गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशात करोनाशी लढा सुरू आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात करोनासाठीचं लसीकरण देखील सुरू झालं. मात्र, अजूनही देशात रोज शेकडोंनी रुग्ण करोनामुळे मरत आहेत. असं असताना देशासाठी करोनाच्या लसींसोबतच अजून एक आशेचा किरण दिसू लागला आहे. Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI अर्थात Drugs Controller General of India नं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७व्या दिवशी करोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Drugs Controller General of India (DGCI) approves emergency use for Zydus Cadila’s Pegylated Interferon alpha-2b, ‘Virafin’ for treating moderate #COVID19 infection in adults. pic.twitter.com/bXBvHZaIBp
— ANI (@ANI) April 23, 2021
झायडसनं जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल ९१.१५ टक्के आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या करोनाबाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे ७ दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
“रेमडेसिविर, लस पुरवठा वाढवा”, पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची मागणी
दरम्यान, विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
“जर रुग्णाला सुरुवातीच्या काळातच विराफीन दिलं, तर करोना विषाणूचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. अतिशय महत्त्वाच्या काळात हे औषध भारतात आलं असून आम्ही करोनाविरोधातल्या या लढ्यामध्ये त्याच्या मदतीने रुग्णांना साथ देऊ”, असं कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले आहेत.