(पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाकडे नुकतेच एक बाड आले असून, ती श्रीमंत संजोयजी भन्साली तथा भाऊसाहेब यांची बखर असल्याचे बोलले जाते. मंडळातर्फे ही बखर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे ती लोकांपर्यंत पोचणार नाही याची खात्री वाटते. म्हणूनच त्या बखरीतील काही प्रकरणे येथे प्रसिद्ध करीत आहोत. ती अभ्यासून वाचकांनी वाद करावा हीच इच्छा.. तेवढेच फुकटात प्रमोशन. दुसरे काय!)
इतिहास तो आम्ही घडवितो!
प्रात:समयी भल्या उठणे ही गोस्ट वैरियावरीसुद्धा कट्टर येऊ नये ऐसे भाव मनी आणोनि भन्साली भाऊसाहेबांनी कूस पालटली. त्यांचे महालाबाहेरी आजूनी शांतता होती. प्रंतु शांतता मनात नाही ऐसे जाहले. ते कारणें निद्रादेवी प्रसन्न होईना. ते पाहोनि आखेरीस भाऊसाहेबांनी शाल कश्मिरी अंगावरची ओढोनी धूम्रकांडी शिलगाऊनी सज्जात उभे राहिले. ते समयी त्यांचे मनी आले ऐसे की मागिलांचे हातूनी जैसे पराक्रम जाहाले तैसे करोनी नाव दिगंतात करावे. प्रंतु ते करणेसाठी काय बरे करावे ऐसे मनी आले. मागिलांनी मोघले आझमामधी शीशमहाल बांधिले. त्याची कीर्त जगामधी आवघी जाहली. नाचगाणे केले. ते करणे हा तो आपुल्या वामहस्ताचा मळ. ते आपण करावे ऐसे भाव मनी आणोनि भाऊसाहेबांनी आपले सचिवांस हाक मारिली व सांगितले की मोघले आझमामधील शीशमहाल तो येथे बांधोनि ते ठिकाणी नाचगाणे करणेचा इंतजाम करणे. ते वेळी सचिव शहाणा बुद्धीचा सागर तो पुसता जाहला की शीशमहाल बांधावयाचा कोठे? त्याकरिता मोघली महाल कुबलसूरत पाहिजे. तो पुण्यपत्तनी कोठूनी आणावयाचा? कां की पुण्यपत्तनी शनवारात वाडा पत्थराचा. त्यात आरसा लावावयाचा हजामतीकरिता तो दगडी भिंतीला खिला ठोकावयाची मारामार. ते ठिकाणी शीशमहाल बांधावयाचा तो कस्ट बहुत व ते इतिहासाशी धरोनी होईल ऐसे नव्हे. ते ऐकोनी भाऊसाहेब रागे जाहाले. इतिहासाचे आम्हांस कौतुक काय सांगावे? इतिहास तो आम्ही घडवितो, ऐसे रागे जाहाले.
शर्थीने घोडे उडवावे..
नौबत लढाई प्रसंगाची करोनि दोन तास लोटले. रणमैदानी एकापरीस एक भीमार्जुनासारिखे महावीर, दर पिक्चरी तलवार गाजविणारे, अंगी वीरश्रीची वारी, रणांगणाचा श्रंगार करोनि, कटितटीस शस्त्रसंभार बांधोनि सिद्ध जाहाले. भाऊसाहेबांनी क्यामेरा रोलिंग व आक्षन ऐशी इशारत देता तोंड युद्धास लागले. दारूण संग्राम जाहला. एकच रणधुमाळी दोन्ही सैन्यांत माजली. धुरें करून दिनमणीचा अस्त जाहला ऐसा भास पडला. प्रंतु भाऊ-साहेबांचे मनी ऐसे की ही काये लढाई म्हणावी? याहूनी टोलीयुद्ध बरवे. प्रतेक्ष बाजीरावासारखे रणगाजी रणधुरंधर येथे लढत असता लढाई भातुकलीची करावी हे शोभायमान नव्हे. हे पाहोनी फिरंगी हालीवूडचे टोपीकर काये म्हणतील? ऐसे म्हणतील की याहूनी मोघले आझमाचे रण भारी! ऐसे म्हणतील की याहूनी रोहितोजी शेट्टीकडील बाजीराव अधिक सिंघम! कां की तो गाडियांवरी गाडय़ा उडवितो व आपुला बाजीराव रणगाजी केवळ युद्ध करितो, ऐसे कालत्रयी होणे नाही ऐसे मनी आणोनि भाऊसाहेबांनी आपले सचिवांस हाक मारिली व हुकुमिले की गाडिया उडविणे ऐसे करावे. ते वेळी सचिव शहाणा बुद्धीचा सागर तो म्हणाला की हे युद्ध मराठियांचे. त्यांचेकडे कोठूनी येणार फियाटी व मारुती व फोक्सव्यागनी? गाडीऐवजी तयांस घोडी प्यार. ते ऐकोनी भाऊसाहेब विचारात पडले की ऐसे कैसे ते श्रीमंत की ज्यांकडे गाडी साधी नाही उडविण्याकरिता? गाडी न उडवावी युद्धप्रसंगी तो लोकांत हंसे होईल. तर काय बरे करावे? प्रंतु इच्छा असेल ते ठिकाणी मार्ग गावतो. भाऊसाहेब गाडी गाडी ऐसा विचार मनी करीत असता अचानक त्यांचे मागुती असलेल्या एका अश्वाने भीमथडी त्यांस हलकेच पदस्पर्श पाश्र्वभागी केला. त्याकारणें भाऊसाहेब ओयओय करोनि ओरडले जोराने, की या घोडियास कोणी उडवा, ऐसे रागेजले. भाऊसाहेबांचे मनी बंदुकीने उडवा ऐसे. प्रंतु अन्यांस वाटले की गाडीऐवजी घोडा उडवा ऐसा ध चा मा जाहला. ते उपरी साऱ्यांनी भाऊसाहेबांची बुद्धी धन्य धन्य ऐशी तारिफ करोनी युद्धास प्रारंभ केला व रश्शीने बांधोनि घोडी शर्थीने उडविली.
पंगुं लंघयते गिरी
काळ तो मोठा कठीण पातला होता. भाऊसाहेबांचे मन डोलायमान जाहले होते. मन नव्हे तो तनसुद्धा डोलायमान जाहले होते. कोणी म्हणे की भाऊसाहेब प्राशनी. ते कारणे तन डोलायमान होणे हे साहजिक. कोणी म्हणे की गतदिनांच्या स्मृती सुरेख आठवोनि ते डोलायमान जाहाले व म्हणोनी त्यांनी हट्टाग्रह बहुत धरिला की ये स्थळीसुद्धा डोलागीत हवेच. प्रंतु संकटे काही सांगोनि येत नाहीत व एकेकटीही येत नाहीत ऐसे जाहले होते, कां की डोलागीत करावयाचे ते कोणी ऐसा सवाल उत्पन्न जाहला होता. ते स्थळी नृत्य करीन ऐशी दीपकलिका एकच. डोलागीती आवश्येकता दो कलिकांची. त्यातील येक अखंड वज्रचुडेमंडित सौभाग्यवती हवी जैशी की माधुरी. ती कोठूनी आणावयाची ऐसा सवाल होता. एकीस विचारता ती म्हणाली की ती अधु पायाने एका व तीस अंग नाचण्याचे नाही व तैशी प्रथापरंप्राही नाही. ते ऐकोनी भाऊसाहेब खिन्न होवोनी बैसले असता त्यांचा सचिव शहाणा बुद्धीचा सागर तो म्हणाला, की मागिलांचे वचन ऐसे की पंगुं लंघयते गिरी. ते ऐकोनी समस्तांस हायसे ऐसे जाहले. इतिहासात दुजे डोलागीतही दाखल होवोनि गेले.
अप्पा बळवंत
balwantappa@gmail.com
भाऊसाहेबांची बखर
भाऊसाहेबांचे मन डोलायमान जाहले होते. मन नव्हे तो तनसुद्धा डोलायमान जाहले होते.
Written by झियाऊद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 06-12-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lessons of history