घर असो किंवा कार्यालय….दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.
लक्ष्मीपूजनाचा ऑडिओ ऐकण्यासाठी खालील ऑडिओ प्लेअरच्या बटणावर क्लिक करा…
यंदा लक्ष्मीपूजन करण्याचा उत्तम मुहूर्त सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत आहे. या प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेर पूजन केल्याने आपल्या कुटुंबावर त्याचा सदैव आशीर्वाद राहील अशी माहिती खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ.सोमण यांनी दिली. अश्विन कृष्ण अमावास्येच्या मुहूर्तावर घरात कुटुंबातील सर्वांच्या उपस्थितीत ही पूजा करावी. यावेळी घरातील लक्ष्मी म्हणजेच धनाची विशेषत्त्वाने पूजा केली जाते. यावेळी देवाला आणि धनाला धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी अभ्यंगस्नान करून देवपूजा, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी (संध्याकाळी) सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजनाचा विधी आहे. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे.
घरामध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे, याचे ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या देश-विदेशातील वाचकांसाठी खास मार्गदर्शन केले आहे गुरुजी अनिल कुलकर्णी यांनी..