बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त यादिवशी असतो. त्यामुळे या दिवशी सोने, घरातील मोठी वस्तू, वास्तू, वाहन यांची खरेदी केली जाते. या दिवशी केलेली खरेदी शुभ मानली जाते. ही खरेदी लाभदायक असते असेही म्हणतात. आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी लोक पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते.

या दिवशी पत्नी पतीला तेलाने मालिश करते. मग उटण्याने आंघोळ घालते. पतीला औंक्षण करते व पती ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दाम्पत्याची पहिली बलिप्रतिपदा पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. यादिवशी जावयाला मुलीच्या कुटुंबाकडून आहेर दिला जातो. आश्विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. या दिवशी घरातील कचरा काढून ‘इडा पीडा टळो’ म्हणून तो कचरा फेकून दिला जातो. बलिप्रित्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान केले जाते.

शुक्रवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी व्यापाऱ्यांसाठी वह्या लेखन करण्यासाठी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत शुभ चौकडी मुहूर्तवेळ असल्याचे पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या वेळेचे पालन केल्यास त्यांच्या व्यवसायात निश्चितच वृद्धी होईल.