शनिवार, रविवारी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी
दिवाळीपूर्वीच बाजारपेठांनी दिवाळी साजरी केली. गेल्या आठवडय़ात ग्राहकांकडून खरेदीसाठी विशेष प्रतिसाद नसल्याने व्यापारी चिंतेत होते. मात्र आता वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्ग रविवारी खरेदीसाठी बाहेर पडला. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीस सुरुवात झाल्याचे चित्र सध्या वसईच्या बाजारपेठेत दिसून आले. शनिवारी व रविवारी संध्याकाळी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.
वसईतील आनंदनगर बाजारपेठ, झेंडा बाजार, विरार येथील रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठ, बोळींज येथील बाजार, सोपारा मार्केट या महत्त्वाच्या बाजारपेठ मानल्या जातात. यंदा दिवाळीचे औचित्य साधून व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध साहित्य दुकानांमध्ये मांडले आहे. १४ व १५ ऑक्टोबर रोजी शनिवार व रविवार असल्याने बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होती.
यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठय़ा प्रमाणावर कात्री बसत आहे. बाजारात साध्या, रंगकाम न केलेल्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या ४ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंत प्रतिनग या भावाने बाजारात उपलब्ध आहेत.
रंगकाम केलेल्या आकर्षक व कुंदनजडीत पणत्या ८० रुपयांपासून १७० रुपयांपर्यंत प्रतिडझन या भावाने विक्री होत आहे. रांगोळ्यांचे स्टीकर, स्वस्तिक व लक्ष्मीची पावले १० ते ३० रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत. रांगोळ्यांचे ठसे, रंग भरण्यासाठी जाळीची झाकणे असलेल्या डब्या व रोल यांनाही चांगली मागणी आहे. त्याचबरोबर दारावरील तोरण आणि झुंबरांचेही विविध प्रकार बाजारात पाहावयास मिळत आहेत. विविध रंग आणि रांगोळ्यांमुळे बाजारपेठा अधिकच खुलून दिसत आहेत. रंग ५ रुपये ५० ग्रॅम या किमतीमध्ये तर रांगोळी मिक्स कलरच्या डब्या यंदा १० रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहेत. रांगोळी पुस्तक १० ते ५० रुपयांपर्यंत असून घरगुती उटणे ५ रुपये एक पॅकेट वसईतील बाजारात उपलब्ध आहेत.
पावसाळी कंदील
यंदा बाजारात नवीन विजेच्या सिंगल पणत्या दाखल झाल्या आहेत, तर रंगांचे विविध प्रकारही एका डब्ब्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे पाऊस अधूनमधून येत असल्याने बांबूच्या आणि कापडाच्या कंदिलाला मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून आले.
वस्तू महाग
यंदा वस्तूंच्या किमतीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दुकानदार संजय सारडा यांनी सांगितले. जीएसटी, नोटबंदी यांचा फटका यंदा बाजारपेठांवर बसल्याने त्यांची कस भरून काढण्यासाठी किमतीमध्ये वाढ झाली आहे, परंतु किमती वाढल्या असल्या तरीही विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे सांगत त्या तुलनेत कपडय़ांच्या दुकानात फार गर्दी नसल्याने व्यापारी चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती
यंदा बाजारपेठेचा ९० टक्के भाग हा भारतीय बनावटीच्या दिवाळीपयोगी वस्तूंनी आच्छादला आहे. चिनी बनावटीच्या मालावर बहिष्कार टाकत नागरिकांची भारतीय बनावटीच्या मालालाच पसंती दिली आहे.