आपल्या ललित लेखनातून लंपनचे निरागस, अद्भुतरम्य आणि अनोखे भावविश्व निर्माण करणारे लेखक प्रकाश नारायण संत यांच्यासोबतच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारे ‘अमलताश’ हे पुस्तक त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी लिहिले आहे. लवकरच ते ‘मौज’तर्फे प्रकाशित होत आहे. या आठवणींच्या हिंदोळ्यांवरील काही अलवार क्षण..
नवीन घरात लावण्यासाठी मी केलेला झाडांचा संग्रह खूपच मोठा होता. इनडोअर प्लँट्स, Cactii, Succulants. त्याशिवाय कुंडय़ांतून पॉलिबॅगमधून तयार करून ठेवलेली कितीतरी रोपं होती. नारळ, आंबा वगैरे झाडं पावसाच्या सुरुवातीला मिळायची होती. पाऊस सुरू व्हायच्या आधी पुढल्या फुलबागेचं आणि मागल्या फळबागेचं प्लॅनिंग करायला हवं होतं. कुठली झाडं कुठं लावायची, किती अंतरावर लावायची, असे सगळे विचार डोक्यात गर्दी करायला लागले होते. मॅझनीनवर घराच्या दर्शनी भागात असलेली प्रकाशांची स्टडी हा आमच्या घराचा सौंदर्यबिंदू! त्यादृष्टीनं लहान आणि मोठय़ा फाटकांच्या जागा लक्षात घेऊन फुलबागेची आखणी करावी लागणार होती.
दोन्ही बागांचे आराखडे मी काळजीपूर्वक ग्राफ पेपरवर तयार केले. फुलबागेतल्या वाफ्याच्या जागा, फळबागेतल्या झाडांमधली अंतरं काटेकोरपणानं मोजून घेतलेली. झाडांच्या जागा निश्चित करून त्यांची नावंही आता ग्राफ पेपरवर आली. प्रकाशना मी आराखडे दाखवले. त्यांनी फेरफार सुचवलेच नाहीत. म्हणाले ‘गो अहेड.’ तिरक्या विटा लावून पुढली बाग इतकी सुरेख आखीवरेखीव दिसायला लागली, की मोठी झालेली, फुलांनी डवरलेली रोपंच माझ्या नजरेसमोर तरळायला लागली.
झाडांनी आपापल्या जागा पकडल्या. पावसात भिजत आमचं झाडं लावणं सुरू झालं. पश्चिमेकडल्या आईच्या आणि आक्कांच्या
(इंदिरा संत) बेडरूमच्या शेजारी चमेली, सायलीनं आपली जागा पसंत केली. हॉलच्या पूर्वेकडल्या खिडकीला टेकून बसावंसं जुईला वाटलं. आणि पूर्वेकडच्याच डायनिंग हॉलच्या मोठय़ा खिडकीच्या दोन्ही कडांना लागून जाईंनी आपलं बस्तान ठोकलं. मधली मोकळी जागा क्रॅब लिली आणि हेलिकोनियमला देऊन, जाईच्या वेलाजवळ असलेल्या पायवाटेपलीकडे लावलेली मोगऱ्याची रोपं पावसाच्या शिडकाव्याबरोबर तरतरून उभी राहिली. आणि त्यांच्या सोबतीनं पांढरा व गुलाबी पाकळीचा कुंद अंग धरायला लागला.
आईने रत्नागिरीहून आणलेले जुईचे दोन्ही वेल आमच्या आताच्या राहत्या घरात छानच पसरलेले आणि कळ्यांचा पाऊस पाडायला लागलेले. लहानपणी आजीच्या घरात राऊंड टेबलावर जुईचे गजरे करायला आम्ही बसत असू. त्याची आठवण आमचं इथलं डायनिंग टेबल करून देणारं. म्हणूनच या दोन वेलांपैकी एक मुळासकट काढून आम्ही इथं या नवीन घरात आणलेला. दुसरा आमची आठवण म्हणून घरमालकांसाठी तिथेच राहू दिलेला.. आणि गजरे करणाऱ्या आम्ही
तिघीजणी आई, उमा आणि मी.. माझ्या सुरंगीच्या झाडांसाठी मी घराच्या पश्चिमेकडच्या भिंतीच्या दोन्ही कोपऱ्यांपासून थोडय़ा अंतरावर दोन जागा राखून ठेवल्या होत्या.
 बघता बघता कागदावरच्या बागेचा नकाशा घराच्या पुढं-मागं-बाजूला हुबेहूब उतरला. आंब्या-फणसाच्या आणि माडांच्या झाडाबरोबर लावलेलं नीरफणसाचं छोटंसं रोप आज्जीच्या परसातल्या- छोटे गोल गोल फणस अंगभर लेवून उभ्या असलेल्या भल्यामोठय़ा नीरफणसाच्या वृक्षाची आठवण करून द्यायला लागलं. सगळ्यांत महत्त्वाच्या कुंडय़ा होत्या त्या प्रकाशनी अभ्यासपूर्वक केलेल्या तीन बोन्सायच्या- वड, पिंपळ आणि औदुंबर. सुंदर पारंब्या आलेला वड आणि उंबरे लगडलेला औदुंबर!
अंतुले सरकारच्या सिमेंटच्या संदर्भातल्या धोरणामुळे आमचं बजेट कोलमडून गेलं होतं. पैसे उभे करण्याचा एकच मार्ग आमच्या हातात होता- माझे दागिने! प्रकाशांच्या सहवासामुळे माझे विचारही माझ्या नकळत बदलत गेले होते. दागिने वापरण्यात मला स्वारस्य राहिलं नव्हतं. प्रकाश सोन्याला ‘पिवळा धातू’ म्हणत आणि ‘बैलासारखं सजायला का आवडतं बायकांना कळत नाही,’ हे त्यांचं आवडतं वाक्य असे. तरीही माझे मोठे दागिने विकायचा प्रस्ताव जेव्हा मी त्यांच्यासमोर मांडला तेव्हा तो त्यांना सहजपणे स्वीकारता येईना. ‘ते तुझं स्त्रीधन आहे. मला अपराध्यासारखं वाटतं,’ असं वाक्य त्यांच्या तोंडून आल्यावर त्यांची समजूत घालावी लागली होती..  आणि प्रकाशांचं ऑपरेशन, आर्थिक ओढाताण, इतर प्रापंचिक अडचणींतून मार्ग काढून आमची नवीन वास्तू दिमाखात उभी राहिली होती..
२ सप्टेंबर १९८३ च्या मुहूर्तावर आम्ही गृहप्रवेश केला आणि माझा ट्रान्सपोर्ट बिझिनेस चालू झाला. रात्री पॅकिंग करणं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी गाडीतून सामान नेऊन नवीन घरात ठेवणं. घरातल्या भिंतींना अगदी फिक्कट मोतिया रंग देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी, चित्रांनी रंग भरून काढायचे, असं आम्ही ठरवलं होतं. प्रकाशनी काढलेलं, ताईंच्या घरी असलेलं पर्वतीचं तैलचित्र आक्कांनी पूर्वीच कधीतरी आपल्या ताब्यात घेऊन केव्हातरी आमच्यापर्यंत पोचवलं होतं. डायनिंग हॉलमधली त्याची जागाही ठरलेली होती. आपली जलरंगांतली काही निवडक चित्रं प्रकाशनी फ्रेम करून ठेवली होती; आणि त्यांच्या बैठकीच्या खोलीतल्या, बेडरूम्समधल्या आणि जिन्याच्या लँडिंगवरच्या जागाही त्यांनी ठरवून ठेवल्या होत्या.
डिव्हायडरचं डिझाइन प्रकाशनी स्वत:च फार विचारपूर्वक केलं होतं. नुकताच घेतलेला शार्पचा टू इन वन, स्पीकर्स आणि कॅसेट्सचा संग्रह यांना त्यांच्या आकाराचे कप्पे मिळाले होते. या नवीन पाहुण्यांबरोबर आमच्या जुन्या रेकॉर्डप्लेअरला आणि रेकॉर्डबॉक्सला प्रतिष्ठेची जागा द्यायला प्रकाश विसरले नव्हते. काही उघडय़ा कप्प्यांत प्रकाशांची आवडती निवडक पुस्तकं दिसायला लागली होती. त्यांत मानानं मिरवत होता त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध! एका उघडय़ा कप्प्यात काही देखण्या भूरत्नांना नेमकी जागा मिळाली होती.
डिव्हायडरच्या काही मोकळ्या चौकटी माझ्या पुष्परचनेसाठी ठेवलेल्या. डायनिंग हॉलमधल्या भिंतीवर लावलेलं प्रकाशांचं पर्वतीचं तैलचित्र या चौकटीतून सुरेख दिसायचं. पण आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष वेधून घेत असे आमचा ड्रय़ूझ- हॉलचा मानबिंदू. एका देखण्या दगडाचा अर्धगोल त्याच्या खास जागेत विराजमान झालेला. त्याच्या नैसर्गिक खोबणीमध्ये बल्ब लावून त्याच्या अंतरंगातले पांढरेशुभ्र पारदर्शक स्फटिक प्रकाशनी अजूनच उजळून टाकलेले. प्रत्येकाला तो दाखवताना सोबत यायची ती कथा! भर पावसाळ्यातली काही इंजिनीयर्सबरोबर कोयनानगरला आम्ही केलेली सफर.. आम्ही सगळे चिखलानं माखलेल्या त्या मोठय़ा गोल दगडाला ओलांडून पुढं जाणारे आणि प्रकाश तिथंच थबकलेले. दगडावरचा चिखल बाजूला करत न्याहाळत असलेले. मग तो फोडताना झालेले त्याचे तीन तुकडे. एक हा अर्धगोल आमच्याकडे आलेला आणि उरलेले दोन चतकोर इंजिनीयरद्वयांनी घेतलेले. या कथेबरोबर मला आठवतं ते प्रकाशांचे त्यावेळी खरचटलेले दोन्ही हातांचे तळवे! घरी आल्यानंतर स्वच्छ धुऊन तो जडशीळ ड्रय़ूझ टेबलावर ठेवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद आणि त्यांनी उच्चारलेले ते शब्द- ‘ छ्रऋी-३्रेी रस्र्ी्रूेील्ल आहे हा सुधा. एखाद्यालाच मिळतो.’
प्रकाशनी मला विचारलं, ‘सुधा, आपल्या घराचं नाव काय ठेवायचं?’ ‘मला काय विचारता? खरं म्हणजे माझी खात्री आहे- नाव तुमच्या मनात नक्कीच तयार असणार. उगीच आपलं मला विचारायचं म्हणून विचारता.’ मी म्हणाले होते. आणि अचानक एके दिवशी प्रकाशनी घराचं नाव सुचवलं- ‘अमलताश!’ – आमच्या अत्यंत आवडीच्या बहावा वृक्षाचं दुसरं नाव! प्रकाशांच्या मनाच्या गाभाऱ्यातून आलेलं सुंदर नाव.
‘महाराष्ट्र टाइम्स’मधून झाडांवर लिहिल्या जाणाऱ्या लेखांवर प्रकाश आणि मी लुब्ध झालो होतो. शरदिनी डहाणूकर या नावाची ओळख झाली ती अशी- त्यांच्या लेखांतून. आम्हाला प्रिय असलेली कितीतरी झाडं त्यांच्या लेखांतून आपापल्या तपशिलांसकट, देखण्या रूपात नजरेसमोर उभी राहत होती. आमच्या माहितीत कितीतरी भर पडत होती.
प्रकाशनी शरदिनीबाई डहाणूकरांना पत्र पाठवलं. ‘अमलताश’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी. समोरच्या कुंपणालगत लावलेली बहावाची- अमलताशची झाडं वाढत होती. त्यांच्या पोपटी पानावर एक वेगळीच कांती चढलेली आम्हाला दिसायला लागली. शरदिनीबाईंच्या पत्रावरून समजलं- ‘अमलताश’ हे बहावाचं बंगाली नाव! घराला या झाडाचं नाव देण्याची कल्पना त्यांना विलक्षण वाटली होती.. माझी झाडंही तयार होती.
घर आमच्या येण्याची वाट पाहत होतं आणि आम्ही ३१ ऑक्टोबर १९८३ ला संध्याकाळी आमच्या नवीन घरात राहायला आलो! सगळ्यांची मनं आनंदानं, समाधानानं भरून गेली होती. पावसालाही येता येता आम्हाला चिंब भिजवून ती आणखीनच शांत करावीशी वाटली. घरात प्रकाशांचे खास मंद प्रकाशाचे दिवे लागले आणि घरानं आपलं एक वेगळंच सौंदर्य आम्हाला दाखवलं. त्या मंद प्रकाशात आमचं लक्ष गेलं ते कितीतरी प्रकारच्या कीटकांकडे. पावसाची पाखरं तर होतीच पण इतरही अनेक. या भागातलं हे आमचं एकमेव घर. प्रकाश म्हणाले, ‘खरं तर या वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचं, किडय़ांचं हे निवासस्थान! बागेत साप निघाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. या सगळ्यांच्या निवासस्थानावर आपण केलेलं हे अतिक्रमण आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणं.’ हे किडे-कीटक नंतर कितीतरी दिवस संध्याकाळी दर्शन देत होते. हळूहळू त्यांची संख्या कमी होत ते दिसेनासे झाले. आमच्या अतिक्रमणामुळं आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्थलांतर तर केलं नसेल?
आमचा रस्टी मालकाच्या पाठोपाठ आनंदानं नवीन घरात राहायला आला आणि घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन, हुंगून आपल्या सोयीची जागा कुठली आहे, हे त्यानं पाहायला सुरुवात केली. आमच्या बोक्यानं- धन्यानं मात्र नवीन घरी यायला साफ नकार दिला. अनीनं काय काय प्रयत्न करून त्याला आपल्या खोलीत कोंडून ठेवलं.. त्याच्या खाण्यापिण्यासकट. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीचं दार उघडायला लागल्यावर अनीला कळायच्या आत त्यानं सूर मारला. जिना उतरून आम्हाला कळायच्या आत कॉटेज हॉस्पिटलचं कंपाऊंड ओलांडून क्रॉस कन्ट्री करत तो जुन्या घराच्या परिसरात पोचलादेखील.
नवीन घराची- आमच्या स्वत:च्या घराची- आम्हाला आणि आमची आमच्या घराला आता सवय व्हायला लागली. ज्या घरानं आम्हाला या घराची वाट दाखवली, त्या आमच्या जुन्या प्रसन्न घराची आठवण काही आमच्या मनातून पुसली जाणार नव्हती. रोज बोलण्यात त्या घराची, तिथल्या दिवसांची एखादी तरी आठवण निघायचीच. शिवाय पुढल्या दारातून त्या घराभोवतालचं पांढरं कपाऊंड दर्शन द्यायचं.
 नवीन घरात राहायला गेल्यानंतर पत्रं यायला सुरुवात झाली. पहिलं पत्र आक्कांचं आलं- ‘आता तुम्ही घरात रमला असाल. नवीन घराचं सुख भरभरून घेत असाल. चंदूची स्टडी, सुधाचा दवाखाना आणि बाईंचं देवघर. . हा अनुभव काही विलक्षण असणार. आता घर केव्हा एकदा पाहीन असं झालं आहे.
सध्या मी एक नवीन उद्योग अंगावर घेतला आहे. दर रविवारी ‘सकाळ’मध्ये माझे एक सदर असणार आहे-‘मृद्गंध!’ पाच लेख पाठवले आहेत. वेळ छान जातो. मनातील विचार लांब राहतात आणि लेख लिहून झाला की प्रसन्न वाटतं. कोणताही विषय आणि केवढाही लेख. मागच्या दोन कथासंग्रहांनंतर हे गद्य आताच लिहिलं आहे.’
गुरुजींच्या सांगण्यावरून सोयीसाठी म्हणून आम्ही गृहप्रवेश करून सामान हलवून नवीन घरात राहायला आलो, ते इथे रूळल्यानंतर वास्तुशांत करायची असं ठरवून. दिवाळीच्या कामातून डोकं वर निघतं न निघतं तोवर वास्तुशांतीच्या तयारीला सुरुवात झाली. आईच्या उत्साहाला पारावार नव्हता. तिनं भेट दिलेल्या भूमीवर लेकीनं-जावयानं वास्तू उभी केल्यानंतरची तृप्ती, समाधान तिच्या मनात काठोकाठ भरून राहिलेलं. कृतकृत्यतेची जाणीवही मनभर पसरून राहिलेली. तिचं वैयक्तिक दु:ख तिनं केव्हाच आमच्या आनंदात, समाधानात बुडवून टाकलं होतं. त्याचा चुकूनसुद्धा कधी तिनं उच्चार केला नव्हता. जणू काही तिच्या आयुष्यात अप्रिय, कटू असं काही घडलंच नव्हतं.
२१ नोव्हेंबर १९८३ ला आमच्या नवीन वास्तूची शांत आनंदानं पार पडली. प्रकाशना आता शारीरिक स्वास्थ्य होतं. नवीन स्टडीत बसून खूप वाचन करता येत होतं. त्यांच्या पुस्तकसंग्रहात सतत भर पडत होती. हिवाळ्याची चाहूल नुकतीच लागली होती. स्टडीतल्या दोन भिंतींचा कोन साधून काटकोनात लावलेल्या खिडक्यांपैकी डावी खिडकी पूर्वेकडली. सकाळच्या वेळी या खिडकीतून सूर्य वर येताना दिसायचा आणि सकाळची कोवळी उन्हं स्टडीतल्या टेबलावर उतरायला लागायची. या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत वाचन करायला प्रकाशना खूप आवडायचं. वाचन करायचं नसलं की, बाभळीवर किंवा विजेच्या तारांवर येणारे विविध प्रकारचे पक्षी न्याहाळता यायचे. त्याच्याही पलीकडे डोळे लावले तर आमच्या जुन्या घराभोवतालची पांढरी भिंत आणि रस्टी बसत असलेला रॅम्प नजरेच्या टप्प्यात यायचा आणि त्या घरातल्या आठवणींना उजाळा यायचा. बागेत लावलेली बहावाची झाडं पावसाचा शिडकावा अंगावर घेत चांगलीच मोठी झाली होती. वाफ्यातील हंगामी फुलझाडं फुलून बागेला रंग-रूप-गंध द्यायला लागली होती. खिडकीतून होणारं हे बागेचं दर्शन खरंच सुखाचं होतं.
समोरच्या विजेच्या तारेवर पंगतीला बसल्यासारखे ओळीत बसलेले वेडे राघू, त्यांच्या फिकट हिरव्या रंगाला डोक्यावरच्या तांबूस रंगाने आणलेली शोभा आणि उठून दिसणारी डोळ्यांतल्या काजळाची रेषा भुरळ पाडायची. एखादा किडा पट्दिशी चोचीत पकडून, तारेवर आपटून चोच वर करत गट्टम् करत चाललेलं त्याचं भोजन पाहायला मिळे.
कॉमन आयोरा या पक्ष्यानं घातलेली एकसुरी शीळ आणि शीळ संपतानाच समेवर आल्यासारखा शिळेचाच तुटलेला छोटासा तुकडा अनी तंतोतंत आपल्या शिळेत उतरवायचा. मधूनच पंख उभारल्यानं तुकतुकीत काळ्याभोर रंगाआडचा क्षणभरच दिसणारा मॅगपाय रॉबिनचा आतल्या पिसांचा शुभ्र रंग त्यानं आम्हाला कितीदातरी दाखवला होता. पांढऱ्या शर्टावर घातलेल्या या काळ्या कोटानं वकीलसाहेबांची आठवण यायची. लालबुडय़ा बुलबुल आणि नाचण यांच्या जोडय़ांना तर तोटाच नव्हता. बुलबुलानं डोक्यावरची टोपी मिरवत केलेली कुजबूज मागील दाराच्या अनंताच्या झाडावरून ऐकू यायची. आणि त्याच्या जोडीला आम्हाला सगळ्यांना हवेहवेसे वाटणाऱ्या ‘नाचण’चं शेपटीचा पंख फुलवत, फांदीवर नाचत, तालात केलेलं नर्तन आणि सुरेल आवाजातलं गायन असायचं. आणि ब्राह्मणी मैनांच्या घोळक्यानं केलेल्या भांडणाचा आवाज या सुरांवर मध्येच केव्हातरी कुरघोडी करायचा. वेडय़ा राघूंच्या मालकीच्या तारेवर मधूनच दुहेरी शेपटीचा कोतवाल हजेरी लावायचा. खंडय़ाचंही दर्शन कधी कधी व्हायचं. संध्याकाळच्या वेळी बाभळीवर हेरॉनचा थवा आपल्या माना मुरडत अलगद उतरायचा. बाभळीची काळी खडबडीत खोडं, फांद्यांना चिकटून असलेली बारीक बारीक पानांची हिरवीगार पालवी आणि अधूनमधून दिसणारी हेरॉनची पांढरीशुभ्र लंबवर्तुळं अशा सुंदर नैसर्गिक चित्रांचं दर्शन घडायचं. चिमण्यांना मात्र वेळेचा काही विधिनिषेध नव्हता. त्यांना बागेपेक्षा दिवाणखाना आणि जेवणघरच पसंत पडायचं. घरानं जमवायला सुरू केलेल्या या मित्रमंडळींशी मैत्री करायला कुणालाही आवडलं असतं.
एकदा दुपारचं जेवण झाल्यावर बेसिनकडे हात धुवायला गेल्यावर माझी नजर मागच्या दारातून पाण्याच्या टाकीजवळच्या उन्हाच्या पट्टय़ाकडे गेली. जवळजवळ सहा-सात फूट लांबीचा, जाडजूड साप पाण्याच्या टाकीला टेकून शांतपणे पसरला होता. उन्हात चमकणाऱ्या त्याच्या पिवळट चॉकलेटी तेजस्वी कांतीनंच माझं लक्ष वेधून घेतलं होतं. मी चटकन सगळ्यांना हाक मारली. अजुनी स्वारी सुस्तच होती. ती धामण होती! आम्ही घरात राहायला आलो त्या संध्याकाळी घरात दिसलेले विविध प्रकारचे किडे, छोटी पाखरं पाहिल्यावर उच्चारलेली प्रकाशांची वाक्यं आठवली. ही सगळी नेटिव्ह मंडळी आणि आम्ही उपऱ्यांनी त्यांच्या जागेचा कब्जा घेतला होता.
‘सकाळ’मधल्या ‘मृद्गंध’ या नवीन सदरासाठी पाच लेख पाठवून देऊन आक्का इथं आल्या. त्यांच्या आणि आईच्या गप्पा खालच्या बेडरूममध्ये चालत. लिहिण्यासाठी एकांत हवा म्हणून आक्का दवाखान्याच्या खोलीत बसत. पुढचं लेखन सुरू झालं होतं. लेख लिहून झाला की आधी त्या प्रकाशना वाचायला देत. सुधारायला हवा का, विचारत. आणि मग तो पाळीपाळीनं आमच्या हातांत येई. ‘भयावहाचे नोंदणीघर’, ‘लळा गोजिरवाण्या पाखरांचा’, ‘त्रिदळाची साखळी’ हे लेख त्यांनी इथं लिहिले. कॉटेज हॉस्पिटल कंपाऊंडमधली पोस्टमॉर्टेम रूम एका सुंदर लेखाचा विषय होऊ शकते? चकितच व्हायला झालं. आम्ही हा इथला प्लॉट घ्यायला निघालो तेव्हा समोरच दिसणाऱ्या या इमारतीबद्दल कितीतरी जणांनी आक्षेप घेऊन आम्हाला सावध करायचा प्रयत्न केला होता. आणि आता आक्कांनी तिला ‘अक्षर’ करून टाकलं होतं. प्रकाशना त्या विषय सुचवायला सांगत. प्रकाशांनी पुरवलेल्या कितीतरी विषयांवर दोघांची चर्चा होई. कुवेशीतल्या आक्कांना विसर पडलेल्या, प्रकाशांच्या जिऑलॉजिस्ट या नात्यानं मिळालेल्या जंगलातल्या अनुभवांची उजळणीही अशीच एकदा ऐकायला मिळाली होती. मला हा अनुभव अगदी नवाकोरा होता.
बेळगावच्या महिला विद्यालयाच्या हीरक-महोत्सवाचं निमंत्रण आल्यामुळं आक्कांना बेळगावला जावं लागलं. त्यांचं प्रकाशना पत्र आलं, ‘कराडची खूप आठवण येते. तुमची सर्वाची. घराची. माझे दिवस कसे गेले, कळलंच नाही. ही त्या नवीन घराची किमया.’
प्रकाशना आवडत असलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र. त्यातला त्यांनी केलेला टिळकांचा उल्लेख प्रकाशना फार आवडे.
आक्का ‘सकाळ’मधून लिहीत असलेल्या लेखांत नानांचा उल्लेख ‘संत’ किंवा ‘नाना’ असा करावा, असं प्रकाशना वाटायचं. आक्का इथं असताना या विषयावर बोलणंही झालं होतं.
प्रकाशना आक्कांचं नुकतंच पत्र आलं होतं. सलग एक आठवण करण्यापेक्षा प्रत्येक लेखात आठवणींचा शिडकावा मला बरा वाटतो. ‘संत’विषयी समजले. मी तो विचार केला. तू  म्हणतोस त्या लक्ष्मीबाई टिळक ख्रिश्चन संस्कारातील. माझे तसे नाही. जे मी कधी केले नाही ते नको वाटते. आडनावात मला त्रयस्थपणा जाणवतो. त्यापेक्षा ‘नाना’ हे बरे वाटते. तेच यापुढे वापरावे. कंसात ‘संत’ लिहावे. हे बरे ना? तू दिलेल्या विषयावर मी लिहिलेला लेख ‘मनोमनीच्या पाऊलवाटा’ तुला कसा वाटला? तुमच्या घरासमोरच्या पोस्टमॉर्टेम इमारतीवरचा लेख इकडे पुष्कळांना नवीन वाटला. ‘भयावह..’ मध्ये साखळी कुठे तुटली हे कळव. म्हणजे आताच दुरुस्त करेन. तुझ्या दुसऱ्या विषयावरचा- झाडांवरचा लेख आता मी तयार केला आहे.. ‘तरुवरांची मांदियाळी’ – वृक्षांचे काही ग्रुप स्वयंभूच असलेले. त्याच्यावर- अरगन तळ्याजवळची चारपाच झाडे-दाल सरोवरातील बेटावरील झाडे इत्यादी इत्यादी. आता तुझ्या धुके-रानफुले या लेखाचे नाव तर सुचले आहे- ‘अरसिक किती हा शेला!’ पण अजून आकार येत नाही!  तुझ्या घराचे नाव आवडले, फार सुंदर. खरे म्हणजे माझ्याऐवजी तूच लिहायला सुरुवात करायला हवी होतीस.’..
(चित्रे: प्रकाश नारायण संत)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा