गेल्या १०-१५ वर्षांत आपला चित्रपट आणि चित्रपटसंस्कृतीत आमूलाग्र बदल झालेला आहे.. आजही होतो आहे. चित्रपटांची कार्यसंस्कृती, चित्रपटांचे विषय, आशय, सादरीकरण, तंत्रातील अत्याधुनिकता, चित्रपटांचं प्रदर्शन, त्यांची आर्थिक गणितं, प्रेक्षकांची बदललेली अभिरूची आणि मल्टिप्लेक्स संस्कृती या सगळ्याचा सर्वागीण वेध..
‘जगणं अन् फिल्म्स हे वेगळं असू शकत नाही. मला फिल्म्स करता आल्या नसत्या तर काय करत असतो देव जाणे. फिल्म हे माझ्या अभिव्यक्तीचं साधन आहे, याची जाणीव झाल्यापासून मी सेल्युलॉइडवर व्यक्त होत आलोय. ती केवळ प्रतिक्षिप्त क्रिया नव्हे, तर कधी कधी मनातल्या गोष्टींना मूर्त रूप देण्याचा तो प्रयत्न आहे..’ हे सांगताना दाढीवरून हात फिरवत फिरवत बोलणाऱ्या निर्माते- दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या डोळ्यांत गहिरेपण अधिकच दाटून येतं. फिल्म्सबद्दल बोलताना अनुरागचा आवाज अकस्मात गंभीर झाल्यासारखा वाटतो. आपल्या चित्रपटांविषयी तो किती गंभीरपणे विचार करतो, हे त्याच्या चित्रकृतींतून त्याने आतापर्यंत सिद्धही केलंय. तथाकथित स्नॉबिश अशा हिंदी चित्रपट उद्योगाला वास्तवदर्शी फिल्म्सची चव नव्याने चाखायला लावणारा हा दिग्दर्शक.
त्याचं बोलणं शांत आहे. पण त्यातून तो आग ओकत असतो. त्याच्या बोलण्यात सतत डोकावते ती बंडखोरी. अनुरागचं वेगळेपण हे आहे. म्हणूनच तर ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या प्रमोशनची टॅगलाइन होती- ‘कह के लूँगा!’ ही जणू प्रस्थापित फिल्ममेकर्सना त्याने दिलेली धमकीवजा सूचनाच होती! ‘हा माझा ‘अॅटिटय़ूूड’ आहे,’ हे सांगायला तो विसरत नाही.
‘पाँच’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एण्ट्री वगरे नाही, तर सरळसोट धडक मारण्यासाठी अनुराग सज्ज झाला होता. मात्र, तो चित्रपट अद्याप प्रदíशतच झालेला नाही. त्याने दिग्दर्शित केलेला ‘ब्लॅक फ्रायडे’ कायदेशीर अडथळ्यांची शर्यत पार करत असताना त्याच्या ‘ट्रेन टू महाकाली’ या शॉर्ट-फिल्मने तो चच्रेत आला. रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ची पटकथा त्याने लिहिली होती. अनुरागचं वैशिष्टय़ हे, की तो समकालीन फिल्ममेकर्स अन् त्यांच्या कलाकृतींवर बिनधास्त बोलतो. पंगा घेण्यात हा कलंदर कलावंत माहीर आहे. तिरपागडं, वेडंवाकडं बोलून लक्ष वेधून घ्यायलाही तो मागेपुढे बघत नाही. त्याचा हा सगळा अॅटिटय़ूड इतर लोक सहन करतात, ते त्याच्या कलासक्ततेमुळे आणि त्याच्या कामाच्या शिस्तीमुळे. चित्रपटसृष्टीत सगळं काही बेभरवशाचंच, असं आता-आतापर्यंत मानलं जायचं. परंतु नव्या दमाच्या सर्जनशील फिल्ममेकर्सनी याला छेद देत आपल्या कामात कमालीचे नियोजन आणि शिस्त आणली आहे. अनुराग याच जातकुळीतला बिनीचा शिलेदार. अनुरागचं यावर काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
‘बॉलीवूडमध्ये शिरलेलं ‘कॉर्पोरेट कल्चर’ चित्रपटसृष्टीच्या पथ्यावर पडलंय का?,’ असं विचारल्यावर अनुराग सांगतो, ‘बॉलीवूड आता कुठे संक्रमणावस्थेतून बाहेर पडतंय. चाकोरीबाहेरच्या प्रयत्नांना आत्ता आत्ता यश मिळू लागलंय. आपल्याला या साऱ्या गोष्टींचा थेट संबंध केवळ अर्थकारणाशी जोडता येणार नाही. चित्रपटाचा विषय, मांडणी अन् त्यातली आशयघनता या साऱ्याशी त्याची नाळ जोडलेली आहे. अर्थात पशाचं सोंग आणता येत नाही, या नियमाला सिनेसृष्टीही अपवाद नाही. कॉर्पोरेटच्या ‘मिडास टच’मुळे सिनेसृष्टीला सोनेरी दिवस आले आहेत, हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवं. यापूर्वी एखादा सिनेमा प्रदíशत करायचा, तर तो निर्णय एखादी व्यक्ती किंवा कुटुंब घ्यायचं. पण आता चित्रपट करायचा असल्यास विषय कोणता असावा, इथपासून तो प्रदíशत करताना त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असेल, याचा निर्णय कॉर्पोरेट कल्चरसारखाच इथेही घेतला जातो. परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून होणारी देवाणघेवाणही आपल्या चित्रपटांच्या पथ्यावर पडली आहे. परदेशी स्टुडिओज्सोबत हातमिळवणी केली की कलाकृतीला उभारी मिळते, हेही आताशा आपल्या लक्षात येतंय. म्हणून सर्जनशीलतेतही आज देवाणघेवाण होते आहे. यामुळे आपल्या चित्रपटांमध्ये तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी परदेशी तंत्रज्ञ उपलब्ध होतात. ही देवाणघेवाण आपल्या चित्रपटांचा दर्जा उंचावण्यासाठी नक्कीच फलदायी ठरते आहे.’
‘बॉलीवूडसारखा मोठा उद्योग जेव्हा कामाच्या पद्धतीसंबंधीच्या आपल्या वृत्तीत आणि धारणेत बदल करायचं ठरवतो, यातच सारं काही आलं. फारशी रिस्क न घेता वेगळे प्रयत्न करण्यात सातत्य बाळगायचं तर त्यासाठी कॉर्पोरेट इंटरेस्ट आणि मल्टिप्लेक्सेस या द्विसूत्रीने हुकूमत गाजवता आली पाहिजे, हे नव्या दमाच्या फिल्ममेकर्सना पटलंय,’ हे स्पष्ट करताना अनुरागच्या नजरेत वेगळीच चमक जाणवते. अनुरागने नेमका हाच फॉम्र्युला यशस्वी केला आहे, हे आपल्याला पटतं.
बॉलिवूडमध्ये रुजलेल्या कॉर्पोरेट कल्चरबद्दल तो खूप काही सांगू पाहतो. ‘कॉर्पोरेटच्या आगमनामुळे फिल्म बिझनेसकडे बॅलन्सशीटच्या नजरेतून पाहिलं जाऊ लागलं. प्रत्येक गोष्टीचा ताळेबंद आला की, आपोआपच उत्तरदायित्वही येतं. आणि त्यातून संपूर्ण व्यवस्थेतच एक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न होतो. पूर्वी एखादा चित्रपट करायचा म्हटला की, नयनरम्य थंड हवेच्या ठिकाणी अख्खं युनिट घेऊन जायचं.. मग कोणीही तिथून हलण्याची शक्यता नाही, अशा भ्रमात निर्माता असायचा. परंतु त्या गोष्टीसाठी अनुरूप लोकेशन्स असली तरी सेटवर हीरो वा हीरॉइन वेळेत पोहोचेल तर शप्पथ. त्यावेळी गुणगान गायलं जायचं ते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं. कारण तेव्हा वक्तशीर असलेला हा एकमेव सुपरस्टार होता. पण आता हे वातावरण राहिलेलं नाही. आता गोष्टीचा विचार होतानाच त्याच्या लोकेशन्सचाही विचार होतो.. वस्तुनिष्ठता जपण्याचा आटोकाट प्रयत्न होतो. प्रेक्षकांनाही गृहीत धरलं जात नाही. पूर्वी लोकेशन्सवर नाही झाली एखादी गोष्ट; तर स्टुडिओमध्ये उरकून घेऊ, असा अॅटिटय़ूड असायचा. आता असा विचार करण्याची पण किंमत मोजावी लागते. जिथे प्रॉडक्शन मॅनेजरचा लाइन प्रोडय़ुसर झालाय, तिथं साऱ्याच गोष्टी बदलल्या नाहीत तरच नवल. बदलाचे हे वारे इंडस्ट्रीच्या पथ्यावर पडले आहेत,’ असं विधान अनुराग जरा सावधपणेच करतोय, हेही त्याच्या देहबोलीतून जाणवतं.
आज कप्प्याकप्प्यांत काम करणं कमी झालंय. त्याविषयी बोलताना अनुरागने सांगितलं, ‘लोकेशन कागदावर निश्चित झालं म्हणून कोणीही उठून शूटिंगसाठी जात नाही. दिग्दर्शकासोबत अगोदर डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी पाहणी करतो. त्यावेळी त्याच्याकडे गोळीबंद स्क्रिप्ट असते. कोणता सीन कुठे चित्रित होईल, याचे आडाखे त्यावेळी बांधले जातात. यावेळी लाइन प्रोडय़ुसरही तिथे असतो. अगदी कॅमेरासाठी जिमी जीब असेल की पँथर, स्टेडी कॅम की ट्रॉली.. इथपासून किती लोकांचं युनिट असेल, जेवण कुठून मागवायचं, व्हॅनिटी व्हॅन कुठे पार्क करायच्या.. इथपर्यंत साऱ्या गोष्टी युनिटमधल्या प्रत्येकाला माहीत असतात. अन् कॉर्पोरेटमधल्या मार्केटिंग टीमपासून अगदी क्रिएटिव्ह हेडपर्यंत सारेचजण या निर्मितीप्रक्रियेचा घटक असल्यामुळे त्यांच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या असतात..’ हे सांगताना खरं तर ज्यावेळी सिनेमा करायचं निश्चित होतं, त्याचवेळी फिल्म टीम अन् कॉर्पोरेट्समध्ये पारदर्शकतेचा अलिखित करार झालेला असतो,’ हे अनुराग नकळतपणे सूचित करतो.
डेट्स, शेडय़ुलमध्ये आज कमालीचा आखीवरेखीवपणा आलाय. त्याबद्दल अनुराग म्हणतो, ‘फिल्म करायची तर त्याचं बजेट काय, इथपासून सुरुवात होते, मग त्यात शॉट्स डिव्हिजन.. दिवसा कोणते, रात्री कोणते.. फिल्म डिजिटलवर शूट करायची की.. फिल्म फॉरमॅटबद्दल निर्णय घेतला जातो तो बजेट अन् सिनेमॅटोग्राफरच्या सहमतीनेच. या साऱ्या गोष्टींचं आरेखन केलं जातं. कलाकारांच्या तारखा.. कॉम्बिनेशन डेट्स अन् त्यानुसार शूटिंगचं शेडय़ुल आखलं जातं. त्यानंतर कलादिग्दर्शक, संगीतकार यांच्या बठका.. एकूणच फिल्मचा पोत कसा असेल, रंगसंगती काय असेल, इथपासून कॉश्च्युम्स काय असतील.. या साऱ्या गोष्टींना आज अनन्यसाधारण महत्त्व आलंय.’
‘वानगीदाखल सांगायचं झालं तर भारतातील पहिलीवहिली फूड फिल्म..’ असं म्हणून त्याच्या ‘लव्ह शव्ह ते चिकन खुराना..’कडे तो लक्ष वेधतो. ही फिल्म तो ‘यूटीव्ही’सारख्या बडय़ा कॉर्पोरेटसोबत करतोय. नवा दिग्दर्शक, मांडणीपासून अनेक बाबतीत ही फिल्म वेगळी आहे, असं त्याचं म्हणणं. आजच्या चित्रपटांतील मांडणीचं वेगळेपणही त्याच्या बोलण्यातून व्यक्त होतं- ‘स्वत:ला तपासून पाहण्याचा खेळ प्रत्येकाने करावा. फिल्मशी जोडल्या गेलेल्या माणसाने हा खेळ नव्याने अनुभवण्यात प्रचंड गंमत असते, हे खेळ खेळणाऱ्यालाच अनुभवता येईल. रात्री पाहिलेल्या स्वप्नासारखीच गंमत असते ही. त्यामधला प्रत्येक क्षण इतरांना सांगता येतोच असं नाही,’ हे सांगताना अनुराग मंदसा हसतो.
चित्रपट प्रदर्शित होताना त्याची वेगवेगळ्या प्रकारे पब्लिसिटी करताना प्लॅनिंगचे डावपेच आज अनिवार्य ठरतात. त्याविषयी अनुराग उत्साहाने सांगतो- ‘आज आऊटडोअर शूटच्या वेळी या गोष्टी अत्यंत बारकाईने पाहिल्या जातात. कारण स्टुडिओमधलं शूटिंग हे कंट्रोल सिच्युएशनमधलं असतं. आजच्या घडीला एखादा सिनेमा करताना जेवढं फूटेज शूट केलं जातं, त्यापेक्षा कमीत कमी तिप्पट फूटेज हे त्या सिनेमाच्या मेकिंगचं असतं. डॉक्युमेण्टेशन हा त्यामधला भाग आहेच; पण सिनेनिर्मिती करताना त्या गोष्टीचा बोलबाला कसा होईल, सिनेमा कसा चच्रेत राहील, त्याची प्रसिद्धी कशी होईल, याकडेही आज गांभीर्याने बघितले जाते. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेण्ट’चा विचार होताना प्रेक्षकांपर्यंत सिनेमा कसा पोहोचेल अन् त्यासाठी कोणकोणत्या टेरिटेरीज्मध्ये सिनेमा रिलीज होईल, परदेशातील कोणत्या भागांत सिनेमा पोहोचेल.. इत्यादीचा बारकाईने विचार होतो. इतकंच नव्हे तर सिनेमामध्ये व्हीएफएक्स असेल तर त्याचे शॉट डिव्हिजनही अगोदरच झालेले असते. त्यामुळे ग्राफिकली कोणत्या गोष्टी होतील, किंवा क्रोमावर कोणत्या गोष्टी होतील, क्रोमा ग्रीन असेल की ब्लू, या गोष्टीही अगोदरच ठरवल्या जाऊ लागल्या आहेत. त्यानुसार फिल्म फ्लोअरवर जाण्याअगोदरच खरं तर पब्लिसिटी डिझायिनगही झालेलं असतं. फर्स्ट लूकपासून ते गाण्याचा पहिला प्रोमो कधी ऑन एअर होईल, अगदी इथपर्यंत सारं ठरलेलं असतं.’
तो पुढे सांगतो, ‘आता शंभर कोटी अन् त्यापेक्षा अधिक गल्ला कमावणाऱ्या फिल्म्स प्लॅन केल्याशिवाय का एवढी मोठी मजल मारता येईल? आता-आतापर्यंत फिल्मचं शूटिंग, पोस्ट प्रॉडक्शन इथपर्यंतच गोष्टी मर्यादित होत्या, पण आज या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं जातं. प्री-प्रॉडक्शन, शूटिंग अन् पोस्ट प्रॉडक्शन (त्यामध्ये व्हीएफएक्स अन् संकलनाचा भाग येतो.) इथवरच गोष्टी थांबत नाहीत. मार्केटिंग अन् डिस्ट्रिब्युशनचा चेहरामोहराही ठरवला जातो. नाझ बििल्डगपासून अगदी ओव्हरसीजमधल्या डिस्ट्रिब्युटर्सना रशेस (चित्रित झालेल्या सिनेमाची दृश्यं!) दाखवण्यासाठी अनोखी ट्रायलही केली जाते. फर्स्ट प्रोमो कट्पासून थिएट्रिकल ट्रेलरच्या अनेक औपचारिकता हल्ली पार पाडाव्या लागतात.
पण एवढय़ावरच थांबलं तर ते फिल्मचं गणित कसलं? हल्ली फिल्मची संकल्पना ऐकवताना त्याचं बजेट सांगून त्यामधल्या स्टार अभिनेत्यांची बॉक्स ऑफिसवरील ताकदही आजमावली जाते अन् त्याचा अपेक्षित गल्ला काय असेल, याचे आडाखे बांधून वितरकांकडून शूटिंग सुरू होण्याअगोदर बिदागी घेणारे बरेच असतात. एवढंच काय, तर हल्ली उपग्रह हक्क आणि संगीताच्या हक्कांवरून चांगलीच जुंपते, हे लक्षात आल्याने दूरचित्रवाहिन्यांमधील जीवघेणी स्पर्धा बॉलिवूडच्या पथ्यावरच पडलेली आहे. उपग्रह हक्क विकताना कोटय़वधींची रक्कम कराराद्वारे शूटिंगपूर्वीच मिळविण्याचा करिष्मा आपल्याकडे अनेक दिग्गज निर्माते सर्रास करतात.’
‘फिल्म म्हणजे जुगार’ असं जे समीकरण पूर्वी होतं, त्याला आता कॉर्पोरेट कल्चरमधल्या ‘लिमिटेड लाएबिलिटी’ आणि ‘लिमिटेड रिस्क’ या सूत्राने बाद ठरवलंय,’ असं अनुरागचं म्हणणं. तो सांगतो, ‘फिल्म रिकव्हर करण्याचे अनेक आडाखे बांधले जातात. चित्रपट प्रदर्शित करण्याच्या वेळेस ते प्रमोशनल पॅकेजिंगमध्ये चपखलपणे बसवले जातात. फिल्म प्रमोशनच्या वेळी कलाकार नखरे करत नाहीत. कारण त्यानं त्यांचा ब्रॅण्ड मोठा होत असतो. आणि असे नखरे होऊ नयेत यासाठी आधीच करार केला जातो.’
अनुरागच्या बोलण्यात फिल्ममेकिंगसंबंधीचे बदलते वारे डोकावतात. तो सांगतो, ‘फिल्मचा नारळ फुटल्यापासून फिल्म प्रदíशत होईपर्यंत हा खेळ असतो, असं मानलं जाण्याचा काळ आज बदललाय. देशविदेशातील फेस्टिव्हल्समध्ये सिनेमा प्रदर्शनासाठी पाठवावा असे वारेही हल्ली जोर धरू लागलेत. कारण तिथे समीक्षक अन् प्रेक्षकांनी सिनेमा उचलून धरला तर जागतिक बाजारपेठ सिनेमासाठी खुली होते. एकूणच सिनेमाकडे कलेच्या अंगाने बघताना आता त्यातल्या अर्थकारणाकडेही बारीक लक्ष ठेवलं जातंय.’
‘पूर्वी काही निर्मात्यांनी अनेकांचे पसे बुडवल्याचं कानावर येत असे. पण आता या गोष्टींना चाप बसलाय. कारण आता भले दोन पसे कमी देण्याचे निर्माते कबूल करतात, पण पसे वेळेवर चुकते करण्याकडे त्यांचा कल असतो. या साऱ्या गोष्टी युनिटच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. कला अन् व्यवसाय या दोन्हीतला सुवर्णमध्य काढणं आता कॉर्पोरेट्सना जमू लागलंय. पण जेव्हा चित्रपटाकडे ही मंडळी प्रॉडक्ट म्हणून पाहतात, सर्जनशीलतेवर प्रश्नांचं मोहोळ उठवतात आणि नुसते मीटिंग्ज-मीटिंग्ज म्हणून खेळ खेळतात, तेव्हा मात्र त्रास झाल्याशिवाय राहत नाही,’ हे अनुराग स्पष्ट करतो.
अनुराग पुढे सांगतो की, ‘या साऱ्या गोष्टीचा बारकाईने विचार केला तर जाणवतं, की इथे पशाला तोटा नाहीए. इथे किंमत आहे ती तुमच्या विचारांना. गोष्टीला. संकल्पनेला. ती फिल्म जगण्याला. ‘मेकिंग’पासूनचा हा प्रवास चित्रपट प्रदर्शित करणे आणि पर्यायाने पुरस्कारांपर्यंत येऊन संपतो. चित्रपट प्रेक्षकाला कसा वाटला, आपला दृष्टिकोन प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडलाय, याचं कुतूहल मोठय़ातल्या मोठय़ा फिल्म दिग्दर्शकालाही असतंच. त्यामुळे आपली संकल्पना ही इन्स्टण्ट कंटाळा येणाऱ्या प्रेक्षकांच्याही पचनी पडावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यातलं नावीन्य व वेगळेपणाची चव चाखण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळतोच वळतो असं माझा अनुभव आहे. वेगळेपणा अन् नावीन्याच्या जोरावरच तर या इंडस्ट्रीने आतापर्यंत इतके खेळ खेळले आहेत. त्यामुळे काहींनी मांडलेली नवी समीकरणं पायंडा पाडून गेली, तर काहीजण रूळलेल्या वाटांवरून चालणंच पसंत करतात. पण त्यांनाही आपल्या मानसिकतेत बदल करावा लागतोच.’
कलात्मकता व चित्रपटाचं आर्थिक गणित यांचं समीकरण जुळवणं किती अवघड आणि मन:स्ताप देणारं असू शकतं, याचा प्रत्यय अनुरागच्या बोलण्यातून येतो. ‘समीकरणं जुनीच असली, तरी त्याची मांडणी, दृश्यचौकट अन् एकूणच पॅकेजिंग यांत समकालीनता जपलेली असते. त्यामुळे आता शंभर- दीडशे कोटींचा आकडा ओलांडणारा सिनेमा असो वा लहान बजेटचा; त्यांना मिळालेल्या यशाच्या प्रमाणात केलेल्या खर्चाचं गुणोत्तर काढलं तर ते जवळपास जाणारं असतं. त्यामुळे व्यावसायिकता जपताना कलात्मकतेवर खर्च करताना कोणी मागेपुढे पाहत नाही. आपल्या मनातल्या गोष्टी पडद्यावर मांडताना प्रत्येकजण त्याचा अन्वयार्थ शोधत असतो अन् नकळत स्वप्नपूर्तीचा आनंदही. हा स्वत:चा शोध आहे- जो अविरतपणे सुरूच आहे..’ हे सांगताना सिनेमाच्या व्यवहार्यतेवर बोलणाऱ्या अनुरागमध्ये तत्त्ववेत्त्याचा अभिनिवेश जागा झालेला असतो.
बदलता सिनेमा : चित्रपटनिर्मितीत बेभरवशीपणाला फाटा!
गेल्या १०-१५ वर्षांत आपला चित्रपट आणि चित्रपटसंस्कृतीत आमूलाग्र बदल झालेला आहे.. आजही होतो आहे. चित्रपटांची कार्यसंस्कृती, चित्रपटांचे विषय, आशय, सादरीकरण, तंत्रातील अत्याधुनिकता, चित्रपटांचं प्रदर्शन, त्यांची आर्थिक गणितं, प्रेक्षकांची बदललेली अभिरूची आणि मल्टिप्लेक्स संस्कृती या सगळ्याचा सर्वागीण वेध..
आणखी वाचा
First published on: 04-02-2013 at 05:33 IST
मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changing indian cinema bollywood movie has bypassed uncertainty