हे सलग गेली दोन-तीन र्वष सुरू आहे. देश कोणत्या ना कोणत्या लाटेवरच आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांची लाट होती. त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्वातंत्र्याच्या लढय़ाने देश भारावला गेला होता. लाटच ती.. विरली.
नंतर त्यांचे चेले अरविंद केजरीवाल यांचं गारूड होतं सगळ्यांवर. देशातला समस्त ‘मेणबत्ती संप्रदाय’ या अरविंदाच्या हातून देश कसा भ्रष्टाचारमुक्त होणार आहे, ते ऐकण्यात मश्गुल होता.
ती पण शेवटी लाटच.. तीही तशीच विरली.
नंतर आता हे ‘अच्छे दिन.’
ती पण लाटच आहे का, आणि तिचंही प्राक्तन याआधीच्या दोन लाटांसारखंच आहे का, याचा खरा अंदाज इतक्यात येणार नाही.
पण मुद्दा तो नाही. प्रश्न हा आहे की, या अशा लाटा आपल्या समाजात का येतात? कोणीतरी हरीचा लाल येईल, आपले दिवस बदलतील, उत्कर्ष होईल.. हे असं मुळात लोकांना वाटतंच का?
याचं साधं कारण आहे. ते म्हणजे विवेकाचा घाऊक आणि सार्वत्रिक अभाव! तो असल्यामुळे या अशा समाजाला खेळवायला अनेकांना आवडतं. राजकारणी, माध्यमं.. इतकंच काय, साहित्यिकांनादेखील! ते त्यांना जमतंही. याचं कारण असं की, या अशा समाजाच्या बौद्धिक गरजा फारच कमी असतात. आणि भावनिक गरजांची पूर्ती करण्यासाठी फार काही बौद्धिक आणि शारीरिक कष्टांची गरज नसते. आपल्याकडे नेमकं हेच सुरू आहे. म्हणूनच विवेकाच्या शोधात निघालेल्या चार क्षेत्रांची अवस्था काय आहे, याचा वेध या अंकात आपल्याला आढळेल.
या लाटेच्या पलीकडेही बरंच काही घडलं. त्याचं एक देदीप्यमान उदाहरण म्हणजे दोन भारतीय गणितींचा जागतिक पातळीवर झालेला सन्मान! यातील एक गणिती मराठी. तेव्हा त्याच्या कामगिरीचा यथोचित परिचय आणि मुलाखतदेखील या अंकात आढळेल.
खरं तर गणित हा काही सणासुदीला चर्चा करावा असा विषय नाही.
तरीही आम्ही तो घेतला.
याचं स्वच्छ कारण म्हणजे गणित आणि विवेक यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे दोन्हीच्या एकत्रित वा एकेकटय़ा अनुपस्थितीमुळे भोंगळपणा वाढतो.
आपल्याकडे तेच तर झालंय. समाजच्या समाज गणित आणि विवेक या दोन्हीपासून दूर दूर चाललाय.
या वास्तवाची जाणीव ही अंधार दूर करणारी असेल. प्रकाशासाठी काही फक्त दिवेच लागतात असं नाही. भौतिक वातावरणातला अंधार दूर करण्यासाठी दिवे हवेत आणि विवेकशून्य समाजातला अंध:कार दूर करण्यासाठी विचार हवेत.
दीपावलीच्या निमित्तानं हे दोन्ही अंध:कार दूर करण्याची संधी एकाच वेळी मिळत असते.
जेथे परीक्षेचा अभाव। तेथे दे घाव, घे घाव.. असं समर्थ रामदासांनी म्हणून ठेवलंय. या अवस्थेपासून आपण लवकरात लवकर दूर जायला हवं. तसं झालं तर हा दीपोत्सव कारणी लागेल.
तसा तो लागावा या शुभेच्छांसह.
आपला..