एखाद्याचं आत्मकथन लिहायचं म्हणजे त्याच्या अंतरंगात डुबी मारणं आलंच! ते जितक्या उत्कटतेनं होईल, तितकं ते लेखन अस्सल उतरणार. अनेक गाजलेली आत्मकथनं शब्दबद्ध करणाऱ्या सिद्धहस्त लेखिकेचं रसीलं अनुभवकथन..
‘गरम वाफाळती इडली, ऑर्किड नावाचं पंचतारांकित इको-फ्रेंडली हॉटेल, रासायनिक पृथक्करण, दगडमातीचं बांधकाम, विम्याची पॉलिसी, दारूचा गुत्ता आणि बायकांनी चालविलेली एक शिक्षणसंस्था..’ या सगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध असतो का? या प्रश्नावर ठाम उत्तर येईल- ‘शक्यच नाही.’ किंवा भुवया उंचावून प्रतिप्रश्न विचारला जाईल- ‘काय संबंध?’
पण मी मात्र म्हणेन, ‘‘हो. या सर्व गोष्टींचा परस्परसंबंध येतो, जेव्हा त्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध होतात; आणि माझ्या पुस्तकांच्या कपाटात ‘शोभा बोंद्रेंची पुस्तकं’ या खणात शेजारी शेजारी गुण्यागोविंदाने स्थानापन्न होतात!’’
माझ्याबाबतीत ‘खऱ्या माणसांच्या खऱ्या गोष्टी’ या प्रकरणाची सुरुवात झाली- ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या विठ्ठल कामतांसाठी लिहिलेल्या पुस्तकातून!
इडलीचा पहिला घाणा निघाला ना निघाला, तोच वाचकांनी पसंतीची पावती देत तो फस्त केला. तेव्हापासून आजपर्यंत आठ वर्षांमध्ये मॅजेस्टिक प्रकाशनाचा ‘इडली’चा कूकर गॅसवरून उतरलेलाच नाही. इडल्यांचं उत्पादन अखंड चालू आहे आणि चांगलं खपतं आहे.
‘इडली, ऑर्किड आणि मी’नंतर ‘मस्त कलंदर’, ‘ही ‘श्री’ची इच्छा’, ‘एक असतो बिल्डर’, ‘मुंबईचा अन्नदाता’, ‘दादा नावाचा माणूस’, ‘नॉट ओन्ली पोटेल्स’ आणि ‘उंच उंच झोका’ ही माझी पुस्तकं प्रसिद्ध झाली. या सर्वच पुस्तकांचं खूप चांगलं स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण एकत्रितरीत्या सर्व पुस्तकांच्या मिळून संपलेल्या आवृत्त्यांची आजमितीची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे.
विठ्ठल कामत, भरत दाभोळकर, किशोरकुमार, जयंत साळगावकर, विजय मल्ल्या, मुंबईचे डबेवाले, मोहनभाई पटेल, उदयदादा लाड आणि अनिता भागवत किंवा रेखा केंकरे ही सर्व मंडळी या पुस्तकांमधली प्रोटागॉनिस्ट पात्रं! काही प्रसिद्ध; पण बरीचशी अप्रसिद्ध! या सर्वाचे व्यवसाय वेगळे, त्यांची व्यक्तिमत्त्वं वेगळी, विचार-आचार-वागणूकही वेगळी! या सर्वामधला सर्वसामान्य घटक एकच, की ही माणसं खरी आहेत!
‘खऱ्या माणसावरचं पुस्तक कसं असावं?’ यासंबंधीची माझ्या मनातली कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मला ‘इडली’मुळे मिळाली.
पुस्तकामध्ये नेमकं काय असावं, हे जितकं महत्त्वाचं; तितकंच ‘काय नसावं’ हे ठरवणं, हे त्याहूनही महत्त्वाचं!
खऱ्या माणसांवरची पुस्तकं दोन प्रकारांनी लिहिली जातात. एक म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र; आणि दुसरा प्रकार म्हणजे चरित्रात्मक कादंबरी!
चरित्र म्हटलं की संपूर्ण सत्यशोधनाची जबाबदारी येते. चरित्रनायकाच्या/ नायिकेच्या आयुष्याचा कण न् कण आणि क्षण न् क्षण वेचून तो पुस्तकात मांडला पाहिजे, असा पण उचलल्यामुळे पुस्तकाची वाचनीयता कमी होते. त्यातून जर पुस्तकाची मांडणीही सरळसोट वळणाची (की बिनवळणाची?) असेल तर संपलंच सगळं! कारण अशा वेळी पुस्तकाची सुरुवात अशी होते-
‘१० ऑक्टोबर १९३२ रोजी एका सुप्रभाती कोल्हापूरजवळच्या पाखाडेबुद्रुक या गावात आपले चरित्रनायक बाळ विष्णू करवंदे यांचा जन्म झाला..’
ही अशी रुक्ष आणि अति औपचारिक सुरुवात वाचली की मला एकदम उदास वाटायला लागतं. तरीही पुढची पाचशे-सातशे किंवा आठशे पानं ओढून वाचली जातात. कारण या करवंदेबुवांनी आयुष्यात पुढे काहीतरी फार मोठं काम केलेलं असतं. आणि त्याबद्दल जाणून घेण्याची मनात उत्सुकता असते.
चरित्रात्मक कादंबरीचा वेगळाच घोळ! हे नक्की चरित्र आहे की कादंबरी, हे रहस्य शेवटपर्यंत उलगडत नाही. खऱ्या माणसांमध्ये काल्पनिक पात्रांची सरमिसळ आणि खऱ्या प्रसंगांना कल्पनेतल्या प्रसंगांची झालर!
‘क्या क्रावं ब्रं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी यासंदर्भात मला आवडलेल्या आदर्श अशा पुस्तकांची एक यादी तयार केली.
मराठीतली ‘स्मृतिचित्रे’ किंवा ‘सांगत्ये ऐका’ ही आत्मचरित्रे, गंगाधर गाडगीळांची टिळकांवरची ‘दुर्दम्य’ ही कादंबरी, अप्पासाहेब पंतांनी आपल्या वडिलांवर म्हणजे औंधच्या शेवटच्या राजावर लिहिलेलं ‘मुलखावेगळा राजा’, इंग्रजीमधलं एम.सी. छागला यांचं ‘रोजेस इन डिसेंबर’, आयाकोकाचं आत्मचरित्र, चार्ली चॅप्लिनचं चरित्र, इन्ग्रिड बर्गमनचं ‘माय स्टोरी’ हे आत्मचरित्र, इंग्मार बर्गमन या प्रतिभावंत दिग्दर्शकाचं ‘द मॅजिक लँटर्न’ हे आत्मचरित्र, अॅगाथा ख्रिस्तीचं आत्मचरित्र.. वगैरे वगैरे.
इथे थोडंसं विषयांतर करून मला अॅगाथा ख्रिस्तीच्या आत्मकथेतला एक प्रसंग सांगण्याचा मोह होत आहे.
अॅगाथा ख्रिस्तीचा दुसरा नवरा हा आर्किऑलॉजिस्ट होता आणि वयानं तिच्यापेक्षा खूप लहान होता. एकदा एका खवट पत्रकारानं विचारलं- ‘‘वयानं मोठय़ा असलेल्या तुझ्यासारख्या म्हातारीवर तुझा नवरा कसा काय प्रेम करू शकतो?’’
अॅगाथानं हसून सांगितलं- ‘‘पुराणवस्तुशास्त्रज्ञ पुराणकालीन गोष्टींवरच प्रेम करणार ना?’’ असो!
आर्थर हेली या प्रचंड लोकप्रिय लेखकाच्या बायकोनं- शीला हेलीनं लिहिलेलं पुस्तक ‘आय मॅरिड अ बेस्ट-सेलर’ हेही असंच परखड, वस्तुनिष्ठ आणि वाचनीय पुस्तक आहे.
आणि कळसाध्याय म्हणावा अशा आयवर्ि्हग स्टोनच्या चरित्रात्मक कादंबऱ्या! ‘पॅशन्स ऑफ माइंड’, ‘अॅगनी अॅण्ड एक्स्टॅसी’ आणि व्हॅन गॉवरची ‘लस्ट फॉर लाइफ’!
अमुक एक गोष्ट उत्तम आहे, तेव्हा मी ती तशीच करेन, अशी निर्मिती कलेच्या कुठल्याही प्रांतात शक्य नसते. पण ‘आदर्श’ काय आहे, हे ठाऊक असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कुवतीनुसार आपली निर्मिती ‘आदर्श’ व्हावी म्हणून प्रयत्न करता. तेव्हा सर्वप्रथम मी पुस्तक कसं नसावं आणि कसं असावं, या दोन चौकटी आखून घेतल्या.
पुस्तकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाचा यू. एस. पी. (युनिक सेलिंग पॉइंट) किंवा गाभा! हा ठरल्याशिवाय लेखनाला आकार येत नाही. लेखनामध्ये नेमकेपणा आणता येत नाही. पुस्तकाचं नावही ठरतं ते या यू. एस. पी. किंवा गाभ्यानुसारच!
‘इडली, ऑर्किड..’च्या वेळी कामतांबरोबर गप्पांच्या दोन-चार बैठका झाल्या तेव्हाच मी ठरवलं की, पुस्तकाचा यू. एस. पी. काय असेल!
भारतात इडली-डोसा बनविणारी लाखो उपाहारगृहं आहेत. पण त्यांच्या मालकांपैकी फक्त एकानंच पंचतारांकित इको-फ्रेंडली हॉटेल बांधण्याचं स्वप्न पाहिलं आणि कमालीच्या जिद्दीनं ते पूर्णही केलं. तेव्हा या पुस्तकाचा गाभा म्हणजे ‘इडली बनवणारा आम उडुपी ते पंचतारांकित हॉटेलचा मालक.. हा विठ्ठल कामतांचा प्रवास.’ पुस्तकाचं नावही तेव्हाच ठरलं- ‘इडली, ऑर्किड आणि मी’!
पुस्तकलेखनाच्या बाबतीतल्या माझ्या सर्व कल्पना स्वीकारून माझ्यावर शंभर टक्के विश्वास टाकणाऱ्या कामतांना हे नाव मात्र पसंत नव्हतं. त्यांना काहीतरी इंटलेक्च्युअल (बौद्धिक) आणि गंभीर असं नाव हवं होतं. नावावरून आमचा बराच काथ्याकूट चालायचा. नाव साधं आणि अर्थवाही असावं, या माझ्या आग्रहावर एकदा ते म्हणाले, ‘‘बोंद्रे मॅडम, ‘मी कसा झालो?’ हे नाव कसं वाटतंय तुम्हाला?’’ थक्क होऊन मी म्हणाले, ‘‘अहो, नाव छानच आहे; पण ते अत्र्यांच्या गाजलेल्या पुस्तकाचं नाव आहे.’’ यावर तेही थक्क झाले होते. पण मग सारवासारवी करीत म्हणाले, ‘‘तेच म्हणतोय मी! अशा तऱ्हेचंच काहीतरी नाव असावं.’’
शेवटी हा वाद प्रकाशक अशोक कोठावळे यांनी सोडवला. प्रकाशकाचा अधिकार वापरून त्यांनी ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या नावाला पसंतीची पावती दिली.
‘ही ‘श्रीं’ची इच्छा’चा यू. एस. पी. होता- ‘इच्छा असेल तर माणूस इकडचं जग तिकडे करेल.’ मॅट्रिकच्या परीक्षेत केवळ ५५ टक्के गुण मिळवून पास झालेला श्रीनिवास ठाणेदार.. एक अतिसामान्य विद्यार्थी. पण जेव्हा मनात महत्त्वाकांक्षा निर्माण झाली, तेव्हा त्याने इच्छाशक्ती पणाला लावली आणि डॉक्टरेट ही उच्चतम पदवी अमेरिकेत जाऊन मिळवली. इतकंच नाही तर या शैक्षणिक पाश्र्वभूमीचा उपयोग करून तो यशस्वी व्यावसायिक बनला.
‘दादा नावाचा माणूस’मधला प्रोटॅगॉनिस्ट उदयदादा लाड हा दारूचा बार चालविणारा, वेळप्रसंगी ‘दादा’गिरी करणारा, सभ्य, सुशिक्षित चौकटीमध्ये न बसणारा माणूस! पण या आधुनिक वाल्या कोळ्याने वाल्मिकी बनण्याचा प्रयत्न केला, हे किती महत्त्वाचं!
पाश्र्वभूमी काहीही असो, उद्योग कोणताही असो, मी ज्या- ज्या माणसांच्या गोष्टी लिहिते, त्यातून काहीतरी सकारात्मक ऊर्जा वाचकांपर्यंत पोचावी असं मला मनापासून वाटतं.
समाजात सडकं, नासकं, कुसकं खूप आहे. दररोज वर्तमानपत्रांतल्या बातम्या वाचतो, तेव्हा आपण आजूबाजूचं हेच जग पाहतो आणि विषण्ण होतो. पण त्याच घाणीचं चित्र लेखनामध्ये रेखाटून वास्तववादाचा आव आणण्यापेक्षा मला रंगवावासा वाटतो, तो घाणीतून मार्ग काढून काही चांगलं काम करणारा एखादा अपवादात्मक माणूस! म्हणूनच गोष्टीसाठी माणूस निवडताना मी हाच निकष लावते. हा वास्तववादही लोकांसमोर यायला हवा.
माझ्या पुस्तकांमध्ये मध्यवर्ती भूमिका असलेल्या सर्वच स्त्री-पुरुषांनी काहीतरी जगावेगळं, अफलातून असं काम केलेलं आहे. म्हणूनच पुस्तकाच्या निमित्ताने या सर्वाना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांचं काम, त्यांचे आचार-विचार आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेणे हा सगळा प्रवास मला खूप काहीतरी शिकवणारा ठरला. अनुभवांची माझी पोतडी या सर्वाच्या सहवासात समृद्ध झाली.
यानिमित्ताने माणसांचे किती रंग, किती ढंग, किती चेहरे, किती मुखवटे, किती विचारधारा आणि किती कर्तृत्वगाथा मला जवळून पाहता आल्या.
अॅड्मॅन भरत दाभोळकर यांना भेटायला वरळी इथल्या ‘झेन’ कंपनीमध्ये मी गेले तेव्हा जाहिरात क्षेत्रातली त्यांची कामगिरी समजून घेण्याआधी मला त्यांचं प्राणीप्रेम समजून घ्यावं लागलं. कारण ‘झेन’च्या या ऑफिसमध्ये फाइली, ड्रॉइंग्ज, फोटोग्राफ्स, स्टेशनरीचं सामान, कॉम्प्युटर्स, टेलिफोन्स इत्यादी निर्जीव वस्तूंसोबत काही बसलेली, काम करणारी माणसं तर होतीच; पण त्याशिवाय सरपटणारे, उडय़ा मारणारे, उडणारे, तऱ्हेतऱ्हेचे आवाज करणारे आणि चक्क पोहणारे अनेक प्राणिमात्र तिथे सुखेनैव संचार करीत होते. ओशो नावाचा बुलडॉग कुत्रा, सद्दाम हुसेन नावाचा मकाव पोपट, मार्मोसेट जातीचं सहा इंची माकड माइटी काँग, बोलणारी आणि हसणारी मैना, कासव आणि फिशटँकमधले मासे!
दाभोळकरांशी बोलण्यासाठी मी आतमध्ये गेले तेव्हा कळलं की, स्वागतकक्षात ज्या आसनावर मी बसले होते, त्याखालच्या फिशटँकमध्ये पिरान्हा नावाचे हिंस्र मासे पोहत होते. हे मासे समुद्रात झुंडीनं एकत्र पोहतात आणि वाटेत एखादा शार्क जरी आला, तरी आपल्या तीक्ष्ण दातांनी क्षणार्धात त्याचा फडशा पाडून त्याचा सांगाडा तेवढा मागे ठेवतात.
‘पाहुण्यांच्या आसनाखाली पिरान्हांचा फिशटँक?’ यावरून दाभोळकरांच्या वक्र, तिरकस विनोदबुद्धीचा क्षणार्धात प्रत्यय येतो.
जयंत साळगावकर हे नाव आज प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. समाजामधलं आजचं त्यांचं स्थान, त्यांनी कमावलेला आदर आणि मानसन्मान वादातीत आहे. पण आज जर कोणाला सांगितलं की, काही वर्षांपूर्वी हा माणूस उद्वेगानं आत्महत्या करायला निघाला होता, तर कोणाचा विश्वास बसेल का?
५० च्या दशकामध्ये ‘शब्दरंजन कोडे’ या स्पर्धेनं साळगावकरांना अभूतपूर्व असं यश मिळवून दिलं. पण नंतर हीच स्पर्धा बुडीत खात्यात जमा झाली आणि साळगावकरांना टोकाच्या विपन्नावस्थेचा कठीण अनुभव आला.
डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा, रस्त्यात कॉलर पकडून ‘पैसे टाक, नाहीतर जीव घेतो’ अशी लाज काढणारे घेणेकरी, कार्यालयात, घरी सर्वत्र धमक्यांचे फोन, गायब झालेली मित्र (?) मंडळी.. असे जीवघेणे दिवस साळगावकरांच्या नशिबात आले.
एकदा एका घेणेकऱ्याच्या शिव्याशापांना कंटाळून साळगावकर म्हणाले, ‘‘मी जीव देतो, म्हणजे तरी सुटेन तुमच्या तावडीतून!’’
यावर तो माणूस दात विचकून म्हणाला, ‘‘तुम्ही मरा. पण माझे पैसे दिल्याशिवाय तुमच्या घरच्यांना प्रेताला हात लावू देणार नाही मी!’’
जिवंतपणी मरण काय असतं, ते साळगावकरांनी अनुभवलं. पण शेवटी जीवनेच्छा प्रबळ असेल तर ती माणसातलं कर्तृत्व जागं करतेच.
तसंच झालं. जुन्या पद्धतीची तिथी, वार, नक्षत्रं सांगणारी पंचांगं आणि नव्या पद्धतीचं दिवस, वार, महिना सांगणारं कॅलेंडर या दोन गोष्टी साळगावकरांनी एकत्र केल्या. ‘कालनिर्णय’चा जन्म झाला. आणि या साध्या, पण विलक्षण व्यवहारी कल्पनेमुळे उद्योगक्षेत्रात क्रांती घडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साळगावकरांचा नवा जन्म झाला!
कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी माणसानं आशा सोडू नये. स्वत:च्या बुद्धीवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवला तर माणूस जग बदलवू शकतो, हा विश्वास साळगावकरांच्या या गोष्टीतून मिळतो.
‘कालनिर्णय’ची यशोगाथा जयंतरावांनी जितक्या मोकळेपणानं सांगितली, तितक्याच प्रांजळपणे त्यांनी भूतकाळातले कटू प्रसंगही मला सांगितले.
माणसाची अद्वितीय, अतुलनीय गोष्ट सांगायची असली तरी त्या माणसाला ‘देवत्व’ बहाल करण्याची भूमिका मी कधीच घेतली नाही.
निरगुडकर असू देत, कामत असू देत किंवा ‘नॉट ओन्ली पोटेल्स’मधले रिची रीच गुजराती बिझनेसमेन! गोष्टीमधून जसा त्यांचा मोठेपणा कळेल, तशाच त्यांच्या हातून घडलेल्या चुका, त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय, स्वभावाची एखादी नकारात्मक छटा याही गोष्टी पुस्तकात याव्यात असं मला वाटतं. यशाचं शिखर गाठण्याआधी काही अपयशी अशी पडझड झाली असेल तर त्याचीही कारणमीमांसा व्हायला हवी.
बऱ्या-वाईट गुणदोषांसकट जेव्हा माणूस तुमच्यासमोर येतो, तेव्हाच तो हाडामांसाचा खरा माणूस वाटतो. तो सर्वसामान्य आहे, आणि तरीही त्याने काहीतरी असामान्य यश प्राप्त केलं आहे, हे कळलं की यशाची झळाळी शेकडो पटींनी वाढते. सामान्य वाचकाला एक दिलासा मिळतो, की ‘अरे, हाही आपल्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस होता; तरीही त्याने काहीतरी असामान्य असं करून दाखवलं. मग असंच काहीतरी भव्यदिव्य माझ्या हातून का घडणार नाही?’
पुस्तक लिहिण्याआधी जेव्हा गप्पांच्या बैठका चालू असतात; तेव्हा माझा हा दृष्टिकोन अगदी प्रत्येकाने मान्य केला. प्रत्येकाने अतिशय खिलाडूपणे, तटस्थ वृत्तीने आत्मपरीक्षण केलं आणि गुणांबरोबर स्वत:च्या दोषांविषयीही मोकळेपणी सांगितलं.
‘एक असतो बिल्डर’मध्ये मी लिहिलेला कथानायक सुधीर निरगुडकर यांचा एक अनुभव..
‘व्यवसायाचा व्याप वाढत चालला तेव्हा मला एका सेक्रेटरीची गरज भासायला लागली. माझ्या बिझनेसच्या नाडय़ा ज्याच्या हातात होत्या त्या बँक मॅनेजरनं एका मुलीला नोकरीसाठी पाठवलं. नाव- कोमल थडानी. गबाळं रूप आणि बावळट व्यक्तिमत्त्वाच्या त्या मुलीला केवळ नाइलाज म्हणून मी नोकरीवर ठेवलं. शिकण्याची इच्छा असली तरी अनुभव शून्य! त्यामुळे तिच्या हातून दररोज नव्या चुका व्हायच्या. प्रत्येक वेळी माझी चिडचीड आणि संतापणं.
एक दिवस टाचणी लावलेले कामाचे काही कागद तिने माझ्या हातात दिले. ही टाचणी उलटी लावलेली होती. ती माझ्या हाताला जोरात टोचली आणि क्षणभराचाही विचार न करता मी तिच्या थोबाडीत लगावली.
गालावर हात दाबून ती मटकन् खाली बसली. मी चरकलो. मनात म्हणालो, ‘‘मेलो! आता हिनं तक्रार केली, घरच्यांना बोलावून आणलं तर त्यांनी घातलेल्या शिव्याही मला निमूटपणे ऐकून घ्याव्या लागतील.’’
काही क्षण अवघडलेली शांतता! मग कोमल उठली आणि खाली मान घालून म्हणाली, ‘‘सॉरी सर!’’ या दोन शब्दांनी मला जे शिकवलं, ते मला आयुष्यभर पुरलं. या दोन शब्दांमधून कळली तिची सहनशीलता, स्वत:ची चूक कबूल करण्याची वृत्ती आणि परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा तिचा समंजस स्वभाव.
याउलट, या ‘‘सॉरी सर!’’ने मला दाखवून दिला- माझा संतापी स्वभाव, समोरच्याचा विचार न करता कृती करण्याचा उतावीळपणा आणि असमंजस वृत्ती!
या ‘सॉरी सर!’ नंतर ती स्वत: तर आमूलाग्र बदललीच; पण तिने मलाही बदलवलं. आयुष्यात माणूस म्हणून माझ्यामध्ये काही बरे गुण असतील, मी काही चांगला व्यवहार आणि चांगलं काम केलं असेल, समाजाचं ऋण फेडलं असेल, तर हे सर्व घडवण्यात मोठा वाटा आहे- सुषमा, कोमल, लीना या माझ्यामागे ठामपणे उभ्या राहिलेल्या काही आदर्श स्त्रियांचा!’
माणसाच्या गोष्टीत माणुसकीचे असे रंग जेव्हा दिसतात तेव्हा गोष्टीतला माणूस वाचकाला ‘आपला’ वाटायला लागतो.
कथेचं सूत्र किंवा यू. एस. पी. ठरल्यानंतर गोष्ट अशी आणि इतकीच फुलवायची, की हे सूत्र आणि कथानायक वाचकांपर्यंत थेट पोचावा.
शरीराच्या मापाप्रमाणे बेतलेला आणि शिवलेला कपडा कसा उठून दिसतो, आकर्षक वाटतो; तसंच पुस्तकाचंही आहे. त्यामुळे पुस्तक दोन-सव्वादोनशे पानांपेक्षा मोठं होता कामा नये. त्यामध्ये जन्म, मृत्यू किंवा तत्सम अनावश्यक सनावळ्या असू नयेत, गरज असल्याशिवाय वंशवृक्षाची माहिती नमूद करू नये, फापटपसारा ठरेल असा आयुष्याचा एकही क्षण पुस्तकात घालू नये.. अशी माझी ‘काय करू नये’ची मोठी नियमावली असते. आणि ती मी कठोरपणे पाळते.
हो- पण हे नियम पुस्तक लिहिताना लक्षात ठेवायचे! त्याआधी माहिती जमा करताना मी समोरच्याला मोकळेपणी बोलू देते. शक्य तो कालक्रमानुसार बोलावं असा संकेत असला तरी गप्पांच्या ओघामध्ये अनेकदा पुढे-मागे उडय़ा मारल्या जातात. त्याच त्याच गोष्टी परत सांगितल्या जातात. अनावश्यक संदर्भ दिले जातात.
हे सर्व बोलणं मी रेकॉर्ड करते. शिवाय जो मजकूर यावा असं वाटतं, त्याबाबतीत बरेच प्रश्न विचारून समोरच्याला बोलतं करते. कथानायकाचं आणि माझं- माहितीच्या संदर्भात समाधान झाल्याशिवाय मी लिहायला सुरुवात करीत नाही.
याबाबतीत मुंबईच्या डबेवाल्यांबरोबर मी जवळजवळ सात-आठ महिने बोलत होते. एक तर त्यांचं दिवसाचं मिनिटा-मिनिटाचं मोजलेलं वेळापत्रक! त्यातून काम उरकून ते संध्याकाळी अंधेरीच्या ऑफिसमध्ये येणार. इथेही त्यांना भेटायला नाना प्रकारचे लोक अचानकदेखील उगवायचे. कधी मॅनेजमेंटचे विद्यार्थी, कधी पत्रकार, कधी पतपेढीसंबंधी व्यवहार करायला आलेले डबेवाले, तर कधी ‘आम्हाला डबा लावायचा आहे’ म्हणत आलेली गिऱ्हाइकं.
इथे टेपरेकॉर्डर सुरू केला, की त्यात जुन्या पंख्याचा भरभराट यायचा, आजूबाजूच्या लोकांची बोलणी टेप व्हायची. मग मी रघुनाथ मेदगे किंवा सोपानराव मरे किंवा गंगाराम तळेकर- जे कोणी माझ्याशी बोलत असतील त्यांना ‘मोठय़ा आवाजात बोला, भाऊ!’ अशी नम्र सूचना करायचे.
सुदैवाने ‘सिक्स सिग्मा’ किंवा आणखीही काही माहिती मला इंटरनेटवरून घेता आली आणि मग पुस्तकलेखनाचा श्रीगणेशा झाला.
लिहायला सुरुवात करण्याआधी मी जेव्हा टेपरेकॉर्डरवरची माहिती लिहून घेतलेल्या माहितीमध्ये जमा करते, तेव्हा कागदांवर तयार होतो माहितीचा, संदर्भाचा, तपशिलांचा एक भूलभुलैया!
आता माझ्या हातात संकलकाची कात्री येते. आणि नको असलेल्या भागावर काट मारून, हव्या त्या मजकुराची हवी त्या पद्धतीने मांडणी करण्याचं स्वातंत्र्य मी घेते.
इथे माझ्यासमोर दोन आदर्श असतात. एक म्हणजे कचरा उचलणारी बाई. ती जशी कचऱ्यातून किमती सामान बाजूला काढते; तशीच मीही बिनमहत्त्वाच्या शब्दांमधून अर्थवाही कथाभाग शोधते आणि तो अधोरेखित करून ठेवते.
दुसरा आदर्श फारच मोठा! आयर्व्हिग स्टोन या लेखकाच्या ‘अॅगनी अॅण्ड एक्स्टॅसी’ या कादंबरीचा महानायक मायकेल अँजेलो! त्याच्या अद्वितीय शिल्पकलेसाठी जेव्हा त्याची वाहवा केली जायची, तेव्हा तो (कादंबरीत) म्हणतो, ‘‘मी विशेष काही करीत नाही. संगमरवराच्या दगडात हे शिल्प लपलेलं होतं. ते शोधून, कोरून मी बाहेर काढतो, इतकंच!’
प्रत्यक्ष लिहिताना प्रसंगांची मांडणी करणं हे पहिलं महत्त्वाचं काम. काळानुसार सरधोपटपणे एकापुढे एक असे प्रसंग रचण्यापेक्षा फ्लॅशबॅकसारख्या सिनेमॅटिक तंत्राचा वापर केला तर वाचकांची उत्कंठा वाढवता येते. त्यामुळे गोष्टीमध्ये नाटय़ निर्माण होतं. मजकुरामध्ये अधूनमधून माणसा-माणसांमधले संवाद हवेत, म्हणजे लिखाणाचा एकसूर मोडतो आणि लिखाण थोडं चुरचुरीत, खमंग आणि अधिक वाचनीय होतं. शेवटचा, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोष्ट सांगताना प्रथमपुरुषी एकवचनाचा केलेला वापर! कथानायक किंवा नायिका जेव्हा स्वत: गोष्ट सांगतात, तेव्हा ती गोष्ट, तो अनुभव जास्त जिवंत वाटतो आणि आणि वाचकाला पटकन् भिडतो.
म्हणूनच ‘इडली, ऑर्किड’पासून ‘उंच उंच झोका’पर्यंत जितक्या काही खऱ्या माणसांच्या गोष्टी मी लिहिल्या,त्या सर्वामध्ये कथानायक किंवा नायिका स्वत: गोष्ट सांगत आहेत, हाच ‘फॉर्म’ किंवा ‘पॅटर्न’ मी कायम ठेवला.
चरित्र, आत्मचरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरी अशा रूढ वर्गवारीमध्ये न बसविता माझ्या पुस्तकांना मी म्हणते- (खऱ्या माणसांच्या खऱ्या) गोष्टी! म्हणूनच ‘नॉट ओन्ली पोटेल्स’ या गुजराती बिझनेसमनवरच्या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ‘सवरेत्कृष्ट कथा पुरस्कार’ मिळाला तेव्हा मला विशेष आनंद झाला. चिकित्सक वाचकांच्या एका समुदायाने माझा दृष्टिकोन मान्य केला, ही मला खास महत्त्वाची गोष्ट वाटली.
मला अनेकदा लोक म्हणतात- ‘तुमचे कथानक, नायिका ही मंडळी आम्हाला भावली. पण ही सर्व माणसं प्रत्यक्षात कशी आहेत? तुमचा काय अनुभव?’
जेव्हा पुस्तकाचं लिखाण चालू असतं, मी या माणसांना भेटत असते, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्याचा क्लोजअपमधला उत्तम अँगलच मला दिसावा असा सर्वाचा आटापिटा असतो. याचवेळी माझा प्रयत्न असतो, की त्यांच्या उत्तम वागणुकीमागचा ‘असली’ माणूस मला शोधता यायला हवा.
या सर्व काळात माझ्याही नकळत माझी एक भूमिका तयार व्हायची- विद्यार्थ्यांची!
हॉटेल इंडस्ट्री, डबेवाल्यांचा व्यवसाय, विम्याची एजन्सी, केमिकल अॅनालिसीस, एक्स्ट्रजन पद्धतीने बनणाऱ्या पोकळ नळ्या, जाहिरातींचं जग, दारू बनविण्याचा मोठा व्यवसाय, दारू विकण्याचा गुत्त्यासारखा छोटा व्यवसाय आणि शिक्षणसंस्थेचा कारभार! उद्योगांचं केवढं विश्व माझ्यासमोर उलगडलं गेलं! तेही त्यामध्ये यशस्वी झालेल्या दिग्गजांकडून! या शिक्षणासाठी कुठल्याही विश्वविद्यालयाची पदवी मिळायची नव्हती किंवा मला मिळवायचीही नव्हती. होता तो निखळ आनंद.. ज्ञान मिळाल्याचा! त्यासाठी मी सर्व कथानायक/ नायिकांची ऋणी आहे.
पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर या नायक/ नायिकांपैकी प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आला. त्याचं कारण प्रत्येक पुस्तकाचा व्यवहार वेगळा होता.
‘इडली, ऑर्किड आणि मी’,‘ही ‘श्री’ची इच्छा’, ‘एक असतो बिल्डर’, ‘मुंबईचा अन्नदाता’, ‘दादा नावाचा माणूस’ आणि ‘उंच उंच झोका’ ही सगळी पुस्तकं ‘कमिशण्ड वर्क’(दुसऱ्याने सोपवलेलं काम) या प्रकारात मोडतात. ‘मस्त कलंदर’ आणि ‘नॉट ओन्ली पोटेल्स’ या पुस्तकांबाबत मात्र कल्पना माझी आणि कारागिरीही माझीच!
दुसरा माणूस जेव्हा ‘माझ्यावर पुस्तक लिहाल का?’ असं म्हणून पुस्तकाचं काम सोपवतो, तेव्हा त्याला व्यवहाराची आर्थिक चौकट असते. त्याचबरोबर दोन्ही पक्षांनी काही अटी मान्य करायच्या असतात. ‘इडली, ऑर्किड आणि मी’, ‘ही ‘श्री’ची इच्छा’, ‘एक असतो बिल्डर’ या तीनही पुस्तकांबाबत कथानायकांबरोबर जशी व्यवहाराची बोलणी झाली, तशीच मी त्यांची एक अट मान्य केली, की लेखक म्हणून कथानायकाचं नाव यायला हवं. ‘इडली’मध्ये माझं श्रेय असेल- लेखनसाह्य़; तर इतर दोन पुस्तकांमध्ये ते श्रेय असेल- शब्दांकन!’ व्यवहाराचा एक भाग आणि एक नवीन प्रयोग म्हणून मी ही अट मान्य केली.
आजमितीला माझी एकूण पंधरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी फक्त दोन पुस्तकांवर माझं श्रेय आहे- शब्दांकन आणि एका पुस्तकावर लेखनसाह्य़. बाकी सर्व पारितोषिकप्राप्त अशा राजमान्य आणि लोकमान्य पुस्तकांवर ‘लेखन- शोभा बोंद्रे’ असाच श्रेयनिर्देश आहे. तरीसुद्धा का कोण जाणे, माझ्यावर बसलेला छाप (शाप?) आहे, तो ‘शब्दांकनकार’ म्हणून! त्यालाही माझी हरकत नाही. पण बऱ्याच वेळा ‘शब्दांकन’ या शब्दाला थोडासा तुच्छतेचा किंवा कमीपणाचा वास येतो तेव्हा हसावं की रडावं, कळत नाही. शब्दांकन म्हणजे जणू काही पुस्तकाचा लेखक (?) बोलला आणि शोभा बोंद्रे हिने त्याचं बोलणं कागदावर उतरवलं, असाच साधासुधा मामला!
अशावेळी सांगावंसं वाटतं की, ‘तसं असेल तर माझ्यापेक्षा चांगलं हस्ताक्षर आणि उत्तम व्याकरण असलेली बरीच मंडळी आहेत. ‘लेखका’नं त्यांनाच लिहून घ्यायला बोलवावं. शोभा बोंद्रेंचीच काय गरज आहे?’’
शांतपणे विचार केला की असं वाटतं, वाचकाशी पटकन् संवाद साधणाऱ्या प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनाचा वापर केल्यामुळे तर हा गैरसमज होत नसेल?
तसं असेल तर माझा नाइलाज आहे. पण कित्येक वेळा कथानायकांकडूनच या गैरसमजाला खतपाणी घातलं जातं.
पुस्तकावर ‘लेखक’ असं नाव छापल्यामुळे जणू काही मीच हे लेखन केलं, अशा स्वप्नरंजनात हे कथानायक इतके मश्गूल होतात, की ‘मी पुस्तकाचं लेखन कसं केलं?’ अशा जाहीर मुलाखतीसुद्धा ते देतात. पुस्तक प्रकाशनाला मला निमंत्रण द्यावंच लागतं. पण मी उपस्थित राहिले तर त्यांचा चेहरा पडतो. आता हिच्या उपस्थितीत लेखनासंबंधी जाहीर टिमकी वाजवता येणार नाही म्हणून ते खट्टू होतात. एका प्रकाशन समारंभात अनेकांचे आभार मानून पुष्पगुच्छ दिले गेले. अगदी निवेदिकेला आणि लाइट व माइकवाल्यालाही पुष्पगुच्छ दिले गेले. पण ‘शब्दांकन’ हे श्रेय घेऊन जिने खरेखुरे पुस्तक लिहिले, तिच्या नावाचा चकार उल्लेखही झाला नाही.
शेवटी प्रकाशकांनी हळूच सूचना केली- ‘अहो, शोभा बोंद्रेंना पुष्पगुच्छ द्या.’ ही सूचना माइकने नेमकी टिपल्यामुळे सर्व उपस्थितांनी ऐकली. तेव्हा कुठे नाइलाज झाल्यासारखे ‘शोभा बोंद्रे’ यांना व्यासपीठावर बोलावून हातात पुष्पगुच्छ दिला गेला!
अशावेळी मला राग येण्याऐवजी कींव येते. पुस्तकातला कर्तृत्ववान कथानायक हे एक सत्य! पण त्याचबरोबर प्रसिद्धीचा अतिरेकी हव्यास, कोती मनोवृत्ती आणि पोकळ दंभ (व्हॅनिटी) हाही कथानायकाचा दुसरा चेहरा! असो.
यासंदर्भात गृहिणीच्याच अनुभवातून एक उदाहरण देते. माझ्या घरी जेवण्यासाठी पाहुण्यांना बोलावलेलं असतं. दोन-चार पदार्थ मी केलेले असतात. एक-दोन पदार्थ घरी येणाऱ्या स्वयंपाकीणबाईंच्या हातचे असतात!
जेवताना जर कोणी पाहुणा म्हणाला- ‘वा! भाकरी छान झाली आहे हं शोभा!’ तर मी हसून, मौन बाळगून ती स्तुती स्वीकारीत नाही. मी म्हणते, ‘आमची मंगल भाकरी फारच सुंदर करते.’ मंगलचं कौतुक केल्यामुळे आणि तिचं श्रेय तिला दिल्यामुळे माझ्या जेवणाचं महत्त्व कमी होणार असतं का? पण जितकं वलय मोठं, तितका भयगंडही मोठा आणि मन मात्र छोटं!
हा अनुभव जमेला धरून मी पुढच्या चरित्रनायकांना आणि नायिकांना प्रथमभेटीतच सांगून टाकते- ‘व्यवहाराची बाब स्वतंत्र ठेवू. बाकी ‘लेखिका शोभा बोंद्रे’ हे श्रेय मान्य असेल तरच आपण पुढे जाऊ. अन्यथा बाय बाय!’
अपवादात्मक अशी ही माणसांची एक-दोन कटु उदाहरणं सोडली तर बाकी या पुस्तकांच्या निमित्ताने माझा स्नेही-संग्रह किती वाढला! डॉ. मोहनभाई पटेल आणि इतर सर्व गुजराती उद्योजक, विलेपार्ले महिला संघाच्या बायका, निरगुडकरांसारखा दाता बिल्डर, मस्त कलंदर निलु गव्हाणकर, उदयदादा लाड आणि रघुनाथ मेदगे किंवा गंगाराम तळेकरांसारखे डबेवाल्यांचे नेते! या सर्वाशी माझं मैत्रीचं नातं आहे. आमच्यामध्ये परस्पर आदरभाव आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि हीच माझी आयुष्याची खरी कमाई आहे.
परमनप्रवेश
एखाद्याचं आत्मकथन लिहायचं म्हणजे त्याच्या अंतरंगात डुबी मारणं आलंच! ते जितक्या उत्कटतेनं होईल, तितकं ते लेखन अस्सल उतरणार. अनेक गाजलेली आत्मकथनं शब्दबद्ध करणाऱ्या सिद्धहस्त लेखिकेचं रसीलं अनुभवकथन..
आणखी वाचा
First published on: 20-02-2013 at 06:39 IST
मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experiences of autobiography writer shobha bendre