अलीकडेच झालेल्या किंवा फसलेल्या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनामुळे ‘जनआंदोलन’ या विषयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. कोणतेही जनआंदोलन मूलत: प्रस्थापित शक्तींच्या- म्हणजेच पर्यायाने सरकारच्या विरोधात असते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असतील आणि त्या मान्य केल्यामुळे काहीही बदल होणार नसेल, तर सरकारने त्या लगेच मान्य केल्या पाहिजेत. पण सरकार नावाची यंत्रणा संवेदनशून्य मेंदूची असते. आंदोलनाचे तीन तेरा वाजवण्यात, आंदोलनात फाटाफूट करण्यात सत्तेवर बसलेल्या लोकांना खूप मजा येते. जोपर्यंत मतदानावर विपरीत परिणाम होत नाही आणि जनआंदोलनातून नवे नेतृत्व उदयाला येत नाही अशी खात्री असते, तोपर्यंत सरकार आंदोलकांच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहत नाही.
भारतात राजकीय पक्षांना जेवढे महत्त्व आहे, त्यापेक्षाही अधिक जनआंदोलनांना आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेच मुळी सत्याग्रही जनआंदोलनामुळे! या अवाढव्य देशात अनंत भेदाभेद असताना, ज्यात जनतेच्या एकजुटीचे बीज वा रसायन अस्तित्वात आहे असे आंदोलन ब्रिटिश साम्राज्याला हादरवू शकते, असे त्या काळात कोणी मानले नसेल. परंतु महात्मा गांधींनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या माध्यमातून भारतीयांची एकात्मता घडविण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा ब्रिटिशांवर गंभीर परिणाम झाला. काहीजण महात्मा गांधी, अहिंसा वगैरे शब्द वाणीविलास म्हणून वापरतात, पण त्यांच्या मनात मात्र हिंसा किंवा युद्धात पराक्रम गाजवलेले योद्धे असतात. अण्णा हजारेप्रणीत आंदोलनात असेच काहीतरी घडले असावे. ते म्हणत, ‘मी तसा गांधीवादी आहे. पण कधी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने जाणे पसंत करतो. अनेक वेळा सांगूनही पटत नसेल तर शेवटी हिंसेचा वापर करावा लागतो.’ अण्णांचा हिंसा-अहिंसेच्या विवेकावर भाष्य करण्याचा हा दुबळा प्रयत्न होता. एकाच घोडय़ावर पंचा नेसलेले महात्मा गांधी आणि चिलखत, जरीटोप, कमरेला तलवार लावलेले शिवाजीमहाराज असे दोन स्वार महाराष्ट्रात फिरताहेत असे त्यांच्या मनोविश्वात पक्के बसलेले असावे. त्यांच्या ओठात काहीही असले तरी अडचणीच्या वेळी पोटातले बाहेर पडतेच. म्हणून तर ‘शरद पवारांना एकच थोबाडीत मारली?’ असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे केला.
सत्याग्रही जनआंदोलन हे फारच आगळेवेगळे प्रकरण आहे. त्यात हिंसेवर किंचितही विश्वास असल्यास जसे यश मिळत नाही, तसेच कुणाला वैरी मानले तर अपयश हमखास येते. ज्या आंदोलनामुळे देशात एकता व अखंडता घडवायची अशी अपेक्षा व आकांक्षा असते, त्यात फाटाफुटीचे कारण असूच शकत नाही. फार तर एकच कारण असू शकते. आंदोलनातील काही लोकांचा संयम सुटतो तेव्हा ते हिंसेची भाषा करू लागतात. सार्वजनिक जीवनात हिंसेची भाषा वापरणे, हे अंध:कारमय अंत:करणाचे व घोर निराशेचे लक्षण होय. आशावाद हे निरोगी मनाचे आणि निराशा हे मनोविकृतीचे लक्षण आहे.
 ‘टीम अण्णा’मधील फाटाफूट ही राजकीय पक्ष स्थापन करायचा की नाही, या विषयावर झाली. अर्थात हे वरवरचे झाले. खरे म्हणजे जनआंदोलनात फाटाफूट फक्त एकाच मुद्दय़ावर होऊ शकते. त्या मुद्दय़ावर फूट पडली तर ती आंदोलनाला पोषक ठरते. हिंसा-अहिंसा या विषयावर मतभेद झाले आणि त्यातून हिंसावाद्यांना हाकलून दिले, किंवा हिंसेवर दृढ निष्ठा असलेले स्वेच्छेने त्या आंदोलनातून बाहेर पडले, तरी त्या आंदोलनाची हानी होत नाही. अण्णांच्या मनात अहिंसेबद्दल स्पष्टता नव्हती, हे आंदोलनाच्या अपयशाचे कारण आहे. पक्ष काढायचा की पक्ष न काढता काम करायचे, हा वादाचा खरा विषय नाहीच. महात्मा गांधी जेव्हा अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यासाठी काँग्रेसचा राजीनामा देऊन देशाच्या दौऱ्यासाठी बाहेर पडले, त्या काळातली एक गोष्ट आहे. काँग्रेसची भूमिका संपूर्ण स्वराज्याची होती. पण काहीजण म्हणत, ‘हप्त्या-हप्त्याने जी सत्ता मिळेल ती घेत जावी.’ अशी भूमिका बाळगणाऱ्या लोकांना ‘फेरवादी’ म्हणत. मूळ भूमिकेत बदल करावयाचा नाही म्हणून जे या फेरवाद्यांना कट्टर विरोध करीत त्यांना ‘नाफेरवादी’ म्हणत. अण्णा स्वत: एकाच वेळी ‘फेरवादी’ अन् ‘नाफेरवादी’ आहेत. ते निवडणुकीत त्यांना पसंत असलेल्या उमेदवारासाठी प्रचार करू इच्छितात आणि त्याचबरोबर राजकीय पक्ष नको, असा आग्रहही धरतात. त्यांचा फोकस जनतेच्या प्रबोधनावर नसून स्वत:चा व्यक्तिगत संप्रदाय वाढवण्यावर आहे असे दिसून येते. अरविंद केजरीवाल अण्णांच्या आदेशावरून दिल्लीत कपिल सिब्बल यांच्या विरोधात उभे राहिले तर अण्णांना ते प्रिय होणार आहेत. गावात पाटलाचा अपमान झाल्यास त्याचा अपमान करणाऱ्याला जो कुणी धडा शिकवतो, तोच पाटलाला प्रिय होतो. असाच हा प्रकार आहे. कपिल सिब्बल यांनी अण्णांचा अपमान केला होता. ते अपमान कधीच विसरत नाहीत. समजा, कपिल सिब्बल यांना निवडणुकीत कुणीही पराभूत केले तरी ती व्यक्ती अण्णांना प्रिय होणार, हे नक्की! अण्णांच्या भूमिकेचा अर्थ नीटपणे समजून घेतला तर असे लक्षात येते, की राजकीय पक्ष स्थापन झाल्यास अरविंद केजरीवालांचे व्यक्तिमाहात्म्य अण्णांच्या व्यक्तिमाहात्म्यापेक्षा अधिक वाढू शकते. म्हणून त्यांना पक्ष नको असावा.
त्यांना जर राजकीय पक्ष नको, तर अण्णा देशात दौरा करून आपली भूमिका स्पष्ट का करीत नाहीत? आज अण्णांचे भाषण ऐकायला लोक जमतीलच याची खात्री नाही. देशात दौरा करण्यापूर्वी अण्णा एक संघटना स्थापन करणार आहेत. त्यासाठी ते लोकांच्या मुलाखती घेणार आहेत. लोकांचे अर्ज मागवून, मुलाखती घेऊन जगात कोणतीही परिवर्तनकारी संघटना निर्माण झाल्याचा आजवर दाखला नाही. पुन्हा तोच मुद्दा. ज्यात अण्णांचे व्यक्तिमाहात्म्य अबाधित राहील, फक्त तीच गोष्ट अण्णांना मान्य असते. दुसऱ्या व्यक्तीला मोजण्याची अण्णांची पद्धत वेगळी आहे. जो त्यांच्या पायावर डोके ठेवतो, तो त्यांच्या दृष्टीने भला माणूस असतो. आम्ही अहमदनगरच्या एका शाळेतले समकालीन विद्यार्थी आहोत. मी कसा त्यांच्या पाया पडणार? माझा अंदाज आहे, की याच कारणाने कधी त्यांनी मला मनापासून स्वीकारले नसावे. त्यांच्या मनात प्रचंड न्यूनगंड असावा, त्यामुळेच त्यांच्या पाया पडल्याशिवाय ते कुणालाही स्वीकारत नाहीत. अण्णा अन्यथा ठीक माणूस आहेत. परंतु भल्या माणसाच्याही काही मर्यादा असतात. हेच नेमके लोक लक्षात घेत नाहीत. राळेगणमध्ये यशस्वी झालेली व्यक्ती राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनाचे नेतृत्व करू शकेल असे मानणे भाबडेपणाचे होईल. अर्थात समाज आपला भाबडेपणा सहजासहजी मान्य करीत नाही.
अरविंद केजरीवाल, किरण बेदी या कंपूने अण्णांचा ग्रामीण बाज वापरायचा असे ठरवले. कारण त्याला बाजारमूल्य आहे. त्यांची एन.जी.ओ. संघटना फेसबुक, ट्विटर, यू टय़ूब अशा विविध आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून आपले नेटवर्क जोरदार तयार करत होती. हा प्रकार पूर्णपणे शहरी होता. आधुनिक होता. परंतु देश मात्र अजूनही ग्रामीण आहे म्हणून त्यांनी धोतर-टोपी या वेशातील एक ग्रामीण चेहरा वापरण्याचे तंत्र अवलंबले. हे कोणताही मंत्र नसलेले तंत्र होते. मुंबईला अण्णा गर्दी खेचू शकले नाहीत, त्याक्षणी अण्णांचा उपयोग संपला. तेथेच अण्णा व टीम अण्णा यांच्यात फारकत सुरू झाली. प्रसारमाध्यमे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे अनेक युक्त्या वापरतात.
दिल्लीतल्या मंडपात जोपर्यंत गर्दी होती, तोपर्यंत ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे तंत्र यशस्वी झाले. मुंबईला जेव्हा गर्दी नव्हती, तेव्हा रिकाम्या जागेची दृश्ये वारंवार दाखविण्यात आली. बिसलेरीच्या पाण्याच्या बाटल्यांचा प्रचंड साठा आणि त्याच पाण्याने पाय धुणारे अनुयायीदेखील प्रसारमाध्यमांनी दाखवले. गणपती बसवताना जे वाजतगाजत गणेशाची मूर्ती आणतात, तेच लोक त्या मूर्तीचे विसर्जन करताना पुढाकार घेतात. तसेच येथे झाले. प्रसारमाध्यमांनी अण्णांची मूर्ती प्रचंड बोलबाला करीत व्यासपीठावर आणली. ज्यांनी अण्णांना सल्ले दिले, त्याच प्रसारमाध्यमांनी अण्णांचे विसर्जनही मोठा बोलबाला करून केले.
अण्णा आत्मकेंद्री असल्याने कधीच संघटक नव्हते. भविष्यातही कधी होणार नाहीत. त्यांच्याकडून भलत्या अपेक्षा करणे चुकीचेच आहे. प्रसारमाध्यमांनी त्यांना भलत्याच उंचीवर नेऊन बसवले आणि त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा केली. अण्णा स्वत: मात्र जे होते, तेच होते. जे भाषण अण्णा ग्रामीण भागात करतात, त्याचीच ते दिल्लीत पुनरावृत्ती करीत. आपल्या टीकाकारांना धडा शिकवायचा अशी त्यांची मानसिकता होती. पंतप्रधान, संसद व लोकशाहीतील प्रभावी संस्थांवर त्यांनी जहरी टीका करायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमांनी लाऊडस्पीकरचे काम केले. देशाच्या कानाकोपऱ्यात ही बातमी पोहोचवली. लोकांमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि अण्णांच्या भूमिकेच्या विरोधात सगळे एकत्रित आले. आपल्या वाणीने जनतेची एकी करत लोकशक्ती उभी करण्याऐवजी हे आंदोलन विसंगतीने घेरले गेले. एका अर्थी हे आंदोलन अपयशी ठरले, हे चांगलेच झाले. त्यामुळे लोकशाही संस्था शाबूत राहिल्या. आंदोलनाच्या अपयशाच्या कारणांवर प्रचंड मंथन सुरू झाले. त्यामुळे यापुढे जनतेकडून अशा भाबडेपणाची पुनरावृत्ती होणार नाही. परिणामी अस्सल सत्याग्रही जनआंदोलन उभे राहण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
अण्णा त्यागाबद्दल सतत सांगत असतात, पण त्यांची भाषा अप्रत्यक्षरीत्या स्व-गौरवाचाच एक भाग असते. जनआंदोलनात सामान्य माणसांना आकर्षित करावयाचे असते. रोज सामान्य माणसांची संख्या जितकी वाढेल, तेवढे आंदोलन व्यापक व तीव्र होते. तेव्हा सामान्य माणसांना न पेलवणाऱ्या संकल्पना वा कार्यक्रम जनआंदोलनात असता कामा नयेत. जनआंदोलनात अंतिम त्यागाची अपेक्षा एकच असते, ती म्हणजे कारावास पत्करणे. प्रसारमाध्यमे म्हणजे प्रतिमांचा खेळ! प्रतिमा आणि वास्तव अलग असू शकते. जनआंदोलनाला प्रसारमाध्यमांनी साथ दिली नाही तरी आंदोलनातील जनसंख्या मात्र वाढत राहायला हवी. प्रसारमाध्यमांचीदेखील भारावून जाण्याची वृत्ती नसावी.
सत्याग्रही आंदोलनात काही कठोर पथ्ये असतात, ती पाळावी लागतात. सर्वात महत्त्वाचे पथ्य म्हणजे जनआंदोलन लोकवर्गणीतूनच झाले पाहिजे. वर्गणी आवश्यकतेएवढीच गोळा करावी. आंदोलनाचा रोजचा खर्च भागल्यानंतर शिल्लक रक्कम उरता कामा नये, हे पथ्य पाळणे खूप गरजेचे आहे. दोन-चार भांडवलदार जर आंदोलनाचा खर्च करीत असतील तर त्यांचा रंग आंदोलनाला लागतो. हळूहळू ती माणसे आंदोलनाचे सुकाणू हातात घेतात. दिल्लीच्या आंदोलनात लोकांना मिष्टान्न देण्यासाठी दीडशे आचारी होते असे म्हणतात. त्यामुळे एक वेळ याला संघर्ष म्हणता येईल, पण जनआंदोलन म्हणता येणार नाही. अण्णा व अरविंद केजरीवाल यांच्यात एका गोष्टीत साधम्र्य आहे. ते म्हणजे दोघेही दुसऱ्यावर आरोप करण्यात परमानंद घेतात. कोणत्याही आरोपाला सत्य मानणे याला ‘सत्याची उपासना’ म्हणत नाहीत. आंदोलनामध्ये जेव्हा विपरीत गोष्टींचा शिरकाव होतो, तेव्हा त्यात मूलभूत चुका घडतात. टीम अण्णाचा संघर्ष अपयशी झाला असे म्हणता येईल. परंतु भविष्यात कुणी सत्याग्रही जनआंदोलनात कधीही यशस्वी होणारच नाही असे कोणी मानू नये. निराश व्हायचे तर काहीच कारण नाही. ही मंडळी चुकली म्हणून सत्याग्रहशास्त्र टाकाऊ झाले असा दावा करायचे कारण नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा