dwi58सृजनशील कलेमध्ये काम करणाऱ्या कलावंताला त्याच्या निर्मितीमागची प्रेरणा नेमकेपणाने सांगणे अवघड असते. कधी एखादा नाजूक क्षण हा निर्मितीसाठी प्रेरक ठरतो; तर कधी कधी अशा घटनांची मालिकाही सृजनात्मक कलेच्या निर्मितीसाठी प्रेरक ठरू शकते. जसे एखादे झाड सांगू शकत नाही, की त्याने जमिनीखालचे पाणी नेमके कोठून शोषून घेतले. कलेच्या संदर्भातही काहीसे असेच आहे असे मला वाटते. त्यामुळे माझ्या कलाकृतीच्या निर्मितीमागच्या प्रेरणांचा स्रोत ठळकपणे मला सांगता येणार नाही. त्यातल्या काही प्रेरणा या सूक्ष्म वा अमूर्त असतात; तर काही वेळा प्रेरणांचा स्रोत ठोस असू शकतो. चित्रपट म्हणजेच फिल्म ही माझ्या जगण्यापेक्षा वेगळी आहे असे मी समजतच नाही. सामाजिक बांधिलकी किंवा सामीलकीच्या भूमिकेतून चित्रपटाचे जगण्याशी अतूट नाते आहे अशीच माझी भावना आहे.

माझ्यात फिल्ममेकिंगची प्रेरणा मिथुनचंद्र चौधरी या माझ्या मित्रामुळे निर्माण झाली. त्याने पुणे विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम केला होता. त्यावेळी ‘कम्पल्सरी हेल्मेट’ हा लघुपट त्याने निर्माण केला होता. मिथुन ही फिल्म करू शकतो, तर मी का नाही, असा विचार माझ्या मनात आला. त्याआधी मी उमेश कुलकर्णी याचा ‘गिरणी’ हा लघुपट पाहिला होता. तोपर्यंत शॉर्ट फिल्म किंवा लघुपट असा काही प्रकार असतो, हे मला माहीतदेखील नव्हते. अभिव्यक्तीच्या अनुषंगाने लघुपट हे मला जवळचे आणि माझे माध्यम आहे असे ‘कम्पल्सरी हेल्मेट’ पाहताना मला जाणवले. आणि हाच माझ्या पुढील चित्रपटनिर्मितीच्या प्रेरणेचा स्रोत असावा. मी पुणे विद्यापीठामध्ये मराठी विषयात एम. ए. करीत असताना मिथुन एम. फिल. करीत होता. तेव्हापासून आमची केवळ ओळख झाली असे नाही, तर आमचे चांगलेच मैत्र जुळले. त्यानंतर मी नगर येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी माझा मित्र असलेला मिथुन हा माझा शिक्षक होता आणि मी त्याचा विद्यार्थी. आमच्या वयामध्ये फारसे अंतर नाही. मिथुनपेक्षा मी फक्त तीन वर्षांनी लहान होतो.
मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी एक लघुपट तयार केला होता. ‘रस्त्यांना जरी फुटती रस्ते, पायांना नच फुटती पाय, पाय ओढिती एकच रस्ता, इथेच हरले सर्व उपाय’ या कवितेच्या अवघ्या चार ओळींवर हा लघुपट मी तयार केला होता. ही कविता आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वडील आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रमेश तेंडुलकर यांची. ही शॉर्टफिल्म अगदीच प्रायोगिक म्हणजे ‘अॅमॅच्युअर’ होती. मात्र, या कवितेच्या आणि लघुपटाच्या प्रेरणा मी माझ्या भोवतालातील जगण्यामध्ये शोधल्या. महात्मा फुले यांचे ‘अखंड’ वाचल्यानंतर अविद्या- म्हणजे शिक्षणाच्या अभावामुळे काय होऊ शकते, हे ध्यानात आले. समाजातील कित्येकजण असे आहेत, की गरिबी आणि दु:ख यामुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. शिक्षणाच्या या संघर्षांबाबत आपण लघुपट करावा, असे माझ्या डोक्यात आले आणि एका प्रखर जाणिवेतून मी ‘पिस्तुल्या’ची पटकथा लिहिली. लिहून झाल्यानंतर ही कथा मी वर्गात वाचून दाखवली होती. त्यावेळी ‘बायसिकल थीफ’ या चित्रपटाच्या कथेशी ही कथा मिळतीजुळती असल्याचे मित्रांचे मत झाले. जाणता-अजाणता का होईना, ‘बायसिकल थीफ’चे अनुकरण करणे योग्य नाही असे मला तेव्हा वाटले. परंतु मी लिहिले ते वेगळ्या धाटणीचे आहे असे माझ्या लक्षात आले आणि मी ‘पिस्तुल्या’ हा लघुपट केला.
‘सिनेमा पॅराडिसो’ हा माझा आवडता लघुपट आहे. हा लघुपट जणू माझ्याच आयुष्याबद्दल बोलतो आणि मीच या लघुपटाचा नायक आहे असे मला वाटते. कथाकथनाचा हा ‘फॉर्म’ असा आहे, की ज्याद्वारे मी माझ्या आयुष्याबद्दल खूप काही बोलू शकतो, याची झालेली जाणीव हीदेखील एक प्रेरणाच आहे. असा सकारात्मक विचार हीसुद्धा एक प्रेरणाच आहे. तसेच कुणी तुम्हाला हिणवते किंवा अडवते, तेव्हा तीदेखील एका अर्थाने प्रेरणा असू शकते.
लहानपणापासून मला चित्रपट पाहण्याचा छंद होता. अमिताभ बच्चन, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती आणि गोिवदा यांचे भरपूर चित्रपट मी पाहिले आहेत. त्याशिवाय माझ्या आयुष्यात मी इतके काय काय बघितले आहे, की त्या गोष्टी पडद्यावर अजून आलेल्याच नाहीत. माझ्यासारख्या उपेक्षित आणि वंचित माणसाच्या जगण्याला कोणीच पडद्यावर मूर्त स्वरूप दिलेले नाही. मी पाहिलेले चित्रपट छान आणि सुखी आयुष्याचेच होते. नायकही अगदी गोरेपान, खाऊनपिऊन सुखी असे खुशालचेंडू. खेडय़ातली, माझ्यासारख्या नावाची, माझ्या रंगरूपाची माणसे कधी रूपेरी पडद्यावर झळकलेलीच नाहीत. माझी सुख-दु:खं, माझ्या व्यथा आणि माझी स्वप्नं या चित्रपटांतून कधीच दिसत नाहीत. तेव्हा या कथा मीच सांगितल्या पाहिजेत, हा माझा हट्ट हीदेखील एक प्रेरणाच होती. उपेक्षित राहिलेल्या समाजातील एका मोठय़ा वर्गाच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशातूनच ‘फॅन्ड्री’ची निर्मिती झाली.
दहावीत असताना मी मैदानावर बास्केटबॉल खेळत होतो. खेळताना चुकून माझा हात एका मुलीला लागला. त्यावेळी ‘ए फॅन्ड्री’ असे म्हणून तिने मला हिणवले. तीसुद्धा ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीमागची एक प्रेरणा असू शकते. तेव्हा ती मुलगी म्हणाली ते माझ्या मनाला लागले. ‘फॅन्ड्री’ या संबोधनाने मी खचलो. पंधरा दिवस मी शाळेला गेलोच नाही. तो आघात मी गुपचूप सहन केला. आपल्यालाच असे का म्हटले जाते? यात dwi56आपला दोष काय? ही न्यूनगंडाची शिदोरी माझ्यात का आहे? असे प्रश्न मला भेडसावत होते. सतावत होते. त्या मुलीविषयीचा राग, त्रागा, विफलता मनामध्ये साठली होती. तो राग, संताप हाच ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीला कारणीभूत ठरला आहे. व्यवस्थेने ज्यांना फॅन्ड्री ठरवले, त्यातला मीही एक आहे. पण हा दोष असलाच तर त्या क्रूर आणि निर्दयी व्यवस्थेचा आहे. कदाचित ती मुलगी सहजपणाने म्हणाली असेल. रूढी-परंपरा आणि संस्कृतीने शिकवलेल्या आचाराला तिने फक्त उच्चार दिला. तो आघात आणि काळजाला झालेली जखम हीच माझी प्रेरणा ठरली. त्या मुलीचे आणि माझे संबंध आज चांगल्या मैत्रीचे आहेत. तिच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही कटुता उरलेली नाही. तिचे लग्न झाले असून आपल्या संसारामध्ये ती सुखी आहे. पण त्यावेळी तिने मला ‘फॅन्ड्री’ असे संबोधल्यावर त्यावेळी आलेल्या रागाच्या भरात मी तिच्या कानाखाली लगावली होती. परंतु आता लक्षात येते, की यात तिचा काहीच दोष नाही. अर्थात ही जखम माझ्या एकटय़ाची नाही. ही जखम असंख्य जणांची आहे. हजारो वर्षे कोंडवाडय़ात असलेल्या दलितांची ही व्यथा-वेदना आहे. त्यांच्या या जखमेने बोलले पाहिजे, या लोकांचे दु:ख आपण मांडले पाहिजे, ही ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीमागची आणखीन एक प्रबळ प्रेरणा आहे.
मी तोवर पाहिलेले बॉलीवूडचे चित्रपट ही माझ्यासाठी तशी एक नकारात्मक प्रेरणा ठरली. त्यावेळचे बहुतांश हिंदूी चित्रपट हे सपक, गुळगुळीत असायचे. त्यातील नायकाच्या जाणिवांची चाकोरी मला ‘रिलेट’ करणारी नव्हती. मी दलित, ग्रामीण साहित्याचे वाचन केलेले आहे. आपल्याला आपली भाषा बोलता येईल का, या भूमिकेतून आपल्या आयुष्याची कथा चित्रपटातून सांगितली गेली पाहिजे असे मला वाटले. मी िवदा करंदीकर, कुसुमाग्रज, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर यांच्या कविता आणि चेकॉव्ह, दोस्तोवोस्की यांच्या कथांचे वाचन केले आहे. अशा साहित्याचे वाचन करून आपण आपला आवाज गडद केला पाहिजे असे मला वाटले.
‘माझ्या हाती नसती लेखणी तर
असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला..’
हाच ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीमागचा विचार आहे.
आपणही अभिनय करावा असे मला वाटायचे. खेडय़ात राहून हे शक्य नव्हते. मी पाहिलेल्या चित्रपटांतील ग्रामीण नायक शहरीच असायचे. त्यांना खेडय़ातला माणूस होता यायचे नाही. मराठी चित्रपटांतूनही कोल्हापूर हे एकमेव खेडे येत होते. वैदर्भीय, मराठवाडी, नगरी, सोलापुरी भाषा चित्रपटांतून दिसायची नाही. त्यामुळे माझ्या प्रांतातील ‘लक्का’ हा शब्द ‘फॅन्ड्री’मध्ये मी जाणीवपूर्वक वापरला. ही भाषा चित्रपटात प्रथमच dwi57आली. त्याला मी निमित्तमात्र ठरलो, याचे खूप समाधान वाटते. मला माझ्या भाषेत माझी दु:खं मांडायची होती. ओबडधोबड नायकाच्या तोंडून कथा मांडायची, हीसुद्धा एक प्रेरणा होतीच.
सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’ हा चित्रपट मी ‘फॅन्ड्री’ बनविल्यानंतर पाहिला. हा चित्रपट पाहून मी कवितादेखील केली होती. गरीबची कथा हा माझ्या आणि सत्यजीत रे यांच्या चित्रपटांतील समान धागा आहे. मात्र, दोघांची पाश्र्वभूमी वेगवेगळी आहे. दृष्टिकोन आणि धाटणीही वेगळी आहे. सत्यजित रे हे भारतरत्न मिळालेले एकमेव फिल्ममेकर आहेत. त्यांचे चित्रपट हे महामार्ग आहेत, तर माझी आपली साधी पाऊलवाट आहे. याच रस्त्याने मी जाईन की नाही, हेदेखील आज सांगता येत नाही. भविष्यामध्ये मी चित्रपट बनवण्याचाच मार्ग अनुसरेन का, याविषयीही माझ्या मनामध्ये साशंकता आहे.
श्याम बेनेगल, ऋत्विक घटक, व्ही. शांताराम हे माझे आवडते फिल्ममेकर. ‘फॅन्ड्री’ची पटकथा लिहिताना आपण काही वेगळे लिहितो आहोत याची जाणीव झाली. पण जातीचं दु:ख मांडताना कोणाला दोषी ठरवू नये, ही माझी भूमिका होती. मी व्यवस्थेला माफ करण्याची भूमिका स्वीकारली. समाजात क्रूर, निर्दयी घटना घडताहेत, त्यांची दखल घ्या, एवढंच सांगण्याचा माझा उद्देश होता. किशोर कदम वगळता मी ठरवून बाकी सारे नवे चेहरेच घेतले. चित्रपट करताना मला तांत्रिक अंगाचे काही ज्ञान नव्हते. आशय सशक्त असेल तर तंत्र थोडे उन्नीस-बीस असले तरी चालते असे मला वाटते. ज्यांचा काही बायोडाटा नाही असे दगड फोडण्याचे काम करून आयुष्यभर संघर्ष करत मुलांना शिकविणारे वडील ही माझी प्रेरणा आहे. ज्यांना स्वत:ला अक्षरांची ओळख नाही, तसेच ज्यांना आयुष्याचे गणित कधी सोडवता आले नाही, पण तरीही आपल्या मुलांनी शिकले पाहिजे, ही आस मनात धरून आम्हा भावंडांना शिक्षण देणारे माझे वडील हे माझ्यासाठी.. माझ्या ‘फॅन्ड्री’च्या निर्मितीकरता प्रेरणादायी ठरलेत. 
शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Story img Loader