मुंबई महापालिकेत सेवेत असताना शहरातल्या बडय़ा बडय़ा धेंडांची अतिक्रमणे बिनधास्त जमीनदोस्त करणारे आणि महाराष्ट्रातील सत्तांतरास कारणीभूत झालेले गो. रा. खैरनार या नावाची तळपती तलवार आज कुठं आहे, असा प्रश्न सामान्यांना पडतो. खैरनार तसे अधूनमधून प्रसिद्धी माध्यमांत येत असले तरी त्यांच्याभोवती आता पूर्वीचं वलय उरलेलं नाही. काय आहे आज त्यांची मन:स्थिती..?
‘अपेक्षेने पाहावे अशी व्यक्तिमत्त्वे आता समाजात फारशी दिसत नाहीत,’ असे निराश उद्गार आजकाल बऱ्याचदा आसपास ऐकू येतात. दुर्दैवाने आजच्या राजकीय व्यवस्थेत नेते आणि मंत्र्यांकडून कर्तृत्वाचे डोंगर उभे राहण्याऐवजी भ्रष्टाचाराचे डोंगर उभे केले जात आहेत. हजारो कोटी, लाखो कोटी हे आकडे भ्रष्टाचाराची वर्णने वाचताना आपण अगदी सहजपणे उच्चारतो. आजची काँग्रेस पाहून महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचे आत्मे ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असे म्हणत अस्वस्थपणे येरझारा घालत असतील. सुभाषचंद्र बोस पुन्हा एकदा ‘आझादी’चा नारा देत असतील. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपली आहुती देणारे चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, कान्हेरे आदी स्वातंत्र्यवीरांचे आत्मेही सध्या देशात जे काही सुरू आहे ते पाहून तळमळत असतील. जातीपातीच्या राजकारणाने जोर धरला आहे. जवळपास सर्वच शासकीय व्यवस्थेत पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. हे काय चालले आहे? शाळेत घालण्यापासून पैसे चारायला लागणार असतील तर ‘स्वच्छ व प्रामाणिक राहा..’ असे शिक्षक तरी विद्यार्थ्यांना कोणत्या तोंडाने सांगणार?
.. मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे गो. रा. खैरनार यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयात थडकलो. खैरनार एकटेच तिथे बसले होते. फायलीत डोके खुपसून. उजव्या हातातील पेन्सिलने समोरच्या कागदांवर काही खाणाखुणा सुरू होत्या.
मी समोर जाऊन उभा राहिलो तरी त्यांनी मान वर केली नाही. बहुधा त्यांच्या ते लक्षातच आलेलं नसावं. मग मी हातातल्या पुस्तकावर टकटक केलं. त्या आवाजानं खैरनार भानावर आले. त्यांनी वर बघितलं. क्षणभरानं त्यांच्या डोळ्यांत ओळखीचे भाव उमटले आणि मंद स्मित करत त्यांनी मला समोर बसण्याची खूण केली.
मी काही मिनिटे त्यांच्याकडे शांतपणे पाहत होतो. तेही बहुधा मला न्याहाळत असावेत. खैरनारांनी आता वयाची सत्तरी पार केलेली असावी. पण आजही ते तसेच आहेत. आताही पालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईची जबाबदारी दिली तरी त्यांचा हातोडा त्याच त्वेषाने उचलला जाईल. डोक्यावरचे केस संपूर्ण पांढरे झालेत. पण शर्टाची बाही अजूनही सरसावलेलीच- तशीच! बोलतानाही हाताच्या बाह्य़ा वर सरकवत बोलण्याची लकबही तीच.
महापालिकेत रिपोर्टिग करताना जवळपास दररोजच खैरनारांच्या कार्यालयात आमचं जाणं असायचं. एखाद्या दिवशी हाताला काहीच बातमी लागली नाही की खैरनार समोरची फाइल उघडी करायचे आणि काहीतरी सनसनाटी हाताला लागायचं. अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील मोहीम राबवता राबवता निवडणुकीच्या रिंगणात शरद पवारांच्या विरोधातील ‘स्टार प्रचारक’ झालेले गोविंद राघो खैरनार यांनी भ्रष्टाचारावरही आपला हातोडा हाणण्यास सुरुवात केली आणि राज्यातील सत्तांतराचे तेही एक शिल्पकार ठरले.
पालिकेतील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर खैरनार काय करत होते, सध्या काय करतात, तेव्हा सळसळता असलेला हा माणूस आजही तितकाच वादळी आहे का, हे सारं या भेटीत जाणून घ्यायला मी उत्सुक होतो.
काही वेळानं मी ‘नोट्स’ घेण्यासाठी वही उघडली, पेन सरसावलं आणि त्यांच्याकडे बघितलं. महापालिकेत खैरनारांच्या कार्यालयात समोर बसून वही उघडली की ते बोलायला सुरुवात करायचे आणि एखादी तरी बातमी मिळायचीच. आजही मी वही उघडताच खैरनारांच्या डोळ्यांत एक हास्य उमटलं. त्यांनाही बहुधा ते दिवस आठवले असावेत.
मग त्यांना ‘बोला’ म्हणून सांगावं लागलंच नाही..
समोरची फाइल त्यांनी बंद केली. त्यांची नजर समोर कुठेतरी स्थिरावली होती. हातातली पेन्सिल टेबलावर आडवी ठेवून ती बोटांनी फिरवत खैरनार बोलू लागले..
‘‘तेव्हा मी केवळ शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. आजची परिस्थिती तर खूपच खराब झाली आहे. सारी व्यवस्थाच सडत चालली आहे. कुणा एका पक्षाचे नव्हे, तर सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही कमी-अधिक प्रमाणात याला जबाबदार आहेत.’’
बोलण्याच्या सुरुवातीलाच खैरनार यांच्या स्वरात अस्वस्थता ओसंडू लागली होती. मला त्या क्षणी त्यांचे जुने दिवस आठवले.
मुंबई महापालिकेत ते साहाय्यक आयुक्त म्हणून दादरमध्ये कार्यरत असताना पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं. दादरच्या भाजी मंडईमध्ये तेव्हा फेरीवाल्यांची कमालीची दादागिरी होती. पालिकेचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरत असत. परंतु डोक्यावर पांढरे हेल्मेट आणि हातात लाकडी दंडुका घेऊन खैरनार कार्यालयाबाहेर पडले की दूरवरच्या फूटपाथवर लगेचच खबर जाई आणि खैरनार तिथे पोहोचण्याआधीच फेरीवाले गायब झालेले असत. त्यावेळी फूटपाथ एकदम सामसूम व्हायचा. आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीही दादर भागातील अनधिकृत बांधकामांवर त्यांचा हातोडा पडला होता. मुलीचा बाप म्हणून थोडा वेळ लग्नाला हजेरी लावून पुन्हा हा माणूस पालिकेचा अधिकारी या भूमिकेत शिरला होता आणि पालिका मुख्यालयातील कार्यालयात दाखल झाला होता.
मी त्या आठवणींचा कप्पा खैरनार यांच्यासमोर उघडा केला आणि बोटाने पेन्सिल फिरवता फिरवता खैरनारांनी माझ्याकडे पाहिलं. ते हसले आणि माझ्या मनातील आठवणींचा पट ते शब्दांत उलगडू लागले..
‘‘सकाळी साडेआठ-नऊ वाजताच मी पालिकेत कामावर दाखल व्हायचो ते रात्री नऊ-साडेनऊला माझं काम संपायचं. समोरची कुठलीही फाइल उगीचच पेंडिंग ठेवायची नाही, यावर माझा भर असायचा.’’
खैरनार बोलू लागले आणि मी उगीचच प्रश्नार्थक चेहरा केला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचलं असावं.
‘‘एखादी फाइल रखडली, की सामान्य माणसाला किती त्रास होतो, त्याला किती नुकसान सोसावे लागते, याचा मला पुरेपूर अनुभव होता..’’ खैरनारांनी जणू माझ्या डोळ्यांत उमटलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुन्हा बोटानं समोरची पेन्सिल फिरवत ते बोलू लागले-
‘‘नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिंपळगाव येथे गरीब घरात माझा जन्म झाला. घराण्यात कोणी शिकलेले नव्हते. मी शिकावं आणि मास्तर बनावं असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लहानपणी माझी देवावर नितांत श्रद्धा होती. मी न चुकता नेमाने देवळात जायचो. देवाला नारळ-दिवा करायचो. कारण देवच परीक्षेत पास करतो अशी माझी श्रद्धा होती. सातवीत असताना माझ्या मास्तरांनी माझे डोळे उघडले. देवळात जाऊन, नाकं घासून काही उपयोग नाही. भरपूर अभ्यास केला तरच पास होशील, हे त्यांनी खडसावून सांगितलं आणि मग माझ्या देवळातल्या वाऱ्या कमी झाल्या. मी अभ्यास करू लागलो, कारण मला मास्तर व्हायचं होतं..’’
खैरनार मिस्कीलपणे आपलं लहानपण वाचत होते..
‘‘अभ्यास करू लागल्यावर खरोखरच चांगले मार्क मिळाले आणि मास्तर व्हायचं स्वप्न आणखीन मोठं झालं. नंतर आपण ‘सर’ व्हावंसं वाटू लागलं. पुढे तर प्राध्यापक झालो तर किती चांगलं, असं वाटू लागलं आणि मी शिकतच राहिलो. शिक्षण पूर्ण झाल्यावर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासकीय सेवेत दहा वर्षे मी काम केलं. त्याच काळात लग्नही झालं. परंतु मुंबईत स्वत:चं घर नसल्यानं व पालिकेच्या नोकरीत घर मिळतं असं समजल्यामुळे शासनाची नोकरी सोडून मी पालिकेच्या नोकरीत दाखल झालो. पुढे विभाग अधिकारीपदाची परीक्षा दिली.’’
हे ऐकताच मला राहवलं नाही. म्हणालो-‘‘..आणि इथूनच खैरनार नावाच्या वादळाचा प्रवास सुरू झाला.’’  
ते हसले आणि पुढे बोलू लागले..
‘‘१९७६ साली वॉर्ड ऑफिसर बनल्यानंतर विविध विभागांत काम करताना एकीकडे कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यायचं, तर दुसरीकडे अनधिकृत फेरीवाल्यांपासून अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करायची असा रोजचा उपक्रम सुरू झाला. माटुंगा विभागात असताना वरदराजन मुदलियार ऊर्फ ‘वरदाभाई’च्या धंद्यांवर मी कारवाई केली. त्यातून माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले. वरदाभाई एके दिवशी माझ्या कार्यालयात येऊन मला ‘मदत’ करण्याची व रिव्हॉल्व्हर देण्याची भाषा करू लागला. एकदा तर एका बडय़ा पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच वरदाभाईच्या उपस्थितीत, ‘वरदाभाईशी जुळवून घ्या,’ असा सल्लाही मला देण्यात आला. मला समजावणीचे खूप प्रयत्न झाले. पण त्यांची ही भाषा तेव्हा मला समजतच नव्हती. कोणतंही अतिक्रमण ‘मोडून काढणे’ एवढंच मी जाणत होतो. अर्थात त्याची किंमतही मी मोजली. १९८५ साली दादरला अचानक माझ्यावर गोळीबार झाला. पायात गोळी घुसली. या हल्ल्यामागे वरदाभाई आणि तत्कालीन काही राजकीय नेते होते, हे मी जाणलं. परंतु त्यांच्यापैकी कोणावरही तेव्हा ठोस कारवाई झाली नाही. तथापि मी हिंमत हरलो नाही.’’
खैरनार सहजपणे हे सांगत होते.
‘‘तेव्हा मी मित्रांपेक्षा विरोधकच जास्त जमा केले. तत्कालीन पालिका आयुक्त सदाशिव तिनईकर यांनी १९८८ साली मला उपायुक्त म्हणून बढती दिली आणि माझे हे विरोधक चांगलेच बिथरले. त्यांच्यापैकी काहींनी माझ्या बढतीला विरोध सुरू केला. इतकंच नाही, तर माझा ‘सीआर’देखील खराब केला. पण तिनईकरांनी त्यांना जुमानले नाही. याच काळात दक्षिण मुंबईत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊ लागली होती. पुढे महापालिका आयुक्त म्हणून शरद काळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण मुंबईतील अतिक्रमणविरोधी कारवाईची जबाबदारी माझ्यावर सोपवली. या काळात मी दाऊदची मेहजबीन मॅन्शन ही वादग्रस्त इमारत तर पाडलीच, शिवाय भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीट, महमद अली रोड या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई सुरू केली. आजवर ज्यांच्याकडे मान वर करून बघायची कुणाची हिंमत नव्हती, तेथे मी घुसलो. आणि त्यामुळे अनेकजण धसकून गेले. माझ्या या कारवाईने वेग घेण्यास सुरुवात केली तसतशी कारवाईसाठी पोलीस बळ उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ होऊ लागली. यामागे काही नेते असावेत असं मला वाटत होतं. मी संतापानं धुमसत होतो. नेते, राजकारणी, गुंड यांचे साटेलोटे मनाला अस्वस्थ करत होते. हे सारं मोडून काढावं, या विचारानं मन उसळी घेत होतं. पण आपले हात कुणीतरी बांधतंय असं सारखं जाणवत होतं..’’
‘‘याच अस्वस्थतेतून मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचं मी बोललो आणि मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. राजकारणाचा सारा नूरच बदलून गेला. विधानसभेत विरोधकांनीही घणाघाती हल्ले करण्यास सुरुवात केली. यातूनच सेना-भाजपला १९९५ मध्ये सत्ता मिळाली आणि या साऱ्या गदारोळात खैरनार नावाचा अधिकारी निलंबित झाला..’’ बोलता बोलता खैरनारांच्या सुरात संतापाची छटा उमटली.
‘‘माझ्यावरील या कारवाईला मी न्यायालयात आव्हान दिले. परंतु तरीही १९९६ ते २००० पर्यंत मी निलंबितच राहिलो. दरम्यान, अचानक दिल्लीहून सूत्रे फिरली आणि मला पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात आले.’’
या कारवाईनंतर बहुधा प्रथमच आज एखादा गौप्यस्फोट केल्यासारखे खैरनार यांचे शब्द होते- ‘‘पुढे मला फक्त सहा महिन्यांचा कालावधी मिळाला. पण तेवढय़ा लहानशा काळातही मी अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला.’’
त्यांचा सूर काहीसा समाधानाचा होता. तसं स्पष्टपणे त्यांच्या चर्येवरून जाणवत होतं. ‘खैरनार’ नावाच्या कारकीर्दीचा एक अंक इथे संपला होता.
नंतर काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. मी मात्र वही तशीच उघडी ठेवून त्यांच्याकडे पाहत बसलो होतो.
ते पुढे बोलू लागले- ‘‘मुंबईतील झोपडपट्टी दादा, अनधिकृत बांधकामे करणारे आणि त्यांचे पाठीराखे यांच्यासाठी खैरनारची निवृत्ती ही पर्वणीच होती. पुढे महमद अली रोड, भेंडीबाजार यासारख्या भागांत पुन्हा  अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू झाला. बैंगनवाडी, शिवाजीनगर, बेहरामपाडा, कुर्ला, गोवंडीपासून थेट उपनगरातील दहिसर येथील गणपत पाटील नगपर्यंत अनधिकृत झोपडय़ांचे साम्राज्य उभे राहिले. या अतिक्रमणावर हातोडा घालावा असं खूप वाटायचं, पण मग आपण आता पालिकेच्या सेवेत नाही, याची जाणीव व्हायची. मुख्य म्हणजे आता या व्यवस्थेत आपल्या पाठीशी कुणी उभा राहील याची खात्रीही वाटेनाशी झालीय. सारेच एका माळेचे मणी वाटताहेत. ज्यांच्याकडे समाज आदर्श म्हणून पाहतोय, तेही बेगडी असावेत असं वाटतं.’’ खैरनारांची अस्वस्थता पुन्हा धुमसू लागली.
‘‘आज पालिकेत ना कोणी खैरनार आहे, ना कोणत्या आयुक्तामध्ये या अतिक्रमणांविरुद्ध उभं राहायची धमक आहे. मुंबईत आज झोपडय़ांचे टॉवर उभे राहिलेले दिसतात. आत बीअर बार बिनधास्तपणे चाललेले असतात. तेव्हा मी फक्त शरद पवारांवर टीका केली होती, पण आज सगळी व्यवस्थाच खराब झालीय. कुठल्या एका पक्षावर विश्वास टाकावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. लोकांनी अण्णा हजारेंकडे विश्वासाने पाहण्यास सुरुवात केली होती. पालिकेच्या सेवेत उपायुक्त असताना मीदेखील अण्णांकडे ओढला गेलो होतो. तेव्हा मी अनेकदा राळेगणसिद्धीला जायचो. त्यांची भेट घ्यायचो. वेगवेगळ्या मुद्दय़ांवर, प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करायचो. पण पुढे अण्णांचा बडेजाव मला आश्चर्यचकित करू लागला. मी उपायुक्त असूनही स्वत:ची गाडी घेणं मला शक्य नव्हतं. मात्र, सैन्यात साधा वाहनचालक असलेला हा माणूस तीन-तीन जीपगाडय़ा जवळ बाळगतो, हे पाहून मला धक्काच बसला. अण्णांच्याच एका मेकॅनिकने ही माहिती मला दिली. अण्णा ज्या देवळात राहतात त्याच्या बांधकामासाठी त्यांनी दहा हजार रुपये दिलेत. बाकीचे पैसे गावकऱ्यांच्या कष्टातून उभे राहिलेत. देवळाचा ताबा मात्र अण्णांकडे! त्यांच्या उपोषणादरम्यान मध्येच ते उठून पडद्यामागे जाऊन एक विशिष्ट प्रकारचा ज्यूस पितात, असे मला त्यांच्या एका जवळच्या माणसाने सांगितले. या ज्यूस पिण्यामुळे बराच काळ भूक लागत नाही, असेही मला सांगण्यात आले. तेव्हा अण्णा हा एक लबाड माणूस असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यांनी अनेक आंदोलने उभी केली, काही चांगले विषयही जनतेसमोर मांडले. मात्र, त्याचे सर्व श्रेय पद्धतशीरपणे केवळ आपल्याकडेच येईल याची काळजीही त्यांनी घेतली. ज्यावेळी याला विरोध झाला, त्या- त्या वेळी त्यांनी संबंधित व्यक्ती- ज्यांनी त्यांना हे विषय अभ्यास करून दिले, त्यांना झटकून टाकल्याचं पाहावयास मिळतं.’’ खैरनार बोलत होते. एक अस्वस्थ, धुमसणारा आवाज त्यांच्या तोंडून उमटत होता..
‘‘निवृत्तीनंतर अनेक मोठय़ा माणसांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या. काही लोकांना देशाचे चित्र बदलायचे होते. पण त्यांच्यामध्ये ती क्षमता नसल्याचं तसंच खरं देशप्रेम व त्यागाची वृत्ती त्यांच्यात नसल्याचं मला आढळलं. निवृत्तीनंतर माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे घराचा. मुंबईत किंवा गावीही माझं घर नव्हतं. यादरम्यान, एका अनिवासी भारतीय व्यक्तीचा अमेरिकेतून मला दूरध्वनी आला. देशाच्या विकासासाठी आमच्या संस्थेत काम कराल का, असं त्यांनी विचारलं. परदेशातील काही संस्था एकत्र आल्या असून त्यांच्या माध्यमातून प्रथम आम्ही भूकंपग्रस्त भूजमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात देशातील विविध राज्यांमध्ये काम करणार असल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं. माझ्या घराचाही प्रश्न त्यातून सुटणार होता. गुजरातमधील भूकंपात भूजसह अनेक गावांची पुरती दैना झाली होती. मी जवळपास दीड वर्ष तिथे काम केलं. पाकिस्तान सीमेजवळील कुरणगाव वसविण्याची जबाबदारी मी स्वीकारली. संस्थेने जवळपास तीस लाख रुपये या प्रकल्पासाठी दिले. त्यातून काम सुरू झालं. याशिवाय अनेक ठिकाणांहून देणग्या तसंच घरबांधणीसाठी लागणारं साहित्य येत होतं. त्यातून शंभर घरे, अनेक बोअरवेल, शाळा तसेच एक समाजमंदिर हॉल आम्ही बांधला. त्याशिवाय शेजारच्या काही गावांमध्ये जाऊन तिथेही जवळपास हजार घरे बांधली.’’
‘‘हे सारं काम साबरकाठ जिल्ह्य़ातील बायडा तालुक्यातील एका गावात संस्थेच्या ट्रस्टच्या आश्रमात राहून मी केलं. अत्यंत काटकसरीने भूकंपाचा धक्का सहन करू शकतील अशी ही घरे अवघ्या पस्तीस हजार रुपयांमध्ये बांधण्यात आली. चेकडॅम तलावांचीही कामे आम्ही केली. हे सारं करत असताना ज्या ‘एनआरआय’नी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्यांच्याकडून हळूहळू निधीचा ओघ आटत गेला. त्यांची आणि किरण बेदी यांची मी गाठ घालून दिली असता त्यांनी बेदी यांच्या एड्ससंबंधात काम करणाऱ्या संस्थेसाठी तत्काळ तीस लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, देशभरात रचनात्मक कार्य करून देशाचा विकास करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या गृहस्थांनी गुजरातमध्ये हात का आखडता घेतला, हे समजू शकले नाही.’’
अर्थात खैरनार यांना त्याचं उत्तर माहीत होतं, हे त्यांच्या सुरांतून स्पष्टपणे जाणवत होतं.
‘‘मी त्या संस्थेतून बाहेर पडलो आणि दुसऱ्या एका संस्थेत काम सुरू केलं. रुग्णालयीन व्यवस्थापनाचं ते काम होतं. मात्र ही कामं करत असताना मुंबई महापालिका कितीतरी चांगली असल्याचं माझ्या लक्षात आलं. मोठमोठय़ा बाता मारणाऱ्यांची मनं किती छोटी असतात तेही यानिमित्तानं अनुभवायस मिळालं. गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी अनेक मुस्लीम कुटुंबांना मी आमच्या आश्रमात आसराही दिला होता. त्यामुळे काही धमक्याही आल्या होत्या. अर्थातच असल्या धमक्यांचा मी कधीच विचार केला नाही.’’  बोलता बोलता खैरनारांनी सहज शर्टाची बाही वर केली.. सवयीनं!
इथं खैरनार यांच्या वाटचालीचा दुसरा अंक संपला, हे लक्षात आलं. त्यांच्या कारकीर्दीचा तिसरा अंक जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. ती उत्सुकता डोळ्यांत ठेवून मी त्यांच्याकडे बघितलं आणि ते पुन्हा बोलू लागले. प्रामाणिक तळमळ म्हणजे काय, याचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्या शब्दांतून साकारू लागलं.
‘‘अमेरिकेतील एक अनिवासी भारतीय प्रकाश यांच्या मदतीमुळे २००४ साली जुहू येथील आयडियल अपार्टमेंटमध्ये मला जागा घेता आली. सध्या सकाळी लवकर उठून मी पाऊण तास फिरायला जातो. भरभर फिरत असल्यामुळे माझं फारसं कोणाशी बोलणं होत नाही. परंतु कधीतरी माझ्याशी लोक गप्पा मारतात. अर्थात गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. कारण मला पैशांची गरज असल्यामुळे मी आजही काम करतो. पूर्वी गुडघे दुखायचे म्हणून योगसाधना सुरू केली होती, पण त्यातून पाठीचे दुखणे उद्भवले. त्याच्यावरील उपचारांचा खर्च माझ्या आवाक्याबाहेर असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या केईएम आणि शीव रुग्णालयांत मी अडीच महिने उपचार घेतले. खिशात पैसे नसले की काय होतं याचा हा अनुभव घेतल्यानंतर प्रथमच मी स्वत:ची आर्थिक स्थिती पाहण्याचा निर्णय घेतला. उभ्या आयुष्यात मी कोणाचा एक पैशाचा मिंधा राहिलेलो नाही. नाटक-सिनेमाचा मला शौक नाही. पेपरवाचन नियमित असलं तरी काम करण्यातच माझं मन रमतं. त्यातच आजारपणात माझी दोन वर्षे गेली हे लक्षात घेऊन यापुढे उपजीविकेचं साधन शोधण्याचं मी ठरवलं. जनआंदोलन किंवा राजकारण हे माझं काम नाही असं माझ्या लक्षात आलं. कारण त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा लागतो. भ्रष्टाचार किंवा गडबड-घोटाळे केल्याशिवाय हा पैसा उभा राहू शकत नाही. आजच्या जमान्यात कार्यकर्तेही काही हाताला लागल्याशिवाय मिळत नाहीत. नि:स्वार्थी कार्यकर्ते ही संकल्पना आजच्या राजकारण्यांमुळे पार मोडीत निघाली आहे. म्हणूनच २००५ साली मी एका अमेरिकन कंपनीत नोकरी स्वीकारली. पनवेल- नवी मुंबई भागात त्यांना जमिनी घेऊन त्या विकसित करायच्या होत्या. दोन वर्षे तिथं काम केलं. पुढे या कंपनीने गाशा गुंडाळल्याने माझी नोकरी गेली. या अनुभवातून पुढे घरी बेकार बसण्यापेक्षा सल्लागार म्हणून कुठंतरी काम करण्याचा निर्णय घेतला. काही मंडळींनी मला कार्यालयासाठी जागा दिली. आज अंधेरी, पवई आणि विलेपार्ले अशा तीन ठिकाणी असलेल्या कार्यालयांमधून मी लोकांना सल्ला देण्याचे काम करतो. अर्थातच हे काम मोफत नाही. प्रामुख्याने ‘एसआरए’शी संबंधित प्रकल्पांत झोपडपट्टीतील लोकांची फसवणूक होऊ नये, एसआरए योजना नेमकी कशी राबवायची, सोसायटीची स्थापना व कामकाज कशा प्रकारे करायचे, आर्किटेक्टची नेमणूक तसेच म्हाडामध्ये पाठपुरावा कसा करायचा, यासंदर्भात सल्ला देण्याचं काम मी करतो. आता वयाच्या सत्तरीमध्ये मी समाजकारण आणि राजकारण बाजूला सारलं आहे. पत्नीला व मला समाधानानं जगता आलं पाहिजे एवढीच आता माझी अपेक्षा आहे. भोवतालच्या ढोंगी जगापासून लांब राहणंच चांगलं, असं मी ठरवलंय.’’
टेबलावरची आडवी पेन्सिल फिरवण्याचं थांबवून खैरनार बोलायचं थांबले. एक सुस्कारा टाकून त्यांनी समोरची फाइल उघडली. मग थोडय़ाशा अवांतर गप्पा मारून मीही त्यांचा निरोप घेतला. परंतु ‘खैरनार’ नावाचं वादळ अजूनही अस्वस्थ आहे, ही जाणीव डोक्यात भणभणत राहिली…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा