‘गँग्स ऑफ वासेपुर’च्या दुसऱ्या भागामध्ये राणाधीर सिंघ हा जो वासेपुरचा सर्वात श्रेष्ठ राजकारणी/ गुंड आहे तो म्हणतो, ‘‘हमने सबको मारा. शाहिद खान को मारा. सरदार खान को मारा. लेकिन हम जिंदा है. इसलिये, क्यूँ की हम सनिमा नहीं देखते. िहदुस्तान में जब तक सनिमा है, लोग च्युत्या बनते रहेंगे.’’
‘गँग्स ऑफ वासेपुर- २’ मध्ये १९९० ते २००९ हा काळ वासेपूर नावाच्या गावात उलगडवून सांगितलेला आहे. हे इथे नमूद करण्याचं कारण असं की, हा सिनेमा गेल्या दहा वर्षांतील िहदी सिनेमाचा उल्लेख करतो, सिनेमातल्या पात्रांवर त्याचा झालेला परिणाम दाखवतो. अर्थात् एका अर्थाने त्यावर भाष्य करतो. पल्प फिक्शन नावाच्या टॅरेन्टिनोच्या सिनेमात आपल्याला सिनेमाच्या इतिहासातील महत्त्वाच्या सिनेमांचे वेगवेगळ्या माध्यमांतून संदर्भ दिलेले दिसतात. कधी पात्रांच्या नावांतून, कधी प्रसंगांच्या रचनेमधून, इ. एका अर्थाने त्या सिनेमांना ट्रिब्युट करणे, त्याकडे अत्यंत नॉन-जजमेंटली पाहणे, असा हेतू असतो. ‘गँग्स’मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ बघून येत असताना टँजन्ट आणि पर्पेडिक्युलर या दोन पात्रांना मारहाण होते. त्यात पर्पेडिक्युलर मरतो. एकच गाजलेला सिनेमा गावाकडे भारतात वर्षांनुर्वष चालतो. सिनेमाच्या अत्यंत कळीच्या प्रसंगी सरदार खान जेव्हा त्याला या सगळ्यात पडायचंच नव्हतं असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याची बायको त्याला गाणं म्हणून दाखवते; जे अगदी अलीकडच्या सिनेमातलं वाटतं. राणाधीर सिंघच्या विधानातून अनुराग कश्यप काही म्हणतो आहे, त्याचा थोडा विचार करूयात.
१) िहदी सिनेमा हा लोकांना मूर्ख बनवतो.
२) िहदी सिनेमा एका अशा विश्वात घेऊन जातो, जिथे आपल्या खऱ्या आयुष्यातून आपली सुटका होईल.
३) अर्थात िहदी सिनेमा अतिरंजन करतो. तो एका वेगळ्याच कल्पनाविश्वाचा आपल्याला राजा बनवतो. सिनेमा एखाद्या अफूच्या गोळीसारखा आहे.
(गेल्या दहा वर्षांतील िहदी सिनेमाचा जर सांख्यिक आलेख काढला, कुठले विषय हाताळले गेले, नवीन ट्रेंड्स काय आहेत, अशातून एक चांगला वृत्तान्त काढता येईल. पण तसं मला इथं करायचं नाहीए. याचं कारण असं की, तशी चर्चा वृत्तपत्रांमधून सारखी होताना दिसते. शिवाय सिनेमा नावाची गोष्ट, संकल्पना इतर सर्वच सामाजिक- राजकीय व्यवहारांपासून वेगळी करून सांगितली जाते. इथे मुद्दाम ‘आíथक’ मी म्हणणार नाही. कारण की, अर्थकारण काहींच्या मते ‘प्युअर सायन्स’च्या जवळ जाणारं सामाजिक शास्त्र आहे! त्यामुळे आíथक चर्चा या कायम ‘नॉन-पोलिटिकल’ होतात आणि तसेच ‘नॉन-भूमिका’, ‘इम्प्लाइड भूमिका’ अशाही होतात. वर नमूद केल्याप्रमाणे, िहदी सिनेमा लोकांना मूर्ख बनवतो, हे जरी खरं असलं तरी तो मूर्खपणे केलेला असत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अत्यंत काटेकोरपणे गणितं आखून सिनेमे रिलीज केले जातात आणि पसा वसूल केला जातो.)
स्लॅवोज जिझेकच्या ‘पर्वट्स गाइड टू सिनेमा’ या समीक्षापटात तो सुरुवातीलाच सिनेमा आणि ‘डिझायर’ यांचं नातं समजावून सांगतो. ‘‘द प्रॉब्लेम विथ अस इज नॉट दॅट अवर डिझायर इज सॅटिसफाइड ऑर नॉट; द प्रॉब्लेम इज हाऊ डू वी नो व्हॉट वी डिझायर.’’ मानवी इच्छा ही एक काहीतरी ठरलेली असते, आणि सिनेमाने ती भागवली तर सिनेमा चालतो, असं जे आपल्याला वरवर वाटतं, त्याच्यापेक्षा खूप खोलवर सिनेमा मानवी इच्छांवर परिणाम करीत असतो.
मानवी इच्छा या नसíगक, स्पाँटॅनियस असतात असा वरवर आपला समज असतो. पण तसं नसून त्या इच्छा करणं माणसाला शिकवलं जातं. ‘‘वन हॅज टू बी टॉट हाऊ टू डिझायर. ’’ सिनेमा तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्हाला देत नाही; सिनेमा तुम्हाला कशाची इच्छा करायची, हे सांगतो.’’
चारशे कोटी विसरभोळे आणि सलमान खान
मकरंद साठय़ांच्या ‘चारशे कोटी विसरभोळे’ या नाटकात भांडवलशाहीच्या अंताची कल्पना केली आहे, ज्यात एक माणूस जितका कमावतो, तितका जास्त काळ तो जगतो. म्हणजे तो जितकं काम करेल, तितका त्याला जगण्यासाठी वेळ मिळेल. प्रत्येक माणसाला एका सुपरकॉम्प्युटरने जगण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. माणसाने काम करून ती वेळ वाढवली पाहिजे, अशी अट आहे. या लॉजिकने मारुती आणि अश्वत्थामा हे सर्वात श्रीमंत आहेत; कारण ते अमर आहेत. नाटकात ते सत्ता मिळवतात खरे; पण सुपरकॉम्प्युटरमध्ये ढवळाढवळ करून मानववंश हा दोन हजार वर्षे मागे नेला जातो आणि मेमरी नष्ट होते व माणसं परत तेच जगणं सुरू करतात.
सलमान खान सिनेमात कुठलंच पात्र रंगवत नाही. सलमान खान हेच एक पात्र आहे- जे लोकांना आवडतं. स्टेरॉइड्स घेऊन फुगवलेले शरीर (सुपरह्युमनसारखे दिसणारे), ज्यात मेंदू तर नाहीच; पण (पूर्वी मेंदू नसलेल्या माणसांना भावना खूप असतात असं तरी दाखवलं जायचं.) आपल्या सलमान खानला भावना तर त्याहून नाहीत. तो पोलिओ झालेल्या माणसाचीही चेष्टा करतो. गोिवदाचा नव्वदच्या दशकातला विनोद वेगळा होता. तो जेव्हा असे विनोद करायचा, तेव्हा तो एका बावळट माणसाच्या व्यक्तिरेखेत असायचा. सलमान हा एका आदर्श पोलिसाची भूमिका वठवतो; ज्यात तो वाईटाचा नाश करतो. शेवटी सगळं चांगलं करतो, किंवा तो अंडरकव्हर कॉप असतो! थोडक्यात असं की, सलमान खान हिट् होणं हा केवळ योगायोग नाही. कारण ती भारतीय समाजाची फार ‘अॅप्ट’ अशी व्याख्या आहे. सलमान खान हा अनेक बेकायदेशीर गोष्टी करताना पकडला गेला आहे. मात्र, हे सगळं विसरून तो काम करतो. त्यात तो स्वत:चीच चेष्टा करतो. स्वत:च्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनांची चेष्टा करतो. थोडक्यात- तो त्याच्याच भूमिकेला विसरतो. ‘सलमान खान’ला विसरतो. भारतीय समाज एका युफोरियात आहे. युफोरिया तेव्हाच येऊ शकतो, जेव्हा आपण गोष्टी विसरतो. साहजिक आहे- सलमान तेच करतो. सलमान हे जर एक मेटॅफर मानलं, तर ते भारतीय समाजाला योग्य आहे. ‘फॉर्म’ आहे, पण आशय नाही. आकृती आहे, पण संकल्पना नाही. हा विसरभोळेपणा का हवा आहे? तो कुठून येतो?
‘दबंग’, ‘सिंघम’ आणि राज्यसंस्था
अमिताभ बच्चन खूप गाजला तेव्हा त्याने अँटी-हीरो प्ले केला म्हणून तो गाजला, असं आपण म्हणतो. म्हणजे तो वाईट आहे, पण मूल्यांशी पक्का आहे. आणि राज्यसंस्था ही भ्रष्टाचारी आहे. पण आता एक राज्यसंस्था असं काही नाहीच, असा समज झालाय असं दिसतं. म्हणजे सगळी राज्यसंस्था ही एका पोलिसाच्या हातात किंवा पोलीस हीच राज्यसंस्था! हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याची ही ठळक लक्षणे आहेत. पोलिसाच्या हातात सर्व काही आहे. मिलिटरी फोर्स यापेक्षा काय वेगळं आहे? ‘सिंघम’ या महाराष्ट्रात गाजलेल्या सिनेमात राजकारण्यांच्या ढुंगणावर पोलीस लाथा घालतात असा एक प्रसंग आहे. ‘दबंग’ हा स्वत:ला रॉबिनहूड म्हणवतो. रॉबिनहूड इमेज ही सध्याची नक्षल इमेज आहे हे विसरून चालणार नाही. तोही पोलीसच.. आणि तोही ‘स्टेट’ला न मानणारा. दहशतवादी हल्ल्यांमध्ये, मिलिटरी फोर्स व पोलीस यांच्यामध्ये मिलिटरी श्रेष्ठ असं समजलं गेलं आणि पोलीस हे राजकारण्यांमुळे दबले गेलेले, असा त्यात एक अध्याहृत समज होता. म्हणून या गाजलेल्या सिनेमांमधले नायक हे पोलीस असतात, पण ते नॉन-स्टेट आणि पॅरलल, पॉवरफुल अॅक्टर्स अशी भूमिका बजावताना दिसतात. याच काळात अण्णांचं आंदोलन गाजत होतं.
जिझेकच्या वरील म्हणण्याकडे आपण परत यायला हरकत नाही. ‘देअर इज निथग स्पाँटॅनियस, निथग नॅचरल अबाऊट ह्युमन डिझायर. अवर डिझायर्स आर आर्टििफशियल. सिनेमा इज द अल्टिमेट पर्वर्ट आर्ट. इट डझन्ट गिव्हज् यू व्हॉट टू डिझायर. इट टेल्स यू हाऊ टू डिझायर.’
‘नेशन-स्टेट’ची कल्पना, हिंदी भाषा आणि प्रादेशिक अस्मिता
गेल्या दहा वर्षांतले तीन सिनेमे आपल्याला एकत्रितपणे काही सांगू शकतात. ते तीन सिनेमे म्हणजे- १) पान सिंह तोमर, २) दबंग, ३) सिंघम्.
(अर्थात हे तीन सिनेमे या तीन सिनेमांच्या निर्मात्यांची समज आणि वर्ल्ड व्ह्यू एकच म्हणून एकत्र केलेले नाहीत. ‘पान सिंघ तोमर’ हा सिनेमा म्हणून त्यातल्या सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून अनेक पटींनी वरचढ आहे. हे लेखात घेतलेल्या सर्वच उदाहरणांना लागू आहे.)
पान सिंह तोमर हा इंडियन आर्मीमध्ये आहे. त्याला भारताबद्दल गर्व आहे. काळ १९५० चा. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे. म्हणजे तेव्हा भारत, पाकिस्तान असं काही वेगळं आहे याचं सामाजिकदृष्टय़ा, सांस्कृतिकदृष्टय़ा आकलन होणं अवघडच. पण तरी पान सिंह अत्यंत अभिमानी आहे. त्याला ‘इंडियन’ या आयडेंटिटीचा अभिमान आहे. ‘स्टेट’ त्याला धावपटू आहे म्हणून लढू देत नाही. तो जी गोल्ड मेडल्स जिंकला, त्याची कदर करत नाही. किंवा क्रीडा या गोष्टीकडे नुसते सांस्कृतिकदृष्टय़ाच नाही, तर आíथकदृष्टय़ाही दुर्लक्ष करते. त्याच्या गावाकडे त्याला आर्मीतला म्हणून गाव सोडलेला, शेतीकडे दुर्लक्ष केलेला- असं पाहिलं जातं. म्हणजे कुटुंब ही संस्था राज्यसंस्थेला मानत नाही, किंवा त्यांच्यात अंतर आहे असं म्हणता येईल. कुटुंब या संस्थेला ‘राज्य’ ही संस्था कळतच नसताना ‘नेशन- स्टेट’ ही संकल्पना कळत असते, ही गंमत आहे. पान सिंहची अशा प्रकारे पुढून-मागून वाट लागलीय. तो गुंड होतो. शासनाच्या विरुद्ध उभा ठाकतो. खरा रॉबिनहूड बनतो. पोलीस त्याला पकडतात, तरीदेखील त्याच्या मनात भारताला मेडल्स मिळवून दिली, हे तसंच आहे. भारताबद्दल अभिमान तसाच आहे. म्हणजे ‘संस्था वाईट नाही. मला ज्या ‘इंडिव्हिज्युअल’ व्यक्तींचे अनुभव आले, ते वाईट होते.’ ते त्या संस्थेचा एक भाग होते, हे तो तेवढय़ापुरते विसरतो.
दुसरीकडे ‘दबंग’ हा बिहारी पोलीस देशभर आवडतो. (पान सिंह तोमर हा इथे मी सृजनाच्या अंगाने घेतलेला आहे. या सिनेमाचा सिनेमा म्हणून उल्लेख करतानाच त्यातल्या ‘गोष्टी’चंही महत्त्व सांगत आहे. ‘दबंग’ आणि ‘सिंघम्’ हे मी त्या सिनेमांचे ‘हिट्’ होणे गृहीत धरून एकूणात भाष्य करीत आहे.) ‘दबंग’ हिट् होत असताना एरवी मनसेला ठिकठिकाणी जिंकवून देणारे लोक प्रादेशिकतेचा मुद्दा विसरतात आणि सिनेमा ‘पोलीस आणि जनता’ या एका मुद्दय़ावर गाजतो. तिथे लोकांची आयडेंटिटी ‘भारतीय’ अशी होते. पण इथे पान सिंह तोमरसारखी ‘नेशन- स्टेट’वाली भूमिका लोक घेत नाहीत, तर एक अँटी-राजकीय आणि ‘प्रो-सामाजिक’ भूमिका घेताना दिसतात.
‘दबंग’ला उत्तर म्हणून ‘सिंघम्’ येतो. त्याची पब्लिसिटी ‘मराठा आणि मराठी’ अशी दोन्ही केली जाते! म्हणजे प्रादेशिक अस्मिता आणि जात! आणि सिनेमा िहदीतून आहे! पण महाराष्ट्रात तो सिनेमा खूप चालतो. परत ‘अँटी-राजकीय’ आणि ‘प्रो-सामाजिक’ (पोलीस आणि समाजाचं नातं या अर्थाने!) भूमिका घेताना दिसतात. एका बाजूला सगळं विखंडित होत आहे असं वाटत असताना वेगवेगळ्या आयडेंटिटीज् एकत्र होऊन एक अँटी-स्टेट आयडेंटिटी लोक पटकन् घेतात.
‘सनिमा पब्लिक को चु.. बनाता है’ या ‘गँग्स’मधल्या डायलॉगकडे परत वळलं तर असं वाटतं की, हे खरंच आहे. पण असं म्हणत असताना ‘गँग्स ऑफ वासेपुर’ काय करत आहे, हे बघायला पाहिजे.
सिनेमा भारतात इतका गाजण्याचं कारण असं मानतात की, जे सर्वसामान्यांना आयुष्यात बघता येत नाही, अनुभवता येत नाही, ते सिनेमात अनुभवता येतं. उंची बंगले, श्रीमंत लोकांचे आयुष्य, इ. पण आता उदारीकरणानंतर मध्यमवर्गाला हे सर्वच अनुभवता येतं. साधं मल्टिप्लेक्समध्ये पूल टेबल असतं, क्रॉसवर्ड असतं; मग लोक सिनेमात काय बघणार? तर ते याहीपेक्षा वेगळं, याच जगण्याविषयी बोलणारं, गिल्टविषयी बोलणारं. म्हणून ‘मल्टिप्लेक्स ऑडियन्स’ नावाचं काहीतरी जे तयार झालंय, तिथे सिनेमा चालतो.
पार्थ चॅटर्जी ‘गँग्स ऑफ वासेपुर- १’ या सिनेमाविषयी लिहिताना असं म्हणतात की, ‘वासेपूर’मधला निहिलिजम हा भारतीय मध्यमवर्गाला भावतो व त्यातली बदला घेण्याची गोष्ट गरीबांना आवडते. याचाच अर्थ सिनेमाने या दोघांनाही ‘चालतं’ असं काहीतरी बनवलं आहे आणि म्हणून तो सिनेमा हिट् आहे. (सिनेमाला हिट् म्हणतानादेखील ते बजेट आणि प्रॉफिट यांच्या गुणोत्तराविषयी बोलताहेत हे ध्यानात घ्यायला हवं.) तसंच ‘सनिमा चु.. बनाता है’ असं म्हणताना ‘वासेपुर’मधला व्हॉयलन्सदेखील तेच करतो, अफूसारखं काम करतो, असं चॅटर्जी म्हणतात. अर्थात ‘वासेपुर- १’ बद्दल लिहिणं म्हणजे अध्र्या सिनेमावर लिहिण्यासारखं आहे. कारण हा सिनेमा दोन टप्प्यांमध्ये रिलीज झाला असला तरी तो एकच आहे.
‘वासेपुर-२’ मध्ये ती सगळी कुटुंबं जेव्हा मुंबईच्या ट्रेनवर येतात तेव्हा या सगळ्याचा अर्थ लागल्याचं फीलिंग येतं. गेल्या दहा वर्षांत िहदी सिनेमा नवीन, वेगळा येत असला (पॅरलल आणि कमíशयल) तरी तो लोकांना काय डिझायर देतो आहे? लोक तो नक्की कसा समजून घेत आहेत, हे फक्त सिनेमा ‘हिट् की फ्लॉप’, ‘चांगला की वाईट’ या चर्चामधून नाही, तर पुढच्या काही पिढय़ांच्या राजकीय आणि सामाजिक निर्णयांमधून समजेल.
‘गँग्स ऑफ वासेपुर’ आणि सिनेमाचे बदलते विश्व
‘गँग्स ऑफ वासेपुर’च्या दुसऱ्या भागामध्ये राणाधीर सिंघ हा जो वासेपुरचा सर्वात श्रेष्ठ राजकारणी/ गुंड आहे तो म्हणतो, ‘‘हमने सबको मारा. शाहिद खान को मारा. सरदार खान को मारा. लेकिन हम जिंदा है. इसलिये, क्यूँ की हम सनिमा नहीं देखते. िहदुस्तान में जब तक सनिमा है, लोग च्युत्या बनते रहेंगे.’’ ‘गँग्स ऑफ वासेपुर- २’ मध्ये १९९० ते २००९ हा काळ वासेपूर नावाच्या गावात उलगडवून सांगितलेला आहे.
First published on: 30-01-2013 at 05:34 IST
मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangs of wasseypur and changing trends in bollywood cinema