१९१३ साली म्हणजे बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहास साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. एका भारतीयास मिळालेल्या या पहिल्यावहिल्या नोबेल पुरस्काराच्या शताब्दीनिमित्ताने रवींद्रनाथांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर लाभलेले हार अन् प्रहार.. तसेच ‘गीतांजली’मधील काव्याच्या गूढरम्यतेचा वेध घेणारे विशेष लेख..
कोणत्याही व्यक्तीला असते तसेच अस्सल साहित्यकृतीलाही तिचे स्वत:चे असे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य असते. साहित्यकृतीचे अंतरंग, तिची रचना, तिचा विषय आणि आशय, ती व्यक्त करीत असलेल्या मानवी भावना आणि मानवी जीवनावरील भाष्यांनी साहित्यकृतीचे वैयक्तिक आयुष्य घडलेले असते. पण जेव्हा ती साहित्यकृती प्रसिद्ध होते त्या क्षणापासून तिचे सार्वजनिक आयुष्य सुरू होते. सार्वजनिक आयुष्यातील राजकारण, टीका आणि प्रशंसा, आरोप आणि प्रत्यारोप, प्रसिद्धीचा झोत आणि कालांतराने विस्मृती हे सर्व व्यक्तीप्रमाणेच साहित्यकृतीच्याही वाटय़ाला येते. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’लाही अशी दोन आयुष्ये आहेत असे म्हणता येईल.
रवींद्रनाथांच्या आणि ‘गीतांजली’च्या सार्वजनिक आयुष्यात दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे ‘गीतांजली’चे वाचन पाश्चात्त्य साहित्यविश्वातील मान्यवरांपुढे पहिल्यांदा झाले तो दिवस. तारीख होती- ७ जुल १९१२ आणि स्थळ होते- ‘गीतांजली’चे वाचन घडवून आणण्यात ज्याने पुढाकार घेतला त्या चित्रकार रोथेनस्टाईनचे हॅम्पस्टीड येथील घर. उपस्थितांमध्ये मे सिंक्लेयर, विख्यात कवी डब्ल्यू. बी. येट्स आणि एझरा पाउंड, प्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स, गांधी आणि रवींद्रनाथांचे मित्र दीनबंधू सी. एफ. अॅण्ड्रय़ूज आदी मान्यवर होते. स्वत: येट्सने गीतांजलीतील कवितांचे वाचन केले. पण रवींद्रनाथांना श्रोत्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज येत नव्हता आणि म्हणून त्यांची स्वत:ची प्रतिक्रियाही संयमाचीच असणे स्वाभाविक होते. अर्थात उपस्थितांच्या ज्या प्रतिक्रिया नंतर आल्या, त्या अतीव प्रशंसेच्या अशाच होत्या.
रवींद्रनाथांच्या आणि ‘गीतांजली’च्या सार्वजनिक आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा दिवस होता- १४ नोव्हेंबर १९१३. याच दिवशी गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी रवींद्रनाथांना मिळाली. बातमीची तार दुपारी शांतिनिकेतनात पोहोचली तेव्हा एडवर्ड थॉम्पसन- ज्याच्या भविष्यात पुढे रवींद्रनाथांचा चरित्रकार व्हायचे होते- तोही तेथे उपस्थित होता. नोबेल मिळाल्यावरची रवींद्रनाथांची पहिली प्रतिक्रिया त्यानेच नोंदवून ठेवली आहे. ती अशी- ‘‘आता मला शांतता लाभणार नाही.’’ त्या दिवसानंतर ‘जिथे शांतता लाभेल असे निवाऱ्याचे ठिकाण’ ही शांतिनिकेतनची ओळख जाऊन ‘शांतिनिकेतन- एक प्रदर्शनीय स्थळ’ अशी नवी ओळख निर्माण झाली. यातील कोणते शांतिनिकेतन रवींद्रनाथांना स्वत:साठी व शांतिनिकेतनसाठी हवे होते, याचा निर्णय रवींद्रनाथ शेवटपर्यंत करू शकले नाहीत.
या दोन्ही प्रसंगांत रवींद्रनाथांच्या प्रतिक्रिया संयत- किंबहुना, थोडय़ाशा अलिप्त अशाच दिसून येतात. पण नोबेलची बातमी कळल्यानंतर बंगालमध्ये त्यांचा जो जयजयकार सुरू झाला होता त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया मात्र आपले बंगाली बांधव नोबेल मिळाल्याबद्दल आपल्यातल्या कवीचा किंवा ‘गीतांजली’तील काव्याचा सन्मान करीत नसून ‘‘पश्चिमेकडून मिळालेल्या सन्मानाचा सन्मान करीत आहेत..’’ अशी अचूक आणि स्पष्ट होती. ही प्रतिक्रिया त्यांनीच रोथेनस्टाईनला- म्हणजे ज्याने रवींद्रनाथांची ओळख पाश्चिमात्य साहित्यजगताला प्रथम करून दिली, त्याला चारच दिवसांनी पाठवलेल्या पत्रात कळवली आहे. नोबेल मिळाल्यानंतर रोथेनस्टाईनला रवींद्रनाथांनी जी पत्रे लिहिलीत त्यात एक तऱ्हेचा कडवटपणा आणि उपहास दिसून येतो. पण त्यालाही कारण होते. कोणत्याही श्रेष्ठ कलाकृतीच्या वाटय़ाला येते तशी टोकाची िनदा व टोकाची प्रशंसा ‘गीतांजली’च्या आणि रवींद्रनाथांच्या वाटय़ाला यायची होती. आणि तशी ती आलीही. ‘गीतांजली’च्या पाश्चात्त्य प्रशंसकांमध्ये विख्यात कवी येट्स आणि एझरा पाउंड, प्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स हे जसे होते तसेच त्यांच्या भारतीय टीकाकारांमध्ये ‘लाल-बाल-पाल’ या भारतीय राजकारणात प्रसिद्ध असलेल्या त्याकाळच्या त्रिकुटातील बिपीनचंद्र पाल आणि बंगालच्याच नव्हे, तर तत्कालीन भारतीय राजकारणातील महत्त्वाचे असणारे देशबंधू चित्तरंजन दास हेही होते. बंगाली भद्रलोकांतील सनातनी आणि सुधारक हे दोन्ही गट रवींद्रनाथांवर तुटून पडले होते. ‘गीतांजली’ प्रसिद्ध झाल्यानंतर तर अनेक कंडय़ाही पिकवल्या गेल्या. त्यातील एक म्हणजे- ‘गीतांजली’ रवींद्रनाथांनी लिहिलेली नसून डब्ल्यू. बी. येट्सने लिहिलेली आहे. लोकमान्य टिळकांनी ज्याच्यावर लंडनमध्ये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता तो व्हलेंटाईन चिरोल हा तर- ‘येट्सने लिहिलेल्या कवितांचे श्रेय रवींद्रनाथ स्वत:कडे घेत आहेत..’ हा आरोप उघडपणे करीत असे. पण वस्तुस्थिती अशी होती की, येट्सने ‘गीतांजली’च्या प्रथम आवृत्तीत अंतर्भूत झालेल्या एकशे चार कविता निवडण्याचे व ‘गीतांजली’तील आध्यात्मिक व गूढतेकडे झुकणाऱ्या भावार्थाला साजेशी अशी मर्मग्राही प्रस्तावना लिहिण्याचे काम केले होते. आणि ही वस्तुस्थिती रवींद्रनाथांनीही मान्य केली होती. ‘गीतांजली’च्या हस्तलिखितात येट्सने काही किरकोळ दुरुस्त्या अवश्य केल्या होत्या, पण त्याचे संपादन केले नव्हते. ‘गीतांजली’ लिहिण्याचे तर दूरच राहिले! अशीच एक दुसरी अफवाही प्रचलित होती. ती म्हणजे- स्वीडनच्या प्रिन्स विल्यमने स्वीडिश अॅकॅडेमीवर टाकलेल्या दबावामुळे ‘गीतांजली’ची निवड नोबेल पारितोषिकासाठी झाली. पण याही अफवेमध्ये तथ्य नव्हते.
कोणत्याही साहित्यव्यवहाराला राजकारण घेरतेच. तसेच ‘गीतांजली’चे आणि रवींद्रनाथांचेही झाले. तत्कालीन वसाहतवादी राजकारणाचे आंतरराष्ट्रीय संदर्भ नोबेलप्राप्त ‘गीतांजली’ला आणि रवींद्रनाथांना चिकटले. एकीकडे पाश्चिमात्य साहित्यविश्वातील टॉलस्टॉय, इब्सेन, एमिल झोला, बर्नार्ड शॉ, येट्स ही सर्व दिग्गज नावे ओलांडून नोबेल पारितोषिक प्रथमच अशा व्यक्तीला दिले जात होते, की जी पाश्चात्त्य जगाबाहेरील.. युरोपीयेतर व त्यातही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या वसाहतीतील होती. हा दूरस्थपणा थोडासा कमी करण्यासाठी म्हणून की काय, नोबेल पारितोषिकाच्या मानपत्रात रवींद्रनाथांचा उल्लेख ‘अँग्लो-इंडियन पोएट’ असा केलेला दिसतो. ‘गीतांजली’ला प्रस्तावना लिहिणाऱ्या येट्सला नोबेल मिळाले १९२३ साली. म्हणजे ‘गीतांजली’नंतर तब्बल दहा वर्षांनी. ज्या वर्षी रवींद्रनाथांना नोबेल दिले गेले त्याच वर्षी थॉमस हार्डी या प्रख्यात कवी आणि कादंबरीकाराचेही नाव नोबेल समितीपुढे विचारार्थ होते. या सर्व पाश्र्वभूमीवर पाश्चिमात्य साहित्यविश्वातील खळबळ व अस्वस्थता आपण समजू शकतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे गीतांजलीला नोबेल द्यावे असे आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या समितीला वाटले असेल, हा प्रश्न विचारला जाऊ लागला असल्यास नवल नाही.
या प्रश्नाचे उत्तर अल्फ्रेड नोबेलच्या- म्हणजे ज्याने नोबेल पारितोषिकाची उपलब्धी जगाला करून दिली, त्याच्या मृत्युपत्रात मिळते. ज्याला नोबेल मिळेल त्याच्यात आदर्शवादी प्रवृत्ती असल्या पाहिजेत, अशी अट त्याने घालून ठेवली होती. नोबेलच्या सुरुवातीच्या काळात ही अट गंभीरपणे घेतली जात असे. इब्सेन किंवा शॉसारख्या लेखकांना नोबेल का मिळू शकले नाही, याचे उत्तर या अटीत आहे. लेखक आदर्शवादी प्रवृत्तीचा असणे याचा अर्थ त्याची साहित्यकृती नतिकदृष्टय़ा चांगली- म्हणजे प्रचलित नीतिमूल्यांचे समर्थन करणारी व धर्म, विवाह, कुटुंब, इ. सामाजिक संस्थांची पाठराखण करणारी असली पाहिजे, असा घेतला जात असे. थोडक्यात- प्रस्थापित मूल्यव्यवस्थेविरुद्ध न जाणाऱ्या साहित्यकृतीलाच नोबेल मिळण्याची काळजी अल्फ्रेड नोबेलने घेतली होती. ‘गीतांजली’ ही रवींद्रनाथांची स्वतंत्र कृती आहे की प्राचीन भारतीय काव्याची ती नक्कल आहे, याबद्दलही शंका घेतली गेली. पण गीतांजलीतील काव्य आदर्शवादी आहे, याबद्दल निवड समितीतील जवळपास सर्वच सदस्यांचे एकमत होते. आणि हाच मुद्दा निर्णायक ठरला. परंतु अल्फ्रेड नोबेल हा स्वत:च एक ‘अनाíकस्ट’ होता आणि प्रत्यक्षात त्याला आदर्शवादामध्ये धर्म, सामाजिक व्यवस्था इ.ची मीमांसा अभिप्रेत होती, हे जेव्हा उघड झाले तेव्हा त्याने घातलेली ‘आदर्शवादा’ची ही अट कालांतराने सोडून देण्यात आली. ज्या निवड समितीने ‘गीतांजली’ची निवड आदर्शवादाच्या कसोटीवर केली तिला रवींद्रनाथांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरील लिखाणाची, तत्कालीन िहदुस्थानातल्या राजकीय व सामाजिक जीवनातील त्यांच्या सहभागाची, थोडक्यात म्हणजे रवींद्रनाथांमधील ‘रीबेलियन’ची जाणीव असणे शक्य नव्हते. आज जर रवींद्रनाथांना नोबेल मिळायचे असते तर ते त्यांनी राजकारणातील आणि धर्मातील कर्मठतेवर केलेल्या टीकेमुळे मिळाले असते; ‘गीतांजली’मुळे नव्हे, असेही मत मांडले गेले आहे.
पाश्चात्त्य साहित्यविश्वाबाहेरच्या तत्कालीन जगातील वंश, धर्म, वसाहतवादी राजकारण आदी घटकही रवींद्रनाथांना मिळालेल्या नोबेलच्या निमित्ताने अस्वस्थ झाले होते. रवींद्रनाथांचा ‘बबींद्रनाथ’ असा चुकीचा उल्लेख करून १४ नोव्हेंबरच्याच ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ‘प्रथमच हे पारितोषिक गौरेतर व्यक्तीला दिले जात आहे..’ असे वर्णवादी विधान छापून आले. पण या विधानाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आपली उदारमतवादी प्रतिमा जपण्यासाठी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दुसऱ्याच दिवशी ‘जरी बबींद्रनाथ टागोर आपल्यापकी एक नसले तरी एक आर्यन आहेत, आणि म्हणून गौरवर्णीय समाजाशी दुरान्वयाने का होईना संबंधित आहेत,’ अशी मखलाशीयुक्त टिपणीही तत्परतेने दिली. व्हिएन्नामधील एका वृत्तपत्रात तर- ‘वेधक विलायती अशा बौद्ध पंथाच्या प्रभावाखाली हे पारितोषिक दिले गेले आहे की बंगाली कवीला (नोबेल पारितोषिकरूपी) मुकुट चढवण्याचेच ब्रिटिशांचे धोरण आहे?,’ असा खवचट प्रश्नही विचारला गेला. टागोर हे ‘राबाय’ म्हणजे ज्यू धर्मगुरू किंवा ज्यू पंडित असले पाहिजेत असे समजून पॅरिसमध्ये सिल्वेन लेव्ही या प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडिताला तो केवळ ज्यू असल्याने ‘राबाय’ टागोर यांच्याबद्दल विचारले गेले. (हेच सिल्वेन लेव्ही हार्वर्ड येथील प्राध्यापकी सोडून शांतिनिकेतन ज्या वर्षी स्थापन झाले त्या वर्षीच शिकवायला म्हणून तिथे येऊन राहिले होते.) रवींद्रनाथांबद्दलचे अज्ञान युरोपभर असे पसरले होते. रवींद्रनाथांबद्दलचे असे अज्ञान इंग्लंडमध्ये जरी नसले तरी तेथील परिस्थितीही फारशी सकारात्मक नव्हती. थॉमस हार्डीला नोबेल न मिळता रवींद्रनाथांना ते मिळाले याची खंत तिथल्या साहित्यविश्वात भरून राहिली होती. स्टर्ज मूर या रवींद्रनाथांच्या मित्राने ‘ज्या वृत्तपत्रातून तुमची स्तुती होत असे, तिथेच आता तुम्हाला अन्याय्य रीतीने वागविले जात आहे हे पाहून मला संताप येतो,’ असे लिहिले. त्याला उत्तर म्हणून रवींद्रनाथांनी लिहिले की, ‘ती मत्री व अंत:करणापासून केलेल्या कौतुकासाठी मी नोबेल पारितोषिकाचाही आनंदाने त्याग केला असता.’’
रवींद्रनाथ ‘ब्रिटिश इंडिया’चे नागरिक असल्याने मातृभाषेत लिहायचे की इंग्रजीत, की दोन्हीत- असा पेच त्यांच्यापुढे असणे स्वाभाविक होते. हा पेच केवळ साहित्याच्याच बाबतीत होता असे नाही. हा पेच एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर्वच आंग्लविद्याविभूषित भारतीयांपुढे होता. परंतु रवींद्रनाथांसमोर हा पेच नव्हता. आपल्या मातृभाषेतून म्हणजे बंगालीतूनच लिहायचे, हे त्यांनी पक्के ठरवले होते. पण त्यांच्या कवितेबद्दल इंग्लंडमध्ये जसजशी अधिक उत्सुकता निर्माण होऊ लागली, तसतशी रवींद्रनाथांना आपल्या कवितांच्या इंग्रजी भाषांतराची गरज भासू लागली. हे काम बंगालमध्ये त्यांच्या काही मित्रांनी सुरू केले होतेच. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अजित चक्रवर्ती. पण ही भाषांतरे रवींद्रनाथांना फारशी पसंत नव्हती. आपल्या कवितांची छंदबद्ध भाषांतरे त्यांना आवडत नव्हती. आपल्या कवितांची भाषांतरे सोप्या, पण प्रवाही गद्यात व्हावीत असे त्यांना वाटे. म्हणून इंग्रजी भाषांतराची निकड जसजशी अधिक प्रखर होऊ लागली, तसतसे भाषांतराचे काम रवींद्रनाथांनी स्वत:च करायचे ठरवले. रवींद्रनाथ स्वत:च स्वत:च्या कवितांचे भाषांतरकार बनले. याबद्दल जगभरातील अ-बंगाली भाषिक त्यांचे ऋणी आहेत. गीतांजलीत एकत्र केलेल्या कवितांवर तर रवींद्रनाथांनी अनेक संस्करणे केली. इतकी, की ‘गीतांजली’ हा एक नवाच संग्रह जन्माला आला. जणू रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्त्वच त्यात उतरले होते.
रवींद्रनाथांच्या पूर्वीही इंग्रजीत तसेच लॅटिन, जर्मन इत्यादी युरोपीयन भाषांत संस्कृत भाषेतील साहित्य भाषांतरित झाले होते. पंचतंत्र, ईशोपनिषद, शाकुंतल ही त्यातली काही प्रसिद्ध उदाहरणे. पण पाश्चिमात्यांवरील त्यांचा प्रभाव मर्यादितच होता. पाश्चिमात्यांच्या दृष्टीने पौर्वात्य साहित्य हे भोंगळ, एक्झोटिक, गूढ असे होते. या त्यांच्या आकलनात पाश्चिमात्य वर्चस्ववादी, वसाहतवादी दृष्टिकोन होता. या पाश्र्वभूमीवर रवींद्रनाथांचा युरोपमध्ये झालेला उदय महत्त्वाचा आहे. रवींद्रनाथांच्या साहित्याकडे आकृष्ट झालेल्यांमध्ये आधुनिक भारताबद्दल आकर्षण आणि थोडीफार माहिती असलेल्या पाश्चात्य साहित्यिकांचा अंतर्भाव होता. त्यांची रवींद्रनाथांच्या काव्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्वीच्या प्राच्यविद्या पंडितांप्रमाणे नव्हती. रवींद्रनाथांची मुळे जरी भारतीय परंपरेमध्ये रुजलेली असली तरी ते एखाद्या विशिष्ट संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत असे म्हणता येणार नाही, असे येट्सने ‘गीतांजली’ला लिहिलेल्या प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. रवींद्रनाथांना युरोपीयन परंपरेमध्ये बसविण्यात येट्सला अडचण भासली नाही. येट्सने लिहिलंय : ‘‘रवींद्रनाथांच्या काव्यात्म प्रतिभेमध्ये आम्हाला आमचीच प्रतिमा दिसते.’’ येट्सचे हे एकच वाक्य रवींद्रनाथांची ‘गीतांजली’ युरोपीय काव्यात्म अनुभवाशी कशी जुळणारी आहे, हे स्पष्ट करायला पुरेसे आहे. ‘गीतांजली’ हा युरोपीयनांसाठी केवळ भारताचाच दूरचा आणि परका आवाज नव्हता; तर हा युरोपचाच आवाज होता. असे जरी असले तरी ‘गीतांजली’कडे आणि पर्यायाने भारतीय साहित्याकडे पाहण्याच्या युरोपीयनांच्या दृष्टिकोनात एक प्रकारचा अंतर्वरिोधही दिसून येतो. येट्सने एकीकडे गीतांजलीचे वेगळेपण, ‘अदरनेस’ मान्य केले; पण आपल्या युरोपीय संवेदनेशी तडजोड न करता! जे येट्सने केले, तेच युरोपने केले. युरोपीय दृष्टिकोनातून रवींद्रनाथ म्हणजे अगम्य अशा ‘अदर’चेच प्रतिनिधी ठरले.
‘गीतांजली’बद्दल बंगालीत आणि इंग्रजीत जितके लिहिले गेले आहे तितके इतर भारतीय भाषांतील साहित्याबद्दल क्वचितच लिहिले गेले असेल. रवींद्रनाथांच्या आयुष्यातील गीतांजली-पर्व हे फक्त नोबेल पारितोषिकाशी संबंधित नाही. रवींद्रनाथांच्या प्रतिभेच्या आविष्कारातील ते एक महत्त्वाचे पर्व आहे. त्याचा कालखंड साधारणत: १९०५ ते १९१२- तर काहींच्या मते हा कालखंड १९०५ ते १९१९ असा मानला जातो. या कालखंडात बंगालमध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाच्या उलथापालथी होत होत्या. या सर्व घटनांवर भाष्य करणारी राजा, चित्रा, संन्यासी, मालिनी, विसर्जन, डाकघर यांसारखी नाटके, ‘मालंच’ (द गार्डनर) यासारखे काव्य, तर ‘साधना’, ‘राष्ट्रवाद’ ‘व्यक्तिमत्त्व’ यांसारखे वैचारिक लेखन, ‘घरे-बाइरे’सारखी कादंबरी, तर ‘जीवनस्मृती’सारखी आत्मकथा असे विविध आणि विपुल प्रकारचे लेखन रवींद्रनाथांनी याच कालखंडात केले. ज्या गीतांजलीला नोबेल मिळाले त्या संग्रहात ‘गीतांजली’ या संचातील त्रेपन्न, ‘गीतीमाल्य’ या संचातील सोळा, ‘नवेद्य’ या संग्रहातील सोळा, ‘खेया’ या संग्रहातील अकरा, ‘शिशू’ या संग्रहातील तीन, ‘चताली’, ‘स्मरण’, ‘कल्पना’, ‘उत्सर्ग’ आणि ‘अचलयातन’ या संग्रहांतील प्रत्येकी एक अशा १०४ कवितांचा अंतर्भाव आहे. रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’ची जातकुळी बंगालमधील ज्यात उत्कट भक्ती अंतर्भूत आहे अशा वैष्णव परंपरेशी जुळणारी आहे. गीतांजलीतील प्रतीके अस्सल भारतीय परंपरेतील आहेत. गीतांजलीत एका पातळीवर निसर्गाशी, तर दुसऱ्या पातळीवर ईश्वराशी अतूट, जैविक असे समर्पणयुक्त प्रेम आणि जवळीक किंवा संत तुकारामांना साधलेला आत्मसंवाद प्रतीत झाला आहे असे म्हणायला हरकत नसावी. गीतांजलीतील बहुसंख्य कवितांची पाश्र्वभूमी सायंप्रकाशाची किंवा रात्रीच्या गडद अंध:काराची आहे. आणि त्या जिथे जन्माला येतात, ते स्थळ म्हणजे एकांतातील एखादा नदीकाठ किंवा हिरवळीचा एखादा पट्टा. अशा वेळी आणि अशा स्थळी जे वर्णनातीत आहे असे गूढ मनात दाटून न येईल तरच नवल. अशा वेळी सर्व इंद्रिये स्तब्ध होऊन केवळ भावनेला प्रतीत होईल अशा अस्तित्वाशी आपल्या मनाचा संवाद होईल. गीतांजलीतील प्रत्येक कवितेत अस्तित्वाच्या किंवा जाणिवेच्या अधिक प्रगल्भ पातळीवर नेणारा, सर्व प्रकारच्या सीमितता ओलांडणारा हा क्षण.. हा ‘मोमेंट ऑफ एंट्रान्समेंट’ रवींद्रनाथांच्या प्रतिभेने नेमकेपणे पकडला आहे. म्हणूनच रवींद्रनाथ मोठे आहेत.
टीप : या लेखासाठी (१) कृष्णा दत्त आणि अॅण्ड्रय़ू रॉबिन्सन लिखित ‘रबींद्रनाथ टागोर : द मायराइड- माईंडेड मॅन’, सेंट मार्टनि प्रेस, न्यूयॉर्क, (१९९५) (२) अबू सईद अय्युब लिखित ‘द गीतांजली पीरियड’, कल्पना बर्धन (भाषांतरित) ‘ऑफ लव्ह, नेचर अँड डिव्होशन : सिलेक्टेड सॉंग्स ऑफ रबींद्रनाथ टागोर’ या पुस्तकातून. ऑक्सफोर्ड, (२००८), (३) सिसिरकुमार दास (संपा.) ‘द इंग्लिश रायटिंग्स ऑफ रबींद्रनाथ टागोर- खंड १’, साहित्य अकादमी, १९९४ (४) एडवर्ड थॉम्पसन लिखित ‘रबींद्रनाथ टागोर : पोएट अँड ड्रामॅटिस्ट’, रिद्धी इंडिया (१९७९) या ग्रंथांचा उपयोग केला आहे.

Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
My Portfolio answer to finding right bearing NRB Bearings Limited
माझा पोर्टफोलिओ : सुयोग्य बेअरिंगच्या शोधाला उत्तर
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
Four professors of Khare Dhere College beaten with iron bar by chauffeur president
गुहागरात खरे ढेरे महाविद्याल्यातील चार प्राध्यापकांना संस्थेच्या अध्यक्षासह पाच जणांकडून जबरी मारहाण
Sudhir Rasal honored with Sahitya Akademi Award
सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी
BJP creates new controversy by targeting Gandhi family over Pandit Nehru letters
नेहरूंच्या पत्रव्यवहारांवरून वाद, सोनिया गांधींनी पत्रे ताब्यात घेतल्याचा दावा; कारवाईचे केंद्राकडून आश्वासन
Seven historical reasons for the decline of Maharashtra
महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे
Story img Loader