कवी, चित्रपटकार गुलजार यांची अनेक रूपं आपल्याला ज्ञात आहेत. चित्रकला वा साहित्यातील व्यक्तिचित्रांसारखाच ‘व्यक्तिकाव्य’ हा प्रकारही त्यांच्या लेखणीनं प्रसवला आहे. मात्र, त्यात काव्यविषय ठरलेल्या व्यक्तींचं गुणगान नसून त्यांच्यासोबतच्या अंतस्थ आठवणींचं, मैत्रभावाचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. हिंदी चित्रसृष्टीतील अशा काही अंतरंगी सुहृदांबद्दलच्या त्यांच्या कविता..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कवितांचा अनुवाद केलाय कवी किशोर मेढे यांनी! त्यांनी आजवर गुलजार, जावेद अख्तर, इमरोज, निर्मला पुतूल, ल्हासा सिरींग यांसारख्या इतरभाषिक कवितांचे सिद्धहस्त अनुवाद केले आहेत.

मर्सिया बासू

दवाखान्यात घेऊन गेलेलो आम्ही त्याला
दुखायचं खूप त्याच्या
पोटामध्ये.. कधी कधी
जेव्हा जास्तच दुखायचं तेव्हा
आपलं अख्खं शरीर तो
नागासारखं पोटाशी लपेटून घ्यायचा
श्वास कोंडायचा
रक्तदाब वाढायचा!

दवाखान्यात
डॉक्टरांनी ‘एप्रन’ घालून
आणि पोट चिरून
सगळ्या जखमा स्वच्छ करत
दुखणंच मुळापासून उखडून
दिलं पुन्हा ‘पॅक’ करून
गुंडाळलेलं कलेवर दवाखान्यातून आणताच
चितेवर ठेवलं नि टाकलं जाळून!

पोर्ट्रेट ऑफ बिमल राय..

संध्येच्या धुक्यात वाहत जाणारा नदीचा नि:शब्द चेहरा
शुभ्र धुक्यात तेवणारे डोळ्यांचे दीप
अखंड जळत राहणारा सिगारेटचा धूर
दूरवरून आलेला झोपेतला घोरण्याचा आवाज

अनोळखी स्वप्नांच्या उडत्या सावलीखाली
मेणासारखी वितळणारी चेहऱ्याची नक्षी
पडणाऱ्या नवनवीन स्वप्नांची धून ऐकून बदलून जाते
असं वाटतं- ना झोपणार, ना जागणार, ना बोलणार कधी
संध्येच्या धुक्यात वाहत जाणारा नदीचा नि:शब्द चेहरा!

नसीरुद्दीन शाहसाठी-

एक अदाकार आहे मी
मी अदाकार आहे ना?
जगावी लागतात कैक आयुष्यं एकाच जीवनात मला!

माझ्या भूमिका रोजच बदलत असतात सेटवर
माझी वेशभूषा बदलते
कथानकानुसार चेहराही बदलतो
माझ्या सवयी बदलतात
आणि मग पोशाखानुसार भूमिकाच शिरतात माझ्यात
जखमी भूमिकांचे काही कण राहून जातात तळाशी
तर एखादी ठसठसणारी भूमिका सळसळत राहते धमन्यांतून
तेव्हा जखमांचे व्रण दीर्घकाळ राहतात हृदयावर
खऱ्याखुऱ्या आयुष्यावर बेतलेल्या या भूमिका
काल्पनिक नाहीयेत
की मन:पटलावर त्यांचं बिंब
विखुरलं जाईल पंख्याच्या हवेनं
लेखकाने लिहिलेल्या संवादांची शाई
साचत जाते मनात
मी दिसतो जगताना
रजत पडद्यासाठी लिहिलेली लेखनशैली
मी अदाकार आहे परंतु
फक्त अदाकारच नाही
त्या- त्या काळाचं प्रतिबिंबसुद्धा आहे!!

सलिल चौधरी

थरथरणारी तलावाच्या पाण्याची पातळी
सुताच्या धाग्यांनी बांधलेल्या पुराचा आक्रोश
हलक्याशा तडाख्यानं एकदम आवाज करून उठतात
धारदार चाकूनं कापलेल्या चेहऱ्यावरच्या खुणा
व्याकूळ चेहऱ्यावर उडणारी डोळ्यांची अक्षरं
एका शोधात आहे, असं वाटतं- कुठल्याही क्षणी
फडफडणाऱ्या पानांना घाबरून कदाचित हे उडून जातील

स्वत:च्याच भीतीनं निसटून तर नाही ना जाणार
स्वत:तच गुरफटलेली ही भरारी!

मीनाजी

डोळे बंद करून झोपली
आणि गेली एकदाची!
त्यानंतर श्वासही नाही घेतला तिने!!
एका प्रदीर्घ संकटांनी भरलेल्या
गुंतागुंतीच्या आयुष्यानंतर
किती सहज आणि सोपं मरण होतं ते!!


पंचम

आठवतो तुला, भरपावसाचा तो दिवस, पंचम
पहाडाच्या कुशीत वसलेल्या दरीत
धुक्यातून अलगद डोकावल्यासारख्या
पुढे पुढे जाणाऱ्या त्या रेल्वे-पटऱ्या
धुक्यात असे दिसत होतो आपण
जणू दोन रोपं खेटून बसलीयेत
बराच वेळ आपण तिथं बसून होतो
येणाऱ्या त्या व्यक्तीविषयी बोलत
ज्याला आदल्या रात्रीच यायचं होतं, पण
त्याची येण्याची वेळ पुढं पुढं सरकत होती
उशिरापर्यंत पटऱ्यांवर बसून
आपण ट्रेनची वाट पाहत राहिलो
ना ट्रेन आली, ना तशी वेळही
तू मात्र दोन पावलं चालून
धुक्यावर पाय ठेवत सहज निघून गेलास
या धुक्यात मी एकटाच आहे, पंचम!!

अमजद खान

तो दोस्त काल हे जग सोडून गेला
तो आता नाहीये आपल्यात

अस्ताला जाणाऱ्या सूर्यफुलाच्या
सोनेरी झाडाखाली
जिथे तो रोज भेटायचा
तिथेच त्याला दफन केलंय

अर्धवट काळोख्या कबरीमध्ये
मी जेव्हा झोपवत होतो त्याला
तेव्हा चोरटय़ा नजरेनं
तो पाहत राहिला मला!

तळहाताने डोळ्यांच्या पापण्या
मी हळूच बंद केल्या
का दोन्ही जगातले किस्से
या धरेवरच चुकते केले

जेव्हा तिथून परतलो तर
तोही मागे-मागेच आला

तो दोस्त- जो नाही राहिला
तो काल हे जग सोडून गेला

अतुल कुलकर्णी

अतुल, एक मिशी पाठवू तुला?
मिशीविना तू ‘बन-फूल’चं पात्र वाटतोस!
जेव्हा तुझी मिशी फुरफुरायची तेव्हा कळायचं, की
तू किती खूश आहेस!
मिशांचे दोन झुपकेच मला सांगून टाकायचे- तू कसा आहेस?
तुझे हालहवाल काय?
ओठांच्या कडेवर ती कधी झुकायची तेव्हा वाटायचं- उदासी आहे
कुणीतरी विरह देऊन गेलंय..
मिशीचं अस्ताव्यस्त वाढणंच कधी सांगून जायचं- विरह किती मोठा आहे ते!

परंतु आता हे..
अचानक काय केलंस तू?
ती तुला सोडून गेलीये, का तू आत्महत्या केलीयेस?!

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icon and faces gulzar