सत्यजीत भटकळ.. ‘लगान’नंतर त्यांचं नाव चर्चेत आलं ते या ऑस्कपर्यंत धडक मारणाऱ्या सिनेमाच्या निर्मिती टीममध्ये ते सहभागी असल्यानं. ‘लगान’च्या प्रचंड यशानंतर त्यांनी ‘द स्पिरिट ऑफ लगान’ ही सिनेमाची निर्मितीकथा सांगणारे पुस्तक काढले. ‘लगान’नंतर त्यांनी ‘बॉम्बे लॉयर्स’ नावाची एक तासाचा एपिसोड असलेली मालिका केली. आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात कोर्टात जे घडतं त्यावर ही मालिका बेतलेली होती. ती एनडीटीव्ही इंडियावर प्रदर्शित झाली. आपल्याकडे मुख्य प्रवाहात एखादा गंभीर विषय घेऊन त्यावर काम केल्याची उदाहरणं खूपच कमी आढळतात. म्हणूनच ही मालिका लक्षवेधी ठरली. या मालिकेबद्दल मला खूप प्रेम आणि अभिमान आहे, असं ते आवर्जून सांगतात. २००४ साली त्यांनी आमीर खान प्रॉडक्शनसाठी ‘चले चलो’ नावाचा माहितीपट तयार केला. हा भारतातला पहिला माहितीपट; जो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. माणसांच्या महत्त्वाकांक्षा, आंतरविरोध, यश मिळवितानाचा संघर्ष याचं प्रभावी चित्रण या माहितीपटात करण्यात आलं होतं. त्यानंतर २०११ साली ‘झॉकोमॉन’ हा लहान मुलांसाठीचा चित्रपट त्यांनी केला. त्यात अनुपम खेर, दर्शिल सफारी, मंजिरी फडणीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या ‘सत्यमेव जयते’ या मालिकेचा विस्तृत कॅनव्हास त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक हाताळला. त्याचा आराखडा, संशोधन, विषयांची मांडणी ही संपूर्णपणे सत्यजीत आणि त्यांच्या टीमची सृजनशील निर्मिती होती! आमीर खान यांनी निर्माता म्हणून त्यांच्या क्षमतेवर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. ‘सत्यमेव’मुळे भारतीयांना आपला देश आणि इथल्या विविधांगी समस्या, त्यावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती, तसेच त्या समस्यांवर काय मार्ग काढता येईल, यासंबंधी तज्ज्ञांचं मार्गदर्शन.. आणि मुख्य म्हणजे जनजागृती.. अशा  सर्वागानं प्रकाश टाकलेला होता. त्या- निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारची, प्रवृत्तीची माणसं त्यांना भेटली. ‘सत्यमेव’ला जे यश मिळालं. त्याचा लोकांवर, व्यवस्थेवर जो परिणाम झाला, त्यामुळे आपण समाधानी असल्याचं ते सांगतात. विशेष म्हणजे ‘सत्यमेव’मुळे आपण आणि आपली टीम सामाजिकदृष्टय़ा अधिक समृद्ध झाल्याचं ते म्हणतात. सिनेमाकडे संवेदनशील दृष्टीने पाहणाऱ्या सत्यजीत भटकळ यांनी या माध्यमाचा सखोल विचार केल्याचं जाणवतं. सिनेमाकडे पाहण्याचा त्यांचा हा दृष्टिकोन समजून घेताना..
पूर्वीच्या काळी बॉलीवूडमधील प्रॉडक्शन हाऊसेसची कामाची पद्धती आणि आताची पद्धती यांत आता खूपच फरक पडला आहे. त्यावेळी चित्रपट निर्मितीच्या कामात एक शिस्त होती. आता तशी स्थिती दिसत नाही..
– हे तितकंसं खरं नाहीए. उलट, बॉलीवूडमध्ये आज बहुतेक प्रॉडक्शन्स हाऊसेसमध्ये अत्यंत शिस्तीने काम चालते. कारण चित्रपटनिर्मिती ही अत्यंत महागडी गोष्ट आहे. चित्रपट माध्यम असं आहे, की त्यामध्ये तीन वेगवेगळे स्रोत कार्यरत असतात आणि हे तिन्ही स्रोत तेवढय़ाच क्षमतेने हाताळले नाहीत तर नुकसान होते. पैकी एक स्रोत म्हणजे अर्थातच कलात्मकता! कारण चित्रपट ही कला आहे. दुसरे: विज्ञान-तंत्रज्ञान. कारण तेही एक शास्त्र आहे. आणि तंत्रज्ञान सतत वेगाने बदलत असते. इतर कोणत्याही कलेपेक्षा चित्रपटनिर्मितीची कला ही तंत्रज्ञानावर अधिक आधारित आहे. तुम्ही पेंटिंग घ्या किंवा शिल्पकला घ्या, कविता म्हणा किंवा मग गाणे घ्या; त्यात तंत्रज्ञानाचा संबंध फारसा येत नाही. साधारणपणे २००० वर्षांपूर्वी तुम्ही गाणे शिकायचे म्हटले असते तरी ते तुम्ही करू शकला असता. कारण त्यासाठी लागणारे सात सूर असतात तुमच्याकडे. पण सिनेमाचा उगमच होतो मुळी तंत्रज्ञानातून. म्हणजे एका क्षणाला तुमच्या लक्षात येतं, की सिल्व्हर नायट्रेट जेव्हा आपण कोट करतो आणि मग तुम्ही ते लाइटमध्ये एक्स्पोज करता, तेव्हा इमेज तयार होते. त्याच्यापलीकडे जाऊनही आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की, अशा २४ फ्रेम्स एकापाठोपाठ एक लावल्या आणि एका सेकंदात फिरवल्या तर फिजिक्समध्ये जो ‘पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन’ आहे, ती डोळ्यांना कळत नाही, की ती स्थिर इमेज आहे. ती इतकी झपाटय़ाने बदलत जाते, की आपल्याला वाटते ती मूव्हिंग इमेजच आहे. म्हणजे चित्रपटाचा जन्मच झाला मुळी विज्ञानामुळे. याचा अर्थ यात एक कला झाली, विज्ञान झालं आणि वाणिज्यही. त्यामुळे तिन्ही शाखा आल्या तुमच्या. तुम्हाला कविता लिहायची असेल तर पैसा मोजावा लागत नाही. तुम्ही जेलमध्ये असू शकता, किंवा तुम्ही जगातले शेवटचे असे व्यक्ती आहात, की न्यूक्लिअर ब्लास्टनंतर तुम्ही एकटेच जिवंत आहात, तरी तुम्ही कविता लिहू शकता. तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. अशा बऱ्याच कला आहेत, ज्यांच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे नाही लागत. पण चित्रपट हे या व्याख्येनुसार एक महागडे कलामाध्यम आहे. ते आज काही प्रमाणात बदलतंय. तंत्रज्ञान अधिक स्वस्त होत आहे, लोकाभिमुख होत आहे. जेणेकरून तुमच्याकडे प्रचंड पैसा नसला तरीही तुम्ही चित्रपट करू शकता. आणि याची सुंदर उदाहरणेही आहेत. तुम्ही ‘स्पंदन’ वगैरे ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल, किंवा अशा अनेक इतर मूव्हमेंट्सही आहेत- ज्या एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर चित्रपट बनवतात. पण ढोबळमानाने सांगायचं तर चित्रपट बनविणे हे तसे महागडेच काम आहे. आणि एवढे पैसे जेव्हा तुम्हाला मोजावे लागतात तेव्हा पैसे देणारा त्याची शिस्त मागतोच. ती शिस्त वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने अमलात आणली जात असली, तरी मला वाटतं की आधुनिक पद्धतीने, आधुनिक मानसिकतेने हे आपल्या सिनेमामध्ये आलं. मला वाटतं, १९९९-२००० साल हे वॉटरशेड म्हणता येईल. कारण त्याच वर्षी आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि आमीर खानने निर्मिती केलेला ‘लगान’ चित्रपट बनवला गेला. तो चित्रपट बनवण्याआधी आशुतोषने एक-दोन चित्रपट बनवले होते. आमीरनेही पस्तीसेक चित्रपटांतून अ‍ॅक्टर म्हणून काम केले होते.
असं जरी असलं तरी बॉलीवूडमध्ये म्हणावी तितकी शिस्त आज आहे असं दिसत नाही. कलाकार शूटिंगला वेळेवर येत नाहीत. पूर्वीच्या काळी कलाकार हे त्या चित्रपट कंपनीत नोकरीस असल्याने जी शिस्त होती, तशी आता दिसत नाही..
– अजूनही काही सुपरस्टार आहेत- जे अशा बेशिस्तीने काम करतात. पण त्यांची संख्या वाढत नाहीये, कमी होते आहे. आज आमीर म्हणा, शाहरुख म्हणा, बच्चनसाहेब आहेत- की जे अत्यंत शिस्तीने काम करतात. मला नाही वाटत, की आज असे मोठे स्टार शिल्लक आहेत, की जे बेशिस्तीने काम करतात. काही अपवाद जरूर आहेत याला; पण फारच कमी. सिनेमाचे कमर्शिअल गणित असे आहे, की ते अ‍ॅक्टरच्या चेहऱ्यावर चालतात. त्यामुळे काही अ‍ॅक्टर त्याचा गैरफायदा घेतात. अर्थात मग त्यांना एवढे यशस्वी असावे लागते, की त्यांचे नखरेही सहन केले जावेत. तरीही अशा लोकांची संख्या कमीच आहे. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, चित्रपट उद्योग हा अत्यंत हार्डवर्किंग उद्योग आहे. नाहीतर मग कोणती अशी इंडस्ट्री आहे- जिथे सलग पंधरा-पंधरा दिवस तुम्ही काम करता! तुम्हाला सूर्योदयाचा शॉट घ्यायचा असेल तर ‘कॉलशीट’मध्ये पाहिलंत तर त्यात त्या दिवसाच्या आणि त्याच्या पुढच्या दिवसांच्या बारीकसारीक कामांचा तपशील दिलेला असतो. प्रत्येक कॉलशीटच्या सर्वात वरच्या जागी कसली माहिती असेल, तर ती त्या दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त कधी आहे, याची. वर्कलाइनमध्ये प्रत्येकाला ती वेळ माहीत असते. ६.५८ चा सूर्योदय असेल तर प्रत्येकाच्या कामाची वेळ त्यानुसार ठरते. कारण तुम्हाला जर सूर्योदयाचा शॉट घ्यायचा असेल तर तुमच्या अ‍ॅक्टर्सचा मेकअप, त्यांचे वॉर्डरोब्स, त्यांचे कॉस्च्युम्स रेडी करून जेव्हा सूर्योदयाची पहिली किरणं येतात तेव्हा तुमचा कॅमेरा रोल झालेला पाहिजे. यासाठी कमालीची शिस्त असावी लागते. मी एक उदाहरण देतो. सूर्योदयाच्या वेळी हीरो-हीरोइनचं नृत्य चित्रित करायचं असेल.. म्हणजे तुम्हाला त्यांच्यामागे एक सुंदर असा लाइट हवा आहे.. सूर्य त्यांच्या मागे उगवतो आहे. तुम्हाला वाटतं की, अरे, काय हा पोरखेळ आहे. पण त्यांनी नाचताना काय कपडे घातले पाहिजेत, तुमचे सेट, प्रॉपर्टी काय आहेत.. म्हणजे तुम्हाला तिथे बैलगाडी हवी आहे, आणि त्या बैलगाडीवर तुम्हाला गवत हवे असेल, तर किती गवत हवे आहे, वगैरे बारीकसारीक सगळी तयारी सूर्योदयापूर्वीच तालमीनिशी पूर्ण झालेली असली पाहिजे. कारण सूर्याला तुम्ही नाही सांगू शकत, की तू परत जा, आम्हाला रिटेक करायचा आहे! तो दिवस गेला म्हणजे गेला. आणि आजच्या घडीला त्या दिवसाचे काम ठरले असेल आणि तुम्ही ते केले नाही, तर तो फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे मी वॉल्ट डिस्नेसाठी जेव्हा ‘झोकोमॉन’ बनवला तेव्हा प्रत्येक दिवशी जे काम ठरले आहे ते त्याच दिवशी पूर्ण केले पाहिजे, हे स्पष्ट केलेले होते. मी कामात झालेली दिरंगाई नंतर भरून काढू शकेन, वगैरे इथे काहीही चालत नाही.
काय होतं, एखाद्या निर्मात्याने म्हटलं कलाकाराला, की ‘तुम्ही इतके ग्रेट आहात! सकाळच्या शिफ्टला तुम्ही दुपारी बाराला आलात तरी पुढच्या चित्रपटात आम्ही तुम्हालाच घेऊ.’ अशावेळी वेगळाच संदेश जातो! चित्रपटनिर्मिती आज पूर्वीपेक्षा खूपच महागडीही झाली आहे. तेव्हाची प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि आताची प्रॉडक्शन व्हॅल्यू यांत खूप तफावत आहे. आज आपले सिनेमे बऱ्याचदा परदेशात बनवले जातात. त्यासाठी परदेशातून जी इक्विपमेंट्स मागवली जातात त्यांचा दिवसाचाच खर्चच एवढा असतो, की वेळेचं मूल्य अधिकच वाढतं.
परंतु आता कलाकार स्वत:च निर्माते झाल्यामुळे बेशिस्तीच्या बाबतीत काही फरक पडलाय का?
– नक्कीच. कलाकार स्वत:च निर्माते झाल्यामुळे फार मोठा फरक पडला आहे. अक्षय स्वत: निर्माता आहे. आमीर, शाहरुख हेही निर्माते झालेत. त्यामुळे या मंडळींना वेळेचं महत्त्व कळलेलं आहे. ते स्वत: वक्तशीर आहेत. सकाळच्या आठच्या शिफ्टला दुपारी येण्यातून काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे एक अकाऊंटेबिलिटी मोठय़ा प्रमाणावर आलेली आहे.
कोणत्याही क्षेत्रात नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा ते जुन्या तंत्रज्ञानाला बाजूला सारतं. फिल्म प्रॉडक्शनमध्येही नवी टेक्निक्स आलीत. मग जुन्या पद्धतीने काम का करावं? असंघटितपणे काम करून एक पसरट आणि बेशिस्तीचे वातावरण असेल तर त्याचा कोणालाच फायदा होत नाही. नवीन टेक्निक्स आली, त्यात दोन-तीन मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे ‘फर्स्ट एडी’ हे पद निर्माण करण्यात आलं. पूर्वी ‘चीफ एडी’ असायचा. तो क्रिएटिव्ह कामही करायचा. तो दिग्दर्शकाच्या सूचना पाळायचा, शिफ्ट ठरवून द्यायचा.. म्हणजे ऑल इन वन असा तो असायचा.
हॉलीवूडमध्ये अशी कामाची पद्धत नाही. तिथे ‘फर्स्ट असिस्टंट डायरेक्टर’ असतो. तो निर्मात्यासाठी काम करतो. तो दिग्दर्शकाला सांगतो की, कोण किती वाजता येणार आहे, हे तुझं काम नाही. तू फक्त सर्जनशील गोष्टींवर लक्ष केंद्रित कर. इतर कोणत्याही गोष्टींत तू सहभागी होऊ नकोस. सिनेमा बनवण्यासाठी एवढे विभाग आहेत! मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, इतकी विविध बॅकग्राऊंडमधली, वेगवेगळ्या क्षेत्रांतली लोकं एकत्र येऊन तो एक शॉट घेण्यासाठी एका ठिकाणी जमलेले असतात. तुम्ही विचार करा.. सकाळपासून काय काय होत असतं त्या सेटवर! आधी जवळजवळ ३०० माणसांच्या प्रवासाची व्यवस्था तुम्हाला करावी लागते. ते ट्रान्स्पोर्ट डिपार्टमेंट वेगळं असतं. तुम्ही सेटवर पोहोचता तेव्हा तुमचा नाश्ता तयार असतो. त्यासाठी तुमचं कॅटरिंग डिपार्टमेंट सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघतेय की नाही, याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर तुमच्या नायक-नायिकांसाठी मेकअप, वॉर्डरोब आणि हेअर स्टाईल करणं- अशी तीन वेगवेगळी डिपार्टमेंट्स असतात. ‘लगान’सारख्या सिनेमाला तर असं असायचं, की ५ वाजून १३ मिनिटांनी तुमचा मेकअप होईल, ५ वाजून १८ मिनिटांनी तुमचे हेअर होतील आणि ५ वाजून २५ मिनिटांनी तुमचे कॉस्च्युम्स तयार होऊन ५ वाजून ४० मिनिटांनी तुम्हाला तयार होऊन सेटवर आणलं जाईल. असं मिलिटरी स्टाईल काम केलं जायचं. त्यामुळे मला वाटतं की, चांगली फिल्म युनिट्स ही थोडी का होईना, शिस्त पाळतात. आमीरच नव्हे, तर अक्षयकुमारसारखा अभिनेताही वक्तशीर असतो. ते अगदी प्रोफेशनल आहेत.
चित्रपटाची क था-पटकथा तयार करण्यापासून ते संपूर्ण चित्रपट तयार होईतो सबंध प्रक्रियाच अशी व्यावसायिक झालेली आहे का ?
– सर्जनशील प्रक्रियेला तुम्ही कधीही व्यावसायिकतेच्या चौकटीत बंदिस्त करू शकत नाही. तसं झालं तर त्यातील कला निघून जाईल. आपल्याकडे कधीही लेखकाला पटकथा लिहिण्यासाठी आगाऊ रक्कम दिली जात नाही. तुम्ही पटकथा लिहा, मग ते ‘कमिशन्ड’ केले जातात. आता बघाल तर जवळजवळ प्रत्येक अभिनेता आपल्या चित्रपटाची कथा तयार करतो, किंवा त्यांच्या काही ठराविक टीम्स असतात. म्हणजे अनुराग कश्यप काही ठराविक लोकांबरोबर काम करतो. फरहानची आपली टीम आहे. प्रत्येकाजवळ त्यांची अशी लेखकांची टीम आहे. त्यामुळे मी अजून तरी ऐकलेलं नाही, की तुम्ही एवढे पैसे घ्या आणि दोन महिन्यांत कथा लिहून द्या, असं लेखकाला सांगितलं गेलंय. ते फक्त टीव्हीवर होतं. कारण ती एक फॅक्टरी आहे. तुमचा जर डेली सोप असेल तर ज्या तारखेला स्क्रिप्ट यायला हवं, त्याच्या आधी अगदी सकाळपासून काम सुरू करून ते संध्याकाळपर्यंत संपवलं जातं. त्याचाही एक मोठा प्रभाव आहे. आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री तर अनफर्गिव्हिंग आहे.
सिनेमा लिहिणं हे फॅक्टरी सिस्टीममध्ये तुम्ही आणूच शकत नाही. आणि तसं ते आणूही नये.  ती एक सर्जनशील प्रक्रिया आहे आणि जो-तो ती आपापल्या पद्धतीने करत असतो. सिनेमा लिहिणं हे लेखकाला स्वत:च्या इच्छेने आणि आपल्याच पैशातून करावं लागतं. त्यासाठी आगाऊ पैसे दिले जात नाहीत. प्रोफेशनलिझमचा एक मोठा भाग हा आहे की, Script is the key!
मग पूर्वी चित्रपट कसे बनवले जात?
– पूर्वी बाऊंड स्क्रिप्टस् नव्हत्या. म्हणजे तुम्ही जर ऋषी कपूर- श्रीदेवीचे चित्रपट बघितलेत किंवा अगदी आमीरलाही विचारलंत, तरी तो सांगेल की, त्यावेळी बाऊंड स्क्रिप्टस् नव्हत्या. एक ढोबळ आराखडा असायचा. हे शूट केलं, चांगलं वाटलं, की मग दुसरं कर.. या पद्धतीने. म्हणजे जसजसं कथा बदलत जाई तसतसा तो चित्रपट बदलायचा. अर्थात त्या पद्धतीनेही चांगले चित्रपट निघालेले आहेत. त्याकाळी त्या पद्धतीने काम होत होतं. आता पटकथा आवडल्यावर ती मंजूर केली जाते, लेखकाला तिचे पैसे दिले जातात. त्यानंतर त्या पटकथेचं कम्प्लिट ब्रेकडाऊन केलं जातं. त्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण पटकथा फीड करायची. मग त्या कथेतले सगळे बारीकसारीक तपशील भरले जातात. तुम्ही जर पटकथेत वर्णन केलं असेल की, छोटंसं रेस्टॉरन्ट वा एक मध्यम आकाराचं रेस्टॉरन्ट- तिथे बसलेली चार माणसं.. अशी वर्णनं येतात तेव्हा तुमच्या रेस्टॉरन्टसंबंधीच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे स्पष्ट होतं. नंतर फर्स्ट एडीला बोलावलं जातं. तो मग सगळे तपशील विचारायला सुरुवात करतो. तो आर्ट डिरेक्टरला विचारतो की, तुम्हाला नक्की कितीजणांची टीम हवी आहे? तर- २५! मग ती व्यक्ती ज्या रेस्टॉरन्टमध्ये बसली आहे तिथे नेमकी कोणत्या प्रकारची माणसे आहेत? श्रीमंत आहेत, गरीब आहेत की मध्यमवर्गीय आहेत? त्यांनी कसले कपडे घातले आहेत? सेट ड्रेसिंग हवंय का? म्हणजे तिथे एका बाजूला बार आहे का?.. काय होतं की, असे तपशील जेव्हा यायला लागतात तेव्हा मी दोन गोष्टींची तयारी करायला लागतो. एक म्हणजे मी शेडय़ुलची तयारी करतो आणि दुसरं म्हणजे बजेट. या कामाला साधारणपणे महिना लागतो. ते सॉफ्टवेअर कथेच्या अनुषंगानं ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळी माहिती पुरवतं. ते तुम्हाला सांगतं की, तुम्हाला एका सीनसाठी किती माणसं लागणार आहेत, त्या सीनचं चित्रीकरण करण्यासाठी किती वेळ लागणार आहे.. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला स्पष्ट व्हायला लागतात. त्यानुसार तुमचं बजेट आकार घ्यायला लागतं.
प्रॉडक्शन कितीही वाईट असलं तरी तुम्हाला बजेट आखावंच लागतं. सिनेमा वाईट असणं आणि त्याचं प्रॉडक्शन वाईट असणं- या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जगातला वाईट सिनेमासुद्धा तुम्हाला शिस्तीनेच बनवावा लागतो. तुम्ही क्लासिक चित्रपट बनवा किंवा बंडल बनवा; तुम्ही जो स्टॉक एक्स्पोज करता त्याची किंमत तीच राहते. दिग्दर्शकाचं काम हे सर्जनशील असतं. फर्स्ट एडी तुम्हाला फक्त तपशील विचारायचे काम करतो. म्हणजे मी दिग्दर्शक असेन तर मला विचारणा होईल की, तुला चर्चच्या सीनसाठी किती माणसं हवी आहेत? मला तीनशे तरी माणसं हवी आहेत, असं सांगितल्यावर मग- तू तीनशे का म्हणतो आहेस? तुला तीनशेच हवी आहेत की..? मग मी सांगतो- मला पटांगण खचाखच भरून जाईल इतकी माणसे हवी आहेत. मग तो मला काही संदर्भ दाखवतो आणि सांगतो की, तुझं काम अडीचशे लोकांमध्येच होईल. तीनशे आणि अडीचशे माणसांमध्ये ५० माणसांचा फरक आहे. एका ज्युनिअर आर्टिस्टचं एका दिवसाचं मानधन आज सहज दीड हजारच्या घरात आहे. त्यामुळे तुमचे या एका दिवसाचेच ७५ हजार रुपये वाचतील. बजेट काढण्याकरता असे सगळे तपशील दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडून घेतले जातील. हे सारं प्रचंड गणित आहे आणि याचं पेपरवर्क शिस्तीनेच केलं जातं. त्यानंतरच त्या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल दिला जातो. कारण त्यानंतरच निर्मात्याला कल्पना येते की, या चित्रपटासाठी मला साधारण आठ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. एकूण ६५ दिवसांचं चित्रीकरण असेल, आणि त्यातले सहा दिवस आऊटडोअर असेल. ३५ दिवस मुंबईत असतील आणि २० दिवस मी पाचगणीत चित्रीकरण करू शकेन. मग मी चित्रपटावर पैसे खर्च करायला सुरुवात करतो. तोपर्यंत मी फक्त स्क्रिप्टचे कॉपीराइट घेण्यावरच पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळे फर्स्ट एडीची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची असते. तो दिग्दर्शकाचा साहाय्यक नाही, तो निर्मात्याचा साहाय्यक आहे. सर्जनशील गोष्टी दिग्दर्शकाकडून समजून घेतल्या जातात. त्याआधारे चित्रपटाची पूर्वतयारी केली जाते. कधी कधी त्यांच्यात देवाणघेवाणही होते. दिग्दर्शक कधी कधी खूप मागतो. निर्माता विचार करतो की, दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार तो प्रोजेक्ट १२५ दिवस चालणार आहे. पण निर्मात्याला जर १२५ दिवसांचा तो प्रोजेक्ट तेवढासा व्हाएबल वाटत नसेल तर तो दिग्दर्शकाला सांगतो की, एकतर तू चित्रीकरण वेगाने कर, नाहीतर मी हा चित्रपट करत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींची चित्रपटाचं प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी तुम्हाला अचूक माहिती असावी लागते.
पण कधी अचानक शूटिंग रद्द करावं लागलं तर तो दिवस कसा भरून काढला जातो?
– चित्रीकरण ठरलंय १२२ दिवसांचं आणि अचानक ते वाढलं असं फारच क्वचित घडतं. फार तर एखादा दिवस इकडे-तिकडे. पण काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अचानक पाऊस पडला, आग लागली, तर त्यासाठी विमा उतरवलेला असतो. माझ्या सिनेमाचा पहिला दिवस होता- १४ मार्चला पाचगणीत. त्याच दिवशी तिथे जोरदार पाऊस पडल्यामुळे पहिलाच दिवस वाया गेला. आता १४ मार्चला पाचगणीत पाऊस का पडावा? पण धो-धो पाऊस पडला खरा. मात्र, विमा उतरवलेला असल्यामुळे तुम्हाला वाया गेलेला खर्च परत मिळतो. त्या दिवसाचं चित्रीकरण तुम्हाला मग एखादा अतिरिक्त दिवस किंवा एखादा रविवार असं धरून पूर्ण करावं लागतं. तुम्ही त्यासाठी तुमचं शेडय़ुल नाही बदलू शकत. अगदीच नाइलाज झाला तरच चित्रीकरण वाढवलं जातं. याचं कारण त्यानंतर कलाकारांच्या तारखाच उपलब्ध नसतात. म्हणून दिलेल्या तारखांमध्येच तुम्हाला ते पूर्ण करावं लागतं. त्यांनी आपल्या पुढच्या तारखा दुसऱ्या कोणालातरी दिलेल्या असतात. आमीरसारखे फार कमी कलाकार असतात, की जे वर्षांला एकच चित्रपट करतात. त्यामुळे ते तुम्हाला सांगू शकतात की, तुला काय आणखी हवं आहे ते घे..’’
आमीरसारखे कलाकार आपलं प्रॉडक्शन सोडून बाहेर फार काम करत नाहीत…
– नाही. असं काही नाही. तो ‘धूम’ करतो आहे. त्याने फरहानसाठी ‘तलाश’ पूर्ण केला आहे. तिसरा चित्रपट तो विधू विनोद चोप्राचा करतो आहे. म्हणजे एकापाठोपाठ तीन चित्रपट तो करतो आहे. मात्र, तो अशा चित्रपटांची निर्मिती करतो, की जे करायला सहसा इतर लोक तयार नसतात. निर्माता म्हणून तो अजिबात महत्त्वाकांक्षी नाहीए. ‘धोबीघाट’सारखा सिनेमा, ‘पीपली लाइव्ह’सारखा सिनेमा आणखी कुणीही केलाच नसता.
‘लगान’ची निर्मितीही त्याचीच होती…
– हो. पण ‘लगान’साठी आशुतोष आधी बारा निर्मात्यांकडे फिरला होता आणि त्याला सगळ्यांकडून नकार मिळाल्यानं मग आमीरने तो स्वीकारला. तोही त्याने दोन र्वष होय-नाही करता करता केला. ते ‘चल आशू, हम करते हैं..’ असं ते अजिबात नव्हतं. त्याला वाटलं की, हा सिनेमा बनायला हवा. इतकी चांगली पटकथा असूनही तो सिनेमा होत नाहीए. कोणी करत नाहीए तर मग ठीक आहे, मी करतो- असं ते झालं. निर्माता होणं हे कटकटीचं काम आहे. त्यामुळे आमीर हा काही उत्साही निर्माता नाहीए.
‘सत्यमेव जयते’ मालिकेची निर्मिती करण्याचं कसं ठरलं?
– स्टार टीव्हीने आमीरला विचारणा केली होती. सगळे कलाकार टीव्ही शो करतायत, तर तूही कर. तुला काय करायचंय? स्पोर्ट्स शो करायचाय की एन्टरटेन्मेट शो करायचाय? तेव्हा आमीरने त्यांना सांगितलं की, मला टीव्ही हे सशक्त माध्यम वाटतं. ते घरोघरी पोहोचणारं माध्यम आहे. त्याचा वापरही आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे. एन्टरटेन्मेट शो किंवा गेम शो करण्यात मला बिलकूल रूची नाही. समाजाला बदलण्यासाठी एक कम्युनिकेटर म्हणून मला खारीचा वाटा द्यावासा वाटतो. त्यामुळे एखादा सामाजिक शो करायला मला आवडेल. सुरुवात तिथपासून झाली. मग आमीरने माझ्याशी संपर्क साधला. आम्ही मग शोची संकल्पना विकसित केली,  आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, याबद्दल प्रदीर्घ चर्चा केली. आमीरनेच या शोची निर्मिती करायची असं आधी ठरलं नव्हतं. पण जसजसं आम्ही पुढे जात गेलो तसतसं आमच्या लक्षात आलं, की हा शो आमीरने केला तरच तो आपल्याला हवा तसा मार्गी लावता येईल. टेलिव्हिजन हा अत्यंत शिस्तीने बांधलेला उद्योग आहे. त्या उद्योगाला त्याच्या अशा काही सवयी आहेत. आम्ही त्या पद्धतीने तो शो करू शकणार नव्हतो. टेलिव्हिजन आज फॉरमॅट-बेस्ड झालेला आहे. टीआरपी हा खूप नंतरचा भाग. शो प्रसारित झाल्यावर टीआरपीचं मोजमाप केलं जातं. पण तोपर्यंत तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करता, हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या काही सवयी या माध्यमासाठी जमेच्या बाजू आहेत. त्यांचं असं म्हणणं असतं की, तुम्ही फॉरमॅट बनवा आणि त्यामध्ये शो कोंबा. ही तोटय़ाची गोष्ट आहे. कारण त्यामुळे तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही नाही देऊ शकत. ‘सत्यमेव जयते’ हा आम्ही कोणत्या रूढ फॉरमॅटमध्ये करत नव्हतो. आम्हाला त्या- त्या सामाजिक विषयांना महत्त्व द्यायचं होतं. ‘सत्यमेव जयते’चा ढोबळ फॉरमॅट असा होता की, आमीर बऱ्याचशा लोकांबरोबर सेटवरती बोलतो. पण त्याच्यात अंतर्गत फॉरमॅट असा काही नव्हता. शोमध्ये काय होईल, हे गृहीत धरलेलं आम्हाला नको होतं. ते त्या- त्या विषयावर अवलंबून राहणार होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आम्ही शेवटचा भाग केला त्यात कोणीही पाहुणे नव्हते. त्या १३ हीरोंच्या डॉक्युमेंटरीज् होत्या. किंवा पाण्यावरचा एपिसोड केला तेव्हा लक्षात आलं की, पाण्याचा विषय कोणाशी बोलून होणार नाही, तर ते वास्तव तुम्हाला प्रत्यक्षात दाखवावं लागेल. या सगळ्याकरता आम्हाला या शोमध्ये एक लवचिकता हवी होती. आणि आमीरने हा शो प्रोडय़ुस केला तरच सगळी सूत्रं आमच्या हातात राहतील असं वाटल्याने तो शो आमीरने प्रोडय़ुस केला.
टीव्ही माध्यमाचं असं एक विशिष्ट बजेट असतं का?
– टीव्ही माध्यमाचं एक विशिष्ट बजेट असतंच. सिनेमामध्ये किमान एक आशा तरी असते, की या ना त्या प्रकारे आपली रिकव्हरी होऊ शकेल. पण टीव्हीची रिकव्हरी ठरलेली असते. त्याचं बजेटही चॅनेलने आपल्या पद्धतीने आखून दिलेलं असतं. ‘सत्यमेव जयते’चं बजेट आमीरमुळे तापदायक झालं नाही. कारण आमीरचा निर्माता म्हणून आग्रह असतो की, सर्जनशील दिग्दर्शनासाठी तुला ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल त्या तुला मिळणारच. त्यामुळे निर्मितीच्या बाबतीत ‘सत्यमेव जयते’वर कधी परिणाम झाला नाही.
प्रॉडक्शन युनिट ठरलेलं असतं का?
– प्रत्येक प्रॉडक्शनची एक छोटी टीम ही ठरलेली असते. आमीर खान प्रॉडक्शनमध्ये दहाहूनही कमी माणसं असतील. हे इथंच नाही, तर जगभरात असंच आहे. कारण हा उद्योगच मुळी असा आहे, की ऑन प्रोजेक्टला महत्त्व आहे. ऑन प्रोजेक्टचा स्टाफ मोठा असतो. हा स्टाफ तुम्हाला किती काळाच्या करारावर घ्यायचा आहे, हे आधीच ठरवावं लागतं.
चित्रपट निर्मितीप्रक्रियेच्या तीन मुख्य पातळ्या असतात. एक प्री-प्रॉडक्शन. यात पटकथा अंतिम होणे, बजेट निश्चित होण्यापासून सेट डिझाइन करणे, कॉश्च्युम डिझाइन करणे, मेकअप डिझाइन करणे, व्हिज्युअल इफेक्टस् डिझाइन करणे. प्रत्येक डिपार्टमेंटची कामे वेगवेगळी आहेत. या प्रक्रियेत तुम्ही अजून एकही शॉट घेतलेला नाहीए.
दुसरं- चित्रीकरण. ज्याला सिनेमाच्या भाषेत ‘प्रिन्सिपल फोटोग्राफी’ म्हणतात. तुमचा चित्रीकरणाचा जो काळ आहे, तो म्हणजे ‘प्रिन्सिपल फोटोग्राफी.’ सगळ्यांना वाटतं, चित्रपट याच काळात पूर्ण होतो. पण तसं नाहीए.
तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोस्ट-प्रॉडक्शन. ज्याला हल्ली अधिकाधिक महत्त्व येत चाललं आहे. प्री-प्रॉडक्शनमध्ये जी माणसं हवी असतात, ती पोस्ट प्रॉडक्शनमध्ये नको असतात. त्यामुळे तुमचा स्टाफ प्री, शूट आणि पोस्ट प्रॉडक्शन या तीन काळांसाठी पूर्णपणे वेगळा असतो. म्हणजे ज्यांना प्री-प्रॉडक्शनसाठी घेतलंय त्यांची चित्रीकरणासाठी गरज असतेच असे नाही. आणि पोस्ट-प्रॉडक्शनसाठी आणखीनच नवी माणसे जोडली जातात. पोस्ट-प्रॉडक्शनच्या वेळेला तर फक्त एडिटर वगैरे अशी मोजकीच माणसे लागतात. कलाकार तर यावेळी नसतातच. आणि आजकाल सिंक साऊंडच वापरला केला जात असल्याने डिबगही फारसे करत नाहीत.
हल्ली फिल्म प्रमोशन हा आता चौथा स्वतंत्र टप्पा बनला आहे. प्रमोशनवर प्रचंड खर्च केला जातो आणि तो वाढतच चालला आहे. तोही प्रॉडक्शनचाच एक भाग असल्याने बजेटमध्ये त्याचाही विचार करावा लागतो.
प्रोजेक्टच्या दरम्यान अनेक सृजनशील मंडळी एकत्र येता, त्याचा चित्रपटाच्या निर्मितीवर बरा-वाईट परिणाम होतो का?
– प्रोजेक्टदरम्यान काही काळापुरती अशी माणसं एकत्र येण्याचा हा जो पायंडा पडला आहे तो केवळ त्यातून मिळणाऱ्या पैशासाठीच आहे असं नाही. याचा फार मोठा चांगला परिणाम सर्जनशील प्रक्रियेवर होतो. कारण सर्वाचीच आपल्या कामाप्रती श्रद्धा असते. यासाठी मी नेहमी सिंक साऊंडचं उदाहरण देतो. सिंक साऊंड येण्याआधी आपल्याकडे ज्या पद्धतीने काम होत होतं त्यावरून मला आपल्याकडच्या लग्नसोहळ्यांची आठवण व्हायची. लग्नात वर-वधू आणि फार तर त्यांचे माता-पिता हेच त्या सोहळ्यात भटजींबरोबर असतात. बाकी सगळेजण गप्पा मारण्यात मग्न असतात. म्हणजे तिथे लग्नाच्या विधींवर कोणाचाच फोकस नसतो. त्यामुळे सिंक साऊंडवर काम करताना कसं होतं, की फर्स्ट एडीने सायलेंसचा कॉल दिला की कोणी हलूच शकत नाही. श्वासही घेऊ नये असं म्हणतात. सगळं जिथल्या तिथंच थांबतं आणि प्रत्येकाचं लक्ष शॉटवर केंद्रित होतं. त्यामुळे कलाकारांचा अभिनयही आणखी धारदार होतो. फक्त सिंक साऊंडपुरतीच नाही, तर इथं कामाची पद्धतच अशी आहे, की त्यामुळे चित्रीकरणाला एक गंभीरपणा येतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यातून आपल्याकडे चांगले चित्रपट निर्माण होत आहेत.
पूर्वीच्या स्टुडिओ पद्धतीत आपल्या कामाप्रती प्रत्येकाची निष्ठा असायची, समर्पण असायचं. ते आता या ठराविक मुदतीपुरते एकत्र येणाऱ्या टीममध्ये पाहायला मिळतं का?
– फार क्वचित मिळतं. आणि पूर्वीच्या काळीही हे समर्पण, कामाप्रती निष्ठा वगैरे होती असं आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. समर्पण, त्याग हे फार मोठे शब्द झाले. मला असं वाटतं की, ती जुळवणूक काही चित्रपटांसाठी काही माणसांबरोबर होते. माझा अनुभव असा सांगतो की, ‘लगान’मध्ये जे वातावरण होतं ते आमीर किंवा आशुतोष पुढे इतर कोणत्याही चित्रपटांच्या वेळी निर्माण करू शकले नसतील. दोघांचीही तशी इच्छा नक्कीच असणार; पण ते शक्य झालं नसेल. कारण हे एक चमत्कारी रसायन असतं. कधी ते फार सुंदर जमून येतं. माझी अशी एक थिअरी आहे, की जेव्हा तुमच्या चित्रपटाचा विषय एखाद्या उच्च पातळीवरचा असतो, तेव्हा असं वातावरण निर्माण करता येण्याची शक्यता असते. मला वाटतं- चित्रपटाचा विषय, त्यासाठी एकत्र येणारी माणसं या सगळ्यावर ते अवलंबून असतं. ते रसायन ठरवून निर्माण करता येत नाही. ही जादू ‘लगान’मध्ये १०१ टक्के होती. त्यात श्रद्धा होती, समर्पण होतं. पण तसं पुन्हा कुठल्या चित्रपटाच्या बाबतीत होईल का, याबद्दल मला दाट शंका आहे.
एखाद्या विषयातच तशी ताकद असू शकते का?
– प्रत्येक वेळेला तसं म्हणता नाही येणार. कारण, चित्रपटांत फार कमी जण नेतृत्व करणारे असतात. एक म्हणजे निर्माता, दुसरा अर्थातच दिग्दर्शक आणि तिसरे  कलाकार. ही यादी वाढवायचीच झाली तर त्यात चौथा कॅमेरामन आणि पाचवा फस्र्ट एडी असू शकतो. ही मंडळी काय वातावरण निर्माण करतात, त्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही प्रोजेक्टला अधिक महत्त्व देता की स्वत:ला, हेही इथं लक्षात घ्यावं लागतं. तुमच्या वागण्यातून जर त्यागभावना उतरली तर युनिटच्या लोकांनाही त्याग करावासा वाटेल. तुम्ही जर प्रोफेशनली वागणार असाल- म्हणजे मी सकाळी नऊच्या शिफ्टला येणार आणि शिफ्ट संपताच जाणार- तर त्यागाची भावना निर्माणच होणार नाही. इतर मंडळीही मग प्रोफेशनलीच वागतील. अर्थात हा स्टुडिओ पद्धती आणि आत्ताची पद्धत यांतला फरक नाहीए. आजही बाँडिंग बनतं. आजही जुन्या स्टुडिओ पद्धतीप्रमाणेचं युनिटचं कुटुंब बनतं. कधी त्यात व्यावसायिकता असू शकते, तर कधी भावनिक ओलावाही असू शकतो. पण त्याकरता बरेच अनेक घटकही कारणीभूत ठरतात. व्यावसायिक दृष्टिकोनातही भावनिक गुंतणूक होऊ शकते. पण असं क्वचितच घडतं. कसं आहे- तुम्ही लोकांची टीम कशी बांधता, त्यावर हे अवलंबून आहे. युनिटमध्ये अडीचशे लोक असतात. म्हणजे अडीचशे वेगवेगळी शरीरं, वेगळी मनं. त्या सगळ्यांना तुम्ही एका ध्येयासाठी प्रेरित करणं हे मोठंच आव्हान असतं. कधी कधी व्यावसायिकदृष्टय़ा ते होतं. पैसे टाकले आहेत, कलाकार-तंत्रज्ञ एकत्र आणले आहेत, तेव्हा सिनेमा बनणारच. पण एकरूपतेची भावना क्वचितच निर्माण होते. मी असं ऐकलंय की, ‘थ्री इडियट्स’च्या सेटवर हे असं भावनिक वातावरण निर्माण झालेलं होतं.
यशराज, विधू विनोद चोप्रा यांच्यासारख्या मोठय़ा प्रॉडक्शन हाऊसेसची भूमिका याबाबतीत महत्त्वाची ठरताना दिसते का ?
– प्रॉडक्शन हाऊसेस नेहमीच महत्त्वाची होती. पूर्वीच्या काळीही मोठमोठे निर्माते होते; ज्यांनी दहा-पंधरा सुपरहिट् चित्रपट काढले आहेत. त्यामुळे त्यांचं वजन असणं ही काही नवीन गोष्ट नाही. आजची नावं आपल्याला मोठी वाटतात, याचं कारण ती आज मोठी आहेत. पूर्वीची बरीच नावे आज इतिहासजमा झाली आहेत. मेहबूब खान, राज कपूर हे त्यांच्या काळात खूप पुढे होते, नावाजलेले होते. पण काही काळानंतर काही कारणांमुळे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसेसना तो दर्जा टिकवता आला नाही. त्याकाळी राज कपूरकडे शंकर-जयकिशन हीच जोडी प्रामुख्यानं संगीतकार म्हणून काम करत होती. आताही तसंच आहे. यशराजकडे स्वत:च्या कॅमेरामनची एक टीम आहे. ज्यांच्याबरोबर काम करायला आदित्य चोप्रांना आवडत असेल असेच कॅमेरामन त्यांच्या चित्रपटासाठी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळतात. हे नवीन अजिबातच नाही. सत्यजित रेंकडेही त्यांचा असा कॅमेरामन होता.
तुम्ही जो स्टुडिओ पद्धतीतला फरक म्हणताय तो प्रभातच्या काळचा! न्यू टॉकीज, प्रभात हे सगळे तेव्हा स्टुडिओ पद्धतीने चालायचे. पण आपल्याकडे तो फार लहान कालखंड होता. १९३०-४० पर्यंतच तो होता. पन्नासच्या दशकात सगळंच बदललं होतं. जगभरातच ही पद्धत मोडीत निघाली. त्यावेळी अशी पद्धत होती, की लेखकापासून दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ अशा सगळ्यांनाच पगार मिळायचा.  आम्ही तुम्हाला सिनेमा देऊ किंवा नाही, पण तुम्हाला महिन्याचा तेवढाच पगार मिळेल. त्यामुळे काम आणि पगार यांचा तसा काही अर्थाअर्थी संबंध नव्हता. ती पद्धत पुढे लयाला गेली. आज कोण म्हणेल, की तुम्ही चित्रपट नाही केला तरी मी तुम्हाला पोसेन!
त्यानंतर जे निर्माते आले तेही आपापल्या परीनं प्रभावी होते. राज कपूरचं उदाहरण तुम्ही घेतलंत तर त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत संगीतकार शंकर-जयकिशनबरोबर काम केलं. जयकिशन गेल्यानंतर ‘बॉबी’ चित्रपटाच्या वेळी मात्र त्यांनी संगीतकार म्हणून लक्ष्मीकांत-प्यारेलालना संधी दिली. सांगायचा मुद्दा असा की, हा सहज मानवी स्वभाव आहे की- ज्याच्याबरोबर माझा स्वभाव जुळलाय, विचार जुळलेत त्याच्याबरोबर मी जास्त काम करेन. एखाद्या चित्रपटाची गरज वेगळी असेल तर मी त्या तऱ्हेने माझी टीम, माझे कलाकार बदलेन. पण दिग्दर्शकाला आपल्या आवडत्या टीमसोबत काम करायला आवडतं, हे सत्य आहे.
दिग्दर्शकाने निवडलेल्या माणसांची वेगवेगळ्या प्रकारचे सर्जनशील चित्रपट करण्याची क्षमताही असावीच लागते ना?
– म्हणूनच तर दिग्दर्शक प्रत्येक वेळी आपली तीच टीम वापरतो असं नाही. राजकुमार हिरानी हे आजचं यशस्वी नाव आहे. पण त्यांनीही आपल्या पहिल्या कॅमेरामनला दुसऱ्या चित्रपटात घेतलं नाही. त्यांचा पहिला चित्रपट बिनोद प्रधान यांनी केला होता. लगोलग आलेला दुसरा चित्रपट मात्र त्यांनीच केला होता असं नाही. लोक आपली टीम बदलत असतात. आणि हे सगळ्याच क्षेत्रांत होतं. चित्रपटातच हे विलक्षण काहीतरी घडतंय असं नाही.
अनुराग कश्यप, आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांमुळे निर्मात्यापेक्षाही दिग्दर्शक मोठे झाले आहेत असं म्हणता येईल का?
– दिग्दर्शकाची एक ब्रँड व्हॅल्यू बनते आहे, हा लक्षणीय बदल आहे. मधला काळ असा होता, की चित्रपट कलाकारांच्या नावावर चालायचे. म्हणजे या चित्रपटात कोण आहे? धर्मेद्र. या चित्रपटात कोण आहे? जितेंद्र. इथे कोण आहे? अमिताभ. म्हणजे चित्रपट काय आहे, ते नंतर बघू. सध्या मी काय बघायला चाललोय, तर धर्मेद्र किंवा अमिताभ. ही पद्धत हळूहळू मागे पडते आहे. पण अजूनही मोठय़ा प्रमाणावर ते झालेलं नाही. खरं तर ते व्हायला हवं.
त्यात आता एक  नवा घटक आला आहे असं म्हणता येईल. हा चित्रपट अनुरागचा आह,े तर अनुराग कश्यपच्या चाहत्यांचा एक वर्ग तयार झाला आहे. याआधी रामगोपाल वर्मानेही आपला असा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. जो त्याने पुढे गमावला. पण आता प्रेक्षक विशिष्ट निर्माता वा दिग्दर्शकाचा म्हणून एखादा चित्रपट पाहायला जातात. आणि असा बदल घडायलाच हवा. राजकुमार हिरानी हे याबाबतीतलं एक मोठं नाव. अर्थात या बदलामागे प्रसिद्धी माध्यमांचाही मोठा हात आहे. कारण पूर्वी चित्रपटाचा दिग्दर्शक काळा आहे की गोरा, हेही कोणाला माहीत नसायचं.
दिग्दर्शकांची कामाची पद्धत, चित्रपटाकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन यामुळे हे घडतंय का?
– असं घडतंय, याला कारण आता पटकथेला पुन्हा महत्त्व मिळायला लागलं आहे. पटकथा कलाकार लिहीत नाहीत. तो दृष्टिकोन दिग्दर्शकाचा असतो. त्यामुळे हा फरक पडलेला आहे. पूर्वी सिनेमा कसा घडायचा? तर सगळ्यात महत्त्वाचं असायचं ते मोठमोठय़ा कलाकारांच्या तारखा घेणं. तेव्हा त्या चित्रपटाची पटकथा काय आहे, हेही माहीत नसायचं. समजा- अमुक एक मोठा कलाकार आहे, माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत, मग मी त्याला भेटतो, तो सांगेल त्या किमतीला मी त्याला साइन करतो. नंतर पहिल्यांदा मी त्या कलाकाराच्या नावावर वितरकांना या आगामी चित्रपटाचे हक्क विकून टाकतो. त्या जोरावर मार्केटमधून काही पैसे उचलतो. आणि मग मी पटकथा लेखकाला भेटून माझ्याकडे अमुक एक कलाकाराच्या तारखा आहेत, आता तू त्याच्यासाठी पटकथा लिही, असं सांगतो. असा तो सगळा मामला असे. आता हे शक्यच नाही.
आता वितरकाची भू्मिकाच बदलली आहे. चित्रपटाला अर्थसाहाय्य करणारे स्रोत वाढलेत. शिवाय हल्ली निर्माते स्वत:च चित्रपटांचे वितरण करायला लागले आहेत. यशराज बॅनर, यूटीव्ही प्रॉडक्शन, व्हायकॉम १८, इरॉस हे सगळे आपापल्या चित्रपटांचे वितरण स्वत:च करतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता चित्रपट करण्यासाठी खूप चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दुसरं म्हणजे प्रेक्षक काही काळापासून आशयात्मक असं काहीतरी मागत होता आणि ते जन्माला येत नव्हतं. मला असं वाटतं, ते दुष्टचक्र ‘लगान’ने तोडलं. ‘लगान’नंतर हे लक्षात आलं की, तुम्ही जर उत्कृष्ट चित्रपट केलात, तर त्याचे नियम काहीच नाहीत. त्यावेळेला वितरकांचं असं म्हणणं होतं की, तुम्ही शहरी चित्रपट बनवायला पाहिजे. ग्रामीण कथा लोकांना पाहायला आवडत नाहीत. तुम्ही जेवढं आधुनिक जग दाखवाल, झगमगाट दाखवाल, ते लोकांना आवडतं. त्यांना पीरियड फिल्म्स आवडत नाहीत. खेळावरचे चित्रपट कधी आपल्याकडे चाललेले नाहीत. सिनेमातील कलाकारांची भाषा ही अर्धी इंग्रजाळलेली पाहिजे, असे सगळे नियम होते. ‘लगान’ने हे सगळे नियम तोडले. आणि असा सिनेमा जेव्हा यशस्वी होतो तेव्हा इतर लेखकांसाठी, दिग्दर्शकांसाठी दारे खुली झाली. ‘लगान’ने लोकांच्या मनात जी जळमटं होती, ती काढून टाकली.
सिनेमाच्या साक्षरतेमुळेही हा परिणाम घडून आला का?
– अगदी खरं आहे. टीव्हीमुळे लोकांना बाहेरच्या जगाचा फार मोठा खजिना उघडला गेला. आता ‘बे एके बे’ अशी लोकांची विचारसरणी राहिलेली नाही.
एकीकडे सिनेमा साक्षरता आली असे म्हटले तरी टीव्हीवर अजूनही सासू-सुनांची भांडणंच आवडीने पाहिली जातात. हे कसं काय?
– आपल्या देशात नवीन काहीतरी आलं म्हणून जुनं कधीच मरत नाही. आपल्याकडे ‘स्पेस प्रोग्रॅम’ आले तरी आपल्याकडे बैलगाडी अजून आहेच ! आणि बैलगाडी हे फक्त भारताचं वैशिष्टय़ आहे. माझ्या आयुष्यात तरी बैलगाडी मरणार नाही, हे खरंय. याचं कारण तांत्रिकदृष्टय़ा खूप वेगवेगळी शतकं आपण एकाच वेळी जगत असतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचं मन एकविसाव्या शतकात असलं तरी ते काहीसं विसाव्या शतकात, थोडंसं एकोणिसाव्या शतकात, आणि अगदी आदिमानव युगातही असतं. लग्नाच्या वेळी तुम्ही एखादी गोष्ट अशी का करता, असं विचारलात तर ‘आमच्यात असं असतं,’ असं उत्तर देऊन लोक मोकळे होतात. आणि आपल्याला त्या गोष्टींचा गर्वही असतो. त्यामुळे आपल्याकडे कितीही नवीन गोष्टी आल्या तरी जुनं काहीही मरणार नाही. म्हणून अनुराग कश्यप आला तरी आपल्याकडे मारधाड चित्रपट येणारच नाहीत असं होणार नाही. तरीही सिनेमाची जाण आपल्याकडे वाढलीय हेही खरंय. चांगला आशय नसेल, तुम्ही लोकांना आश्चर्यकारक असं काही देऊ शकत नसाल तर प्रेक्षक तुम्हाला नाकारतात.
हल्ली निर्माता-दिग्दर्शक चित्रसाक्षर झालेले आहेत म्हणूनही हे चित्र बदललं आहे का?
– आजकालची मुले खूप चित्रपट बघतात. चित्रपट बघणे हे तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे हल्ली सोपं झालं आहे. रात्र-रात्र सिनेमा पाहणारी मुलं आहेत. आणि ते सगळं पाहतात. रशियन क्लासिक पाहतील, फ्रेंच सिनेमा पाहतील, सत्यजित रे पाहतील आणि डेव्हिड धवनही पाहतील. सिनेमासाक्षर होणं ही चांगलीच गोष्ट आहे; पण जीवनाबद्दल साक्षर होणं ही त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुमच्या अनुभवांतून तुम्ही समृद्ध व्यक्तिमत्त्व बनता तेव्हा तुमच्याकडे सांगण्यासारखं काही असतं. त्यामुळे आपल्याकडे चांगल्या तंत्रज्ञानावरचे चित्रपट आले तरी चांगल्या आशयावरचे, चांगले लिखाण असलेले चित्रपट मात्र अजून हवे तितके आलेले नाहीत.
खूप सिनेमे असे असतात की ज्यांची एक पैशाचीही कमाई नसते. हिंदी सिनेमा व्यवसायात साधारण वर्षांला दीडशे चित्रपटांना सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळतं. अलीकडे प्रदर्शित झालेल्या वीस चित्रपटांची नावं तुम्ही सांगा.. बाकीचे जे ऐंशी चित्रपट आहेत, ते कधी प्रदर्शितच होत नाहीत. आणि तरीही बॉलीवूडमध्ये वर्षांकाठी एवढे चित्रपट बनतात.
मग यामागचं कारण काय असू शकतं?
– मोह. ही एकच गोष्ट अशी आहे, की जिथे आग आहे आणि माणूस स्वत: होरपळून जायला त्या आगीत उडी टाकतो. या वर्षी कितीही चित्रपट पडले तरी पुढच्या वर्षी आणखी नव्या चित्रपटांचं पीक येईल. बरेच जण पहिल्यांदा चित्रपटनिर्मिती करणारे असतात आणि त्यांचा तो चित्रपट शेवटचाही असतो. जिंदगी में एक तो फिल्म बनाकर रखेंगे- अशा वृत्तीने केलेली ती निर्मिती असते.
मराठीत अलीकडे सर्वार्थाने चांगले चित्रपट येत आहेत. मराठीत जितके चांगले चित्रपट बनले आहेत.. मला नाही वाटत, तितके गेल्या पाच वर्षांत तरी हिंदीत बनले असतील. उत्तम पटकथा, उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन असलेले चित्रपट मराठीत येत आहेत. खरं तर हा मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ आहे असं म्हणायला हवं.
मराठीत कितीही चांगले चित्रपट बनत असले तरी त्यांची रिकव्हरी मात्र होत नाही..
– चित्रपटाची रिकव्हरी खूप महत्त्वाची असते. काहीजण रिकव्हरीबद्दल थापा मारतात. पण इंडस्ट्रीला पक्कं माहिती असतं की, त्या चित्रपटाची रिकव्हरी किती झाली आहे. आता असं झालंय, की शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीनच दिवस तुम्हाला मिळतात. तुमच्या चित्रपटाची एकूण रिकव्हरी जेवढी होईल त्याच्या पन्नास टक्के रिकव्हरी या तीन दिवसांत होते. त्याचा फटका छोटय़ा चित्रपटांना बसतो. मोठे कलाकार असलेल्या चित्रपटांना साहजिकच चांगलं ओपनिंग मिळतं. त्यामुळे पुन्हा कलाकारांना महत्त्व येण्याचं ते चक्र उलट सुरू होण्याची शक्यता आहे. टेलिव्हिजन राइट्स जरी म्हटले तरी ते लोकही चित्रपटाचा प्रभाव, परिणाम या सगळ्या गोष्टी तपासून घेतात. चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत, हे लक्षात घेतात. काही नाही तरी सॅटेलाइट राइट्समधून तरी पैसे परत मिळतील अशी आशा असते. परंतु फार मोठय़ा प्रमाणात हा आतबट्टय़ाचाच धंदा आहे. निर्माता काहीही करून पैसा कमावेल, असे सगळे म्हणतात. पण ते सपशेल खोटं आहे. जे लोक अनेक वर्षे या धंद्यात टिकून आहेत त्यांनी काही गणितं आजमावलेली आहेत आणि म्हणूनच ते टिकून आहेत. दरवर्षी दीडशे सिनेमे बनतात. त्यापैकी एकशे चाळीस सिनेमे बुडतात. जगभरात इतके लोक या धंद्यात डुबत असतात आणि तरीही नव्या चित्रपटांचे पीक येतंच राहतं.
चित्रपटसृष्टीत आलेल्या तरुण पिढीला हे गणित मान्य आहे का?
– कोणालाच हे गणित मान्य होणं शक्य नाही. इतके पैसे खर्च करून आपण चित्रपट करतो आणि ७२ तासांत त्याचं नशीब ठरतं, यापेक्षा भयंकर गोष्ट नाही. तुम्हाला यश मिळालं तरी त्यात मजा नाहीए. पूर्वीच्या काळी कसं चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाला, गोल्डन ज्युबिली झाला.. तो एक आनंद होता.
पायरसीला पायबंद घातला तर याला काही प्रमाणात आळा बसेल का?
– तुम्ही अजून या लोकांना भेटला नाही आहात. जो चित्रपट चोपला जातो ना, त्याचीही प्रिंट अगदी त्या दुपारी टोरँटवरती मिळते. प्रत्येकाला वाटत असतं की, आपलं नशीब आजमावायचं. पण रविवारी त्यांच्या लक्षात येतं की, आपल्या नशिबाचा काय झालं आहे! चित्रपट सुपरहिट् झाला म्हणजे निर्मात्यांकडे आणखी चित्रपट करण्यासाठी पैसा येतो असं लोकांना वाटतं. पण ते तितकंसं खरं नाही. कारण प्रत्येक चित्रपट हा महागडाही असतो ना!
चित्रपटाचं एक तिकीट विकलं की निर्मात्याच्या हातात २५ पैसे पडतात. सगळ्यात पहिला जातो तो मनोरंजन कर. बाकीचा पैसा थिएटर मालकाकडे जातो. म्हणजे तुमचा चित्रपट बंपर हिट् झाला, त्याने २२० कोटींचा धंदा केला तर- याचा अर्थ ७० ते ८० कोटी निर्मात्याच्या हातात आले. याव्यतिरिक्त त्याचे ओव्हरसीज राइट्स आहेत. टेलिव्हिजन आहे. टेलिव्हिजनचे सगळे पैसे मात्र निर्मात्याच्या हातात येतात. टेलिव्हिजनचा एक रुपया हा बॉक्स ऑफिसवरच्या चार रुपयांएवढा असतो. कारण, बॉक्स ऑफिसच्या चार रुपयांपैकी एक रुपया निर्मात्याच्या हातात येतो, तर टेलिव्हिजनचा एकूण एक रुपया हा निर्मात्याच्याच हातात पडतो. संगीताचे राइट्स त्याला मिळत नाही. तुम्ही ए. आर. रेहमानला घ्या, नाहीतर आणखी कोणाला; पायरसीमुळे तुम्हाला काहीही मिळत नाही. फक्त रिंगटोन्सचा धंदा चालतो. म्हणजे ‘लगान’च्या म्युझिकचा खर्च करोडोंमध्ये होता. ९९ सालची गोष्ट आहे ही. त्यावेळेला जर तुम्हाला म्युझिक राइट्सचा एक रुपया मिळत असेल तर आज तुम्हाला ५० पैसे मिळतात. गाणं मला फ्रीमध्ये ऐकायला मिळणार आहे तर मग मी पैसे का मोजू, या वृत्तीमुळे म्युझिक इंडस्ट्रीत फक्त आता रिंगटोन्सचा धंदा तेवढा शिल्लक राहिला आहे.
चित्रपट उद्योग हा अत्यंत अवघड उद्योग आहे. पण त्याच्या ग्लॅमरमुळे लोकांना ते लक्षात येत नाही. या व्यवसायात किती लोक बुडतात! तरीही पुन्हा ते चित्रपटनिर्मिती करतच राहतात. हे पूर्वीही तसंच होतं, आजही तसंच आहे आणि यापुढेही असंच चालत राहणार आहे. आणि हे फक्त भारतातच नाही, तर जगात सगळीकडेच आहे.

Story img Loader