आयटी क्षेत्रातील बहुतांशी मंडळी ‘मी- माझं ऑफिस- माझं घर’ असं एकेरी आयुष्य जगत असतात. आय. टी.मधील स्वत:ची नोकरी सोडल्यास याच्या पलीकडे काही जग आहे, याची बहुतेकजणांना पुसटशी कल्पनादेखील नसते, हे मी स्वानुभवानं सांगतो. त्यामुळे ज्यांचे विविधांगी व्यक्तिमत्त्व नसते, अशा लोकांची मंदीच्या काळात खरी कसोटी असते. २००८ साली जी जागतिक मंदी आली त्यामुळे अनेक सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तोपर्यंत ‘कधीकाळी आय. टी.मधली माझी नोकरी गेली तर मी काय करू शकतो. किंवा शकते’, याचा यातल्या अनेकांनी कधी विचारच केला नव्हता. अशांना त्या वेळी प्रचंड नैराश्य आले होते. याउलट, ज्या लोकांना स्वत:चे असे छंद होते किंवा नोकरीव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात ज्यांचा संचार होता, अशा लोकांना नोकरी गेल्याचा धक्का पचवणे तुलनेने सोपे गेले.
आज विचाराल तर आय. टी. क्षेत्राच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडतोय. सभोवताली घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बदलांकडे जे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत त्यांचा येणाऱ्या काळात टिकाव लागणार आहे, हे उघड आहे. परंतु या बदलांबद्दल पूर्ण अनभिज्ञ असणारे लोकही बरेच आहेत. महिन्याच्या शेवटी पगार मिळतोय तोवर देशात कुठलीही समस्या येवो किंवा न येवो, त्यांना त्याचं सोयरसुतक नाही. उलट, मिळणारा पगार खर्चायचा कसा, हे योजण्यात ते दंग असतात. मात्र, अशा सपाट आणि गुळगुळीत आयुष्य जगणाऱ्या लोकांची ‘गोष्ट’ होत नाही. गोष्ट अशा लोकांची होते- जे समूहात राहून समूहापेक्षा वेगळा विचार करतात. आय. टी. क्षेत्रातील अशाच काही शिलेदारांच्या या गोष्टी! काहींनी आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे रूपांतर संधीत केले. काहींनी राजमार्गापासून दूर जात स्वत:ची पायवाट निर्माण करण्यात धन्यता मानली. काहींनी आय. टी. क्षेत्रात राहून स्वत:ची आवड जोपासली. काहींनी स्वत:च्या आवडीसाठी आय. टी. क्षेत्र सोडले; परंतु त्यात निभाव लागणार नाही, हे स्वीकारून ते पुन्हा आय. टी. क्षेत्रात आले. ही सर्व उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ही उदाहरणे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, आय. टी.च्या चाकोरीबद्ध आयुष्याच्या पलीकडे जे एक मोठ्ठे जग आहे, त्या जगाचा त्यांनी शोध घेतला. या व्यक्तींमध्ये तुम्हांला स्वत:ला शोधता येईल. वेळ काढून स्वत:ची आवड जोपासता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा