‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांच्या बहुआयामी उद्यमशीलतेबरोबरच एक संवेदनशील माणूस म्हणून असलेली त्यांची ओळख अधोरेखित करणारा लेख..
मुंबईतल्या उद्योगी माणसाला फार काळ बाहेर राहवत नाही. बाहेरच्या संथपणाचा कंटाळा येतो त्याला. तसंच जमशेटजींचं झालं नागपुरात. दोन-तीन वर्षांनी त्यांना नागपूरचा कंटाळा यायला लागला. त्यांना मुंबई खुणावू लागली होती. उद्योगविस्तार हे तर कारण होतंच; पण त्याखेरीजही मुंबईत बरंच काय काय सुरू होतं. जमशेटजींचे मित्र पिरोजशा मेहता शहराच्या आघाडीवर अनेक कार्यक्रम करीत होते. जनजागृतीबरोबर राजकीय जाग आणि जाणीव तयार करण्याचं कामही मेहता यांच्याकडून होत होतं. जमशेटजी त्यांना जाऊन मिळाले.
या माणसाला आपण जे काही करतोय त्याच्यापेक्षा अधिक काय करता येईल, असाच प्रश्न पडलेला असायचा. लोकांत राहायला त्यांना आवडायचं. पण साधनेसाठी एकांतही त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटायचा. सकाळी ठरलेल्या वेळी ते कार्यालयात जायचे म्हणजे जायचेच. दुपारी जेवायला घरी. जेवण सहकुटुंब. मग पुन्हा कार्यालय. येताना वेगवेगळय़ा क्लब्जना भेटी. त्याचं फार आकर्षण होतं त्यांना. पिरोजशांच्या साथीनं त्यांनी रिपन क्लब स्थापन केलेला होताच. पारशी जिमखानाही सुरू झाला तो जमशेटजींच्या उत्साही सहभागामुळेच. एलफिन्स्टन क्लब हीदेखील त्यांचीच निर्मिती. आलटूनपालटून रोज सायंकाळी ते या क्लब्जना भेटी द्यायचे. समविचारी पारशी मंडळींशी गप्पा मारायला त्यांना आवडायचं. पण या गप्पाही नवीन काही करता येईल का, याच्या. जगातल्या घडामोडींचे आपल्यावर होऊ घातलेले परिणाम यावरही साधकबाधक चर्चा व्हायची. रात्री घरी परतले की जेवण. हेही सगळय़ांच्या बरोबर. त्यांचं एकत्र कुटुंब होतं. मुलांबरोबर पुतणेही असायचे. एक बहीण अकाली विधवा झाली होती. तीही त्यांच्यासमवेत राहायची. हा सगळा गोतावळा जेवायला एकत्र असायचा. याच्या अभ्यासाचं विचार, त्याची चौकशी कर.. असं करत करत जेवण झालं की जमशेटजी आपल्या अभ्यासिकेत दाखल व्हायचे. ही त्यांची सगळ्यात आवडती जागा. हजार- दोन हजार पुस्तकं होती तिथे. जमशेटजींचं वाचन दांडगं होतं. वेगवेगळय़ा विषयांवर वाचायला त्यांना आवडायचंही. मग ते विषय ‘बागकाम ते बांधकाम’ असे काहीही असायचे. पुढचे दोन तास जमशेटजी एकटे वाचत बसलेले असायचे. त्यांच्याविषयी घरात सगळय़ांनाच अमाप आदर होता. बहिणींनाही त्यांनी आपल्या व्यवसायात भागीदार करून घेतलं होतं. थेट समभाग त्यांच्या नावावर करून दिले होते. या अशा सगळय़ांची काळजी घेण्याच्या सवयीमुळे जमशेटजींविषयी घरात सगळय़ांनाच कमालीचं ममत्व होतं.
आता त्यांचा थोरला मुलगा दोराब खांद्याला आला होता. हा शिकायला आधी इंग्लंडमध्ये केंट इथं आणि नंतर केंब्रिज इथं होता. पण त्यानं आता परत यावं, असं आजोबा नुसेरवानजी यांना वाटू लागलं. नाही म्हटलं तरी त्यांचंही वय झालंच होतं. १८७९ साली तो परत आला. पण म्हणून त्याला जमशेटजींनी लगेचच आपल्या हाताखाली घेतलं असं झालं नाही. मुंबईला आल्यावर धाकटा भाऊ रतन याच्याबरोबर तो इथल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात दाखल झाला. राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर एव्हाना नागपुरात एम्प्रेस जोरात सुरू झाली होती. तिथं त्याच्यासाठी जागा करणं अगदी सहज शक्य होतं. परंतु जमशेटजींनी तसं केलं नाही. त्याला काम करायला लावलं ‘बॉम्बे गॅझेट’ या वर्तमानपत्रात. पत्रकारितेत. दोन र्वष तिथं घासल्यावर त्याची रवानगी केली थेट पाँडिचेरीला. तिथं उच्च दर्जाचं फ्रेंच गिनी नावाचं कापड तयार व्हायचं. प्रचलित जाडय़ाभरडय़ा कापडापेक्षा फारच सुबक होतं ते. तेव्हा त्या कापडाची तिथं एखादी गिरणी काढता आली तर पाहावी असा जमशेटजींचा विचार होता. दोराब त्याच कामाला लागला. त्या नव्या गिरणीच्या परवान्यापासून जमिनीपर्यंत सर्व व्यवहार दोराबनंच पार पाडले. पण पुढे जमशेदजींनी तो प्रकल्प बासनात गुंडाळला. कारण तिकडे तसा कारखाना काढणं आर्थिकदृष्टय़ा तितकंसं शहाणपणाचं नव्हतं.
इकडे देशात स्वदेशीचे वारे जोरात वाहायला लागले होते. टाटांना ते लगेचच भावले. एकतर त्यात आव्हान होतं. आणि परत देशाचा विचार! कोणतंही आव्हान नाही असं झालं की जमशेटजींना चैनच पडायची नाही. एम्प्रेस मार्गी लागली आहे, मुलगा हाताशी आला आहे, अन्य प्रकल्पांचा विचार सुरू आहेच; आणि त्यात आता हे स्वदेशीचे वारे! जमशेटजींनी हे आव्हान आपलं मानलं आणि कामाला लागले. योगायोग असा की, त्याचवेळी मुंबईतल्या कुर्ला इथली ‘धरमसी’ नावाची गिरणी मालकांनी विकायला काढली. खड्डय़ात गेलेली ही गिरणी. त्यावेळी जवळपास ५५ लाखांची मालमत्ता या गिरणीच्या नावावर होती. पण ती चालेना. शेवटी लिलावात निघाली. जमशेटजींना सुगावा लागल्यावर त्यांनी बोली लावली आणि अवघ्या साडेबारा लाखांत ही गिरणी त्यांनी पदरात पाडून घेतली. पण नंतर लगेचच जमशेटजींची डोकेदुखी सुरू झाली. गिरणी इतकी डफ्फड होती, की एक जमीन सोडली तर तिचं सगळं काही बदलावं लागत होतं. पण जमशेटजींचं कौतुक असं, की त्यासाठी त्यांनी सगळी जुनीच यंत्रसामग्री घ्यायचा निर्णय घेतला. वास्तविक त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना वेडय़ात काढलं. जमशेटजी नेहमीसारखेच ठाम होते. गिरणीची जवळपास दीड लाख चौ. मीटरची जागा होती. १३०० माग होते. लाखभर स्पिंडल्स होते. तेव्हा हे सगळं सुरळीत सुरू झालं की ही गिरणीही फायद्यात येईल, हा ठाम विश्वास होता जमशेटजींना. पण या विश्वासाची जणू कसोटीच पाहिली जात होती. ही गिरणी काही लवकर मार्गी लागेना. खर्च तर वाढत चाललेला. त्यात चीनने जमशेटजींची एक ऑर्डरच रद्द केली. झालं! मुंबईत एकदम पळापळ झाली. ‘टाटा’ नाव एकदम संकटात आलं. ते वाचवायचं तर पुन्हा एकदा मोठं भांडवल उभारण्याची गरज होती. जमशेटजी बँकेकडे गेले. तोपर्यंत टाटा संकटात असल्याची चर्चा सुरू झाली होती. बँकेनं जमशेटजींना पतपुरवठा नाकारला. प्रश्न ‘टाटा’ या नावाच्या इभ्रतीचा होता. जमशेटजींनी वेळ दवडला नाही. त्यांनी आपल्या आडनावाचा एक ट्रस्ट बनवला आणि तो तारण ठेवून पैसे उभे करता येतील का, याची चाचपणी केली. बँकांनी त्यालाही नकार दिला. तेव्हा जमशेटजींनी तो ट्रस्ट मोडला आणि वैयक्तिक मालकीचे समभाग विकून पैसा उभा केला. नागपुरातल्या एम्प्रेसमधून आपली तयारीची माणसं आणली. त्यांच्या हाती ही नवी गिरणी दिली. कामगार मिळेनात. तर त्यांनी थेट वायव्य सरहद्द प्रांताच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याला कळवलं- ‘जरा तगडे पठाण पाठवून दे मुंबईला कामाला.’ त्यानेही ते पाठवले.
पुढे ‘स्वदेशी’ नावाने ओळखली गेलेली गिरणी ती हीच. लहानपणी जन्माला येताना एखादं बाळ अगदीच अशक्त असावं आणि पुढे मोठं झाल्यावर त्याचा ‘हिंदकेसरी’ व्हावा तसं या ‘स्वदेशी’चं झालं. अगदी अलीकडेपर्यंत स्वदेशी गिरणी ही टाटा समूहातला महत्त्वाचा उद्योग होता. पण या स्वदेशीला वाचवताना जमशेटजींची चांगलीच दगदग झाली होती. त्यातून थकवा आला होता त्यांना. शिवाय विo्रांती कशी असते, तेही माहीत नाही. त्यामुळे त्यांनी या अशक्तपणाकडे दुर्लक्षच केलं. तर तो इतका वाढला, की एकदा नागपुरात एम्प्रेसच्या आवारातच ते कोसळले. तेव्हापासून नाही म्हटलं तरी जमशेटजी जरा प्रकृतीनं अशक्तच झाले. तशात सतत धावपळ त्यांच्या पाचवीला पुजलेली. इकडे महाराष्ट्रात पाचगणीला त्यांनी जागा घेऊन ठेवलेली. पारशी मंडळांना आरोग्य केंद्र उभारायचं होतं तिथं. ते पाहायला गेल्यावर पुढच्या काही वर्षांत पाचगणीला अतोनात महत्त्व येणार, याचा अंदाज त्यांना आला. मोठय़ा प्रमाणावर त्यांनी जागा घेऊन ठेवल्या. सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी जागा घेतल्या की त्याचं काय करायचं असतं, याचे काही आडाखे अलीकडच्या काळात मांडले गेलेत. म्हणजे हॉटेलं वगैरे उभारायची, जागा भाडय़ानं द्यायचा उद्योग सुरू करायचा, वगैरे. असला फुसका विचार त्यांनी कधीच केला नाही. जमशेटजी जग हिंडलेले. या ठिकाणासारखं हवामान कुठे आहे, तिथं काय काय पिकतं, याचा सगळा आलेख त्यांच्या डोक्यात तयारच होता. हे उद्योगाचं भान कायमच त्यांच्या डोक्यात असायचं. म्हणजे इजिप्तसारखं हवामान आताच्या पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे, तेव्हा इजिप्तसारखा उत्तम दर्जाचा कापूस तिथे पिकेल असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी हजारभर शेतकरी तयार केले. त्यांना स्वत:च्या खर्चानं इजिप्शियन कॉटनची उत्तम रोपं दिली. त्यांना त्याची उस्तवारी कशी काय करायची याची माहिती दिली. दुर्दैवानं फारसं काही यश आलं नाही त्यांना त्या प्रयोगात. तरीही पाचगणीला असंच काहीतरी करून बघायचा त्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. या झकास डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी, कॉफी उत्तम होईल याबद्दल त्यांना जराही संशय नव्हता. त्यासाठी स्ट्रॉबेरीची, कॉफीची रोपं वगैरे घेऊन त्यांनी बऱ्याच फेऱ्या मारल्या पाचगणीला. या परिसरात जाणं हा आता आनंदाचा भाग झाला आहे. त्याकाळी तसा तो नव्हता. म्हणजे अफझलखानाइतकी नाही, तरी बरीच उरस्फोड केल्याशिवाय तिकडे जाता यायचं नाही. मुळात रेल्वे आतासारखी सातारा-कोल्हापूपर्यंत नव्हती. पहिली गाडी होती ती फक्त पुण्यापर्यंत. तीसुद्धा दुपारी. ती रात्री नवाच्या आसपास पुण्याला पोचायची. मग दुसरी गाडी. ती पकडायची. वाठारला उतरायचं. मध्यरात्री. रात्र तिथेच स्थानकावर घालवायची. किंवा त्यातल्या त्यात बरं हॉटेल वगैरे मिळतंय का, ते पाहायचं. मग पहाट झाली की टांगा. २८ किलोमीटरचा तो घाट चढायला पाच तास लागायचे. चढावर घोडय़ाच्या दोन जोडय़ा घ्यायला लागायच्या. एकाच्या तोंडाला फेस आला की दुसरी जोडी. असं सव्यापसव्य करीत पाचगणीला जायला दुपार उजाडायची. तरीही जमशेटजी उत्साहानं जमेल तेव्हा जायचे. या माणसाला इतकं पुढचं दिसायचं, की एकदा का रस्ते बनले की या भागाचा कायापालट होणार याची त्यांना पक्की खात्री होती. त्या काळात जमशेटजींनी या भागात येण्यासाठी मोटारही घेऊन ठेवली होती. मुंबईतली ती पहिली मोटार. पाचगणीला जमशेटजींचे दोन बंगले होते. एक ‘दलकेथ होम’ नावाचा. आणि दुसरा ‘बेल एअर’! पहिल्यात आता आजाऱ्यांसाठी निवारा आहे, तर दुसऱ्यात रुग्णालय. जवळपास ४३ एकराची मालमत्ता होती त्यांची. ही टाटा मंडळी इतकी दानात पुढे, की नंतर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी ती सगळी रिकामी जागा देऊन टाकली. पण दरम्यान त्यांचा कॉफीचा प्रयोग काही यशस्वी झाला नाही. स्ट्रॉबेरी रुजली. कॉफीसाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. तेवढा तो काही त्यावेळी त्यांच्याकडे नव्हता. दरम्यानच्या त्यांच्या जगप्रवासात त्यांना आणखी एक जाणवलेलं होतं. ते म्हणजे फ्रान्समधल्या काही भागातलं हवापाणी आपल्या बंगलोर-म्हैसूरसारखंच आहे. त्यामुळे फ्रान्समधून त्यांनी रेशमाचे किडे आणले होते. त्यांच्या साह्य़ानं रेशीम लागवडीचा प्रयोगही सुरू होता त्यांचा. पुन्हा त्यासाठी त्यांनी बंगलोर, म्हैसूर वगैरे परिसरात मोठय़ा जागा घेऊन ठेवल्या होत्या. तिथे त्यांनी शेतकऱ्यांना रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. खरं म्हणजे भारतातही पूर्वी रेशीम लागवड चांगली होत होतीच, पण मधल्या पारतंत्र्याच्या काळात ती कला मारली गेली असावी. तिचं पुनरुज्जीवन करण्याचा चंगच जमशेटजींनी बांधला. अशा कामासाठी त्यांना कमालीचा उत्साह असायचा. त्याच उत्साहाच्या भरात जमशेटजींनी रेशीम लागवडीतल्या तज्ज्ञ मंडळींना थेट जपानहून पाचारण केलं. त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था केली आणि त्यांच्याकडून तिथल्या स्थानिकांना रेशीम लागवडीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांनी दिलं. या सगळय़ात त्यांचं द्रष्टेपण इतकं, की त्यांनी त्यासाठी चक्क एक संस्थाच स्थापन केली. ‘टाटा सिल्क फार्म क्रॉसरोड्स’ नावाची. वास्तविक त्यावेळी उत्तर भारतात मोरादाबादच्या आसपास रेशीम पैदास होत होती. जमशेटजी अर्थातच तिकडेही गेले होते. पण त्या रेशमाला झळाळी नाही असं त्यांचं मत होतं. त्यामुळे उत्तम प्रतीचे रेशीमकिडे त्यांनी परदेशातून आणवले आणि म्हैसूर परिसरातल्या शेतकऱ्यांना त्यातून उत्तम रोजगाराचं साधन मिळवून दिलं.
आज हा सगळा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय. उत्तम रेशमी साडय़ा म्हणजे म्हैसूर-बंगलोरच्या हे समीकरण बनलंय. पण अनेकांना माहीतही नसेल की, हे सगळं झालं त्याच्या मुळाशी जमशेटजींचा रेशीमस्पर्श आहे ते.
तिकडे मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्य़ात इटलीतल्या व्हेनिसच्या धर्तीवर सुंदर, घाटदार शहर वसवता येईल असं त्यांच्या लक्षात आलं. जमशेटजी मुंबईत राहायचे मलबार हिलवर; पण आसपास खूप हिंडायचे. जुहू हे तेव्हा खोत कुटुंबाची वाडी होती. त्या गावात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं नवरोजी जमशेटजी वाडिया यांना मोठय़ा प्रमाणावर जमीन आंदण दिलेली होती. जुहू, पार्ला, मढ बेट आदी परिसरात त्यांनी मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. तीन रुपये प्रति चौरस फूट असा दर होता त्यावेळी. त्यावेळच्या मानाने भलताच महाग. तरीही जमशेटजींनी मोठी गुंतवणूक केली जमिनींत. मुंबईची वेस शीवपर्यंत होती. जमशेटजींची नजर त्याही पलीकडच्या परिसरावर गेली. या परिसरात पूर्वेकडचं व्हेनिस उभारता येईल अशी खात्रीच पटली त्यांची. ठाण्यातून बाहेर पडणारा घोडबंदर रस्ता पश्चिम महामार्गाला जिथे मिळतो तिथपासून मुंबईच्या वांद्रा, जुहू तारा बंदर, अंधेरी- वसरेवा परिसरापर्यंत हे नवं शहर वसवायची त्यांची कल्पना होती. या सगळय़ा परिसराला समुद्राचा किनारा आहे. भरतीच्या वेळी तिथून पाणी आत येऊ द्यायचं. त्यासाठी दोन भलेमोठे बंधाऱ्यांचे धरण-दरवाजे उभारायचे. पाणी अडवायचं आणि मधल्या जमिनींचा शिस्तबद्ध विकास करून छान शहर वसवायचं अशी ही रम्य योजना होती. त्यासाठी जवळपास १२०० एकर जमीन लागणार होती. ती मिळावी यासाठी जमशेटजींनी प्रयत्नही सुरू केले. या जमिनींतला बराचसा मोठा भाग ठाणे जिल्ह्य़ात येतो. कोणी ओर नावाचे ब्रिटिश अधिकारी ठाण्याचे जिल्हाधिकारी होते त्यावेळी. जमशेटजींनी आपल्या स्वप्नाची समग्र योजना तयार करून ती ओरसाहेबांना सादर केली. साहेब इतका प्रभावित झाला, की त्याला इकडे व्हेनिस झाल्याचं स्वप्न पडायला लागलं. त्यानं उत्साहानं टाटांना साथ द्यायला सुरुवात केली. परंतु पुढे या स्वप्नात पारशी माशीच शिंकली. झालं असं, की यातल्या बऱ्याच जमिनी वाडिया यांच्या मालकीच्या होत्या. त्यामुळे ओर टाटांना म्हणाले, वाडिया यांची त्यासाठी परवानगी घ्या. जमशेटजी जाऊन भेटले अर्देशीर वाडिया यांना. पण गडी ऐकायलाच तयार होईना. जमशेटजींनी ती जमीन विकत घ्यायची तयारी दाखवली. पण हा किती दर हवा, तेही सांगेना. हा इतका अडून बसलाय म्हटल्यावर ओरसाहेबही चिडले. तेही वाडिया यांना भेटायला गेले. ‘जमीन तुझ्या इनामाची आहे हे मान्य; पण किती आहे, ते तरी सांग. कागदपत्रं दाखव..’ म्हणाले त्याला. तर त्यानं ती मागणीही धुडकावली. मग ओरसाहेबांनी शासकीय आदेशच काढला- जमिनीची पाहणी करण्याचा. त्याचवेळी कलकत्त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयाशी संपर्क साधून या जमिनीची सर्व मूळ कागदपत्रं मागवून घेतली त्यांनी. आज हे सगळं सहज वाचून होत असलं तरी या सगळय़ा उपद्व्यापात त्यावेळी किती वेळ गेला असेल याचा अंदाजच केलेला बरा. या सगळय़ा विलंबात हे प्रकरण बारगळलं ते बारगळलंच.
जमशेटजींचं मन हे सुपीक कल्पनांचं बन होतं. ठाण्यात व्हेनिस निर्माण करायचं जमतंय- न जमतंय तोवर जमशेटजींनी माहीम परिसरात भराव घालून जमिनीवर अशीच- पण आकारानं लहान नगर वसवण्याची कल्पना मांडली. त्यातही बराच काळ गेला. त्यामुळे तीही बारगळली. तेव्हा या परिसरात खोताच्या इनामाच्या जमिनीवर मोठमोठे गोठे होते. जमशेटजींच्या लक्षात आलं- मुंबई वाढत जाणार आणि त्यावेळी या गोठय़ांतल्या म्हशींना शहराचा आणि शहराला म्हशींचा त्रास होणार. तेव्हा मग जमशेटजींनी म्हशींचा शास्त्रीय विचार सुरू केला. त्यांची चांगल्या पद्धतीनं पैदास कशी करता येईल, त्यासाठी कुठलं वाण कुठून आणावं, त्यांच्यासाठी चांगला चारा कुठे पिकवता येईल.. वगैरे बाबतीत जमशेटजींनी डोकं घातलं. त्यांना लक्षात आलं की, मुंबईच्या पश्चिमेकडनं ते पार आणिक आणि कुल्र्यापर्यंतच्या जमिनीतलं गवत खाऊन म्हशींच्या दुधात वाढ होते. खाऱ्या गवताचा तो परिणाम. मग त्यांनी सरकारकडेच हजारभर एकर जमीन चाऱ्यासाठी आणि गोठे उभारण्यासाठी मागितली. पण सरकार ढिम्म. हलेचना. तेव्हा न राहवून जमशेटजी थेट गव्हर्नरलाच भेटायला गेले. म्हणाले, ‘माझं मान्य नसेल तर बाजूला ठेवा. पण तुमचं काय ते बोला.’ सरकार असं काही लगेच बोलत नाही, हे जमशेटजींना त्यावेळी उमगायचं होतं. तो प्रकल्पही बारगळला. पण गोठे मुंबईच्या बाहेर गेले. आजही गोरेगाव, जोगेश्वरी वगैरे परिसरात हे गोठे मोठय़ा संख्येने आहेत. मुंबईला दूधपुरवठा करताहेत. कोणाला माहितीये हे गोठे असे एकगठ्ठा उभे राहिले ते जमशेटजींच्या प्रयत्नामुळे!
हे सगळं सुरू असताना पोलाद काही त्यांच्या डोक्यातून गेलं नव्हतं. लंडनला असताना थॉमस कार्लाइलनं दिलेला सल्ला त्यांच्या डोक्यात होताच. एव्हाना जमशेटजी चाळीशी पार करून गेले होते. वयानुसार आलेली स्थिरता आणि शहाणपण या दोन्हीचा पुरेसा संचय त्यांच्याकडे झालेला होता. त्यातच १८८२ च्या सुमारास त्यांच्या वाचनात एक अहवाल आला. जर्मन भूगर्भशास्त्रज्ञाचा. रिटर वॉन श्वाट्झ नावाच्या या शास्त्रज्ञानं आपल्या अहवालात नमूद केलं होतं की, मध्य प्रांतातल्या चांदा जिल्हय़ात जमिनीखाली भारतातली सगळय़ात o्रीमंत खनिजसंपत्ती दडलेली आहे. तो हातात आला आणि जमशेटजी मोहरूनच गेले. त्यांचा आनंद अधिकच वाढण्याचं कारण म्हणजे एकतर श्वाट्झ म्हणत होता ते ठिकाण नागपूरपासून अगदीच जवळ होतं. शेजारीच असलेल्या वरोरा इथंही भूगर्भात कोळसा असल्याचा पुरावा हाती लागला होता. तिथेही त्यांना लगेच काम सुरू करता येणार होतं. जमशेटजींना खात्री झाली की हीच संधी आहे. ते या क्षेत्रात नवीन काही करण्यासाठी इतके अधीर होते, की त्यांनी लगेचच वरोरा आणि परिसरात उत्खनन केलं आणि त्या मातीत किती आणि काय आहे, याची माहिती घेण्यासाठी तो माल थेट जर्मनीतच पाठवून दिला. जमशेटजींच्या आणि अर्थातच भारताच्याही दुर्दैवानं तिथल्या कोळशात आग फार नव्हती. जर्मनीहून तसा अहवाल आला. दरम्यानच्या काळात कोळशाचं खाणकाम आपल्याला करायचंच आहे या विचारानं जमशेटजींनी सर्व तयारी चालू केली होती. परवाने वगैरे. पण गाडी तिकडेही अडली. कारण सरकारचे खाणकामावरचे र्निबध इतके जाचक होते, की त्यातून उद्योग उभा राहणं शक्य नव्हतं.
पण तरीही जमशेटजींचा पोलादाचा ध्यास काही सुटला नाही. त्यानंतर जवळपास १७ वषर्ं हा माणूस भारतात जिकडे जाईल तिकडे काही खनिजं आहेत का जमिनीत, ते पाहायचा. त्यांचे नमुने गोळा करायचा आणि त्यांची पाहणी करून घ्यायचा. यातूनच त्यांचा स्वत:चा असा खनिज नमुनासंग्रह तयार झाला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल अशी परिस्थिती १८९९ साली तयार झाली. व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी खाण धोरण जरा शिथिल केलं आणि त्यामुळे जमशेटजींच्या पोलाद स्वप्नांना पुन्हा पंख फुटले. त्याच वर्षी मेजर आर. एच. मेहॉन यांनी भारतात खनिजाची उपलब्धता आणि पोलाद कारखानानिर्मिती याबाबतचा अहवाल सादर केला. तो वाचला आणि जमशेटजी थेट लंडनलाच गेले.. भारतमंत्री लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांना भेटायला. लॉर्ड हॅमिल्टन द्रष्टे होते. त्यांना टाटा यांच्याविषयी आदर होता. त्यांनी जमशेटजींना ताबडतोब भेटीची वेळ दिली. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. टाटा म्हणाले, ‘माझं तरुणपणापासून एक स्वप्न आहे- पोलादाचा कारखाना काढण्याचं. आता मी साठीला आलोय आणि ते स्वप्न अधिकच गहिरं झालंय. माझ्या बाकीच्या सगळय़ा गरजा आता भागल्यात. आता इच्छा आहे ती देशाला पोलादाचा कारखाना देण्याची. ती पूर्ण करण्यासाठी सरकार मला मदत करेल का?’ लॉर्ड हॅमिल्टन हे ऐकून खूपच प्रभावित झाले. त्यांनी लगेचच पत्र लिहिलं- भारतात लॉर्ड कर्झन यांना. टाटा यांना पोलाद कारखाना काढण्यासाठी हवी ती मदत जलदगतीनं देण्याच्या सूचना लॉर्ड हॅमिल्टन यांनी भारतातील कार्यालयाला दिल्या. त्यापाठोपाठ जमशेटजींनीही आपल्या मुंबई कार्यालयाला परवाने वगैरे मिळवण्यासाठी लगेचच प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि ते तिथूनच गेले अमेरिकेला.
कशासाठी? तर त्यांना महत्त्वाचे पोलाद कारखाने पाहायचे होते आणि या क्षेत्रातल्या उत्तम तंत्रज्ञांशी चर्चा करायची होती. ते अलाबामाला गेले, पिट्सबर्गला गेले, क्लेव्हलंडला गेले. जगातली सर्वात मोठी खनिज बाजारपेठ त्यावेळी क्लेव्हलंडला होती. तिथे ते खनिज संशोधक आणि तंत्रज्ञ ज्युलियन केनेडी यांना भेटले. केनेडी जरा आढय़तेखोर असावा बहुधा. तो टाटांना म्हणाला, ‘तुम्हाला परवडणार नाही. पोलादाचा कारखाना उभा राहील की नाही याची पाहणीच इतकी खर्चिक असते, की ती झेपणार नाही तुम्हाला.’ टाटांच्या वयाकडे पाहूनही त्याला जरा शंका आली असणार. पण टाटा त्याबाबत ठाम होते. ‘कितीही खर्च आला तरी आपण हा कारखाना उभारणारच. वेळ पडली तर आहे ते विकून आपण पैसा उभा करू,’ असं त्यांनी ठणकावल्यावर केनेडी यांनी चार्लस पेज पेरीन यांचं नाव सुचवलं. पेरीन हे या क्षेत्रातलं नावाजलेलं नाव होतं. ‘त्यांच्याकडून एकदा ‘हो’ आलं की आपण कारखाना उभारायला लागू या,’ केनेडी म्हणाले. त्यांनी एक पत्रही दिलं पेरीन यांना.
टाटा स्वत: मग पेरीन यांना भेटायला गेले. ते थेट त्याच्या कार्यालयातच धडकले. त्याच्या दालनाच्या दरवाजावर पूर्वी असायचे तसे अर्धे उघडणारे दरवाजे होते. टाटा ते उघडून आत गेले. समोर एकच व्यक्ती होती. टाटांनी विचारलं, ‘तुम्ही पेरीन ना?’ त्यांनी होकारार्थी मान हलवल्यावर टाटा म्हणाले, ‘मग माझा हव्या त्या व्यक्तीचा शोध संपला आहे असं मी मानतो. तुम्हाला केनेडी यांनी लिहिलं आहेच. तर मी भारतात पोलाद कारखाना उभारावा म्हणतो. त्यासाठी माझे प्रकल्प सल्लागार म्हणून मला तुम्हीच हवे आहात. खर्चाची काळजी करू नका. हा कारखाना उभा करणं हे आपलं ध्येय आहे एवढं लक्षात ठेवा. माझ्याबरोबरच चला तुम्ही भारतात. आहे ना तुमची तयारी त्यासाठी?’ पेरीन बघतच राहिले. त्यांना कळेचना- हा थकलेला वृद्ध गृहस्थ इतक्या आत्मविश्वासानं कसं काय बोलू शकतोय! त्यांना वाटत होतं- सांगावं जमणार नाही म्हणून. पण टाटांच्या डोळय़ाला डोळे भिडवून पाहायला लागल्यावर पेरीन यांना कळलं, की या माणसात भारावून जावं असं काहीतरी आहे. ते इतके प्रभावित झाले टाटा यांच्या वागण्यानं, की नकळतपणे ते लगेच ‘हो’च म्हणाले त्यांना भारतात येण्यासाठी.
पेरीन यांनी भारतात येण्याची तयारी सुरू केली. त्याआधी त्यांनी आपला मदतनीस भूगर्भशास्त्रज्ञ सी. एम. वेल्ड याला भारतात पाठवलं. तो येई-येईपर्यंत १९०४ साल उजाडलं. जमशेटजींचा थोरला मुलगा दोराब आणि पुतण्या शापूरजी सकलातवाला आणि वेल्ड हे तिघे उत्खननाच्या मोहिमेवर निघाले. चांदा जिल्हय़ात. हा परिसर किर्र जंगलाचा. साहेब शिकारीला यायचा तिकडे. म्हणजे कल्पना करा- कसं वातावरण असेल, त्याची. पण या तिघांना जमिनीवरच्या शिकारीत रस नव्हता. जमिनीखाली काय आहे, ते पाहायचं होतं त्यांना. कमालीच्या हालअपेष्टा सहन करत त्यांची यात्रा सुरू होती. कधी बैलगाडी, कधी आणखी काही.. आणि बऱ्याचदा चालत. आसपास कुठे पाणी आहे का, याचीही पाहणी ते करायचे. वेल्ड हा मोठा शिस्तीचा माणूस होता. शारीरिक कष्ट पडताहेत म्हणून अंगचोरी करायचं त्याच्या स्वभावातच नव्हतं. तो अगदी पद्धतशीरपणे जमिनीचे नमुने गोळा करायचा. मातीचं पृथ्थकरण करायचा. पण त्याचे निष्कर्ष मात्र सगळेच नकारात्मक निघाले. पोलादाचा अंश होता मातीत तिथल्या; पण व्यावसायिक पातळीवर कारखाना उभा करता येईल इतकं काही सत्व त्या मातीत नव्हतं. त्यानं तसा अहवाल दिला टाटांना. म्हणाला, ‘यात काही अर्थ नाही. इतक्या किरकोळ खनिजावर काही कारखाना उभा राहणार नाही. मी आपला जातो परत.’ ते ऐकून टाटा अर्थातच निराश झाले. पण नाउमेद मात्र झाले नाहीत. ते म्हणाले, ‘आलाच आहात भारतात तर जरा राहा आणखी चार दिवस. हे चांदा जिल्हय़ातलं जाऊ द्या.. आपण इतरत्र पाहू काही मिळतंय का!’ जमशेटजींचा आग्रह त्याला मोडवेना. तो राहिला.
इकडे दोराब कळवायला गेला चांदा जिल्हय़ाच्या आयुक्तांना, की आम्ही इथलं उत्खनन थांबवतोय म्हणून. आयुक्त बैठकीत व्यग्र होते. म्हणून दोराब बाहेर त्यांच्या कार्यालयात येरझारा घालत होता. त्यावेळी त्याचं सहज लक्ष गेलं. समोरच्या भिंतीवर नकाशा होता. जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाचा. भारताच्या भूमीत कुठे काय दडलंय, हे सांगणारा. दोराब उभा होता त्याच्या जवळच एका ठिकाणाभोवती काळी काळी वर्तुळं होती. दोराबचे डोळे विस्फारले. काळी वर्तुळं जमिनीखालचं लोहखनिज दाखवतात, हे दोराबला जाणवलं. तो जवळ जाऊन पाहायला लागला. ती जागा नागपूरपासून फार लांब नव्हती. १४० मैल फक्त. तिथे जमिनीत लोहखनिज दिसत होतं. दोराब खूश झाला. त्यानं लगेच वेल्ड आणि वडील जमशेटजींना जाऊन ते सांगितलं. दोघेही लगेच निघाले. दुर्ग जिल्हय़ात ही जागा होती. टेकडीवर हे दोघे चढत होते तेव्हा बूट धातूवर आपटल्यावर जसा आवाज येईल तसा आवाज येत होता. म्हणजे जमिनीत मोठय़ा प्रमाणावर लोहखनिज आहे, हे कळत होतं. वेल्ड यानं लगेचच मातीचं विश्लेषण केलं. ६४ टक्के खनिज होतं मातीत. पण कारखाना उभा करायचा त्यावर आधारीत; तर जवळ पाण्याचा चांगला साठा हवा होता. तो काही जवळपास सापडेना. त्यामुळे पुन्हा निराश व्हायची वेळ आली सगळय़ांवर. पाणीसाठी सापडला. पण जरा लांब. त्यांनी त्यामुळे तिथे कारखाना उभारण्याचा निर्णय सोडून दिला. आणखीन एक निराशा. पण त्यांचे प्रयत्न अगदीच काही वाया गेले नाहीत. पन्नास वर्षांनंतर ती जागा पोलाद कारखान्यासाठी ओळखली जायला लागली. आज आपण भिलाई नावानं ओळखतो, ती ही जागा!

‘प्रिय दोराब…
माझ्या प्रतिक्रियेवर तू रागावल्याचं मला जाणवलं. तुला राग येईल असं बोलल्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. तुला दुखावणं हा माझा उद्देश नव्हता. पण लक्षात घे- आपल्याला हे हॉटेल सर्वागसुंदर करायचं आहे. खरं तर मला माहितीये- सौंदर्याच्या कल्पना या भिन्न असतात. युरोपियन मंडळी ब्रिटिशांच्या सौंदर्यकल्पनांना हसतात. आणि अमेरिकनांना जे सुंदर वाटतं त्यावर हे दोघं नाकं मुरडतात. पण या सगळय़ातलं चांगलं काय आहे ते आपल्याला घ्यायचंय. अमेरिकी पद्धतीच्या विटांचा सांगाडा दाखवणाऱ्या भिंती मुदपाकखान्यात चालतील, पण शयनगृहात त्या डोळय़ांना टोचतील. आतमध्ये सौम्य, सुखद रंगसंगती असायला हवी. बटबटीत पिवळा आणि टोचऱ्या लाल रंगांना तू हातभर लांब ठेवशील याची मला खात्रीच आहे. मला हे माहितीये की, सर्वाना मान्य होईल असं सौंदर्य समीकरण कुठेच असू शकत नाही. पण आपण आपल्या ग्राहकांना काय हवं असेल आणि आवडेल, याचा विचार करून अंतर्गत सजावट करायला हवी. तू तेच करशील याची मला खात्री आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याच आवडीनिवडीत बांधलं गेलेलं आपलं मन मुक्त करून तू सजावटीचा विचार करावास.. आणि हो, तुझ्या आवडीनिवडीवर माझा अविश्वास आहे या भावनेलाही तू सोडचिठ्ठी देशील अशी मला खात्री आहे.
तुझा-
जमशेटजी

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

प्रयत्नांत सातत्य असलं की योगही जुळून येतात. जमशेटजींना त्याबाबत खात्री होतीच. दुर्गचा प्रकल्प सोडून द्यायची वेळ आली असतानाच त्यांना एक पत्र आलं. भूगर्भशास्त्रज्ञ पी. एन. बोस यांचं. बोस यांनी दुर्ग जिल्हय़ात आधी काम केलं होतं. तिथल्या लोहखनिजाचा तपशीलवार अभ्यास त्यांनी आधीच केला होता. पण पत्र त्याबाबत नव्हतं. हे बोस त्यावेळी मयुरभंज संस्थानिकासाठी काम करत होते. मयुरभंज होतं त्यावेळच्या बंगाल प्रांतात. या प्रांतातही मोठे खनिज साठे असल्याचं बोस यांचं म्हणणं होतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्थानात त्यावर आधारीत पोलाद कारखाना कोणीतरी काढावा अशी फार इच्छा होती त्यांची. बोस यांनी हे सगळं जमशेटजींना कळवलं. मग हे सगळं पथक रवाना झालं 

मयुरभंजला. o्रीनिवास राव हे शास्त्रज्ञही तोपर्यंत त्यांना येऊन मिळाले होते. सर्वानी खनिजशोधाच्या कामाला जुंपून घेतलं.
परिसर घनदाट जंगलाचा. हत्तींचे कळपच्या कळप मुक्तपणाने हिंडत. जंगलात वावर या हत्ती आणि संथाल आदिवासींचा. त्या परिसरात उत्तम प्रतीचं लोहखनिज होतं. एके ठिकाणी हे सर्व खणत होते. काही फुटांवर गेले आणि फावडं एखादय़ा धातूच्या भांडय़ावर आपटावं असा टणत्कार झाला. सर्वानी चमकून एकमेकांकडे पाहिलं. जाणवलं- आपल्या हाती मोठं घबाड लागतंय. खरोखरच ते घबाड होतं. वेल्डनं मातीचं विश्लेषण केलं. ६० टक्के लोहखनिज. साठा साधारण साडेतीन कोटी टन इतका. म्हणजे उत्तमच.
आता प्रश्न होता पाण्याचा. हे सगळे आसपास हिंडत राहिले पाणी कुठे आहे, ते पाहायला. थोडं हिंडल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. चक्क दोन-दोन नदय़ा परिसरातून वाहत होत्या. आणि जवळच एक रेल्वेस्थानकही होतं. कालीमाती. हे सगळं इतकं काही जुळून आलंय, हे पाहिल्यावर सगळय़ांनी लहान मुलांसारख्या एकमेकांना मिठय़ा मारल्या.
भारतात पोलाद उद्योगाच्या जन्माचा तो शुभशकुन होता.
आपल्या प्रयत्नांना यश येणारच, याबाबत जमशेटजींच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. प्रश्न फक्त आज की उद्या, एवढाच होता. आणि जमशेटजींची अगदी परवापर्यंतदेखील थांबण्याची तयारी होती. आपलं पोलाद कारखान्याचं स्वप्न साकार होणारच होणार याची इतकी खात्री त्यांना होती, की हे स्वप्न साकार व्हायच्या आधी तब्बल पाच र्वष त्यांनी दोराबला एक पत्र लिहून पोलाद कारखान्याचं गाव कसं असायला हवं, याच्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. ‘ज्या गावात आपला कारखाना उभा राहणार आहे त्या गावातले रस्ते आधीच अधिक रूंद बांधून घे. ते मजबूतही असायला हवेत. खनिज वाहून नेणाऱ्या मालमोटारींची वाहतूक या गावात अधिक असेल. तेव्हा रस्ते या वजनदार वाहतुकीसाठी सज्ज हवेत. आणि या रस्त्यांच्या कडेला गर्द सावली देणारी झाडं मोठय़ा प्रमाणावर लाव. ती पटकन् वाढणारी हवीत. पोलाद कारखान्याच्या गावात उष्णता जास्त असते. तेव्हा नागरिकांच्या त्रासाचा आपण आधीच विचार करायला हवा. फक्त हिरवळीची अशी मोठमोठी मैदानंही या गावात राहतील याची काळजी घे. फुटबॉल, हॉकी यांसारखे मैदानी खेळ पोरांना खेळता यायला हवेत इतकी मोठी मैदानं या गावात हवीत. आणि मुख्य म्हणजे मशिदी, चर्च आणि मंदिरही या गावात चांगल्या प्रकारे बांध.’
जमशेटजींनी इतक्या बारीकसारीक सूचना देऊन ठेवल्या होत्या संभाव्य पोलाद कारखान्यासाठी, की त्यांचा दृष्टिकोन तर त्यातून कळतोच; पण त्या सूचना वाचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचीच आठवण यावी. आपल्या सैनिकांनी रयतेशी कसं वागावं, याच्या शिवाजी महाराजांनी दिलेल्या सूचना आणि आपण कारखाना कसा उभारावा, याच्या जमशेटजींनी दिलेल्या सूचना यांतून दोघांनाही जनकल्याणाची किती प्रामाणिक आच होती, हेच दाखवून देतात.
हे असं पोलादी स्वप्न एकीकडे. तर त्याचवेळी आणखीही बरंच काय काय.. त्यावेळी मुंबईत प्लेगनं थैमान घातलेलं होतं. जमशेटजी जगभर हिंडणारा माणूस. त्यामुळे अशावेळी काय करायचं, याबाबत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झालेला होता. त्यांनी आपल्या घरी आणि कार्यालयात एका रशियन डॉक्टरलाच पाचारण केलं. लशीकरणासाठी. त्या डॉक्टरचं नाव- हाफकिन. आज मुंबईत ज्याच्या नावानं देशातलं एक महत्त्वाचं आरोग्य संशोधन केंद्र उभं आहे त्या हाफकिन केंद्राचा जनक हाच. याच काळात मुंबईत जमशेटजींना लक्षात आलं होतं की, मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढतोय. मुंबईत उच्चभ्रूंचे दोन वर्ग होते त्यावेळी. बडा साहेब आणि छोटा साहेब. या सगळय़ांसाठी हॉटेलं होती फक्त तीन. काळाघोडा इथलं एस्प्लनेड मॅन्शन हे जरा कमी प्रतीचं. त्यामुळे भारतीयांसाठीचं असं. दुसरी दोन होती- गेट्र वेस्टर्न आणि अपोलो हॉटेल नावाची. साहेब लोक तिकडे जायचे. पण त्यांच्याही खोल्या लहान, कोंदट अशाच होत्या. शिवाय डास मुबलक. त्यामुळे आपण एक उत्तम प्रतीचं, जगात नावाजलं जाईल असं हॉटेल उभारायला हवं असं जमशेटजींना वाटत होतंच. त्यात एकदा असं झालं म्हणतात की, त्यांना साहेबाच्या हॉटेलात प्रवेश नाकारला गेला. त्यावर त्यांनी पणच केला, की साहेबाला लाजवेल असं हॉटेल मीच बांधीन. अर्थात काही अभ्यासकांच्या मते, ही केवळ दंतकथा आहे. असेल किंवा नसेलही. यातला खरा भाग इतकाच, की टाटांना उत्तम दर्जाचं हॉटेल बांधायचं होतं. हा काळ मुंबईत उत्तमोत्तम वास्तु उभारल्या जाण्याचा. मध्यवर्ती ठिकाणी भव्य असं व्हिक्टोरिया टर्मिनस उभं राहिलं होतं. समोर आता तिथं जे काय चालतं त्याची लाज वाटेल इतकी सुंदर अशी मुंबई महानगरपालिकेची इमारत उभी राहिली होती. त्यावेळच्या बीबीसीआय- म्हणजे आताची पश्चिम रेल्वे कंपनीचं मुख्यालय उभं राहिलं होतं. हेच आताचं चर्चगेट स्थानक. या वास्तूंचा आरेखनकार होता एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स. त्याच्याकडेच टाटांनी हॉटेल उभारणीचा प्रस्ताव ठेवला. त्याचे दोन भारतीय सहकारी होते. रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य या शुद्ध मराठी नावाचा एक आणि दुसरा डी. एन. मिर्झा हा पारशी. या दोघांनी या हॉटेलच्या उभारणीचं काम अंगावर घेतलं.
एका रविवारी सकाळी आपल्या काही मित्रांना घेऊन जमशेटजींनी मुंबईच्या किनाऱ्याची सैर केली. त्या पाहणीत त्यांना एक जागा पसंत पडली. नौदलाचा यॉट क्लब आणि अपोलो बंदर याच्या मधली. इथे लक्षात घ्यायला हवं की, जमशेटजींनी ही जागा मुक्रर केली तेव्हा गेटवे ऑफ इंडिया जन्माला यायचं होतं. ब्रिटिश तिथे समुद्रात भराव घालून जमीन तयार करत होते. उद्या ही जागा आकर्षणाचं केंद्र होणारच होणार, याची जमशेटजींना खात्री पटली. त्यांनी हीच जागा आपल्या हॉटेलसाठी नक्की केली. तिथला अडीच एकराचा एक तुकडा जमशेटजींनी ९९ वर्षांच्या करारावर भाडेपट्टय़ानं घेतला. कोणाला काही सांगितलं नाही, विचारलं नाही. आणि १ नोव्हेंबर १८९८ या दिवशी त्यांनी आपल्या हॉटेलचा मुहूर्त केला. कसला सोहळा नाही की काही नाही. एक नारळ फोडला. दिवा लावला. झालं. हॉटेलचं काम सुरू झालं. हे हॉटेल टाटा कंपनीच्या पैशातून उभं राहणार नाही, हे जमशेटजींनी तेव्हाच आपल्या पोराबाळांना सांगून टाकलं. हे हॉटेल हे आपल्या वैयक्तिक पैशातून त्यांना उभारायचं होतं. त्यामुळे त्यांनी तोपर्यंतची टाटा उद्योगाची परंपरा मोडीत काढली. जमशेटजींचे सहकारी बरजोरी पादशा हे सर्व टाटा उद्योगांसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायचे. हॉटेलसाठी मात्र जमशेटजींनी ही सगळी खरेदी स्वत:च केली. तीही जगभरातून. जर्मनीतल्या डय़ुसेलडॉर्फमधून वीजवस्तू आणल्या. बर्लिनमधून खोल्यांत टांगायची झुंबरं आणली. कपडे धुण्याचं यंत्र, पंखे, सोडा बाटलीत भरायचं यंत्रं हे सर्व अमेरिकेतून आणलं. हॉटेलातले पोलादी खांब आणले पॅरीसमधून. हे तिथूनच का? तर तिकडेच आयफेल टॉवर उभा राहत होता. त्यामुळे ते किती उत्तम दर्जाचे आहेत हे टाटांना माहीत होतं. हे पोलादी खांब इतके दणकट आहेत, की सव्वाशे वर्षांनंतरही या हॉटेलात मेजवानी सभागृह अजूनही त्यांच्याच खांद्यावर उभं आहे. टर्कीमधून हमामखाने आणले. या सगळय़ासाठी त्यांनी त्यावेळी २५ लाख रुपयांचा खुर्दा उधळला. तोही स्वत:च्या खिशातून. हे जेव्हा त्यांच्या बहिणीला कळलं तेव्हा ती त्यांना म्हणाली, ‘अरे, तू काय काय करणारेस? तुला गिरण्या चालवायच्यात. पोलादाचा कारखाना काढायचाय. इमारती बांधायच्यात. आणि त्यात हे आता भटारखान्याचं खूळ काय शिरलंय तुझ्या डोक्यात?’ तिच्या दृष्टीनं हॉटेल हा भटारखानाच होता. पण टाटांना मुंबई या आपल्या आवडत्या शहराला एक भेट द्यायची होती. मुगल सम्राट शाहजहान यानं आपल्या प्रेमिकेसाठी ताजमहाल बांधला. जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनाही ताजमहाल बांधायचा होता; पण तो आपल्या प्रेमिक शहरासाठी! त्यांनी तो बांधला. या प्रकल्पावर त्यांचा इतका जीव होता, की जमशेटजी त्याचं बांधकाम सुरू असताना न चुकता दररोज त्या ठिकाणी जायचे. त्यांच्या त्या बांधकामात वैयक्तिक सूचना असायच्या. या हॉटेलचा पायाच तब्बल ४० फूट खोल खणला गेलाय. समोर पाणी. तेव्हा इतका खोल पाया खणणं किती जिकिरीचं असेल. पण जमशेटजींनी त्यासाठी काहीही कसूर ठेवली नाही. त्यांची कल्पना अशी होती की, या खोल्यांतल्या बिछान्यावर झोपलं की समोरचं पाणी दिसलं पाहिजे. झोपणाऱ्याला आपण बोटीत आहोत की काय असा भास व्हायला हवा. १९०३ सालच्या १६ डिसेंबरला त्याचं उद्घाटन झालं. तोपर्यंत एकच भाग बांधून झाला होता. मधे बऱ्याच अडचणी आल्या. रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य मलेरियाच्या आजारात दगावले. त्यामुळे घुमटाचं काम अर्धवटच राहिलं होतं. मग स्टीव्हन्सचा दुसरा गोरा सहकारी डब्ल्यू. ए. चेंबर्स याला जमशेटजींनी पाचारण केलं. त्याच्याकडून राहिलेलं काम पूर्ण करून घेतलं. या हॉटेलच्या उभारणीत दोराबही लक्ष घालत होता. तो महाविद्यालयात असताना त्याची खोली एकदा जमशेटजींनी पाहिली होती. ती पाहिल्यावर दोराबच्या सौदर्यजाणिवांबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. खरं तर महाविद्यालयीन वयात मुलांच्या आवडीनिवडी जरा भडक असू शकतात. पण याच आवडी घेऊन दोराब हॉटेल बांधायला गेला तर पंचाईत होईल अशी रास्त भीती त्यांना वाटली. तेव्हा जमशेटजींनी त्याबाबत शंका व्यक्त केली. त्यावर दोराब रागावला. कोणत्याही तरुण मुलाला वडिलांनी अशी शंका व्यक्त केल्यावर राग येणं साहजिकच आहे. तसाच तो दोराबला आला. आपला पोरगा रागावलाय हे जमशेटजींना कळलं. त्यांना वाईट वाटलं. त्यावेळी त्यांनी आपल्या लेकाला एक पत्रच लिहिलं.
एका बाजूला पोलादाचा कारखाना कसा उभारायचा याच्या सूचना देणारे जमशेटजी- हॉटेलातली अंतर्गत सजावट कशी असावी यावरही तितक्याच मायेनं विचार करत होते.
आणखीन एक इतकंच महत्त्वाचं पायाभूत काम जमशेटजींच्या हातून होणार होतं.

प्रिय स्वामी विवेकानंद…
काही वर्षांपूर्वी आपण एका बोटीत सहप्रवासी होतो, हे आपणास आठवत असेल अशी आशा आहे. त्यावेळी आपल्यात बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती. आणि आपला देश व समाज या विषयावरच्या मतांनी माझ्या मनात तेव्हापासून घर केलेलं आहे. देशउभारणीच्या दृष्टीने अशीच एक विज्ञान संशोधन संस्था उभारण्याचा माझा मानस आहे. त्याबाबत आपल्या कानावर कदाचित काही आलंच असेल- मला खात्री आहे. भारताच्या प्रेरणांना चांगली वाट काढून द्यायची असेल तर साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धर्मपुरुषांसाठी मठ, धर्मशाळा वगैरेपेक्षा विज्ञान रुजेल, त्याचा प्रसार होईल असे काही करणे मला महत्त्वाचे वाटते. अशा काही कामात तितक्याच कोणा ध्येयवादी व्यक्तीने झोकून दिल्यास कामाची परिणामकारकता वाढेल आणि देशाचे नावही गौरवाने घेतले जाईल. विवेकानंदांइतकी योग्य व्यक्ती कोण आहे आता? तुमचे याबाबतचे विचार जरूर कळवावे. तुम्ही एखादे पत्रक जरी काढलेत या प्रश्नावर तरी त्याचा वातावरणनिर्मितीसाठी मोठाच उपयोग होईल. मी त्याचा सगळा खर्च उचलायला तयार आहे.
तुमचा विश्वासू…
जे. एन. टाटा

त्याचं असं झालं- इंग्लंडमध्ये वाहणारे सुधारणांचे वारे भारताच्या किनाऱ्यापर्यंत आले होते. सुवेझ कालव्याने व्यापारउदिमाला गती आली होती. १८५१ साली पहिली दूरसंचार वाहिनी घातली गेली. त्याचवर्षी
जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली. या संस्थेनं पहिल्यांदा हिमालयाची उंची मोजायचा प्रयत्न केला. जवळपास ७० शिखरांची उंची या मंडळींनी मोजलीदेखील. १८७५ साली हवामान खात्याच्या
केंद्राची स्थापना झाली. पुढच्याच वर्षी ‘इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ ही संस्थाही आकाराला आली. (या संस्थेचं महत्त्व हे, की पुढे पन्नास वर्षांनंतर सी. व्ही. रामन यांचं नोबेलविजेतं संशोधन याच केंद्रात झालं.) पुण्यात इम्पिरियल बॅक्टेरियोलॉजिकल प्रयोगशाळा जन्माला आली. या सगळय़ा निमित्तानं उच्च शिक्षण भारतात येऊन ठेपलं होतं. इंग्रजी वाघिणीचं दूध पिऊन नव्या विचारांवर पोसली गेलेली ताजी कोरी पिढी भारतात आकाराला येत होती. मुंबईतच प्रोटेस्टंट मिशनऱ्यांचं विल्सन महाविद्यालय सुरू झालं होतं. जेझुइटांनी सेंट झेवियरची मुहूर्तमेढ रोवली होती. मुंबईच्या जोडीला लाहोर आणि अलाहाबाद ही आणखी दोन विद्यापीठं सुरू झाली होती आणि देशभरातल्या महाविद्यालयांची संख्या १७६ वर गेली होती. या महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या पिढीला तितक्याच ताकदीची गुंतवणूक हवी होती. आर्थिक, वैचारिक आणि वैज्ञानिकही. यापाठोपाठ ३० नोव्हेंबर १८९८ या दिवशी लॉर्ड जॉर्ज नॅथानिएल कर्झन हे मुंबईत दाखल झाले. नवीन व्हॉइसरॉय म्हणून. लॉर्ड कर्झन बुद्धिमान होते. त्यांच्या बुद्धिवैभवाचे गोडवे त्यांच्या मायभूमीत विन्स्टन चर्चिल यांच्यापासून अनेकांनी गायले होते. लॉर्ड कर्झन मुंबईला रूजू व्हायच्या आधी बरोबर आठवडाभर आधी जमशेटजींनी आपल्या- आणि देशाच्याही आयुष्यात महत्त्वाच्या ठरेल अशा कामाला हात घातला होता. त्यांनी २३ नोव्हेंबरला एक पत्र लिहिलं..
टाटा आणि विवेकानंद यांच्यात एक अदृश्य बंध तयार झाला होता १८९३ साली. टाटा त्यावेळी जपानहून अमेरिकेतील शिकागो इथं औद्योगिक प्रदर्शनासाठी निघाले होते. आणि विवेकानंद निघाले होते जागतिक धर्मसंसदेसाठी. तो अमृतयोग असा की, एम्प्रेस ऑफ इंडिया या बोटीवर दोघेही एकाच वेळी होते. दोघांनाही मुबलक वेळ होता आणि दोघांनीही त्याचं चीज केलं. पुढच्या आयुष्यात दोघांचाही एकमेकांवर प्रभाव राहिला. स्वामी विवेकानंदांना जमशेटजींच्या कार्याचं महत्त्व मनापासून जाणवलं होतं. आणि या उद्योगमहर्षीस विवेकानंदांची महती मोहवत होती. टाटांना आता नव्या स्वप्नासाठी विवेकानंदांची साथ हवी होती.
लॉर्ड कर्झन मुंबईत दाखल झाले आणि दुसऱ्याच दिवशी टाटा एक शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेले. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जमशेटजींनी दिलं होतं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू जस्टीस कँडी यांच्याकडे. ही सर्व मंडळी लॉर्ड कर्झन यांना भेटली. त्यांना त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला की, भारताला आता प्रगत विज्ञान संशोधनासाठी तितक्याच प्रगत संस्थेची गरज आहे. जमशेटजींच्या डोळय़ांपुढे त्यावेळी होती- रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंड. अशासारखी एखादी संस्था त्यांना भारताच्या विकासासाठी भारताच्या भूमीवर उभारायची होती. पण लॉर्ड कर्झन अगदीच निरुत्साही होते त्याबाबत. त्यांनी दोन शंका काढल्या. एक म्हणजे इतक्या प्रगत विज्ञान संशोधन संस्थेत प्रशिक्षण घ्यायची इच्छा असलेले आणि ते शिक्षण परवडेल असे विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतील का? आणि दुसरं म्हणजे ते समजा आले, तर तिथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर त्यांनी करायचं काय?
जमशेटजी आपला प्रकल्प अहवाल फक्त लॉर्ड कर्झन यांच्यासमोर सादर करून स्वस्थ बसले नाहीत. भारतमंत्री लॉर्ड हॅमिल्टन यांना त्यांनी याबाबतीत गळ घातली. लॉर्ड हॅमिल्टन यांना त्यात जरा तथ्य दिसलं असावं. त्यांनी लॉर्ड कर्झन यांच्याप्रमाणे ती झटकून टाकली नाही. त्यांना वाटलं, पाहणी करायला काय हरकत आहे त्याबाबत. म्हणून मग त्यांनी ती जबाबदारी सोपवली रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडमधले प्रा. विल्यम रॅम्से यांच्यावर. प्रा. रॅम्से दहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. देशभर हिंडले आणि पाहणी करून त्यांनी आपला अहवाल दिला.. टाटा म्हणताहेत तशी संस्था उभी करायचीच असेल तर त्यासाठी योग्य शहर असेल बंगलोर. त्याअनुषंगाने काही उद्योगांनाही उत्तेजन देता येईल असं प्रा. रॅम्से यांनी सुचवलं. ते काही लॉर्ड कर्झन यांना आवडलं नाही. त्यांनी दुसरी समिती नेमली. त्या समितीनं सुचवलं- एक छोटंसं विज्ञान संशोधन केंद्र सुरू करायला हरकत नाही टाटा म्हणताहेत त्याप्रमाणे. पण ते भव्य नको.
या दोन्ही अहवालांचा आधार घेत लॉर्ड कर्झन यांनी मग सरकारला पत्र लिहिलं. खर्चाचा अंदाज दिला. या प्रकल्पासाठी जमशेटजींनी स्वत:चे आठ हजार पौंड.. त्यावेळचे जवळपास सव्वा लाख रुपये दिले होते. लॉर्ड कर्झन म्हणाले, टाटा म्हणताहेत त्याप्रमाणे मोठं काही करायची आवश्यकता नाही. लहानसं एखादं केंद्र करू या. त्याला टाटा ‘नाही’ म्हणाले तर तो प्रकल्प आपोआपच बारगळेल आणि तो नाकारल्याचं पाप आपल्या माथ्यावर येणार नाही. टाटा हे लॉर्ड कर्झन यांची इच्छा पूर्ण होऊ देणार नव्हते. आपल्या कामात शिक्षणाचा एकूणच विचार करण्यासाठी त्यांनी एक समितीही नेमली होती. त्यात एक नाव होतं- न्या. महादेव गोविंद रानडे. तर टाटा या विज्ञान केंद्रासाठी आग्रही होते. त्यांना वाटत होतं, या संस्थेचं महत्त्व पाहता अनेक उद्योगपती मदतनिधीच्या थैल्या घेऊन पुढे येतील. म्हैसूरच्या संस्थानिकानं आपल्या मालकीची बंगलोरातली ३७१ एकर जागा या संभाव्य केंद्रासाठी दिली. वर एकरकमी पाच लाख रुपये दिले आणि दर वर्षांला ५० हजार रुपये देण्याची हमी दिली. बडोदा, त्रावणकोर वगैरे o्रीमंत संस्थानिकही पुढे येतील असं टाटांना वाटत होतं. ते काही झालं नाही. म्हैसूर संस्थानला मात्र याचं महत्त्व कळलं. म्हैसूर संस्थानच्या देणगीची बातमी ऐकून मुंबईचे छबिलदास लालूभाई यांनीही तितकीच देणगी जाहीर केली. हे छबिलदास चांगलेच शेठ होते. त्यांच्याकडे १८००० एकर इतकी प्रचंड जमीन होती. मोठमोठे देणगीदार पुढे येत होते. पण लॉर्ड कर्झन आडमुठेपणानं योजना मंजूर करतच नव्हते. त्याच वर्षी नेमके भारतमंत्री लॉर्ड हॅमिल्टन भारतात येणार होते. तेव्हा टाटा लॉर्ड कर्झनना म्हणाले, ‘तू नाही योजना मंजूर केलीस तर मी पुन्हा भारतमंत्र्यांना भेटून त्यासाठी आग्रह धरणार.’
त्याप्रमाणे ते खरोखरच भेटले. भारतमंत्री या संस्थेसाठी उत्सुक होते. ते पाहून लॉर्ड कर्झन यानं बराच त्रागा केला. या खड्डय़ात जाणाऱ्या योजनेसाठी आपण काहीही मदत करायची, पैसे द्यायची गरज नाही असंच त्याचं मत होतं.
पण टाटा ठाम होते. कोणत्याही परिस्थितीत या संस्थेसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता. एव्हाना ते खूप थकले होते. अतिदगदगीने o्रमले होते. त्याच भरात त्यांनी मृत्युपत्र केलं. त्यात लिहिलं स्पष्टपणे- की मी आहे तापर्यंत हे केंद्र उभं राहिलं नाही, तर त्यासाठी माझ्या पश्चात माझ्या संपत्तीतून त्यासाठी मदत दिली जाईल. या केंद्राबाबत टाटा इतके आग्रही होते की मुंबईतल्या आपल्या तब्बल १७ इमारती त्यांनी या केंद्रासाठी विकल्या. त्यातूनच उभी राहिली ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ ही आजही अद्वितीय असलेली संस्था. भारतातल्या विज्ञान संशोधन आणि शिक्षणात या संस्थेचं महत्त्व आजही अनन्यसाधारण असंच आहे.
पण ती उभी राहिलेली पाहणं काही जमशेटजींच्या नशिबी नव्हतं. जर्मनीच्या दौऱ्यावर असताना न्यूहैम इथं त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजे पूर्वाo्रमीची ‘टिस्को’ आणि आताची ‘टाटा स्टील’ आणि ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ ही दोन्ही स्वप्नं त्यांच्या डोळय़ांदेखत पूर्ण झाली नाहीत.
तसं ते ठीकच म्हणायला हवं. कारण जमशेटजींच्या स्वप्नांचा आकार आणि त्यांची संख्या इतकी भव्य होती, की ती पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या कोणाला दहा जन्म घ्यावे लागले असते. जमशेटजींनी एका जन्मात जी काही स्वप्नं पेरली, त्याच्यावर भारत नावाच्या पुढे स्वतंत्र झालेल्या देशाला आपल्या पायावर उभं राहण्याचं बळ मिळालं. टाटांचं ‘ताजमहाल’ जेव्हा सुरू झालं त्यावेळी ते इंग्रजांना म्हणाले होते, ‘या हॉटेलची मालकी स्वत:कडे ठेवण्यात मला काडीचाही रस नाही. मला इच्छा आहे ती आमच्या देशात असं काही करता येतं हे दाखवण्याची. इतरांनी ते पाहून त्यापासून प्रेरणा घ्यावी याची.’
आग्रा इथला ताजमहाल बांधून झाल्यावर सम्राट शहाजहान यानं तो बांधणाऱ्या कारागिरांचे हात कलम केले. का? तर परत दुसरा असा ताजमहाल कुठे उभा राहू नये म्हणून! तर ‘ताजमहाल’ हॉटेल बांधणाऱ्या जमशेटजींनी आपले हात इतरांना दिले. इतरांना पडणाऱ्या अशाच भव्य स्वप्नांची पूर्तता करता यावी म्हणून! त्यांनी पेरलेल्या स्वप्नांवर देशाचं आजचं वास्तव उभं राहिलंय.
राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या टाटा उद्योगसमूहावरील आगामी पुस्तकातील एक प्रकरण…

Story img Loader