मुंबईतल्या उद्योगी माणसाला फार काळ बाहेर राहवत नाही. बाहेरच्या संथपणाचा कंटाळा येतो त्याला. तसंच जमशेटजींचं झालं नागपुरात. दोन-तीन वर्षांनी त्यांना नागपूरचा कंटाळा यायला लागला. त्यांना मुंबई खुणावू लागली होती. उद्योगविस्तार हे तर कारण होतंच; पण त्याखेरीजही मुंबईत बरंच काय काय सुरू होतं. जमशेटजींचे मित्र पिरोजशा मेहता शहराच्या आघाडीवर अनेक कार्यक्रम करीत होते. जनजागृतीबरोबर राजकीय जाग आणि जाणीव तयार करण्याचं कामही मेहता यांच्याकडून होत होतं. जमशेटजी त्यांना जाऊन मिळाले.
या माणसाला आपण जे काही करतोय त्याच्यापेक्षा अधिक काय करता येईल, असाच प्रश्न पडलेला असायचा. लोकांत राहायला त्यांना आवडायचं. पण साधनेसाठी एकांतही त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटायचा. सकाळी ठरलेल्या वेळी ते कार्यालयात जायचे म्हणजे जायचेच. दुपारी जेवायला घरी. जेवण सहकुटुंब. मग पुन्हा कार्यालय. येताना वेगवेगळय़ा क्लब्जना भेटी. त्याचं फार आकर्षण होतं त्यांना. पिरोजशांच्या साथीनं त्यांनी रिपन क्लब स्थापन केलेला होताच. पारशी जिमखानाही सुरू झाला तो जमशेटजींच्या उत्साही सहभागामुळेच. एलफिन्स्टन क्लब हीदेखील त्यांचीच निर्मिती. आलटूनपालटून रोज सायंकाळी ते या क्लब्जना भेटी द्यायचे. समविचारी पारशी मंडळींशी गप्पा मारायला त्यांना आवडायचं. पण या गप्पाही नवीन काही करता येईल का, याच्या. जगातल्या घडामोडींचे आपल्यावर होऊ घातलेले परिणाम यावरही साधकबाधक चर्चा व्हायची. रात्री घरी परतले की जेवण. हेही सगळय़ांच्या बरोबर. त्यांचं एकत्र कुटुंब होतं. मुलांबरोबर पुतणेही असायचे. एक बहीण अकाली विधवा झाली होती. तीही त्यांच्यासमवेत राहायची. हा सगळा गोतावळा जेवायला एकत्र असायचा. याच्या अभ्यासाचं विचार, त्याची चौकशी कर.. असं करत करत जेवण झालं की जमशेटजी आपल्या अभ्यासिकेत दाखल व्हायचे. ही त्यांची सगळ्यात आवडती जागा. हजार- दोन हजार पुस्तकं होती तिथे. जमशेटजींचं वाचन दांडगं होतं. वेगवेगळय़ा विषयांवर वाचायला त्यांना आवडायचंही. मग ते विषय ‘बागकाम ते बांधकाम’ असे काहीही असायचे. पुढचे दोन तास जमशेटजी एकटे वाचत बसलेले असायचे. त्यांच्याविषयी घरात सगळय़ांनाच अमाप आदर होता. बहिणींनाही त्यांनी आपल्या व्यवसायात भागीदार करून घेतलं होतं. थेट समभाग त्यांच्या नावावर करून दिले होते. या अशा सगळय़ांची काळजी घेण्याच्या सवयीमुळे जमशेटजींविषयी घरात सगळय़ांनाच कमालीचं ममत्व होतं.
आता त्यांचा थोरला मुलगा दोराब खांद्याला आला होता. हा शिकायला आधी इंग्लंडमध्ये केंट इथं आणि नंतर केंब्रिज इथं होता. पण त्यानं आता परत यावं, असं आजोबा नुसेरवानजी यांना वाटू लागलं. नाही म्हटलं तरी त्यांचंही वय झालंच होतं. १८७९ साली तो परत आला. पण म्हणून त्याला जमशेटजींनी लगेचच आपल्या हाताखाली घेतलं असं झालं नाही. मुंबईला आल्यावर धाकटा भाऊ रतन याच्याबरोबर तो इथल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात दाखल झाला. राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर एव्हाना नागपुरात एम्प्रेस जोरात सुरू झाली होती. तिथं त्याच्यासाठी जागा करणं अगदी सहज शक्य होतं. परंतु जमशेटजींनी तसं केलं नाही. त्याला काम करायला लावलं ‘बॉम्बे गॅझेट’ या वर्तमानपत्रात. पत्रकारितेत. दोन र्वष तिथं घासल्यावर त्याची रवानगी केली थेट पाँडिचेरीला. तिथं उच्च दर्जाचं फ्रेंच गिनी नावाचं कापड तयार व्हायचं. प्रचलित जाडय़ाभरडय़ा कापडापेक्षा फारच सुबक होतं ते. तेव्हा त्या कापडाची तिथं एखादी गिरणी काढता आली तर पाहावी असा जमशेटजींचा विचार होता. दोराब त्याच कामाला लागला. त्या नव्या गिरणीच्या परवान्यापासून जमिनीपर्यंत सर्व व्यवहार दोराबनंच पार पाडले. पण पुढे जमशेदजींनी तो प्रकल्प बासनात गुंडाळला. कारण तिकडे तसा कारखाना काढणं आर्थिकदृष्टय़ा तितकंसं शहाणपणाचं नव्हतं.
इकडे देशात स्वदेशीचे वारे जोरात वाहायला लागले होते. टाटांना ते लगेचच भावले. एकतर त्यात आव्हान होतं. आणि परत देशाचा विचार! कोणतंही आव्हान नाही असं झालं की जमशेटजींना चैनच पडायची नाही. एम्प्रेस मार्गी लागली आहे, मुलगा हाताशी आला आहे, अन्य प्रकल्पांचा विचार सुरू आहेच; आणि त्यात आता हे स्वदेशीचे वारे! जमशेटजींनी हे आव्हान आपलं मानलं आणि कामाला लागले. योगायोग असा की, त्याचवेळी मुंबईतल्या कुर्ला इथली ‘धरमसी’ नावाची गिरणी मालकांनी विकायला काढली. खड्डय़ात गेलेली ही गिरणी. त्यावेळी जवळपास ५५ लाखांची मालमत्ता या गिरणीच्या नावावर होती. पण ती चालेना. शेवटी लिलावात निघाली. जमशेटजींना सुगावा लागल्यावर त्यांनी बोली लावली आणि अवघ्या साडेबारा लाखांत ही गिरणी त्यांनी पदरात पाडून घेतली. पण नंतर लगेचच जमशेटजींची डोकेदुखी सुरू झाली. गिरणी इतकी डफ्फड होती, की एक जमीन सोडली तर तिचं सगळं काही बदलावं लागत होतं. पण जमशेटजींचं कौतुक असं, की त्यासाठी त्यांनी सगळी जुनीच यंत्रसामग्री घ्यायचा निर्णय घेतला. वास्तविक त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना वेडय़ात काढलं. जमशेटजी नेहमीसारखेच ठाम होते. गिरणीची जवळपास दीड लाख चौ. मीटरची जागा होती. १३०० माग होते. लाखभर स्पिंडल्स होते. तेव्हा हे सगळं सुरळीत सुरू झालं की ही गिरणीही फायद्यात येईल, हा ठाम विश्वास होता जमशेटजींना. पण या विश्वासाची जणू कसोटीच पाहिली जात होती. ही गिरणी काही लवकर मार्गी लागेना. खर्च तर वाढत चाललेला. त्यात चीनने जमशेटजींची एक ऑर्डरच रद्द केली. झालं! मुंबईत एकदम पळापळ झाली. ‘टाटा’ नाव एकदम संकटात आलं. ते वाचवायचं तर पुन्हा एकदा मोठं भांडवल उभारण्याची गरज होती. जमशेटजी बँकेकडे गेले. तोपर्यंत टाटा संकटात असल्याची चर्चा सुरू झाली होती. बँकेनं जमशेटजींना पतपुरवठा नाकारला. प्रश्न ‘टाटा’ या नावाच्या इभ्रतीचा होता. जमशेटजींनी वेळ दवडला नाही. त्यांनी आपल्या आडनावाचा एक ट्रस्ट बनवला आणि तो तारण ठेवून पैसे उभे करता येतील का, याची चाचपणी केली. बँकांनी त्यालाही नकार दिला. तेव्हा जमशेटजींनी तो ट्रस्ट मोडला आणि वैयक्तिक मालकीचे समभाग विकून पैसा उभा केला. नागपुरातल्या एम्प्रेसमधून आपली तयारीची माणसं आणली. त्यांच्या हाती ही नवी गिरणी दिली. कामगार मिळेनात. तर त्यांनी थेट वायव्य सरहद्द प्रांताच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याला कळवलं- ‘जरा तगडे पठाण पाठवून दे मुंबईला कामाला.’ त्यानेही ते पाठवले.
पुढे ‘स्वदेशी’ नावाने ओळखली गेलेली गिरणी ती हीच. लहानपणी जन्माला येताना एखादं बाळ अगदीच अशक्त असावं आणि पुढे मोठं झाल्यावर त्याचा ‘हिंदकेसरी’ व्हावा तसं या ‘स्वदेशी’चं झालं. अगदी अलीकडेपर्यंत स्वदेशी गिरणी ही टाटा समूहातला महत्त्वाचा उद्योग होता. पण या स्वदेशीला वाचवताना जमशेटजींची चांगलीच दगदग झाली होती. त्यातून थकवा आला होता त्यांना. शिवाय विo्रांती कशी असते, तेही माहीत नाही. त्यामुळे त्यांनी या अशक्तपणाकडे दुर्लक्षच केलं. तर तो इतका वाढला, की एकदा नागपुरात एम्प्रेसच्या आवारातच ते कोसळले. तेव्हापासून नाही म्हटलं तरी जमशेटजी जरा प्रकृतीनं अशक्तच झाले. तशात सतत धावपळ त्यांच्या पाचवीला पुजलेली. इकडे महाराष्ट्रात पाचगणीला त्यांनी जागा घेऊन ठेवलेली. पारशी मंडळांना आरोग्य केंद्र उभारायचं होतं तिथं. ते पाहायला गेल्यावर पुढच्या काही वर्षांत पाचगणीला अतोनात महत्त्व येणार, याचा अंदाज त्यांना आला. मोठय़ा प्रमाणावर त्यांनी जागा घेऊन ठेवल्या. सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी जागा घेतल्या की त्याचं काय करायचं असतं, याचे काही आडाखे अलीकडच्या काळात मांडले गेलेत. म्हणजे हॉटेलं वगैरे उभारायची, जागा भाडय़ानं द्यायचा उद्योग सुरू करायचा, वगैरे. असला फुसका विचार त्यांनी कधीच केला नाही. जमशेटजी जग हिंडलेले. या ठिकाणासारखं हवामान कुठे आहे, तिथं काय काय पिकतं, याचा सगळा आलेख त्यांच्या डोक्यात तयारच होता. हे उद्योगाचं भान कायमच त्यांच्या डोक्यात असायचं. म्हणजे इजिप्तसारखं हवामान आताच्या पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे, तेव्हा इजिप्तसारखा उत्तम दर्जाचा कापूस तिथे पिकेल असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी हजारभर शेतकरी तयार केले. त्यांना स्वत:च्या खर्चानं इजिप्शियन कॉटनची उत्तम रोपं दिली. त्यांना त्याची उस्तवारी कशी काय करायची याची माहिती दिली. दुर्दैवानं फारसं काही यश आलं नाही त्यांना त्या प्रयोगात. तरीही पाचगणीला असंच काहीतरी करून बघायचा त्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. या झकास डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी, कॉफी उत्तम होईल याबद्दल त्यांना जराही संशय नव्हता. त्यासाठी स्ट्रॉबेरीची, कॉफीची रोपं वगैरे घेऊन त्यांनी बऱ्याच फेऱ्या मारल्या पाचगणीला. या परिसरात जाणं हा आता आनंदाचा भाग झाला आहे. त्याकाळी तसा तो नव्हता. म्हणजे अफझलखानाइतकी नाही, तरी बरीच उरस्फोड केल्याशिवाय तिकडे जाता यायचं नाही. मुळात रेल्वे आतासारखी सातारा-कोल्हापूपर्यंत नव्हती. पहिली गाडी होती ती फक्त पुण्यापर्यंत. तीसुद्धा दुपारी. ती रात्री नवाच्या आसपास पुण्याला पोचायची. मग दुसरी गाडी. ती पकडायची. वाठारला उतरायचं. मध्यरात्री. रात्र तिथेच स्थानकावर घालवायची. किंवा त्यातल्या त्यात बरं हॉटेल वगैरे मिळतंय का, ते पाहायचं. मग पहाट झाली की टांगा. २८ किलोमीटरचा तो घाट चढायला पाच तास लागायचे. चढावर घोडय़ाच्या दोन जोडय़ा घ्यायला लागायच्या. एकाच्या तोंडाला फेस आला की दुसरी जोडी. असं सव्यापसव्य करीत पाचगणीला जायला दुपार उजाडायची. तरीही जमशेटजी उत्साहानं जमेल तेव्हा जायचे. या माणसाला इतकं पुढचं दिसायचं, की एकदा का रस्ते बनले की या भागाचा कायापालट होणार याची त्यांना पक्की खात्री होती. त्या काळात जमशेटजींनी या भागात येण्यासाठी मोटारही घेऊन ठेवली होती. मुंबईतली ती पहिली मोटार. पाचगणीला जमशेटजींचे दोन बंगले होते. एक ‘दलकेथ होम’ नावाचा. आणि दुसरा ‘बेल एअर’! पहिल्यात आता आजाऱ्यांसाठी निवारा आहे, तर दुसऱ्यात रुग्णालय. जवळपास ४३ एकराची मालमत्ता होती त्यांची. ही टाटा मंडळी इतकी दानात पुढे, की नंतर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी ती सगळी रिकामी जागा देऊन टाकली. पण दरम्यान त्यांचा कॉफीचा प्रयोग काही यशस्वी झाला नाही. स्ट्रॉबेरी रुजली. कॉफीसाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. तेवढा तो काही त्यावेळी त्यांच्याकडे नव्हता. दरम्यानच्या त्यांच्या जगप्रवासात त्यांना आणखी एक जाणवलेलं होतं. ते म्हणजे फ्रान्समधल्या काही भागातलं हवापाणी आपल्या बंगलोर-म्हैसूरसारखंच आहे. त्यामुळे फ्रान्समधून त्यांनी रेशमाचे किडे आणले होते. त्यांच्या साह्य़ानं रेशीम लागवडीचा प्रयोगही सुरू होता त्यांचा. पुन्हा त्यासाठी त्यांनी बंगलोर, म्हैसूर वगैरे परिसरात मोठय़ा जागा घेऊन ठेवल्या होत्या. तिथे त्यांनी शेतकऱ्यांना रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. खरं म्हणजे भारतातही पूर्वी रेशीम लागवड चांगली होत होतीच, पण मधल्या पारतंत्र्याच्या काळात ती कला मारली गेली असावी. तिचं पुनरुज्जीवन करण्याचा चंगच जमशेटजींनी बांधला. अशा कामासाठी त्यांना कमालीचा उत्साह असायचा. त्याच उत्साहाच्या भरात जमशेटजींनी रेशीम लागवडीतल्या तज्ज्ञ मंडळींना थेट जपानहून पाचारण केलं. त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था केली आणि त्यांच्याकडून तिथल्या स्थानिकांना रेशीम लागवडीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांनी दिलं. या सगळय़ात त्यांचं द्रष्टेपण इतकं, की त्यांनी त्यासाठी चक्क एक संस्थाच स्थापन केली. ‘टाटा सिल्क फार्म क्रॉसरोड्स’ नावाची. वास्तविक त्यावेळी उत्तर भारतात मोरादाबादच्या आसपास रेशीम पैदास होत होती. जमशेटजी अर्थातच तिकडेही गेले होते. पण त्या
आज हा सगळा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय. उत्तम रेशमी साडय़ा म्हणजे म्हैसूर-बंगलोरच्या हे समीकरण बनलंय. पण अनेकांना माहीतही नसेल की, हे सगळं झालं त्याच्या मुळाशी जमशेटजींचा रेशीमस्पर्श आहे ते.
तिकडे मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्य़ात इटलीतल्या व्हेनिसच्या धर्तीवर सुंदर, घाटदार शहर वसवता येईल असं त्यांच्या लक्षात आलं. जमशेटजी मुंबईत राहायचे मलबार हिलवर; पण आसपास खूप हिंडायचे. जुहू हे तेव्हा खोत कुटुंबाची वाडी होती. त्या गावात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं नवरोजी जमशेटजी वाडिया यांना मोठय़ा प्रमाणावर जमीन आंदण दिलेली होती. जुहू, पार्ला, मढ बेट आदी परिसरात त्यांनी मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. तीन रुपये प्रति चौरस फूट असा दर होता त्यावेळी. त्यावेळच्या मानाने भलताच महाग. तरीही जमशेटजींनी मोठी गुंतवणूक केली जमिनींत. मुंबईची वेस शीवपर्यंत होती. जमशेटजींची नजर त्याही पलीकडच्या परिसरावर गेली. या परिसरात पूर्वेकडचं व्हेनिस उभारता येईल अशी खात्रीच पटली त्यांची. ठाण्यातून बाहेर पडणारा घोडबंदर रस्ता पश्चिम महामार्गाला जिथे मिळतो तिथपासून मुंबईच्या वांद्रा, जुहू तारा बंदर, अंधेरी- वसरेवा परिसरापर्यंत हे नवं शहर वसवायची त्यांची कल्पना होती. या सगळय़ा परिसराला समुद्राचा किनारा आहे. भरतीच्या वेळी तिथून पाणी आत येऊ द्यायचं. त्यासाठी दोन भलेमोठे बंधाऱ्यांचे धरण-दरवाजे उभारायचे. पाणी अडवायचं आणि मधल्या जमिनींचा शिस्तबद्ध विकास करून छान शहर वसवायचं अशी ही रम्य योजना होती. त्यासाठी जवळपास १२०० एकर जमीन लागणार होती. ती मिळावी यासाठी जमशेटजींनी प्रयत्नही सुरू केले. या जमिनींतला बराचसा मोठा भाग ठाणे जिल्ह्य़ात येतो. कोणी ओर नावाचे ब्रिटिश अधिकारी ठाण्याचे जिल्हाधिकारी होते त्यावेळी. जमशेटजींनी आपल्या स्वप्नाची समग्र योजना तयार करून ती ओरसाहेबांना सादर केली. साहेब इतका प्रभावित झाला, की त्याला इकडे व्हेनिस झाल्याचं स्वप्न पडायला लागलं. त्यानं उत्साहानं टाटांना साथ द्यायला सुरुवात केली. परंतु पुढे या स्वप्नात पारशी माशीच शिंकली. झालं असं, की यातल्या बऱ्याच जमिनी वाडिया यांच्या मालकीच्या होत्या. त्यामुळे ओर टाटांना म्हणाले, वाडिया यांची त्यासाठी परवानगी घ्या. जमशेटजी जाऊन भेटले अर्देशीर वाडिया यांना. पण गडी ऐकायलाच तयार होईना. जमशेटजींनी ती जमीन विकत घ्यायची तयारी दाखवली. पण हा किती दर हवा, तेही सांगेना. हा इतका अडून बसलाय म्हटल्यावर ओरसाहेबही चिडले. तेही वाडिया यांना भेटायला गेले. ‘जमीन तुझ्या इनामाची आहे हे मान्य; पण किती आहे, ते तरी सांग. कागदपत्रं दाखव..’ म्हणाले त्याला. तर त्यानं ती मागणीही धुडकावली. मग ओरसाहेबांनी शासकीय आदेशच काढला- जमिनीची पाहणी करण्याचा. त्याचवेळी कलकत्त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयाशी संपर्क साधून या जमिनीची सर्व मूळ कागदपत्रं मागवून घेतली त्यांनी. आज हे सगळं सहज वाचून होत असलं तरी या सगळय़ा उपद्व्यापात त्यावेळी किती वेळ गेला असेल याचा अंदाजच केलेला बरा. या सगळय़ा विलंबात हे प्रकरण बारगळलं ते बारगळलंच.
जमशेटजींचं मन हे सुपीक कल्पनांचं बन होतं. ठाण्यात व्हेनिस निर्माण करायचं जमतंय- न जमतंय तोवर जमशेटजींनी माहीम परिसरात भराव घालून जमिनीवर अशीच- पण आकारानं लहान नगर वसवण्याची कल्पना मांडली. त्यातही बराच काळ गेला. त्यामुळे तीही बारगळली. तेव्हा या परिसरात खोताच्या इनामाच्या जमिनीवर मोठमोठे गोठे होते. जमशेटजींच्या लक्षात आलं- मुंबई वाढत जाणार आणि त्यावेळी या गोठय़ांतल्या म्हशींना शहराचा आणि शहराला म्हशींचा त्रास होणार. तेव्हा मग जमशेटजींनी म्हशींचा शास्त्रीय विचार सुरू केला. त्यांची चांगल्या पद्धतीनं पैदास कशी करता येईल, त्यासाठी कुठलं वाण कुठून आणावं, त्यांच्यासाठी चांगला चारा कुठे पिकवता येईल.. वगैरे बाबतीत जमशेटजींनी डोकं घातलं. त्यांना लक्षात आलं की, मुंबईच्या पश्चिमेकडनं ते पार आणिक आणि कुल्र्यापर्यंतच्या जमिनीतलं गवत खाऊन म्हशींच्या दुधात वाढ होते. खाऱ्या गवताचा तो परिणाम. मग त्यांनी सरकारकडेच हजारभर एकर जमीन चाऱ्यासाठी आणि गोठे उभारण्यासाठी मागितली. पण सरकार ढिम्म. हलेचना. तेव्हा न राहवून जमशेटजी थेट गव्हर्नरलाच भेटायला गेले. म्हणाले, ‘माझं मान्य नसेल तर बाजूला ठेवा. पण तुमचं काय ते बोला.’ सरकार असं काही लगेच बोलत नाही, हे जमशेटजींना त्यावेळी उमगायचं होतं. तो प्रकल्पही बारगळला. पण गोठे मुंबईच्या बाहेर गेले. आजही गोरेगाव, जोगेश्वरी वगैरे परिसरात हे गोठे मोठय़ा संख्येने आहेत. मुंबईला दूधपुरवठा करताहेत. कोणाला माहितीये हे गोठे असे एकगठ्ठा उभे राहिले ते जमशेटजींच्या प्रयत्नामुळे!
हे सगळं सुरू असताना पोलाद काही त्यांच्या डोक्यातून गेलं नव्हतं. लंडनला असताना थॉमस कार्लाइलनं दिलेला सल्ला त्यांच्या डोक्यात होताच. एव्हाना जमशेटजी चाळीशी पार करून गेले होते. वयानुसार आलेली स्थिरता आणि शहाणपण या दोन्हीचा पुरेसा संचय त्यांच्याकडे झालेला होता. त्यातच १८८२ च्या सुमारास त्यांच्या वाचनात एक अहवाल आला. जर्मन भूगर्भशास्त्रज्ञाचा. रिटर वॉन श्वाट्झ नावाच्या या शास्त्रज्ञानं आपल्या अहवालात नमूद केलं होतं की, मध्य प्रांतातल्या चांदा जिल्हय़ात जमिनीखाली भारतातली सगळय़ात o्रीमंत खनिजसंपत्ती दडलेली आहे. तो हातात आला आणि जमशेटजी मोहरूनच गेले. त्यांचा आनंद अधिकच वाढण्याचं कारण म्हणजे एकतर श्वाट्झ म्हणत होता ते ठिकाण नागपूरपासून अगदीच जवळ होतं. शेजारीच असलेल्या वरोरा इथंही भूगर्भात कोळसा असल्याचा पुरावा हाती लागला होता. तिथेही त्यांना लगेच काम सुरू करता येणार होतं. जमशेटजींना खात्री झाली की हीच संधी आहे. ते या क्षेत्रात नवीन काही करण्यासाठी इतके अधीर होते, की त्यांनी लगेचच वरोरा आणि परिसरात उत्खनन केलं आणि त्या मातीत किती आणि काय आहे, याची माहिती घेण्यासाठी तो माल थेट जर्मनीतच पाठवून दिला. जमशेटजींच्या आणि अर्थातच भारताच्याही दुर्दैवानं तिथल्या कोळशात आग फार नव्हती. जर्मनीहून तसा अहवाल आला. दरम्यानच्या काळात कोळशाचं खाणकाम आपल्याला करायचंच आहे या विचारानं जमशेटजींनी सर्व तयारी चालू केली होती. परवाने वगैरे. पण गाडी तिकडेही अडली. कारण सरकारचे खाणकामावरचे र्निबध इतके जाचक होते, की त्यातून उद्योग उभा राहणं शक्य नव्हतं.
पण तरीही जमशेटजींचा पोलादाचा ध्यास काही सुटला नाही. त्यानंतर जवळपास १७ वषर्ं हा माणूस भारतात जिकडे जाईल तिकडे काही खनिजं आहेत का जमिनीत, ते पाहायचा. त्यांचे नमुने गोळा करायचा आणि त्यांची पाहणी करून घ्यायचा. यातूनच त्यांचा स्वत:चा असा खनिज नमुनासंग्रह तयार झाला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल अशी परिस्थिती १८९९ साली तयार झाली. व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी खाण धोरण जरा शिथिल केलं आणि त्यामुळे जमशेटजींच्या पोलाद स्वप्नांना पुन्हा पंख फुटले. त्याच वर्षी मेजर आर. एच. मेहॉन यांनी भारतात खनिजाची उपलब्धता आणि पोलाद कारखानानिर्मिती याबाबतचा अहवाल सादर केला. तो वाचला आणि जमशेटजी थेट लंडनलाच गेले.. भारतमंत्री लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांना भेटायला. लॉर्ड हॅमिल्टन द्रष्टे होते. त्यांना टाटा यांच्याविषयी आदर होता. त्यांनी जमशेटजींना ताबडतोब भेटीची वेळ दिली. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. टाटा म्हणाले, ‘माझं तरुणपणापासून एक स्वप्न आहे- पोलादाचा कारखाना काढण्याचं. आता मी साठीला आलोय आणि ते स्वप्न अधिकच गहिरं झालंय. माझ्या बाकीच्या सगळय़ा गरजा आता भागल्यात. आता इच्छा आहे ती देशाला पोलादाचा कारखाना देण्याची. ती पूर्ण करण्यासाठी सरकार मला मदत करेल का?’ लॉर्ड हॅमिल्टन हे ऐकून खूपच प्रभावित झाले. त्यांनी लगेचच पत्र लिहिलं- भारतात लॉर्ड कर्झन यांना. टाटा यांना पोलाद कारखाना काढण्यासाठी हवी ती
कशासाठी? तर त्यांना महत्त्वाचे पोलाद कारखाने पाहायचे होते आणि या क्षेत्रातल्या उत्तम तंत्रज्ञांशी चर्चा करायची होती. ते अलाबामाला गेले, पिट्सबर्गला गेले, क्लेव्हलंडला गेले. जगातली सर्वात मोठी खनिज बाजारपेठ त्यावेळी क्लेव्हलंडला होती. तिथे ते खनिज संशोधक आणि तंत्रज्ञ ज्युलियन केनेडी यांना भेटले. केनेडी जरा आढय़तेखोर असावा बहुधा. तो टाटांना म्हणाला, ‘तुम्हाला परवडणार नाही. पोलादाचा कारखाना उभा राहील की नाही याची पाहणीच इतकी खर्चिक असते, की ती झेपणार नाही तुम्हाला.’ टाटांच्या वयाकडे पाहूनही त्याला जरा शंका आली असणार. पण टाटा त्याबाबत ठाम होते. ‘कितीही खर्च आला तरी आपण हा कारखाना उभारणारच. वेळ पडली तर आहे ते विकून आपण पैसा उभा करू,’ असं त्यांनी ठणकावल्यावर केनेडी यांनी चार्लस पेज पेरीन यांचं नाव सुचवलं. पेरीन हे या क्षेत्रातलं नावाजलेलं नाव होतं. ‘त्यांच्याकडून एकदा ‘हो’ आलं की आपण कारखाना उभारायला लागू या,’ केनेडी म्हणाले. त्यांनी एक पत्रही दिलं पेरीन यांना.
टाटा स्वत: मग पेरीन यांना भेटायला गेले. ते थेट त्याच्या कार्यालयातच धडकले. त्याच्या दालनाच्या दरवाजावर पूर्वी असायचे तसे अर्धे उघडणारे दरवाजे होते. टाटा ते उघडून आत गेले. समोर एकच व्यक्ती होती. टाटांनी विचारलं, ‘तुम्ही पेरीन ना?’ त्यांनी होकारार्थी मान हलवल्यावर टाटा म्हणाले, ‘मग माझा हव्या त्या व्यक्तीचा शोध संपला आहे असं मी मानतो. तुम्हाला केनेडी यांनी लिहिलं आहेच. तर मी भारतात पोलाद कारखाना उभारावा म्हणतो. त्यासाठी माझे प्रकल्प सल्लागार म्हणून मला तुम्हीच हवे आहात. खर्चाची काळजी करू नका. हा कारखाना उभा करणं हे आपलं ध्येय आहे एवढं लक्षात ठेवा. माझ्याबरोबरच चला तुम्ही भारतात. आहे ना तुमची तयारी त्यासाठी?’ पेरीन बघतच राहिले. त्यांना कळेचना- हा थकलेला वृद्ध गृहस्थ इतक्या आत्मविश्वासानं कसं काय बोलू शकतोय! त्यांना वाटत होतं- सांगावं जमणार नाही म्हणून. पण टाटांच्या डोळय़ाला डोळे भिडवून पाहायला लागल्यावर पेरीन यांना कळलं, की या माणसात भारावून जावं असं काहीतरी आहे. ते इतके प्रभावित झाले टाटा यांच्या वागण्यानं, की नकळतपणे ते लगेच ‘हो’च म्हणाले त्यांना भारतात येण्यासाठी.
पेरीन यांनी भारतात येण्याची तयारी सुरू केली. त्याआधी त्यांनी आपला मदतनीस भूगर्भशास्त्रज्ञ सी. एम. वेल्ड याला भारतात पाठवलं. तो येई-येईपर्यंत १९०४ साल उजाडलं. जमशेटजींचा थोरला मुलगा दोराब आणि पुतण्या शापूरजी सकलातवाला आणि वेल्ड हे तिघे उत्खननाच्या मोहिमेवर निघाले. चांदा जिल्हय़ात. हा परिसर किर्र जंगलाचा. साहेब शिकारीला यायचा तिकडे. म्हणजे कल्पना करा- कसं वातावरण असेल, त्याची. पण या तिघांना जमिनीवरच्या शिकारीत रस नव्हता. जमिनीखाली काय आहे, ते पाहायचं होतं त्यांना. कमालीच्या हालअपेष्टा सहन करत त्यांची यात्रा सुरू होती. कधी बैलगाडी, कधी आणखी काही.. आणि बऱ्याचदा चालत. आसपास कुठे पाणी आहे का, याचीही पाहणी ते करायचे. वेल्ड हा मोठा शिस्तीचा माणूस होता. शारीरिक कष्ट पडताहेत म्हणून अंगचोरी करायचं त्याच्या स्वभावातच नव्हतं. तो अगदी पद्धतशीरपणे जमिनीचे नमुने गोळा करायचा. मातीचं पृथ्थकरण करायचा. पण त्याचे निष्कर्ष मात्र सगळेच नकारात्मक निघाले. पोलादाचा अंश होता मातीत तिथल्या; पण व्यावसायिक पातळीवर कारखाना उभा करता येईल इतकं काही सत्व त्या मातीत नव्हतं. त्यानं तसा अहवाल दिला टाटांना. म्हणाला, ‘यात काही अर्थ नाही. इतक्या किरकोळ खनिजावर काही कारखाना उभा राहणार नाही. मी आपला जातो परत.’ ते ऐकून टाटा अर्थातच निराश झाले. पण नाउमेद मात्र झाले नाहीत. ते म्हणाले, ‘आलाच आहात भारतात तर जरा राहा आणखी चार दिवस. हे चांदा जिल्हय़ातलं जाऊ द्या.. आपण इतरत्र पाहू काही मिळतंय का!’ जमशेटजींचा आग्रह त्याला मोडवेना. तो राहिला.
इकडे दोराब कळवायला गेला चांदा जिल्हय़ाच्या आयुक्तांना, की आम्ही इथलं उत्खनन थांबवतोय म्हणून. आयुक्त बैठकीत व्यग्र होते. म्हणून दोराब बाहेर त्यांच्या कार्यालयात येरझारा घालत होता. त्यावेळी त्याचं सहज लक्ष गेलं. समोरच्या भिंतीवर नकाशा होता. जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाचा. भारताच्या भूमीत कुठे काय दडलंय, हे सांगणारा. दोराब उभा होता त्याच्या जवळच एका ठिकाणाभोवती काळी काळी वर्तुळं होती. दोराबचे डोळे विस्फारले. काळी वर्तुळं जमिनीखालचं लोहखनिज दाखवतात, हे दोराबला जाणवलं. तो जवळ जाऊन पाहायला लागला. ती जागा नागपूरपासून फार लांब नव्हती. १४० मैल फक्त. तिथे जमिनीत लोहखनिज दिसत होतं. दोराब खूश झाला. त्यानं लगेच वेल्ड आणि वडील जमशेटजींना जाऊन ते सांगितलं. दोघेही लगेच निघाले. दुर्ग जिल्हय़ात ही जागा होती. टेकडीवर हे दोघे चढत होते तेव्हा बूट धातूवर आपटल्यावर जसा आवाज येईल तसा आवाज येत होता. म्हणजे जमिनीत मोठय़ा प्रमाणावर लोहखनिज आहे, हे कळत होतं. वेल्ड यानं लगेचच मातीचं विश्लेषण केलं. ६४ टक्के खनिज होतं मातीत. पण कारखाना उभा करायचा त्यावर आधारीत; तर जवळ पाण्याचा चांगला साठा हवा होता. तो काही जवळपास सापडेना. त्यामुळे पुन्हा निराश व्हायची वेळ आली सगळय़ांवर. पाणीसाठी सापडला. पण जरा लांब. त्यांनी त्यामुळे तिथे कारखाना उभारण्याचा निर्णय सोडून दिला. आणखीन एक निराशा. पण त्यांचे प्रयत्न अगदीच काही वाया गेले नाहीत. पन्नास वर्षांनंतर ती जागा पोलाद कारखान्यासाठी ओळखली जायला लागली. आज आपण भिलाई नावानं ओळखतो, ती ही जागा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा