‘पिता, भाऊ, पुत्र आणि पती- एकमेकांशी नातं नसलेले हे शब्द पण तू भेटलास आणि या साऱ्या शब्दांना अर्थ आला..’
लग्नाच्या बंधनात न अडकताही प्रेमाच्या नात्यात चाळीस वष्रे घट्ट बांधल्या गेलेल्या लेखिका अमृता प्रीतम यांनी इमरोज यांना उद्देशून लिहिलेल्या या ओळी. त्यांच्या नात्याची प्रगल्भता सांगणाऱ्या. या नात्याला नेमकं काय म्हणायचं याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. पण समाजाला मात्र अशा नात्याला कायमच लग्नाची चौकट असावी असं वाटत आलंय. म्हणूनच लग्नचौकटीत कुटुंबव्यवस्था वाढली, फोफावली. पण काळाच्या ओघात या नात्यातले दोष लक्षात यायला लागले. आणि मग लग्नसंस्थेला एक पर्याय समोर आला तो- ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’चा! म्हणूनच ‘लोकसत्ता’ने दिवाळी अंकात लग्नव्यवस्थेला ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ हा सुयोग्य पर्याय आहे का?’ हे तपासायचं ठरवलं. त्यासाठी असं लग्नाविना सहजीवन व्यतीत करणाऱ्या सामान्यजनांपासून सेलेब्रिटींपर्यंत सर्व स्तरातल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांचे या नात्यातले अनुभव इथे जाणून घेतले आहेत. आजही या नात्याला समाजमान्यता नसल्याने त्याविषयी उघडपणे बोलणारे फारच कमी लोक आहेत असं लक्षात आलं. जे कुणी बोलले त्यांच्याशी मोकळ्या गप्पा झाल्या. पण यातही दोन गट पडले. एक गट- जे गेली काही वष्रे ‘लिव्ह इन्’मध्ये आहेत आणि दुसरा गट ‘लिव्ह आऊट’- म्हणजे एक तर त्यांनी आता लग्न केलंय, किंवा न जमल्याने ते वेगळे झालेले आहेत. यातून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे यातल्या बहुसंख्यांची ती मजबुरी आहे. म्हणजे एक तर त्यांचं आधी एकदा लग्न झालेलं आहे. त्या नात्याने अपेक्षाभंग केला, तेव्हा आता दुसऱ्यांदा लग्न नकोच, अशीही काहींची धारणा होती. तर काही जोडप्यांच्या बाबतीत त्यांच्यापैकी एकाला आधीच्या लग्नापासून फारकत मिळत नसल्याने दुसरं लग्न करण्यात कायदेशीर अडचण आहे. त्याला पर्याय म्हणून मग ‘लिव्ह इन्.’ त्यातल्या काहींना आता मुलंही आहेत. समाजाची टीका नको म्हणून नवरा-बायको असल्याचं ते सांगताहेत. एकूण आपापल्या ‘कुटुंबा’त ही मंडळी सुखी आहेत. परंतु यात ‘लग्न नकोच; लिव्ह इन् रिलेशनशिपमध्येच राहूया,’ असं म्हणत खूप वष्रे एकत्र असलेली जोडपी विरळाच आहेत. त्यामुळे लग्नसंस्थेला ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ हा पर्याय आहे का, याचं उत्तर काळावरच सोपवलेलं बरं.
शेवटी- तुम्ही लग्न केलं अथवा नाही, तुमचं एकमेकांशी नातं कसं आहे, तुम्ही एकमेकांना किती हवे आहात, हाच या नात्याचा गाभा असतो. म्हणूनच अमृता प्रीतम यांनी इमरोज यांना जेव्हा विचारलं, ‘इमू, जर मला साहिर मिळाला असता तर तुझी भेट झाली नसती..’ तेव्हा इमरोज यांनी उत्तर दिलं होतं, ‘मी तर तुला भेटलोच असतो. भले साहिरच्या घरी नमाज पढताना तुला शोधून काढावं लागलं असतं, तरी..’
लग्नाविना सहजीवन!
‘पिता, भाऊ, पुत्र आणि पती- एकमेकांशी नातं नसलेले हे शब्द पण तू भेटलास आणि या साऱ्या शब्दांना अर्थ आला..’ लग्नाच्या बंधनात न अडकताही प्रेमाच्या नात्यात चाळीस वष्रे घट्ट बांधल्या गेलेल्या लेखिका अमृता प्रीतम यांनी इमरोज यांना उद्देशून लिहिलेल्या या ओळी. त्यांच्या नात्याची प्रगल्भता सांगणाऱ्या. या नात्याला नेमकं काय म्हणायचं याची त्यांनी कधी पर्वा केली नाही.
First published on: 20-02-2013 at 05:36 IST
मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live in relationship