‘लिव्ह इन्’मध्ये राहायचा निर्णय मी काही अचानक, काहीतरी वेगळं करायचं म्हणून घेतलेला नव्हता. फार समजून-उमजून या नात्यात राहायचं मी ठरवलं. पुरोगामी चळवळीचं वातावरण आमच्या घरात पहिल्यापासूनच होतं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गं. बा. सरदार तसंच दादा धर्माधिकारी आदींच्या विचारांवर आधारित साहित्य मी लहानपणीच वाचलं होतं. आजूबाजूच्या संसारांचा चिकित्सक बुद्धीनं विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की, स्त्रियांचा त्याग, तडजोडी, दु:खं, कष्ट, आनंद याच्या ‘कंपोस्ट’ खतावरच अनेकांच्या संसाराचा वृक्ष बहरलेला आहे.
अनेक संसारांत प्रत्यक्षात जरी नवरा-बायकोमध्ये विसंवाद दिसत नसला, तरी घरातील पुरुषावर ताबा मिळविण्यासाठी सासू, सून, नणंदा यांचा आपापसात चालणारा सत्तासंघर्ष अनेक घरांत तीव्र होता. केवळ एखाद्या विधीनं कुणाची मनं जुळत नाहीत, किंवा विश्वासाचं नातंही तयार होत नाही, हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं. प्रस्थापित विवाह पद्धती ही पुरुषप्रधान असल्यानं आपल्या पुरोगामी विचारांना झेपेल अशा स्व-निर्मित नात्यात राहावं, ही जाणीव कुमारवयातच मला झाली. मी मला अनुकूल जोडीदार मिळाला नाही तर एकटी राहीन, अशी मनाशी खूणगाठ बांधली होती.
पुरुषाशिवाय आयुष्यात काही अडायला नको म्हणून आत्मनिर्भर होता यावं यासाठी जी पुरुषांनीच करायची असं रूढार्थानं मानलं जायची ती कामं स्वत:च करायला शिकले. त्यामुळं इलेक्ट्रिकची कामं, दुचाकीचं पंक्चर दुरूस्त करणं, घराचा नकाशा तयार करण्यापासून बँकेतून कर्ज काढण्यापर्यंत सगळी कामं केवळ अनुभव यावा आणि पुरुषी आधाराशिवाय ती अडू नयेत यासाठी मी अंगावर घेतली. नोकरी असल्यानं हातात पैसा होताच. कुमारवयात पुरुष-मित्रांविषयी आकर्षण असलं तरी पारंपरिक स्त्रीची भूमिका आपल्याला करायची नाहीए, असं एक मन म्हणायचं. या मनाने बाजी मारली.
त्याचदरम्यान एका महिला संघटनेच्या कार्यशाळेत माझी राकेशशी ओळख झाली. सहवास वाढला. आणि त्याची परिणती प्रेमात झाली. त्यावेळी राकेश विवाहित होता. पण पत्नीशी त्याचे सूर जुळलेले नव्हते. मात्र, पत्नी त्याला घटस्फोट द्यायला तयार नव्हती. अशातच प्रतिष्ठेला ‘काळिमा’ फासणाऱ्या काही घटनांमुळं राकेशला सेटबॅक मिळाला. घरातलं वातावरण त्याला आवडेनासं झालं. घरातून त्याला अपेक्षित सन्मान मिळेनासा झाला. एक प्रकारच्या उपरेपणाच्या भावनेनं त्याला ग्रासलं. पत्नीशी विसंवाद होताच; त्यामुळं त्याला माझ्याकडं येण्यास कौटुंबिक बंधनं अजिबात आडवी आली नाहीत. त्याचवेळी मलाही चळवळी चालवणाऱ्या माणसांचा खोटारडेपणा अनुभवास येत होता. स्वयंसेवी संस्थांचा समाजात शिरकाव झाल्यामुळं लोक नि:स्वार्थी वृत्तीनं काम करणाऱ्यांकडं संशयानं बघतात असाही अनुभव येऊ लागला. अशातच स्वत:चं मूल असणं फार गरजेचं वाटू लागलं. नवऱ्यापेक्षाही स्वत:चं मूल असावं हे वाटणं मला ‘लिव्ह इन्’कडं खेचत होतं. त्यातून राकेशबरोबर मला ‘लिव्ह इन’मध्ये राहायला हरकत नाही अशी माझी मानसिकता निर्माण झाली.
वयाच्या ३५ व्या वर्षी मी ‘लिव्ह इन्’ स्वीकारलं. पण अर्थात हे सहज सोपं नव्हतंच. मी रीतसर लग्न करत नाही म्हणून आईच्या हातचा चांगलाच मार खाल्ला. मी ‘लिव्ह इन्’ डोक्यातून काढून टाकावं असं घरच्यांना खूप वाटत होतं. वडील तर मला नागपुरातील एका मानसोपचार तज्ज्ञांकडेही घेऊन गेले. पण गंमत अशी की, डॉक्टरांनी मलाच योग्य ठरवलं. मी ‘लिव्ह इन्’मध्ये राहू लागले तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी माझ्याशी संबंध तोडले. पण राकेशच्या नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध तोडले नाहीत, हे विशेष. काही प्रमाणात नाती दुरावली, एवढंच.
पाच वर्षे सोबत राहिल्यानंतर आम्ही मुलांचा निर्णय घेतला. आम्हाला आज दोन मुले आहेत. आता घरच्यांनी आम्हाला स्वीकारायला हळूहळू सुरुवात केली आहे. मुख्यत: राकेशच्या घरच्यांनी. आता राकेशच्या घरच्यांकडून वेगळे सूर ऐकू येतात. राकेशच्या पहिल्या बायकोला मुलं झाली नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यांचा ओढा माझ्या मुलांकडे आहे.
‘अगं बाई, तू तर गडच जिंकलास!’, ‘‘तू कशाला मागे राहतेस?’ अशी वाक्यं मला आता राकेशच्या नातेवाईकांकडून ऐकवली जातात. पण राकेशच्या घरात शिरून कुणावर ताबा मिळवण्यासाठी मी ‘लिव्ह इन्’ नव्हतं स्वीकारलं. मला सासू-सून, नणंद-भावजय किंवा जावा-जावा असे संबंध अपेक्षित नाहीत, तर मानवी पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध अपेक्षित आहेत. पुरोगामी चळवळीत वावरताना संस्कारांचा जो सशक्त वारसा मला लाभला, तो माझ्यात मुरलेला आहे. अर्थात तो अद्यापि मी माझ्या मुलांना देऊ शकलेली नाही असं मला वाटतं.
मला ‘लिव्ह इन्’च्या नात्याबद्दल काय वाटतं? तर- या माध्यमातून अशी व्यवस्था हवी, की ज्यातून सहज बाहेर पडता येईल. ती स्त्रियांच्या जास्त फायद्याची आहे. या नात्यात असुरक्षित वाटण्याचं कारण नाही. राकेश सोडून गेला तर माझं कसं होईल, हा विचारदेखील माझ्या मनात येत नाही. मी शिकलेली आहे. अर्थार्जन करते. कुठल्याही पुरुषी आधाराशिवाय पडेल ते काम करण्याची माझी तयारी असते. भविष्यासाठीची आर्थिक तरतूद मी केली आहे. मग कशाची आलीय असुरक्षितता? तुम्ही किती वर्षे सोबत राहता, हे काही या संबंधाचे यश-अपयश मी मानत नाही. मुलांना जन्म देण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राकेशनं उचलली आहे. त्यामुळे ‘लिव्ह इन्’मध्ये राहण्याचा मला अजिबात पश्चात्ताप होत नाही.
(नाव बदलले आहे.)