अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना योगायोगाने भेटलेल्या आणि त्यांच्यातल्या कलावंताला आणि लेखनकलेला विविध वळणे देण्यास निमित्त ठरलेल्या व्यक्तींवर टाकलेला झोत..

अशी काही माणसं आली माझ्या आयुष्यात- ज्यांच्यामुळे (कलाटणी वगैरे नाही म्हणत, पण..) अनपेक्षित संधी गवसणं, मग एका फार वेगळ्या, मोठय़ा अनुभवाला सामोरं जाणं, कला-कारकीर्दीला वेगळं वळण मिळणं, तिची दिशा बदलणं, असं माझ्या बाबतीत वेगवेगळ्या टप्प्यांवर आपसूक घडत गेलं. आता मागे वळून पाहिलं तर या सगळ्याची गंमत वाटते. आश्चर्यही वाटतं. या व्यक्ती अशा वेळोवेळी आणि जागोजागी अनपेक्षितपणे भेटत गेल्या. मात्र, निमित्त ठरल्या.. त्यांच्याबद्दल इथं सांगायचं आहे.

important tips to filling upsc personality test application form
मुलाखतीच्या मुलखात : छंदांची माहिती भरतानाचे तारतम्य
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

माझी अभिनयाची आवड त्यावेळी शाळा-कॉलेजमधल्या वार्षिकोत्सवात आणि आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात नाटकं करण्यापुरतीच होती. नाटकं लिहिणं, बसवणं, करणं, ओळखीच्या प्रेक्षकांकडून उत्तेजन, शाबासकी, बक्षिसं मिळवणं, त्यामुळे मग उत्साह वाढणं, आनंदित होणं- असं सगळं होत असे.

मी नाटकं पाहतही असे.. हौशी, व्यावसायिक आणि प्रायोगिकही! त्यावेळी प्रायोगिक नाटकं, एकांकिका करणाऱ्या संस्था मुंबईत अनेक होत्या. त्यात ‘रंगायन’ अग्रेसर होती. विजया मेहता (त्यावेळच्या- विजया खोटे!) ‘रंगायन’च्या जवळपास कर्णधार होत्या. ‘रंगायन’ संस्थेनं केलेल्या एकांकिका-नाटकांबद्दल, त्यातल्या नव्या प्रयोगांबद्दल नाटय़वर्तुळात नेहमीच उलटसुलट चर्चा व्हायची. संस्थेचा दबदबा होता. अशा या संस्थेचा मी ‘प्रेक्षक सभासद’ होतो. अत्यंत कमी वार्षिक वर्गणीत (मला वाटतं, ती पंधरा रुपयेसुद्धा नव्हती.) पाच किंवा सहा दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळत. ‘रंगायन’चा सभासद असल्याचा आणि त्यामुळे जागतिक रंगभूमीवरील नव्या प्रवाहांचा (‘रंगायन’ करत असलेल्या प्रयोगांच्या निमित्ताने!) साक्षीदार बनल्याचा मला (त्यावेळी) रास्त अभिमान होता!

अशा या ‘रंगायन’च्या आतल्या वर्तुळातला आणि ‘रंगायन’साठी प्रायोगिक एकांकिका, नाटकं लिहिणारा (‘खुच्र्या’ हे आयनेस्कोच्या ‘चेअर्स’चं भाषांतर करणारा!) वृंदावन दंडवते आमच्याच कॉलनीत राहत असे. तो कॉलनीतल्या उत्सवांच्या वेळी कधीमधी जाता-येता माझे स्टेजवर चाललेले उद्योग बघत असे.

एकदा अचानक त्यानं मला हटकलं- ‘राज्य नाटय़स्पर्धेत ‘रंगायन’ विजय तेंडुलकरांचं एक नाटक करणार आहे. दिग्दर्शक अरविंद देशपांडे. त्यांना एक उंच मुलगा हवाय. तू जाशील का भेटायला?’

मी ‘हो’ म्हटलं. वृंदावन पुढे म्हणाला, ‘आधी एकजण ते काम करत होता. पण त्याला जमत नाहीये. (म्हणजे काढून टाकलंय!) तू बघ. त्यांना आवडलं तर तुला ठेवतील, नाहीतर काढतील..’ अशी छानपैकी उत्साह कमी करणारी आणि सस्पेन्स वाढवणारी ‘वॉर्निग’ त्याने मला दिली!

‘प्रेक्षक सभासद’ म्हणून पाहिलेल्या ‘रंगायन’च्या शिष्टसंमत प्रायोगिक नाटकांचं पुण्य माझ्या गाठीशी होतं. उंचीचं क्वालिफिकेशन आणि वृंदावनचं रेकमेंडेशन घेऊन मी गेलो आणि तालमीत सहभागी झालो. मला काढलं नाही. मी राहिलो.. टिकलो.. नाटक आणि भूमिका घडण्याची, विकसित होण्याची प्रक्रिया पाहता झालो!

दुसऱ्या महायुद्धातल्या दोस्तराष्ट्रांच्या छावणीतल्या एका हॉस्पिटलच्या तंबूमध्ये घडणारी ती कथा होती. जॉन पॅट्रिकच्या ‘हेस्टी हार्ट’ या नाटकाचं तेंडुलकरांनी केलेलं हे अनुवादित नाटक- ‘लोभ नसावा, ही विनंती’! दोस्तराष्ट्रांचे सहा सैनिक पेशंट्स आणि नर्स मार्गारेट ही प्रमुख पात्रं. अमेरिकन ‘यांकी’ (नारायण पै), ऑस्ट्रेलियन ‘डिगर’ (बाळ कर्वे), ब्रिटिश ‘टॉमी’ (यशवंत भागवत), स्कॉटिश ‘लॅची’ (अरविंद कारखानीस) आणि आफ्रिकन ‘ब्लॉसम’ (वृंदावन दंडवते). मी न्यूझीलंडचा ‘किवी’ झालो होतो. तंबूतल्या टेम्पररी हॉस्पिटलची कॉट ज्याला पुरत नाही अशा उंचीचा ‘किवी’! नर्स मार्गारेट (चित्रा पालेकर)!

नाटकाचा पडदा उघडल्याबरोबर झावळांच्या खोपटातला तात्पुरत्या ब्रिटिश हॉस्पिटलचा रुग्णांचा वॉर्ड दिसायचा. मच्छरदाण्या लावलेल्या आमच्या कॉट्स होत्या. एक-एक जण उठून बसायचा. मच्छरदाणी जुडी करून वर टाकायचा. वरच्या आडव्या बांबूला एक तेवता कंदील लटकलेला असे.

अनुभवी अरविंद देशपांडेंनी नाटक खूप मेहनतीनं बसवलं होतं. (विजयाबाई तेव्हा इंग्लंडला होत्या.) नाटकातल्या प्रत्येक पात्राला त्यांनी स्वत:चं असं वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्व दिलं होतंच; आणि त्यातले नाटय़पूर्ण प्रसंग उठावदार व परिणामकारक होतील याचीही काळजी घेतली होती.

नाटकाच्या तालमी बऱ्याचदा साहित्य संघाच्या पुरंदरे हॉलमध्ये होत. तेंडुलकर काही वेळा येत. त्यांच्याभोवती एक वलय होतं. ते काय म्हणतात, हे नटमंडळी जीवाचे कान करून, लक्षपूर्वक ऐकत. तेंडुलकर पॉजेस घेऊन नेमकं, मार्मिक, मोलाचं बोलत. मतं सांगत. सूचना करत. पहिल्यांदा ते आले तेव्हा तालीम झाल्यावर सगळे त्यांच्याभोवती गोळा झाले होते. मी नवखेपणामुळे बुजल्यासारखा मागे उभा होतो. तें मला रोखून बघत म्हणाले, ‘तुझ्या उंचीचा वापर कर.’ (‘म्हणजे नेमकं काय करू?,’ असं मी सहकलाकारांना विचारलं. प्रत्येकानं वेगळा सल्ला दिला!)

काही प्रयोगांनंतर मी रुळलो. दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पाश्र्वसंगीत या साऱ्यांचा नाटकाच्या सादरीकरणात कसा वाटा असतो, नाटकाच्या घडणीत त्यांचा कसा एकत्रित परिणाम होतो, हे पाहायला मिळत होतं. नाटककार म्हणून तेंडुलकरांच्या नाटय़रचनेची, भाषाशैलीची, संवादांची आणि कंसातल्या सूचनांची या नाटकात ओळख झाली. पुढे ‘विठ्ठला’ आणि ‘एक हट्टी मुलगी’ या त्यांच्या नाटकात मी प्रमुख भूमिका केल्या.

..असं हे कॉलनी आणि कॉलेजच्या बाहेरचं माझं पहिलं नाटक. तेही ‘रंगायन’सारख्या मातब्बर संस्थेतर्फे केलेलं. तेंडुलकरांचं.

वृंदावन दंडवतेमुळेच मी कॉलनीबाहेर पडलो.

नाटकाची वाट अशी आणि इथून सुरू झाली! थिएटरच्या ‘मॅजिक’चा स्पर्श झाला.

‘लोभ नसावा, ही विनंती’ या नाटकाच्या दिल्लीतल्या एका प्रयोगानंतर आम्ही नाटकातल्याच (तंबूतल्या हॉस्पिटलच्या सेटच्या) कॉट्सवर लोळत प्रयोगाचा शीण घालवत होतो. स्थूल आणि धिप्पाड मधुकर नाईक त्यात ‘कर्नल’ची भूमिका करायचा. त्यानं मला विचारलं, ‘दिलीप, बालनाटय़ात काम करायला आवडेल? रत्नाकर मतकरींचा ग्रुप आहे. त्यांचीच नाटकं. धमाल रिस्पॉन्स असतो. येशील?’ मी काहीही नवं करून बघायला उत्सुक होतोच. लगेचच ‘येईन ना!’ म्हटलं.

किंग जॉर्ज हायस्कूलसमोर नप्पू रोडवरच्या ‘शिशुविहार’ शाळेत बालनाटय़ाच्या तालमी चालू होत्या. तिथे जाऊन दाखल झालो. रत्नाकर आणि प्रतिभा मतकरींनी अनौपचारिक अगत्यानं स्वागत केलं. त्यांना माझा अंदाज नव्हता आणि मला बालनाटय़ांचा!

‘राक्षसराज झिंदाबाद’ हे नाटक बसवलं जात होतं आणि मधुकर नाईकचीच मुख्य भूमिका होती. थोडय़ाच दिवसांत मी तालमीत रुळलो.

पुढच्या आठ-नऊ वर्षांत मी तिथे बारा नाटकं आणि पाच-सहा एकांकिका- म्हणजे तेवढय़ाच वेगवेगळ्या भूमिका केल्या. संस्थेचं नाव ‘बालनाटय़’ होतं; पण मुलांसाठी नाटकं करणारी ही संस्था (‘सूत्रधार’ या नावाने) प्रौढांसाठीही नाटकं करत होती. मेमध्ये एक नवं बालनाटय़ आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक प्रायोगिक नाटक राज्य नाटय़स्पर्धेसाठी केलं जायचं.

मधुकर नाईकने मला रत्नाकर मतकरींच्या संस्थेत नेणं हा माझ्या करीअरमधला मोठा योग होता असं मला वाटतं. इथे मला अ‍ॅक्टर म्हणून मी सापडत गेलो. ‘रंगायन’मध्येच राहिलो असतो तर असा वाव मिळाला असता असं वाटत नाही. (कदाचित ‘थिअरी’ पक्की झाली असती. रंगभूमीवरचे मॉडर्न प्रवाह कळले असते. ‘थिएटर’वर चर्चा करता आली असती.) असे आणि इतके रोल्स करायला मिळाले नसते. अ‍ॅक्टर म्हणून स्वत:शी खेळायला मिळालं नसतं!

बालनाटय़ं ही माझ्या दृष्टीनं अभिनयाची प्रयोगशाळा होती. पुढे मी केलेल्या काही भूमिकांची बीजं या नाटकांतील भूमिकांमध्ये होती. आवाजातले बदल, आवाजाची फेक (प्रोजेक्शन) यांचे प्रयोग इथे करता आले. आणि मुख्य म्हणजे (बाल)प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं.. कम्युनिकेशनचं ट्रेनिंग इथे फार चांगल्या रीतीने आपोआप मला मिळालं. ‘अदृश्य माणूस’मधल्या माझ्या विक्षिप्त शास्त्रज्ञाच्या करामती बघताना मुलांचा हास्यकल्लोळ, चेहऱ्यांवरचा अचंबा, विस्मय आणि माझी ‘चेटकी’ बघताना मुलांचा होणारा थरकाप, आरोळ्या, (चेटकीचा पराभव झाल्यावर) सीट्सवर उभं राहून टाळ्या हे सारं ऑडियन्स पार्टिसिपेशन- प्रेक्षक सहभाग म्हणून पाहण्यासारखं असे. नटाला कमालीचं समाधान देणारं असे. इथे खूप काही करून बघता आलं.

‘प्रेमकहाणी’ नाटकासाठी मला ‘सवरेत्कृष्ट हौशी नट’ हा पुरस्कार इथे मिळाला. ‘अलबत्या गलबत्या’मधला (मुलांना घाबरवणाऱ्या) चेटकीचा रोल नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्टच्या अभिनयसंग्रहात रेकॉर्ड करून ठेवला गेला. ‘आरण्यक’ या महाभारतावरील नाटकातला ‘विदूर’, ‘पोट्र्रेट’मधला माझ्या शारीरिक मर्यादांवर मात करून साकारलेला आर्मी ऑफिसर, ‘चुटकीचं नाटक’मधला गाणारा, नाचणारा ‘सुखाराम’ असे वेगवेगळे रोल्स मी इथे केले. ते नंतरच्या व्यावसायिक नाटकांच्या प्रेक्षकांसमोर आणि टीव्ही मालिकांच्या दर्शकांसमोर मात्र आले नाहीत.

मतकरींच्या नाटकांतल्या भूमिका करताना स्वत:च्या मर्यादा आणि शक्तिस्थानं कळत गेली. आंगिक, वाचिक, आहार्य या अभिनयाच्या अंगांचा वापर करून बघता आला. विशेष म्हणजे या निरनिराळ्या भूमिकांमधली कुठलीही भूमिका मी मागितली नाही. काही वेळा मतकरींनी केलेलं माझं कास्टिंग मलाही ‘सरप्राइज’ असायचं! ‘अलबत्या गलबत्या’ नाटकातली चेटकी, ‘पोट्र्रेट’मधला आर्मी ऑफिसर यांसारखे रोल्स मला न शोभणारे होते. (मी ते आव्हान म्हणून केले.) म्हणजे माझा माझ्यावर होता त्यापेक्षाही जास्त विश्वास मतकरींचा माझ्या टॅलेंटवर होता असं मला नेहमीच वाटत आलंय.

मला रत्नाकर मतकरींच्या संस्थेत नेणारा मधुकर नाईक बहुतेक बालनाटय़ांमध्ये (आणि मोठय़ांच्या काही नाटकांतही!) माझ्याबरोबर होता. पुढे काही वर्षांनी तो निर्माता झाला. स्वत:ची संस्था त्याने काढली. आता तो नाही. अचानक गेला.

तो मला बालनाटय़ं करायला रत्नाकर आणि प्रतिभा मतकरींकडे घेऊन गेला याबद्दल त्याला कधीतरी एकदा मनापासून ‘थँक्यू’ म्हणायला हवं होतं. पण ते राहूनच गेलं असं आता वाटतं.

मी लिहू शकतो (आणि ते छापण्यालायक असतं!), हा उमेद वाढवणारा विश्वास मला ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ मासिकांचे संपादक आनंद अंतरकर यांनी सर्वप्रथम दिला! माझं पहिलंवहिलं लेखन त्यांनी छापलं. ‘मोहिनी’च्या अंकात आलेल्या ‘नाटक’ या विनोदी कथेनं मला आत्मविश्वास दिला. (एकदम लेखक झाल्यासारखं वाटलं!) सहज म्हणून पाठवलेल्या कथेचं त्यांनी चक्क प्रोत्साहनपर सुंदर पत्र पाठवून स्वागत केलं. ‘काही लिहिलंत की अवश्य पाठवा. विनोदी लेखन तुम्ही चांगलं कराल. वेळ काढून लिहा..’ असा प्रेमळ सल्लाही दिला.

त्या उत्तेजनपर पत्राचं मोल खूप आहे. आनंद अंतरकरांचं ते छोटं पत्र मी अजून जपून ठेवलंय.

..त्यावेळी दूरदर्शनवर ‘गजरा’ नावाचा एक कार्यक्रम असे. प्रहसनं, गाणी, नृत्य, किस्से, विनोद, चुटके अशी बहुरंगी करमणूक करणारा तो लोकप्रिय कार्यक्रम होता. निर्माते, दिग्दर्शक होते विनायक चासकर.

मी राहतो त्या भल्यामोठय़ा ‘शारदाश्रय’ सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात मी एक नाटक केलं होतं. वॉल्टर मॅथाऊच्या ‘Plaza Suite’ या सिनेमाने प्रेरित होऊन मी ‘हनिमून हॉटेल रूम नं. १२’ नावाचं हे लघुनाटक लिहिलं होतं आणि त्यात तीन भूमिकाही केल्या. कुठल्याही महोत्सवी नाटकाचं होतं तसं आणि तितपत त्याचं कौतुकबिवतुक झालं. ते नाटक बघायला रत्नाकर मतकरी आले होते.

ते त्यावेळी ‘गजरा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. त्यांनी चासकरांकडे माझ्या नावाची शिफारस केली. चासकरांनी निरोप पाठवला आणि लघुनाटक घेऊन टीव्ही सेंटरला बोलावलं.

कलंदर व्यक्तिमत्त्वाचे वाटणारे, कुरळ्या, पिंजारलेल्या केशसंभाराचे चासकर पाईप ओढत, धुराच्या लोटात माझ्याकडे चष्म्यातून रोखून पाहत होते. मी मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवारासारखा त्यांच्या केबिनमध्ये संहिता घेऊन बसलो आणि त्यांनी इशारा करताच वाचायला सुरुवात केली. माझ्या संहितेत माझ्यातल्या ‘अ‍ॅक्टर’साठी जागा सोडलेल्या असत. ते यांना कसं सांगता येईल? अ‍ॅक्टिंग, रिअ‍ॅक्टिंग, एक्स्प्रेशन्स, पॉजेस, पंचेस, गॅग्ज मी कितपत परिणामकारकरीतीने पोचवू शकतो आह़े, असे प्रश्न मला वाचताना जाणवत होते. कारण चासकर डोळे बारीक करून बघत होते. ते बारकाईने ऐकताहेत की ऐकता ऐकता यांना डुलकी लागली आहे, हे मला निश्चितपणे कळत नव्हतं. पण वाचन संपल्यावर त्यांनी ‘हे चांगलं आहे. आपण यातला एक भाग ‘गजरा’साठी करू या,’ असं म्हणून टाकलं.

ही सुरुवात होती..

मी चासकरांकडे रत्नाकर मतकरींच्या ‘गजऱ्या’मध्ये, सुरेश खरेंनी सादर केलेल्या अनेक ‘गजऱ्यां’त आणि स्वत: लिहून केलेल्या विविध नाटिकांमध्ये निरनिराळ्या भूमिका केल्या. चासकरांनी नेहमीच अशा नव्या कल्पनांना, भूमिकांना आणि प्रयत्नांना उत्तेजन दिलं. त्यांचा माझ्यावरचा विश्वास मला त्यावेळी सतत नवं काही करायला उद्युक्त करत असे.

मी ‘चौकट राजा’, ‘नातीगोती’, ‘रात्र आरंभ’ यासारखे मतिमंदत्वाशी किंवा बिघडलेल्या मानसिक संतुलनाशी संबंधित नाटक-सिनेमे खूप पुढे केले. पण तत्पूर्वी बरीच वर्षे आधी मी ‘मुन्नीचा वाढदिवस’ नावाची नाटिका लिहून गजऱ्यामध्ये ती सादर केली होती. त्यात आपल्या मतिमंद मुलीचा वाढदिवस कॉलनीतल्या मुलांना बोलावून हौसेने साजरा करू बघणाऱ्या.. मुलीला आनंद मिळावा म्हणून धडपडणाऱ्या एका बापाची भूमिका मी केली होती.

‘मुन्नीचा वाढदिवस’ टेलिकास्ट झाल्यावर चासकरांना व्ही. शांतारामांचा फोन आला. ‘हा कोण आहे? याला प्लीज पाठवा माझ्याकडे.’ चासकरांनी मला ‘दिलीप, लगेच जा त्यांच्याकडे. टाळू नकोस. लेट करू नकोस,’ असं बजावलं.

परळच्या राजकमल स्टुडिओत मी चित्रमहर्षी शांतारामांना भेटलो. त्यांच्यासोबत अनंत माने आणि संगीत दिग्दर्शक राम कदम बसले होते. शांतारामबापूंनी शेजारी बसलेल्या दोघांना ‘मुन्नीचा वाढदिवस’बद्दल, माझ्या रोलबद्दल वर्णन करून सांगितलं. मग मला म्हणाले, ‘तुम्हीच ते लिहिलं होतं असं मला कळलं. एका अखंड फिल्मने देता येणार नाही असा संदेश तुम्ही पंधरा मिनिटांच्या या नाटिकेत दिलात. बापाची व्यथा, त्याचं दु:ख तुम्ही फार चांगलं पोहोचवलंत..’ हे ऐकताना मी फार संकोचलो होतो. आपल्या अभिनयाला (आणि लेखनाला) शांतारामबापूंनी दाद द्यावी याचा आनंद का नाही होणार? मग ते म्हणाले, ‘आम्ही एक विनोदी चित्रपट करणार आहोत. त्यातली नायकाची भूमिका तुम्ही करावी असं मला वाटतं.’

त्यांना माझे महिन्याला दहा दिवस असे चार महिन्यांचे चाळीस दिवस त्याकरता हवे होते. मी चकित होऊन ऐकत राहिलो. मग ‘कळवतो’ असं म्हणालो. त्यांना आणि तिथे आलेल्या किरण शांतारामना माझ्या या म्हणण्याचं आश्चर्य वाटलेलं दिसलं. हा काही माझा तडफदारपणा (किंवा माज) नव्हता. माझ्या नोकरीची काळजी आणि (प्रॅक्टिकल) सावधपणा होता. मला चार महिने दहा-दहा दिवस रजा नक्कीच मिळू शकली नसती. शिवाय, एका मराठी चित्रपटातल्या नायकाच्या रोलसाठी (मोठय़ा कंपनीतली चांगल्या पोस्टची) नोकरी सोडून देऊन पूर्णवेळ अभिनय करायची माझी तेव्हा मनाची तयारी नव्हती. मी गेलो नाही.

एकदा ‘गजरा’मध्ये ‘शेजारच्या घरात- एक नि:शब्द नाटय़’ ही सायलेंट स्लॅपस्टिक कॉमेडी करून पाहिली होती. शब्द नव्हतेच. फक्त अ‍ॅक्शन होती. तंबोरा घेऊन गात बसलेली मुलगी, पाइपावरून चढून, खिडकीतून आत शिरून तिला पळवून नेणारा हेल्मेटधारी तरुण आणि त्या दोघांना रंगेहाथ पकडणारे तिचे आई-वडील!

‘फॉरिन फिल्म विथ इंग्लिश सबटायटल्स’ या नाटिकेत अगम्य भाषेत बोलणाऱ्या शास्त्रज्ञाची भूमिका मी केली होती. (‘अगम्य’ भाषेतल्या संवादांसाठी पोर्तुगीज भाषेतल्या शब्दांची पद्धतशीर मोडतोड करून नवीनच शब्द जुळवून संवाद तयार केले होते.) हे संवाद चालू असताना टीव्ही स्क्रीनवर खाली इंग्लिश सबटायटल्स यायचीच; पण जांभई, हुंदके, नि:शब्दता यांचंही हास्यास्पद भाषांतर यायचं!

या साऱ्याच कॉमेडीज्च्या प्रयत्नांना चासकरांनी प्रोत्साहन दिलं, कल्पनाविस्ताराला मोकळीक दिली. त्याप्रमाणे ‘टेकिंग’ ठरवलं. त्यांच्याकडे मग मी एकदा ‘पंचवीस एके पंचवीस’ नावाची नाटिका केली. त्यात जोडप्याच्या पंचवीस वर्षांच्या अंतराने दाखवलेल्या तीन अवस्था होत्या. वय पंचवीस-पन्नास आणि पंचाहत्तर. ‘मल्टिपल’ रोल्स करायची खुमखुमी मला होती म्हणून मी ही नाटिका लिहिली आणि केली. तर गंमत म्हणजे त्यातल्या पंचवीस वर्षांच्या तरुणाचा माझा भाबडेपणा, बहिर्मुख (extrovert) स्वभाव, पोकळ आत्मविश्वास वगैरे पाहून निर्मात्या विजया जोगळेकर यांनी मुंबई दूरदर्शनवरची पहिलीवहिली मालिका ‘चिमणराव’मध्ये मला ‘चिमणराव’चा रोल दिला.

मतकरींकडे मिळाल्या तशा चासकरांकडेही अतिशय भिन्न प्रकारच्या भूमिका मला साकारायला मिळाल्या. मतकरींकडे स्वत:ला शोधण्याची प्रक्रिया होती; चासकरांकडे स्वत:ला सिद्ध करण्याची हौस! वाव दोन्हीकडे मिळाला. फक्त माध्यमांचा तेवढा फरक होता.

विनायक चासकरांकडे केलेल्या वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिरेखांच्या अनेक आठवणी आहेत. त्यातलं कुठलंच रेकॉर्डिग आता उपलब्ध नाही. रेकॉर्डिग कशाला, यातल्या कुठल्या नाटिकेचा फोटोसुद्धा नाही. मोबाइल फोन कॅमेरा त्यानंतर तीसेक वर्षांनी आला. त्यावेळी तो असता तर निदान तीन-चार कॅरेक्टर्सचे ‘सेल्फी’ तरी काढून ठेवले असते! पुरावा म्हणून!

एकदा ‘आकाशवाणी’चे सीनिअर निर्माते माधव कुलकर्णी यांनी मला आग्रहाने भेटायला बोलावलं. त्यावेळी ते ‘बालदरबार’ या मुलांच्या कार्यक्रमाचेही ते निर्माते होते. ‘मुलांसाठी श्रुतिकांची मालिका तू लिहावीस.. तू ती चांगली लिहिशील-’ असा त्यांचा प्रस्ताव होता. (नेहमीप्रमाणे) माझी पहिली प्रतिक्रिया ही (येऊ घातलेली) जबाबदारी टाळण्याची- म्हणजेच नकाराची होती. माझ्या अडचणी मी सांगितल्या. वर आणि गप्पांच्या ओघात ‘आता या टीव्हीच्या जमान्यात रेडिओ ऐकतात तरी का हो मुलं?’ असा शिष्ट सवालही त्यांना मी केला. पण त्यांनी आग्रह सोडला नाही आणि ‘तुझ्याकडून मला मुलांची नभोनाटय़ं हवीच आहेत. तू लिहायलाच हवंस!’ असा वर प्रेमळ दम दिला.

यातून आता सुटकाच नाही म्हटल्यावर मी मग ‘सहनिवास संस्कृती’तला एक नायक निर्माण केला. दहा वर्षांचा ‘बोक्या सातबंडे’ आणि त्याचं विश्व! निरनिराळ्या प्रसंगांतून दिसणाऱ्या त्याच्या खोडय़ा, त्याचे पराक्रम, त्याचा भलेपणा!

श्रुतिका सुरू झाल्या. (मी त्यात बोक्याचे ‘बाबा’ होतो.) त्याला छान प्रतिसाद मिळत गेला. एकदा श्रुतिकेच्या रेकॉर्डिगच्या वेळी गेलो असता माधव कुलकर्णीनी मला पत्रांचे गठ्ठे दाखवले. ‘वाच. टीव्ही जिथे पोचला नाही अशा गावांतलीच नव्हेत, तर मोठय़ा शहरांतली पत्रं आहेत ही..’ ते म्हणाले.

‘बोक्या सातबंडे’च्या श्रुतिका खूप लोकप्रिय झाल्या. बालश्रोते (आणि त्यांच्या घरचे) पुढच्या नाटिकांची वाट बघायचे.

‘राजहंस’ प्रकाशन संस्थेचे दिलीप माजगावकर माझे मित्र. माझे ‘गुगली’ पुस्तक त्यांनी प्रकाशित केले होते. ते मला म्हणाले, ‘श्रुतिकांची पुस्तकं बाजारात आली तर कोणी विकत घेऊन वाचणार नाहीत. तुम्ही याच्या कथा करा.’ अनुभवी संपादक-प्रकाशक माजगावकरांचा आग्रही सल्ला मानायलाच हवा होता. मग मी त्या नभोनाटय़ांवर आधारित संवादप्रधान कथा लिहिल्या. राजहंस प्रकाशनच्या परंपरेप्रमाणे दर्जेदार निर्मितीचे आकर्षक स्वरूपातले तीन भाग प्रकाशित झाले. (प्रत्येक भागात पाच कथ!) मुलांना कथा आवडतात? ती (विकत घेऊन) वाचतात?

हो, वाचतात. ‘बोक्या’च्या एक ते तीन भागांची आता अठरावी आवृत्ती येईल!

या कथांवर मग दूरदर्शनवर मालिका आली. चित्रपट आला. पुढच्या कथाही त्यानंतर मी लिहिल्या. सध्या ‘बोक्या सातबंडे’चे दहा भाग प्रसिद्ध झाले आहेत. पुंडलिक वझे (आणि नंतर नीलेश जाधव) यांनी सुंदर, समर्पक चित्रांनी या कथा सजवल्या. ‘बोक्या’ला दोन वेळा राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार मिळाले आणि चार वर्षांपूर्वी ‘बोक्या सातबंडे’च्या चौथ्या आणि पाचव्या भागांसाठी मला साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारही बालसाहित्यासाठी मिळाला. हे आकाशवाणीचं अपत्य असं पराकर्मी ठरलं!

अलीकडे काही पालक मला म्हणाले, ‘आमची मुलं इंग्रजी माध्यमातली आहेत. वाचायची आवड आहे त्यांना. मराठी कथा (हळूहळू) वाचता येतात. पण त्यांना कथा, संवाद जाणून घ्यायची घाई असते. मग मुलं आम्हाला रात्री झोपताना वाचून दाखवायला सांगतात.’ असे काही पालक मुलांसाठी मोठय़ाने वाचतात. मुलं ते तन्मयतेनं ऐकतात. म्हणजे या मुलांसाठी त्या कथा पुन्हा ‘श्रुतिका’ झाल्या आहेत! तर असं हे ‘बोक्या सातबंडे’चं एक वर्तुळ पूर्ण झालंय. श्रुतिकेसाठी निर्मिलेलं पात्र सगळ्या माध्यमांतून फिरलं आणि पुन्हा या काही इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी श्रुतिकेच्या स्वरूपात अवतरलं.

माधव कुलकर्णीच्या चिकाटीमुळे आणि तगाद्यामुळे ‘बोक्या’ मी लिहिला, निर्माण केला आणि दिलीप माजगावकरांच्या संकल्पनेमुळे आणि सांगण्यावरून तो कथांमधून पुस्तकरूपाने आला. बालवाचकांना अपार आनंद देत राहिला..

निखिल वागळेंच्या आक्रमक आग्रहामुळे माझं मुबलक स्तंभलेखनही झालं. (मी लिहिता झालो!) ‘षटकार’ या पाक्षिकात (संपादक- संदीप पाटील) मी कॉलम लिहावा आणि मी तो चांगला लिहीनच, असं निखिलचं दृढ मत होतं. त्यांना खात्री होती. ‘गुगली’ हे क्रीडाविषयक विडंबनपर, क्रीडापटूंची- विशेषत: क्रिकेटर्सची फिरकी घेणारं, खिल्ली उडवणारं, त्यांच्या मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या ‘पराक्रमांना’ वाचा फोडणारं माझं सदर सुरू झालं. सगळे मराठी क्रिकेटर्सही ‘गुगली’ नियमितपणे वाचायचे. (‘या माणसाला- जो कधी मॅच पाहायलाही आलेला दिसत नाही- ‘आतल्या’ बातम्या देतं कोण?’ असा त्यांना प्रश्न पडायचा!)

या सदरातील मजकुराची पुढे तीन पुस्तकं (‘गुगली’, ‘नवी गुगली’, ‘हाऊज दॅट’) झाली. ‘गुगली’च्या मलपृष्ठावर सुनील गावस्करची प्रतिक्रिया आहे. ‘चंदेरी’ पाक्षिकात (संपादिका- रोहिणी हट्टंगडी) ‘झूम’ आणि ‘महानगर’ सायंदैनिकांत ‘कागदी बाणा’ या माझ्या स्तंभलेखनाचीही पुढे पुस्तकं आली. हे सगळं लेखन (नियमितपणे आणि बरेच महिने) झालं ते निखिल वागळेंमुळे. (पुढे तगादा लावायचं काम मीना कर्णिकने आवडीनं केलं.) मलाच माहीत नसलेली माझ्यातली- या सदरासाठी लागणारी व्यंग टिपणारी शैली निखिल वागळेंनी हेरली होती!

‘हसवाफसवी’ नाटक रंगमंचावर आलं तेव्हा ते ‘व्यावसायिक’ म्हणून चालेल, त्याचे खूप प्रयोग होतील असं मुळीच वाटलं नव्हतं. संस्था, मंडळं, क्लब्स यांच्यासाठी हे नाटक होऊ शकेल अशी माफक अपेक्षा होती.

मुळात आधी हे नाटक विचित्र पद्धतीनं लिहिलं गेलं. (खरं तर नाटक कसं लिहू नये, याचा हा वस्तुपाठ ठरावा!) माझ्यातल्या नटासाठी मी लिहिलेली अतिशय भिन्न भूमिकांची ही नाटकाची स्क्रिप्ट होती. (चिमणराव, प्रिन्स वांटुंग पिनपिन, नाना पुंजे, दीप्ती प्रभावळकर- पटेल- लुमुंबा, बॉबी मॉड आणि वृद्ध गायक नट कृष्णराव हेरंबकर- या सहा भूमिका!) आधी पात्रं ठरवली आणि मग त्यांना जोडणारं सूत्र शोधलं!

हौस म्हणून मी ‘हसवाफसवी’ची निर्मिती केली. (लेखन, दिग्दर्शन, सहा भूमिकांबरोबर हेही!) सुरुवातीला ‘कॉन्ट्रॅक्ट’ शोज् मिळत गेले. गणेशोत्सवात जास्त. सगळीकडे चांगल्या रंगमंचाच्या सोयी नव्हत्या. पण आम्ही उत्साहानं करत होतो. रिस्पॉन्स जबरदस्त मिळायचा. प्रयोगाचं मानधन मात्र माफक असे. ज्येष्ठ आणि अनुभवी व्यवस्थापक चित्रेकाका त्याची मॅनेजमेंट बघायचे.

एकदा गिरगावातल्या साहित्य संघ मंदिरात असाच एक कॉन्ट्रॅक्ट शो होता. कुठल्यातरी संस्थेनं घेतलेला. मेकअप रूमशेजारच्या कपडेपटातल्या एका मोठय़ा टेबलावर चित्रेकाका आडवे पडून विश्रांती घेत होते. नाटक संपल्यावर सहा भूमिका करून दमलेला मी (सहाव्या भूमिकेचे) कपडे उतरवत होतो. चित्रेकाका एकदम उठून बसले. मला म्हणाले, ‘हे नाटक चालणार. याचे थिएटरला तिकीट विक्रीचे प्रयोग लावू. आपण हे व्यावसायिक पद्धतीनं चालवू.’ मी तयार झालो खरा; पण साशंक होतो. माझ्याबरोबर काम करणाऱ्या डॉ. हेमू अधिकारी किंवा रमाकांत देशपांडे यांनाही त्यावेळी खात्री नव्हती.

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिर इथे आम्ही तिकीट विक्रीचा पहिला प्रयोग लावला. नेमका त्या दिवशी पुण्यात रिक्षांचा संप होता. तरीही बुकिंग चांगलं झालं. आम्हाला वाटलं, चुकून झालं असेल. पण ते बुकिंग टिकलं. वाढत गेलं. चक्क ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागायला लागले.

त्यानंतर मग नवल घडलं. प्रयोग सुरू करतेवेळी आत मेकअप रूममध्ये बातम्या यायच्या.. आज पु. ल. आणि सुनीताबाई आले आहेत. आज भीमसेन जोशी नाटकाला बसलेत. माझी घबराट व्हायची. बाकीच्या रोल्सचं काही नाही, पण माझं ८८ वर्षांच्या कृष्णरावांच्या भूमिकेत ‘प्रिये पहा..’ गाणं होतं. ‘आता यांच्यासमोर आपण काय गाणार?’ या विचारानं मी अस्वस्थ व्हायचो. अशावेळी स्टेजवर मला गाण्याचा आग्रह करणाऱ्या मोनिकाला ‘पूर्वीसारखा आवाज लागत नाही. एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरले आहेत..’ हे (कापऱ्या आवाजातलं) वाक्य म्हणताना मी माझं अभिनयाचं सारं कसब पणाला लावत असे! म्हणजे गाण्यात काही कमी-जास्त झालं तर ते वयामुळे झालंय (गाणं न शिकल्यामुळे नाही!) असं वाटावं याची सोय करून ठेवत असे. दिग्गजांचीही या गाण्याला दाद मिळे!

निळू फुले आले. अमरीश पुरी आले. एकदा श्री. ना. पेंडसे. मग एकदा तेंडुलकर नाटक पाहून गेले. माझे एकेकाळचे आयडॉल बॅडिमटन सुपरस्टार नंदू नाटेकर, सुनील गावस्कर हेही येऊन (वर आणि ‘तुमचे फॅन आहोत’ असं सांगून!) गेले!

सत्यदेव दुबे दोनदा नाटक पाहायला आलेच, वर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरेक्टरायझेशनचा स्टडी’ करायला पाठवू लागले! ते या नाटकाच्या प्रेमात होते. पृथ्वी थिएटरच्या संजना कपूरनी केवळ दुबेंच्या आग्रहाखातर मला पृथ्वी थिएटरच्या एका सोहळ्यात ‘हसवाफसवी’मधली दोन पात्रं करायला पुण्याहून बोलावलं.

दादरला शिवाजी मंदिरातल्या प्रयोगाला ‘डॉक्टर लागू येतायत..’ असं चित्रेकाकांनी सांगितल्यावर मी असाच काळजीत पडलो होतो. डॉक्टरांना आवडेल का हे नाटक? त्यांची उपस्थिती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दबाव आजूबाजूच्या प्रेक्षकांना हसण्यापासून रोखणार नाही ना? असे विचार डोक्यात येत होते. डॉक्टर खोखो हसताहेत असं काही डोळ्यासमोर येईना.

पण नाटक संपल्यावर डॉक्टरांनी आत येऊन मिठी मारली. ते भारावले होते. (मग त्यांनी मला अलेक गिनेसचे आठ रोल्स असलेल्या ‘काइंड हार्ट्स अँड कॉरोनेट्स’ या सिनेमाची व्हीएचएस कॅसेट पाठवली. ‘हसवाफसवी’चं कौतुक करणारं एक सुंदर पत्रही लिहिलं.)

मी ‘हसवाफसवी’ थांबवायचा निर्णय घेतल्यावर ते पुन्हा एकदा नाटक पाहायला आले. पूर्वीपेक्षा अधिक भारावले. त्यांनी मला त्यांचा आवडता हॉलिवूडचा नट पॉल म्युनी याचं चरित्र भेट दिलं. त्यात आतल्या पानावर लिहिलं आहे- ‘हसवाफसवी’ला सलाम! – श्रीराम लागू.’ मला अ‍ॅवार्ड्स खूप मिळाली. अगदी ‘नॅशनल’सुद्धा! पण हे माझं मोठं अ‍ॅवार्ड आहे.

महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर (गोवा, बेंगलुरू, दिल्ली, इंदूर, कानपूर, जबलपूर, इ.) आणि अमेरिकेतही या नाटकाचे प्रयोग झाले.

‘हसवाफसवी’मधल्या व्यक्तिरेखा मी लेखक म्हणून स्वत:तल्या नटासाठी ‘रचल्या’ हे खरं; पण स्टेजवर त्या एकेक साकारताना मात्र त्यात ‘रचलेपणा’ नव्हता. दर प्रयोगात त्या सहाही भूमिका नव्याने उभ्या राहाव्यात, जिवंत.. खऱ्या वाटाव्यात असा माझा प्रयत्न असे. त्यातली उत्स्फूर्तता टिकवून स्वत:ला कंटाळा येऊ न देता ‘एन्जॉय’ करता येणं, त्यात ताजेपणा ठेवणं, हे सोपं जात नसे.

७५० प्रयोगांनंतर मी नाटक थांबवण्याचा निर्णय घेतला. खरं तर ‘हसवाफसवी’चे हजारच्या वर प्रयोग सहज झाले असते एवढी त्याला मागणी होती. पण मला वाटलं, (‘सॅच्युरेशन पॉइंट’ येण्याआधी) थांबावं. चित्रेकाकांना ते पटलं नसावं. चालणारं नाटक बंद करणं कुणाला पटेल? पण त्यांनी माझं म्हणणं मानलं.

इतक्या प्रयोगांत रसिक प्रेक्षकांचे असंख्य अनुभव आले. त्यांचा प्रतिसाद नट म्हणून मला खूप काही शिकवणारा, समाधान देणारा होता. जाणकारांच्या प्रतिक्रिया उमेद, आत्मविश्वास वाढवणाऱ्या होत्या. प्रेक्षकांना हसवणं, हसवत ठेवणं, गंभीर, अंतर्मुख, भावविवश करणं- हे सारं रंगमंचावरून करू शकणं, यात विलक्षण ‘थ्रिल’ आहे. हा अनुभव मी घेतला. सतत सातशे पन्नास प्रयोग!

..चित्रेकाकांनी नाटक चालवायचा प्रस्ताव मांडला तेव्हा मी त्यांना ‘हो’ म्हटलं नसतं तर हे सारे अनुभव मला कसे आले असते?ॉ

..‘लोकसत्ता’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत रविवारच्या पुरवणीत मी सदर लिहावं अशी मला अनेकदा विचारणा झाली होती. नाटकांचे प्रयोग, अधेमधे शूटिंग्ज आणि इतर कार्यक्रम यामुळे वर्षभर असं नियमित स्तंभलेखनाच्या जबाबदारीला बांधून घेणं मला जमणार नाही असं मला वाटलं. संपादकीय विभागातून फोन येत राहिले. पण मी ‘बघतो’, ‘कळवतो’, ‘जमेलसं वाटत नाही’, ‘नकोच’ असं म्हणत राहिलो.

आणि एके दिवशी अचानक संपादक डॉ. अरुण टिकेकर पत्ता शोधून दादरच्या आमच्या शारदाश्रम सोसायटीत घरीच येऊन थडकले! हे फारच अनपेक्षित होतं. त्यांच्या आर्जवी विनंतीला मी ‘नाही’ म्हणू शकलो नाही. माझ्याकडून होकार घेऊनच ते गेले. आता सदर लिहावंच लागणार होतं.

काही दिवस विषय सापडत नव्हता. मग तो सापडला. सूत्र शोधत होतो. ते मिळालं.

एका सुखवस्तू, मध्यमवर्गीय कुटुंबातली (तीन पिढय़ांतली) पाच माणसं आजूबाजूच्या बदलणाऱ्या जगाकडे कसं बघतात, घडामोडींचा कसा वेध घेतात, हे लिहून बघावंसं वाटलं. त्यांच्या रोजनिशीचा फॉर्म मला सुचला. पाचही जण डायरी लिहिणारे आहेत अशी कल्पना केली. दर रविवारी कुटुंबातल्या एका व्यक्तीची रोजनिशी. कॉलमचं नाव- ‘अनुदिनी.’

पन्नाशीतला कुटुंबप्रमुख शेखर, त्याची बायको ‘हाऊस वाइफ’ शामला, शिक्षण पुरं केलेला आणि नोकरीच्या शोधात असलेला मुलगा श्रीलेश ऊर्फ शिऱ्या, कॉलेजात जाणारी मुलगी शलाका आणि शेखरचे वडील श्रीयुत गंगाधर ऊर्फ आबा टिपरे. प्रत्येक रविवारच्या पुरवणीत यातल्या एकेका व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातल्या नोंदी या सदरात असायच्या.

ठरल्याप्रमाणे वर्षभर (एकही रविवार न चुकवता) मी पाचजणांच्या रोजनिशीतली ही पानं लिहिली. दैनंदिनी आणि त्यातलं प्रथमपुरुषी निवेदन म्हटल्यावर साहजिकच काही मर्यादा पडल्या. पण त्याचबरोबर त्या डायरीतल्या पानांमधून अनेक स्वभाववैशिष्टय़ांनिशी ही पाच पात्रं आकाराला आली. त्यांच्या अंतरंगात शिरता आलं. (लिहिताना केलेल्या या पाच वेगवेगळ्या भूमिकाच होत्या!)

मध्यमवर्गातील मंडळींचं आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांमधून सुख शोधणं, वेळोवेळी निराशा पदरी आली तरी नाउमेद न होता आशावादी राहणं, हे या लिखाणामधून येत राहिलं. त्यांच्या असुरक्षित मन:स्थितीवर केलेलं ते भाष्यही होतं. ते कधी गंभीर असायचं, कधी अंतर्मुख करणारं. पण बहुतेक वेळा मिश्कील आणि गमतीदार! ‘अनुदिनी’मध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांवरील घडामोडींचा कुटुंबातल्या मंडळींनी घेतलेला वेध होता. (यासाठी माझे विविध ‘इंटरेस्टस्’ मला उपयोगी पडले.)

सदराचं लेखन प्रासंगिक असल्यामुळे टिपरे कुटुंबाच्या डायऱ्यांमध्ये ताज्या विषयांवर टीकाटिपण्णी यावी म्हणून मी रोजची वर्तमानपत्रं बारकाईनं वाचायला लागलो. त्यावर्षीच्या घटनाही जबरदस्त होत्या! प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स आणि पॉप किंग मायकेल जॅक्सन यांची भारतभेट, श्रीलंका-भारत क्रिकेट मालिकेत श्रीलंकेची झंझावाती फलंदाजी, मदर तेरेसांचं निधन, अमिताभच्या करीअरची घसरण सुरू झाली असं वाटावं असं ‘मृत्युदाता’ फिल्मचं आपटणं, राजकारण्यांचा अव्याहत कोडगेपणा हे सगळंच ‘दखलपात्र’ होतं.

रविवारच्या पुरवणीतला लेख उशिरात उशिरा गुरुवार सकाळपर्यंत द्यावा लागे. त्यामुळे बऱ्याचदा नाटकांचे प्रयोग, अधूनमधून येणारी शूटिंग शेडय़ूल्स, प्रवास, दौरे या सगळ्यांतून ‘डेडलाइन’ सांभाळताना तारांबळ होई. प्रवासात, शूटिंगच्या ठिकाणी काही सुचलं तर मी हळूच नोंदी करत असे!

वर्षभर कॉलम चालला. लोकप्रिय झाला. अरुण टिकेकरांमुळेच सुरू केलेल्या या स्तंभलेखनाचं मग ‘अनुदिनी’ पुस्तकही प्रकाशित झालं.

एकदा हे पुस्तक घेऊन तरुण लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे माझ्याकडे आला. मला म्हणाला, ‘या पुस्तकात मला टीव्ही मालिका दिसत्येय.’ ‘या रोजनिशीतल्या पानांत मालिका?’ मला खरंच आश्चर्य वाटलं! ‘हो.. ही तुमची सगळी टिपरे कॅरेक्टर्स सीरियलसाठी अगदी करेक्ट आहेत. यातले विनोद, प्रसंग मला घडताना दिसतायत.’ त्याचा आत्मविश्वास बघून मी संमती दिली. त्याची आणखी एक मागणी होती. तो हटूनच बसला. मी त्यात काम करायला त्याला हवं होतं. आबांची- गंगाधर टिपरेंची भूमिका त्याच्या सांगण्यावरून मी केली. हे कबूल करायला हवं, की एकेका रविवारी टिपरे कुटुंबातल्या एकेका व्यक्तीच्या डायरीतली पानं लिहिताना मी रमत असलो तरी जास्त मजा मला आबांची ‘वासरी’ लिहिताना यायची. त्यांच्या स्वभावातले कंगोरे, छटा दिसायच्या. मी जास्त तपशील भरायचो. त्याचा उपयोग कदाचित ती भूमिका साकारताना झाला असावा. लिहितेवेळी अनुभवलेली आबांची स्वभाववैशिष्टय़ं अ‍ॅक्टिंग करताना (फार त्रास न घेता, ‘एफर्टलेसली’) दाखवणं मला सोपं गेलं.

टिपरे कुटुंबात तीन पिढय़ा होत्या. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, दृष्टिकोन वेगळे, मतं वेगळी.. पण त्यांना धरून ठेवणारे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि मायेचे धागे होते. आबांच्या खांद्यावर हात टाकणारा, त्यांच्या मांडीवर हक्काने लोळणारा तरुण नातू शिऱ्या, वडलांची घ्यावी तशी सासऱ्याची काळजी घेणारी सून शामला, ब्युटी काँटेस्टमध्ये कॅट-वॉक कसा करावा याची आबांकडून शिकवणी घेणारी नात शलाका, सकाळी घाईच्या वेळी बाथरूम अडवून एकाच वेळी आंघोळ आणि (तांब्यात पाणी भरून) व्यायाम करणारे आबा बाहेर येण्याची वाट बघत थांबलेला शेखर, शामलाला घरी यायला उशीर झाल्यावर तिला मदत व्हावी म्हणून घाईघाईत स्वयंपाकाचा प्रयोग करणारे आबा आणि प्रयोगातले पूर्ण बिघडलेले पदार्थ चवीने खाऊन त्यांना उत्तेजन देणारी घरातली मंडळी.. या साऱ्यातून त्यांची जवळीक दिसायची. छोटय़ा छोटय़ा घरगुती गोष्टींमधून घडणारं हे ‘संस्कृतीदर्शन’ होतं.

जरी मूळ लेखन माझं होतं, तरी मालिकेसाठी पटकथा केदार शिंदे आणि संवाद गुरू ठाकूरचे होते. सुरुवातीपासूनच या मालिकेला लोकप्रियता लाभली.

एक गंमत सांगण्यासारखी आहे. एकदा ‘नमस्कार अल्फा’ या ‘लाइव्ह’ कार्यक्रमात गंगाधर टिपरेंना (म्हणजे मला) टीव्ही चॅनेलवर बोलावलं होतं. लोकांना फोन करून आबांशी बोलण्याचं, प्रश्न विचारण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तो सुटीचा दिवस किंवा शनिवार-रविवार नसूनसुद्धा एका तासात अक्षरश: हजारो फोन्स आले आणि एमटीएनएलची लाइन ‘क्रॅश’ झाली, असं आम्हाला (तेव्हाच्या) अल्फा मराठी चॅनेलचे कार्यकारी निर्माते अजय भाळवणकर यांनी सांगितलं!

त्यावर्षीच्या एका मोठय़ा गणेशोत्सवात टिपरे फॅमिलीला बोलावलं होतं. तुडुंब गर्दी होती. एका कॉलेजच्या मुलीनं भाषणात सांगितलं, ‘समाजाचं प्रतिबिंब कलाकृतींमध्ये उमटतं असं म्हणतात. या मालिकेचं प्रतिबिंब समाजात उमटलं तर किती छान होईल!’ (श्रोत्यांबरोबर आम्हीही टाळ्या वाजवल्या.)

मालिका सुरू झाल्यावर ‘अनुदिनी’ पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीचं नाव उत्कर्ष प्रकाशनच्या सुधाकर जोशींनी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी’ असं ठेवलं. एकदम खप वाढला! (एकदा एक वाचक- अर्थात पुण्यातले- प्रकाशकांकडे जाऊन हातातलं पुस्तक नाचवत म्हणाले, ‘काल पाहिलेला ‘टिपरे’ मालिकेतला एपिसोड या पुस्तकात नाही. मग पुस्तकाचे नाव ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ कसें?’ हे मला कळताच मी पुढल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ‘..काही वेळा मालिकेमधील प्रसंग पुस्तकाबाहेरचे असतात. माध्यमाची मागणी म्हणून असे स्वातंत्र्य घ्यावे लागते,’ असं वाक्य लिहून टाकलं. उगाचच नंतर वादावादी नको!)

या पुस्तकाच्या आता सात आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मागे दूरदर्शनवर ‘चिमणराव’ मालिका चालू होती तेव्हा चिं. वि. जोशींच्या पुस्तकांचा खपही प्रचंड वाढला होता.

टी. व्ही. माध्यमाचा असाही उपकारक परिणाम वाचनसंस्कृतीवर होऊ शकतो!

..तर मागे वळून पाहताना माझ्या वाटचालीत असे अनेक टप्पे मला दिसतात. या ‘निमित्त’ ठरलेल्या माणसांनी माझ्या (आणि त्यांच्याही!) नकळत मला खूप काही दिलं आहे.
दिलीप प्रभावळकर

Story img Loader