सबंध जगाला दहशतवादाच्या कराल विळख्याने उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या ‘इस्लामिक स्टेट’ तथा ‘इसिस’ संघटनेचा उगम, तिची पूर्वपीठिका, मुस्लीम कट्टरतावाद्यांकडून तिला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्या जोरावर सर्व जगभर आतंकवादाचे थैमान घालण्याचा इसिसने लावलेला सपाटा आणि त्यापायी देशोधडीला लागलेले लोक.. या साऱ्या घटनाचक्राचा मागोवा..

अरबजगतातला वसंत ऋतू उत्सवी वातावरणाचा. ग्रीष्म ऋतूचा तडाखा सरून भूमध्य समुद्रावरून आल्हाददायक वारे वाहू लागतात. निसर्गाची चार-पाच महिनेच काय ती कृपा; त्यामुळे लोक खुशीत िहडा-फिरायला निघतात. पण २०११ मधल्या वसंत ऋतूचा नूर काहीसा आगळावेगळाच होता. क्रांतीचा जयजयकार करतच त्याने आगमन केलं. टय़ुनिशियात स्वातंत्र्याची तुतारी फुंकली गेली आणि एकच खळबळ उडाली. टय़ुनिशिया, इजिप्त, लिबिया, येमेन, बहारिन असं करत करत क्रांतिगीत सीरियन जनतेच्या ओठांवर जाऊन पोहोचलं.

या ‘वसंत क्रांती’च्या दरम्यान चर्चा करायला दुसरा विषयच नव्हता. प्रथमच असे खुले वारे अरब जगात एवढय़ा जोरदारपणे वाहत होते. माझे इथले सहकारी, विद्यार्थी, मित्रमंडळी सर्वच जण राजकारणावर भरभरून बोलत होते. शतकानुशतकाची कोंडलेली वाफ बाहेर पडत होती.

तहरीर चौकातला जनसमुदाय क्रांतीच्या लाटेवर डोलू लागल्यावर एका इजिप्शियन मत्रिणीचा आनंद ओसंडून वाहू लागला. थोडेथोडके नव्हे, तीस र्वष अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेल्या होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिल्यावर उत्साहाने ती म्हणाली, ‘‘आता आमच्या देशातही लोकशाही येणार, बघ.’’ पण पुढे या वाटेत अडथळे येऊ लागले, तसा तिच्या बोलण्यात निराशेचा सूर उमटू लागला.

त्याचदरम्यान लिबियन सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं काळजीचं जाळं दिवसागणिक गहिरं होत होतं. मुहम्मर गद्दाफी यांच्या राजवटीचा शेवट झाल्यावर आपल्या मायदेशी अंदाधुंदी माजेल, ही त्यांची शंका खरी ठरली.

सीरियाचे सर्वेसर्वा बशर अल् असाद यांचं सिंहासन उलथविण्यासाठी जनता नुकतीच पुढे सरसावली होती. त्यावेळी एक सीरियन विद्यार्थी सांगू लागला, ‘‘दमास्कसला राहणारे माझे काका मारले गेल्याचं कालच कळलंय. तिथे काय चाललंय, चुलतभावंडांची काय स्थिती आहे, हे कळायला काहीच मार्ग नाही. विमानतळ बंद करण्यात आलंय. फोनही बंद. त्यांच्याशी संपर्क करायला काही साधनच नाही.’’ गेल्या चार वर्षांत त्याच्या नातलगांसह लाखो सीरियनांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.

एक मूळचा इराकी विद्यार्थी.. अभ्यासात साधारण असला तरी मेहनती. त्याने त्याची खंत बोलून दाखवली- ‘‘काय करणार? शाळेत असताना अमेरिकेने इराकवर हल्ला केला. सर्वाची पळापळ सुरू झाली. मग कसली शाळा अन् कसलं काय? सगळंच संपलं. माझे आई-वडील बहारिनला आले, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. तिथल्या माझ्या मित्रांची अवस्था आता इसिसमुळे कशी असेल, कुणास ठाऊक!’’

चार-साडेचार र्वष उलटल्यानंतर या सर्व देशांमधल्या लोकांना एकच प्रश्न सतावतोय : ‘माझ्या मायदेशाचं भविष्य काय?’ २०११ मधल्या वसंतातल्या आनंदाची लाट कधीच ओसरलीय. त्यावेळचं आशावादाने भारलेलं वातावरण काळजी, भीती, अस्थर्य यांत रूपांतरित झालंय. हुकूमशाही राजवट परवडली असं म्हणण्याची वेळ काही ठिकाणी आली आहे. याला कारण- लोकशाहीच्या मार्गात धार्मिक मूलतत्त्ववादी शक्तींनी ठोकलेला तळ! वसंत-क्रांतीचा झंझावात ओसरला तसं इजिप्त आणि टय़ुनिशियात कट्टर सलाफी शक्तींनी डोकं वर काढलं, लिबिया आणि येमेनमध्ये अल् कैदाने जम बसवला, तर सीरिया आणि इराकमध्ये इसिसने पाय पसरवले.

इराक आणि सीरिया या दोन देशांच्या सीमाभागातला लाखो लोकांचा लोंढा आज सरावैरा धावतोय. जन्मभूमीत राहायचं म्हटलं तर करणार काय अन् खाणार काय? मुलाबाळांचं पुढे काय? ना शाळा उरलेल्या, ना इस्पितळ. सगळी भग्नावस्था. त्यात मध्ययुगीन व्यवस्थेत जगण्याची सक्ती!

यात या सामान्य लोकांचा दोष काय? तर त्यांचा जन्म झालाय- इराकमधल्या तग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांपासून इजिप्तमधल्या निळय़ा नाईलच्या खोऱ्यापर्यंतच्या अर्धचंद्राकृती पट्टय़ात! आजूबाजूच्या रखरखीत वाळवंटात हाच काय तो त्यातल्या त्यात सुपीक भाग. प्राचीन काळापासून सुमेरियन, अ‍ॅसीरियन, बॅबिलोनियन या संस्कृती इथे बहरल्या. पण आज याच प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या ऐतिहासिक ठेव्यावर घाव घालण्याचं काम इसिसकडून जोरदारपणे चाललंय.

या लोकांच्या दुर्दैवाच्या कहाणीची सुरुवात झाली ती दीड वर्षांपूर्वी. २०१४ मधला जूनचा महिना. मोसूल हे इराकमधलं उत्तरेकडचं शहर. तग्रीस नदीकाठी वसलेलं. रमझानचा महिना होता. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कडकडीत उपवास करायचा आणि संध्याकाळी मशिदीत प्रार्थनेसाठी जमायचं, हा लोकांचा वर्षांनुवर्षांचा परिपाठ. त्या दिवशी नमाजानंतर अबु बाकर अल् बगदादी चौथऱ्यावर चढले. हे इसिसचे प्रमुख. बगदाद शहरातल्या एका गरीब वस्तीत जन्मलेल्या ४४ वर्षीय अल् बगदादी यांचे हे खरे नावही नव्हे. अरबीमध्ये अबु म्हणजे वडील. व्यक्तीची ओळख मुलाच्या नावावरून करण्याची परंपरा; त्यानुसार कदाचित ते बाकरचे वडील! त्यांच्या खऱ्या नावाबद्दल जसे उलटसुलट प्रवाद आहेत, तसेच त्यांच्या खऱ्या चेहऱ्याबद्दलही.

त्यांनी जगभरातल्या मुस्लिमांना आवाहन केलं, ते इस्लामी राज्याकडे धाव घेण्याचं! आधी इराक आणि लेव्हंट (सीरिया आणि लेबनॉन या दोन देशांचा एकत्रित भाग!) या भागावर जम बसवून इस्लामी राज्य स्थापन करायचं आणि मग चहुबाजूने राज्यविस्तार करायचा, हे इसिसचं ध्येय. हा हेतू साध्य करण्यासाठीचं साधन म्हणजे दहशतवाद. त्यांनी स्वत:ला मुस्लिमांचा खलिफा घोषित केलं. त्या दिवसापासून या भागात खळबळ उडाली. जिवावर उदार होऊन इस्लामी राज्याच्या स्थापनेसाठी जगभरातून लोक इराक आणि सीरियाकडे धावू लागले. आणि इथले मूळ रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी इथून पळ काढू लागले.

तेव्हापासून इसिस हे काय प्रकरण आहे? ते अचानक कसं उद्भवलं? गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर हल्ले करूनही ही संघटना कशी फोफावतेय? यांना पसा कोठून मिळतो? असे अनेक प्रश्न जगभरातल्या लोकांना पडू लागले.

इसिस ही मुळात अल् कैदासारखी दहशतवादी संघटना. पण तिचा हेतू केवळ दहशतवाद पसरवणं एवढाच नाही, तर त्या जोरावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचा आहे. वेगवेगळय़ा नावांनी तिची ओळख. एक नाव- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ म्हणजेच ISIS. दुसरं नाव- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हंट’ म्हणजे ISIL. या संघटनेला आणि तिच्या नावातल्या ‘राज्य’ या शब्दाला कडकडून विरोध करणारे अरब तिचा ‘दाईश’ असा उल्लेख करतात. फ्रान्सनेही याच नावाला मान्यता दिली आहे. ‘दाईश’ या शब्दाचा अरबीमध्ये ‘पायाखाली चिरडणं’ असा नकारात्मक अर्थही आहे. अलीकडे फक्त ‘IS म्हणजे ‘इस्लामी स्टेट’ असाही तिचा उल्लेख होऊ लागलाय.

या संघटनेचा जन्म तसा पंधरा वर्षांपूर्वीचा. जॉर्डनमधला पॅलेस्टिनी निर्वासित अबु मुसाब अल् झरकावी हा या संघटनेचा संस्थापक. या दहशतवाद्याने २००० साली जॉर्डनच्या राजेशाहीविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. इस्लामी तत्त्वात राजेशाहीला स्थान नाही, हे त्यामागचं कारण. राज्याचा प्रमुख हा धार्मिक नेता म्हणजे खलिफाच असायला हवा, हा त्याचा आग्रह. हे बंड फसलं आणि झरकावी पाकिस्तानातल्या पेशावरमाग्रे अफगाणिस्तानात पोहोचला. तेव्हा तालिबानची राजवट अशा मंडळींसाठी अफगाणी गालिचे अंथरण्यात आघाडीवर होती आणि ओसामा बिन लादेनने त्यांना दहशतवादाचे धडे देण्यासाठी तिथे बठक मारली होती. अफगाणिस्तानमध्ये त्याचा जम बसतो- न बसतो तेवढय़ात २००३ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्यानंतर कर्दाशी हातमिळवणी करून झरकावीने इराकच्या उत्तरेकडे आपला तळ ठोकला. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. पुढे तो २००६ मध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. पण त्याने स्थापन केलेली संघटना नष्ट झाली नाही.

इराकवर अमेरिकेने केलेला हल्ला हे खरं तर ‘इसिस’ जिवंत राहण्याचं मूळ. सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध जॉर्ज बुश यांनी अनेक कुभांडं रचली. इराककडे रासायनिक अस्त्रं-शस्त्रांचा साठा आहे, तो अणुबॉम्बची निर्मिती करण्यात गुंतला आहे, सद्दाम हुसेन अल् कैदाला आश्रय देताहेत- अशा अनेक कारणांची ते जंत्री देत होते. वास्तविक ही रासायनिक अस्त्रं-शस्त्रं अमेरिकेनेच एकेकाळी इराकला प्रेमाने दिली होती. त्याचदरम्यान इराकला अणुभट्टी उभारून देण्यासाठी फ्रान्स पुढे सरसावलं होतं. अल् कैदाचा मुळापासूनचा इतिहास तोंडपाठ असणाऱ्या अमेरिकेने सद्दाम हुसेन यांचं अल् कैदाशी नातं असल्याचं सांगितलं खरं; पण ते सिद्ध करण्याचे कष्ट घेतले नाहीत. खरं तर अमेरिकेचं सन्य इराकमध्ये शिरल्यानंतर तिथं निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत अल् कैदाने इराकमध्ये प्रवेश केला.

इसिसच्या प्रश्नाचं कूळ-मूळ समजून घेण्यासाठी इराक आणि सीरिया या दोन देशांचं राजकारण समजून घेणं आवश्यक ठरतं.

इराकचा पट हा धर्म, पंथ, वंश यांच्या गोतावळय़ाने भरलेला. इराकच्या पश्चिमेकडचा अनबार प्रांत हा सुन्नींचा बालेकिल्ला. जॉर्डन आणि सीरियाला लागून असलेला हा भाग. सद्दाम हुसेन यांचा पाडाव झाल्यावर इथं अल् कैदाने आपली ठाणी उघडली. अमेरिकन सन्यावर आणि शियापंथीयांवर हल्ले करणं हा त्यांचा एकमेव कार्यक्रम. अल् कैदाचा बीमोड करण्यासाठी तेव्हा अमेरिकेने एक खेळी खेळली. स्थानिक सुन्नींनाच लष्करी प्रशिक्षण देऊन दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी फौज उभी केली. या फौजेचं नाव होतं- ‘इराकपुत्र’! काम तर फत्ते झालं. पण पुढे प्रश्न उभा ठाकला तो- या प्रशिक्षित सुन्नी फौजेचं काय करायचं? इराकच्या सरकारला ही डोकेदुखी बहाल करून २०११ मध्ये अमेरिकेने या वाळवंटातून आपला पाय बाहेर काढला. आता ही प्रशिक्षित फौज इसिसला आयतीच लाभलीय. या अनबार प्रांतातच आज या संघटनेने आपला जम बसवलाय.

२००६ मध्ये झालेल्या निवडणुकांपासून इराक धुमसतोय. इराकमध्ये शिया बहुसंख्याक; त्यामुळे निवडणुकीनंतर शिया- पंथीयांच्या हातात सत्ता गेली. शतकानुशतके सत्ता उपभोगणारे सुन्नीपंथीय बाजूला फेकले गेले. सुन्नी आणि शिया या दोन संप्रदायांतल्या वैराचा उगम इराकच्या भूमीतलाच. ते वैर पुन्हा उफाळून आलं. सुन्नीपंथीयांचा इराकच्या सरकारविरुद्ध रोष वाढला. आपल्या प्रांतांकडे सरकार दुर्लक्ष करतंय, आपल्याला नोकऱ्यांपासून, लष्करातल्या मुख्य पदांपासून वंचित ठेवलं जातंय, ही त्यांची तक्रार. दोन पंथांमधली ही दरी बुजवण्यात इराकचं सरकार अपयशी ठरलं आणि त्यात इसिसचं फावलं. अमेरिकेने आपलं सन्य इराकमधून मागे घेतल्यावर तर इसिसला वाळवंट मोकळं झालं. त्यात शेजारच्या सीरियात क्रांतीचं वादळ उठल्यावर तिथलंही वाळवंट तिला आपसूकच मिळालं.

सीरियावर असाद घराण्याची पकड १९७१ पासूनची. गेल्या चाळीस वर्षांपासून जनतेचा उठाव यशस्वीपणे चिरडण्याचा असाद घराण्याला दांडगा अनुभव आहे. सीरिया हा सुन्नीबहुल देश. पण राज्यकत्रे असाद मात्र अल्पसंख्याक असलेल्या शिया पंथातल्या अलवीत या उपपंथाचे. सीरियाच्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम दहा टक्के अलवीत पंथीय. असाद यांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी सीरियन जनता अनेकदा प्रयत्न करून थकली होती. बशर अल् असाद यांना बंड चिरडण्याचा वारसा पिता हाफीज अल् असाद यांच्याकडून मिळालेला. १९८२ ची घटना.. हाफीज अल् असाद अध्यक्ष असताना सीरियातल्या हमा या शहरात उठाव झाला. त्यांनी शहरवासीयांना महिनाभर कोंडून ठेवलं. सगळं शहर नेस्तनाबूत केलं. नंतर त्यावर बुलडोझर फिरवला. एका अंदाजानुसार, त्यांनी दहा हजारांच्या आसपास लोक मारले. तेव्हापासून सीरियन जनतेने उठावाची धास्तीच घेतली. पण २०११ मध्ये आजूबाजूच्या देशांमधल्या हुकूमशहांना पळता भुई थोडी झाली हे बघून सीरियन जनता पुढे सरसावली. यावेळी तरी आपल्याला यश मिळेल अशी तिला मोठी आशा होती. पण..

सुरुवातीला सीरियन क्रांतिकारक एका वेगळय़ाच भ्रमात वावरत होते. लिबियाच्या मुहम्मर गद्दाफींना ठेचण्यासाठी धावलेले पाश्चात्त्य आपल्यालाही मदत करतील, अशी त्यांना आशा होती. त्या आशेवरच तर पूर्वानुभव विसरून ते धाडसाने रस्त्यावर आले. परंतु आपल्या भूमीत लिबियासारखं उत्तम प्रतीचं तेल नाही, याचा या सामान्य लोकांना विसर पडला. आपल्याला मदत करून पाश्चात्त्यांना काय बरं लाभ होणार आहे? हा साधा विचारही त्यांच्या मनात आला नाही. शिवाय, बुश यांच्या युद्धखोरीनंतर अमेरिका आíथक विवंचनेत सापडलेली. त्यामुळे बराक ओबामा यांनी पुन्हा युद्धाच्या भानगडीत पडण्याचं टाळलं.

त्यात भरीला हुकूमशहा असाद यांच्या पाठीवर इराण आणि रशियाने हात ठेवलेला. पाश्चात्त्य देशांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत असादांच्या विरोधात पाऊल उचलायची तयारी केली की रशियाने त्यात अडथळा आणायचा, हे ठरलेलंच. असंच चित्र अरबजगतातलं. इराणची असाद यांना भरभरून मदत, तर सुन्नी राजवटींची उठावकर्त्यांना! जागतिक राजकारणातल्या ताणतणावांचं प्रतििबब सीरियाच्या क्रांतीत पडलं.

या सगळय़ा ताणाताणीत सीरियाचा प्रश्न चिघळला. पाश्चात्त्य आपल्याला मदत करायला राजी नाहीत, हे उठावकर्त्यांच्या बरंच उशिरा लक्षात आलं. त्यात आणखी या उठावकर्त्यांमध्ये एकी नाही, ही पाश्चात्त्यांच्या दृष्टीने एक मोठी अडचण. सीरियातला एक उठावकर्ता म्हणतो, ‘‘इथे सगळं उलटसुलट चाललंय. कोण आपल्या बाजूचं आणि कोण विरोधातलं, हे आता उमजतच नाहीए.’’ असाद यांची सत्ता उलथवल्यानंतर सत्ता कुणाच्या हाती द्यावी, हे पाश्चात्त्यांना न समजणारं कोडं. आपल्या विरोधातल्या आवाजाला हुकूमशहा वेळीच ठेचतात. आणि संधी मिळूनही विरोधकांना तात्काळ संघटित होणं शक्य होत नाही. विरोधकांमध्ये एकवाक्यता नसणं, ही मोठीच अडचण. लोकशाहीची मागणी करणाऱ्या निधर्मी शक्तींचा आवाज क्षीण होणं आणि धार्मिक शक्तींचा आवाज बुलंद होणं, हे अरबजगतातल्या सर्वच देशांचं कायमचं दु:ख आहे. याच साठमारीचा लाभ हुकूमशहा उचलतात आणि आपलं आसन बळकट करतात.

सीरियातही नेमकं हेच घडलं. ‘अल् नुसरा फ्रंट’ ही अल् कैदाची सीरियातली शाखा. तिने सीरियातल्या काही भागांत जम बसवल्यावर पाश्चात्त्य मागे सरले. लिबियातल्या अंदाधुंद परिस्थितीचं उदाहरण ताजं होतंच. आपल्या राजदूताला लिबियात जाळून मारल्यावर तर अमेरिका धास्तावलीच. असादांची सत्ता उलथवली तर अशाच शक्तींच्या हातात सत्ता जाण्याचा मोठा धोका दिसत होता. पाश्चात्त्य गोंधळलेले बघून असाद मात्र निर्धास्त झाले.

बरं, सीरियात लिबियासारखी अंदाधुंदता माजली तर त्याचा धोका शेजारच्या इस्रायललाही होता. त्यामुळे इस्रायलची काळजी घेण्यासाठी अमेरिकेला जपून पावलं उचलणं भाग झालं. परिणामी क्रांती करू इच्छिणाऱ्यांची पाश्चात्त्यांकडून मदतीची आशा मालवली. असादांची पकड अधिकच मजबूत झाली. काही भागावर अल् नुसरा फ्रंटने कब्जा बसवला. या सगळय़ा गोळाबेरजेत सामान्य जनतेचं जीवन उद्ध्वस्त झालं. असादांनी उठावाला चेचण्याच्या कामाला प्रारंभ केल्यावर सीरियन निर्वासितांचे तांडे शेजारच्या जॉर्डन आणि लेबनॉनमध्ये पोहोचले. कधीतरी सगळं सुरळीत होईल आणि आपण पुन्हा मायदेशी परतू, या आशेवर ते तिथल्या छावण्यांमध्ये आला दिवस ढकलू लागले.

पण परिस्थिती सुधारण्याची शक्यता तर दूरच राहिली; उलट सीरियातल्या या गोंधळाचा लाभ इसिसने घेतला. तिचे लढवय्ये इराकमधून इकडे वळले. त्यांचा मार्ग सोपा होता- आपल्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना आणि संघटनांना ठेचून काढायचं. दहशतीचं राज्य आलं. ‘विलायत अल् रक्का’ हा सीरियातला तुर्कस्तानला लागून असलेला प्रांत. सीरियन लष्कराकडून हा भाग बळकावल्यापासून रक्का हे इसिसचं राजधानीचं शहर झालंय. इसिसचा काळा झेंडा इथे जागोजागी फडकतोय. स्त्रिया बुरख्यात गुंडाळून घरात बंदिस्त झाल्या आहेत. पुरुषांना दाढी ठेवणं बंधनकारक झालंय. रस्त्यारस्त्यांवर इसिसची फौज करडी नजर ठेवून उभी. शाळांमधून विज्ञान, कला, इतिहास हे विषय बाद झालेत. शहरातल्या ख्रिश्चनांवर जिझिया कर लादला गेलाय. विरोध केला, कायदा मोडला तर भर चौकात मृत्युदंडाची शिक्षा ठरलेली.

एकेकाळची नांदती-खेळती गावं आता सीरियन लष्कर आणि इसिस या दोघांच्या तावडीत सापडली आहेत. घरंदारं मागे सोडून लोक पळताहेत. यात भांबावलेले अल्पसंख्याक ख्रिश्चन, कर्द, याझिदी यांच्याचबरोबर भयमुक्त जीवन जगण्याची इच्छा बाळगणारे मुस्लीमही आहेत. बरं, जाणार तरी कुठे? शेजारच्या तुर्कस्तान, जॉर्डन आणि लेबनॉनमध्ये आधीच निर्वासितांच्या छावण्या दाटीवाटीने भरलेल्या. या लोकांवर परक्या मुलखात जाऊन भीक मागण्याची वेळ आलीय. चिमुकल्या लेबनॉनच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्केप्रमाण आज सीरियन निर्वासितांचं आहे. इराकमध्ये जाणं म्हणजे आगीतून फुफाटय़ात पडण्यासारखं. आखाती देशांमध्ये काम मिळालं तरच प्रवेशाची संधी. अशावेळी या होरपळणाऱ्या लोकांना उत्तरेकडचा किनारा खुणावतोय. लहानशा जहाजांमध्ये कोंबून ते निघताहेत. मायदेशी राहिलो तर जगू-वाचू याची खात्री नाही, निदान युरोपात पोहोचलो तर दहशतीच्या छायेत रोजचं मरण तरी भोगावं लागणार नाही.

इसिसला आपलं राज्य विस्तारायचं आहे ते इराक, सीरिया आणि लेबनॉन या तीन देशांमध्ये. तिला या देशांमधल्या सीमारेषाच मान्य नाहीत. यामागे पहिल्या महायुद्धादरम्यानच्या साईक्स-पिको कराराचा इतिहास आहे. पंधराव्या शतकापासून अरब जगावर ऑटोमन साम्राज्याची सत्ता होती. आशिया आणि युरोप खंडात पसरलेल्या या अवाढव्य साम्राज्याची अवस्था पहिल्या महायुद्धापर्यंत ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी झालेली. रशियाच्या झारने त्याचं वर्णन आधीच ‘आजारी माणूस’ असं केलं होतं. १९१६ मध्ये ब्रिटिश अधिकारी साईक्स आणि फ्रेंच अधिकारी पिको यांनी टेबलावर ऑटोमन साम्राज्याचा नकाशा उघडला. पिकोने भूमध्य समुद्राला लागून असलेल्या भागावर हक्क सांगितला, तर त्याच्या खालच्या भागावर साईक्सने. झालं! पुढे अपेक्षेप्रमाणे तुर्काचा पराजय झाला. ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं. आणि व्हर्सायच्या तहाने अरब जगाचे तुकडे झाले. इराक ब्रिटिशांकडे गेलं; लेबनॉन आणि सीरिया फ्रान्सकडे. आता इसिस या रेषा पायदळी तुडवून एकच अवाढव्य इस्लामी राज्य वसविण्याच्या कामाला लागलं आहे.

इसिस धुमाकूळ घालू लागलं तेव्हा सुरुवातीला अमेरिकेने त्याकडे दुर्लक्षच केलं. इराकच्या वाळूत पुन्हा पाय टाकायला ती धजावत नव्हती. पण इसिसची फौज एक-एक शहर ताब्यात घेऊ लागली तेव्हा ओबामा प्रशासनाला हालचाल करणं भाग झालं. अमेरिकेने आपल्या नेहमीच्या साथीदारांना आणि आखाती देशांना सोबतीला बोलावलं. इराकच्या लष्कराला इसिसविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा आणि हवाई हल्ले करून इसिसची ठाणी उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम आखला गेला. परंतु खरा प्रश्न होता तो सीरियाचा. सीरियाचं सरकार तर शत्रुगोटातलं. त्यामुळे तिथल्या वाळवंटात घुसलेल्या इसिसचं काय करायचं, हा प्रश्न तसाच लटकलाय. दीड वर्षांनंतरही परिस्थिती नियंत्रणात येऊ शकलेली नाही.

दहशतवादी संघटनेचं काम चालतं ते जिवावर उदार होऊन लढणाऱ्या लोकांवर आणि विविध मार्गानी मिळणाऱ्या पशावर. इसिसने आपल्या फौजेत सामील होण्यासाठी जगभरातल्या मुस्लिमांना साद घातली. त्यासाठी इंटरनेटचा पुरेपूर उपयोग करून घेतला. देशोदेशीच्या लोकांना तिथे पोहोचण्याचा मार्ग तसा अवघडही नाही. तुर्कस्तानला जायचं आणि त्याच्या दक्षिण सीमेवरून सहजपणे सीरियात शिरायचं. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या हवाई हल्ल्यांनी इसिसची ठाणी उद्ध्वस्त होत असली, दहशतवादी मारले जात असले, तरीही इसिसला मनुष्यबळाची रसद मिळतेच आहे. इराक आणि सीरियाकडे जाणाऱ्या लढवय्यांना थोपवायचं कसं, ही समस्या आज आपल्या देशासह जवळजवळ ८० देशांपुढे उभी ठाकली आहे.

मनुष्यबळाचा ओघ तर सुरूच आहे. पशाचीही ददात नाही. अल् कैदा या दहशतवादी संघटनेमागे अब्जाधीश ओसामा बिन लादेनची प्रचंड धनदौलत होती. ‘बिन लादेन’ या सौदी अरेबियातल्या अवाढव्य पसरलेल्या उद्योगविश्वाचा ओसामा बिन लादेन एक वारसदार होता. संपत्तीची कमतरता नव्हती. शिवाय धनाढय़ अरब पाठीराखेही बिन लादेनजवळ थल्या मोकळय़ा करत होते. तसंच काहीसं इसिसचं. इसिसचं काम इराक आणि सीरियातल्या शियापंथीय सरकारांच्या विरोधातलं. त्यामुळे सुरुवातीला अरबजगतातल्या सुन्नी श्रीमंत वर्गाकडून तिला पसा मिळाला. त्या जोरावर तिचा पाया रचला गेला. नंतर तिने स्वत:चे मार्गही शोधले. आपल्या ताब्यातल्या भागातून खंडणी गोळा करणं, बँका लुटणं, लहान-मोठय़ा व्यावसायिकांडून जबरदस्तीने कर गोळा करणं, हे त्यातले काही मार्ग. इराकमधल्या मोसूल आणि सीरियातल्या रक्का प्रांतातल्या तेलविहिरींवर कब्जा केल्यावर तर पशाचा प्रश्न फारसा उरलाच नाही. तेलाचे बॅरल भरायचे आणि सीमापार करून तुर्कस्तानमध्ये काळय़ा बाजारात विक्री करून पसा आणायचा. या मार्गाने या संघटनेची महिन्याला लक्षावधी डॉलर्सची कमाई होत असल्याचे अंदाज आहेत.

या सगळय़ाचा अंत कुठे आणि कधी होणार आहे, हे मुख्य प्रश्न आहेत. जमेची बाजू एवढीच, की ओसामा बिन लादेन याच्यानंतर अल् कैदाच्या प्रमुखपदी बसलेला आयमन अल् जवाहिरी आणि इसिसचा प्रमुख अबु बाकर अल् बगदादी यांच्यात सख्य नाही. एकाच म्यानात दोन तलवारीची पाती कशी राहणार? म्हणूनच बगदादीने स्वत:ला मुस्लीम जगताचा खलिफा म्हणून घोषित करण्याला जवाहिरीचा विरोध आहे. असं असलं तरी परिस्थितीची दाहकता लवकर कमी न होणारी.

इराक, सीरिया आणि तुर्कस्तान यांचा सीमाभाग कायमच ठसठसणारा. इथे फोफावलेल्या इसिसचा समूळ नायनाट करणं नजीकच्या काळात शक्य होईल का? कदाचित इसिसची ठाणी उद्ध्वस्त होतील, त्यांच्या ताब्यात गेलेला भाग इराक आणि सीरियाचं सरकार परत मिळवतील, इसिसचे पाचपन्नास लढवय्ये मारले जातील; पण तरीही इसिसने पेरलेलं इस्लामी राज्याचं बीज पूर्णपणे नष्ट होईल असं चित्र दिसत नाही. सर्वात मोठा धोका आहे तो या इस्लामी राज्यात सामील झालेले सनिक आपापल्या देशांत इसिसचा झेंडा फडकावत परतण्याचा! हीच आज सर्व देशांना वाटणारी मोठी चिंता आहे.

दुसरी मोठी समस्या आहे, ती परागंदा होणाऱ्या लोकांची. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर लोकांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. लाखो निर्वासित युरोपातल्या देशांचे दरवाजे ठोठावत उभे आहेत. कुणी निर्वासितांना आत घेण्यासाठी उत्सुक, तर कुणी आपले दरवाजे घट्ट बंद केलेले. इसिसने युरोपातल्या देशांची डोकेदुखी वाढवलीय.

जेवढी भूमी अस्थिर, तेवढी ती धर्माध शक्तींची मुळं फोफावण्यासाठी पोषक! त्यातूनच दहशतवादाच्या शाखा उगवतात. संधी मिळेल तिथे थमान माजवतात. अरबजगताला स्थिर करणं, हे आज मोठंच आव्हान आहे. इथलं गुंतागुंतीचं धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, इतिहास यांतून वाट काढत या आव्हानाला तोंड देणं हे नजीकच्या काळात तरी शक्य नाही.

आणि तोपर्यंत भय इथले संपत नाही..

Story img Loader