इतके दिवस आपण त्याला दूरध्वनी यंत्र नावानं ओळखत होतो. तेव्हा तो लांब असायचा आपल्यापासून. म्हणजे गरज लागली तर त्याच्याकडे आपल्याला जावं लागायचं. कधी तो उच्चभ्रू दिवाणखाण्यातल्या एका कोपऱ्यात असायचा. कधी रस्त्यावरच्या खास पिवळ्या खोपटांत. ‘पीसीओ’ म्हणायचे त्याला. तर कधी लालभडक डब्यांत. रुपयाचं नाणं भरवावं लागायचं; मगच बोलायला लागायचा तो. तात्पर्य इतकंच, की त्याच्याकडे आपल्याला जावं लागायचं.
पण त्याचा मोबाइल झाला आणि सगळं जगणंच बदललं आपलं. खिशातच येऊन बसला तो. पुढे पुढे तर आपल्या शरीराचा अवयवच आहे की काय तो, असं वाटावं इतका तो आपला अविभाज्य भाग बनून गेला. सुरुवातीला फक्त शब्दसंवादासाठीच होता तो. मग मेसेज आले. चित्रसंदेश आले. चलत्चित्रं आली. सगळंच आलं. आणि आता तर तो बँक बनलाय. दुकान झालाय. इतकंच काय, तर तो मार्गदर्शकाचं काम करत आता रस्ताही दाखवतो.. इतका आज मोबाइल फोन आपल्या जगण्याचा भाग बनून गेलाय.
आणि आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर ‘डिजिटल इंडिया’च करायला निघालेत. मग तर या मोबाइलचं प्रस्थ किती आणि कसं वाढेल याची कल्पनाही करवत नाही. आपली इंडिया डिजिटल व्हायला लागली की मोबाइल फोनचा वेग वाढणार आहे; आणि सर्वदूर त्याचा प्रसारदेखील होणार आहे. सध्याच सव्वाशे कोटी भारतीयांसाठी प्रातर्वधिीसाठी पुरेशी स्वच्छतागृहं नाहीत; पण त्यांच्या हाती मोबाइल मात्र आहेत. ‘डिजिटल इंडिया’ झाल्यावर तर मग बघायलाच नको.
इतके दिवस व्यापारउदिमाच्या कामात मोबाइलनं हातपाय पसरले होते. आता तो कलाप्रांतातही शिरलाय. यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे त्याचंच प्रतीक! ही मोबाइलमग्न स्त्री रेखाटली आहे विख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. पण कशी? अॅपलच्या नव्या आयपॅड आर्ट पेजवर! ही सगळी कलाकुसर आता फोनवरही करता येऊ शकणार आहे.
म्हणजे उपयुक्तता, व्यापारउदिमातली गरज म्हणून ओळखला जाणारा हा मोबाइल फोन आता आपल्या कलाजाणिवांचाही आधार होऊ लागणार आहे तर!
तेव्हा अशा तऱ्हेनं ही मोबाइलमग्नता हळूहळू वाढतच जाणार अशी लक्षणं आहेत. कोणतीही मग्नता वाढली की वास्तवाकडे दुर्लक्ष होतं. पण जनतेनं वास्तवाचा विचार करू नये, हेच तर नसतं का कोणत्याही सरकारचं उद्दिष्ट?
समाजाचा एक मोठा घटक या मोबाइलमग्नतेत रमलाय. पण सुदैवानं तितकाच एक मोठा घटक या मग्नतेतून बाहेरदेखील पडू लागलाय. यंदाच्या वर्षांत याची चुणूक दिसली.
आताचा हा दीपोत्सव अधिकाधिकांना मोबाइलमग्नतेच्या अंधारातून बाहेर काढो, या शुभेच्छांसह..
आपला..
गिरीश कुबेर