हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नासीरुद्दीन शाह यांच्या ‘अॅण्ड देन वन डे..’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद चतुरस्र लेखिका आणि चित्रपटकार सई परांजपे करीत आहेत. नासीर यांनी घरातून पळून जाऊन मुंबईत अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत शिरकाव करण्यासाठी केलेल्या अनेक उपद्व्यापांचे चित्रण करणारा त्यातील काही अंश..
आता ‘शाळा (कायमची) सुटली, पाटी फुटली’ याचा ब्रह्मानंद फार काळ टिकला नाही. पास झाल्याबद्दल बाबांनी मला माझं पहिलंच घडय़ाळ दिलं. मी केलेली अविरत प्रार्थना हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी मला आवर्जून सांगितलं. मला मनातल्या मनात हसू येत होतं. माझ्याशी वार्तालाप करणारा देव चांगलाच भोळसट असला पाहिजे. झहीर एव्हाना आय. आय. टी. मध्ये दाखल झाला आहे याची पण मला आठवण करून देण्यात आली. नशीब, की मी त्याचा कित्ता गिरवावा असं काही नाही सुचवलं. पण परराष्ट्र सेवा, IAS, चहाचे मळे आणि अगदी शेतकी विद्यालयसुद्धा- यांचा विचार करण्यात आला. दुसरा झकार आता राष्ट्रीय रक्षा अकादमीत होता. मी पण तिथे दाखल होण्याबद्दल चर्चा झाली आणि काहीशा नाखुशीने मी तिथे अर्ज धाडून दिला. झकार NDA मधून जेव्हा प्रथमच घरी परतला तेव्हा आम्ही सगळे दिपून गेलो होतो. उंचापुरा आणि देखणा असल्यामुळे तसा तो नेहमीच लक्ष वेधून घेत असे. पण त्या दिवशी नुकत्याच वाढवलेल्या भरघोस आडव्या मिश्या आणि कॅडेटचा युनिफॉर्म अशा थाटात तो जेव्हा पहिल्या वर्गाच्या डब्यातून उतरला तेव्हा जवळच उभ्या असलेल्या एका पोलिसाने त्याला कडक सलाम ठोकला. मला थेट स्टेजवर प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या मिस्टर केंडलची आठवण झाली. तोच डौल. तोच रुबाब. दोन-तीन क्षणांपुरतं मीही दिवास्वप्न पाहिलं. मीही NDA मध्ये होतो. आता घरी परतत होतो, सगळ्यांना थक्क करणार होतो.. पण शाळेत असताना मी दोन-चार वेळा एन. सी. सी.च्या कॅम्पस्ना गेलो होतो. इतर कॅडेट्सबरोबर तंबूंमधून झोपलो होतो. या कॅडेट्सचा एक आवडता उद्योग म्हणजे रात्री उशिरा गाढ झोपी गेलेल्या कुणा बापडय़ाच्या नुन्नीला लांब दोरा बांधून तो तंबूच्या छतामधून बाहेर काढून पतंगाला जोडायचा. या दिवसांची आणखी एक आठवण म्हणजे गारठवणाऱ्या थंडीमध्ये कुणीतरी पेकाटात लाथ घातली म्हणजे उठायचं आणि कडक गणवेश घालून दुखणाऱ्या पाठीने परेडला जायचं. त्यानंतर आपापले टमलर (याचाच उपयोग टमरेल म्हणूनही करायचा.) आणि थाळे घेऊन रांगा लावायच्या आणि मिळेल ते आंबोण गिळायचं. पुन्हा कवायत..! हे आयुष्य मला अजिबात मंजूर नव्हतं. पण तरीसुद्धा ‘टोकदार मिश्या आणि आर्मीचा चुस्त युनिफॉर्म’ अशी स्वत:ची टेचदार छबी कल्पून मी हा अर्ज केला. झकारने मग लवकरच बुडबुडा फोडला. जरी त्यांना घोडेस्वारी, शिडाची बोट चालवणं, मुष्ष्ठियुद्धामधले डावपेच आणि शस्त्रनिपुणता हे सगळं शिकवलं; आणि जरी एका वर्गाहून दुसऱ्या वर्गाला सायकलवरून जायची मजा त्यांच्या नशिबी असली; तरी गणितापासून त्यांची काही सुटका नव्हती. बंदूक धरली आणि तालेवार दिसलं की काम संपलं असं अजिबात नव्हतं. त्यापलीकडेही बरंच काही होतं. माझा स्वत:चा तर NDA ला जाण्याचा एकमेव उद्देश युनिफॉर्म घालून छाप पाडणे हाच होता. पण ही नवलाई फार तर एक पंधरवडा टिकेल- आणि मग माझी सहनशक्ती कल्पिल्यापेक्षाही आधी आटून जाईल, हे मी मनोमनी ओळखून होतो. शिवाय साला युनिफॉर्म तर मी नट झाल्यावरसुद्धा हवा तेवढा घालू शकणार होतोच की. मग?
दिल्लीच्या लब्धप्रतिष्ठित सेंट स्टीफन्समध्ये जाण्याचा मी विचार केला आणि पत्राद्वारे त्यांना प्रवेशपत्रिका धाडण्याची विनंती केली. पण मला उत्तर धाडण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत. माझं गिचमिड अक्षर कदाचित त्यांना लागलं नसेल. कधी कधी तर मी काय लिहिलं आहे, ते माझं मलाच उमजत नाही. तर आता एकच पर्याय उरला होता. माझ्या कुटुंबाच्या दोन पिढय़ा ज्या संस्थेत शिकल्या होत्या, त्या अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये दाखल होणे. हे विद्यालय भव्य वास्तुशिल्प आणि उदात्त उद्देशांचा प्रदीर्घ इतिहास अशा जमेच्या बाजू असूनही काळाच्या कचाटय़ात सापडून जागीच उभे राहिले आहे. वास्तविक सुसंस्कृत आणि प्रगल्भ विचारांच्या मुसलमान तरुणांच्या पिढय़ा निर्माण करून, त्यांच्याकरवी आपल्या समाजाची प्रगती आणि भरभराट घडवून आणायला हातभार लावणे आणि बाकीच्या देशाबरोबर हातमिळवणी करणे; ही या संस्थेची मूळ उद्दिष्टं होती. ती साध्य करणं तर दूरच; पण ही संस्था सध्या कर्मठ जातीयवाद, किंबहुना अतिरेकी धर्माध विचारसरणीचा प्रसार करणारी बजबजपुरी बनून राहिली आहे. पोशाख आणि रिवाज याबद्दल कडक नियम तिथे अजूनही लागू आहेत. दुर्दैवाने सालस विचारसरणी आणि नैतिक आचार यांच्याविषयी मात्र उदासीनता आढळते.
अलिगढमध्ये पदवीपूर्व वर्ग हे संमिश्र (मुलामलींचे एकत्र) नव्हते. तेव्हा मला तिथे शिकायची इच्छा झाली नाही. मी पुन्हा एकदा बाबांना मला शास्त्राऐवजी साहित्य घेऊ देण्याबद्दल विनंती केली. पण ते तर आता मला डॉक्टर व्हायचे तर राग कसा आटोक्यात ठेवावा लागेल, याबद्दल प्रवचन देऊ लागले होते. मग पांढरा कोट घालून, गळय़ात स्टेथोस्कोप लटकावून कॉरिडोरमधून डावी-उजवीकडे हाताखालच्या लोकांना सूचना देत देत झपाझप चालताना मी किती रुबाबदार दिसेन याचीच कल्पना करीत मी स्वत:ची समजूत घातली आणि शास्त्र शाखेसाठी अर्ज केला. माझी टक्केवारी फारच कमी असल्यामुळे तो नामंजूर झाला. AMU कधीच कुणाला डावलत नाही असं मला आश्वासन देण्यात आलं होतं. हताश होऊन बाबा मला परत मीरतला घेऊन गेले. मग जास्त काही सोपस्कार न होता तिथे प्रसिद्ध वकील असलेल्या एका चुलतभावाच्या मदतीने मला NAS कॉलेजात प्रवेश मिळाला. काही कारणाने या कॉलेजला नानकचंद कॉलेज म्हणून ओळखत. कारण काय ते मला ठाऊक नाही, पण ते वाजवीच असणार यात शंका नाही. फक्त मी छडा लावू शकलो नाही, कारण माझं तिथलं वास्तव्य फार काळ लांबलं नाही. NAS ला वसतिगृह नव्हतं. तेव्हा बाबांचे एक काका मासूम अली शाह यांच्याकडे माझी सोय करण्यात आली. कॅन्टोन्मेंटमध्ये त्यांचा मोठा पसरट बंगला होता. बाबांप्रमाणेच ते निवृत्त डेप्युटी कलेक्टर होते. सगळे जग त्यांना ‘डिप्टीसाब’ म्हणून ओळखत असे. ते वारले तेव्हा सरढाण्याच्या ‘डिप्टीसाहेबा’चं लोण बाबांकडे आलं.
पोर्चजवळची वापरात नसलेली खोली मला देण्यात आली. मला वाटतं की आम्हाला भाडं द्यावं लागे. खोली स्वच्छ करून ती मी राहण्याजोगती ठेवावी अशी अपेक्षा असे.
आहा, आनंद! माझी हक्काची जागा. पॅलेस सिनेमापासून हाकेच्या अंतरावर. आता मी स्वतंत्र होतो. आणि या स्वातंत्र्याचा मी पुरेपूर गैरफायदा घेऊ लागलो. डिप्टी आजोबांचा बंगला एक सैन्य मावेल एवढा मोठा होता. त्याच्या वेगवेगळय़ा भागांत तीन कुटुंबं राहत होती. त्यातल्या माझ्या वयाच्या मुलांबरोबर मी काही वेळ घालवत असे. पण त्या कुणालाच सिनेमाचा नाद नव्हता. कुणी क्रिकेटही खेळत नसे. NAS च्या कॉलेजच्या संघाने मला नेट्समध्ये माझं कसब अजमावायला सांगितलं. यापूर्वी कधीच कॉलेजच्या पातळीवर मी खेळलो नव्हतो. संरक्षण न वापरताच मी मजेत बॅटिंग करायला उतरलो. बॉल भलतीकडेच बसला. आणि अर्थातच मग क्रिकेटपटू म्हणून माझा प्रभाव पडला नाही. त्यानंतर कैक र्वष मी क्रिकेटपासून चार हात दूरच राहणार होतो. पण ते केवळ बॅटिंगच्या या विक्रमामुळे नाही.
NAS ने माझ्यासाठी फारसं काहीच नाही केलं. सांगण्यासारखं. हा, एकदा एका स्थानिक गुंडाशी माझी बाचाबाची झाल्यावर पाच-सहाजणांनी मला बेदम चोपलं होतं; आणि रोज सकाळी मी सायकल मारीत एका मोक्याच्या ठिकाणी पोचून तिथून जवळच्या रघुनाथ गर्ल्स कॉलेजला जाणाऱ्या मुलींना बघण्याचं नेत्रसुख घेत असे, एवढंच. माझा सगळा पॉकेटमनी आणि वर शिवाय कॉलेजात जमा करायच्या रकमेमधला बराचसा भाग पॅलेस सिनेमाचा गल्ला भरण्यात जात असे. पॅलेस आता ओस पडलं आहे. वेगवेगळय़ा हकदारांची त्याच्यावरून बाचाबाची चालू असावी. ब्रिटिशांच्या राज्यात त्या जागी पोहण्याचा तलाव होता असं मला नंतर कळलं. तरीच तो नेहमी दमट वाटे. नंतर त्याचे थिएटरमध्ये रूपांतर झाले तरी तळाचा उतार तसाच राखण्यात आला. त्यामुळे भिन्न दराच्या प्रेक्षकांसाठी जागा ठरवणे सुकर झाले. तलावाच्या सगळय़ात उथळ भागात- म्हणजे वर उंचावर बाल्कनीवाले बसू लागले. या सिनेमागृहात फक्त अमेरिकन आणि ब्रिटिश सिनेमे दाखवले जात. दर तीन दिवसांनी कार्यक्रम बदलायचा. मी प्रत्येक सिनेमा अधाशासारखा पाहिला. फिल्मी किडा माझ्या रक्तवाहिनीत शिरला होता. त्याचा वंश बळावत होता आणि माझ्या अवघ्या अस्तित्वाचा त्याने कब्जा घेतला होता.
मुंबईला जाण्याची कल्पना मला प्रथम केव्हा सुचली, ते आता नाही स्मरत. पण एके दिवशी अचानक आठवण झाली, की जे. आर. ची एक मैत्रीण S.M. मुंबईला होती आणि तिचे वडील चरित्र अभिनेते होते. माझं गाढं अज्ञान असं, की चित्रपटसृष्टीमधला कुणीही मला काही ना काही काम मिळवून देऊ शकेल असा माझा प्रांजळ समज होता. काम काही का असेना, सुरुवातीला मी काही नखरे करणार नव्हतो. स्वत:च्या प्रमुख भूमिका असलेल्या काल्पनिक सिनेमांची पोस्टर्स रेखाटण्यामधून वेळ काढून, मी S.M. शी पत्रव्यवहार सुरू केला. कालांतराने तिला माझ्या स्वप्नांची पण कल्पना दिली. आणि मुंबईला येण्यात काही हशील आहे का, हे तिलाच विचारलं. तिनं माझ्या उत्साहावर पाणी नाही फिरवलं. उलट, वडील शक्य ती मदत करतील असं आश्वासन दिलं आणि तिच्याकडे राहण्याचं आमंत्रणही दिलं. तिच्या दिलदारपणामुळे मला कैफ चढला आणि कॉलेजच्या फीचा एक मोठासा हिस्सा खर्च करून मी एक महिन्यानंतरच्या डेहराडून एक्स्प्रेसचं तिकीट काढलं. ही गाडी तेव्हा डेहराडूनहून निघून थेट मुंबईला जात असे; वाटेत मीरतच्या प्रवाशांना उचलून! आपलं घडय़ाळ, सायकल, पुस्तकं आणि गरम कपडे मी विकायला काढले. मुंबईला कशाला लागणार होते गरम कपडे? एकूण सगळे मिळून सुमारे ५०० रुपये हाती येणार होते. मुंबईच्या थोडय़ा दिवसांच्या मुक्कामासाठी एवढे बस्स झाले. नंतर मग पैशाचा धूरच धूर, महागडय़ा रेस्त्राँमधून मेजवान्या आणि चाहत्यांना स्वाक्षऱ्या देणं!
तर मी मुंबईला निघालो होतो. खऱ्याखुऱ्या नटाच्या घरी राहणार होतो. तो माझ्यासाठी ‘शक्य ती मदत’ करणार होता. आणि मी प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान होणार होतो. यात काही घोटाळा होण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात मर्फीबद्दल, किंवा त्याच्या कायद्याबद्दल (जर काही चुकण्याची शक्यता असेल तर ते चुकणारच.) मी त्यावेळेला अनभिज्ञ होतो.
मला उतरवून घ्यायला ते बॉम्बे सेंट्रलला आले होते. S.M., तिचा सख्खा भाऊ आणि चुलीपलीकडचा एक भाऊ युसूफ. देव त्यांचं भलं करो! पुढे युसूफबरोबर मी बराच वेळ घालवत असे. मला वाटतं, की मला न्यायला एखादी लिमोझिन गाडी येईल आणि तिच्यात बसून आम्ही त्यांच्या महालनुमा घरी जाऊ अशी माझी काहीशी अपेक्षा होती. सगळे नट ऐषोरामात राहतात असा माझा समज होता. लिमोझिन वगैरे काही नव्हती, पण एका इराण्याकडे चहा आणि खिमापाव मात्र होता. त्याच्यावर आम्ही ताव मारला. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीशी माझी ती पहिली ओळख. मग म्हणे ज्याला ‘लोकल’ म्हणून संबोधतात, त्या आगगाडीतून बांद्रय़ापर्यंत प्रयाण. S.M. बांद्रय़ाला राहत होती. तिथून पुढे टॅक्सी. मेहबूब स्टुडिओ अगदी दिसेनासा होईपर्यंत मी मान वेळावून पाहत राहिलो. मीसुद्धा नाही कल्पना करू शकणार अशा वेगाने माझी स्वप्नं साकार होत होती.
साजिऱ्या माऊंट मेरीवरून आम्ही वर गेलो आणि आयुष्यात प्रथमच मी अरबी समुद्र पाहिला. मग एका बंगल्याच्या पोर्चमध्ये टॅक्सी थांबली. हा बंगला मासूम व्हिलापेक्षा लहान होता; पण कमी शानदार नव्हता. शिवाय बंगला तर होता! ‘तू इथे राह्य़चंस..’ मला सांगण्यात आलं. घराची तारीफ करायला मी शब्द शोधत होतो तेवढय़ात एक मध्यमवयीन स्त्री- तिची मावशी अवतरली. ती बंगल्याची मालकीण असल्याचं मला सांगण्यात आलं. माझ्या नशिबाला पारावार उरला नव्हता. हे जर मावशीचं घर- तर तिचं स्वत:चं घर कसं असेल याचा अंदाजच मी नाही करू शकलो. मला मावशी आत घेऊन गेली. काहीशा धास्तावलेपणानं.. हे मला नंतर सांगण्यात आलं. तिची कुशंका नंतर अगदी रास्त ठरली. मी फार तर एक-दोन आठवडे राहणार- या भाबडय़ा समजुतीखाली मला थारा देण्यासाठी तिला गळ घालण्यात आली होती. जाण्याचं नावच काढण्याचा माझा इरादा नाही, हे त्या बापडीला स्वप्नातसुद्धा वाटलं नाही. S.M. ला जेव्हा मी माझं हे मनोगत सांगितलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा हलली नाही. मला समुद्रकिनाऱ्यावरून चक्कर मारून यायला तिनं सांगितलं. मी त्याप्रमाणे फेरी मारून आलो. माऊंट मेरीमधला नेमका कुठला बंगला आपण पुढे-मागे खरेदी करायचा, याचा निर्णय होईना तेव्हा मी परतलो. घरामध्ये माझ्याचवरून प्रचंड मोठी वादळी चर्चा चालू होती.
माझ्या जाण्याबद्दलची, किंवा न जाण्याबद्दलच्या माझ्या इराद्याची कल्पना सगळ्यांना देण्यात आली होती आणि वातावरण विलक्षण तंग होतं. तिच्या वडलांनी माझ्याकडे करडय़ा कुतूहलाने पाहिलं आणि १६ व्या वर्षी मी बालकलाकार म्हणून मोठा आणि इतर नेहमीच्या भूमिका करायला छोटा असल्याचं आपलं परखड मत जाहीर केलं. मग मी आवेशाने ‘दोस्ती’चं उदाहरण मांडलं. त्यात माझ्याच वयाची दोन मुलं होती आणि तो सिनेमा भलताच गाजला होता. मग तोंडातल्या तोंडात ते ‘चेहरेपट्टी’बद्दल काहीसे बोलले. ते मला नीट ऐकू नाही आलं. मग पुढे-मागे आपण स्वत: दिग्दर्शित करणार असलेल्या सिनेमांत मला एकदा रोल द्यायचं त्यांनी कबूल केलं. पण त्याला अवकाश असल्यामुळे सध्या मी घरी जावं असंही त्यांनी सुचवलं. वेळ आली की ते माझ्या वडलांशी बोलणी करतीलच. त्यांच्यापुरता त्यांनी प्रश्नाचा सोक्षमोक्ष केला होता. परंतु आपला खानदानी हक्क असल्याच्या आविर्भावात आणि अत्यंत उर्मट शब्दांत मी ‘जाणार नाही’ असं जाहीर केलं. त्या प्रसंगाची आठवण झाली की आजही माझी मला शरम वाटते. एक मोठ्ठा उसासा सोडून तिचे वडील गप्प झाले. या चर्चाकांडाच्या दरम्यान S.M. मख्ख चेहऱ्याने बसली होती. तिने कसलाच थांग लागू दिला नाही. सुमारे महिनाभर चाललेल्या या नाटय़ादरम्यान तिच्या संपूर्ण कुटुंबाला मी किती अवघड परिस्थितीत लोटलं होतं; आणि वर मला जेवू-खाऊ- राहू देण्याचा भार त्यांच्यावर टाकला होता, त्याबद्दल कधी चकार शब्दही तिने काढला नाही. याबद्दल मी तिचा आजन्म ऋणी आहे. एवढंच नाही, तर एकदाही मला ‘आता मार्ग सुधार’ असंही तिने सुचवलं नाही. मलाही अर्थात ते सुचलं नाही. महिन्याभरात मावशीच्या सहनशक्तीचा मात्र अंत झाला. पण तरीही मला सरळ ‘जा’ म्हणून कुणी सांगितलं नाही. उलट, तो बंगला पाडायचा आहे अशी कपोलकल्पित कथा रचून मला दुसरीकडे आपली सोय पाहण्याची विनंती करण्यात आली.
लिंकिंग रोडवर बेकार नट मंडळींचा एक अड्डा होता. पंपोश रेस्त्राँँ. हजारो नवजात स्वप्नांची आणि तितक्याच चुराडा झालेल्या आकांक्षांची बाजारपेठ! आपल्या लिमोझिनमधून मोठय़ा दिमाखात भुर्रकन् जाणारे मशहूर सितारे कधी कधी तिथून दिसत. तर कधी कमी यश पदरात पडलेले होतकरू फुटपाथवरूनच मिरवताना नजरेस पडत. काहीजण बिचारे कटिंग चहाच्या पेल्यात आपल्या नशिबाचा ठोकताळा आजमावत राहत. मी आता भेडचाळीमध्ये सामावलो होतो. माझ्याकडचे पैसे कधीच संपून गेले होते. पण S.M.- जरी हल्ली ती जास्त व्यस्त भासू लागली होती तरी- मला माझ्या गरजेच्या वस्तू पुरवत असे. अधूनमधून कुणी अनोळखी भला इसम फुकट चहा पाजी. जेवण तिच्याकडे होई- लिंकिंग रोडला. तिच्या घरी मी प्रथम गेलो तेव्हा मला तिथे राह्य़ला का बोलावलं नाही, याचा उलगडा झाला. एका खोलीत घरचे सहाजण राहत होते. दूरचा भाऊ; शिवाय उपरा. छोटय़ा ट्रेवर वाढून दिलेलं ताट मी बाहेरच्या छोटय़ा पोर्चमध्ये बसून जेवत असे. तोंडी लावायला आता ‘काम मिळवायला काही हालचाल कर जरा’ किंवा सरळ ‘आता घरी जा’ अशा सूचना सुरू झाल्या. माऊंट मेरीच्या बंगल्यामधून साग्रसंगीत उचलबांगडी होण्याची वेळ समीप येऊन ठेपल्यानंतर युसूफने माझ्यासाठी झोपण्यापुरती जागा हेरली. शहराच्या मध्यवर्ती- मदनपुऱ्यामध्ये एक मोठा हॉल होता. अगदी बकाल असा. दिवसा हॉलमध्ये जरीकामाचा कारखाना चाले. गृहउद्योग. रात्री तिथे तीसजणांची झोपायची सोय होई. प्रत्येकी दहा रुपये महिना देऊन. ठरावीक नेमस्त जागा आणि सामान ठेवायला लहानसा कोनाडा अशी सवलत. सकाळी नऊ वाजताच बाहेर पडायचं.. जायला कुठे जागा असो वा नसो. मला होती. बांद्रा अणि पंपोश. मदनपुऱ्याच्या महिना- दीड महिन्याच्या वास्तव्यात मी रोज दोनदा तरी लोकल गाडीने बिगरतिकीट प्रवास करीत असे. पण एकदाही पकडलो गेलो नाही. बांद्रा स्टेशनमधून बाहेर पडण्याचा छुपा मार्ग मला भावाने दाखवला होता. बॉम्बे सेंट्रलचा चोरदरवाजा तर माझा मीच शोधून काढला. माझा रक्षक देवदूत ओव्हरटाइम करीत होता, हे नक्की!
त्या काळात एका विचित्र वैराग्याने मला पछाडलं होतं. ती उदासीन अवस्था नंतरही बराच काळ टिकून राहिली. आपलं भवितव्य, आपलं रिकामं पोट, नोकरी मिळण्याची शक्यता, काळजीनं विदीर्ण झालेले आपले आई-बाप.. कशाकशाची म्हणून मला तमा वाटली नाही. याचं कारण मी आजही सांगू शकत नाही. किंबहुना मी ते कधी नीट समजूच शकलो नाही. S.M. आणि तिच्या कुटुंबाच्या ढोसणीमुळे मी काही थोडी हालचाल करीत असे, एवढंच. तिच्या वडलांच्या एका चाहत्याने (मुंबई शहरात अगदी मामुली नटालादेखील चमचे असतात.) मला एका सुबक ठिकाणी वसलेल्या बाटरेरेल्डी नावाच्या रेस्त्राँमध्ये नेलं. एका बाजूला रेसकोर्स, दुसऱ्या बाजूला समुद्र. तिथला मॅनेजर त्याच्या ओळखीचा होता. त्याच्यामार्फत मला स्टुअर्डची नोकरी मिळवून द्यायची अशी योजना होती. स्टुअर्डला टीप मिळते किंवा नाही, याबद्दल मी जरा विचारात पडलो आणि वेटरचीच नोकरी बरी असं मनात ठरवलं. अर्थात तिथला मॅनेजर आता तिथे मॅनेजर नव्हता राहिला, तेव्हा तो समग्र बेत ओमफसच झाला. त्यांना तूर्तास वेटर नको होते, तेव्हा तोही प्रश्न मिटला. शिवाय वेटरची नोकरी मिळवणं, हे मला वाटलं होतं तेवढं सोपं नव्हतं. बश्या विसळण्यापासून सुरुवात करावी लागते. मेन्यू तोंडपाठ तर हवाच; पण कशात काय घातलं आहे याची नेमकी माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे. बाटरेरेल्डीमध्ये मी प्रथमच एक सिनेमा नट जवळून पाहिला. अगदी क्लोजअपमध्ये. ‘चमच्या’ने त्याला ‘हॅलो’ म्हटल्यावर त्याने उलट अभिवादन केलं आणि मी सर्द झालो. वा! फिल्मी सिताऱ्याला ‘कसं काय? ठीक?’ म्हणायला ओळख असावीच लागते असं नाही, हे तेव्हा कुठं मला ठाऊक होतं? बहुतेकजण यांत्रिकपणे हसून उत्तर देण्याचं सौजन्य पाळतातच.
माझं बूड हलवण्याचा आणखी एक क्षीण प्रयत्न मी केला, तो युसूफच्या पुढाकारामुळे. एक दिवस तो वर्तमानपत्र फडकावीतच उगवला. ताजमहाल हॉटेलमध्ये बेल बॉईज हवे असल्याची ती जाहिरात होती. अठरा ते पंचवीस वर्षांच्या दरम्यान वय, माध्यमिक शाळा पासचा दाखला, उमदं व्यक्तिमत्त्व आणि इंग्रजीची जाण- या अटी होत्या. पगार २०० रुपये महिना. वयाच्या बाबतीत काहीतरी गोलमाल करता येईल. बाकीच्या दोन अटी तर चपखल बसत होत्या. अर्थात मी बऱ्याच दिवसांत आरशात डोकावून आपले केविलवाणं प्रतिबिंब पाहिलं नव्हतं, ही गोष्ट वेगळी. अर्जाबरोबर एक पासपोर्टच्या आकाराचा फोटो धाडायचा होता. युसूफने- देव त्याचं भलं करो- दोन रुपयांची नोट पैदा केली आणि मी कष्टपूर्वक फॉर्म भरून एकदाचा हा महागडा उपचार पुरा केला. फोटो फॉर्मला जोडून आम्ही लोकलने चर्चगेट गाठलं आणि मग ताजवर पायी पायी स्वारी केली. नोकरी ही माझ्यासाठी ठरलेलीच होती. अगदी दगडावरची रेघ! सामान उचलायचं फक्त. ते मला सहज जमण्यासारखं होतं. शिवाय मी माध्यमिक शाळा पुरी केली होती. सफाईनं इंग्रजी बोलत तर होतोच; आणि शिवाय माशा अल्लाह कुणावरही छाप पडेल असं माझं व्यक्तिमत्त्व होतं. पण ताजचं प्रेक्षणीय प्रवेशद्वार जवळ येऊ लागल्यावर माझे गुडघे डगमगू लागले. दार अडवून उभा राहिलेला भलाथोरला दरबान नक्कीच आतिथ्यशील नव्हता. बराच वेळ घालवल्यावर एक मवाळ दिसणारा इसम मी गाठला. त्यानं सांगितलं, की कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मागच्या दारानं आत शिरायचं. मग एका डेस्कच्या मागे बसलेल्या काहीशा बावचळलेल्या इसमाकडे अर्ज देऊन मी निघालो. बेलबॉयच्या गोल टोपीमध्ये मी इतका काही विनोदी दिसणार नाही अशी मी स्वत:ची समजूत घातली. जेरी लुईस आठवून पाहा. शिवाय- भरपेट खाना, लक्षाधीशांकडून मिळणारी लठ्ठ बक्षिसी आणि अखेर एके दिवशी कुणा चाणाक्ष चित्रपट निर्मात्याची आपल्यावर स्थिरावलेली नजर.. हे सर्व विधिलिखित होते. या नव्या नोकरीत मी काय उजेड पाडणार, हे मात्र कधीच कळायचं नव्हतं. कारण माझ्या अर्जाचं उत्तर येईपर्यंत (की ते कधी आलंच नाही?) त्या शहरामधलं माझं वास्तव्य संपत आलं होतं. ताज हॉटेलची एक अत्यंत होनहार बेलबॉय मिळवण्याची नामी संधी हुकली.
सरतेशेवटी जेव्हा घरी जाणं भागच पडलं तेव्हा अम्मी मला गाठून विचारीत असे, ‘माझी आठवण झाली का रे कधी? कधी अम्मीसाठी कासावीस झालास का?’ यावर सरळ उत्तर द्यायचं टाळून मी माझ्या साहसकथांचंच वर्णन करी. तोपर्यंत त्यांना कठोर कारावासाचा दर्जा प्राप्त झालेला असे. खरी गोष्ट अशी की, मला घरची एका सेकंदासाठी पण कधी आठवण झाली नव्हती. चुकूनही कधी मी बेघर आहे, किंवा कोणत्याही प्रकारे माझा छळ होतो आहे, ही भावना मनाला शिवली नव्हती. अगदी बसस्टॉपवर किंवा पार्कातसुद्धा मला सुखाने झोप येई. शहराने मला कधी भांबावलं नाही, का धास्तावलं नाही. कधी एकटेपणा नाही जाणवला. नाही कधी कशाची चिंता वाटली. कारण ते सगळं अगदी माझ्या कल्पनेबरहुकूम होतं. मुंबईचं आणि माझं तत्काळ सूत जमलं. आमचं गोत्र जुळलं. माझं काय होणार, या प्रश्नानं मला कधीच भेडसावलं नाही. आई-बाबांचा विचार एकदाही डोक्यात आला नाही. ते प्रकरण आता मिटलं होतं. कायमचं.
एकदा एका संध्याकाळी असाच रिकामा लटकत असताना युसूफने एका इसमाची ओळख करून दिली. त्या इसमाचा एकूण आव आणि त्याचा भडक पोशाख तो फिल्लम् इंडस्ट्रीतला असल्याचा आक्रोश करून सांगत होता. त्यानं माझ्याकडे पाहिलं- न पाह्य़ल्यासारखं केलं, भोवतालचे दहा-बारा लोक निवडले, आणि एखादा उच्चत्तम गुप्तहेर अधिकारी आपल्या निवडक चेल्यांना ‘जिंकू किंवा मरू’च्या बोलीवर कुण्या खतरनाक मोहिमेवर धाडतो आहे अशा थाटात त्याने दबक्या आवाजात ‘उद्या सकाळी ७॥. नटराज स्टुडिओ’ असं आम्हाला सांगितलं. एका दिवसाच्या कामासाठी आम्हाला रु. ७॥ कबूल करण्यात आले. वाजवी दर होता रु. १५. पण आम्ही युनियनचे सभासद नव्हतो. तेव्हा आमची निम्मी मिळकत हा भाडखाऊ खाणार होता. पण तरीही ७॥ रुपयांच्या विचाराने मी पार सात स्वर्गात पोचलो होतो. शिवाय आणखीदेखील काम असण्याची शक्यता त्याने बोलून दाखविली होती. त्यावेळेला नेमकं काय षड्यंत्र चालू होतं याचा थांग लागायला मला तब्बल पस्तीस र्वष चित्रपटसृष्टीची आतडी पिंजून काढायला लागली. चित्रपट पूर्ण व्हायच्या बेताला आला होता आणि त्याला थोडय़ा डागडुजीची गरज होती. पॅचवर्क. ठिगळ. पण त्यांचा खजिना एव्हाना रिता झाला होता. एक्स्ट्रा नट.. ज्युनिअर कलाकार हवे होते. तत्काळ आणि स्वस्तात. मुंबईची एक्स्ट्रास्ची संघटना ही नेहमीच बलशाही राहिली आहे. सभासद नसलेले कलाकार वापरले गेले तर; वेळेवर मेहनताना दिला नाही तर; किंवा कोणत्याही प्रकारे वाईट वर्तणूक मिळाली तर चित्रण लांबवण्याची किंवा थांबवण्याची ताकद तिच्यात आहे. आमचा हा कार्यक्रम निश्चितच घिसाडघाईने ठरला होता आणि चोरून चालला होता. बिगर-युनियनवाल्यांना स्वस्त दरात घेऊन. मला ही फार मोठी संधी होती. मी चक्क फिल्ममध्ये काम करणार होतो. असंख्य किशोरवयीन स्वप्नं डोक्यात थैमान घालू लागली. युसूफला सोबत घेऊन मी नटराज स्टुडिओत वेळेच्या भरपूर आधीच पोचलो. आता नामशेष झालेल्या नटराज स्टुडिओमध्ये तेव्हा शहरातल्या जवळजवळ प्रत्येक सिनेसम्राटाचं ऑफिस होतं. दरवाज्यावरची नावं वाचीत आणि कंपन्यांची प्रतीकचिन्हं पाहत मी कंपाऊंडभर हिंडलो. आजवर हा मजकूर फक्तपडद्यावर पाहिला होता. माझं हृदय आनंदाने उसळ्या मारीत होतं. मुंबईला पळून जाणारा प्रत्येक सिनेवेडा पोरगा कधी ना कधी हार मानून परत घरी जातो, हे सर्वश्रुत होतं. पण माझ्याएवढी प्रगती कुणीच केली नसणार, या कल्पनेने मी सुखावलो.
आम्ही आमच्या हिरव्याकंच लोकेशनवर पोचलो. कॅमेराचा अवाढव्य आकार पाहूनच मी गार झालो. त्याच्या तैनातीलासुद्धा कितीजण हजर होते. आम्हाला आमच्या जागेवर उभं केलं गेलं. डोळे दिपवणारे रिफ्लेक्टर वळवले आणि कॅमेरा संथगतीने या बाजूकडून त्या बाजूकडे वळू लागला. तो असा ‘पॅन’ करीत असताना मी भिंगामध्ये चक्क स्वत:ला पाहिलं. मजा आली! मी चक्क कॅमेराच्या आत होतो. पण लगेच मला ‘हसायचं नाही आणि लेन्समध्ये अजिबात पाह्य़चं नाही,’ असं कडक शब्दात बजावण्यात आलं. पुन्हा प्रयत्न झाला. मी अतिशय गंभीर चेहरा धारण केला. प्रेतयात्रेचा प्रसंग होता, तेव्हा आनंदी दिसून चालणार नाही. पण दरवेळेला कॅमेरा माझ्यावरून सरकला की मी हळूच लेन्समध्ये डोकावत असे. हा शॉट अखेरच्या संकलनात ठेवला गेला नाही. मग मी आजपर्यंत हजारो ‘गर्दी कलाकारां’नी वापरलेली नेहमीची घिसीपिटी सबब सांगितली- ‘माझा अभिनय एवढय़ा ताकदीचा होता, की हीरोने घाबरून माझे सगळे प्रवेश छाटून टाकले.’
‘अमान’ ही ती फिल्म नंतर दाखवली गेली. ती अद्याप अस्तित्वात आहे आणि काही शॉट्समध्ये मी दिसतोही. एकदा तर मी चक्क मुख्य कलाकार आणि त्यावेळचा गाजलेला नट राजेन्द्रकुमार याच्याबरोबर आहे. तो तेव्हा (सिनेमात) मृत आहे. कुणी लॉर्ड बट्र्राड रसेल नावाच्या इसमाने पण याच सिनेमात चित्रपटसृष्टीतले आपले पहिले पदार्पण केले; पण त्यांच्याबरोबर माझा प्रवेश नव्हता. आम्हाला पोचून तब्बल एक तास झाल्यावर एका काळय़ा मर्सिडीजमधून श्री. कुमार उगवले. भडक पोशाखामधला तो इसम त्यांच्या खास मर्जीतला असावा. सगळय़ांनी एकमेकांना मिठय़ा मारल्या. हास्याची कारंजी उसळली आणि अनेक सिगरेटी पेटल्या. आपला पिवळसर मेकअप बारकाईने न्याहाळल्यावर श्री. कुमार ट्रकच्या मागच्या हौदात चढले. फुलांनी सजवलेली तिरडी वाट पाहत होती. कॅमेरा ट्रकवरच वरती होता. ट्रक हलला. कॅमेरा सुरू झाला आणि आम्ही सर्व भाडोत्री शोकग्रस्त संयुक्तपणे आपला दु:खावेग व्यक्त करीत मागून निघालो. इतरांपेक्षा चपळ आणि पडद्यावर दिसण्यासाठी आतुर असल्यामुळे मी पहिल्याच रांगेत घुसू शकलो. अशा प्रकारे मी सिनेमात प्रथमच झळकलो.
आम्हाला जेवण देण्यात आलं आणि त्या दिवशी आणखी काम नसल्याचं सांगितलं गेलं. पण लवकरच काम असण्याची शक्यताही होती. युसूफ आणि मी मग फॉकलंड रोडला गेलो आणि एकेका भाडोत्री बाईबरोबर आम्ही ती संध्याकाळ साजरी केली. आनंदाची गोष्ट म्हणजे तंबूमधल्या त्या पहिल्या अनुभवासाठी मोजले होते तेवढेच पैसे लागले. मला थोडं नवलच वाटलं. मुंबईला तर सगळंच जास्त महाग असतं.. मग किशनगढमध्ये आम्हाला ठकवलं की काय?
बॉम्बे सेंट्रलला दोन उकडलेली अंडी खाऊन मी माझा नित्याचा बेलासिस रोड पकडला. अॅलेक्झांडर सिनेमा पार करून डावीकडे वळलं की मदनपुरा आणि मग घर. वाटेत सापासारख्या लांब ओळीत उभ्या असलेल्या सगळय़ा टॅक्स्या मोजल्या. वेळ घालवायला प्रत्येकीचं दार बंद आहे की नाही याची खात्री करून घेतली. नसल्यास नीट बंद केलं आणि मगच पुढे सरकलो. दिवसाचं सत्कार्य तर पार पडलं होतं. मग जरीच्या कारखान्यात फरशीवरच्या माझ्या गादीवर त्या रात्री मी शांत झोपलो. आता सात रुपयातले तीनाहून अधिक रुपये खलास झाले होते. पुढच्या महिन्याचं भाडं द्यायचं होतं. मग मी ‘लवकरच काम असण्याची शक्यता’ असण्याची हमी देणाऱ्या फरिश्त्याची पंपोशमध्ये डोळय़ांत तेल घालून वाट पाहू लागलो.
अखेरीस त्या अन्नदात्या कुटुंबाच्या टोमण्यांची दखल घेऊन मी त्यांच्याकडे जेवणं बंद केलं. स्वत:च्या जेवणाखाण्याचा जिम्मा कसाबसा पार पाडू लागलो. मग तो भडक पोशाखाचा इसम परत उगवला आणि आणखी एका सिनेमासाठी आमची गरज लागेल असं त्यानं सांगितलं. त्याच दराने- तीन दिवस. मला आतापासूनच पैशाचं ओझं जाणवू लागलं. साडेबावीस रुपये म्हणजे सरळसरळ दोन महिन्यांचं भाडं आणि वर दोन-तीन सिगरेटची पाकिटं. खाण्यापिण्यासाठीसुद्धा पैसे लागतात, हा विचारही मनाला शिवला नाही. मोहन स्टुडिओमध्ये चित्रण व्हायचं होतं. काळाच्या उदरात गडप झालेला हा आणखी एक स्टुडिओ. एका वाढदिवसाच्या मेजवानीत सामील झालेल्या सुमारे दोनशे पाहुण्यांपैकी मी एक होतो. प्रमुख नट ‘भोळाभाबडा’ राज कपूर होता. तो अनाहूतपणे या शानदार पार्टीत येऊन कडमडतो आणि मग म्हणे भलतीच धमाल होते- असा काहीसा प्रसंगाचा गोषवारा होता. आम्हाला कोकाकोल्याचा रंग असलेलं द्रव भरून ग्लास दिलं गेलं आणि ‘पिऊ नका’ म्हणून बजावलं. उठून दिसण्याच्या माझ्या धडपडीला या खेपेला यश आलं नाही. ‘सपनों का सौदागर’ हा सिनेमा पुरा झाल्यावर मी पाहिला तेव्हा मलासुद्धा कुठे मी दिसून आलो नाही. दोन महिन्यांचं आगाऊ भाडं भरण्याचा मी विचार केला, पण पुढे तो सोडून दिला आणि मग फॉकलंड रोडच्या दोन-तीन खेपा आणि सिनेमा यावर खर्च करून त्या पैशाचा सदुपयोग केला.
लोकलचं तिकीट काढण्याच्या फंदात मी कधीच पडलो नाही. कारण चोरदरवाज्यांनी बाहेर सटकणं, हे कितीतरी अधिक स्वस्त होतं. कधी अखेरची गाडी जर हुकली तर मी सरळ पंपोशजवळच्या बसस्टॉपवर पहुडत असे. गस्त घालणाऱ्या कुण्या पोलिसाने तिथून हुसकलं तर मग बाजूला बाग होतीच. तिथल्या गवतावर इतर बेघर पडीक लोकांसमवेत मग मी बिनधास्त झोपी जात असे. एक महिन्याचं खोलीभाडं मी भरलं. उरलेले साडेबारा रुपये नरकात बर्फ वितळावं अशा झपाटय़ाने नाहीसे झाले. भडक पोशाखाचा तो इसम नंतर कुठे दिसलाच नाही. काही घडतही नव्हतं. पोटातल्या कावळ्यांचं कोकलणं आता जोरात सुरू झालं होतं. फुकटात चहाचा पेला मिळवणं दुरापास्त झालं. युसूफच्या सांगण्यावरून मला नको असलेले कपडे मी चोरबाजारात कवडीमोलाने विकले. आता परिस्थिती खरोखर बिकट होत चालली होती. महिनाअखेर अंगावर चालून येत होती.
आणि मग एके दिवशी पंपोशच्या बाहेरच्या फुटपाथवर मी बसलेलो असताना एक चकचकीत राखाडी रंगाची लिमोझिन माझ्या पुढय़ात थांबली. उंच टाचेच्या झगझगणाऱ्या सॅण्डलमधलं काळजीपूर्वक निगराणी केलेलं सुबक पाऊल बाहेर पडलं. ‘‘तुझंच नाव नसीर का?’’ पाठोपाठ आवाज आला. होकारार्थी मान डोलावून मी वर पाहिलं. अगदी चुस्त परीटघडीचे कपडे परिधान केलेली एक काहीशी ओळखीची वाटणारी स्त्री बऱ्याच उंचावरून मला न्याहाळत होती. तुटक शब्दांत तिने मला गाडीत पुढच्या बाजूला बसायला सांगितलं आणि ग्लानीत असल्याप्रमाणे मी तसं केलं. वातानुकूलित झोताचा जोरदार मारा माझ्या घामट शर्टवर बसताच मी जवळजवळ गारठून गेलो. गाडी धावू लागली. हे स्वप्न नाही याची मला खात्री वाटेना. पण मग माझी कानउघाडणी सुरू झाली आणि लगेचच ‘स्वप्नभंग’ झाला. आता त्या बाईंची ओळख पटली. त्यांचा फोटो मी कुठल्याशा मासिकात पाहिला होता. त्या श्रीमती सईदा खान होत्या. त्याकाळच्या सर्वात मोठय़ा सिनेनटाची- दिलीपकुमारची बहीण. आता हळूहळू सर्व सुस्पष्ट होऊ लागलं. अजमेरमध्ये बाबा ज्या सूफी संताच्या दग्र्याचे व्यवस्थापक होते, त्या संताच्या सकिनाआपा- म्हणजे कुमारसाहेबांची सर्वात मोठी बहीण- परमभक्त होत्या. त्यांनी दग्र्याला अनेकदा भेट दिली होती आणि एकदा आमच्या घरी पण मुक्काम केला होता. आपल्या जन्मजात मुखदुर्बळपणावर आणि संकोचावर मात करून सकिनाआपांशी संपर्क साधायला बाबांना माझ्या मुंबईच्या मुक्कामाएवढा समय- म्हणजे तब्बल दोन महिने लागले होते. माझा ठावठिकाणा लागण्याचा एकमेव दुवा म्हणजे ज्या मुलीशी मी पत्रव्यवहार केला होता त्या मुलीचं आडनाव. कुमारसाहेबांच्या प्रसिद्ध आणि हिकमती परिवाराला या एवढय़ाशा मागावरून माझा छडा लावणं अवघड नव्हते. त्या लिमोझिनमध्ये बसून, ही आपलीच गाडी आहे, असलं नेहमीचं स्वप्नरंजन करायला मला वेळच नाही मिळाला. पाहता पाहता गाडी पाली हिल चढू लागली. त्याकाळच्या बहुतेक सर्व सिनेताऱ्यांचं निवासस्थान. एक भलंथोरलं फाटक उघडलं आणि आम्ही दिलीपकुमारच्या बंगल्याच्या आवारात शिरलो.
सकिनाआपांना भेटायला मला वर माडीवर नेण्यात आलं. आमची आधी अजमेरला भेट झाली होती. त्या खिन्न, विषण्ण वाटत. अलिप्त आणि अंतर राखणाऱ्या. पण त्या दिवशी मात्र त्या आग ओकत होत्या. मी अंतर्बाह्य़ थकवा आणि अपयशाची घोर जाणीव यांना इतके दिवस थारा दिला नव्हता; पण अखेर बांध फुटला. इतके दिवस कोंडून ठेवलेल्या भावनांच्या पाणलोटात मी गटांगळय़ा खाऊ लागलो. या प्रलयात आपोआपच अश्रुविमोचन आणि क्षमायाचना यांचाही समावेश झाला. त्या दिवशी काय काय बोललं गेलं, त्याच्या तपशिलात नाही शिरत- कारण आपल्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता नट होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुण व्यक्तीच्या बाबतीत तो संवाद अनेकदा घडला आहे.. आजही घडतो आहे.
त्या घटनेचं पर्यवसान म्हणजे मी घरी जाण्याचं मान्य केलं. माझ्या सामानाचे अवशेष मदनपुऱ्याहून पाली हिलला आणण्यात आले आणि माझी बंगल्याच्या तळघरात व्यवस्था करण्यात आली. ही जागा प्रतीक्षाकक्ष किंवा घरी काम करणाऱ्या मंडळींना आराम करण्यासाठी म्हणून राखण्यात आली असावी. मला जेवू-खाऊ घातलं जात होतं आणि स्वच्छतागृहाचीसुद्धा सोय होती. घरात बहुतेक ठिकाणी जायची मला मुभा होती. अनेकदा मी दिवाणखान्यात चक्कर मारीत असे. तिथे एका फळीवर सहा का सात फिल्मफेअरचे पुतळे ओळीने मांडले होते. मी एक उचलून पाहिला. तो इतका जड वाटला, की वाटलं की खिळ्यानं ठोकलेला आहे. अखेर मी तो उचललाच, आणि एका हातात तो धरून दुसरा हात उंचावून अभिवादन केलं आणि अंत:करणाला भिडणारं असं अतिशय परिणामकारक स्वीकृतीचं भाषण केलं.
मुख्य बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर एक छोटी कुटीर होती. ही त्या विभूतीची खास स्वत:ची अशी जागा. विचार करायची. कदाचित काम करायची पण. त्यात दोन छान निवाऱ्याच्या खोल्या होत्या. एक कोच आणि जमिनीवर बैठकी मांडलेल्या. खालपासून ते पार छताला भिडणारी पुस्तकं रचली होती. भिंतीवर चित्रं होती. आणि कोपऱ्यात एक सतारही होती. मला केव्हाही इच्छा होईल तेव्हा तिथे जायला आडकाठी नव्हती. ‘फक्त ते असले की जाऊ नकोस,’ असं मला सांगण्यात आलं. पण ते कधीच नसत. किंबहुना, ते घरीच फार थोडा वेळ असत. तेव्हा माझा बराचसा वेळ मी तिथेच घालवीत असे. खुद्द दिलीपकुमारच्या खाजगी खोलीत मी तासन् तास बसत होतो.. सिनेमाबद्दलच्या दुर्मीळ पुस्तकांमध्ये रममाण होत! याआधीचं माझ्या माहितीचं सिनेसाहित्य म्हणजे फिल्मफेअर, पिक्चरपोस्ट आणि कधी क्वचित हॉलीवूडचा फोटोप्ले. आता नवीन नावं आणि नवनवीन चेहऱ्यांनी माझ्या डोक्यात गर्दी केली. जॉर्ज आर्लिस, विलियम एस. हार्ट, एमिल जॅनिंग्स, जॉन गिल्बर्ट हे नट आणि मायकल कर्टिझ, एफ. डब्ल्यू. मरनो, जॉर्ज क्लूझो, जोसफ व्हॉन स्टर्नबर्ग यांसारखे डिरेक्टर्स तिथे मौजूद होते. या महाभागांची कामगिरी आपल्याला कधीच पाह्य़ला मिळणार नाही, या विचाराने मी विलक्षण उदास झालो. आणि मग माझ्या नेहमीच्या खाक्याने वॉल्टर मिटीच्या चालीवर मी स्वप्नरंजनात गढून गेलो. किंबहुना, त्याही पुढे जाऊन काही क्षणांपुरता मी भविष्यवेत्ता बनलो, आणि असा एक दिवस मी पाहिला, की जेव्हा सहज हातात बाळगता येईल अशा मशीनवर, म्हणाल ती फिल्म, म्हणाल तेव्हा पाहता येईल. अर्थात व्हिडीओ प्लेअरचा शोध लावण्याचं श्रेय मी घेत नाही. तो दिवस उगवेपर्यंत मला थांबावं लागलंच. अजूनही काही निवडक सिनेमांसाठी माझी प्रतीक्षा चालू आहे. खासकरून मिस्टर हार्ट यांचे मूक वेस्टर्न सिनेमे. हो, हार्टसाहेबांचं मधलं नाव ‘शेक्सपियर.’
माझी मुंबईहून बोळवण होण्याच्या आधीचे उरलेले दिवस मी या नंदनवनामधल्या झोपडीत घालवले. एकदा तर प्रत्यक्ष त्या महान पुरुषाशीच गाठ पडली. मी तिथे असल्याचं यत्किंचितही आश्चर्य किंवा कुतूहल व्यक्त न करता ते आपलं काम करीत राहिले. किंबहुना, त्यांनी माझी काहीच दखल घेतली नाही. दोनेक दिवसांनी त्यांना बागेत एकटं पाहून मी बिचकत बिचकत त्यांच्यापर्यंत पोचलो. हेतू हा, की मला काही काम मिळवून देण्याबाबत त्यांची मदत मागावी. पण नेमकं काय विचारायचं, ते मनात नीट सयुक्तिकपणे जुळवीपर्यंत त्यांनीच एक छोटंसं भाषण ठोकलं. चांगल्या घराण्यातल्या मुलांनी सिनेमाच्या फंदात का पडू नये, याचं विवेचन करणारं. आणि मग विषय संपल्याचा इशारा करून त्यांनी मला चक्क कटवलं.
खूप काळ लोटल्यावर मला मनापासून नावडलेल्या एका सिनेमात एकत्र काम करण्याचा आम्हा दोघांना योग आला. आमच्या आधीच्या भेटीबद्दल बोलायला मी नाही धजावलो. एवीतेवी त्यांना आठवण उरली नसणारच. दुसऱ्याच दिवशीचं डेहराडून एक्स्प्रेसमध्ये माझं मीरतचं तिकीट काढलं असल्याचं सकिनाआपाने सांगितलं. परतीच्या वाटेवरच्या जेवणापुरते पैसे मला देण्यात येतील आणि मला पार शयनकक्षापर्यंत पोहोचवायला कुणीतरी येईल असं ठरलं. उगीच लफडं नको! आता वर्तुळ पुरं होत आलं होतं. अम्मी-बाबांना तोंड कसं द्यायचं, याचा विचार आता कुठे मनात प्रथम डोकावला. फारसा दिलासा देणारा विचार नव्हता तो.
(लवकरच पॉप्युलर प्रकाशनातर्फे हा अनुवाद प्रसिद्ध होत आहे.)
नासीरुद्दीन शाह, अनुवाद : सई परांजपे