जागतिक चित्रकलेचा इतिहास समजून घ्यायचा तर व्हेनिसची ‘आर्ट बिएनाले’ समजून घेतली पाहिजे! कलाविषयक उपक्रमांच्या भाऊगर्दीच्या अगोदर- १२० वर्षांपासून- म्हणजेच सन १८९५ पासून व्हेनिसच्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय महाप्रदर्शनाचा प्रवास सुरू झाला आहे..
संत तुकाराम हा ‘प्रभात’चा मराठी चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता, हे कदाचित मराठी चित्रपटप्रेमींना माहीत असेल. किंवा चित्रपटप्रेमी नसलं तरी एक सुजाण मराठी माणूस म्हणून ‘संत तुकाराम’ चित्रपटाचा हा दिग्विजय अनेकांना माहीत असेल. पण व्हेनिसचा हा चित्रपट महोत्सव ज्या ‘व्हेनिस बिएनाले’चा भाग म्हणून १९३२ पासून सुरू झाला, ती ‘बिएनाले’ यंदा १२० वर्षांची झाली आहे, हे बऱ्याचजणांना माहीत नसेल. चित्र-शिल्प आदी दृश्यकलांचं हे द्वैवार्षिक प्रदर्शन व्हेनिसमध्ये १८९५ सालापासून भरत असलं, तरी मराठीभाषक कलावंताच्या कलाकृतीला तिथं मानानं सहभागी करून घेतलं जातंय अशी वेळ २००९ साली- म्हणजे काहीशी उशिराच आली, म्हणूनही तसं झालं असेल. परंतु अनेकांना सुनील गावडे या कलावंताचा ‘व्हेनिस बिएनाले- २००९’च्या मध्यवर्ती प्रदर्शनात सहभाग होता, हेसुद्धा माहीत नसतंच.
माहीत नाहीत, पण महत्त्वाच्या आहेत अशा अनेक गोष्टी असतात. व्हेनिसचं द्वैवार्षिक कलाप्रदर्शन हे त्यांपैकी एक आहे. या महाप्रदर्शनाला गेल्या दहा वर्षांत चारदा स्वखर्चानं जाऊन आल्यानंतर आणि व्हेनिस बिएनालेच्या इतिहासातही डोकावून पाहिल्यानंतर हे महत्त्व केवळ कलेपुरतं मर्यादित नाही असं वाटू लागलं. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि त्यावर येणारे घाले या ‘बिएनाले’नं गेल्या १२० वर्षांत पाहिले आहेत. कलेला आश्रय देणारे मोठे की कलावंत मोठा, ही रस्सीखेच गेल्या ५६ खेपांतून इथे सुरू आहे. या बिएनालेच्या विरुद्ध चित्रकारांनीच निषेधाचा सूर उमटवला आणि ‘राजकीय कले’च्या जन्माची व्हेनिस बिएनाले ही भूमी ठरली. राष्ट्रभावना आणि आधुनिक कला यांचं नातं काही असतं का, आणि हे नातं कसं असतं?, या प्रश्नाची उत्तरं गेल्या शंभरहून अधिक वर्षांत आणि दोन महायुद्धांनंतर कशी बदलत गेली, त्याची ‘व्हेनिस बिएनाले’ ही साक्षीदार आहे.
म्हणजे काय आहे?
ते समजण्यासाठी एकतर थोडी विकिपिडीया पद्धतीनं माहिती घ्यावी लागेल, किंवा तो विकिधोपट मार्ग टाळूनही काही गोष्टी सांगाव्या लागतील.
मुळात ‘बिएनाले’ किंवा ‘बायअॅन्युअल’, ‘बायएनिअल’, ‘बिनाले’ अशा विविध उच्चारांच्या नावांनी जगभरच्या २०० शहरांत (त्यांच्या- त्यांच्या खर्चानं) जे काही भरतं, त्याचं स्वरूप ‘दोन वर्षांतून एकदा’ असं असतं. ब्राझीलमधलं साओ पावलो, क्यूबा देशातलं हवाना या दक्षिण अमेरिकी शहरांमध्ये अनुक्रमे १९५१ आणि १९८४ सालापासून ‘आमचीही अभिव्यक्ती पाहाच’ अशा जिगरीतून बिएनाले सुरू झाल्या. यापैकी हवाना बिएनाले तर पाश्चात्त्य कलाकल्पनांना आव्हान देण्याचं काम गेल्या ३१ वर्षांत सातत्यानं करते आहे. भारतात नेहरूयुगाला आणि अलिप्ततावादाला शोभणारी ‘ललित कला त्रवार्षिकी’- म्हणजे बिएनालेऐवजी ‘ट्रायएनिल’ किंवा हिंदीमय इंग्रजी उच्चारानुसार ‘त्रिनाले’ १९६८ साली सुरू होऊन २००५ मध्ये अखेरची ‘त्रिनाले’ झाली. तर पुढे चित्रकला क्षेत्रात बऱ्यापैकी पैसा येऊनही आंतरराष्ट्रीय पातळीच्या कलाजाणिवा आपल्याकडे नाहीत, या खंतीतून बोस कृष्णम्माचारी आणि रियाझ कोमू या तरुण चित्रकारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कोची (केरळ) इथं डिसेंबर २०१२ पासून ‘ कोची बिनाले’ सुरू झाली.
जगभरच्या या बिएनालेंमध्ये एक गोष्ट सामायिक आहे. ती म्हणजे- कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी कलाविषयक भूमिका हवी! ही कलाविषयक भूमिका व्यक्तीगणिक बदलेल हे ठीक आहे; त्यासाठी दर खेपेस एका महनीय कला-जाणकाराला त्याच्या भूमिकेनुसार ‘बिएनाले’मधलं मुख्य- मध्यवर्ती प्रदर्शन मांडू द्यावं, त्याकामी लागणारी साधनसंपत्ती बिएनालेच्या आयोजकांनी पुरवावी.. सुमारे दोन ते तीन महिने हे मुख्य प्रदर्शन सुरू राहावं; जेणेकरून जगातून अनेक ठिकाणांहून लोक येऊन ते पाहू शकतील. बिएनालेच्या पसाऱ्यातली बाकीची प्रदर्शनं कदाचित निराळ्या, कदाचित विरोधीसुद्धा भूमिका मांडणारी असली, तरी त्यांना बिएनालेच्या काळात स्थान दिलं जातं.
शिवाय अवघ्या सहा वर्षांपूर्वी का होईना, जगभरच्या या बिएनालेंना संघटित रूपही आलंय. ‘बिएनाले फाऊंडेशन’ ही आंतरराष्ट्रीय संघटना २००९ साली सर्व बिएनालेंना कवेत घेऊन स्थापन झाली. त्यामुळे तिचे सदस्य नसलेल्या ‘बिएनाले’ (उदाहरणार्थ- आपल्या राज्यातली शहर सजावट आणि पर्यावरण संधारणाचे मार्ग शोधण्यासाठी होणारी ‘पुणे बायएनिअल’ आदी) जगाच्या खिजगणतीत नसतात. म्हणजेच जागतिक संस्कृतीचा ‘बिएनाले’ या महत्त्वाचा भाग ठरल्या आहेत. आपल्याला माहीतच नसलं, तरीही.
आणि दुसरं- या संस्कृतीचं ‘आधी बीज एकले’ रोवलं गेलं ते १८९५ सालच्या व्हेनिसमध्ये. आणि या ‘एका बीजापोटी, तरु कोटी कोटी’सुद्धा व्हेनिसच्या नंतरच उगवले. पण खुद्द व्हेनिसची बिएनाले मात्र पहिली काही र्वष- फारच कठोरपणे मोजायचं तर १९४८ सालापर्यंत- तशी संथपणेच चालत होती. ती आंतरराष्ट्रीय होती खरी; पण त्यात राजकीय शिष्टाचाराची ऐट जास्त होती. म्हणजे युरोपातल्या अन्य देशांना निमंत्रणं जात, मग त्या देशांच्या पसंतीच्या चित्र-शिल्पकारांच्याच कलाकृती इथं येत, वगैरे. हळूहळू (१९०७ पासून) या देशांनी व्हेनिसमध्ये कायमस्वरूपी दालनं बांधून त्यांत दर दोन वर्षांनी प्रदर्शन भरवणं सुरू केलं. ही देशोदेशींची पक्क्या दगडविटांची ‘पॅव्हिलियन’ आजही व्हेनिसच्या ‘जार्दिनी द बिएनाले’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपवनात आहेत.
व्हेनिसमध्ये बिएनाले सुरू झाली तेव्हा (पुढे इटलीचा फॅसिस्ट राज्यकर्ता झालेला) मुसोलिनी १२ वर्षांचा होता. तिकडे लंडनमध्ये ‘व्हिक्टोरियन काळ’ सुरू होता आणि फ्रान्समध्ये मात्र १८७२ सालीच ‘इम्प्रेशनिझम’चा- म्हणजे एकेका रंगाच्या फटकाऱ्यांतून रंगांचा एकत्रित परिणाम साधणाऱ्या ‘दृक्प्रत्ययवादी कले’चा सूर्योदय झाला होता. (उगाचची माहिती : १८७२ सालीच इटलीचा राष्ट्रपुरुष जोसेफ मॅझिनी वारला.) पण व्हेनिसच्या बिएनालेत रेन्वारसारख्या इम्प्रेशनिस्ट चित्रकाराचा समावेश १९१० साली झाला. कलाप्रेम होतं, पण ‘आत्ताचा कलाविचार काय? आणि त्यातून कोणत्या कलाकृती घडताहेत?’ याचा शोधबिध घेण्याला अजिबात महत्त्व नव्हतं. म्हणूनच चौथ्या व्हेनिस बिएनालेतून पिकासोचं एक चित्र चक्क काढून टाकण्यात आलं. का, तर म्हणे- ‘हे लोकांना रुचणार नाही!’ ते होतं पिकासोच्या ‘रोझ पीरियड’ (१९०४- ०६) मधलं- म्हणजे माणसासारखाच माणूस असणारं- सर्कशीतल्या माणसांचं चित्र.
अर्थात व्हेनिसच्या बिएनालेत कलेची किंवा अभिव्यक्तीचीच गळचेपी चालायची असं अजिबात नाही. पहिल्याच बिएनालेसाठी जिआकोमो ग्रॉस्को हा त्यावेळचा प्रसिद्ध इटालियन चित्रकार खास निमंत्रित होता. इटलीत तेव्हा ज्या गुळगुळीत ‘निओ-क्लासिकल’ चित्रांची चलती होती, तशीच चित्रं हा करायचा. पण एवढंच की, ‘द सुप्रीम मीटिंग’ हे जे चित्र त्यानं १८९५ मध्ये ताजं ताजं रंगवून पाठवलं होतं, त्यात पाच नग्न स्त्रिया आणि एक शवपेटी होती. एक स्त्री शवपेटीवरच बसली होती आणि दुसरी पेटीवर पहुडून मृताचं मुखदर्शन घेत होती. बहुधा मर्त्य मानव आणि पंचेंद्रियांच्या चिरंतन संवेदना यांचं हे चित्र म्हणजे प्रतीक होतं. पण ‘हे अयोग्य आहे’ असा शेरा व्हेनिसच्या एका नगरपित्यानं मारूनसुद्धा आणि ख्रिस्ती कॅथॉलिकांचाही या चित्राला विरोध असूनसुद्धा हे चित्र एका छोटय़ाशा खोलीत का होईना, पण लावायचंच असा निर्णय व्हेनिसचे महापौर आणि बिएनालेचे पदसिद्ध नियोजक रिकादरे सेल्व्हेटिको यांनी घेतला आणि रेटलाच. ख्रिस्त्यांच्या धार्मिक साप्ताहिकांनी या चित्राविरुद्ध मजकूर छापला. पण त्याने झालं एवढंच, की या चित्राला प्रसिद्धी मिळून त्याची लोकप्रियता वाढली. अखेर बिएनालेतल्या उत्कृष्ट चित्राचं बक्षीसदेखील याच चित्राला मिळालं! हा खास ‘राजकीय इच्छाशक्ती’ कलेमागे असली तर धर्मबिर्म कसा आड येत नाही याचा मासला- व्हेनिसमध्ये घडलेला.
पुढल्या- म्हणजे १९१० नंतरच्या बिएनाले मात्र कलेतल्याच विशेषज्ञ, जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली भरू लागल्या. यातून कलासंग्रहाच्या बाबतीत ‘क्युरेटर’ म्हणजे फक्त संधारक- संग्रहपालक असा जो अर्थ होता, तोच बदलत गेला आणि सध्या चित्रकलेच्या क्षेत्रात ‘क्युरेटर’ म्हणजे ‘प्रदर्शनाच्या वैचारिक भूमिकेचा आणि कलाकृतींच्या निवडीचा (आणि अर्थातच प्रदर्शनाच्या यशापयशाचाही) सर्वेसर्वा’ ठरला आहे. त्याही आधीच्या नियोजकांनी आपल्या शहरातल्या दालनांमध्ये नुसतीच चित्रं कशी लावणार, म्हणून सोबत फर्निचर आणि त्यावरल्या प्रावरणांची डिझाइन्स यांचंही प्रदर्शन मांडलं होतं. आणि त्यातही पुढे ‘इटलीच्या सात निरनिराळय़ा प्रांतांमधली डिझाइन्स’ असे प्रयोग झाले होते! पण हा निरागसपणा पहिल्या महायुद्धापूर्वीचा. व्हेनिसच्या बिएनालेनं व्हिक्टोरियन किंवा ‘निओ क्लासिकल’ काळापासून दोन महायुद्धांदरम्यानच्या फॅसिस्ट काळापर्यंतचा प्रवास पहिल्या ४० वर्षांतच केला. फॅसिस्टांच्या काळात मात्र ही बिएनाले आणखी तीन दिशांनी वाढली. म्हणजे चित्र-शिल्पकलांखेरीज संगीत (१९३० पासून) , चित्रपट (१९३२ पासून) आणि नाटय़ (१९३४ पासून) यांचेही महोत्सव सुरू झाले. यापैकी संगीत आणि नाटय़ दर वर्षांआडच होतात. पण चित्रपट महोत्सव मात्र १९३४ पासून दरवर्षी भरतो. म्हणूनच यंदा दृश्यकलेच्या बिएनालेची ५६ वी आणि चित्रपट महोत्सवाची मात्र ७२ वी खेप होती. नृत्य आणि वास्तुकला अशा आणखी आंतरराष्ट्रीय महोत्सवांची सुरुवात व्हेनिसमध्ये १९७५ नंतर झाली. पण चित्रपट आणि दृश्यकला यांखेरीज बाकीचे महोत्सव अद्याप ‘जागतिक’ झालेले नाहीत.
जागतिक म्हणजे काय? ‘अभिव्यक्तीचं जागतिकीकरण’ हा शब्द आपण कोणत्या अर्थानं वापरणार आहोत? चित्रपटाबाबत जागतिक होण्याची प्रक्रिया जरा तरी सुकर होती असं इतिहास सांगतो. पण चित्रकला किंवा ‘दृश्यकले’बाबत विचार केला तर १९४८ पर्यंत केवळ ‘आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इथं व्हेनिसला येणारे देश तेवढे आमचे’ असंच वातावरण होतं! १९४८ मध्ये- म्हणजे महायुद्धाच्या फटक्यानंतर जर्मनी आणि ग्रीस यांचा सहभाग असणं शक्यच नव्हतं. मग या देशांच्या दालनांमध्ये खास प्रदर्शनं लागली. त्यापैकी एक होतं- अमेरिकेत स्वत:च्या दिवंगत (‘टायटॅनिक’ अपघातात गेलेल्या) पतीच्या- सॉलोमन आर. गुगेनहाइम यांच्या नावानं अमेरिकेत मोठं चित्रसंग्रहालय उभारणाऱ्या पेगीबाई गुगेनहाइम यांनी व्हेनिसमध्ये आणलेलं- वासिली कान्डिन्स्कीपासून अनेक ‘अमूर्तीकरणवादी’ चित्रकारांच्या चित्रांचं खास प्रदर्शन. इथं देशांना नव्हे, शैलीला महत्त्व होतं. आणि दुसरं होतं- पिकासोच्या १९ निवडक चित्रांचं सिंहावलोकन! यासाठी एकेकाळी अवमानित झालेला पिकासो वयाच्या ६७ व्या वर्षी व्हेनिसला आला होता. यापैकी पेगीबाईंनी आणलेल्या चित्रांना व्हेनिसमध्येच कायमस्वरूपी जागा देऊन संग्रहालय उभारायचं असं व्हेनिसच्या पालिकेनं ठरवलं. लगेच जागाही मुक्रर झाली. ती जागा म्हणजे आजचं व्हेनिसच्या अकाडेमिया भागातलं ‘पेगी गुगेनहाइम संग्रहालय’! इथंच सध्या (जानेवारी २०१६ पर्यंत) वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांचं खास सिंहावलोकनी प्रदर्शन भरलेलं आहे.
व्हेनिसच्या बिएनालेला वेळोवेळी सुजाण क्युरेटर लाभल्यामुळे काही फायदे झाले. त्यापैकी एक म्हणजे- ‘पॉप आर्ट’ या शैलीतल्या अमेरिकी चित्रांना अभ्यासकीय प्रतिष्ठा पावलेली नसूनही या शैलीचा महत्त्वाचा उद्गाता रॉय लिख्टेनष्टाइन याच्या चित्रांना १९६४ च्या व्हेनिस बिएनालेत स्थान मिळाल्यामुळे ही शैली कलेतिहासाचा भाग म्हणून गणली जाऊ लागली. आपल्या महाराष्ट्रात शिकवला जाणारा कलेतिहास अनेकदा याच शैलीपाशी संपतो.. पुढे काय झालं? पुढल्या इतिहासाला ‘पाश्चात्त्य’ वरदहस्त नाही म्हणूनही असेल- पण पुढला इतिहास खरोखरच शोधावा लागतो. पोस्टमॉडर्न कला, पूर्वीच्या ‘डाडा’ चळवळीपासून प्रेरणा घेऊन मांडणशिल्पांची सुरुवात, १९७० च्या दशकातली स्त्रीवादी- ‘फेमिनिस्ट’ कला असे धागेदोरे एकत्र करत पुढे जावं लागतं. या धाग्यांचीही टोकं व्हेनिसच्या बिएनालेत कुठे ना कुठे, कधी ना कधी दिसतातच. ती एरवी कदाचित दिसली नसती. युरोप-अमेरिकेपुरतीच ही बिएनाले मर्यादितही राहिली असती. जग जणू काही आपल्याच मालकीचं आहे अशा तोऱ्यात वावरणारे हे पाश्चात्त्य देश त्यांची मोठमोठाली प्रदर्शनं दर दोन वर्षांनी इथे लावत राहिले असते आणि बिएनालेचं रीतसर ‘सेल्स ऑफिस’ या चित्रांची विकाविक करत राहिलं असतं. पण १९६८ मध्ये इटलीतल्याच तरुणांनी (त्यात चित्रकार आणि कलाविद्यार्थी अधिक होते-) बिएनालेच्या ‘बाजारू, चंगळवादी, विकाऊ’ स्वरूपाला विरोध म्हणून ‘बिएनाले बहिष्कार आंदोलन’ पुकारलं. त्यांची निदर्शनं म्हणजे मानवी मनोरे, उन्मुक्त संगीत, भराभर तयार होणारी भित्तिपत्रकं यांची आतषबाजीच होती. पण अखेर तो निषेधाचा सूर होता.. त्यावेळी कुणी त्याला ‘हा तर पुरोगामी दहशतवाद!’ असं झिडकारलं नाही. आणि म्हणूनच बिएनाले बदलली आणि आजही प्रतिष्ठा टिकवू शकलीय! ‘पुढल्या खेपेपासून बिएनालेतल्या कलाकृती विक्रीसाठी नसतील. ‘सेल्स ऑफिस’ नसेलच. फक्त बिएनाले पाहण्यासाठी तिकीट लावलं जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही आयोजकांनी दिली. बिएनालेतले एकंदर प्रागतिक, पुरोगामी बदल फक्त ‘विक्री थांबवण्या’पुरते मर्यादित नव्हते. व्हिएतनामवरचं अमेरिकी अतिक्रमण किंवा क्युबातला संघर्ष यांपैकी कशाचंच प्रतिबिंब तुमच्या बिएनालेत कसं काय पडत नाही, असा सवालही तरुणाई विचारत होती. हेही ओळखून हळूहळू बिएनाले बदलू लागली. अखेर १९७४ मध्ये तर चिली या देशातल्या लष्करशाहीचा निषेध अभिव्यक्त करणाऱ्या चिलियन चित्रकारांचं प्रदर्शन खुद्द बिएनालेचा भाग म्हणून भरलं! अर्थात् यातही कुणाला ‘इम्पिरिअलिस्ट अजेंडय़ा’चा वास येऊ शकतो. चिलीतली लष्करशाही दिसते आणि अमेरिकेचे मेक्सिकनांवरले अत्याचार नाही दिसत? हे प्रश्न शीतयुद्धाच्या काळात खरोखरच बोचरे होते. आज त्यांची तीव्रता विविध कारणांनी कमी झाली आहे.
एकीकडे हे राजकीय भूमिका घेणारे वैचारिक प्रश्न आणि दुसरीकडे वाढत जाणारा कलाबाजार! हे दोन्ही बिएनालेसोबतच वाढत राहिलं आहे. व्हेनिसची बिएनाले १९७० पासून अजिबात विक्रीसाठी नसते. ते ‘बहिष्कार आंदोलन’ ज्या वर्षी झालं आणि बिएनालेत चित्रं विकलीच जाणार नाहीत हेही स्पष्ट झालं, त्याच वर्षी तिघा बडय़ा चित्र-खरेदीदारांनी स्वित्र्झलडच्या बाझल शहरात (हे शहर आपल्याला जगभरातल्या बँकांनी मान्य केलेल्या ‘बाझल अटीं’मुळे माहीत आहे!) १९७० पासून ‘आर्ट बाझल’ हा कलाव्यापारालाच वाहिलेला मेळा भरवायला सुरुवात केली. हा जगातला पहिला कलाव्यापार मेळा. त्याआधी व्यापारी- सर्वच वस्तूंचं वाणिज्य आदानप्रदान करणाऱ्या प्रदर्शनांमध्ये कलेचा खास विभाग वगैरे असायचा; पण फक्त कलेचाच व्यापार रीतसर मांडणारा मेळा बाझलचा पहिला. ‘आर्ट बाझल’नंतर आता अगदी दिल्ली-मुंबईपर्यंत कलाव्यापार मेळ्यांची साथ पोहोचली आहे. म्हणजे विक्रीसाठी ४५ वर्षांपूर्वी खुली झालेली निराळी वाट आता भरपूर लांब-रुंदसुद्धा झाली आहे. बिएनालेला कलाबाजाराचा उपसर्ग आजही होतो आहे. पण कुठेतरी दुसरीकडे होणारी विक्री आणि फोफावलेला बाजार हे ‘नेसेसरी एव्हिल’ मानण्याखेरीज गत्यंतर नाही. बिएनालेत प्रदर्शित झालेले चित्रकार किंवा त्यांच्या कलाकृती यांचा भाव मात्र भरपूर वाढतो. शिवाय एकेका देशाच्या पॅव्हिलियनवर किंवा अगदी मध्यवर्ती प्रदर्शनातसुद्धा ‘अमुक तमूक आर्ट गॅलरीच्या सौजन्याने’ असं लहान अक्षरांत का होईना, लिहिलेलं दिसतं. हे पाहून १९६८ सालच्या त्या तरुणांचं रक्त खवळत असेल- आजही! पण आपण- आजच्या चित्रप्रेक्षकांनी जणू हे सारं मान्य केलेलं आहे.
हे चित्रप्रेक्षक थोडेथोडके नाहीत; त्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. व्हेनिस बिएनालेला तिकीट काढून येणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत- म्हणजे वर्षांआडच्या पाच खेपांना- किमान सव्वातीन हजारांच्या वरच राहिली आहे. कशासाठी येतात एवढे लोक? व्हेनिसमुळे कोणत्या चित्रकारांची किंमत वाढणार, हे पाहण्यात या सर्वानाच रस असतो असं मानण्यात अर्थ नाही. मग कशाला येतात? माझ्यासारखे ‘नोकरदार’च असलेले लोकही पदरमोड करून का जातात हा बिएनाले पाहायला?
एकतर पाश्चात्त्य वळणाच्या दृश्यकलेचं प्रदर्शन हे व्हेनिस बिएनालेचं कधीकाळचं रूप गेल्या ४५ वर्षांत झपाटय़ानं बदललं आहे. त्यात बर्लिन भिंत पडल्याचा आणि रशियाचं विघटन झाल्याचा, तसंच जगाचे व्यवहार (कागदोपत्री तरी) समपातळीवरून व्हावेत आणि त्यासाठी समान नियम असावेत, असं म्हणत कार्यरत झालेल्या जागतिक व्यापार संघटनेचाही दुरून आणि अप्रत्यक्षपणे का होईना, पण वाटा आहे. ग्रेनाडा, कुवेत यांसारखे देश- जे कलेसाठी अजिबात ओळखले जात नाहीत- तेही आज आपली दालनं इथं थाटू शकतात. व्हेनिसच्या या बिएनालेचा भौतिक पसारादेखील गेल्या २५ वर्षांत इतका वाढला आहे, की ‘जार्दिनी द बिएनाले’ या प्रदर्शन उपवनाचं महत्त्व कमी वाटावं. शहरभर कालव्यांच्या काठाकाठानं एकेका देशाची पॅव्हिलियन्स- दालनं असतात. यंदा अझरबैजानचंही दालन होतं. १९९० पासून बिएनालेतलं मुख्य किंवा मध्यवर्ती दालन (जे पूर्वी खुद्द इटलीच्याच कलेनं भरलेलं असायचं-) दरखेपी एकेका क्युरेटरला दिलं जातं आणि तिथं त्यानं त्याच्या मते सन्माननीय निमंत्रित ठरण्याजोगे दृश्यकलावंत जे कुणी असतील त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवावं अशी अपेक्षा असते. हे प्रदर्शन पाहणं हा ‘बिएनाले बघण्या’तला महत्त्वाचा भाग असतो. कलेमागच्या वैचारिक भूमिका मूलत: सत्ताप्रधान नसल्यामुळे त्या भूमिकांच्या लोलकातून किती विविधरूपी, विविधांगी दृश्यप्रेरणा मिळू शकतात, हे या मध्यवर्ती प्रदर्शनातून जाणवतं. ते प्रदर्शन नीट पाहायचं तर दोन दिवस पुरत नाहीत. अख्खी व्हेनिस बिएनाले- म्हणजे मुख्य प्रदर्शन, ४५ हून अधिक देशांची दालनं आणि शिवाय शहरात बिएनालेचा भाग म्हणून भरलेली अन्य प्रदर्शनं असं सगळं पाहायचं तर सात दिवसही अपुरेच पडतील.
मुख्य मध्यवर्ती प्रदर्शनासाठी म्हणून १९९९ पासून ‘आर्सेनाले’ या व्हेनिसच्या भुईकोट किल्ल्यामधल्या कोणे एकेकाळच्या कारखान्याची जागाही घेण्यात आली. (शिडाची जहाजं बनवणं, दारूगोळा बनवणं आणि शस्त्रनिर्मिती हे सारं याच ५०,००० चौरस मीटरच्या जागेत चालायचं. औद्योगिक क्रांतीपूर्वी दोन हजार कामगार एकाच वेळी राबायचे इथं.) त्याही आधी गोदीभोवतीच्या काही रिकाम्या गोदामांत कलाप्रदर्शनं मांडण्याचा उपद्व्याप व्हेनिस बिएनालेत झाला होता आणि अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये लष्करी कारखान्यात १९१३ साली भरलेल्या पहिल्या ‘आर्मरी शो’ या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनालाही व्हेनिसहूनच प्रेरणा मिळाली होती. राजकारण, हिंसा, लष्करी बळ हे सारं वास्तव अजिबात नाकारायचं नाही, अशा कलाविषयक भूमिकेला मात्र १९८५ पासून (त्यातही १९९५ नंतर अधिक) बळकटी आली आहे. अधिकाधिक दृश्यकलावंत, हिंसक जगाशी आपण कसे वागणार आहोत, हा प्रश्न (अहिंसकपणे) आपल्या कलाकृतींतून केवळ मांडण्याच्याच नव्हे, तर आपापल्या परीनं सोडवण्याच्या प्रयत्नांत दिसतात. जर्मनीच्या कासेल शहरात १९५५ पासून दरवर्षी भरणाऱ्या ‘डॉक्युमेंटा’ या अधिक सुघटित महाप्रदर्शनात अशा- आजच्याच जगाकडे डोळ्यास डोळा भिडवून पाहणाऱ्या कलाकृती अधिक (आणि अनेकदा अधिक गुणवत्तापूर्णही!) पाहायला मिळतात हे खरं; पण व्हेनिससारख्या शुंदल शुंदल शहरात आणि एरवीच पर्यटकांचं नंदनवन वगैरे असलेल्या ठिकाणीसुद्धा राजकीय आशयाच्या कलाकृती पाहता येतात, हे समाधानकारक असतं. एक प्रकारे व्हेनिसच्या बिएनालेचा गतकाळ (निओ-क्लासिकल तेवढें बरें.) आणि आजवरची वाटचाल मिळून कलेचाच जो इतिहास सामोरा येतो, किंवा कला-संघटन करण्याचे मार्ग कसकसे बदलले हे ज्याप्रकारे दिसतं, त्यातून या इतिहासाचं भवितव्य उज्ज्वल आहे अशी खात्री पटू लागते.
केवळ भिंतीवर टांगलेली चित्रं नव्हेत, केवळ फोटो नव्हेत, वा केवळ शिल्पं किंवा मातीपासून विमानापर्यंत काहीही कलात्म हेतूनं वापरून मांडलेली तात्पुरती मांडणशिल्पंही नव्हेत.. व्हिडिओकला, ‘परफॉर्मन्स’ अशा दृश्य-कलाप्रकारांनीही आता व्हेनिस बिएनालेच्या मध्यवर्ती प्रदर्शनात स्थान मिळवलं आहे. गेल्या खेपेला (२०१३- ५५ वी बिएनाले) टिनो सेहगल या जर्मन (मूळ भारतीय वगैरे) कलावंतानं इंग्रजी न जाणणाऱ्या काहीजणांना घेऊन एक ‘परफॉर्मन्स’ व्हेनिसच्या बिएनालेत केला होता. दोन पात्रं अगम्य ‘अ’-भाषेत केवळ घशातून, तोंडातून निरनिराळे आवाज काढत कोणत्याही अर्थपूर्ण शब्दांविना एकमेकांशी बोलत राहायची. हा परफॉर्मन्स करणारी पात्रं दर अमुक तासांनी बदलत. त्यामुळे कधी वडील-मुलगा यांची पिढीसुलभ वादावादी, कधी नवरा-बायकोचे ताणेबाणे, तर कधी समवयस्क मित्रांचा एकमेकांसाठी आणि फक्त स्वतसाठी अशा हेतूंच्या विणीतून घडणारा संवाद अशी विविध संवादरूपं ‘पाहायला’ मिळाली होती. आता ‘याला दृश्यकला कसं म्हणणार?’ वगैरे प्रश्न आजही उरलेले असतीलच. पण इतिहासाचं टोक गाठून त्याच्या पुढे काहीतरी निर्माण करू पाहण्याची आजच्या- समकालीन कलेची जी ईष्र्या आहे, ती या अभाषिक संवादातून दिसत होती. आणि मुख्य म्हणजे विविधभाषी लोक जिथं येतात, त्या व्हेनिसमध्ये ही अभाषिक कलाकृती ‘होणं’ अधिक समाधानकारक होतं.
अशा एकेका कलाकृतींच्या आठवणी आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणा किंवा खूणगाठी पुढली दोन र्वषच नव्हे, तर आयुष्यभर पुरणाऱ्या असतात. हळूहळू अंगी लागणाऱ्या औषधासारखा हा परिणाम असतो. सात दिवसांत यंदा ५०० हून अधिक कलाकृती पाहून झाल्यावर मला कुणीतरी विचारलं- ‘काय अधिक आवडलं?’ तेव्हा माझा गोंधळच झाला होता. आणि तात्काळ सुचलेलं उत्तर म्हणून भारतातून आलेल्या दोन कलाकृतींचा उल्लेख मी केला होता. दिल्लीच्या ‘राक्स मीडिया कलेक्टिव्ह’ या (जीबेश बागची, शुद्धव्रत सेनगुप्ता आणि मोनिका नरुला या तिघांचाच समावेश असलेल्या) गटानं वसाहतकाळातले सात पुतळे अशा रीतीनं मांडले होते, की त्यांचा फोफसेपणा प्रेक्षकाला नीट दिसेल. ‘सत्ता आली की तिच्याबरोबरच ती जाण्याची भीतीदेखील सुरू होते-’ हे या फोफसेपणामागचं गमक. ही पुतळ्यांची विटंबना अजिबात नव्हती. संगमरवरासारख्या दिसणाऱ्या प्लास्टरमध्ये या व्याजमूर्ती मुद्दाम घडवताना अगदी विचारपूर्वक एखाद्या पुतळ्याची मानच मोड, दुसऱ्याचं अख्खं धड पोकळ ठेवून केवळ पायघोळ झगा आणि हातच तेवढे उभार- अशी ही रचना होती. बिएनाले-उपवनात ठिकठिकाणी मांडलेले हे भलेमोठे पुतळे नऊ-दहा फूट उंचीच्या पदस्थलावर होते आणि या सर्व पदस्थलांवर वसाहतवादाचे खंदे विरोधक दिवंगत लेखक जॉर्ज ऑर्वेल यांनी भारत आणि ब्रह्मदेशाबद्दल लिहिलेल्या ‘शूटिंग अॅन एलिफंट’ या निबंधातल्या निवडक ओळी कोरलेल्या होत्या. ‘गोरे पाश्चात्त्य लोक जेव्हा इतरांना पारतंत्र्यात ठेवतात, तेव्हा स्वतचेही स्वातंत्र्य ते धोक्यात आणत असतात..’ यासारख्या या ओळी तेव्हा कुणाला कळल्या नसतील; आजही काहींना कळणार नाहीत! दुसरी ‘भारतीय’ कलाकृती इथल्या मध्यवर्ती प्रदर्शनात होती, ती केरळचे आणि चित्रकलाजगताला अजिबात परिचित नसलेले ज्येष्ठ (पैशानं नव्हे, वय आणि अनुभवानं!) कलावंत मधुसूदनन् यांची. चारकोलनं कागदावर केलेल्या ३० हून अधिक चित्रांचा हा समूह होता. या चित्रांमध्ये कार्ल मार्क्स, लेनिन, एंगल्स वगैरेंचे चेहरे त्यांच्या विचारांची प्रतीकं म्हणून होतेच, पण भारतीय वास्तवामधली काही दृश्यप्रतीकं या चेहऱ्यांच्या जोडीनं होती. काही वेळा भारताचीही सीमा ओलांडून क्रोएशियात २० वर्षांपूर्वी घडलेल्या वांशिक हिंसेचा किंवा अफगाणिस्तानात निर्लज्जपणे फोफावलेल्या तालिबान्यांचा दृश्योल्लेखही एखाद् दोन चित्रांत होता. दमनप्रेरणेची आणि एकेका प्रदेशातल्या तिच्या विस्फोटाची ही उदाहरणं होती. त्या चित्रांना मालिका म्हणता येणार नाही, कारण एका चित्राचा दुसऱ्याशी (विषय, वर्णन, संकल्पना यांपैकी कशानं तरी) संबंध होताच असं नाही. यांपैकीच एक चित्र एका ब्रिटिशकालीन आगगाडीचं आणि इंग्रजनिष्ठ काळ्या सोजिराचं होतं. ते इतकं अव्यक्त होतं, की १९ आणि २० नोव्हेंबर १९२१ च्या रात्री इंग्रजांनी आपल्याच भारतीय सोजिरांना आगगाडीच्या एका डब्यात कोंबून दारं बंद केल्यामुळे शंभराहून अधिकजण जिवास मुकले, ही कथा प्रदर्शन पुस्तिकेत लिहिली गेली नसती, तर त्यातला काळा रंग अंगावर शहारे आणूच शकला नसता.
बिएनाले पाहून पुन्हा मायदेशी यावं तसतसे अनुभव अधिक मुरत जातात. प्रश्न उरत जातात. अर्थ उलगडत राहतात. ग्रीसच्या पॅव्हिलियनमध्ये मारिया पापादिमित्र्यू या शिल्पकर्तीनं मांडणशिल्प म्हणून ग्रीसच्या एका शहरातलं एक अख्खं दुकानच आणलं होतं. हे दुकान होतं लांडगे, रानमांजर आदी जनावरांची फर आणि कातडी विकणारं. सोबत व्हिडिओवर वृद्ध दुकानदाराची गप्पावजा मुलाखत सुरू होती. ‘जॉर्जियात फरचा धंदा जोरात होता दुसऱ्या महायुद्धापूर्वी-’ वगैरे इतिहास हा माणूस जगला होता. त्या इतिहासानं त्याचा संसार घडवला/ बिघडवला होता. आता दुकानाला अवकळा आलीय.. हे सारं पाहून कुतूहल वाटलं होतं. पण बदलत जाणाऱ्या जगाचे आर्थिक प्रश्न इथं मांडायचे आहेत, हेही जाणवत होतं. परतल्यावर कल्हईवाला पाहिला, तेव्हाही मग मारिया पापादिमित्र्यू अशा आपल्यासाठी विचित्र नावाची ती शिल्पकर्ती आणि तिचं ‘अॅग्रिमिका’ नावाचं ते दुकान आठवलं! किंवा जपानच्या पॅव्हिलियनमध्ये लाल दोऱ्याच्या गुंत्यात अडकवलेल्या अनेकानेक अगणित किल्ल्या पाहत होतो तेव्हा नुस्ती मजाच वाटली होती. मीच नव्हे, त्या दालनातले सारेच प्रेक्षक विस्मयचकित दिसत होते. या किल्ल्या कसल्या होत्या? त्या अख्ख्या मांडणशिल्पातून काय सांगायचं होतं? – हे प्रश्न माझ्याकडले फोटो पाहून इथल्या मित्रानं विचारले तेव्हा गप्प राहून मनातल्या मनात म्हणालो, ‘तुला नाही कळलं? स्वतच्याच होत्या त्या किल्ल्या.. प्रत्येक प्रेक्षकाच्या स्वतच्या!’
व्हेनिस बिएनालेचं ऐतिहासिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय स्थान अबाधित आहेच. पण त्याहीपेक्षा वर उरणारं तिचं महत्त्व हे असं प्रत्येकाच्या मनात मुकेपणानं वाढत राहिलेलं असणार. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्सपासून तिवुलू बेटे किंवा तत्सम अत्यंत बिनमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या देशांपर्यंत अनेक देशांची दालनं, ज्या देशांनी दालनं थाटली नाहीत त्यांनाही मध्यवर्ती प्रदर्शनात कधी कधी विशेष दालन देण्याचा प्रघात अशी या बिएनालेची रचना असल्यामुळे सगळी लोकशाहीच जणू. म्हणजे मग इथं अगदी परस्परविरोधी प्रकारचं काम पाहायला मिळतं. आणि या सर्व कलाकृती आपण नीट पाहिल्या असल्या तर त्या काहीतरी सांगतात तरी, किंवा विचारत तरी राहतात.
व्हेनिस बिएनालेची गोष्ट संपतच नाही. तीही वाढतच राहते!
छायाचित्रवर्णन (लेखातील क्रमानुसार): बिएनालेचं पोस्टर – सन १९०५ व १९३६; जिआकोमो पेगी गुगेनहाइम संग्रहालय; ग्रॉस्को यांचं (वादग्रस्त) चित्र; १९६८ सालची निदर्शनं; टिनो सेहगल यांनी संकल्पिलेली ‘परफॉर्मन्स आर्ट’; मारिया पापादिमित्रु (ग्रीस) यांच्या मांडणशिल्पाचा तपशील; ‘राक्स मीडिया कलेक्टिव्ह’कृत एक शिल्प.
अभिजीत ताम्हणे