पोम्पीये, दफन था सदियोंसे जहां
एक तहजीब थी पोशिदा वहां
शहर खोदा तो तवारीख के टुकडे निकले
ढेरो पथराये हुए वक्त के सफहोको उलटकर देखा
एक भूली हुई तहजीब के पुरजेसे बिछे थे हरसू
मुनजमद लावे में आकडे हुए इन्सानों के गूच्छे थे वहां
आग और लावे से घबराके जो लिपटे होगे
वही मटके, वही हंडी, वही टूटे प्याले
होट टुटे हुए, लटकी हुई मिट्टी की जबाने
भूख उस वक्त भी थी, प्यास भी थी, पेट भी था…
मला वाटतं, वयाच्या २४-२५ व्या वर्षी कधीतरी माझ्या हातात गुलजारजींचं ‘पुखराज’ हे पुस्तक पडलं आणि त्याने मला भारावून टाकलं. गुलजारजींच्या गैरफिल्मी लिखाणाची मला लागलेली ही पहिली हवा.. त्यातल्या नज्म आणि त्रिवेण्यांनी माझ्यावर अक्षरश: गारुड केलं. पण ‘पुखराज’मधल्या या ‘पोम्पीये’ नावाच्या कवितेपाशी मी नेहमी अडायचे. ही कविता मला समजायचीच नाही. ती कशाबद्दल लिहिलेली आहे, हे मला कधीही कळलं नाही. आणि खरं सांगायचं तर ते शोधण्याचा मी कधी प्रयत्नही केला नाही.
त्यानंतर सात-आठ वर्षांनी कधीतरी मीना प्रभू यांचं ‘रोमराज्य’ हातात पडलं. आणि इटली या देशाबद्दलच्या कुतूहलामुळे ते चाळत असताना मला त्यात पॉम्पेचा उल्लेख आढळला. आणि मग मला ‘पुखराज’मधली ही कविता आठवली. मी तो मजकूर वाचून काढला. व्हेसुव्हियस नावाच्या ज्वालामुखीमुळे खाक होऊन अडीच हजार वर्षांपूर्वी गाडले गेलेले आणि दीड-दोनशे वर्षांपूर्वी सापडलेले पॉम्पे हे इटलीमधलं एक गाव. त्याच्याबद्दल वाचलं तेव्हा कुठे मला गुलजारांची कविता समजली. त्यानंतर मी पॉम्पेबद्दल जे मिळेल ते वाचत राहण्याचा सपाटाच लावला.
तेव्हापासून आयुष्यात कधी ना कधीतरी पॉम्पे नक्की पाहायचं हे मी ठरवून ठेवलं होतं. त्यानंतर जे जे ओळखीचे पाळखीचे युरोप ट्रिपसाठी इटलीत गेले त्यांना मी परोपरीने पॉम्पेला जाऊन यायला विनवलं. त्यात अर्थात माझा स्वार्थ होता. आपल्या नाही तर इतर कुणाच्या तरी नजरेने आपल्याला पॉम्पे पाहायला मिळेल- हा. पण ते काही कधी फळाला आलं नाही.
..आणि अचानक दोन वर्षांपूर्वी चार महिन्यांसाठी शिक्षणानिमित्त इटलीमधल्या तुरीन इथे जाण्याचा योग आला. जायचं नक्की ठरल्यावर मी मनोमन खूणगाठ बांधली ती पॉम्पे नक्की पाहण्याची. इटलीमधील माझ्या अभ्यासक्रमात शनिवार-रविवार सुट्टी तर असायचीच, पण काही वेळेला जोडूनही तीन-चार दिवस सुट्टय़ा मिळायच्या. दोन दिवसांच्या सुट्टीत व्हेनिस, पिसा, मिलान, फ्लोरेन्स, जेनोआ पालथं घालून झालं. पहिल्या मोठय़ा सुट्टीत भावाकडे नेदरलँडला जाऊन आले. पुढची पाच दिवसांची सुट्टी जाहीर झाली. वर्गातले सर्वजण या सुट्टीत पॅरिस, बास्रेलोना, अॅमस्टरडॅम किंवा ब्रुसेल्सला जात होते. मला मात्र रोम आणि तिथून पुढे नेपल्स आणि पॉम्पे अशी सहल करण्याची इच्छा होती. पण वर्गातले कुणीही या ट्रिपसाठी बरोबर यायला तयार होईनात. कारण पॉम्पे हे तसं जरा कमी ग्लॅमरस ठिकाण आहे. शेवटी एकदाची लला ही माझी इराणी वर्गमत्रीण आणि अकीलन हा श्रीलंकन कॅनेडियन वर्गमित्र यायला तयार झाले.
लला आणि अकीलन यायला तयार झाल्यावर आम्ही आमची तुरीन ते रोम, रोम ते नेपल्स आणि नेपल्स ते पॉम्पे अशी ट्रेनची तिकिटे काढली. रोममधल्या हॉटेलचे बुकिंग केले आणि एके दिवशी भल्या पहाटे रोमकडे रवाना झालो. रोम आणि पॉम्पेचे प्रवासवर्णन लिहिणे हा माझा उद्देश अजिबात नाही. त्यामुळे आम्ही रोममध्ये कसे फिरलो आणि काय काय पाहिले, हे अजिबात इथे लिहीत नाही. पण कलोसियम, व्हॅटिकन सिटी, सिस्टीन चॅपल ही तिथली जगप्रसिद्ध ठिकाणे पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले, इतके नक्की.
तीन दिवस रोममध्ये घालवल्यावर चौथ्या दिवशी पहाटे आम्हाला नेपल्सला जाणारी ट्रेन पकडायची होती आणि तिथून पुढे पॉम्पेला जायचे होते. ही सगळी तिकिटे आमच्या तुरीनच्या ट्रेिनग सेंटरच्या टुरिस्ट एजन्सीमार्फत आरक्षित केलेली होती. आणि ती त्यांनी इंटरनेटवरून केलेली नव्हती. त्यामुळे तिकिटाच्या हार्ड कॉपीज् आम्हाला देण्यात आलेल्या होत्या (ई-बुकिंग करून काढलेल्या िपट्र आऊट्स नव्हत्या.) आणि ही तिकिटे ललाकडे होती. उद्या सकाळी ट्रेन होती आणि आज संध्याकाळी ललाबाईंच्या लक्षात आले की त्यांनी पुढची तिकिटे हरवून टाकली आहेत. मग आता काय करायचे, असा विचार करत रोम स्टेशनवर जाऊन भल्यामोठय़ा रांगेत उभे राहिलो. तिथे गेल्यावर अकीलन म्हणू लागला की, ‘पॉम्पेसारख्या गावातली उद्ध्वस्त उत्खनने पाहण्याचा मला कंटाळा आला आहे, मी तुरीनला परत जातो. मी येत नाही पॉम्पेला.’ तिकीट काऊंटरवरच्या बाईने सांगितले की, आम्हाला आता नवी तिकिटे काढावी लागतील. आधीच्या तिकिटांचे पसे वाया गेले. मग रांगेत उभे राहून माझे आणि ललाचे रोम ते नेपल्स आणि नेपल्स ते पॉम्पे असे आणि अकीलनचे तुरीनला परत जाण्याचे तिकीट काढले. अकीलन रात्री उशिरा तुरीनला परत निघून गेला. मी आणि ललाने दुसऱ्या दिवशी पहाटे नेपल्सकडे कूच केली. दोन-अडीच तासाने नेपल्स आले. तिथून चरकुम व्हेसुवियना (circum vesuviana- म्हणजे व्हेसुवियसला वळसा घालून जाणारी) या कंपनीची सोरेंटोकडे जाणारी ट्रेन पकडून पॉम्पेला उतरलो. आणि स्टेशनपासून चालत चालत आधुनिक पॉम्पेच्या बाजूला असलेल्या पॉम्पेच्या प्राचीन उत्खननापर्यंत जाऊन पोहोचलो. एव्हाना माझी छाती प्रचंड उत्कंठेने धडधडू लागली होती. मुख्य दरवाजात पसे भरून तिकिटे खरेदी केली, गाइड शोधला आणि पॉम्पेच्या उत्खननात प्रवेश केला. आयुष्य ढवळून काढणारा अनुभव घ्यायला मी निघाले आहे याची मला तेव्हा जराही कल्पना नव्हती.
पॉम्पे हे इटलीच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले नेपल्सजवळील कॅम्पानिया या परगण्यातले एक गाव. इटलीच्या मूळ रहिवाशांनी- म्हणजे ऑस्कन्सनी इसवी सनापूर्वी साधारण आठशे वष्रे वसवलेले. त्यानंतर तेथे एस्त्रूकन्स, सँम्ंनाईट्स आणि शेवटी रोमनांनी राज्य केले. समुद्रकिनारी वसलेले असल्याने हे फार मोठे बंदर आणि व्यापारपेठ म्हणून उदयास आले. इसवी सन ७९ मध्ये- म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी साधारण १५ हजार वस्तीचे पॉम्पे हे रोमन शहर जवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या उद्रेकात गाडले गेले. अतिशय रसिक आणि समृद्ध होते हे शहर. व्यापाऱ्यांचे, व्यायामपटूंचे, काव्यशास्त्रनिपुण रसिक नागरिकांचे हे शहर. एक दिवस ध्यानीमनी नसताना व्हेसुव्हियस कोपला. हा कोप इतका भयंकर होता, की काही किलोमीटर इतक्या उंचीचा आगीचा स्तंभ त्यातून हवेत उसळला. आणि काहीही आसभास नसताना त्याच्या लाव्हाचा आणि राखेचा वर्षांव पॉम्पेवर आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या हरक्युलेनियम नावाच्या गावावर होऊ लागला. त्या प्रचंड उष्णतेने भाजले जाऊन तिथले लोक या लाव्हाच्या आणि राखेच्या कितीतरी फूट थराखाली गाडले गेले.
रोमन सन्यात नोकरीवर असलेला प्लीनी (थोरला) नावाचा एक लष्करी अधिकारी जवळच मॅसेनियम या गावात राहत होता. पॉम्पेमध्ये झालेला हा उत्पात पाहून लोकांना मदत करायला तो तिथे धावून गेला. आणि त्यांना वाचवता वाचवता स्वत:च या आगीत जळून खाक झाला. दूरवरून छोटा प्लीनी हा त्याचा पुतण्या हे सगळं पाहत होता. त्याने आपल्या काकाला या उद्रेकात जळताना पाहिलं आणि या घटनेची भयानकताही अनुभवली. धाकटा प्लीनी या उत्पातातून वाचला. त्याने आपल्या एका मित्राला या घटनेची जंत्री सांगणारी अनेक पत्रे लिहिली; जी नंतर सापडली. एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा दोन हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला हा ‘आँखो देखा हाल’! धाकटा प्लीनी लिहितो, ‘काका घाईघाईने पॉम्पेकडे जायला निघाले आणि मलाही चल म्हणाले. पण मला खूप अभ्यास होता आणि त्यातला बराच काकांनीच दिलेला. तो झाला नसता तर उगीच बोलणी खावी लागली असती. म्हणून मी येत नाही म्हणालो.’
त्या भीषण उत्पाताचा कुणीतरी साक्षीदार शिल्लक राहावा म्हणूनच धाकटा प्लीनी मागे राहिला असावा. त्याने काय आणि कसं झालं, हे इतकं इत्थंभूत लिहून ठेवलंय, की सारं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं!
सुमारे अडीच हजार वर्षे निद्रिस्त राहिल्यावर दीडेकशे वर्षांपूर्वी उत्खननात हे गाडले गेलेले शहर परत सापडले. पॉम्पेच्या या भग्नावशेषांवरूनही त्याचा एकेकाळचा रुबाब स्पष्ट होतो. सामान्य लोकांची टुमदार घरे, व्यापाऱ्यांच्या, सरदार आणि दरकदारांच्या आलिशान हवेल्या, मोठमोठे हमामखाने, व्यायामशाळा, वीस हजार लोक बसतील एवढे भव्य अॅम्फी थिएटर, अपोलो, व्हीनस, ज्युपिटर अशा देवदेवतांची मंदिरे, उपाहारगृहे, धोब्याची दुकाने, स्मशान, एवढेच नव्हे तर मोठमोठाली वेश्यागृहे असलेले हे गाव. दोन्ही बाजूने पदपथ आणि मधे वाहनांना जायची जागा असलेले घडीव दगडांचे रस्ते, चौक, माडी, मागचे-पुढचे अंगण, दारात पाण्याची कारंजी असलेले हौद, सार्वजनिक स्वछतागृहे अशा इथल्या सगळ्या गोष्टींमधील वास्तुशास्त्र थक्क करायला लावणारे. घराच्या िभतीवर दगडाच्या कपच्या जुळवून काढलेली भित्तिचित्रे आणि ठिकठिकाणी असलेली शिल्पे इथल्या नागरिकांच्या संपन्न अभिरुचीची साक्ष देत असलेली. काही श्रीमंत घरांत आणि वेश्यागृहांत सापडलेली अनावृत्त कामुक चित्रे आणि शिल्पे इथल्या खुल्या समाजव्यवस्थेची कल्पना देत असलेली.
पॉम्पेच्या उत्खननात घट्ट थिजलेल्या लाव्हात रुतलेले मानवी शरीरांचे अवशेष सापडले. त्यात गाडल्या गेलेल्या माणसांच्या शरीरावरचे मांस झडून जाऊन त्याच्या पोकळ्या आणि हाडांचे सांगाडे लाव्हात जसेच्या तसे राखले गेले होते. पुरातत्त्वशास्त्रातील काही पद्धती वापरून या हाडांच्या बाजूच्या मांसाच्या पोकळीत प्लास्टर ऑफ पॅरिसची इंजेक्शन्स देऊन ही शरीरे तशीच्या तशी बाहेर काढण्यात आली. जी आताच्या भग्न, उद्ध्वस्त पॉम्पेमध्ये अजूनही आहेत. असतील त्या अवस्थेत गोठवून गाडली गेलेली कितीतरी हजार माणसं.. ज्यातली काही तिथे अजून मांडून ठेवली आहेत.
अडीच हजार वर्षांपूर्वीच्या या गावातून फिरताना जाणवत राहतात इथल्या समृद्धीच्या खुणा आणि सतत टोचत राहते- या समृद्ध लोकांची नियतीपुढे असलेली पराधीनता. इतकी समृद्धी, पसा काही काही उपयोगास आलं नाही. काही कळायच्या आत मृत्यूने असा घाला घातलेला. भुंकता भुंकता जबडा वासलेला एक कुत्रा. त्याच्या गळ्यात पट्टा आणि त्याला बांधलेली साखळी. त्याला आपलं मरण दिसलं असेल. तो पळून जाण्यासाठी धडपडला, तडफडला असेल. पण गळ्यातल्या साखळीने त्याला त्याच्या मरणाशी जखडून ठेवलेलं. प्रत्येक जण स्वत:चा जीव वाचवण्यात मग्न असलेला. या मुक्या प्राण्याला कोण सोडवणार होतं? शेवटी सगळेच जळून खाक झाले, ही गोष्ट वेगळी. पण याला मात्र आपला जीव वाचवण्याचा साधा प्रयत्नही करता आला नाही. मृत्यूपुढे असलेल्या मूर्तिमंत हतबलतेची प्रतिमा म्हणजे पॉम्पेमधला हा कुत्रा! आईला बिलगून झोपलेली काही लहानगी. जेवताना, झोपताना, फिरताना गाडली गेलेली माणसं. ज्यांना कल्पना आलेली असावी, की मृत्यू जवळ येऊन पोचला आहे- त्यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीत असलेली प्रचंड भीती आणि अगतिकता. गरम लाव्हापासून वाचण्यासाठी चेहऱ्यापुढे धरलेले हात. बहुतेकजण याच अवस्थेत जाळून खाक झालेले.
एका घरात सापडलेलं ते किसिंग कपल! एकमेकांच्या शेजारी आडवं होऊन आवेगानं परस्परांना चुंबणारं ते जोडपं. अक्षरश: एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवून मरण पावलेलं. भरभरून प्रेम करता करताच जळून खाक झालेले ते दोन जीव. इतक्या आवेगाने प्रेम करत असलेले एकमेकांवर- की बाहेर झालेल्या उत्पाताचे त्यांना भानच नाही. त्या गोंधळाने यांची प्रेमसमाधी जराही भंगली नाही! कोण असतील हे एकमेकांचे? समाजाच्या नजरांपासून चोरून भेटलेले कुणी प्रियकर-प्रेयसी? चोरून प्रेम करण्याची एवढी भयंकर शिक्षा त्यांना.. जळून खाक होण्याइतकी? की नवरा-बायको असतील? दुपारच्या जेवणानंतर एकमेकांशेजारी क्षणभर विसावलेले? आपल्या जोडीदाराच्या ओठांवर ओठ ठेवताना कल्पना तरी आली असेल त्यांना- की हा आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे? ध्यानीमनी तरी असेल त्यांच्या- की आपण प्रेमभराने घेतलेलं हे चुंबन असं चिरंतन होऊन गोठवलं जाणार आहे काळाच्या पोटात? मानवजात ज्या एकमेव गोष्टीवर तरली आहे.. तरून राहणार आहे.. तेच हे प्रेम. अडीच हजार वर्षांपूर्वीही ते चिरंतन होतं.. आणि आजही आहे! काळाच्या पोटात थिजून गेलेलं हे प्रेममग्न जोडपंही जणू हेच सांगतं आहे. त्यांच्या प्रेमाला त्यांनी खरोखर अजरामर केलं आहे!
पॉम्पेमध्ये सापडलेली एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिथली नग्न आणि उत्तान चित्रे आणि शिल्पे! धनाढय़ांच्या घरातल्या िभतींवर सापडलेली काममग्न मथुनांची भित्तिचित्रे. तिथे सापडलेलं एक प्रचंड मोठं वेश्यागृह. तिथल्या िभतीवर लिहिलेले विविध कामक्रीडांचे दर. गल्ल्यागल्ल्यांत कोपऱ्यावर कोरून ठेवलेली पुरुषांची शिश्ने. पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे प्रतीक म्हणून पुरुषाच्या िलगाची पूजा इथे बांधली जात असावी का? की क्षणभंगुर जीवनात स्वर्गसुख मिळवण्यासाठी असावा हा अट्टहास? पॉम्पेच्या नशिबात असलेला हा असला भीषण मृत्युयोग कळला असेल का तिथल्या नागरिकांना? आपण एका ज्वालामुखीच्या तोंडावर जगतो आहोत म्हणून असेल का ही आसक्ती?आलेला क्षण भरभरून, आनंदात जगणे म्हणूनच शिकले असतील का इथले नागरिक? कुणास ठाऊक! पण उपभोग आणि विलास पूर्णपणे भोगून ही प्रजा जाळून खाक झाली, एवढे मात्र नक्की!
इथल्या मोकळ्या जागांमध्ये ठिकठिकाणी द्राक्षांचे वेल दिसले. नाशिकसारख्या गावात आयुष्य काढलेल्या मला हे द्राक्षाचे बाग ओळखणं अजिबातच अवघड नव्हतं. आमच्या वाटाडय़ाला मी उत्सुकतेने प्रश्न विचारला, की या उद्ध्वस्त उत्खननात या द्राक्षाच्या बागा कशासाठी?
..आणि त्याचं उत्तर ऐकून अक्षरश: शहारून गेले. दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा हे गाव उत्खननात सापडलं तेव्हा त्यात द्राक्षाच्या काही बिया सापडल्या. त्या पॉम्पे जळून गाडलं गेलं त्या काळातल्या होत्या. म्हणजे अडीच हजार र्वष जुन्या. लाव्ह्य़ाने तयार झालेल्या निर्वात पोकळीत गाडल्या गेल्याने त्या जशाच्या तशा टिकल्या होत्या. त्या इथे परत पेरल्या गेल्या आणि त्यातून हे बाग उभे राहिले. अंगावर सरसरून काटा आला हे ऐकून. कुठेतरी वाचनात आलेली एक मेक्सिकन म्हण आठवली- ‘They tried to bury us… they did not know we were seeds.’ माणसाच्या कुण्या अडीच हजार र्वष जुन्या पूर्वजांनी आपल्या मळ्यात घाम गाळून पिकवलेल्या द्राक्षांची ती बीजं! इतक्या वर्षांनंतर त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातात अचानक पडलेली आणि त्यांनी ती परत उगवलेली. माणसाच्या दोन सहस्र र्वष जुन्या बापांची जगण्याची धडपड, त्यांची मेहनत, त्यांची संस्कृती, त्यांचं शहाणपण- या सगळ्याचं संचितच जणू त्या इवल्याशा बीमध्ये राखून ठेवून त्यांनी आपल्या मुलाबाळांच्या हातात सुपूर्द केलेलं.. आणि ते परत असं उगवून आलेलं. आपल्या दिवंगत आजीची एखादी तलम, सुवासिक पठणी किंवा आजोबांची काठी असते घरात राखून, जपून ठेवलेली. तिला हात लावताच कसं उचंबळायला होतं! अगदी तस्स झालं हा बाग पाहून. या द्राक्षांपासून आता वाईन बनवली जाते. पॉम्पे वाईन म्हणून ती सुप्रसिद्ध आहे. चवीला फारशी बरी नसते म्हणे खरं तर; पण आपल्या पूर्वजांच्या भूतकाळाची चव तिच्या रूपाने जिभेवर घोळवायला मिळते, म्हणून ती अमूल्य!!!
इथे आल्यापासून सीमस हीनी हा आयरिश कवी मनात सतत रुंजी घालत होता. या बागेत मात्र काळजावर तो धडाधड धडका मारू लागला. यीट्सनंतरचा आर्यलडने जगाला दिलेला हा दुसरा महत्त्वाचा कवी. तो खास प्रसिद्ध आहे त्याच्या ‘बॉग पोएम्स’साठी. बॉगलँड म्हणजे युरोपात ठिकठिकाणी सापडलेल्या दलदलीच्या जागा. आर्यलडमधल्या अशाच एका दलदलीजवळ हीनी राहत होता. या दलदलीच्या जागांमधला द्रव अॅसिडिक असतो आणि त्यामुळे त्यात गाडल्या गेलेल्या गोष्टींचे जीवाश्म बनत नाहीत.. तर त्या जशाच्या तशा जतन झालेल्या सापडतात. हीनीने अशा कित्येक विवरांमधली उत्खननाची कामं पहिली. आणि ती पाहता पाहता कवीहृदयाचा हा माणूस त्याच्या तिसऱ्या डोळ्याने पाच ते सात हजार वष्रे इतक्या जुन्या असलेल्या त्याच्या पूर्वजांच्या भूतकाळाचा वेध घेऊ लागला.. त्यात रमू लागला.. त्याने भारला गेला. या जागांवर हीनीने अनेक कविता लिहिल्या- ज्या ‘बॉग पोएम्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. इथे सापडलेला आयरिश एल्क नावाच्या महाप्रचंड हरणाचा सांगाडा. इथे गाडलं गेलेलं आणि नंतर जसंच्या तसं सापडलेलं खारवलेलं लोणी.. यात हीनीला त्याच्या पूर्वजांच्या भूतकाळाची चव गवसली. कसल्यातरी अघोरी प्रथेपायी देवापुढे बळी दिलेल्या किंवा केवळ अत्याचाराने मारून टाकलेल्या कित्येक गुलाम स्त्री-पुरुषांची कलेवरंही या दलदलींमध्ये जशीच्या तशी सापडली. टोलंडमॅन, कोलबेर्ग वुमन अशी नावंही त्यांना नंतर दिली गेली. यांचा अभ्यास करता करता हीनी त्याच्या कवितांमधून हजारो र्वष मागे जाऊन तेव्हाचं आयुष्य जगू लागलेला दिसतो. हे जीव का आणि कसे मारले गेले असतील, हे शोधण्यासाठी तो विकल झालेला दिसतो. पॉम्पेमध्ये फिरत असताना हीनी माझ्यासोबत सतत असा िहडत होता.. या पूर्वजांच्या भूतकाळाची ‘चव’ चाखायला शिकवत!! त्याच्या आसपास जाईल इतपतही बरी कविता लिहिण्याची प्रतिभा मला लाभलेली नाही, हे माझं केवढ दुर्दैव! पण या भूतकाळात फिरताना त्याची झालेली विकल अवस्था मला अगदी समजू शकली. त्याची उलघाल मी अक्षरश: अनुभवली.
इथली घरं, गल्ल्या, स्वत:च एक मोठं स्मशान असलेल्या पॉम्पेमधलं गावाबाहेरचं स्मशान, इथल्या व्यायामशाळा, शेतं, रस्ते, मंदिरं.. सगळं सगळं त्या काळात पुढारलेल्या या गावाची साक्ष देत असतात. पण त्याचवेळी मागे दूरवर व्हेसुव्हियस दात विचकत उभा असतो. अकाली मरण पावलेल्या त्या हजारो लोकांच्या गाडल्या गेलेल्या अपूर्ण इच्छा-आकांक्षा जणू अजूनही तिथल्या हवेत भरून राहिलेल्या असतात. मृत्यूच्या असहाय क्षणी त्यांनी कुणाकुणाला जिवाच्या आकांताने मारलेल्या हाका जणू आपल्याभोवती फेर धरून नाचू लागतात. सगळ्या वातावरणात दाटून आलेली एक उदासीनता आणि त्याने जड झालेली तिथली हवा. गुदमरवून टाकणारी.. घुसमटवणारी.. छातीवर दडपण आणणारी.
अशा भारलेल्या पॉम्पेमध्ये फिरता फिरता ढळायला लागलेला दिवस. अंगावर शहारे आणणारी थंडी. त्या उदास वातावरणाला आणखीनच गहिरं बनवणारी सरपटत आलेली कातरवेळ. हळूहळू मंद होऊ लागलेला प्रकाश. आणि त्या संधिप्रकाशात आणखीनच उठून दिसणारा अक्राळविक्राळ व्हेसुव्हियस.. या गावाच्या नरडीचा घोट घेणारा तो ज्वालामुखी.. पॉम्पेसारखी अशी कितीही गावं आली आणि गेली तरी मी अढळ आहे असं सांगणारा.. ‘माणूस नश्वर आहे; पण मी नव्हे!’ असं सांगणाऱ्या निसर्गाचं प्रतीक जणू..
त्यातच दूर कुठेतरी या उद्ध्वस्त गावाच्या दुसऱ्या टोकाला कुणीतरी छेडलेली कुठल्यातरी अगम्य वाद्याची दुखरी सुरावट.. ती कानावर पडली आणि मला स्वत:वर ताबा ठेवणं अशक्य झालं. ‘अगं अगं, थांब.. कुठे चाललीस?’ असं लला मागून ओरडत असताना तिथून बाहेर पडण्यासाठी जिवाच्या निकराने मी धावत सुटले. मला त्या उदासीनतेच्या सावलीपासून लांब पळायचं होतं.. बाहेरच्या गजबजलेल्या सुरक्षित जगात..
पळत पळत मी बाहेर येऊन पोचले.. बाहेर नव्या आधुनिक पोम्पेचे चलनवलन सुशेगात चालू होते. या गावाला अजूनही व्हेसुव्हियसच्या उद्रेकाचा धोका आहेच. तो मागच्या वेळी कोपला तेव्हा या गावाचं काय झालं, हे इथे राहणाऱ्या सगळ्यांना ठाऊकच आहे. त्याच्या प्रकोपाने गाडलेलं जुनं पोम्पे पायाखालीच आहे, हे माहीत आहे इथे राहणाऱ्या सगळ्यांना! पण आपल्या बापजाद्यांची गाडलेली कलेवरं पायाखाली घेऊनही इथले लोक या नव्याने वसवलेल्या गावात निर्धास्तपणे फिरतायत. पाश्र्वभूमीवर व्हेसुव्हियस सतत खुणावत असतानाही खातायत. पितायत. खेळतायत. प्रेम करतायत. लग्न करतायत. पोरं जन्माला घालतायत. मजा करतायत. आहे तो क्षण आनंदाने घालवतायत. भविष्याची कसलीही चिंता न करता! बाहेर मजेत असलेल्या गावातल्या या गजबजलेल्या रस्त्यांवरून मी मात्र मनात काहूर घेऊन, अस्वस्थ होऊन पळत सुटलेय!
स्टेशनवर जाऊन नेपल्सला जाणारी ट्रेन पकडली. अचानक उजव्या हाताला नितांतसुंदर समुद्र सामोरा आला. नुकताच त्यात बुडालेला सूर्य.. त्याची समुद्रावर पसरलेली प्रभावळ.. आणि काठावर नांगरून पडलेल्या चिमुकल्या होडय़ा.. काहीच क्षणांत झालेला हा बदल! निसर्गाचं ते विनाशकारी रूप डोळ्यांपुढून पुसलं जात नाही तोच त्याचं झालेलं हे आल्हाददायक दर्शन.. या विरोधाभासामुळे अवाक् होऊन मी ओक्साबोक्शी रडायला लागले. आणि कुणीतरी लिहवून घेत असल्यासारखा माझा हात जवळच्या डायरीत हे खरडू लागला..
‘दाटून आलेली संध्याकाळ
गहिऱ्या झालेल्या सावल्या
टिटवीची भीषण टिव टिव
आणि अशा कातरवेळी मी उभी आहे
या ज्वालामुखीच्या पायथ्याशी
हजारो वर्षांपूर्वी त्याच्याच उद्रेकाने
बेचिराख होऊन गाडल्या गेलेल्या या गावात
हे गाव.. जणू काळाच्या पोटात गोठलं गेलेलं
काळानेच जणू त्याला विस्मरण होऊ नये
म्हणून थिजवून ठेवलेलं..
खाताना, झोपताना, खेळताना, थिजलेली माणसं
सुन्न करून टाकणारी मरणकळा
आणि अनामिक हुरहूर
मी पाहते आहे स्वत:ला
त्या गोठलेल्या जिवांच्या जागी..
अजून दोन सहस्र वर्षांनंतर
मी अशी कुठे असेन का?
..कुणाच्या आठवणीत.. विचारात.. गोठलेली?
(प्रा. चेतन देशमाने यांनी हीनीच्या कविता समजून घेण्यात केलेली मदत अमूल्य आहे. त्यांचे आभार. तसेच जेनिफर रांदाझ्झा या माझ्या अमेरिकन मत्रिणीचे फोटोंबद्दल आभार)
मृदुला बेळे