लोकसत्ता दिवाळी अंक २०१७
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंदिराजींवर आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील काही चरित्रे त्यांच्या निकटच्या व्यक्तींनी लिहिली आहेत. डॉम मोराईस यांच्यासारख्या पत्रकारानेही त्यांच्यावर संशोधनपर लेखन केले आहे. इंदिराजींवरील अशा मोजक्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा धांडोळा घेणारा लेख…
इंदिरा गांधींच्या जन्माला यंदा १०० वष्रे पूर्ण होत आहेत. मला कळायला लागल्यापासून मी त्यांच्याबद्दल वाचत आलेलो आहे. या वाचनात एक गोष्ट कळली, ती म्हणजे इंदिरा गांधींचा करिश्मा! या लेखानिमित्ताने इंदिराजींवरची निवडक महत्त्वाची पुस्तके चाळली. त्यात पी. सी. अलेक्झांडर यांनी लिहिलेले ‘इंदिरा गांधी- अंतिम पर्व’ आहे. इंदिराजींची मत्रीण पुपुल जयकरनी लिहिलेले इंदिराजींचे चरित्र आहे. त्यांच्या तीस वर्षे साहाय्यक राहिलेल्या उषा भगत यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र आहे. तसेच वादग्रस्त आणि इंदिराजींनी हातात घ्यायलाही नाकारलेले डॉम मोराईस यांचे ‘मिसेस गांधी’ हे चरित्रही आहे. इंदिराजींच्या आठवणींचे पुस्तक त्यांच्या सत्तरीच्या निमिताने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी लिहिलेले लेख आणि शांतिनिकेतनविषयक मुलाखत यांचा त्यात समावेश आहे. या साऱ्यांतून एक वेगळ्याच इंदिराजी समोर येतात. लहानपणी त्या ‘आनंदभवन’ या प्रशस्त बंगल्यात अलाहाबादला राहत. पण हे घर नंतर नेहरू कुटुंबीयांनी काँग्रेस चळवळीसाठी दिले. १९४६ पर्यंत ते काँग्रेसचे मुख्यालय म्हणून वापरले जात असे. दरम्यान, ‘आनंदभवन’चे नाव बदलून ‘स्वराजभवन’ झाले होते. १९२८ साली त्याच्या आवारात एक छोटे घर बांधण्यात आले आणि त्याला जुने ‘आनंदभवन’ हे नाव देण्यात आले. नंतर जेव्हा ते वारसाने इंदिराजींकडे आले तेव्हा त्यांनी ते आपल्यासाठी न ठेवता वडिलांच्या नावाने उभारलेल्या ट्रस्टला- ‘जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड’ला दिले.
त्यांच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये पहिली आठवण आहे ती घरातील परदेशी भरजरी वस्त्रं जाळून टाकल्याची. जाळण्यासाठी कपडय़ांचा ढिगारा करण्यात आला होता. तो त्यांना बघायचा होता म्हणून त्यांनी आजोबांकडे विनवणी केली आणि आजोबा त्यांना तिथे घेऊन गेले. एकदा कोणीतरी त्यांच्यासाठी पॅरिसवरून भरजरी वस्त्रं आणली होती. पण आम्ही केवळ खादी वापरतो, असे सांगून त्यांच्या आई कमला नेहरूंनी ती परत केली. आईने त्यांना विचारले की, ‘‘इंदू, तुझ्यासाठी ही भेट आणली आहे. तुला हवी असेल तर ती तू स्वीकारू शकतेस. पण तो कपडय़ांचा ढिगारा आठव- ज्यात परदेशी कपडे जाळून टाकले होते. आम्ही सारे खादी वापरत असताना तुला हे कपडे वापरायचे आहेत का?’’ तेव्हा छोटय़ा इंदूने त्यास नकार दिला. त्यावर आलेली पाहुणी म्हणाली, ‘‘मग तू परदेशी बाहुली वापरतेस तिचे काय?’’ ती बाहुली इंदिराजींची आवडती होती. तरी त्यांनी ती गच्चीवर नेऊन जाळून टाकली.
इंदिराजींचे आजोबा पं. मोतीलाल नेहरू आणि वडील जवाहरलाल हे दोघेही राजकारणात सक्रिय होते. इंदिराजी चार वर्षांच्या असताना या दोघांना तुरुंगात टाकण्यात आले. काँग्रेसच्या नियमाप्रमाणे त्यांनी दंड न भरल्यामुळे घरातील फर्निचर न्यायला पोलीस आले. इंदिराजींची लहान असतानाची ‘आनंदभवन’ची ही आठवण. ‘आनंदभवन’ या ४८ खोल्या असलेल्या प्रचंड मोठय़ा घरात त्या राहत होत्या. बालपणीच राजकारणाची त्यांना ओळख झाली. काँग्रेसने देशभर आंदोलन केले तेव्हा त्यांनीही स्वतची ‘वानरसेना’ काढली. पं. नेहरूंनी त्यांना पत्रात गमतीने लिहिले की, ‘या वानरसेनेतल्या सर्वानी शेपटय़ा लावाव्यात आणि अधिकारानुसार शेपटय़ांची लांबी कमी-जास्त व्हावी!’ वानरसेनेचे प्रमुख असलेल्या इंदिराजींचे वेळापत्रक पुपुल जयकर यांनी त्यांच्या चरित्रात दिले आहे. ते वाचताना कळते, की त्याही काळात त्या किती व्यग्र असत.
अलाहाबादमधल्या रोमन कॅथलिक शाळेत त्या शिकत होत्या. ज्यात प्रामुख्याने ब्रिटिशधार्जिणी मंडळी होती. या मंडळींना भारतीय सण आवडत नसत. पुढे इंदिराजींचे शिक्षण शांतिनिकेतनमध्ये करावे का, असा प्रश्न पं. नेहरूंनी आपल्या केंब्रिजमधल्या एका सहकाऱ्याला पत्रातून विचारला. त्यावर त्याचे उत्तर आले की, आधी तिला जहांगीर वकील आणि त्यांच्या पत्नीने चालवलेल्या पुण्यातील ‘चिल्ड्रन्स ओन स्कूल’मध्ये पाठवावे. या शाळेत त्यांना टाकण्यात आले. मात्र, तिथे त्यांना एकाकी वाटू लागले. कारण ‘आनंदभवन’मध्ये त्यांची स्वतची वेगळी खोली होती, तर इथे त्यांना अन्य मुलांच्यात राहावे लागत होते. इंदिराजींवर उत्तम वाङ्मयाचे संस्कार जवाहरलालनी केले. ‘अॅलीस इन वंडरलँड’पासून गॅरीबाल्डीच्या चरित्रापर्यंत अनेक पुस्तके त्यांना वाचायला दिली. टेनिसनची ‘इन मेमोरियम’ ही कविता त्यांची आवडती होती. राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचताना त्या भारावून जात. त्याचा खोलवर संस्कार त्यांच्यावर झाला. पुण्यातील शाळेत १९३२ साली त्या दाखल झाल्या. १९३४ साली मॅट्रिक झाल्यावर त्या शांतिनिकेतनला गेल्या.
गुरुदेव टागोर मुलांना एकत्र करून त्यांच्याशी गप्पा मारत. कधी कथा-कविता वाचून दाखवत, तर कधी चित्रं काढताना इतर मुलांसोबत इंदिराजीही ते शांतपणे बघत बसत. शांतिनिकेतनचे नियम त्या कसोशीने पाळत. साडेचार वाजता उठून साडेपाच वाजताच्या प्रार्थनेला हजर राहत. शाळा सहा वाजता भरे. इथेच चित्र व संगीताचे विश्व त्यांना गवसले. त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यातून सुसंस्कृत बनले. त्यांचा मामा प्राणिशास्त्रज्ञ असल्यामुळे तो घरात साप घेऊन येत असे. इंदिराजी म्हणतात की, ‘त्यामुळे लहानपणापासून साप आणि इतर प्राण्यांची मला ओळख झाली.’ शांतिनिकेतनमध्ये त्या निसर्गात रमल्या. त्यामुळेच पुढे जाऊन पर्यावरणविषयक अनेक कायदे करण्यामध्ये आणि अभयारण्ये निर्माण करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांचे आधीचे शिक्षक जहांगीर वकील हेदेखील शांतिनिकेतनमध्ये शिकले होते. श्रीमती वकील या विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या शिष्या होत्या. त्यामुळे संगीत आणि कलांचे शिक्षण मला मिळाले. शांतिनिकेतनमध्ये संगीत व कलेचे वातावरण होते, असे त्या लिहितात. इंदिराजींना निसर्ग व शांततेची आवड होती. त्या लिहितात की, ‘इतर मुलींच्या कलकलाटाची मला सवय नव्हती. आनंदभवनमधील वातावरण राजकीय होते, तर शांतिनिकेतनमधले पूर्णपणे वेगळे होते. त्यामुळे मला खूप जमवून घ्यावे लागले. शांतिनिकेतन हे गुरुदेवांच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेले होते. मला त्यांच्या सर्वच पलूंमध्ये आणि दृष्टीमध्ये रस होता. पण काही गोष्टींचे नावही माहीत नव्हते अशा कितीतरी गोष्टी गुरुदेवांनी आम्हाला सांगितल्या. उदा. पर्यावरणाबद्दलची आस्था. गुरुदेवांनी स्वत: शांतिनिकेतनमध्ये ती बाणवली होती.’
एका मुलाखतीत इंदिराजींनी सांगितले आहे की, ‘‘शांतिनिकेतनचा अनुभव तुम्हाला घडवतो. आपल्याला लहानपणापासून माहीत असलेल्या काही परंपरांना तिथे उजाळा मिळाला. शांतिनिकेतनमध्ये त्या गांभीर्यपूर्वक राबवल्या जात. उदा. वसंत पंचमीचा सण. शांतिनिकेतनने मला नेमके काय दिले असेल, तर आपल्या आत शांतपणा जपण्याची सवय. मग बाहेर काही घडत असो. या सवयीने मला नेहमीच तगायला मदत केली आहे.’’
‘घरातील राजकीय वातावरणापायी तुम्हाला बालपणाचे फायदे लाभले नाहीत असे वाटते का?’ असा प्रश्न कुणीतरी केला असता इंदिराजी म्हणाल्या, ‘बालपणीच्या फायद्यांबद्दलची आधुनिक मते अगदी मूर्खपणाची आहेत. लहान मुलाला मोठय़ांइतकीच काळजी असते. पण त्या काळज्या आहेत हे त्याला कळत नसते. वयाच्या अत्यंत अवघड टप्प्यावर.. सोळाव्या वर्षी मी शांतिनिकेतनला गेले. माझ्या घरात असलेल्या ताणांमुळे मला तिथल्या शांततेची गरज होती. पण तिथे गेल्यावर मी आई-वडिलांबद्दल पूर्वीइतकीच काळजी करत राहिले. पण तरीही त्याकाळच्या तणावकेंद्रापासून दूर जाणे आणि माझी मी असणे, हे मला आवश्यक वाटत होते.’’
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंदिराजी लिब्सनला एक महिना होत्या. लंडनचे तिकीट त्या काढू बघत होत्या, पण त्यांना रोज ‘जागा नाही’ असे सांगितले जाई. म्हणून त्यांनी तार केली की, मी बोटीने जाईन. त्यावर सगळेजण त्यांना म्हणाले, बोटीने जाऊ नकोस. कारण त्याकाळी दहापकी नऊ बोटी बुडत असत. त्या ब्रिस्टॉलला पोचल्या तेव्हा तिथे बॉम्बवर्षांव सुरू होता. दिवसा जमिनीवरचे युद्ध आणि रात्री बॉम्बवर्षांव. त्यांना त्यावेळी मदत पथकात काम करायचे होते. पण ते त्यांना करता आले नाही.
फिरोज गांधी आणि त्या भारतात परतताना ते बोटीने आले. त्यांच्यासोबतची अनेक जहाजे बुडत होती. ब्रिटिश काळ्या लोकांना जी अपमानास्पद वागणूक देत, त्याचाही त्यांना यावेळी प्रत्यय आला. केपटाऊनला त्या थांबल्या असता त्यांनी तिथल्या स्वातंत्र्ययुद्धातील मंडळींना भेटायची इच्छा व्यक्त केली. त्या, फिरोज आणि त्यांच्यासोबत असलेल्या शैला वगळता इतरांना तिथे वेगळी वागणूक मिळत असे. याचे कारण हे तिघे युरोपियन आहेत असे तिथल्या मंडळींना वाटत होते. इंग्लंडमध्ये असताना एके ठिकाणी कृष्ण मेनन यांनी अचानक ‘मिस नेहरू आता बोलतील’ असे जाहीर केले. त्यावेळी इंदिराजींनी आपले पहिले जाहीर भाषण केले. त्यावर प्रेक्षकांतून एक दारूडा ओरडला, ‘she doesn’t speak, she squeaks.’ त्यावर त्या म्हणाल्या, यापुढे मी कधीच जाहीर सभेत भाषण करणार नाही. अर्थात, याच इंदिराजी पुढे पंतप्रधान झाल्यावर लाखोंच्या सभांतून प्रभावी भाषणे करत. त्यांच्यात हे रूपांतर कसे झाले, हे पाहण्याजोगे आहे. लहानपणापासूनचा राजकारणातला त्यांचा सहभाग यास कारणीभूत ठरला. पं. नेहरू, महात्मा गांधी यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन, फिरोज गांधींशी मत्री आणि अशा कितीतरी गोष्टींनी त्यात भर घातली. चांगल्या सहकाऱ्यांची, विशेषत: चांगल्या मित्र-मत्रिणींची निवड हेही त्याला एक कारण ठरले. पैकी पुपुल जयकर इंदिराजींच्या खूपच जवळ होत्या. उषा भगत यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी त्यांना मानसिकदृष्टय़ा स्थिर व्हायला मदत केली.
इंदिराजी हे एकाच वेळी देशातील सर्वोच्च पद भूषविणाऱ्या आणि दुसरीकडे विलक्षण एकाकी असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याबरोबर काम केलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी म्हटले आहे, ‘इंदिराजींच्या दोन उत्तम व दुबळ्या गोष्टी कुठल्या, असे मला विचारलेत तर मी म्हणेन, परराष्ट्र धोरणावरील त्यांची विलक्षण पकड व जाण, तसेच राष्ट्रीय मुत्सद्दीपणा या त्या दोन गोष्टी होत.’ इंदिराजींच्या दुबळेपणाबद्दल त्यांनी म्हटले आहे की, ‘त्यांनी कधी सहकाऱ्यांवर विश्वास टाकला नाही. हा त्यांचा दुबळेपणा आहे. दुसरे म्हणजे त्यांच्यामध्ये कायम एकाकीपणाची भावना वास करून होती. अर्थात, याचे कारण त्यांच्या बालपणात होते.’
इंदिरा गांधींचा स्वभाव काहीसा अंतर्मुख अन् काहीसा बहिर्मुख असा मिश्र होता. त्यांनी पुपुल जयकर यांना सांगितले होते, ‘‘लहानपणापासून मी मुलांच्यात वाढले. बारा-तेरा वर्षांपर्यंत मला कधी हा फरक जाणवला नाही. कारण मी सतत चुलतभावांबरोबरच खेळत असे.’’ तरी इंदिराजी ‘टॉमबॉइश’ नव्हत्या.
नेतृत्वगुण त्यांच्यात आपसूक आले. त्या गर्दीत सहज मिसळू शकत. किंबहुना, ती त्यांना आवडतही असे. याची दोन उदाहरणे पुपुल जयकरांच्या पुस्तकात सापडतात. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते फाळणी होऊन. त्याच सुमारास िहदू-मुस्लीम दंगे होऊ लागले. इंदिराजी तेव्हा मुलांना भेटायला मसुरीला गेलेल्या. पण दंगे सुरू होताच त्या रेल्वेने परत आल्या. त्या रेल्वेच्या डब्यात बसल्या असताना एका मुस्लीम व्यक्तीला िहदू जमावाने घेरल्याचे त्यांना दिसले. त्याबरोबर त्या खाली उतरल्या आणि त्याला हाताला धरून आपल्या डब्यात घेऊन आल्या. खरे तर हे धोकादायक होते. पण असा धोका इंदिराजींनी वेळोवेळी पत्करलेला दिसतो.
दुसरा प्रसंगही असाच- महात्मा गांधींनी दंगलींच्या काळात मुस्लीम वस्तीत जाऊन काम कर, असे त्यांना सांगितले. इंदिराजींनी ‘माझी तब्येत बरी नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर करते,’ असा निरोप त्यांना पाठवला आणि बरोबर कोणीतरी द्यावे, अशी विनंती केली. तेव्हा महात्माजी म्हणाले, ‘‘दुसरे कोणी असते तर हे मी तुला सांगितले नसते.’’ त्यानंतर मात्र इंदिराजी मुस्लीम वस्त्यांमध्ये रोज जाऊ लागल्या. त्या पहाटे साडेचार-पाचला जात अन् रात्री काळोख पडल्यानंतरच परत येत. या कामानंतर महात्माजींनी त्यांना म्हटले की, ‘‘तुझ्याबद्दलची माझी दृष्टी आता बदलली आहे. तुला मी रोज भेटायला येत जाईन. आणि जेव्हा भेटणे शक्य नसेल तेव्हा तुला गुलाबाचे फुल पाठवीन.’’ महात्मा गांधींचा ज्या दिवशी खून झाला त्याच्या आदल्या दिवशी त्या प्रार्थनेला हजर होत्या. त्याही दिवशी त्या जाणार होत्या, पण काही कारणामुळे त्या जाऊ शकल्या नव्हत्या. गांधीजींच्या निधनाने त्यांना आपले एक महत्त्वाचे सल्लागार व पालक गेल्याचे दु:ख झाले. याचे कारण त्या सांगतात, ‘‘महात्माजी आमच्या घरातलेच होते. वेळोवेळी ते चेष्टामस्करी करीत.’’ त्यांच्या शेवटच्या भेटीतही राजकारणावर न बोलता ते इंदिराजींशी चित्रपटावर गप्पा मारत होते. साहजिकच आईच्या पश्चात पुन्हा एकदा त्या एकाकी झाल्या.
मधल्या काळात त्यांची फिरोज गांधींशी मत्री झाली होती. फिरोज गरीब घरातील होता. त्याचे शिक्षणही नीट झाले नव्हते. लहान वयातच त्याने आंदोलनात भाग घेतला होता. तेव्हा त्याच्या एका नातेवाईकाने त्याला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला पाठवायचे ठरवले. त्यामुळे त्याचा राजकारणातला सहभाग कमी होईल अशी त्यांना आशा होती. याच काळात इंदिराजीही ऑक्सफर्डमध्ये शिकत होत्या. तिथले वातावरण त्यांना फारसे सुखावह वाटत नव्हते. व्ही. के. कृष्ण मेनन तेव्हा इंग्लंडमध्ये होते. भारतातून शिकायला आलेल्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांनी फिरोज व इंदिरा यांना पंखाखाली घेतले. पुढे फिरोज गांधी आणि इंदिराजींचे लग्न झाले. ‘आनंदभवन’मध्येच ते पार पडले. राजकारणातील आणि अलाहाबादमधील प्रतिष्ठित मंडळी या लग्नाला उपस्थित होती. फिरोज गांधी यांना टाइम्स ऑफ इंडियाने नोकरी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मात्र, ते टाइम्समध्ये लेख लिहीत असत.
डॉम मोराईस यांचे पुस्तक इंदिराजींच्या अनेक व्यक्तिगत क्षणांचा वेध घेते. त्यांच्या पुस्तकात इंदिराजी आई व पत्नी म्हणून कशा होत्या, हे समजते. संजयवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. तसेच नेहरूंवरही. मोराईस म्हणतात की, ‘त्यांनी आपले अस्तित्व या दोघांच्यात विरघळून टाकले होते.’ नेहरूंसोबत त्या वीस वष्रे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होत्या. साहजिकच त्यांचे बोलण्या-वागण्याचे, मुत्सद्दीपणाचे प्रशिक्षण नेहरूंच्या सहवासात झाले. नेहरूंसोबत दौऱ्यावर असताना अनेकदा त्या आदिवासींमध्ये मिसळत. खेडय़ापाडय़ातील साध्या, भावुक जनतेला नेहरू हे राजे वाटत, तर इंदिराजी त्यांची छोटी राजकन्या. नेहरूंप्रमाणेच त्यांनी जनतेचे प्रश्न जाणून घेतले. धान्यटंचाईवर मात करण्यासाठी हरितक्रांतीची योजना राबवली आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. अर्थ-सल्लागार सोबत घेऊन त्या देशातील मुख्यमंत्र्यांना भेटत. दर मंगळवारी व शुक्रवारी संसदेत अर्थविषयक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्या सकाळी सल्लागारांना कार्यालयात बोलावीत. संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचे विधेयक १९७० च्या ऑगस्टमध्ये लोकसभेत मांडण्यात आले. ते लोकसभेत दोन-तृतीयांश मतांनी मंजूर झाले. पण राज्यसभेत बहुमतासाठी एक मत कमी पडले. तेव्हा संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा अध्यादेश राष्ट्रपतींकरवी जारी करण्यात आला. अशी मुत्सद्दी खेळी इंदिराजी अनेक वेळा खेळल्या. अनेक वष्रे नेहरूंबरोबर काम केल्यामुळे त्यांना अन्य देशांतील उच्चपदस्थ व राष्ट्रप्रमुख ओळखत असत. त्याचा त्यांना खूप फायदा झाला. परदेशी राष्ट्रप्रमुखांशी बोलताना त्या परिस्थिती मुत्सद्दीपणे हाताळत. त्यांनी सहकारी म्हणून पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखा कर्तव्यकठोर अधिकारी निवडला. त्यांनी लिहिले आहे की, ‘इंदिरा गांधी परराष्ट्रविषयक धोरणांत अत्यंत कमी व सूचकपणे बोलत. मलाही त्या कधी बोलायचं, याचा इशारा करत.’ त्यांच्याकडून मी बरेच काही शिकलो, असे अलेक्झांडर यांनी म्हटले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘अनेकदा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना त्या त्यांची मते विचारत. त्यांच्याकडून टीकेची अपेक्षा करत. पण त्यांचे सहकारी कधीही मोकळेपणाने बोलत नसत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वापुढे ते दबून असत. इंदिराजींना याचा राग येई.’ अलेक्झांडर यांनी म्हटले आहे की, ‘लहान लहान गोष्टींतही त्यांना बेफिकीरपणा खपत नसे. एखादी फ्रेम तिरपी लागली किंवा फुलदाणीतील झाडे नीट नसली तरीही त्यांना चालत नसे.’ पंतप्रधान असल्या तरी लहानसहान गोष्टींत त्यांचे लक्ष असे. दोन्ही नातवांकडे-राहुल आणि प्रियांका- त्यांचे सतत लक्ष असे.
कॅथरीन फ्रँक, डॉम मोराईस, पुपुल जयकर या चरित्रकारांनी इंदिराजींच्या अकाली प्रौढत्व आलेल्या बालपणाचा वेध घेतला आहे. इंदिराजी व कमला नेहरू भल्यामोठय़ा घरात एकटय़ाच असत. टेनिसनच्या कविता मोठय़ाने वाचणे हा त्यांचा विरंगुळा होता. नेहरू नेहमी राजकीय कार्यात मग्न असत. आणि कमला नेहरू बऱ्याचदा आजारी असत. कमला नेहरू या सय्यद महमद यांच्याकडे उर्दू शिकत असत. ते नेहरूंचे मित्र होते. त्यांना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, ‘पंडितजींना माझ्या जबाबदारीमुळे स्वातंत्र्य चळवळीत काम करता येत नाही.’ या अपराधगंडाने कमला नेहरू गोठलेल्या दिसतात. दुसरीकडे विजयालक्ष्मी या नेहरूंच्या भगिनी कमला नेहरूंना चांगले इंग्रजी येत नाही म्हणून, तसेच त्या वेगळ्या सांस्कृतिक पाश्र्वभूमीतून आल्यामुळे त्यांचा अपमान करीत. इंदूलाही ‘तू तितकी छान दिसत नाहीस,’ असे घालूनपाडून बोलत. ५० वर्षांनंतरही इंदिराजींनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘त्यांनी (विजयालक्ष्मी) बालपणात माझ्या मनात निराशा िबबवली.’ याचा विपरीत परिणाम इंदिराजींवर झाला. बालपण समृद्ध असेल, कौतुकात गेले असेल तर माणूस सहसा संतुलित आणि कणखर बनतो. आजोबा मोतीलाल हे इंदिराजींचे लाड करीत. पंडितजी आणि आईही करे. घरात शंभरएक माणसे वावरत असत. असे असले तरी घरात इंदिराजींच्या वाटय़ाला वडील व आजोबा फारसे येत नसत. आईही आजारपणामुळे फारशी लाभत नसे. शिवाय सतत कार्यकर्त्यांचा गराडा.
नेहरू तुरुंगात असताना त्यांनी इंदिरेला १९० च्या वर पत्रे लिहिली. पण ही पत्रे इंदिराजींच्या हाती पडत नसत. ती दोन वर्षांनंतर इंदिराजींना मिळतील याची नेहरूंना खात्री होती. त्यांनी जगाचा इतिहास छोटय़ा इंदूला या पत्रातून सांगायला सुरुवात केली. ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ या नावाने पुढे ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली.
डॉम मोराईस यांची लेखनशैली अत्यंत खेळकर व अनौपचारिक आहे. मोरारजींपासून पुपुल जयकरांपर्यंत अनेकांना ते भेटले. इतकेच नव्हे, तर पत्रकार असल्याने फिल्ड वर्कवर त्यांचा विश्वास होता. अलाहाबादला इंदिराजींच्या जुन्या घरी ते जाऊन आले. तिथे एकमेव नोकर व त्याची पत्नी राहत होती. त्यांनी सांगितले की, इंदिराजींनी त्यांना पेन्शन द्यायचे कबूल केले होते, पण ते कधीच दिले नाही. मोरारजी देसाईंना जेव्हा मोराईस भेटले तेव्हा ते म्हणाले, ‘मी कोणाबद्दल वाईट बोलत नाही.’ ते चरखा चालवीत होते. ते म्हणाले, ‘पण इंदिरा गांधी या हिटलर किंवा स्टॅलिनपेक्षा वाईट हुकूमशहा आहेत.’ मोराईस यांनी विचारले, ‘कशा काय?’ तेव्हा ते म्हणाले, ‘मला विचारू नका. तारकेश्वरी सिन्हांना विचारा.’ ते मग तारकेश्वरी सिन्हांना भेटले. सिन्हा भेटल्यावर म्हणाल्या, ‘तुमचे पुस्तक मी पंधराव्या वेळा वाचते आहे.’ त्या थापा मारत होत्या. पुपुल जयकर मोराईसना म्हणाल्या की, ‘काही माणसे तुमच्यावर विशिष्ट छाप सोडतात. मी जेव्हा इंदूला पहिल्यांदा भेटले तेव्हा ती चौदा वर्षांची होती. माझं तिच्याबद्दलचं पहिलं इम्प्रेशन असं होतं, की ती कशात तरी हरवून गेली आहे. अ ग्रेव्ह चाइल्ड. जेव्हा इंदू राजीवच्या वेळी गरोदर होती तेव्हा कृष्णा हाथीसिंग यांच्या घरी तिला मी भेटले. ती खूप नाजूक वाटत होती. इंदूचं तेव्हाचं इम्प्रेशन म्हणजे ती अपूर्ण व्यक्तिमत्त्व असल्यासारखी मला भासली होती. तिचं व्यक्तिमत्त्व धूसर वाटायचं. १९४६ नंतर तिचं वडिलांशी खऱ्या अर्थाने नातं सुरू झालं. विजयालक्ष्मी पंडित युनायटेड नेशन्समध्ये गेल्यावर. हळूहळू इंदू आपल्या कोशातून बाहेर येऊ लागली. विकसित होऊ लागली. इतरांशी बरोबरीच्या नात्याने संवाद साधू लागली. पण फिरोजबरोबरच्या नात्याच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. ’फिरोजमध्ये आतूनच कुठेतरी एक प्रचंड कठोरपणा आणि चमकदारपणा होता. उलट, मिसेस गांधींकडे बुद्धिमत्ता आणि जिद्द होती,’ असे पुढे डॉम मोराईस पुपुल जयकर यांना भेटून आल्यावर म्हणतात. इंदिरा आणि फिरोज यांचे गुण अगदीच वेगळे होते. १९४६ च्या अगोदर तिच्या बुद्धिमत्तेची झलक तशी दिसली नव्हती. मात्र, ती कितीही लाजाळू वा हरवलेली वाटली तरी तिच्या बुद्धिमत्तेची छाप समोरच्यावर पडत असे,’ असे मोराईस म्हणाल्यावर जयकर म्हणाल्या, ‘खरे आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पलू आहेत; जे तिने विकसित होऊ दिले नाहीत.’
इंदिराजींच्या आयुष्यातील तीन पुरुष- वडील, पती फिरोज गांधी आणि मुलगा संजय गांधी- या तिघांचा त्यांच्या आयुष्यावर मोठाच परिणाम झालेला दिसतो. नेहरूंनी त्यांना एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून घडवले. पुढे राजकीय जबाबदारी अंगावर पडल्यावर १९४६ पासून पंडितजींनी इंदिराजींना आपले स्वीय सहाय्यक नेमल्याने त्यांचा सर्वाधिक सहवास त्यांना लाभला. त्यांच्यात मतभेद व खटकेही उडत, पण नेहरू स्वत: डॉमिनेट करीत. इंडोनेशियात एकदा इंदिराजी मुलांना घेऊन गेल्या होत्या. तिथे एका सभेत इंडोनेशियन लोक चित्कारायला लागले तेव्हा इंदिराजींनी मुलांना उचलून वर धरले. त्यामुळे नेहरूंचे भाषण ऐकू जाईना. तेव्हा नेहरू इंदिराजींवर चिडले. म्हणाले, ‘यांना घेऊन जा.’ आणि त्या तिथून निघून गेल्या. बऱ्याचदा ते त्यांना ओरडत. तेव्हा त्या ‘हा पापू’ असे दबल्या आवाजात उत्तर देत.
फिरोज गांधी कमला नेहरूंच्या आजारपणात आणि नंतरही इंदिराजींच्या आईच्या जवळ होते. हळूहळू त्यांची इंदिराजींशी मत्री झाली. इंदिरेकडे सोळा-सतराव्या वर्षीच त्यांनी (बहुधा) पत्रातून आपली प्रेमभावना व्यक्त केली होती. इंदिरा आणि कमला- दोघीही त्यावर म्हणाल्या, की ती अजून लहान आहे. अर्थात, हे डिप्लोमॅटिक उत्तर होते. कारण कमला नेहरू यांचे लग्न तेरा-चौदाव्या वर्षीच झाले होते. त्याकाळी बहुतेक मुलींची लग्ने सतराव्या वर्षी होत. कमला नेहरूंच्या आजारपणात व त्यांच्या मृत्यूनंतर इंदिराजी आणि फिरोज गांधी जवळ आले. फिरोज गांधींनी त्यांना लग्नाची मागणी घातली आणि इंदिराजींनी त्यांना होकार दिला. इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्या काळात इंदिरा गांधी भारतीय विद्यार्थ्यांबरोबर भरपूर फिरत. हसत-खेळत. पुढे भारतात परतल्यावर त्यांनी लग्न केले. नेहरूंचा या लग्नाला फारसा विरोध नव्हता. पण गांधीजींशी बोलावे असे त्यांनी सुचवले. फिरोज गांधी पारशी होते. पण िहदू पद्धतीने हा विवाह सोहळा झाला. लग्नानंतर फिरोज गांधी अलाहाबादला राहत, तर इंदिराजी स्वीय सहाय्यक म्हणून नेहरूंबरोबर दिल्लीत राहत होत्या. दरम्यान, फिरोज गांधींनी पत्रकारिता सुरू केली. कॅथरीन फ्रँक लिहितात की, ‘फिरोज गांधींचा स्वभाव हा चाबकाने फटके मारण्याचा होता. दोन-तीनदा त्या फटक्यांचा बळी नेहरू ठरले. फिरोज गांधी यांनी खासदारपदासाठी उभे राहायचे ठरवले ते रायबरेलीतून. इंदिरा गांधींनी त्यांना प्रचारात मदत केली. खासदार झाल्याने दिल्लीत फिरोज गांधींना घर मिळाले. अनेकदा ते मतदारसंघात जाताना इंदिराजींना सोबत घेऊन जात. त्यावर नेहरू नाराज होत. ते म्हणत, ‘कशाला उगाच तिला थकवतोस?’ इंदिराजींच्या लग्नानंतरही नेहरूंचे त्यांच्या बारीकसारीक गोष्टींत लक्ष असे. परिणामी इंदिरा व फिरोज यांच्यात मतभेद होऊ लागले. दिल्लीत काही स्त्रियांसोबत फिरोज यांचे नाव जोडण्यात येऊ लागले. त्यावरून इंदिराजी आणि त्यांच्यात खटके उडू लागले. शेवटी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
कॅथरीन फ्रँक यांच्या चरित्रलेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे, इंदिराजींचा इंग्लंड, स्वित्र्झलड आणि भारतातील वास्तव्याचा जो काळ आहे तो त्यांनी तिथली कागदपत्रे वाचून आणि चरित्रे चाळून तपशिलात उभा केला आहे. फिरोज गांधींना सगळ्या गोष्टी दुरूस्त करायची आवड होती; जी नंतर त्यांच्या मुलांमध्ये आली. ते उत्तम फोटोग्राफर होते. ही आवड नंतर राजीवमध्ये आली. कॅथरीन फ्रँक लिहितात, ‘इंग्लंडमधील एकांतात दोघांमधील जवळीक किती वाढली होती हे पाहायचे असेल तर ते फोटोतून दिसते. फिरोज गांधींनी काढलेल्या फोटोमध्ये त्या रोखून फोटोग्राफरकडे- फिरोज गांधींकडे पाहतात. त्यातली जी नजर आहे, ती विलक्षण प्रेमाची आहे.’ सगळ्या लेखकांनी इंदिराजींचे गुण सांगितले आहेत. त्यातील एक म्हणजे प्रचंड वाचन. अलेक्झांडर सांगतात की, ‘रोज त्या काही ना काहीतरी वाचत असत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याबद्दल सांगत.’ दुसरा त्यांचा गुण म्हणजे माणसे हेरणे, माणसांना वेळ देणे. त्याबद्दल डॉम मोराईस यांनी लिहिले आहे- ‘त्यांना होळी आवडत नसे. पण एकदा ग्रामीण भागातील लोक त्यांना भेटायला आले असता त्यांनी सांगितले की, तुमच्यातल्या एकाला निवडा आणि तो मला रंग लावेल.’ त्या कोणाला नाराज करत नसत. सतत त्या कार्यमग्न असत. इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे वेगळे रूप होते. कॅथरीन फ्रँक सांगतात की, ‘त्यांच्या शाळेतल्या, ऑक्सफर्डमधल्या तसेच इतर मत्रिणी मानत, की इंदिराजींची दोन रूपे आहेत. एक- त्यांच्यात वावरणारी लाजाळू, शांत आणि दुसरी- भारतीय मुलांमध्ये हसत-खेळत त्यांचे नेतृत्व करणारी.’ वेळोवेळी ज्या गोष्टी पुपुल जयकरांशी इंदिराजींनी चर्चिल्या आहेत, त्याही विलक्षण आहेत. उदा. लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यावर हंगामी पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी सैन्य बोलावले. त्यांचा उठावाचा डाव होता, असे इंदिराजींनी म्हटल्यावर पुपुल जयकर चकित झाल्या व म्हणाल्या, ‘खरंच?’ कारण त्यांचा यावर विश्वास बसेना. तेव्हा इंदिराजींनी सांगितले की, ‘नंदा किती महत्त्वाकांक्षी आहे, हे तू पाहायला हवेस.’ माणसांची चांगलीच पारख इंदिराजींना होती. म्हणूनच पुढे त्यांनी प्रशासनावर पकड बसवताना चांगल्या अधिकाऱ्यांची निवड केली.
इंदिराजींचे पती फिरोज लखनौला मुलांसोबत राहत. इंदिराजी दिल्लीत ‘तीन मूर्ती’मध्ये पंडित नेहरूंबरोबर. इंदिराजींनी अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे, की पंडितजींची काळजी घ्यायला कोणीच नव्हते, म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर पडली. बऱ्याचदा त्या रेल्वेने लखनौला येत. तेव्हा ताबडतोब पंडितजींचा टेलिग्राम येई- ‘असशील तशी निघून ये.’ फिरोज गांधी खासदार झाल्यावर तेही दिल्लीत राहू लागले. पण वेगळ्या बंगल्यात. फिरोज खासदार म्हणून लोकप्रिय होते. दीड कोटींचे शेअर्स सरकारने विकत घेतल्याचे मुंद्रा प्रकरण त्यांनी बाहेर काढले. त्यातून टी. कृष्णाचार्य या अर्थमंत्र्याना राजीनामा द्यावा लागला. साहजिकच फिरोजभोवती एक वलय तयार झाले. एका जाहीर कार्यक्रमात पंडित नेहरू आणि बुल्गॅनिन भेटणार होते. तिथे इंदिरा गांधी नेहरूंशेजारी बसल्या होत्या, तर फिरोज गांधींना आतही सोडण्यात आले नव्हते. फिरोज गांधी यांनी संसदेत हा विषय मांडला. तेव्हा नेहरूंनी जे- जे त्या कार्यक्रमाला पत्नीला घेऊन आले होते त्यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यावर फिरोज गांधी म्हणाले, मी काही माझ्या पत्नीला तिथे आणले नव्हते. हा नेहरूंना जबरदस्त टोला होता. अशा प्रकारे फिरोज गांधींनी नेहरूंशी सतत संघर्षांची भूमिका घेतली. दिल्लीत ते ‘इंडियन एक्स्प्रेस’ गटाचे संचालक म्हणून काम करू लागले. त्याआधी ‘नॅशनल हेरॉल्ड’चे ते काम पाहत. नॅशनल हेरॉल्डसाठी त्यांनी सुमारे दोन लाखांचे कर्ज घेतले होते. हे प्रकरण वाढत गेले. नेहरूंना त्यात हस्तक्षेप करता येईना. प्रचंड मोठी मशिनरी फिरोज यांनी हेरॉल्डसाठी मागवली. पण ती मुंबईच्या बंदरात एक-दीड वष्रे पडून राहिली. फिरोज यांना संघटनात्मक काम जमत नसले तरी पुढारीपणा जमत होता. हळूहळू त्यांचे नेहरूंवर टीका करणे इंदिराजींना जाचक होऊ लागले.
१९५९ साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची जागा रिकामी होत होती. तेव्हा के. सी. पंत यांनी इंदिराजींना सुचवले, की त्यांनी ती जागा घ्यावी. इंदिराजींनी त्यास नकार दिला. त्या संसदेच्या सदस्यही नव्हत्या. राजकारणात त्यांना रस नव्हता, हे वारंवार त्या सांगत असत. पण पंत म्हणाले की, ‘आम्ही ठरवले आहे. तुम्ही फक्त हो म्हणायचे आहे. तुमची परवानगी विचारत नाही.’ तेव्हा त्यांनी ‘नेहरूंना विचारा,’ असे सांगितले. पण नेहरूंशी आधीच पंत बोलले होते. अशा तऱ्हेने इंदिराजी अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, ननी यांच्यानंतर काँग्रेसच्या चौथ्या अध्यक्षा झाल्या. नेहरू आजारी असतानाच्या काळात एक विचित्र घटना घडली. केरळमध्ये काँग्रेसने मुस्लीम लीगशी हातमिळवणी केली होती आणि कम्युनिस्टांविरोधात ही मंडळी बोलत होती. इंदिराजी केरळमध्ये जाऊन आल्या आणि कम्युनिस्टांचे सरकार बरखास्त करायचे त्यांनी ठरवले. लोकशाहीच्या विरोधात त्यांचा हा पहिला आसूड होता. फिरोज आदी मंडळींनी याविरोधात दिल्लीत धरणे धरली. अगदी फिल्मी दृश्य होते ते. पत्नी काँग्रेसची अध्यक्ष आणि नवरा काँग्रेसच्या विरोधात धरणे धरतो आहे. यानंतर फिरोज आणि इंदिरा यांच्यातील चिडचिड वाढत गेली. लखनौमध्ये दोन-तीन स्त्रियांशी फिरोज यांचे नाव जोडले गेले होते. त्यातली एक काँग्रेसच्या मंत्र्याची मुलगी होती. साहजिकच नेहरूंनी त्यात हस्तक्षेप केला आणि त्यांना आवरायला सांगितले. त्या मुलीचे नंतर लग्न झाले. हे सारे इंदिराजींच्या कानावर येत होते. पुढे दिल्लीतही फिरोज यांचे अनेक स्त्रियांशी नाव जोडले जाऊ लागले. त्यामुळे अर्थातच इंदिराजी अस्वस्थ होत होत्या. दरम्यान, घडले असे की, मथाई आणि इंदिरा गांधी यांच्या संबंधांबद्दल बोलले जाऊ लागले. मथाई अविवाहित होते. नेहरूंचे सचिव म्हणून ते काम पाहत. प्रत्येक पत्र, प्रत्येक फाईल मथाईंच्या डोळ्याखालून जायची. नेहरू कुटुंबीय व इंदिराजी यांनी मथाईंचा स्वीकार केला होता. ते स्वभावाने कडक होते. त्यांचे इंग्रजी चांगले होते. पण ते अजिबात भावनिक नव्हते. असा माणूस राजकारण्यांना ढाल म्हणून नेहमी उपयोगी पडतो. इंदिराजींचे मथाईंबरोबर नाव जोडण्यात येत होते. कॅथरीन फ्रँक लिहितात की, ‘खरे तर हे इंदिराजींना हवेच होते.’ फिरोज गांधींनी आपले मित्र निखिल चक्रवर्ती यांना मथाईंची माहिती काढायला सांगितली. मथाईंनी कुर्ग तसेच दिल्लीत अवाढव्य पसा खर्च करून प्रॉपर्टी केल्याचे आढळून आले. हे पसे कुठून आले, असा प्रश्न लोकसभेत फिरोज यांनी उपस्थित केला आणि मथाई यांना राजीनामा देणे भाग पडले. खरे तर नेहरूंचा या साऱ्यावर विश्वास नव्हता. तरीही मथाईंनी राजीनामा देणे चांगले, असे त्यांना वाटले. साहजिकच मथाईंना नेहरूंच्या घराबाहेरचा रस्ता पकडावा लागला. ते प्रचंड चिडले. सुडाने पेटले. पुढे त्यांनी आत्मचरित्रात सर्वावर शरसंधान केलेच, पण इंदिराजींवरही त्यांनी ‘शी’ शीर्षकाने एक प्रकरण लिहिले. त्यात त्यांनी ‘इंदिरा गांधी माझ्या प्रेमात होत्या, आमचे शारीरिक सबंध होते. इतकेच नव्हे तर इंदिरेला माझ्यापासून मूल होणार होते..’ यांसारख्या अनेक गोष्टी लिहिल्या. त्या साऱ्या अफवा मानल्या तरी कॅथरीन फ्रँक सांगतात की, ‘इंदिराजींचे चुलतभाऊ ब्रजकुमार नेहरू यांनी मात्र या चरित्रात फॅक्टपेक्षा फिक्शनच अधिक असल्याचे म्हटले आहे.’ ‘शी’ हे प्रकरण छापायचे नाही असे मथाईंनी ठरवले. पण नंतर काही वर्षांनी ते प्रकरण दिल्लीत फिरू लागले. यामागे मनेका गांधी होत्या, असे फ्रँक यांनी म्हटले आहे.
नेहरूंची तब्येत ढासळली आणि ‘नेहरूंनंतर कोण?’ अशी चर्चा सुरू झाली. अमेरिकेतील एका वाहिनीने यावर एक मालिकाच तयार केली. त्यासाठी त्यांनी जे. पी., यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, कामराज आणि इंदिरा गांधी यांच्या मुलाखती घेतल्या. जेव्हा नेहरूंना कळले, की आपल्यानंतर कोण, यावर इंदिरेने मुलाखत दिली आहे; तेव्हा त्यांनी त्यांना फटकारले आणि म्हणाले, ‘तू तयारच कशी झालीस अशी मुलाखत द्यायला?’ मोरारजी देसाई महत्त्वाकांक्षी होते. त्यांचा या पदावर डोळा होता. तेव्हा एक वेगळीच योजना कामराज यांनी आखली. त्यांनी ठरवले, की काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी काही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आणि अशा पद्धतीने मोरारजींना दूर करण्यात आले. आणखी एक फळी लालबहादूर शास्त्रींना पुढे करून उभारण्यात आली.
डोरोथी नॉर्मन या अमेरिकन लेखिका व छायाचित्रकर स्त्रीला इंदिराजी अनेकदा पत्रे लिहीत. त्यात त्यांनी आपले मन उघड केले आहे. त्यात फिरोज गांधींविषयीची चिडचिड आहे. सत्ताकेंद्राविषयीची अस्वस्थता आहे. त्या सुट्टी व्यतीत करत असतानाचा इकडे फिरोज गांधींना लागोपाठ दोन हृदयविकाराचे झटके आले. त्यामुळे इंदिराजी तातडीने दिल्लीत परतल्या. पोहोचताक्षणी वििलग्डन इस्पितळात त्यांनी धाव घेतली. फिरोज गांधी बेहोश होते. अधूनमधून ते शुद्धीवर येत आणि ‘इंदू कुठे आहे?,’ असे विचारत. एका नर्सच्या कथनानुसार, ‘इंदिराजी एक दिवस आणि एक रात्र त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी काही खाल्ले नाही की काही प्यायल्या नाहीत. फिरोज गांधी शुद्धीवर आले तेव्हा इंदिराजींना उशाशी पाहून त्यांना आनंद झाला. नंतर त्यांनी डोळे मिटले.’ फिरोज यांच्या मृत्यूने इंदिराजींना मोठाच धक्का बसला. त्या केवळ पांढरी साडी नेसू लागल्या. दागिने वगैरे घालणे त्यांनी बंद केले. पण त्या बांगडय़ा घालत असत. डोरोथी नॉर्मन आणि नंतर नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात की, ‘‘लहानपणापासून सतत माझ्यावर कसले तरी दडपण आहे. मला सतत असे वाटते, की मी कुठल्या तरी कर्जाच्या ओझ्याखाली आहे.’’ दोन-तीन वर्षांनंतर त्या म्हणाल्या, ‘‘आता मला पुन्हा रंगीत साडी नेसावीशी वाटतेय. असं वाटतंय, की मी कर्जमुक्त झालेय.’’ त्याच दिवशी त्यांनी नेहरूंना पत्र लिहिले- ‘‘लहानपणापासून मी विलक्षण जगावेगळ्या परिस्थितीत माणसांना भेटत आली आहे. ऐतिहासिक गोष्टींना सामोरी गेली आहे. एखाद्या िपजऱ्यातल्या पक्ष्यासारखी माझी अवस्था झाली आहे. आता मला मुक्त व्हायचे आहे.’’ अशी मुक्तीची आस त्यांना वारंवार लागत असे. अनेकदा त्यांना वाटत असे, की हिमालयात एक छोटे घर घेऊन राहावे. त्या बऱ्याचदा म्हणत, ‘पंडितजी गेले तर मी राजकारणात राहणार नाही. मी छोटे घर घेऊन हिमालयात राहीन.’ पण तसे व्हायचे नव्हते. पंडितजी गेले आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. इंदिराजींना त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्री केले. पुनश्च लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर, आता कोण पंतप्रधान होणार, याबद्दल चर्चा सुरू झाली. इंदिराजींचे नाव सोपे म्हणून पुढे करण्यात आले. त्या आपल्या कह्य़ात राहतील असे सर्वाना वाटत होते. प्रत्यक्षात वेगळेच घडले आणि इंदिराजी देशाच्या दीर्घकालीन पंतप्रधान बनल्या. इंदिरा गांधींनी १९३८ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि १९५३ पासून वडिलांच्या राजकीय जीवनात त्या सक्रिय सहभाग घेऊ लागल्या. राजकारणापासून अनेकदा दूर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण अखेर हा राजकीय वारसा आपल्याला नाकारता येणार नाही, हे त्यांना कळून चुकले.
शशिकांत सावंत