वीणा गवाणकर

इस्रायलचा राजकीय इतिहास गोल्डा मेयरविना अधुरा ठरेल. ‘आयर्न लेडी’ हा किताब जिला चपखल लागू पडतो असं हे व्यक्तिमत्त्व. आयुष्यभर राजकीय संघर्ष करत, अनेक चढउतारांना तोंड देत देशाच्या सर्वोच्च पदी- पंतप्रधानपदी- पोहोचलेल्या गोल्डा मेयरने जागतिक स्तरावर इस्रायलची  अत्यंत आक्रमक, लढाऊ, पोलादी प्रतिमा निर्माण केली.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?

नोव्हेंबर १९६५ मध्ये इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी कधी नव्हे एवढय़ा खालच्या स्तरावर प्रचार मोहिमा राबवल्या गेल्या. बेन गुरियॉन विरुद्ध गोल्डा मेयर एकमेकांची उणीदुणी काढत राहिले. निवडणुकीत राफी पक्षाला दहा, तर मापाइ आणि अ. ऌ. संघटनेला ४५ जागा मिळाल्या. इश्कोलना पंतप्रधानपद लाभलं. त्यांनी संरक्षण खातंही आपल्या अखत्यारीत घेतलं. पण प्रचार मोहिमेत घेतलेले कष्ट त्यांना भोवले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रुग्णालयात काही आठवडे काढावे लागले. जानेवारी १९६६ मध्ये त्यांनी नवीन मंत्रिमंडळ स्थापलं. आबा इबन परराष्ट्रमंत्री झाले. गोल्डाने आपली निवृत्ती जाहीर केली. तिचे अस्वास्थ्य लक्षात घेऊन सर्वानी तिचा मान राखला.

निवडणुकीतील प्रचार मोहिमांनी गोल्डालाही थकवलं होतं. तिला आता विश्रांती आणि बदल दोन्ही हवे होते. गेली तीस र्वष सततचा प्रवास, सभा, बैठका, परिषदा, अधिवेशनं.. तिनं ठरवलं, आता सक्रिय राजकारण आणि सार्वजनिक आयुष्य पुरे. साधं कौटुंबिक जीवन जगायचं. मुला-नातवंडांत रमायचं. नेसेटचं सदस्यत्व मात्र ठेवायचं. कारण त्यामुळे तिला देशाची अद्ययावत स्थिती समजणार होती.

गोल्डाचं आणि इश्कोल याचं चांगलं जुळत होतं. (ती ६८, तर ते ७१ वर्षांचे होते.) त्यांना ओलांडून पुढं जाणं तिला जमणारं नव्हतं आणि तिच्या योग्यतेचं पदही आता उरलेलं नव्हतं. इश्कोलनी तिला उपपंतप्रधानपद देऊ केलं. तेही तिने नाकारलं. ‘अर्धवेळ मंत्री होण्यापेक्षा पूर्णवेळ आजी होणं बरं.’ पण तिनं इश्कोलना शब्द दिला, ‘मी काही राजकीय संन्यास घेऊन मठात जाणार नाही.’

तिच्या निवृत्तीची दखल अवघ्या जगानं घेतली. तिच्यावर शेकडो गौरवपर लेख लिहिले गेले. यू.एन.च्या एका अधिकाऱ्यानं तर म्हटलं, ‘जगात कुठेही इस्रायलसंबंधी काहीही विषय निघाला तर पहिला उल्लेख गोल्डा मेयरचा होईल.’

गोल्डाला आबा इबनची कुवत माहीत होती. ते आपलीच गादी चालवतील याची तिला खात्रीही होती. यू. एन., अमेरिकेत त्यांनी आपला चांगलाच प्रभाव पाडलेला होता. शेक्सपियरन इंग्रजी, अस्खलित हिब्रू बोलणारे आणि बोलण्यात अचूक संदर्भ देणारे म्हणून त्यांचा लौकिक होता. त्या दोघांत आता कसलीही स्पर्धा उरलेली नव्हती. तिच्या निरोपाच्या सत्रात इबननी तिच्या कारकीर्दीची ‘देदीप्यमान’ अशी स्तुती केली. आणि तिनेही तिच्या पदग्रहण समारंभाच्या वेळी शारेटनी जे करणं टाळलं ते तिने आवर्जून केलं. तिने समारंभपूर्वक इबनना त्यांच्या आसनापाशी नेलं. त्यांचा परिचय करून दिला. छायाचित्रकारांसाठी अनेक वेळा इबन यांच्याशी हस्तांदोलन केलं.

नेसेटचं पहिलं सत्र (२६ जानेवारी १९६६) सुरू झालं. नेसेट सभागृहात गोल्डा प्रवेशली. नेहमीप्रमाणे हसत, अभिवादन स्वीकारत गेली दहा र्वष आसनस्थ होत आलेल्या आपल्या जागेजवळ गेली. आणि मग एकदम चूक लक्षात आल्याप्रमाणे तिथून दूर जात म्हणाली, ‘नव्या तबेल्याकडे जायचं शिकायला जुन्या म्हाताऱ्या घोडय़ाला जरा कठीणच जातंय.’ आणि मग ती मागच्या बाकावर मापाइ सभासदांत जाऊन बसली.

तेल अविवच्या उपनगरात रमत अविवमध्ये १९५९ साली तिने आणि मेनाहेमने छोटं घर घेतलं होतं. त्याच्या एका भागात मेनाहेम, आया आणि त्यांचे तीन मुलगे राहत होते. दुसऱ्या अध्र्या भागात गोल्डा राहू लागली. या छोटय़ा घरात येण्यापूर्वी तिने परराष्ट्रमंत्र्याच्या (आपल्या) निवासस्थानातील बरीचशी स्मृतिचिन्हे, भेटवस्तू, पुस्तके, पुतळे वगैरे योग्य ठिकाणी- म्हणजे संग्रहालयात आणि सरकारी खजिन्यात पाठवले. छोटय़ा भेटवस्तू, चित्रे, लेखकांनी भेट पाठवलेली पुस्तके तिने आपल्या छोटय़ा घराच्या बैठकीत ठेवली. बैठकीत सोफा, खुच्र्या, कॉफी टेबल, तिची आवडती खुर्ची. आणि बैठकीला जोडूनच तिचं छोटं स्वयंपाकघर. तिच्या नातवंडांना या घरात मुक्त संचार होता. आणि तिला भेटायला येणाऱ्यांचा ओघ थांबता थांबत नव्हता.

शक्य असेल तेव्हा ती आपल्या बहिणीला- शेयनाला भेटायला जाई. तिला अलीकडे अल्झायमर आजारानं ग्रासलं होतं. तिला भेटताना गोल्डाला वाटे, मला दीर्घायुष्य नको. माझी बुद्धी ठिकाणावर आहे तोवरच मला जगायचंय. त्यानंतर एक मिनिटही नको. शेयनाने यीडिश भाषेमध्ये आपल्या आठवणी लिहून ठेवल्या होत्या. तिच्या मृत्यूपूर्वी त्या प्रकाशित व्हाव्यात याची सोय गोल्डाने केली. गोल्डा वेळ मिळेल तेव्हा सारा-झकेरिया आणि त्यांच्या मुलांना भेटायला  रिवायव्हीम किबुट्समध्ये जात असे. गोल्डा सामान्य नागरिकांप्रमाणे सार्वजनिक बसमधून प्रवास करे. तिला ओळखून लोक अभिवादन करत. आनंदित होत. ती प्रतिक्रिया तिलाही आनंद देई. वाहनचालक वाट वाकडी करून तिच्या दारात तिला सोडे. वाणसामानवाला तिला सामान उचलू देत नसे. तो स्वत:हून तिच्या घरी ते पोचवे.

आताशा तिला कोणी प्रकृतीबद्दल विचारलं की ती ‘फार काही नाही. इथे जरासा कॅन्सर. तिथे चिमूटभर क्षय. अधूनमधून गॉलब्लॅडर..’ म्हणत ते हसण्यावारी नेई खरी; पण तिची तब्येत उताराला लागली होती. तिला डॉक्टरांनी सांगितलेली पथ्यं पाळणं जमत नव्हतंच. पण आता केमोथेरपी सुरू झाल्यावर तिचे अस्वास्थ्य गुप्त राहिले नव्हते. मात्र, वृत्तपत्रे तिच्या खासगी जीवनाविषयी आदर राखत त्याच्या बातम्या करत नव्हती.

हा निवृत्तीकाळ जेमतेम तीन-चार आठवडे टिकला. सपीर, अरॅन, इश्कोल, गॅलीली एके दिवशी तिच्या घरी धडकले आणि ‘आता विश्रांती पुरे!’ म्हणू लागले. ‘मापाइ पक्षाची सेक्रेटरी जनरल हो,’ म्हणून त्यांनी आग्रह धरला. मापाइला छोटे छोटे तडे गेले होते. तुकडे निखळले होते. तरी अजूनही तो इस्रायलमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष होता. सरकार चालवण्यास समर्थ होता. महत्त्वाच्या सर्व कामगार संघटना अजूनही मापाइशी जोडून होत्या. परराष्ट्रमंत्री म्हणून गोल्डाला प्रतिष्ठा मिळालेली होतीच; पण आता या नव्या पदात प्रतिष्ठा आणि सत्ताही होती. पंतप्रधानाखालोखाल महत्त्वाचे असे हे पद होते.

पक्षाला इश्कोलसारखा पंतप्रधान देशाला देता आला असला तरी ते स्वभावाने नरम होते. पक्षाचे नेतृत्व करून त्याला उभारी देण्यासाठी गोल्डासारखी कणखर, ताठ व्यक्तीच हवी होती. सेक्रेटरी जनरलपद हे सतत प्रसिद्धीच्या झोतात चमकणारं नसलं तरी प्रचंड शक्तिस्थान होतं. गोल्डा त्या भूमिकेत फिट्ट बसणारी होती.

गोल्डा अधिकृतरीत्या सेक्रेटरी जनरलपद ग्रहण करण्यासाठी मापाइ पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीत आली तेव्हा धो-धो पाऊस पडत होता. सार्वजनिक वाहनातून प्रवास करून ती कार्यालयात थडकली होती. त्यावरून तिला कोणी टोकलं तर तिने त्यालाच फटकारलं. ‘म्हणजे काय? मी टॅक्सी करून यायला हवं होतं की काय?’

गोल्डाकडे कसली उधळमाधळ नव्हतीच. ती काटकसरी होती. तिची राहणी तर साधी होतीच; पण स्वत:चा वा पक्षाचा पैसाही ती जपून वापरे. कार्यालयातून घरी जायला निघताना विजेची सर्व बटणे ती स्वत: बंद करी. परराष्ट्रमंत्रीपदावरून निवृत्त झाल्यावर सर्व सरकारी सोयीसवलती बंद झाल्या. त्यावेळी तिच्या घराला सुरक्षा देणारे कर्मचारी, वाहनचालक यांनी आपली बदली नाखुशीने स्वीकारली. आपल्याला स्वयंपाकघरात आपल्याच टेबलावर जेवू घालणारी, रात्री उशिरानं हाक मारून चहा-कॉफी पाजणारी, मुलाबाळांची चौकशी करणारी एखादी ज्यूइश माताच होती ती त्यांच्यासाठी. मोठमोठे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी तिचा निरोप घेतला होता.

नवे सत्ताकेंद्र

गोल्डा आता नव्या भूमिकेत शिरली. पक्षश्रेष्ठी!

प्रचंड मंदीमुळे आणि तेवढय़ाच प्रचंड बेरोजगारीमुळे कामगार चळवळीला धक्का बसला होता. ती कमकुवत होत होती. तिच्यात नव्याने प्राण फुंकायचे तर मापाइ पक्षातील फटी बुजवून, तडे लिंपून, राफी पक्षातील सुशिक्षित तरुण, मापाममधले कडवे मार्क्‍सिस्ट आणि अ. ऌ. यांना एकत्र आणून नव्यानं कामगार पक्ष उभा करायला हवा होता.

हे काम सहज, सोपं नव्हतं. मनं पुन्हा सांधायची, नवे बंध निर्माण करायचे, एकमेकांचे दृष्टिकोण समजून घ्यायचे, द्यायचे, बदलायचे, जुन्या जखमांचा हिशेब मांडताना नव्याने जखमा होणार नाहीत याची दक्षता घ्यायची, मखमली चिमटे काढत चुका पदरात घालायच्या, हळूच वर्मावर बोट ठेवायचं.. एक ना अनेक कौशल्यं तिला वापरावी लागणार होती.

तिने आपली कामगिरी सुरू केली. सत्तेचा केंद्रबिंदू मंत्रिमंडळाकडून पक्षाकडे आला. पंतप्रधान कार्यालयाकडून तो गोल्डाच्या त्या छोटय़ा स्वयंपाकघरात आला. पंतप्रधान इश्कोलना गोल्डाची भेट हवी असेल तर ते तिला जेरुसलेमला बोलावून घेत नसत. स्वत: तेल अविवला जाऊन तिला भेटत. सौ. मरियम लेवी इश्कोल गोल्डाला ‘हातात शस्त्र नसणारी, पण सर्वाना खुजे करून सोडणारी अ‍ॅमेझॉन!’ म्हणे.

पक्षाचे पुनर्गठन करण्याच्या गोल्डाच्या प्रयत्नांना खीळ बसली ती नासेर यांच्या कृतीमुळे. १६ मे १९६७ रोजी सकाळी इजिप्शियन लष्करप्रमुखाने यू. एन. इमर्जन्सी फोर्सच्या कमांडरला त्यांच्या पलटणी ताबडतोब हलवायला सांगितल्या. १९५६ साली सिनाईतून माघार घेताना इस्रायलने घातलेल्या अटीमुळे यू. एन. पलटणी तिथे तैनात होत्या. यू. एन. जनरल असेम्ब्लीने सांगितल्याखेरीज त्या फौजा तिथून काढल्या जाणार नाहीत, असा शब्द  यू. एन. जनरल सेक्रेटरी हॅमरशोल्ड यांनी दिला होता.

नासेर यांची ती सूचना इस्रायलला नीट समजेपर्यंत इजिप्तच्या लष्करी फौजा रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्रे, रशियन लढाऊ विमाने, वाहने यांसह सिनाई आणि गाझात घुसल्या. ‘इस्रायलचं अस्तित्व बराच काळ टिकलंय. इस्रायल नष्ट केल्यावरच आता हे युद्ध थांबेल..’ रेडिओ कैरोवरून घोषणा झाली.

गेले दशकभर यू. एन. इमर्जन्सी फोर्सचे साडेचार हजार सैनिक इजिप्तमध्ये चाळीसएक टेहळणी नाक्यांवर ठेवलेले होते. त्यामुळे टिरान सामुद्रधुनीमधून  जलवाहतूक सुरळीतपणे चालू होती. फेदायिन गाझातून घुसखोरी करू शकत नव्हते आणि इजिप्शियन- इस्रायलींत एकदाही चकमक घडली नव्हती. यू. एन. सैन्य तिथे तैनात नसेल तर शस्त्रसंधी संभवणार नाही, ही भीती गोल्डाने १९५७ साली यू. एन. जनरल असेम्ब्लीसमोरील आपल्या भाषणात केली होती. यू. एन. जनरल सेक्रेटरी  हॅमरशोल्ड यांच्या जागी ऊ थांन्ट आल्यावर त्यांनी हॅमरशोल्डनी दिलेलं आश्वासन कानाआड करून यू. एन. इमर्जन्सी फोर्स हलवण्यास अनुमती दिली. इजिप्तच्या सहमतीशिवाय ते सैन्य तिथे ठेवता येणार नाही, ही सबब पुढे केली.

इस्रायलने आपले राजकारणी धुरंधर (डिप्लोमॅट्स) ब्रिटन, अमेरिकेत पाठवले. इजिप्त कसे आक्रमणाच्या तयारी आहे ते सीमेवर जाऊन पाहण्यासाठी आणि इस्रायल कुठेही आक्रमण करत नाहीए याची खात्री करून घ्या, म्हणून त्यांना पत्रे पाठवली. ही प्रबळ राष्ट्रे या प्रकरणी काय भूमिका घेतात याच्या प्रतीक्षेत पंतप्रधान इश्कोल होते. तशात अगदी योजून ठरवल्याप्रमाणे विरोधी पक्ष हेरट याचा नेता मेनाहेम बेगीन आणि राफी पक्ष यांनी आरडाओरडा सुरू केला.. ‘इश्कोलना लष्कराचा अनुभव नाही, अनुभवी बेन गुरियॉन यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांचा समावेश असलेले राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करा.’ इश्कोलनी ही मागणी तात्काळ फेटाळली. गोल्डाचा भरभक्कम पाठिंबा इश्कोलना होताच. तिनेही राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करायला नकार दिला.

१९ मे रोजी यू. एन. सैन्याची शेवटची तुकडी इजिप्त-सिनाईबाहेर पडली. २३ मे रोजी नासेरनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि यू. एन. निर्देश डावलून टिरान सामुद्रधुनीमधून इस्रायलच्या आणि त्यांच्याकडे ये-जा करणाऱ्या जहाजांवर बंदी घातली. जे काही घडतंय ते समजत असूनही इस्रायलच्या बाजूने कोणीही महासत्ता वा राष्ट्र उभे राहिना. आपण आता एकटेच आहोत, हे इस्रायल समजून चुकले.

उँ्रीऋ ऋ २३ंऋऋ  यीडझ्ॉक राबिन  यांनी  जरलन्सना स्पष्ट केलं, ‘कैरो रेडिओवरून इस्रायल समूळ नष्ट करा म्हणून सांगितलं जातंय. हा आता आपल्या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण असणार आहोत की नसणार आहोत?’

हे युद्ध कसं टाळता येईल, या प्रयत्नांत इश्कोल होते. प्रेसिडेन्ट लिंडन जॉन्सननी ‘अमेरिकेला विचारल्याशिवाय पहिली गोळी झाडू नये, किंवा कोणतीही लष्करी कारवाई करू नये,’ असं आधीच कळवलं होतं. आता त्यांनी कळवलं- ‘४८ तास थांबा.’ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन इश्कोलनी विरोधी पक्षांतील नेत्यांसह एक बैठक घेतली. मेनाहेम बेगीन, मोशे दायान, शिमॉन पेरेस आणि राफी पार्टीतील इतरही नेते. गोल्डालाही अर्थात निमंत्रण होतेच. बैठकीत वेगवेगळे पर्याय सुचवले गेले. गोल्डाने ४८ तास वाट बघण्याचा आग्रह धरला. इस्रायलला अमेरिकेने दोषी धरू नये यासाठी अमेरिकेची सूचना पाळावी, यावर ती ठाम होती. राबिन आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांनी तो निर्णय स्वीकारला. इबन यांनी विदेशात दौरा काढून प्रबळ राष्ट्रांना इस्रायलची बाजू पटवून द्यावी असेही या बैठकीत ठरले. त्यानुसार इबन दौऱ्यावर गेले.

या प्रतीक्षेच्या काळात सर्व राखीव सैनिकांना- म्हणजे पंचावन्न वर्षांखालील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला बोलावून घेण्यात आले. ज्यांना लष्करी तयारीसाठी बोलावले गेलेले नव्हते अशा मागे राहिलेल्यांनी घराभोवती खंदक खणणे, तळघरे साफसूफ करणे अशी युद्धजन्य आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू केली. खासगी वाहने लष्कराच्या दिमतीला गेली. कारखाने बंद झाले आणि कामगारांना राखीव दलात जायला मोकळे केले गेले. गोल्डा कॅबिनेटची सदस्य नव्हती तरी तिच्या आता जेरुसलेमला सतत फेऱ्या सुरू झाल्या. तिच्या स्वयंपाकघरात मंत्र्यांचा राबता वाढला. मोठय़ा प्रमाणावर रक्तसंकलन केलं जाऊ लागलं. आयत्या वेळी रुग्णालये म्हणून उपयोगात यावीत म्हणून हॉटेल्स रिकामी केली गेली. पुढची भीषणता लक्षात घेऊन हजारो कबरी ठिकठिकाणी खोदून तयार ठेवल्या गेल्या. आता त्यांना काहीही झालं तरी इस्रायल उन्मळू द्यायचा नव्हता.

आपले सैन्य सक्षम आहे. आपणच आधी भेदक मारा करावा, असा राबिन यांचा आग्रह होता. परंतु अमेरिका तसं करायला मना करत होती आणि स्वत: मदतीलाही येत नव्हती. आपण जगासमोर युद्धखोर ठरू नये यासाठी इश्कोल सर्वाना सबुरीचा सल्ला देत होते. आणि त्यांना गोल्डाचा याबाबत भक्कम पाठिंबा होता.

इश्कोल यांच्या या भूमिकेचा अर्थ ते भित्रे, कचखाऊ आहेत, असा विरोधी पक्ष आणि नागरिकांनी काढला आणि मग ठरवून निषेध मोर्चे, घोषणा, नेतृत्व बदलाची मागणी सुरू झाली. देशापुढे खरी परिस्थिती मांडावी या हेतूनं इश्कोलनी दूरदर्शनवरून भाषण केलं. मुळात ते उत्तम, प्रभावी वक्ते नव्हतेच. त्यात ते प्रचंड तणावाखाली. थकलेले वृद्ध. त्यांचे भाषण प्रभावी झाले नाही. जनतेला धीर देण्यातही ते कमी पडले. त्यामुळे विरोधकांचे अधिकच फावले. ‘सिनाई युद्धात रणवीर ठरलेल्या निधडय़ा मोशे दायानना संरक्षण मंत्री करा,’ म्हणत राफी पक्षाने राष्ट्रीय एकता सरकार स्थापावे यासाठी हाकाटी सुरू केली. ‘दायान, दायान, दायान’ म्हणून रस्तोरस्ती घोषणा ऐकू येऊ लागल्या. ‘आता तेच एक तारणहार आहेत..’ अशी त्यांची प्रतिमा उभी राहू लागली.

मापाइ पक्षाच्या अंत:वर्तुळात चर्चा झाली. आता मंत्रिमंडळात काही बदल केला, इश्कोल यांच्या जागी अन्य कोणी आणले तर अविश्वासाचा ठराव आणल्यासारखे होऊन सरकार कोसळण्याची भीती होती. गोल्डाने मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यास नकार दिला. इश्कोल यांच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली- ‘देशाला युद्धात लोटण्यापूर्वी जो नेता कच खात नाही, तो नेता होण्याच्या योग्यतेचा नाही..’ तिच्या या उक्तीला नंतर म्हणीचंच स्थान मिळालं.

विरोधकांची धार थोडी बोथट करावी, या हेतूनं गोल्डाने राष्ट्रीय एकता सरकार स्थापण्याची तयारी दाखवली. त्यात दायान संरक्षणमंत्री असल्याखेरीज असा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका राफी आणि विरोधी पक्षांनी घेतली. ‘ते तर माझा जीव गेला तरी शक्य नाही,’ यावर गोल्डा अढळ राहिली. गोल्डाने दायानना बिनखात्याचे मंत्रिपद देऊ केले. इश्कोलने त्यांना उपपंतप्रधानपद देऊ केले. दायाननी दोन्ही नाकारले. ‘विजयासाठी आम्ही सिद्धच होतो. आमचं कऊाजिंकणारच याची मला पूर्ण खात्री होती. अशा वेळी इश्कोलकडचं संरक्षण खातं काढून घेण्याची काही गरज नव्हती..’ यावर गोल्डा ठाम होती.

गोल्डाच्या सिगरेट्स वाढल्या. भेटी, चर्चा, फोन्स.. तिची ताकद वाढतच चालली होती. तिला आता कोणी मात देऊ शकत नव्हतं. ही म्हातारी आहे तोवर आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही, हे दायान समजून चुकले.

पक्षात गोल्डाचं स्थान प्रबळ होत चाललं असलं तरी लोकमानसात तिच्याविरुद्ध मत तयार होऊ लागलं होतं. होलोकॉस्टची भीती अजून मनातून पुसली न गेलेल्यांनी इस्रायलवर हल्ला करू पाहणाऱ्या शक्तींना धडा शिकवण्यासाठी मोशे दायानसारखा धडाडीचा रणमर्दच हवा म्हणून आग्रह धरला. कऊा च्या सामर्थ्यांची, तयारीची आणि विजयाची पूर्ण खात्री असणाऱ्या गोल्डाला पुढचे चित्र दिसत होते. या युद्धात (ते झालं तर) इस्रायलला विजय मिळाल्याचं श्रेय दायानला मिळालं (आणि तो ते घेणारच!) तर..? रणझुंजार म्हणून त्याला महत्त्व येणार, हे निश्चित.

लोक गोल्डाविरुद्ध घोषणा देऊ लागले. मोर्चे काढू लागले. तिच्या घराला घेराव घालू लागले. राष्ट्रीय एकता सरकार स्थापू न देणारी, ‘दायानच्या मार्गातली धोंड’ असं तिला म्हणू लागले. वृत्तपत्रांतूनही तिच्याविरुद्ध मतप्रदर्शन सुरू झालं. तिची हेटाळणी करणारी व्यंगचित्रे प्रसिद्ध होऊ लागली. राफी पक्ष, दायान, पेरेस हे या विरोधाचे प्रणेते आहेत, हे गोल्डा समजून होती. पण तिने या सगळ्याला दाद दिली नाहीच. मात्र, आता बेन गुरियॉन यांचे नाव जोरदारपणे पुढे येऊ लागलं. लोकांना युद्ध नको होतं. पण ही परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी तेच अनुभवी आणि सक्षम आहेत असं त्यांना वाटत होतं. मग बेन गुरियॉननीही इश्कोल यांच्यातील उणिवा दाखवायला सुरुवात केली. पेरेस त्यांच्या पाठीशी होतेच. आजवर बेन गुरियॉनच्या विरोधात अगदी दंड थोपटून उभे असणाऱ्या मेनाहेम बेगीन यांनीही बेन गुरियॉन यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा आग्रह धरायला सुरुवात केली. सौ. पॉला बेन गुरियॉन यांनीही गोल्डाला फोन करून बेन गुरियॉनशी सलोखा कर, म्हणून सांगितलं. पेरेसनी गोल्डाला खास पत्र पाठवून नवे विस्तृत सरकार स्थापनेचा विचार करण्यासाठी एक बैठक घेऊन चर्चा करू या म्हणाले. गोल्डाने अशा युद्धजन्य आणीबाणीच्या परिस्थितीत आदर्शात तफावत असणाऱ्या पक्षांचे संमिश्र सरकार कार्यक्षम ठरणार नाही, म्हणत हे सर्व प्रस्ताव नाकारले. तिला आता बेन गुरियॉन यांच्या हाती देशाची धुरा द्यायची नव्हतीच. इश्कोलना तिच्या या धोरणाने खूप आश्वस्त केलं.

परराष्ट्रमंत्री इबन आपला दौरा संपवून २७ मे रोजी इस्रायलला परतले. त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. अमेरिकेला त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या अहवालानुसार, इस्रायलला इतक्यात काही धोका संभवत नव्हता. परंतु ‘‘४ लाख ६५ हजार अरब सैनिक, २८०० रणगाडे आणि ८०० विमानं इस्रायलला वेढू पाहत होती त्याचं काय?’’ असा पालमाख् संघटनेचे संस्थापक आणि कमांडर यीगल अ‍ॅलन यांचा प्रश्न होता. ते देशातले सर्वात अनुभवी युद्धशास्त्रज्ञ होते. सध्या ते श्रम आणि रोजगार मंत्री होते.

शेवटी गोल्डाने माघार घेतली.

बरेच शह-काटशह, रुसवेफुगवे होऊन १ जूनला राष्ट्रीय एकता सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मोशे दायान संरक्षण मंत्री झाले. राफी आणि गोहल या विरोधी पक्षांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. मेनाहेम बेगीन बिनखात्याचे मंत्री झाले. मापाइ पक्षालाही मंत्रिमंडळात एक जागा अधिक मिळाली. गोल्डाला मंत्रिमंडळात सामील होण्याचा आग्रह झाला. पण तिने नकार दिला.

एवढय़ात जॉर्डनचे राजे हुसेन यांनी इजिप्तबरोबर संरक्षण करार केला. आपले सैन्य इजिप्तच्या दिमतीस दिले. अरबांचा आता इस्रायलच्या सीमाभोवतीचा वेढा वाढत चालला.

एक साधा अंदाज घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान इश्कोल यांनी मोसाद प्रमुख मेयर अमिट यांना अमेरिकेला पाठवलं. उकअ ऊ्र१ीू३१ रिचर्ड हेल्म्स, ज्येष्ठ सीआयए अधिकारी, रीू१ी३ं१८ ऋ ऊीऋील्ल२ी रॉबर्ट मॅक् नामाराआणि प्रेसिडेन्ट जॉन्सन यांच्या भेटी घेऊन त्यांना परिस्थिती समजावून देऊन तीन जूनला मेयर अमिट परतले. लागलीच ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. तिथे पंतप्रधान, मोशे दायान आणि इतर त्यांची अधीरतेने वाट पाहत होते.  नासेरना अडवण्यासाठी कोणतीही कारवाई इस्रायलने केली तर अमेरिका त्यांच्या पाठीशी असेल, असे अमिटनी सांगितले. असा हिरवा कंदील मिळताच रविवार, ४ जून रोजी सकाळी इस्रायली मंत्रिमंडळाने देशाला वेढून असणाऱ्या अरब देशांवर हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला. ‘अरबांना इथून आम्हाला उखडून काढायचं आहे. आम्ही त्यांना याकामी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे की काय? युद्ध टाळण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नाही. आमच्या मदतीला कोणीही येणार नाही..’ कोणतंही सरकारी पद न भूषवणाऱ्या गोल्डाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनभिषिक्त अधिकाराने सांगितले.

४ जून १९६७ रोजी सकाळी ७ वा. १४ मिनिटांनी इस्रायली हवाई दलाने फक्त १२ विमाने देशाच्या हवाई अवकाश रक्षणासाठी मागे ठेवून आकाशात झेप घेतली. अरब विमानचालक अजून न्याहारीच करत होते. दोन तासांत इस्रायलींनी इजिप्तची ३०० विमाने जागीच जमीनदोस्त केली. उत्तरेकडे जॉर्डनच्या आणि सीरियाच्या विमानतळांवरही हल्ला चढवला. दिवस संपता संपता इजिप्त, जॉर्डनचे संपूर्ण आणि सीरियाचे अर्धेअधिक हवाई दल नष्ट झाले होते. कऊा ने सीरियाकडून गोलन टेकडय़ा पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या. सिनाई आणि गाझापट्टी परत मिळवली होती. (जो भूप्रदेश दहा वर्षांपूर्वी गोल्डाला परत करावा लागला होता, तोच हा प्रदेश.) तीन दिवसांनंतर ७ जूनला इस्रायली पॅराट्रपर्सनी प्राचीन नगरी जेरुसलेम जॉर्डनकडून पूर्णपणे ताब्यात घेतली. सहा दिवस चाललेले हे युद्ध १० जूनला थांबले. इस्रायलने जिंकलेल्या भूप्रदेशामुळे त्याचे आकारमान आता मूळच्यापेक्षा तिप्पट मोठे झाले होते.

दोन दिवसांनी गोल्डा प्राचीन नगरीला भेट द्यायला गेली. पूर्वीही काही वर्षांपूर्वी पती मॉरिससह जेरुसलेममध्ये राहत असताना ती या ‘वेस्टर्न वॉल’ला भेट द्यायला आली होती. त्यावेळी तिला या प्राचीन वास्तूविषयी फारसं काही वाटलं नव्हतं. आता यावेळी पॅराट्रपर्स आणि सैनिक यांनी त्या भिंतीजवळचा परिसर फुलून गेला होता. ते त्या भिंतीला आपल्या बोटांनी स्पर्श करत होते. १९४८ पासून ही (पवित्र) भिंत जॉर्डनच्या ताब्यात होती. तिला स्पर्श करताना इस्रायली सैनिकांच्या भावना उचंबळून येत होत्या. त्यातले कितीतरी तरुण धार्मिक आचार कठोरपणे पाळणारे नसतीलही, तरीही त्या भिंतीच्या दर्शनाने आणि स्पर्शाने ते हळवे झाले होते. दोन हजार वर्षांपूर्वीपासून उभे असलेले हे वास्तू-अवशेष ज्यूंच्या अस्तित्वाशीच निगडित होते. ज्यूंच्या गेल्या कित्येक पिढय़ा जे करत आल्या होत्या तेच गोल्डाने केलं. आपली इच्छा लिहिलेली चिठ्ठी भिंतीच्या फटीत घुसवली. तिनं चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘शालोम’! ती तिथे उभी असतानाच एक सैनिक तिच्या जवळ गेला. आपले मस्तक तिच्या खांद्यावर ठेवलं. तिला मिठीत घेऊन तो रडू लागला. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी गोल्डाने अमेरिकेला प्रयाण केलं. देशाचा खजिना रिता झाला होता. अमेरिकेत मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये प्रचंड रॅली निघाली. अठरा हजारांची उपस्थिती होती. गोल्डाने तिथल्या भाषणात म्हटलं की, ‘‘स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच इस्रायलला तिसऱ्यांदा युद्धात उतरावं लागलं. ते आम्ही जिंकलं. हिटलरच्या गॅस चेंबरमध्ये, त्याला प्रतिकार करून स्वसंरक्षण करू न शकल्याने नष्ट झाले ते शेवटचेच ज्यू!’’ असं म्हणत तिने इस्रायलने केलेल्या विक्रमाची गाथा सांगितली. जिंकलेल्या प्रदेशातून माघार घेऊन पुन्हा इस्रायलच्या सीमा असुरक्षित होऊ देणार नाही, हे सांगत ती पुढे विचारती झाली- ‘‘पूर्ण शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत इस्रायलींनी माघारी जावे असं कोणी प्रामाणिकपणे सांगू शकेल का? आमच्या दहा वर्षांच्या मुलांनी पुढच्या युद्धाच्या दृष्टीने प्रशिक्षित व्हायला सुरुवात करावी असं आम्हाला सांगायचं धाडस कुणी करू शकतो का?’’

जमावातून ‘‘नाही.. नाही.. नाही’’ असे शब्द घुमले.

अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी गोल्डा लेवी इश्कोलना भेटली होती. जेरुसलेममध्ये प्राचीन नगरी भागात ज्यू वसाहती उभ्या राहाव्यात यासाठी योजना आखण्याविषयी ते बोलले. तेव्हा गोल्डाने भविष्याचा वेध घेत म्हटलं, ‘‘मला वाटतं, तिथे अशा वसाहती करणं शक्य होणार नाही. जे ज्यू तिथे वसाहत करतील त्यांना तिथं टिकून राहता येणं कठीण आहे.’’

सहादिवसीय युद्धात (6 िं८२ ६ं१) अभूतपूर्व यश मिळवल्यावर जेरुसलेमसह जिंकलेल्या प्रदेशाचं काय करावं, याविषयी संभ्रम आणि वाद यांना तोंड देण्याची वेळ इस्रायली नेत्यांवर आली.

वाढते प्राबल्य

पंतप्रधान इश्कोल हे कर्करोगाने आजारी होतेच. तशात आताशी त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला होता.

दुसरीकडे गोल्डा वजन कमी करण्याची आणि आरोग्याची काळजी घेण्याची आठवण झाली की सवड काढून झुरिचला (स्वित्र्झलड) जात असे. १९६७ च्या उन्हाळ्यात ती तिथे असताना झीव्ह शारेफ (इस्रायलचे व्यापार मंत्री) तिला भेटायला आले. ते तिचे हितचिंतक व मित्र. इश्कोलच्या प्रकृतिअस्वास्थ्याला अनुलक्षून ते गोल्डाला म्हणाले, ‘आता तूच पंतप्रधान होणार.’ तिने त्यांना झटकलं. त्यावर ते म्हणाले, ‘इश्कोलनंतर कोण, या वादात पक्षात झगडा होईल आणि दुफळी माजेल. त्यामुळे तुलाच हे पद घ्यावं लागेल.’ ‘इश्कोल हयात आहेत तोवर हा विषय नको,’ म्हणत तिने तो विषय थांबवला. उडवून मात्र लावला नाही.

माजी मोसाद प्रमुख इसर हॅरेल यांनीही गोल्डा मापाइची सेक्रेटरी जनरल झाल्यावर तिनेच इश्कोलना बाजूला करून पंतप्रधान व्हावे म्हणून आग्रह धरला होता. ‘‘मी म्हातारी बाई. काहीतरीच काय बोलतोस?’’ म्हणत तिने तेव्हा तो विषय थांबवला होता. नाकारला नव्हताच.

गोल्डाने तूर्तास पक्षबळ वाढवायला घेतलं होतं. मापाइ आणि ए. एच. पक्षांत संगठन घडवून आणण्याच्या प्रयत्नात असताना तिने राफी पक्षाला दूरच ठेवलं होतं. सहा-दिवसीय युद्धानंतर संरक्षण मंत्री मोशे दायान आता महाकर्तृत्ववान ठरले होते. त्यामुळे राफी पक्षाचा रुबाब वाढला. पेरेस राफी पक्षाचे (ज्या पक्षातून तो फुटून निघाला होता त्या) मापाइशी पुनर्मीलन करू पाहत होते. तसं झालं तर पेरेस, दायान आणि इतर राफी नेत्यांना अधिक मजबूत पायावर उभं राहता येऊन सत्तेचा मोठा वाटा उचलता आला असता. गोल्डा, सपीर, अरॉन वगैरे ज्येष्ठांना हा मापाइच्या राजकीय वर्चस्वाला बसू शकणारा धोका वाटला. शिवाय गोल्डा अ. ऌ. पक्षाचे यीगल अ‍ॅलन यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहत होती, त्यालाही अडसर निर्माण झाला असता.

राफीचे इतर सदस्य मापाइला संलग्न होण्यासाठी उत्सुक असले तरी बेन गुरियॉन त्यासाठी तयार नव्हते. गोल्डा वृद्ध झाली असली, आजारांनी त्रस्त असली तरी तिला नमवणं कुणालाच शक्य होत नव्हतं. वादविवादात ती कुणाला हार जात नव्हती. सगळ्यांना ती ओळखून होती. त्यांच्या उणिवा, कच्चेपणा, उथळपणा सगळे हिशोब तिच्याकडे होते.

शेवटी मापाइ, ए. एच. आणि राफी पक्ष संगठित होऊन नवा पक्ष ‘इस्रायल लेबर पार्टी’ तयार झाला. सर्वाच्या बऱ्याच आग्रहानंतर गोल्डाने ‘नको.. नको’ म्हणत सेक्रेटरी जनरलपद स्वीकारण्याचं मान्य केलं. या पदामुळे तिची सत्ता आणि प्रतिष्ठा पूर्वीपेक्षाही वाढणार होती. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी अर्धेअधिक नेते हे जग सोडून गेले होते. बेन गुरियॉन बाजूला पडले होते.

वृत्तपत्रे आता गोल्डाला नव्या इस्रायलच्या धाडसाचं, शक्तीचं, भक्तीचं प्रतीक म्हणून तिचा गौरव करत होती. कणखर (पोलादी) स्त्री म्हणून तिची स्तुती करत होती.

नवा पक्ष स्थापन केल्याला जेमतेम तीन आठवडे झाले असतील-नसतील तोच उखाळ्यापाखाळ्यांना सुरुवात झाली. आता मात्र गोल्डा वैतागली. मापाइ पक्षाच्या सेक्रेटरी जनरल पदानं तिला फार काही समाधान दिलं नव्हतंच. आता तर ती साफ कंटाळली. ‘आपल्याला फार गृहीत धरलं जातंय, आपल्याविरुद्ध मोर्चे निघतात, वृत्तपत्रे विरोधात उभी राहतात, तेव्हा मात्र आपल्या मदतीला कोणी येत नाही. पुरे आता हे.’ म्हणून तिने आपली निवृत्ती जाहीर केली. आणि सेक्रेटरी जनरलपदी बसणार नाही म्हणाली. मग इश्कोल आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी तिची मनधरणी केली. शेवटी ती राजी झाली. आणि पेरेसही डेप्युटी सेक्रेटरी जनरल झाले. पिन्हास सपीर यांनाही महत्त्व आले. इश्कोलच्या मदतीला म्हणून श्रम व रोजगार मंत्री (पालमाख्  प्रमुख) यीगल अ‍ॅलन यांना उपपंतप्रधानपदी आणले गेले. गोल्डाची ही खेळी दायान, पेरेस आणि स्वत: इश्कोल यांना आवडली नाही; पण तिला कोणीच विरोध करू शकलं नाही.

आणि मग एकाएकी ८ जुलै १९६८ ला गोल्डानं आपण पक्षाच्या सेक्रेटरी जनरल पदाचा राजीनामा देत आहोत असं जाहीर केलं. लेबर पक्षाची स्थापना होऊन अवघे सहाच महिने झालेले होते. इश्कोल, सपीर, अ‍ॅरॉन, गॅलीली या सर्वानी तिची मनधरणी केली. तिच्या घरी तासन् तास बसून तिला हा राजीनामा मागे घे, म्हणून आग्रह केला. ‘‘जगात कोणीही अपरिहार्य नसतं. माझ्याशिवायही तुम्ही सर्व सांभाळाल..’’ म्हणत ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिनं आपल्या वाढत्या वयाचं कारण सांगितलं असलं तरी त्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. कारकीर्दीच्या शिखरावर असताना ती राजीनामा का देतेय?

तीन दशकांहून अधिक काळ इस्रायली राजकारणावर प्रभाव ठेवून असणारी, करोडो डॉलर्स निधी संकलन करून राष्ट्रउभारणीत प्रचंड योगदान देणारी, जागतिक पातळीवर इस्रायलचा आवाज उठवणारी, जिच्या घराचे दरवाजे राजकीय सल्लामसलतीसाठी सदैव उघडे असत- (आणि नंतर मध्यरात्री उशिरा सर्व कप धुऊन, फरशी पुसण्याचं जी काम करे.) ती.. ती गोल्डा निवृत्त होणार?

१ ऑगस्टला तिने कार्यालय सोडलं.

मेनाहेम-आया अमेरिकेला गेले होते. सारा तिच्या कुटुंबासह किबुट्सध्येच होती. गोल्डाने थोडे दिवस स्वित्र्झलडला विश्रांतीसाठी जाण्याचं ठरवलं.

नोव्हेंबर १९६९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या होत्या.

१९६८ सरता सरता इश्कोल यांची तब्येत ढासळली. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ते आजारी पडले तरी रुग्णालयात दाखल व्हायला मात्र तयार नव्हते. गोल्डा आपल्याला चटकन् बाजूला करेल आणि अ‍ॅलोनना पंतप्रधानपदी बसवेल, ही त्यांना धास्ती. पुढे कित्येक महिने इश्कोल यांच्या निवासस्थानी ऑक्सिजन सिलिंडर्स गुपचूपपणे पोहचवले जात होते.

आणि तिकडे इश्कोलनंतर दायान की अ‍ॅलन, हा सामना रंगत होता. लेबर पार्टीला अ‍ॅलन पंतप्रधान म्हणून हवे होते. पण त्यांना निवडावं तर दायान स्वत:चा वेगळा पक्ष स्थापतील, ही भीती. आणि दायानना पंतप्रधान करावं तर ते एकाधिकारशाही व हुकूमशाही चालवतील, लोकशाहीची तत्त्वं पायदळी तुडवतील- याची खात्री!

सपीरनी मात्र निश्चय केला होता.. इश्कोलनंतर गोल्डाच! अ‍ॅलोन विरुद्ध दायान या संघर्षांत इस्रायलचे नुकसान होईल. ते टाळायचं तर इश्कोलनंतर भावी निवडणुकीपर्यंत गोल्डालाच पंतप्रधानपदी ठेवायचं. सर्वाची समजूत होती, की स्वत: सपीरच पंतप्रधानपद घेतील. परंतु तशी त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. आपला स्वभाव अशा पदासाठी योग्य नाही, अशी त्यांची खात्री होती. खेरीज गोल्डाइतका परराष्ट्र धोरणांचा अनुभवही त्यांच्यापाशी नव्हता. त्यापेक्षा किंगमेकरच्या भूमिकेत राहून आपल्याला हवं तसं घडवून आणणारी माणसं नेमणं त्यांना जास्त श्रेयस्कर वाटलं. गोल्डा आपला शब्द टाळणार नाही याची त्यांना खात्रीही होती. शिवाय तिच्या नेतृत्वाखाली पक्षही अखंड राहिला असता. सपीरनी अ‍ॅलनना विश्वासात घेऊन सांगितले की, इश्कोलनंतर थोडय़ा काळापुरतीच (नव्या निवडणुका होऊन नवे सरकार स्थापले जाईपर्यंत) गोल्डा पंतप्रधानपदी राहील.. नंतर तुम्हीच.

इश्कोल यांचे २६ फेब्रुवारी १९६९ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची वार्ता मिळताच काही तासांतच सपीर त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे अ‍ॅलन आणि दायान आधीच तिथे पोहोचले होते आणि त्यांच्यात पंतप्रधानांचे दफन कुठे व्हावे यावर वाद सुरू होता. इश्कोलनी त्यांचे दफन त्यांच्या डेगानिया किबुत्झमध्ये व्हावे अशी इच्छा व्यक्त केलेली होती. पण त्या भागात जॉर्डन बॉम्बफेक करत होता. तिथे दफनक्रियेच्या वेळी मोठा जनसमूह जमला तर जॉर्डनचे आयतेच फावेल म्हणून दायान त्या किबुट्समध्ये नको म्हणत होते. त्यापेक्षा जेरुसलेममधील माऊंट हर्झलवर दफन करा असं त्यांचं म्हणणं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोल्डा इश्कोल यांच्या पत्नीकडे दुखवटय़ासाठी गेली. बैठकीच्या दालनातील प्रशस्त सोफ्याच्या मध्यभागी बसून सिगरेट ओढत दायान आणि अ‍ॅलन यांच्यातील न संपलेला वाद ती ऐकू लागली. पण तो लगेच थांबला आणि एकेक मंत्री उठून तिच्या डाव्या-उजव्या बाजूला बसत हलक्या आवाजात तिच्याशी चर्चा करू लागला. दोन्ही बाजूंची मतं ऐकून झाल्यावर गोल्डाने निकाल दिला. ‘जेरुसलेम!’ (इथे नेत्यांच्या दफनासाठी जागा आरक्षित होती.) कोणीही त्याविरुद्ध ब्र काढला नाही. सपीर मनोमन संतोषले. गोल्डाने परिस्थिती ताब्यात घेतली तर! सर्व सूत्रे गोल्डाकडे आली होती. आणि पंतप्रधानपदही तिच्याकडे चालत आले.

पंतप्रधान इश्कोलनंतर त्या जागी कोण येणार, याविषयी लोकांत अंदाज वर्तवले जात होते. लोकमताचे सर्वेक्षण केले गेले. त्यात दायानना ४५%, अ‍ॅलनना ३२%, अबा इबनना ३%, मेनाहेम बेगीनना ३% आणि १% पिन्हास सपीरना मतं मिळाली होती. गोल्डाचा साधा उल्लेखही कुठे नव्हता. नंतर पक्षातील लोकांच्या मतांचा सव्‍‌र्हे केला गेला तेव्हा गोल्डाला फक्त १% मतं मिळाली. दायानना विरोध करणारी धोंड म्हणून लोकांचा गोल्डावर रोष होता, एवढे स्थान दायान यांना लोकमानसात लाभले होते.

सपीरनी या सर्व सर्वेक्षणांना केराची टोपली दाखवली. पक्षातील नेत्यांच्या भराभर भेटी घेत सपीरनी गोल्डासाठी वातावरण तयार केले आणि दुखवटय़ाचे सात दिवस संपण्यापूर्वीच २ मार्चला पक्षाच्या मध्यवर्ती समितीकडे पंतप्रधानपदासाठी गोल्डाच्या नावाची शिफारस केली. आणि दुसऱ्या दिवशी समितीने गोल्डाचे नाव काळजीवाहू  पंतप्रधानपदासाठी जाहीर केले. आणि येत्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी तीच उमेदवार असेल असेही स्पष्ट केलं. तत्पूर्वी गोल्डाने तिच्या नावाची मध्यवर्ती समितीकडे शिफारस होत असताना अ‍ॅलन आणि दायान यांचीही नावं समितीकडे पाठवा म्हणून सुचवले. अ‍ॅलन आणि दायान दोघांनीही आपण या स्पर्धेत नाही म्हणत बाजूला सरणे स्वीकारले. गोल्डाचा मार्ग अधिकच प्रशस्त झाला.

गोल्डाने पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं असं म्हणता येणार नाही. १९५३ साली पंतप्रधान बेन गुरियॉननी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी शारेट आणि नंतर इश्कोल यांची वर्णी लागली तेव्हा लायकी असूनही आपण डावलले गेलो याचं दु:ख तिला झालं होतंच. आता ती संधी समोर आली तेव्हा तिला आपल्या वाढत्या वयाचं भान, आजार यांनी साशंक केलं. तिने आपल्या एका मित्राला विचारलं- ‘काम करता करता मला वार्धक्याने ग्रासलं तर? माझा कमकुवतपणा मला न कळता इतरांना कळला तर?’

‘काळजी करू नकोस. तशी वेळ आली तर मी तुला सांगेन..’

तिच्या कर्करोगावर उपचार करत असलेल्या डॉक्टरलाही तिने- आपण आणखी किती र्वष जगू शकू, असं विचारलं. तो म्हणाला, ‘दहा र्वष!’

आणखी दहा र्वष! म्हणजे आपण तेव्हा ८१ वर्षांच्या असू. खूप झालं की! भरपूर वेळ हाताशी आहे. गोल्डा तयार झाली. तिचं नाव उमेदवार म्हणून जाहीर होताच वार्ताहरांनी तिला याबद्दल काय भावना आहेत, असं विचारलं. त्यावेळी तिने अपेक्षित असंच उत्तर दिलं- ‘पक्षाने सोपवलेली जबाबदारी, पक्षाचा निर्णय मी स्वीकारत आलेय..’ तिच्या वाढत्या वयासंबंधी कोणीतरी छेडलं तेव्हा ती उद्गारली- ‘सत्तरीत असणं हे काही पाप नाही.’

७ नोव्हेंबर रोजी तेल अवीवमध्ये ओहल थिएटर मध्ये पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या ४०० सदस्यांनी मतदान केले. राफी पक्षाचे ४५ सदस्य अलिप्त राहिले. उर्वरित सर्व मते गोल्डाला मिळाली. एकानेही विरोधी मत नोंदवलं नाही.

गोल्डा सभागृहात तिसऱ्या रांगेत बसली होती. मतदानाचा निकाल जाहीर होताच गोल्डाने आपलं मस्तक दोन्ही हातांनी धरलं. तिच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. इस्रायलमध्ये तिला येऊन पन्नास र्वष झाली होती. ती आता तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर होती. देशाच्या सर्वोच्चपदी पोहंचली होती. ती व्यासपीठाकडे जाऊ लागली तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. ‘कोणतंही पद स्वीकारताना मला नेहमीच त्या पदाचा धाक, दरारा वाटत आलाय. खरंच मी लायक आहे का या पदासाठी, अशी शंकाही मला भेडसावते. पूर्वी कधीही घेतली नव्हती एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली जातेय..’ ती आपल्या आभाराच्या भाषणात म्हणाली.

ती सभागृहाच्या बाहेर पडली तेव्हा जनसमूदायाने ‘गोल्डा.. गोल्डा’ म्हणत गजर केला. हात हलवून त्यांना प्रतिसाद देत ती मंत्र्यांसाठी असलेल्या मोटारीत बसून सपीरसह निघाली.

ज्या कर्मठ लेबर पार्टीने तिला तेल अवीवची महापौर होण्यापासून रोखलं होतं, तिनेच आता प्राचीन ग्रंथातील डेबोराचा दाखला देत गोल्डाचं नेतृत्व स्वीकारलं. मात्र, कट्टर ऑर्थोडॉक्स पक्षांचा मात्र अजूनही स्त्री-नेतृत्व स्वीकारण्यास नकारच होता.

काही वृत्तपत्रांनी तिच्या वार्धक्यावर, प्रकृतिअस्वास्थ्यावर प्रश्न विचारले. देशावर संकट ओढवलं तर त्याला तोंड देण्याइतकी साथ तिचं स्वास्थ्य तिला देईल का, अशी शंका व्यक्त केली. अनेक वृत्तपत्रांतून व्यंगचित्र आलं. इस्रायली तरुण पुत्र (रुं१ं) आरशात आपलं प्रतिबिंब पाहतोय. ते प्रतिबिंब एका वृद्धेचं आहे. तरुण देशाचं- षट्दिवसीय युद्धात विजय मिळवलेल्या देशाचं- प्रतिनिधित्व हा वृद्ध चेहरा करणार? न्यूयॉर्क टाइम्सनं तर तिच्यावर मृत्युलेखही तयार केला होता. पण स्त्रियांनी मात्र तिच्या निवडीचे स्वागत केले. सिरिमाओ बंदरनायके (श्रीलंका), इंदिरा गांधी (भारत) यांच्यानंतर आता तिसरी स्त्री-पंतप्रधान गोल्डा मायर. सिरिमाओ पतीनिधनानंतर पंतप्रधानपदी आल्या होत्या. इंदिरा गांधींचा राजकीय वारसा त्यांच्या आजोबांपासून- मोतीलाल नेहरूंपासून चालत आलेला होता. गोल्डा मात्र एक-एक पायरी चढून, अपार मेहनत करून या स्थानावर पोहोचली होती.

अमेरिकेतल्या ‘टाइम’ मॅगझिनने गोल्डाचा उल्लेख ‘७० वर्षांची आजी’ असा केला तेव्हा एका वाचकाने पत्र लिहून विचारलं, ‘तुम्ही कधी प्रेसिडेन्ट जॉन्सनचा उल्लेख ‘आजोबा’ म्हणून करत नाही. गोल्डाचा विजय असो. स्त्रीवर्गाचे ती प्रेरणास्थान आहे.’

गोल्डा मेयरला- एक स्त्रीला पंतप्रधानपदी बसवून इस्रायलने आधुनिकता दाखवली याचा इस्रायली जनतेलाही अभिमान वाटला.

१७ मार्चला गोल्डाने आपल्या मंत्रिमंडळाची यादी नेसेटपुढे ठेवली. ती यादी ८७ विरुद्ध १२ मतांनी मान्य झाली. एक नेसेट सदस्य अलिप्त राहिले. बेन गुरियॉन.

साधा सफेद ब्लाऊज, काळा स्कर्ट, काळा स्वेटर घातलेल्या गोल्डाने आपल्या हातातली ती प्राचीन पर्स सावरत इस्रायलची चौथी पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली. आपण पदभार स्वीकारत आहोत, असं म्हणत असताना तिचा कंठ दाटून आला.

सारा, तिचे कुटुंब, जुना मित्रपरिवार प्रेक्षक कक्षातून हा शपथग्रहण समारंभ पाहत होते. उपस्थित राहू शकली नाही ती शेयना. गोल्डाचं प्रेरणास्थान. सतत तिला टोचणी लावून तिला भान ठेवायला लावणारी तिची टीकाकार.. शेयना. अल्झायमरमुळे तिला आरोग्यधामात ठेवले होते.

गोल्डाचे पंतप्रधानपदासाठी नामांकन होण्याआधी काहीच आठवडे डेविड रेमेझ यांचा मुलगा अहरान रेमेझ गोल्डा आजारी असल्यानं तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याला ती खूप थकलेली, चेहरा ओढलेला, त्वचा काळवंडलेली, केस विस्कटलेले अशी दिसली. धूम्रपान तर अखंड चालू होतं. आयुष्यातले शेवटचे दिवस मोजणाऱ्या व्यक्तीला आपण भेटत आहोत असे अहरानला वाटले. पंतप्रधान झाल्यावर ती लंडनला गेली असताना तिला विमानाच्या पायऱ्या झपझप उतरताना पाहून तो चकित झाला. (अहरान त्यावेळी इस्रायलचा राजदूत म्हणून लंडनमध्ये होता.) सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंतचे तिचे कार्यक्रम आखलेले पाहून त्याने तिला त्यातले काही कमी कर म्हणून सुचवले. ती डाफरली, ‘मी काही इथे मौज करायला आलेली नाही.’

पंतप्रधानपदाने जणू तिला संजीवनी दिली होती. उत्साहाने परिपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण, सर्वत्र योग्य नियंत्रण.. जणू हेच पद ती आयुष्यभर सांभाळत आली होती, इतक्या सहज तिचे कामकाज सुरू झाले. ा

(इंडस सोर्स बुक्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या वीणा गवाणकर यांच्या आगामी ‘गोल्डा मेयर’ या चरित्रात्मक पुस्तकातील भाग)

Story img Loader