अभिजीत ताम्हणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महात्मा गांधीजींचं १५० वं जयंती वर्ष साजरं करतोय आपण. गांधीजींची खूप चित्रं वर्षभरात काढली जातील. पण चित्रकारांच्या सुमारे पाच पिढय़ा गांधीजींच्या असण्याचा- आणि नसण्याचाही- आधार अभिव्यक्तीसाठी घेत राहिलेल्या आहेत. या चित्रकारांनी गांधींबद्दलचं आणि समाजाबद्दलचं आपलं ‘म्हणणं’ गांधीजींच्या आधारानं मांडलं आहे. दृश्यकलेतल्या अभिव्यक्तीच्या या प्रवासाचा धावता धांडोळा..

नंदलाल बोस तिसऱ्यांदा जेव्हा गांधीजींच्या आश्रमात गेले तेव्हा त्यांना काही मिनिटं एकटेच वाट पाहत थांबावं लागलं. तेवढय़ा कमी वेळातही खोलीच्या सारवलेल्या िभतींनी आणि एका िभतीवर असलेल्या िपपळपानाच्या आकारानं बोस यांचं लक्ष वेधून घेतलं. ते पान होतं लोखंडातून घडवलेलं. काळं लोखंडी िपपळपान! तितक्यात गांधीजी आले. म्हणाले, ‘‘कलाकृतीच आहे ना ही! निसर्ग तर आहेच त्यात; पण हे पान याच गावच्या लोहारानं आपलं सारं कौशल्य वापरून घडवलंय आणि प्रेमानं मला भेट दिलंय. मलाही फार आवडतं ते.’’

नंदलाल बोस शांतिनिकेतनचे चित्रकार. तिथल्या कलाभवनातले गुरू. ‘निसर्गाकडे पाहा. जीवनाकडे पाहा. आपल्या कौशल्यात आणि आपल्या शैलीत निसर्गानुकरण करा. कलेत जीवनाचा अंश असू द्या..’ हा कलाविचार भारतात रुजवणाऱ्यांपकी नंदलाल बोस महत्त्वाचे. त्यांना गांधीजींचं म्हणणं पटलंच. ही घटना सांगणाऱ्या १९४४ सालच्या लेखाच्या शेवटी बोस लिहितात- ‘‘कला याहून काय वेगळी असते? गांधीजींचे त्या लोखंडी िपपळपानाबद्दलचे उद्गार हे माझ्यासाठी कलेची व्याख्याच आहेत!’’

या साध्या-सोप्या व्याख्येचा आविष्कार नंदलाल बोस यांच्या गांधीचित्रांमध्ये दिसतो का? बोस यांनी १९४४ साली केलेलं गांधीजींचं एक चित्र आपल्यासमोर आहे. ‘दांडीयात्रा : गांधीजी आणि ७९ सत्याग्रही’ हे या चित्राचं शीर्षक. गांधींच्या मागे बऱ्याच चौकटी आहेत त्यात. यापैकी ७९ चौकटींत एकेक स्त्री वा पुरुष सत्याग्रही आहे. तेच या चित्राचं वैशिष्टय़. नंदलाल यांचं याहीपेक्षा गाजलेलं एक ‘मुद्राचित्र’ (िपट्रमेकिंग) या प्रकारातलं आणि वूडकट (लाकडी ठसा) या उपप्रकारातलं एक काळ्यावर पांढरं गांधीचित्र आहे. ते दांडीयात्रा यशस्वी झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी केलंय. १२ एप्रिल १९३० ही त्या चित्राखालची तारीख आजही ठसठशीत दिसते. त्या चित्रातले शिडशिडीत, पण ठाशीव आणि ठाम रेषांमधून साकारलेले गांधीजी ही सहज लक्षात राहण्याजोगी प्रतिमा आहे. तीच प्रतिमा या नव्या चित्रात मोजक्या रंगांनिशी साकार होते. या रंगीत चित्रातल्या गांधीजींमध्ये आंदोलकाचा ताठरपणा नाही. त्याऐवजी साऱ्यांना सामावून घेणाऱ्या नेत्याचा पोक्त, समंजस गोडवा आहे. काळ्या-पांढऱ्या वूडकटमधले गांधीजी वेगानं चालताहेत असं भासतं. तो वेग रंगचित्रात बिनमहत्त्वाचा ठरून त्या जागी आता मूर्तीसारखी प्रासादिकता गांधीजींच्या प्रतिमेत आहे. गांधीजींच्या आसपासचे इवलाले सत्याग्रही एकेक करून पाहिल्यास ते स्त्री-पुरुष तुलनेनं अधिक हट्टेकट्टे, वेगवान भासतील. या साऱ्यांना चालना देणारे गांधी कृश झालेले आहेत. इथे गांधी चालताना जमिनीकडे पाहताहेत. आरपार. नंदलाल बोस यांच्या लिखाणात पहिल्या गांधीभेटीचं वर्णन करताना चटईचा उल्लेख येतो. ती चटईच इथं या चित्राच्या रचनेचा प्रमुख भाग ठरलेली असावी! चटईची प्रतिमा म्हटलं तर आहे; म्हटलं तर नाहीदेखील. ही संदिग्धता (अ‍ॅम्बिग्विटी) किंवा हे कलात्म मौन नंदलाल बोस यांनी पाळलं आहे. कलेतून जीवनानुकरण करण्याच्या कामी आपापलं कौशल्य पणाला लावा, हा गांधीसंदेश बोस यांनी अनुसरला आहेच, हे निराळं सांगायला नको. पण चटईसदृश योजनेमुळे ही कलाकृती निव्वळ एक कलावस्तू ठरत नाही, तर तिच्यात नंदलाल बोस यांची अभिव्यक्ती आहे, हे नमूद करायलाच हवं. कारण आपली पुढली सारी चर्चा ही गांधीचित्रांतून विविध काळांत होणाऱ्या अभिव्यक्तीबद्दल आहे.

हुबेहूब गांधींसारखीच दिसणारी चित्रं पुढल्या काळात अनेक झाली. गांधीजींचा भारतातील राजकीय सक्रियतेचा काळ (१९२० ते १९४८) हा कृष्णधवल छायाचित्रकलेचाही सुवर्णकाळ असल्यामुळे अनेक देशीविदेशी छायाचित्रकारांनी या काळात गांधीजींचे फोटो काढले आहेत. त्यामुळे पुढल्या काळातल्या साऱ्याच दृश्यकलावंतांना गांधीजींचे भरपूर प्रतिमासंदर्भ उपलब्ध झाले. त्यामुळे आजही विविध पोजमधली तंतोतंत गांधी साकारणारी गांधीचित्रं येतातच. प्रश्न असतो तो अभिव्यक्तीचा. किंवा चित्रातून चित्रकाराला काय म्हणायचंय, काय सांगायचंय, हा. आणि हे म्हणणं किंवा सांगणं म्हणजे ‘संदेश देणं’ नव्हे! ते ‘मानलं तर चटई, मानलं नाही तर नाही चटई. चटईच्या प्रत्येक चौकोनात माणसं’ इतकं अस्फुटसुद्धा असू शकतं. अभिव्यक्ती जर आपल्याला समजून घेता येत नसेल तर चित्रकाराला किंवा जाणकाराला त्याबद्दल विचारावं, शोध घ्यावा किंवा किमान गप्प राहावं, हे ज्या समाजाला कळत नाही तिथं सत्ता आणि शक्ती यांचा नंगानाच सुरू राहतो. ‘नंदलाल बोस यांच्या चित्रातली अभिव्यक्ती म्हणजे चटईची दृश्ययोजना’ हे केवळ चित्र पाहून कळेलच असं नाही. चित्र पाहून सहसा पहिल्यांदा शैलीबद्दल समजतं. नंदलाल बोस यांच्या चित्राला तर एक विशिष्ट शैली आहेच. अवनींद्रनाथ टागोर, समरेन्द्रनाथ गुप्त आदींमुळे पौर्वात्य कलाशैली परत आणण्याची जी कलाचळवळ बंगालात पुढे गेली होती (‘बेंगाल रिव्हायव्हलिझम’ हे तिचं इंग्रजी नाव!), तिच्या चित्रपद्धतीशी इमान राखणाऱ्या रीतीनं या चित्रातले गांधी चितारले आहेत. म्हणूनच त्यांचं नाक सरळ आणि लांब, डोळे लघुचित्रांतल्यासारखे- अशी शैलीवैशिष्टय़ं दिसून येतात. पण शैली आणि अभिव्यक्ती यांच्यात फरक असतो किंवा असू शकतो, हे लक्षात ठेवलेलं बरं.

गांधीजींच्या हत्येनंतर क्रिशन खन्ना यांनी कॅनव्हासवर एक तैलचित्र केलं. त्यात गांधी दिसतच नाहीत; वृत्तपत्रं वाचणारे लोक दिसतात फक्त. या चित्राचं शीर्षक- ‘न्यूज ऑफ गांधीजीज् डेथ’ असं आहे. हे सारे लोक वर्तमानपत्रांमधून गांधीजींची मृत्युवार्ता वाचताहेत. रेडिओवरून ती दु:खद वार्ता त्यांना आधीच कळली असल्यामुळे असेल, पण बहुतेक जण आतल्या पानांतला मजकूर वाचत आहेत. चित्रात अधूनमधून रक्ताइतका लाल रंग येतो. पण वर्तमानपत्रं पांढरीच असली तरी हे अख्खं चित्र काळपट छटांमधलं आहे. गांधीजींच्या हत्येनंतरचा शोक आणि स्तब्धता चित्रबद्ध करणं, हीच क्रिशन खन्ना यांची या चित्रातली अभिव्यक्ती. हे चित्र जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधले अनेकांचे गुरू शंकर पळशीकर यांना आवडलं आणि ते १९५२ सालच्या प्रदर्शनात (बहुधा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात) पळशीकरांनी पाठवलं, अशी आठवण खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. खन्ना हे ‘जे. जे.’त शिकलेले नसूनही त्यांच्या या चित्रानं पळशीकरांशी अनुबंध जोडले, हे विशेष.

पुढल्या काळात, विशेषत: १९५० च्या दशकानंतर शैलींची सरमिसळ होत गेली, असं आधुनिक कलेचा भारतातला इतिहास सांगतो. तरीही पाश्चात्त्य यथातथ्यवादी (जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ब्रिटनच्या रॉयल अकॅडमीतून आलेली, म्हणून ‘अकॅडमिक’) शैली टिकून आहे, याचा धडधडीत पुरावा म्हणजे गांधीजींची अनेक चित्रकारांनी केलेली चित्रं. यापकी काही चित्रं सरकारनं गांधीहत्येनंतर करवून घेतलेली (कमिशन्ड) आहेत आणि विधानभवन, पोलीस मुख्यालय आदी वास्तूंत ही मूळ तलचित्रं आहेत. तिथं माधवराव सातवळेकरांचे गांधी निळी बाह्य़रेषा असणारे, एम. आर. आचरेकरांचे गांधी नाटय़मय उजळ रंगछटांच्या पाश्र्वभूमीवर खुलून दिसणारे, के. के. हेब्बर यांचे गांधी मान झुकवलेले आणि जर्द राखाडी पाश्र्वभूमीवर चिंतनशील भासणारे, असा थोडा थोडा फरक या चित्रांमध्ये आहे. म्हणजे मूळ अकॅडमिक शैलीला या चित्रकारांनी आपापल्या व्यक्तिवादी शैलीवैशिष्टय़ांची डूब दिली आहे.

शैली आणि अभिव्यक्ती यांच्यात गल्लत करू नये. पण खुद्द चित्रकारांची अभिव्यक्ती अनेकदा शैलीमध्येच गुरफटलेली दिसते. मकबूल फिदा हुसेन यांनी मदर तेरेसा यांची जी चित्रमालिका केली, तिच्याशी हुसेन यांचं गांधीचित्रही मिळतंजुळतं आहे. मात्र, इथं मिळतेजुळतेपणा केवळ शैलीचाच की अभिव्यक्तीचाही? मदर तेरेसा यांच्या प्रतिमांकनातून जे हुसेन यांना म्हणायचं होतं, तेच गांधींबद्दलही म्हणायचं होतं, अशा संशयाचा फायदा हुसेनना आपण देऊ शकतो! चित्रातल्या प्रतिमेचं व्यक्तित्व फक्त कपडय़ांतूनच दाखवणारी गांधींची आणि मदर तेरेसा यांची ही चित्रं केवळ या दोघांचे कपडे वैशिष्टय़पूर्ण होते म्हणून एकसारखी घडली नसावीत. दोघांबद्दल हुसेन यांना सारखाच आदर असावा असं मानायला जागा आहे. प्रतीकांच्या भाषेतून हुसेन या दोघांबद्दलही बोलत आहेत. गांधींबद्दलचा आदर आजही अनेक चित्रकारांना आहे. आदर आणि अभिव्यक्ती यांचं नातं मान्य करायला हरकत नाही, याचं हुसेन हे एक उदाहरण ठरतात.

आणि दुसरं उदाहरण- अकबर पदमसी. पदमसी हे स्वातंत्र्योत्तर भारतीय चित्रकलेच्या इतिहासातले ‘अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी प्रसंगी कैदेत जाण्यास मी तयार आहे,’ असं भर न्यायालयात म्हणणारे पहिले चित्रकार! ही कोर्टबाजी १९५२ च्या सुमारास झाली. पदमसी पुढे मानवाकृतींची चित्रं काढणं सोडून अमूर्त भूदृश्यांकडे वळले. त्यानंतर बऱ्याच खंडानं ते मानवाकृतींकडे परतले. १९९७ साली. पंडोल आर्ट गॅलरीत ‘गांधी’ हे त्यांचं प्रदर्शन त्या वर्षी भरलं. ही सारी चित्रं म्हटल्यास महात्मा गांधींची होती; कारण गांधींसारखा चष्मा बहुतेक चित्रांत होता. पण व्यक्तिचित्रणात जो हुबेहूबपणाचा गुण असतो, तो इथं फारच कमी होता. ‘मग कशाला पाहायची ही चित्रं?’ मूढपणे २१ वर्षांपूर्वी हा प्रश्न थेट पदमसींनाच विचारला होता, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आजही आठवतं : ‘आता फक्त गांधीजींचीच चित्रं करू, असं म्हणून मी ही चित्रं केलेली नाहीत. मी माणसासारखे चेहरे चितारत गेलो. त्यापैकी काही गांधींसारखे आहेत असं वाटल्यानं त्यांचं हे प्रदर्शन केलं. पण मी हल्ली जी मानवाकृती चित्रं केली, त्या सर्वातच गांधीजींच्या सूतकताईसारखा साधेपणा असावा, करत असलेल्या कामाशी निरागस निष्ठा असावी, असा विचार मी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतो आहे.’

पदमसी हे दिवंगत धातुकाम-कलावंत नागेश साबण्णवारांना गुरुस्थानी मानत. धातूच्या पत्र्यावर ‘रिपूझे’ (उठावकाम) करताना छोटय़ा अवजारांनी ‘टाकी’ केल्यासारखे ठोके मारावे लागतात. ते काम करताना ठोक्यांचा आवाज कसा येतो आहे यावरून साबण्णवार सर विद्यार्थ्यांची मन:स्थिती ओळखायचे, अशी आठवण पदमसींनी अनेकदा सांगितली आहे. साधारण १९९९ नंतर पदमसींच्या बऱ्याच चित्रांत पेस्टलनं आधी बिंदू उमटवून त्याच बिंदूतून निघणाऱ्या छोटय़ा रेषा दिसत. अशा बिंदू-रेषांच्या खेळातूनच चित्र तयार होई. ‘तुम्ही असं का करता अकबर?’ असं एकदा खेळीमेळीत अतुल दोडियांनी विचारलं तेव्हा अकबर पदमसी म्हणाले, ‘दगडावर किंवा पत्र्यावर ‘टाकी’चे घण घालतात, तशी कृती मी करत राहतो.’ गांधींना अभिप्रेत असलेल्या कार्यसंस्कृतीशी पदमसी यांचं नातं विद्यार्थिदशेपासूनच होतं. त्यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये ‘ही नुसतीच शैली, ती मात्र अभिव्यक्ती’ असा भेद करता येणं कठीण आहे. पण ‘शैली हीच अभिव्यक्ती’ या पातळीला पोहोचलेले पदमसी हे सन्माननीय अपवादच ठरतात.

मात्र, पदमसी हेदेखील गांधीजींविषयीच्या आदराचीच अभिव्यक्ती चित्रातल्या प्रतिमांमधून करणारे आहेत. या आदरयुक्त प्रतिमांकनाच्या पुढली पायरी अतुल दोडिया यांनी गाठली. किंवा असं म्हणू की, दोडियांच्या काळानंच त्यांना तशी सवलत दिली. दोडियांना गांधींबद्दल किती नितांत आदर आहे, हे त्यांनी गांधी हीच मुख्य प्रतिमा वापरून जी १०० हून अधिक चित्रं केलेली आहेत त्यांतून उमगेल. दोडिया हे गांधीजींना ‘अ‍ॅन आर्टस्टि ऑफ नॉन-व्हायोलन्स’- ‘अिहसेचा चित्रकार’  मानतात. दोडियांच्या कलाविषयक विचारांवर ज्या अनेकांचा प्रभाव आहे, त्यांत जोसेफ बॉइस हा मूळचा जर्मनीत राहणारा, पण पुढे अमेरिकावासी व्हावं लागलेला दृश्यकलावंत महत्त्वाचा. बॉइसनं परफॉर्मन्स आर्ट किंवा कृतिकला या प्रकारातही बरेच काम केलेलं आहे. पण १९७४ साली त्यानं न्यूयॉर्कच्या रेने ब्लॉक गॅलरीत जी कलात्म कृती केली, ती दोडियांना महत्त्वाची वाटली. बॉइस रेने ब्लॉक गॅलरीच्या काचेआड, बंद खोलीत एका रानटी लांडग्यासोबत तीन दिवस राहिला. फेल्टचं जाड बुरणूस पांघरून, हातात काठी ठेवूनही तिचा वापर लांडग्याला मारण्यासाठी न करता राहिला.. आणि तिसऱ्या दिवसाअखेर लांडगा बॉइसचा दोस्त बनला! हा अिहसेचा सोहळा पाहायला प्रत्यक्ष गांधीजी अवतरले आहेत, असं एक चित्र (शीर्षक: बापू अ‍ॅट रेने ब्लॉक गॅलरी) अतुल दोडियांनी काढलं. ते त्यांच्या कलाप्रवासातल्या महत्त्वाच्या चित्रांपकी एक आहे. गांधीजींच्या जीवनातले क्षण चितारणाऱ्या आपल्या प्रदर्शनात अन्य चित्रांसकट हे चित्र दोडियांनी मांडलंच; पण ‘मॉìनग वॉक अ‍ॅट जुहू बीच’ या अन्य एका चित्रानं दोडियांचं ‘म्हणणं’ अधिक धीटपणे, स्पष्टपणे मांडलं. दोडिया गांधीजींचा फक्त आदरच करत नसून गांधीजींचा अभाव, गांधीजींचं नसणं त्यांना जाणवत आहे आणि त्यामुळे होणारं दु:ख हल्लीच्या बनियेगिरीच्या काळात हास्यास्पद ठरेल याचीही जाणीव त्यांना आहे, असं काहीतरी या चित्रात होतं. निरागस लहान मुलगा (कनू गांधी) गांधीजींची काठी धरून त्यांना समुद्रकिनाऱ्यावरच्या पुळणीतून जणू ओढत नेत आहे, ही सुपरिचित प्रतिमा मोठय़ा आकारात रंगवून दोडियांनी उलटी टांगली आणि याच चित्राच्या सुलटय़ा बाजूनं दिसणारं एक बटबटीत ठिगळही रंगवलं. काय होतं त्या ठिगळावर? दोन माकडांना मेवा समान वाटून देण्याच्या मिषानं स्वत:च सगळा मेवा गट्टम करणारं लबाड मांजर. लहानपणीच्या गोष्टींसह जी चित्रं असतात, तसं. पण गांधीजींचं मोठेपण दोडियांप्रमाणेच आपल्यालाही कळतं: गांधीजींच्या चित्रातला निरागसपणा उलटा टांगून आजच्या सत्ताधाऱ्यांनी लबाडीचं राज्य आणलं आहे.

अतुल दोडियांच्या गांधी-चित्रांतली अभिव्यक्ती ही कधी कधी काही चित्रांमधून आजच्या सामाजिक-राजकीय स्थितीवरचं भाष्य ठरते. दोडियांची अन्य गांधी-चित्रं ही गांधीजींच्या काळाकडे डोळे उघडून पाहायला शिकवतात. उदाहरणार्थ, गांधीजींच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाच्या फोटोबरहुकूम कॅनव्हासवर केलेलं मोठ्ठं चित्र आणि त्याच्या जोडीला साधारण त्याच वर्षी पाश्चात्त्य किंवा जागतिक दृश्यकलेच्या इतिहासात महत्त्वाच्या ठरलेल्या कलाकृतीचं चित्र- यांचं सहदर्शन दोडिया घडवतात. याखेरीज एक निराळीच चित्रमालिका दोडियांनी केली होती. गुजराती कवी लाभशंकर ठाकर यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादांवर आधारलेली ही चित्रमालिका होती. गांधीजींचं नसणं अधोरेखित करणाऱ्या काही कविता ठाकर यांनी लिहिल्या होत्या. या कवितांचं सूत्र असं की, एक लहानगा खोडकर मुलगा एका भुताशी बोलतो आहे. ते भूत आहे ‘बापूं’चं (म्हणजे कुणाचं बरं?)! कवितांमधले हे संवाद काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूनं लिहिले असल्याचा भास दोडियांनी कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंगांतल्या चित्रांतून बेमालूम उभा केला होता. पण इथं महत्त्व शब्दांना होतं. चित्रातले सांगाडावजा आकार ‘बापूं’चे आहेत याची खात्री प्रेक्षकाला पटत होती खरी; पण तो योगायोग! गांधी नसलेल्या काळात पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांतूनही जाणवणारी हताशा, हे त्या चित्रमालिकेचं ‘म्हणणं’ होतं.

जितीश कलाटच्याही दृश्यकलाकृतींमध्ये शब्द अनेकदा असतात. नेहरू-गांधींचा काळ जसा भारतात उरला नाही, स्वामी विवेकानंदांचे विचार जसे विसरले गेले, तशीच वैचारिक घसरण जगभरात झालेली आहे, याचं भान आल्यानंतरच्या काळातला हा चित्रकार अद्याप पंचेचाळिशीचाही नाही. दांडीयात्रा सुरू करण्यापूर्वी साबरमती आश्रमातून गांधीजींनी जे भाषण केलं, ते अख्खं सुमारे एक हजार शब्दांचं भाषण जितीशनं ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स गॅलरीत मांडलं.. त्या भाषणातले सगळेच्या सगळे शब्द त्यानं हाडांसारख्या आकारांपासून बनवले होते. हाडांची रास हे संहाराचंच प्रतीक. अहिंसा ज्यांच्या हाडामासांत रुजली होती अशा व्यक्तीचे विचार जितीशनं हाडांमधून मांडले होते. प्रचंड आकारामुळे लक्षवेधी ठरणाऱ्या कलाकृतींचा जमाना (आर्ट ऑफ द स्पेक्टॅकल) १९६० च्या दशकापासून पाश्चात्त्य देशांत सुरू झाला होता. (नेमकं त्याच सुमारास तिथल्या आधुनिकतावादी, नवं काही घडवू पाहणाऱ्या कलाचळवळी थंडावू लागल्या होत्या.) त्या जमान्याची समीक्षा गाय डीबोर्ड यांनी लिहिली आणि ‘अनुभवाचं वस्तूकरण होतंय’ यावर भर दिला. जितीशच्या या ‘गांधी स्पीच’ शीर्षकाच्या अगडबंब कलाकृतीला या दोन्हीचा संदर्भ आहे असं दिसून येतं. पण त्याहीपेक्षा प्रकर्षांनं दिसतात ते ‘अहिंसा’, ‘शांती’, ‘सत्य’ (नॉन-व्हायोलन्स, पीस, ट्रथ) असे शब्द.. किंवा त्या शब्दांची हाडं. स्नायू नाहीत, रक्तवाहिन्या नाहीत. त्वचा तर नाहीच. नुसती हाडं उरलीत या शब्दांची.

जितीशपेक्षा वयानं तीन वर्षांनी मोठा रियाज कोमू. त्याच्या चित्रांमध्ये एरवी मजुरांचं, स्थलांतरितांचं, युद्धग्रस्त स्त्री-पुरुष वा लहानग्यांचं दु:ख दिसायचं. फुटबॉलपटूंच्या ताणलेल्या स्नायूंमधली जिद्द दिसायची. याच रियाजनं देशाची महत्त्वाची प्रतीकं ठरणाऱ्या दृश्यांशी आपलं काय नातं आहे, याचा शोध घेणारं एक प्रदर्शन २०१७-१८ साली केलं होतं. त्या प्रदर्शनातली एक ‘लेंटिक्युलर’ तंत्रानं (म्हणजे आपल्या हाताला चरचरीत स्पर्श जाणवणारी, पण डोळ्यांचा कोन बदलताच आकार बदलणारी ‘थ्रीडी’ असतात त्या तंत्रानं) केलेल्या तीन फ्रेम होत्या. त्यात आंबेडकर आणि गांधी असे दोघेही दिसत राहतील अशी दृश्ययोजना होती. गांधी पाहायचे की आंबेडकर पाहायचे, अशी निवड करण्याच्या गडबडीत असलेल्या प्रेक्षकाला दोघेही धड पाहता येऊच नयेत, अशीही खुबी त्या तीन फ्रेममध्ये होती. पण हे काही रियाज कोमूचं गांधींविषयीचं केलेलं चित्र नव्हे. त्यानं २०१५ साली एक चित्रमालिका शब्दांनाच महत्त्व देऊन केली होती. पाच भागांच्या या चित्रात कम्युनिस्टांचा लालजर्द रंग असतो तशी लाल पाश्र्वभूमी असलेल्या पाच एकसारख्या आकाराच्या मोठय़ा कॅनव्हासवर गांधीजींचा एकच मोठ्ठा फोटो पुन्हा पुन्हा दिसतो आहे. पाचही कॅनव्हासच्या वरच्या भागात दोन-दोन शब्द आहेत, ते मात्र निरनिराळे आहेत. हे दोन-दोन शब्द असे : सत्य/ पर्सेप्शन, अहिंसा/ व्हायोलन्स, अंत्योदय/ व्हिक्टिम, सवरेदय/ फीअर, स्वराज/ कंट्रोल. यापैकी इंग्रजीतले शब्द (ज्याचा-त्याचा दृष्टिकोन, हिंसा, बळी, भय, नियंत्रण अशा अर्थाचे) हे सारेच आजच्या काळाबद्दलचे आहेत. चित्रांमधल्या गांधींचं हसणं आता निव्र्याज वाटत नाही. ते भेसूर भासतं.

याहीनंतरच्या काळातला अद्याप वयाच्या विशीत असलेला शिल्पकार सहेज राहल. समाजमाध्यमांचा भरपूर वापर करणाऱ्या पिढीचा तो प्रतिनिधी. ‘इन्स्टाग्राम’ या प्रामुख्यानं दृश्यव्यवहारासाठीच असलेल्या समाजमाध्यमावर त्यानं २ ऑक्टोबर २०१८ रोजी, म्हणजे गांधी जयंतीदिनी एक ‘फोटो-कोलाज’ केलं होतं. त्याच दिवशी शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा दिल्लीच्या वेशीवरच अडवण्यात आला होता आणि मोर्चा अडवणाऱ्या पोलिसांना शेतकऱ्यांनीही काही प्रमाणात प्रतिकार कसा केला, याची छायाचित्रं इंटरनेटवर, विशेषत: वृत्त-संकेतस्थळांवर झळकली होती. त्यापैकी काही छायाचित्रं ‘व्हायरल’ झाली होती. यापैकीच एका छायाचित्राला संगणकावर कापून अध्र्या भागात सहेज राहलनं गांधीजींच्या कुठल्याशा पुतळ्याचा फोटो अशा रीतीनं डकवला, की गांधीजींची काठी जिथं संपते त्याच बिंदूपासून पोलीस आणि आंदोलक/शेतकरी यांच्या काठय़ा सुरू होताना दिसाव्यात. ‘द डे ऑफ द स्टिक’ हे या फोटो-कोलाजचं शीर्षक. सहेजच्या ज्या कलाकृती त्याच्या प्रदर्शनांत मांडल्या जातात, त्यापेक्षा हे अगदी निराळं आणि सहज म्हणून केलेलं काहीतरी होतं. पण त्यातून सहेजची- त्याच्या पिढीची- अवतीभवतीच्या घटनांकडे आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी समजते. सहेज राहलची ही फोटो-कोलाज करून इन्स्टाग्रामवर ‘शेअर’ करण्याची कृती म्हणजे ‘कलाकृती’ नसेलही; पण तिच्यात अभिव्यक्ती नक्की आहे.

गांधीजींना लोखंडी पिंपळपान भेट देणाऱ्या लोहाराच्या गावात सहेज राहत नाही. सहेज इंटरनेटवाला ‘नेटिझन’ आहे. त्या पिंपळपानाचं कौतुक करणारे नंदलाल बोस आणि गांधी हे दोघेही कधीच आपल्यातून निघून गेलेत. नंतरच्या पिढय़ा गांधीजींची आठवण या ना त्या प्रकारे काढत राहिल्या. गांधीजींबद्दल समाजमाध्यमांतून किती विखारी प्रचार (अपप्रचार) होतो, हे आजच्या पिढीला सांगायला नको. तरीही सहेजला शेतकरी मोर्चाचा फोटो पाहून गांधीजी आठवतात. या देशाबद्दल, आपल्या समाजाबद्दल आणि त्यात चाललेल्या राजकारणाबद्दल काही ‘म्हणायचं’ असेल, काही अभिव्यक्त करायचं असेल, तर गांधीजींचा आधार आजही घेता येतो. अभिव्यक्तीसाठी गांधीजी आजही आधाराची

एक काठी ठरलेले आहेत. या अभिव्यक्तीच्या बदलत्या रूपांचा, बदलत्या हेतूंचा अगदी त्रोटक आढावा इथं आपण घेतला. पण ‘आपल्या देशात गांधी होऊन गेले’ ही जाणीव अनेक कलांमधल्या अनेक परींच्या अभिव्यक्तीला आजही चालना देणारी आहे.