अलीकडच्या काळात मराठीत वेगळ्या शैलीचे चित्रपट मोठय़ा संख्येनं येत आहेत. त्यांच्या कर्त्यांची त्यामागे काहीएक भूमिका असते.. प्रेरणा असते. या प्रेरणा काय असतात, हे जाणून घेण्यासाठी ‘टिंग्या’कार मंगेश हाडवळे आणि ‘फॅण्ड्री’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आम्ही लिहितं केलं. त्यांनी कथन केलेला त्यांचा प्रेरणास्रोत..
एखादी कलाकृती चिरतरुण असते. आणि जसजसे तिचे वय वाढत जाते, तसतशी ती कलाकृती आणखीननच महान होत जाते. आणि तिची झिंग चढत जाते.. शेकडो वर्षे साठवून ठेवलेल्या एखाद्या चवदार मद्यासारखी! याचं कारण कालानुरूप आपणही बदलत असतो. नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध लागत असतात. परंतु त्यात हरवून जात माणसा-माणसांमधला संवाद आपण गमावून बसतो. भौतिक सुखं मिळविण्याच्या हव्यासापोटी नाही म्हटलं तरी बऱ्याच प्रमाणात आपण असंवेदनशील बनत जातो. मग कधीतरी आपण अशी एखादी कलाकृती बघतो, की ज्यातील मानवी मूल्यं, निरागस भावबंध आपल्याला आपण किती असंवेदनशील बनलो आहोत, याची प्रखरतेनं जाणीव करून देते. म्हणूनच आज शेकडो वर्षे उलटूनही तुकारामाची गाथा, ज्ञानोबामाऊलींची ज्ञानेश्वरी आणि मोझार्टचे अजरामर संगीत आपल्या मनात आजही घर करून आहे.
व्हिट्टोरिओ डी’सिकाचा १९४८ साली प्रदर्शित झालेला ‘द बायसिकल थीफ’ हा इटालियन चित्रपटदेखील असाच कालजयी ठरला आहे. त्याने जगातल्या जाणकार चित्रपटरसिकांच्या मनावर अक्षरश: गारूड केले आहे.
मी जेमतेम वीस वर्षांचा असेन तेव्हा. पुण्यात एका मित्राच्या घरी मी पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला. चित्रपट संपल्यावर मी खूप अस्वस्थ झालो होतो. डेक्कनवरून पुणे विद्यापीठातील वसतिगृहापर्यंत चालत येताना डोक्यात फक्त या सिनेमाबद्दलचाच विचार घोळत होता. तेव्हा मला कळत नव्हतं, की माझ्या मनात नेमकी कशाची आंदोलनं चालू आहेत? त्या रात्री उशिरापर्यंत मला झोप लागली नाही. सिनेमातील बापाची व्यक्तिरेखा मला माझ्या बापाची आठवण करून देत होती. मला पुण्यात शिकायला जाता यावं म्हणून माझ्या वडिलांनी घरच्या दोन दुभत्या म्हशींपैकी एक म्हैस विकली होती. माझ्या वडिलांची कुटुंब चालवण्यासाठीची केविलवाणी धडपड मला माहीत नव्हती असं नाही; पण ‘द बायसिकल थीफ’ या चित्रपटाने मला माझा बाप उलगडायला, त्याला जाणून घ्यायला मला खूपच मदत केली. आणि त्यानंतर दोन वर्षांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी मी ‘टिंग्या’ चित्रपट लिहिला आणि मला उमगलेला माझा बाप मी त्या कथेत चितारला.
आजपर्यंत मी जास्त नाही, तरी तीन चित्रपटांच्या कथा-पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यातील ‘टिंग्या’ आणि ‘देख इंडियन सर्कस’चे मी दिग्दर्शनही केले आहे. आणि मी लिहिलेल्या तिसऱ्या ‘टपाल’ चित्रपटाचे दिग्दर्शन माझा मित्र लक्ष्मण उतेकर याने केले आहे. या तिन्ही चित्रपटांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. त्यानिमित्तानं मी जगभरातल्या डझनाहून अधिक देशांतून जाऊन आलो. या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल, तर ते व्हिट्टोरिओ डी’सिका या ‘द बायसिकल थीफ’च्या महान दिग्दर्शकाला! त्याच्यामुळेच मी चित्रपट दिग्दर्शक बनलो. जगभरातील अनेक महान दिग्दर्शकांनी या चित्रपटापासून प्रेरणा घेतली आणि आपल्या सिनेमा दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला. भारतातील सत्यजित रे, बिमल रॉय, श्याम बेनेगल आणि अनुराग कश्यप हेही त्यात सामील आहेत.
‘द बायसिकल थीफ’ची कथा ज्या काळात घडते तो काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. जेव्हा संपूर्ण युरोपप्रमाणेच इटलीसुद्धा आपले युद्धकाळात झालेले घाव भरून काढण्याचा प्रयत्न करत होती. इटलीत तेव्हा बेरोजगारी आणि मानवी हालअपेष्टा टोकाच्या वाढल्या होत्या. या सिनेमाचा नायक अॅन्टोनिओ रिकी (लॅम्बटरे माग्गिओरानी) हा एक गरीब, बेरोजगार आहे. एके दिवशी त्याला शासकीय रोजगार मंडळाकडून भिंतीवर पोस्टर्स चिकटविण्याचे काम मिळते. परंतु हे काम मिळण्याकरता त्याच्याकडे सायकल असणे अत्यावश्यक होते. परंतु त्याची सायकल त्याने गहाण ठेवली होती. त्याची पत्नी मारिया (लायनेला कॅरेल) तिला हुंडय़ादाखल मिळालेल्या चादरी विकून सायकल सोडवते आणि दोघे नवरा-बायको चांगल्या भविष्याची आशा करत सायकलवर बसून घरी येतात. आपल्या कामाच्या पहिल्याच दिवशी अॅन्टोनिओ शिडीवर चढून पोस्टर चिकटवत असतानाच एक भुरटा चोर त्याची सायकल चोरून घेऊन जातो. त्यानंतरचा पूर्ण सिनेमा त्या चोराचा आणि सायकलचा शोध घेण्याच्या वांझोटय़ा प्रयत्नांवर केंद्रित झालेला आहे.
अॅन्टोनिओ आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा ब्रुनो (एन्जो स्टैओला) संपूर्ण रोम शहरात चोरीस गेलेली सायकल शोधत फिरतात. या शोधादरम्यान दिग्दर्शकाने पाश्र्वभूमीदाखल त्यावेळची इटलीतली सामाजिक परिस्थिती, आर्थिक विषमता, गरिबी, बेकारी, राजकीय अराजकता, सामाजिक मानसिकता यांचे जिवंत चित्रण केलेले आहे. सायकलचा शोध घेताना ते दोघं रोमच्या गल्लीबोळांतले रस्ते, चोरबाजार, वेश्यावस्ती, चर्च अशा अनेक ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणचे सामाजिक व्यवहार आणि तिथल्या लोकांचे परस्परांतले संबंध यांतील बारकावे आपल्याला उलगडत जातात.
एक गरीब, प्रामाणिक, मेहनती माणूस स्वत:ची सायकल शोधत असताना कसा स्वत:च सायकलचोर बनतो, त्याचा हा प्रवास बघण्यासारखा आहे.
या सिनेमाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याची सहजता आणि त्यातला कमालीचा सच्चेपणा. दिग्दर्शक सिनेमातल्या पात्रांचे दु:ख प्रेक्षकांच्या काळजात सहज उतरवतो. ही एका सर्वसामान्य माणसाची कथा आहे- जो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. त्याला आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित पालनपोषण करायचं आहे. परंतु त्यासाठी त्याला या निष्ठुर दुनियेशी नेहमी लढावे लागते. आणि ही गोष्ट जगातील प्रत्येक माणसाला लागू पडते.
म्हणूनच प्रेक्षक आजही या सिनेमात आपल्या दु:खद जीवनानुभवांचा पुन:प्रत्यय घेतात. जो मीही हा सिनेमा पाहून वयाच्या विसाव्या वर्षी घेतला होता आणि भयंकर अस्वस्थ झालो होतो.
माझ्या ‘टिंग्या’ चित्रपटातील बाप आणि टिंग्या आठवलात तर तुम्हालाही कळेल, की मला नेमकं काय म्हणायचं आहे. टिंग्याचा बापदेखील ‘बायसिकल थीफ’मधल्या अॅन्टोनिओसारखाच प्रामाणिक, मेहनती कुटुंबप्रमुख आहे. तिकडे त्याची सायकल चोरीला जाते, जिच्यावर त्यांची दोन वेळच्या जेवणाची भिस्त आहे. आणि माझ्या ‘टिंग्या’ या चित्रपटातही शेतकऱ्याचा तो बैल आजारी पडतो- ज्यावर त्याच्याही घराची रोजी-रोटी अवलंबून आहे. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की, त्या रात्री मला माझा बाप उलगडला. परिस्थितीच्या कोंडीतून शेतकऱ्यांना येणारं नैराश्य, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, वाढता जातीयवाद किंवा राजकारण्यांसाठी असलेली त्याची गरज, स्त्रियांचा सामाजिक दर्जा, शहरी जीवनातील संपलेला संवाद अशा विविध अंगांना ‘टिंग्या’ही स्पर्श करतो- जसा ‘बायसिकल थीफ’ इटलीतील तत्कालीन सामाजिक परिस्थिती दर्शवितो.
माझ्या तिन्ही सिनेमांची कथा सर्वसामान्य कुटुंबात घडणारी आहे. परंतु ज्या पटलावर ती घडते, त्याला खूप मोठी सामाजिक पाश्र्वभूमी आहे. त्यातला ‘देख इंडियन सर्कस’ अद्यापि प्रदर्शित न झाल्यामुळे तुम्हाला त्याची पाश्र्वभूमी माहीत नाही, परंतु त्याला लोकसभेच्या निवडणुकांची पाश्र्वभूमी आहे. खासदाराला मिळालेले निवडणुकीचे तिकीट आणि एका सामान्य कुटुंबाला हवे असणारे पंचवीस रुपयांचे सर्कसचे तिकीट यांच्यातली तुलना करण्याचा प्रयत्न मी त्यात केलेला आहे. बघायला गेलं तर दोन्ही तिकिटेच; पण त्यावर होणाऱ्या खर्चात जमीन-अस्मानाची तफावत आहे. ‘सर्कस’ हे एक प्रतीक आहे. ‘टपाल’मध्ये आणीबाणीची पाश्र्वभूमी आहे; जेव्हा माणसांच्या अभिव्यक्त होण्यालाच बंदी घातली गेली होती. तेव्हा एक छोटा मुलगा टपालात स्वत:च्या भावना अभिव्यक्त करतो आणि त्यातून पुढचे सगळे भावनाटय़ आकार घेते. असो.
मी हे सारं विस्तृतपणे यासाठी लिहिलं, की ‘बायसिकल थीफ’ या सिनेमाचा माझ्या कलाकृतींवर किती प्रभाव आहे, हे सर्वाना कळावं.
आपण जेव्हा एखादा सामाजिक आशय सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो एकतर बटबटीत किंवा उपदेशपर होण्याची दाट शक्यता असते. असा सिनेमा बघताना प्रेक्षकांच्या मनात असा विचार येतो की, हा कशाला हे सगळं आम्हाला सांगतोय? परंतु डी’सिकाने नेमकं याच्या अगदी उलट केलं आहे. त्याने जो सामाजिक आशय मांडायचा आहे तो मांडलाच आहे, परंतु तो बटबटीत किंवा उपदेशपर होऊ नये म्हणून मुख्य विषय हा चित्रपटाची पाश्र्वभूमी केली आहे. या सिनेमात इटलीतील तत्कालीन समाजाचं प्रतिनिधित्व करू शकेल असं एक कुटुंब प्रेक्षकांशी हितगुज करतं. जसं आपण भाताचं एखादं शीत बघतो आणि त्यावरून सगळा भात शिजला आहे की नाही, हे आपल्याला कळतं. त्यामुळे प्रेक्षक यातल्या व्यक्तींच्या भावनांशी स्वत:च्या भावना जुळवून बघतो, आणि त्याला स्वत:चं दु:ख किंवा आनंद त्या व्यक्तिरेखेत दिसू लागतो. त्यातून मग तो प्रेक्षक रडतो आणि हसतोही. ‘बायसिकल थीफ’चं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे ही सगळी कथा आपण त्या सात वर्षांच्या मुलाच्या- ब्रुनोच्या नजरेतून बघतो. त्यामुळे आपणही लहान मूल होतो. आपल्यात त्याची ती निरागसता काही वेळासाठी वास्तव्याला येते. त्याच्या नजरेतून दिग्दर्शक डी’सिका अत्यंत सफाईने त्याला जो सामाजिक आशय मांडायचा आहे तो मांडतो आणि आपणही लहान झाल्यामुळे तो लगेचच स्वीकारतो. आपल्या मनात मग हा प्रश्न डोकावत नाही, की हा आपल्याला काहीतरी उपदेश झाडतो आहे. जसं कडू औषध साखरेत मिसळून देतात, तसंच काहीसं.
एक कथाकथनकार म्हणून डी’सिकाच्या या तंत्राचा वापर मीही ‘टिंग्या’ आणि माझ्या इतरही चित्रपटांतून केला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखा गंभीर विषय ही सिनेमाची पाश्र्वभूमी ठेवली आणि संपूर्ण कथा टिंग्या या आठ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून घडताना तुम्हाला दाखविली. ‘देख इंडियन सर्कस’मध्येही एका लहान मुलाच्या नजरेतूनच जीवनाची सर्कस उलगडत जाते. असाच प्रयत्न तुम्हाला इतर अनेकांनीही त्यांच्या चित्रपटांतून केलेला आढळून येईल. त्यापैकी लक्षात राहणारा एक चित्रपट म्हणजे ‘लाइफ इज ब्युटिफुल’!
आपल्याला चित्रपट म्हटलं की लांबलचक कथानक लागतं. त्यात एका मोठय़ा कालखंडाचा प्रवास लागतो. त्यात खूप साऱ्या अतिरंजित नाटकी घटना लागतात. पण जर खरोखर तुम्हाला काहीतरी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर यापैकी काहीच लागत नाही असा माझा अनुभव आहे. हवा असतो फक्त एक छोटा विचार.. एखाद्या फुलत्या कळीसारखा. जी सकाळच्या कोवळ्या उन्हात उमलते, दिवसभर फुलाच्या रूपाने वाऱ्यावर डोलते आणि संध्याकाळी कोमेजून गळून पडते. ही विचारांची प्रक्रिया मला ‘बायसिकल थीफ’ने दिली. म्हणूनच माझ्या कथा-पटकथा अतिरंजित नसतात. त्या कथांचा कालावधी फार मोठा नसतो. पण
त्यातल्या व्यक्तिरेखा ज्या संकटांचा मुकाबला करतात, ती संकटं मोठी असतात. त्यांची जगण्याची लढाई त्यात असते. त्यांच्या वेदना या सामान्य माणसांच्या प्रतिनिधी म्हणून कथेत जागा घेतात.
‘बायसिकल थीफ’चं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्यात काम केलेले कलाकार! त्यांनी त्यापूर्वी कधीही कुठल्याही चित्रपटात काम केलेलं नव्हतं. मी पण माझ्या सिनेमांमध्ये जास्तीत जास्त खरी माणसं घेण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा असेच कलाकार घेतले- ज्यांना पूर्वीची काही ओळख नाहीए, अथवा असलेली ओळख लोक विसरले आहेत. त्यामुळे चित्रपट बघताना असं वाटत नाही, की कुणी कलाकार ती भूमिका साकारतो आहे. उलट असं वाटत राहतं, की ही माणसं खरोखरचीच आहेत. डी’सिकाने त्याच्या चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार सर्वसामान्य लोकांतूनच निवडले होते आणि त्यांच्याकडूनच त्यानं उत्तम अभिनय करून घेतला. ‘बायसिकल थीफ’चा हीरो लॅम्बटरे माग्गिओरानी या चित्रपटात काम करण्यापूर्वी एका फॅक्टरीमध्ये लेथ मशीनवर काम करत असे. या फिल्ममध्ये काम केल्यानंतर त्याला फॅक्टरी मालकाने पुन्हा कामावर घेतले नाही. मग नाइलाजाने त्याला अभिनय हेच कार्यक्षेत्र निवडावे लागले. त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी लायनेला कॅरेल- जी अत्यंत गरीब वस्तीत राहणारी एक सामान्य स्त्री होती. ‘बायसिकल थीफ’नंतर ती इटालियन सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री बनली. सात वर्षांच्या ब्रुनोची व्यक्तिरेखा साकारलेला मुलगा एन्जो स्टैओलाने तर कमालच केली. या चित्रपटात त्याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वावर मात केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि डोळ्यांतील भाव फिल्म संपल्यानंतरही आपल्या मनात घर करून राहतात. मीदेखील ‘टिंग्या’मध्ये मेंढय़ा चारणाऱ्या एका मुलाला घेतले आणि ‘देख इंडियन सर्कस’मध्ये राजस्थानमधील एका दुर्गम खेडय़ातील मुलाला घेतले. विशेष म्हणजे या दोघांनाही त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.
आज माझा मुलगा साडेतीन वर्षांचा आहे. त्याला लोक ‘टिंग्या’ म्हणूनच हाक मारतात. माझ्या पत्नीने त्याला या वयातच ‘द बायसिकल थीफ’ हा चित्रपट दाखवला. आणि त्याला तो प्रचंड आवडला. मी माझ्या बापाला मला घडवताना बघितले आणि त्यांच्यात मला ‘बायसिकल थीफ’मधील बाप दिसला; जो आपल्या मुलाला आत्मसन्मानाने जपण्यासाठी कशी धडपड करतो, त्याच्यावर वेळप्रसंगी चिडतोही. मुलावर संकट आलं की भीतीने तो वेडापिसा होतो. मुलाला जपणारा बाप, मुलाच्या गरजा पुऱ्या करताना हतबुद्ध होणारा बाप.. हे सगळं मी माझ्या बापात बघितलं. आणि एक बाप म्हणून माझ्या मुलाला हे सगळं देण्यासाठी मीपण आज धडपडतो आहे. मला माहीत नाही- या लेखाचा शेवट कसा करायचा, ते. पण मनापासून एकच सांगावंसं वाटतं, की ६६ वर्षांपूर्वी बनलेल्या ‘बायसिकल थीफ’ या कलाकृतीने मला घडवलं. एक माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणूनदेखील. आणि विशेष म्हणजे ती कलाकृती एवढी वैश्विक आणि चिरतरुण आहे, की जी माझ्या साडेतीन वर्षांच्या मुलालाही भुरळ घालते. आणि मला खात्री आहे- माझ्या नातवंडांनाही ती भुरळ घालेल!