श्रीनिवास विनायक कुलकर्णी.. लहानपणापासून ज्यांच्या ललित लेखनाचं गारुड आपल्यावर झालंय, त्या या लेखकाला भेटायचंय म्हटल्यावर काहीसं मोहरून जायला झालं होतं. परंतु दुसरीकडे त्यांच्या लेखनातून आपल्या मनात निर्माण झालेली त्यांची प्रतिमा आणि प्रत्यक्षातला लेखक हे सारखेच निघतील का, अशी एक पुसटशी शंकाही मनाला कुठंतरी कुरतडत होती. त्या प्रतिमेला तडा जाऊ नये असं खूप आतून वाटत होतं. त्यांच्याबद्दल थोडंफार ऐकलंही होतं. त्यांचं श्रीपुंसारखंच सौम्य, ऋजू व्यक्तिमत्त्व, विचक्षण संपादनदृष्टी, चौफेर वाचन आणि चित्रदर्शी लेखनशैली.. आता आपल्या या आवडत्या लेखकाला प्रत्यक्षात भेटायचं होतं.. त्यांच्याशी बोलायचं होतं. एक दडपणही होतं मनावर. परंतु त्यांच्या घरात शिरलो आणि जणू काही आपण आपल्याच घरी आल्यासारखं वाटलं. घरातली सगळी मंडळी इतकी मृदू, सुसंस्कृत, मनमोकळी, की त्यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये कसा रंग भरत गेला, कळलंच नाही. श्रीनिवास कुलकर्णीबरोबरच्या गप्पा तर कधी संपूच नयेत असं वाटत होतं. त्या गप्पांतला हा काही अंश..
तुम्ही ‘सत्यकथा’ आणि ‘मौजे’कडे कसे आणि कधी वळलात?
– मी हायस्कूलमध्ये असताना ‘सत्यकथा’ मासिक आणि ‘मौज’ साप्ताहिक मला नेहमी वाचायला मिळत असे. तेव्हा मी सांगलीला आरवाडे हायस्कूलला शिकत होतो. ५० ते ५४ या काळात. तिथं माझे मामा विश्वनाथ जोशी हे उत्तम पुस्तकं वाचणारे गृहस्थ मला सापडले. ते अनेक पुस्तकं, मासिकं वगैरे स्वत: विकत घेऊन वाचत. त्यामुळे इथली चार र्वष मला उत्तमोत्तम  पुस्तकं वाचायला मिळाली. लहानपणापासून मी कविताही करीत असे. त्यावेळी ‘सत्यकथा’ आणि ‘मौजे’त येणाऱ्या कविता मी वाचीत होतो. इतरत्रच्याही कविता वाचत होतो. परंतु सत्यकथा-मौजेतल्या कविता याच खऱ्या कविता आहेतसं तेव्हाही मला वाटे. इतरत्र येणाऱ्या कविता मला कविता म्हणून तितक्याशा भावत नव्हत्या. सत्यकथा-मौजेतल्यासारख्या कविता आपण लिहाव्यात, आणि त्या लिहिण्यातून आणि प्रत्यक्षातदेखील तिथपर्यंत पोचावं असं मला नेहमी वाटे.
ही शाळेतली गोष्ट झाली. पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर..?
– मी कॉलेजमध्ये गेलोच नाही. ५४ साली अकरावी झाल्यावर मी काही किरकोळ उद्योग करू लागलो. मी साइन बोर्ड पेंटिंग करत असे. गणपती संस्थान प्रेसमध्ये कम्पोझिंगही शिकत होतो. अशी बरीच कामं करीत होतो. तिथून नंतर मी ओगले ग्लास वर्क्‍सला आलो. ओगलेवाडी हे माझ्या आईचं माहेर. तिथं माझ्या मामांचा मुलगा गोपाळ हा ओगले ग्लास वर्क्‍समध्ये होता. त्यानं माझं अक्षर पाहिलं आणि मला म्हणाला, ‘तू ओगले ग्लास वर्क्‍सचे मॅनेजर प्रभाकर पाध्ये यांना पत्र पाठव. तुझं अक्षर बघितल्यावर ते लगेचच तुला बोलावतील.’ प्रभाकर पाध्ये तिथं बिझनेस मॅनेजर होते. पुढे ते किलरेस्करला गेले. मोठा रसिक, वाचणारा माणूस. इंग्रजी, मराठी पुस्तकं. त्यांच्याकडे सत्यकथा-मौजही येत. इथं मला त्यांच्याकडून सत्यकथा-मौज वाचायला मिळे. गंगाधर गाडगीळ ओगलेवाडीला आल्यावर पाध्यांकडेच उतरत. त्याकाळी ओगलेवाडीला सांस्कृतिक गोष्टी खूप होत्या. आमचे व्यंकटराव ओगले हे स्वत: चांगले चित्रकार होते. त्यांच्यामुळे सातवळेकरांपासून अनेक चित्रकार मंडळी तिथं येत. असं सगळं वातावरण होतं. ओगलेचे मॅनेजिंग डायरेक्टर शंकरराव ओगले हेही मोठे ग्रंथप्रेमी होते. ते सतत पुस्तकांतच असत. सकाळी ऑफिसला आल्यावर मला ते बोलावून घेत. ‘आज मी एवढं एवढं वाचलं.. तू नवं काय वाचलंस?’ असं विचारीत.
तिथं तुम्ही काय काम करत होतात?
– मी अकौंट्सला होतो. सीनियर क्लार्क. तसं मला सगळंच येत होतं. गणितही उत्तम होतं माझं. व्हर्नाक्युलर फायनलला मी दक्षिण सातारा जिल्ह्य़ात दुसरा आलो होतो. तर मी काय सांगत होतो.. हं. मी ओगले ग्लास वर्क्‍सला आलो. तिथं भय्यासाहेब म्हणजे प्रभाकर पाध्ये मॅनेजर होते. मी त्यांना भेटलो. ते तेव्हा मद्रासला निघाले होते. तिथं वारू नावाचे त्यांचे मित्र होते.. ते आमचे डिस्ट्रिब्युटरही होते.. त्यांच्याकडे ते निघाले होते. त्यांनी मला म्हटलं, ‘ठीक आहे. तू जॉइन हो. मी सांगितलंय म्हणून सांग जोशींना.’ आणि मी ओगलेला जॉइन झालो. आठएक दिवसांनी जोशींनी मला ज्यांच्या ताब्यात दिलं होतं त्या सदाशिव रामचंद्र हर्षे यांनी माझा रिपोर्ट करायचा होता. त्याप्रमाणे हर्षेनी माझा रिपोर्ट दिला.. ‘यांचं अक्षर छान आहे. चुकाही नाहीत फारशा त्यांच्या. पण स्लो आहेत. आपल्या कामाचे नाहीत.’ जोशींनी -ते एक्झिक्युटिव्ह होते- मला बोलावून सांगितलं की, असा असा तुमचा रिपोर्ट आहे. तेव्हा तुम्ही आठ दिवसांचा तुमच्या कामाचा जो काही हिशेब असेल तो उद्या घेऊन जा. माझ्या मामाचा मुलगा  तेव्हा म्हणाला की, भय्यासाहेब पाध्ये येताहेत. त्यांना तू भेटून जा. योगायोगानं त्याच दिवशी भय्यासाहेब आले होते. मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी मला विचारलं, ‘काय काम होतं माझ्याकडे?’ मी त्यांना काय झालं ते सांगितलं. तर ते म्हणाले, ‘तू कामाला लाग.’ त्यांनी जोशींना तसं कळवलं आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सहा महिन्यांची ऑर्डर काढली आणि मग पर्मनंटची!
तुम्ही खूप चांगले वाचक आहात, हे पाध्यांना कसं कळलं?
– नाही. त्यांना आधी नव्हतं कळलं. त्यांनी चांगल्या अक्षरावरच मला तिथं घेतलं होतं. त्यांना हे नंतर कळलं. मग माझा सांगलीतला सत्यकथा-मौजेचा रतीब त्यांच्यामुळं तिथंही सुरू राहिला. आमचे आणखी एक एक्झिक्युटिव्ह होते- एस. एच. जोशी नावाचे. त्यांना माहीत होतं.. मी चांगला वाचक आहे, ते. त्यांच्याकडून नंतर शंकरराव ओगल्यांना कळलं. मग शंकररावांची माझी पुस्तकावर चर्चा सुरू झाली. तू काय वाचलंस, मी काय वाचलं, वगैरे. परंतु क्वचितच असं असे, की मी जे वाचलंय ते त्यांनी वाचलेलं नसे. एकदा मी त्यांना म्हटलं, काल मी एक खूप चांगलं पुस्तक वाचलं. पॅटरसनचं ‘मॅनइटर्स ऑफ साओ.’ आफ्रिकेत ब्रिटिशांनी रेल्वेचे रूळ घालायचं काम सुरू केलं तेव्हाची ही गोष्ट. रेल्वेच्या वाघिणींत कामगार वगैरे बसलेले असत. खालून उडी मारून सिंह त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्यांना मारून खात. असा तो सगळा भीषण व अद्भुत अनुभव त्यात कथन केलेला होता. शंकरराव मला म्हणाले, माझ्या वाचनात हे पुस्तक आलेलं नाही. तुम्ही मला ते आणून द्याल का? मी ते विलिंग्डन कॉलेजमधून आणलं होतं. त्यांना मी ते आणून दिलं. त्यांनी एका रात्रीत ते दोन-अडीचशे पानांचं पुस्तक वाचून काढलं. म्हणाले, उत्तम पुस्तक आहे. तुम्ही सांगितलं नसतंत तर माझं ते वाचायचं राहून गेलं असतं. पुढे त्यांनी माझं ‘डोह’ हे पुस्तकही असंच एका रात्रीत वाचून काढलं आणि दुसऱ्या दिवशी मला बोलावून घेतलं. आणि आपल्या कुर्त्यांच्या खिशातले सगळे पैसे त्यांनी मला काढून दिले. मी त्यांना म्हटलं, ‘भाऊ, मी हे पुस्तक तुम्हाला भेट दिलेलं होतं.’ तर म्हणाले, ‘मीही तुम्हाला ही भेटच देतोय. मी काही तुम्हाला पुस्तकाची किंमत देत नाहीए.’ पुढे मग त्यांनी ओगले आणि ओगलेंचे सर्व डिस्ट्रिब्युटर्स यांना बोलावून माझा सत्कारही केला या पुस्तकाबद्दल.
किती काळ तुम्ही ओगलेमध्ये होता?
– ओगले ग्लासमध्ये मी बरीच र्वष होतो. १६ जुलै १९५६ ते ७८ पर्यंत.
मग मौजेशी तुमचा संबंध कसा आला?
– मौजेत माझा पहिला लेख १९६० साली प्रसिद्ध झाला.. ‘मनातल्या उन्हात.’ तोपर्यंत मी मौजेकडे माझ्या कविता पाठवीत असे. त्यावेळेला मला कुणा-कुणाकडून भागवतांचा त्यावरचा अभिप्राय कळत असे, की ‘कविता मिळाल्या. अक्षर चांगलं आहे!’ अर्थात पुढे त्यांनी माझ्या पुष्कळ कविता छापल्या. पाडगावकरांचा आमचा परिचय होता. प्रल्हाद वडेर हे माझे मित्र. त्याकाळी श्रीपुंच्याबद्दल मी सगळीकडनं ऐकत होतो. शांताराम शिंदे आमचे मित्र. ते इथं एजीएम कॉलेजला होते. ‘शांताराम रामचंद्र’ नावानं सत्यकथेत त्यांच्या कविता येत. त्यांची पुढं पुस्तकंही आली. मोठा माणूस होता तो. त्यावेळी आणखीही वाङ्मयप्रेमी मंडळी इथं होती. त्यात बी. के. पाटील नावाचे एक काव्यप्रेमी होते. हा दांडगाच्या दांडगा, मिशाबिशा असलेला असा माणूस! पुढं ते आष्टा कॉलेजला प्रिन्सिपॉल झाले. ते आम्हाला बोदलेयर वगैरे शिकवीत. आणि ‘कळ्ळलं का?’ म्हणून पाठीत गुद्दा मारून मला विचारीत. मी म्हणे, ‘अहो, हुकबिक भरेल ना ब्राह्मणाच्या पाठीत. तुम्ही असं मारू नका.’
श्रीपुंशी तुमची पहिली भेट कधी झाली?
– श्रीपुंबद्दल खूपजणांकडून ऐकत होतो. त्यातून त्यांची अशी एक प्रतिमा मनात तयार होत होती. पण श्रीपुंची माझी पहिली गाठ पडली ती माझ्या लेखनामुळेच. कविता पाठविण्याच्या निमित्तानं त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला होता.
तुमचा पहिला लेख छापून आला तेव्हा तुम्ही त्यांना आभाराचं पत्र वगैरे पाठवलं का?
– आभाराचं नाही, पण मला आनंद झाला म्हणून कळवलं. आभार कधी जवळजवळ मी मानलेच नाहीत. कृतज्ञता किंवा आनंद.. इतकंच.  ‘मनातल्या उन्हात’नंतर त्यांचं मला लहानसं पत्र आलं- ‘नवं काय लिहिताय?’ आणि दुसरा लेख जेव्हा प्रसिद्ध झाला ऑक्टोबर ६१ मध्ये- ‘आम्ही वानरांच्या फौजा’- त्यावेळी त्यांचं मला फार चांगलं पत्र आलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, इथं हे खूप लोकांना आवडतंय. उदाहरणार्थ इरावती कर्वे, माधव आचवल, दिल्लीच्या मीना मराठे, पाडगांवकर वगैरेंना तुमचा लेख खूप आवडलाय. इरावतीबाई तर त्यांना म्हणाल्या की, या लेखकाकडे लक्ष द्या. पुढच्या काळात इरावतीबाईंशी माझी गाठभेटही झाली.
यानंतर श्रीपुंशी माझा पत्रव्यवहार सुरू झाला. आणि असे दोन-तीन-चार लेख झाल्यानंतर एके दिवशी श्रीपु स्वत: गाडी घेऊन कराडला आले. त्यांची मोठ्ठी शेव्हरलेट गाडी होती. तिला जयवंत दळवी ‘मौजेचा रथ’ म्हणत. तर ते गाडी घेऊन आले. त्यांच्या सोबत विमलाबाई- त्यांच्या पत्नी, अशोक- त्यांचा मुलगा; जो आता अमेरिकेत सायन्टिस्ट आहे; आणि विमलाबाईंच्या आई असे चौघंजण होते. आमचं तेव्हा सोमवारात पडकं, घुशीनं पोखरलेलं घर होतं. आम्हाला अगदी लाजल्यासारखं झालं. एवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय आणि.. पण श्रीपुंनी सगळं निभावून नेलं.
माझे चार लेख प्रसिद्ध झाले होते त्यावेळेला. आम्ही सगळे जेवत होतो. विमलाबाई म्हणाल्या, ‘भागवतांना सांजेच्या पोळ्या आवडतात हे कुणी सांगितलं का तुम्हाला?’ तेव्हा माझी आई म्हणाली, ‘नाही. कुणीतरी चांगलं माणूस आलं तर काहीतरी चांगलं बनवायचं म्हणून बनवल्यायत.’ तेव्हा श्रीपु मला म्हणाले, ‘हे तुम्ही लिहिताय त्याचं पुस्तक काढायचं नं?’ मी काही बोललो नाही. तेव्हा ते  माझ्या आईला म्हणाले, ‘बघा म्हणाले- आम्ही त्यांना पुस्तक काढायचं का विचारतोय, तर लेखक त्यावर काहीच बोलत नाहीए.’ मी मग म्हटलं भागवतांना, की ‘तुम्ही काढलंत तर आणखीन काय पाहिजे लेखकाला? पण फक्त चारच लेख झालेयत. त्यात पुस्तक कसं होणार?’ तर म्हणाले, ‘होईल.’
आणि मग सतत ते मला पत्रं लिहीत राहिले. काय लिहिताय? कुठं लिहिताय? कसं लिहिताय? असं करत करत.. आणखीन माझ्या लेखांची गंमत अशी की, एक लेख मला सुचला, की त्यात एखादा संदर्भ जो असेल, त्यातून मला दुसरा लेख सुचायचा. उदाहरणार्थ, ‘घंटीवाला’ म्हणून एक लेख आहे. त्यात एक हुप्प्या आहे. तो लेकाचा नदीला जाऊन वाकून पाणी पित असे. तर मी त्यात म्हटलंय की, ‘सुसरीनं याला नेऊ नये.’, कारण सुसरी न्यायच्या कुत्रीबित्री.. औदुंबरला आमच्या. पण वानरं ही सहसा याप्रकारे पाणी पित नसत तिथं.. आणि मग असंही मनात आलं की, सुसरीवरही लिहिता येईल. मग सुसरीवर लिहिलं. सुसरीवरचा लेख वाचून व्यंकटेश माडगूळकरांनी मला सांगितलं की, ‘अण्णा (म्हणजे गदिमा) मला म्हणाले की, हा नदीकाठचा लेखक आहे. याच्यावर लक्ष ठेव.’
तुम्ही मुंबईला मौजेत पहिल्यांदा कधी गेलात?
– भागवतांनी ‘डोह’ काढायचं ठरवलं तेव्हा. १९६५ साली. त्यांनी मला मुंबईला बोलावलं. म्हणाले, चार दिवस इथं माझ्या घरीच राहायला या. चार दिवस लेख वाचून, त्यावर चर्चा करून असं ते पुस्तक झालं. अशी आमची मुंबईत पहिली भेट झाली ती अशी.
श्रीपुंनी तुम्हाला तुमच्या लेखांवर संस्कार करायला बोलावलं होतं..?
– नाही. संस्कार असे काही करायचे नव्हते. फक्त चर्चा. राम पटवर्धन मौजेतून निवृत्त झाल्यावर त्यांची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली होती. तीत त्यांनी सांगितलं होतं की, शरश्चंद्र चिरमुले आणि श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनावर आम्हाला कधीही संस्कार करावे लागले नाहीत. बाकीच्यांच्या बाबतीत आम्ही काही ना काही सुचवत असू. लेखकाला ते पटलं तर ते करायचे/ करायचे नाहीत- असं होई.
मौजेत तुम्ही संपादक म्हणून कसे गेलात?
– भागवतांना त्याकाळी मी बरीचशी पत्रे लिहीत असे. त्यांत सत्यकथा-मौजेत मी जे काही वाचत असे त्याबद्दलचे बरे-वाईट अभिप्राय कळवत असे. त्याचबरोबर मी जी मराठी-इंग्रजी पुस्तकं वाचीत असे, त्यातलं काय आवडलं, काय आवडलं नाही, हेही लिहीत असे. जेव्हा राम पटवर्धन मौजेतून निवृत्त झाले तेव्हा श्रीपुंनी मला फोन केला. ‘मुंबईला निघून या,’ म्हणाले. तत्पूर्वी ‘डोह’ पुस्तक काढण्याची ऑफर द्यायला जेव्हा ते कराडला आले होते, तेव्हाही त्यांनी मला ‘तुम्ही मौजेत येता का?’ असं विचारलं होतं. त्यावेळेला मी म्हटलं की, ‘मी मुंबईत कुठं राहणार?’ म्हणाले, ‘आमच्याकडे एक ब्लॉक आहे, तो तुम्हाला आम्ही देऊ.’ सरोजिनीबाई त्यावरती म्हणाल्या- ‘ह्य़ांना घरसुद्धा बांधून देतील भागवत मुंबईत!’ पण मी तेव्हा त्यांना म्हणालो, ‘मला ना भागवत, बरं वाटतं.. इथंच कराडात. शांत.’ त्यावर ते म्हणाले, ‘मलासुद्धा मुंबई आवडत नाही, परंतु आम्ही आता तिथं रुतलोत. त्यामुळे तिथंच राहणं प्राप्त आहे. पण तुम्ही निर्णय घेतलाय तर ठीक आहे.’ आणि त्यानंतर पुन्हा पटवर्धन जेव्हा मौजेतून गेले तेव्हा त्यांनी मला फोन केला, की ‘तुम्ही लगेचच निघून या.
’ मध्यंतरीच्या काळात आमचा पत्रव्यवहार सुरू होता. त्यांची जवळजवळ अडीचशेच्या वर अशी दीर्घ पत्रं माझ्यापाशी आहेत. गंमत म्हणजे मी त्यांना लिहिलेली सर्व पत्रं शेवटी शेवटी त्यांनी माझ्या स्वाधीन केली. . झेरॉक्स करून!
तर मी काय सांगत होतो- दुसऱ्यांदा जेव्हा मला त्यांनी बोलावलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘अहो भागवत, मी काही संपादक नव्हे. मी लिहिणारा आहे. मला इतकं सगळं जमणार नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘तुमच्या पत्रांतून तुमचं संपादकत्व लक्षात आलेलं आहे. तुमच्यामध्ये एक चांगला क्रिटिक आहे. तुम्ही कुठच्याही लेखकाचं योग्य ते मूल्यमापन करू शकता. आणि मुख्य म्हणजे तुमची माझी वेव्हलेंग्थ, विचार जुळणारे आहेत. तेव्हा तुम्ही इथं या. मला मदत करा.’ मी म्हटलं, ‘पण मी मुंबईत राहणार कुठं?’ म्हणाले, ‘भागवतांच्या घरी राहायचं.’ म्हटलं, ‘कायमचं इथं राहणं मला जमणार नाही. मी पंधरा दिवस राहीन, पंधरा दिवस कराडला जाईन.’ म्हणाले, ‘बरं.’ त्यांनी मला अशोकची- त्यांच्या मुलाची.. तो तेव्हा अमेरिकेला गेला होता.. स्वतंत्र एसी रूम मला राहायला दिली. म्हणाले, ‘इथं आपल्या प्रेसची गाडी आहे, तिनं ऑफिसला ये-जा करा. दुसरीकडे मुंबईच्या धावपळीत जायची काही एक गरज नाही.’ असा तो सगळा त्यांच्या निव्र्याज प्रेमाचा मामला होता.
तुम्ही किती साली मौजेत जॉइन झालात?
– ८५ साली. पुढे २०-२२ र्वष मी मौजेत होतो. २००७ साली मी ते सोडलं. मौजेत जॉइन होण्याआधी वीसेक र्वष तरी माझा भागवतांचा संपर्क होता. त्या काळात ते मला निरनिराळ्या लेखकांच्या स्क्रिप्टस् पाठवीत. त्या वाचून मी त्यांना त्यावरचा माझा अभिप्राय देत असे.  ते त्याचं मला मानधन देत. चांगलं मानधन देत. अधिक माझा पत्रव्यवहार! असं सगळं धरून त्यांनी मला हे काम जमेल असं गृहीत धरलं. अर्थात केलंही मी ते चांगलं.
मौजेत एखादं पुस्तक निवडण्याचे किंवा लेख स्वीकारण्याचे विशिष्ट असे निकष होते का? त्यासंबंधात श्रीपुंशी तुमचे कधी कुठल्या बाबतीत मतभेद वगैरे झाले का?
– नाही. निकष वगैरे असं काही नव्हतं. निकष मनात.. जाणिवेत असत. लिखित निकष नव्हते. मी मौजेत साहाय्यक संपादक म्हणून जॉइन झालो. नंतर कार्यकारी संपादक झालो आणि पुढं संपादक. काम तेच होतं.. जे मी पूर्वी कराडात राहून, स्क्रिप्टस् वाचून करीत असे! पुस्तक किंवा लेखांच्या निवडीच्या बाबतीत श्रीपुंनी मला कधी काही सांगितलं नाही. त्यांची याबाबतीतली निवड  मला नेहमी योग्यच वाटे. अर्थात हे केवळ त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी नव्हे, तर त्यांच्या साक्षेपी अभिरुचीमुळे वाटे. कदाचित त्यांचं चुकीचं असं काही माझ्यासमोर कधीच आलं नाही, म्हणूनही असं घडलं असावं. मी निवडलेल्या पुस्तकांतही श्रीपुंनी कधी हस्तक्षेप केला नाही. क्वचित त्यांना पसंत पडलं नाही, तरीही! त्याबाबतीत संपादकाचा अधिकार ते अंतिम मानत. माझ्यावर त्यांचा संपूर्ण विश्वास होता. त्यामुळे आमचे कधी मतभेद झाले नाहीत. याचा अर्थ श्रीपु मवाळ होते असं नाही. ते आपल्या मतांबद्दल ठाम असत.
चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कविता सुरुवातीच्या काळात सत्यकथेनं नाकारल्या होत्या. आणि नंतर त्यांनी ‘आरती प्रभू’ या नावानं कविता पाठवल्यावर त्या छापून आल्या, असं म्हटलं जातं. हे खरंय का?
 – साफ खोटं आहे हे. असं कधीच घडलेलं नाही. लेखकाच्या नावावरून त्याच्या लेखनाची गुणवत्ता सत्यकथा-मौजेनं कधीच ठरवली नाही. कोणत्याही लेखनाच्या बाबतीत गुणवत्ता हाच एकमात्र निकष असे. याचं एक उदाहरण सांगतो. ‘जी. ए.- एक अन्वयार्थ’ हे पुस्तक काढताना त्याच्या कव्हरमध्ये एक शब्द चुकला होता. कव्हरचं प्रिटिंग झालेलं होतं, पण श्रीपुंनी ते कव्हर रद्दीत फेकून दिलं आणि नवं कव्हर छापलं. यामुळे आपल्याला किती आर्थिक नुकसान होईल वगैरे कसलाही विचार त्यांनी केला नाही.
लेखक आणि प्रकाशक यांच्यातील संबंधाबाबत श्रीपुंचा काय दृष्टिकोन असे?
– लेखकाचा शब्द ते अंतिम मानत. एखादं पुस्तक त्यांना आवडलं नाही तर ते काढीत नसत. परंतु त्या पुस्तकात गुणवत्ता नाही, असं मात्र ते म्हणत नसत. माझी निवड ही व्यक्तिगत निवड आहे, त्यात चूक होऊ शकते, असं त्यांचं यावर म्हणणं असे. लेखकाला ते लिखाणात काही संस्कार सुचवीत. परंतु ते स्वीकारायचे की नाहीत, हे सर्वस्वी त्या लेखकावर सोडत. यात बराच कालापव्यय होत असे. पण त्याला इलाज नसे. याबाबतीत पु. शि. रेग्यांच्या ‘मातृका’च्या वेळची गोष्ट मला आठवते. शेवटच्या दिवसांत रेगे जसलोकमध्ये अ‍ॅडमिट होते. आपल्या हयातीत हे पुस्तक प्रसिद्ध व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे करणार होत्या. पण काही केल्या त्यांच्या मनाजोगतं चित्र त्यांना जमत नव्हतं. त्यामुळे पुस्तकाला उशीर होत होता. शेवटी श्रीपुंनी त्या पुस्तकाची छापील पानं रेग्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवली. ते पुस्तक नंतर निघालं खरं; पण ते बघायला रेगे नव्हते. पण श्रीपुंनी पद्माबाईंवर लवकर चित्र काढण्यासाठी दडपण आणलं नाही. त्यांचं म्हणणं- लेखक आणि चित्रकाराला त्याचं सृजनशील समाधान होईतो वेळ हा द्यायलाच हवा.
त्यांनी कुठलंही पुस्तकं प्रकाशित करताना धंद्याचा विचार कधी केला नाही. एकदा कवी शंकर रामाणींना १५ रु. पुस्तकाची रॉयल्टी पाठवण्यात आली. तेव्हा रामाणींनी श्रीपुंना पत्र पाठवलं की, ‘तुम्ही माझ्यासारख्यांची तोटय़ात जाणारी पुस्तकं का काढता?’ श्रीपुंनी त्यांना उलटटपाली उत्तर धाडलं की, ‘तुम्ही उत्तमोत्तम कविता लिहीत राहा. आम्ही त्या प्रसिद्ध करू. आमच्या आर्थिक नफा-नुकसानीत तुम्ही लक्ष घालू नये.’
अर्थात त्यांनी भिडेपोटी किंवा भावनिकतेवर कुठलंही पुस्तक काढलं नाही. वि. स. खांडेकरांबद्दल त्यांना व्यक्तिगत जिव्हाळा होता, परंतु त्यांनी त्यांचं कुठलंही पुस्तक काढलेलं नाही. त्यांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा श्रीपुंनी त्यांच्या लेखनावर टीका करणारा लेख छापला होता. तीच गोष्ट ना. सी. फडकेंची. त्यांचं लेखन मौजेनं कधी प्रसिद्ध केलं नाही. मौजेच्या अनुवाद विशेषांकात मात्र श्रीपुंनी फडक्यांकडे लेख मागितला. तेव्हा फडके म्हणाले, ‘शेवटी तुम्ही आमचं लेखन मागितलंत तर..!’ त्यावर श्रीपु एवढंच म्हणाले, ‘‘तुमचं’ लेखन नव्हे, ‘अनुवाद’ मागितलाय.’
मौजेत असताना श्रीपुंची तुमची कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा होत असे?
– खरं तर साहित्यापेक्षा आमची साहित्यबाह्य़ गोष्टींवरच जास्त चर्चा होत असे.
चांगली पुस्तकं हातून गेल्याचं श्रीपुंना कधी दु:ख होत असे..?
– दु:ख होणं साहजिक आहे. नेमाडेंची ‘कोसला’, जयवंत दळवींची ‘चक्र’ अशी काही पुस्तकं मौजेला मिळाली नाहीत याची श्रीपुंना नक्कीच खंत वाटत असे. ‘चक्र’मध्ये श्रीपुंनी काही संस्कार सुचवले होते, परंतु दळवींना ते मान्य नव्हते. त्यामुळे पुढं ते मॅजेस्टिककडे गेलं.
तुमच्या काही लेखांमध्ये अतिंद्रिय अनुभव आलेले आहेत. तरीही मौजेनं त्यांचं पुस्तक काढलं. श्रीपुंना ते मान्य होते का?
– नाही. त्यांना ते मान्य नव्हते. याबद्दल तेंडुलकरांनीही त्यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘यातल्या अनुभवांशी मी सहमत नाही. मी विज्ञानवादी आहे. परंतु असे काही अनुभव कुणाला येत असतील, आणि त्यानं ते कलात्मकरीत्या लेखनातून व्यक्त केले, तर ते प्रसिद्ध करण्यात मला काही गैर वाटत नाही.’ या अर्थानं ते अज्ञेयवादी होते. सासूबाईंच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या मुलाची- अशोकची मुंजही केली होती. जरी असल्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता, तरीही!
श्रीपुंना तुम्ही कधी चिडलेलं पाहिलंय..?
– नाही. कधीच नाही. शरश्चंद्र चिरमुले हे मौजेचे लेखक. एकदा श्रीपुंनी त्यांना कथेचं शीर्षक बदलायला सांगितलं. तर त्यांनी चिडून आपली मौजेकडची सगळी पुस्तकंच काढून घेतली आणि ती मॅजेस्टिकला दिली. तरी श्रीपु आणि त्यांच्या व्यक्तिगत स्नेहसंबंधांत बाधा आली नाही. स. शि. भावे यांनीही एकदा श्रीपुंशी किरकोळ कशावरून वाद घातला आणि मौजेतलं लेखन बंद केलं. परंतु त्यांच्याबद्दल श्रीपुंच्या मनात मी कधीच कटुता अनुभवली नाही. विमलाबाई (त्यांच्या पत्नी) कधीतरी त्यांना याबद्दल टोकायच्या. तेव्हा श्रीपु म्हणत, ‘प्रकाशक-लेखक संबंध वेगळे आणि व्यक्तिगत जिव्हाळा वेगळा. दोहोची गल्लत करता नये.’
मौजेत श्रीपु आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे जणू अभिन्न जीव होते. त्यांचं मैत्र, त्यांच्यातला नितळ, निरामय जिव्हाळा, त्यांची संपादकीय दृष्टी, कुलकर्णीचं रसरशीत लेखन यावर कितीही गप्पा मारल्या तरी त्या संपणाऱ्या नव्हत्या. पण कुठंतरी थांबणं भाग होतं. म्हणून थांबलो.

kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Story img Loader