एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ मिळाल्याने त्यांच्याभोवती संरक्षक कवच तयार झालं. बाळासाहेबांनी इशारा केला की कोणतंही काम पार पाडणाऱ्या कट्टर शिवसैनिकांमध्ये त्यांना स्थान मिळालं आणि सेनेबरोबरच नारायण राणे या नावाचीही सर्वत्र चर्चा सुरू झाली. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्याची भक्कम उभारणी करण्यासाठी सेनेला राणे यांचा पुरेपूर उपयोग झाला. त्याची बक्षिसी म्हणून बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. पुढे कोकणात राणेंनी साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या तंत्रांचा वापर करत आपली पकड घट्ट केली. परंतु त्यांच्या नावाची ही दहशत गेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणी माणसांनी झुगारून दिली. राणेंचा सत्तासूर्य मावळतीकडे निघाल्याचंच तर हे निदर्शक नव्हे?
मुक्काम- सांगली. दिनांक- ६ जुलै २०१३. प्रसंग- महानगरपालिका निवडणुकीची प्रचारसभा. प्रमुख वक्ते- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.
दादांची चौफेर टोलेबाजी सुरू होती. मिनिटा-मिनिटाला मोजून एकेकाला अंगावर घेत दादा त्यांच्यावर टीकेची झोड उठवत होते आणि सभेत टाळ्यांचा कडकडाट होत होता. शिट्टय़ा आणि हशाने आसमंत फुलून गेला होता.
‘दादा, तुमच्या पक्षावर गुंडगिरीचा आरोप व्हतोय..’ समोरच्या गर्दीतून कुणीतरी अजितदादांना डिवचलं आणि दादांचा चेहरा खुलला.
‘आता त्यांच्याबद्दल काय बोलणार हो?,’ असं म्हणत दादांनी गृहमंत्री आर. आर. आबांकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली.
‘गुन्हेगाराच्या बाजूला बसल्यावर मांडी कापून घ्यायची म्हटलं तर आमच्या आर. आर. आबांना दर बुधवारच्या कॅबिनेट मीटिंगनंतर मांडी कापून घ्यावी लागंल..’ दादांनी पहिलाच सणसणीत टोला लगावला आणि सभेत टाळ्यांचा पाऊस पडला. दादा आणखीनच खुलले. सभा आता रंगात आली होती.
त्याआधी काँग्रेसच्या प्रचाराच्या एका सभेत नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गुंडगिरीचा आरोप केला होता. आजच्या सभेमुळे उत्तर द्यायची नामी संधी दादांना चालून आली होती. ती ते सोडणार नव्हते.
दादा पुढे बोलू लागले आणि श्रोत्यांचे कान दादांच्या भाषणाकडे लागले. सर्वाचे डोळे दादांच्या चेहऱ्यावर खिळले होते.
पण दादांनी एक खबरदारी घेतली होती. आपल्या भाषणात कुठेही राणे यांचं नाव त्यांनी उच्चारलं नाही. पण त्यांचा प्रत्येक शब्द मात्र त्यांच्यासाठीच आहे, हे श्रोत्यांना कळेल अशा खुबीनं ते बोलू लागले.
‘चेंबूरच्या टोळीचा इतिहास अजूनही गृहखात्याकडे आहे. या टोळीचे सगळे उद्योग सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यामुळे त्यांनी गुन्हेगारीवर बोलावं, यासारखा दुसरा विनोद नाही..’ गर्दीवर सभोवार नजर फिरवत दादा क्षणभर थांबले.
आपण कुणाबद्दल बोलतोय हे श्रोत्यांनी ओळखलंय, याचा अंदाज घेऊन दादांनी आपलं पुढचं भाषण सुरू केलं.
‘नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपला इतिहास तपासावा. आबांना मांडी कापून घ्यायचा सल्ला देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, की तशी पाळी आली तर दर बुधवारीच मंत्रिमंडळ बैठकीनंतर आबांना आपली मांडी कापून घ्यावी लागेल. ज्यांना आम्ही टायरीत घालून मारलं, त्यांना सलाम ठोकायची वेळ आमच्यावर आली, अशी खंत अजूनही काही पोलीस अधिकारी खाजगीत आमच्याकडे व्यक्त करतात..’ दादांचं हे वाक्य संपलं आणि पुन्हा टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. मागच्या गर्दीतून शिट्टय़ांचे आवाजही घुमू लागले.
..सांगलीच्या प्रचारसभेतील अजितदादांचं ते भाषण माध्यमांमधूनही गाजलं. अवघ्या महाराष्ट्रात पुढे काही दिवस त्याची जोरदार चर्चा होत राहिली. आणि डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेस नेत्यांना नंतर चांगलीच धावपळ करावी लागली.
..कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या एका गावात मूळ असलेले नारायण राणे मुंबईत आले आणि शिवसेनेच्या स्थापनाकाळापासून वयाच्या १६ व्या वर्षी- १९६८ पासून कट्टर शिवसैनिक म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती सावलीसारखे वावरले. निडर, धाडसी स्वभाव, मागचा-पुढचा विचार न करता झोकून देण्याची सवय आणि प्रचंड निष्ठा हे त्यांचं वैशिष्टय़ बाळासाहेबांनी ओळखलं आणि राणे यांच्यावर संघटनेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. दोन वर्षांत ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले.
एकेकाळी राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा अजूनही ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ मिळाल्याने राणे यांच्याभोवती संरक्षक कवच तयार झालं. बाळासाहेबांनी इशारा केला की कोणतंही काम पार पाडण्यासाठी सज्ज असलेल्या मोजक्या कट्टर शिवसैनिकांमध्ये त्यांना स्थान मिळालं, आणि शिवसेनेबरोबरच नारायण राणे या नावाचीही सर्वत्र चर्चा सुरू झाली. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्याची भक्कम उभारणी करण्यासाठी बाळासाहेबांना ‘राणे’ या नावाचाही पुरेपूर उपयोग झाला होता. कधी सहजपणे, कधी अत्यंत आक्रमकपणे, तर कधी खास ‘सेना स्टाईल’ने गावागावात पोहोचण्यासाठी जे ‘तंत्र’ सेनेला त्या काळात अभिप्रेत होतं, त्याचा नेमका वापर करीत राणे यांनी कोकणात ‘भगवा’ रुजविला आणि नारायण राणे मुंबईबरोबरच कोकणाचेही राजकीय नेते बनले. त्यांची ‘दादा’ ही उपाधी कोकणातही सर्वाच्या मुखी रुळली. दादा मुंबईहून येणार आहेत, अशी वर्दी मिळाली, की कोकणातलं गाव न् गाव त्यांच्याविषयी उत्सुकतेनं चर्चा करू लागलं. काँग्रेसचा पगडा असलेल्या कोकणातील राजकारणावर पकड बसविण्यासाठी या दादांनी आपलं ‘नारायणास्त्र’ जणू बाळासाहेबांच्या स्वाधीन केलं.
कोकणातील गावागावांतील लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, या सुरुवातीच्या पक्ष रुजविण्याच्या काळातील क्लृप्त्यांचा पुढे कोकणात बस्तान बसविण्यासाठी राणे यांना चांगलाच उपयोग झाला, आणि ‘तातू राण्याचो झील मुंबईचो मोठो नेता आसा..’ असं म्हणत कोकणी माणसं त्यांचा आदरही करू लागली.
तोवर इकडे मुंबईत राणे यांचं शिवसेनेत चांगलं वजन प्रस्थापित झालं होतं. १९८५ साली पहिल्यांदा नगरसेवकपद मिळाल्यानंतर राणे यांनी फिरून कधी मागे वळून पाहिलंच नाही. बाळासाहेबांच्या शब्दाशी इमान असलेली एक टोळीच्या टोळीच त्या काळात शिवसेनेत उभी राहिली होती. राणे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले आणि राजकारणात सक्रिय झाले. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नारायण राणे हे शिवसेनेच्या राजकारणातील उगवता तारा बनले. मुंबईतील कोकणी, चाकरमानी मतदारांची शिवसेनेसाठी बांधणी करण्याची जबाबदारी राणे यांच्यावर सोपविण्यात आली. सेनेचा ‘आर्थिक पाया’ भक्कम करण्यासाठीही राणेंची प्रचंड मदत झाल्याचं सांगितलं जातं. बेस्ट समितीचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर महापालिका ही ‘दुभती गाय’ ठरू शकते, याचा पहिला धडाही त्यांनीच शिवसेनेला दिल्याचंही बोललं जातं. त्यामुळे राणे यांचं पक्षातील महत्त्व वाढलं. १९९० मध्ये त्यांना आमदारकी मिळाली आणि १९९५ साली राज्यात सेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर ‘दुभती गाय’ अशी ख्याती असलेल्या महसूल खात्याच्या चाव्याही राणे यांच्याच हाती सोपविण्यात आल्या.
..ते १९९०-९१ चं र्वष असावं. कोकणातील कणकवली या गावाच्या राजकारणात त्यावेळी नाईक कुटुंबाचा दबदबा होता. शिवसेनेने कोकणात शिरकाव करून काँग्रेसच्या गडाला धक्के देण्यास सुरुवात केली असली तरी कणकवलीत नाईक कुटुंबामुळे काँग्रेस मजबूत होती. कोकणात तोवर ‘राडेबाजी’ला फारसा वाव नव्हता. उजाडणारा प्रत्येक दिवस शांतपणे मावळायचा. पण एके दिवशी कणकवलीचे काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीधर नाईक यांची त्यांच्या गावाजवळच भीषण हत्या झाली आणि शांत कोकणातील वातावरण गढूळ झालं. या खुनाची सुपारी दिल्याच्या आरोपावरून या प्रकरणात थेट राणे यांनाच आरोपी ठरविण्यात आलं. नारायण राणे यांच्यासह १३ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि मंत्री असताना कोर्टात हजेरी लावण्याची पाळी राणेंवर आली. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी स्वत: कोर्टात हजर राहणाऱ्या राणे यांच्या दबावामुळेच साक्षीदारांवर दडपण आलं, असा आरोप त्यांचे विरोधक अजूनही करतात. या खटल्यात एकामागून एक साक्षीदार उलटले आणि राणे यांची आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.
पण तेव्हापासून कोकणातील राजकारण रक्तरंजित झाल्याची खंत प्रत्येक कोकणवासीयाला छळू लागली. निवडणुकीच्या काळात मुंबईहून गाडय़ा भरून दाखल होणारे रांगडे तरुण गावागावांतील रस्त्यांवर फिरू लागले की घरांची दारं बंद होऊ लागली. कोणत्याही क्षणी काहीही होईल आणि दिवसाउजेडीही कुणाला आपला जीव गमवावा लागेल, या भीतीचं सावट कोकणावर दाटू लागलं. अशातच नोव्हेंबर २००२ मध्ये कणकवलीजवळ शिवडाव गावाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांचा खून झाला. शिवसेना-राष्ट्रवादीतील राजकीय वादाची किनार या हत्येला होती, अशी कुजबूज गावात सुरू झाली. नारायण राणे तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. भिसे हत्याकांडानंतर कोकणात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने नारायण राणेंच्या कणकवलीतील बंगल्यावर चाल केली. बंगल्यातील सामानाची मोडतोड करून बंगल्याला आग लावण्यात आली. कणकवली शहरातही जाळपोळ झाली. राणे यांच्या राजकारणामुळेच कोकणातील वातावरण गढूळ झाल्याचा आरोप भिसे आणि नाईक कुटुंबांनी केला. भिसे हत्या प्रकरणात राणे यांचे त्यावेळचे विश्वासू सहकारी राजन तेली यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. पण त्यांच्यासह १९ जणांची या आरोपातून मुक्तता झाली.
परंतु पुढे शिवसेनेच्या कामकाजात उद्धव ठाकरे सक्रिय होऊ लागल्यानंतर राणे यांची राजकीय घुसमट सुरू झाली. उद्धव यांच्या नीतीनुसार काम करणे राणे यांना शक्य होणार नाही, हे स्पष्ट दिसू लागलं आणि राणे शिवसेना सोडणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यांना काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये म्हणून श्रीधर नाईक आणि सत्यविजय भिसे यांच्या कुटुंबीयांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु कोकणातील शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी सेनेनेच तयार केलेला दारूगोळा वापरण्याची नीती काँग्रेसला जवळची वाटली. सेनेच्या सावलीत नगरसेवकपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतची सारी पदे उपभोगलेले नारायण राणे यांची जुलै २००५ मध्ये सेनेतून हकालपट्टी झाली आणि ते काँग्रेसवासी झाले.
पुढे २००५ मध्ये आणखीन एक प्रकरण गाजलं. मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या धामधुमीतच शिवसेनेचा रमेश गोवेकर हा कार्यकर्ता बेपत्ता झाला. त्यावेळीही राणे यांच्यावरच संशयाची सुई रोखली गेली. गोवेकरांची हत्या झाली असावी असं बोललं जातं. निवडणुकीच्या काळात कोकणावर पसरणारं दहशतीचं हे सावट २००९ च्या निवडणुकीत अधिकच गडद झालं होतं. लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातून राणे यांचे पुत्र नीलेश राणे विजयी झाले, पण कणकवली मतदारसंघात मात्र त्यांचा उजवा हात मानले जाणाऱ्या त्यांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीच्या राजकारणातच राणे यांच्या चुलतभावाचा- अंकुश राणे यांचा खून झाला. रमेश वाळुंज नावाच्या आणखीन एका कार्यकर्त्यांचाही गूढ मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली असावी, असं बोललं जात होतं. पण त्याच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणावर गूढ मौन पाळलं. मालवण विधानसभा मतदारसंघातून १९९० मध्ये नारायण राणे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून या जिल्ह्य़ात तीन खून प्रकरणं गाजली आणि प्रत्येक प्रकरणात राणे यांच्या नावाचीच चर्चा होत राहिली.
वयाच्या १६ व्या वर्षी- १९६८ मध्ये राणे शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना राजकारणाचा मार्ग सापडला. शिवसेना ते काँग्रेस या प्रवासात त्यांची राजकीय कारकीर्दही वादग्रस्तच राहिली. काँग्रेसवासी झाल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न सतत उसळी घेत राहिलं. मात्र, वास्तवापासून दूर जाणाऱ्या त्या स्वप्नामुळे धुमसणाऱ्या अस्वस्थतेतून २००८ मध्ये सोनिया गांधींची सभा उधळण्यापर्यंत त्यांच्या अनुयायांची मजल गेली. त्यांना त्यामुळे पक्षातून निलंबितही करण्यात आलं. पण काही महिन्यांनी निलंबन मागे घेऊन पक्षाने त्यांना पुन्हा सामावूनही घेतलं.
नारायण राणे या नावाभोवती गुन्हेगारी व दहशतीच्या या इतिहासाचं वलय आहे. राजकारणात वावरताना आजही त्यांना अनेकदा अशा प्रकारच्या आरोपांना तोंड द्यावं लागतं. अजित पवार यांनी सांगलीच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणातील सारे उल्लेख राणे यांची ही पाश्र्वभूमी स्पष्टपणे अधोरेखित करणारे आहेत. राणे यांच्या काँग्रेसप्रवेशाचं वारं वाहू लागलेलं असताना शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी विधानसभेच्या भरसभागृहात सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक यांच्या खुनाचे संदर्भ उपस्थित करून राणे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले होते. ‘आता काँग्रेसमध्ये गेल्यावर कोकणातील श्रीधर नाईकांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तुमचे हात धजावतील का? सत्यविजय भिसेच्या फोटोला तुम्ही कोणत्या हातांनी हार घालणार?,’ असे सवाल करत राणे यांच्याभोवती फेर धरणारी गुन्हेगारी संशयाची ही जुनी प्रश्नचिन्हे त्यांनी पुन्हा एकदा उकरून काढली होती. अजितदादांनी सांगलीत केलेल्या आरोपांमुळे मुंबईकरांच्या स्मृतीही चाळवल्या आणि राणे यांचा माहीत असलेला किंवा ऐकिवात असलेला पूर्वेतिहास अनेकांच्या मनात ताजा झाला. ईशान्य मुंबईच्या चेंबूर उपनगरात हन्या-नाऱ्या गँग नावाची एक टोळी अस्तित्वात होती आणि राजकारणात प्रवेश करण्याआधी राणे त्या टोळीचे म्होरके होते, असे अजूनही बोललं जातं. ‘चेंबूरच्या टोळीचा इतिहास अजूनही पोलीस खात्याकडे आहे,’ या अजित पवार यांच्या आरोपांचेही तेच संदर्भ असावेत.
नारायण राणे यांच्या राजकारणामुळे कोकणात, विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विकासाऐवजी दहशतीचे सावट वाढत गेले आणि शांतताप्रिय कोकणात अस्वस्थता पसरली. मात्र, आपण शांतताप्रिय असलो तरी दुबळे नाही, ही जाणीव गेल्या काही वर्षांत कोकणात मूळ धरू लागली होती. दहशतीचे राजकारण हा विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या कोकणाच्या वाटेतील अडथळा आहे, हे लोकांना पटू लागले होते. राणेपुत्राच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने हे दाखवून दिले आणि आपल्या कर्मभूमीत आपला भाव पूर्वीसारखा राहिला नाही, हेही राणे यांना जाणवले. विधानसभेच्या निवडणुकीआधी तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अनेकांनी राणे यांच्या विरोधात उघडपणे आक्रमक रूप धारण केले. एकेकाळचे राणे यांचे खंदे समर्थक दुरावले. रवींद्र फाटक यांनीही राणेंची साथ सोडली. भिसे-नाईक कुटुंबाशी तर राणे कुटुंबाचे वैरच होते, पण दीपक केसरकर, परशुराम उपरकर, राजन तेली ही वजनदार मंडळीही राणे यांच्याविरोधात दंड थोपटून उभी राहिली. आजवरच्या दहशतीला हद्दपार करण्याचा निर्धार कोकणाने केला आहे, याची जाणीव राणेंना विधानसभा निवडणुकीत झाली.
अर्थात परिवर्तनाची ही सुरुवात अचानक झालेली नाही. तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्य़ातील पालिका निवडणुकीत मतदारांनी राणेविरोधाची आपली भावना मतपेटीतून व्यक्त केली होती. बॅ. नाथ पै यांचे गाव असलेल्या वेंगुल्र्यात ५ डिसेंबर २०११ रोजी राडा झाला. शांततेचा इतिहास असलेल्या या गावाने हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवला होता. पालिका निवडणुकीत तेथील मतदारांनी आपली नाराजी नोंदविली. राणे यांच्या हरतऱ्हेच्या प्रयत्नांना न जुमानता पालिकेत राष्ट्रवादीला कौल मिळाला. राणे यांच्या काँग्रेसचा केवळ एक उमेदवार निवडून आला आणि राणेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. सावतंवाडीत राणे-समर्थक आणि काँग्रेसचे जुने नेते ठाण मांडून बसलेले असतानाही एकही जागा काँग्रेसला मिळवता आली नाही. मालवण नगर परिषदेतही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली.
साम, दाम, दंड, भेदाचे कोणतेही पैलू आता प्रभाव पाडू शकणार नाहीत, याची जाणीव सिंधुदुर्गवासीयांनी या निवडणुकीत पहिल्यांदा करून दिली. तेव्हपासून राणे यांच्या राजकारणातील दहशतीचा प्रभाव ओसरत गेला. राणे यांच्या प्रतिष्ठेचा असलेल्या एकमेव जिल्ह्य़ातच त्यांची प्रतिमा खालावत चालल्याने जुन्या काँग्रेसजनांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तर राणे यांच्या विरोधात काँग्रेस श्रेष्ठींकडे धाव घेऊन तक्रारींचा पाढाही वाचला होता.
..आता दहशतवादाचे हे सावट मावळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कोकणाची माती लाल असली तरी तिला रक्ताचा रंग प्रिय नाही. कारण त्या मातीला नात्यांची ओढ आहे. तिला शांतता हवी असते. दहशतीच्या राजकारणाला पुरता धडा शिकवूनच या मातीतील असंतोषाची धग शमणार आहे. तसे संकेत मिळण्यास सुरुवात झाली आहे…