गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’ हे नाटक त्या काळातील जरठ-बाला विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. मात्र, या नाटकातील स्त्रीपात्रं फक्त सोसत नाहीत, तर ती साऱ्या पुरुषवर्चस्वाचा धिक्कार करतात, आपला संताप शब्दबद्ध करतात, त्यावर आपसात चर्चा करतात, आणि त्याबाबत काही प्रत्यक्ष कृतीही करू पाहतात. नटी, वल्लरी, इंदिराकाकू आणि शारदा या साऱ्यांबाबत हे खरं आहे. ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्दही जेव्हा अस्तित्वात नव्हता अशा काळात ‘शारदा’मधील स्त्रीपात्रं स्त्रीशक्तीचा एल्गार व्यक्त करतात.
‘शारदा’ हे एक सदारंग मराठी सामाजिक संगीत नाटक आहे. मराठी संगीत नाटकं प्रामुख्याने पौराणिक वा जुन्या काळातील काल्पनिक कथानकांवर आधारित असत, कारण दैनंदिन विवंचनांपासून मुक्त असं एक रम्याद्भुत, रोमँटिक वातावरण नाटय़पदं रंगण्याकरता अनुकूल ठरतं. हे पाश्चिमात्य ऑपराबद्दलही खरं आहे.
मामा वरेरकरांची संगीत नाटकं मारूनमुटकून लोकाग्रहास्तव ‘संगीत’ होती. दोन सामाजिक संगीत नाटकं खरी अजरामर ठरली. गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’(१८९९) आणि राम गणेश गडकरी यांचं ‘एकच प्याला’(१९१९). त्यातही ‘शारदा’ हे या दोहोतील खरं संगीत नाटक. पदं वगळून ‘एकच प्याला’ची सहज कल्पना करता येते. गडकऱ्यांनी कवी असूनही ही पदं नाटक लिहिताना लिहिलीच नाहीत, हेही महत्त्वाचं. नंतर ती वि. सी. गुर्जर यांनी लिहिली. गडकऱ्यांच्या इतर नाटकांमध्येही आढळणाऱ्या जीवनदृष्टीप्रमाणे पातिव्रत्याचा उदोउदो करणारं असं हेही नाटक आहे. या नाटकातल्या पदांना चाली दिल्या बाई सुंदराबाई यांनी! या नाटकात नाटय़काव्यात्म आहे ती मात्र खुद्द गडकऱ्यांनी लिहिलेली सात शब्दांची ओवीओळ :
‘चंद्र चवथीचा / रामाच्या ग बागेमधे चाफा नवथीचा.’
ही दोन्ही नाटकं वरपांगी ज्या समस्यांवर आहेत त्या समस्या रस्ता-नाटकात हाताळता येतील अशा आहेत : जरठ-बालाविवाह आणि दारूचं व्यसन. परंतु अव्यक्त प्रेम, गैर ठिकाणची निष्ठा, समवयस्कांमधला मैत्रभाव; किंवा सज्जनांची कुचंबणा, गैर ठिकाणची निष्ठा (दुसऱ्यांदा केलेला उल्लेख ही चूक नाही), जणू शोकात्म प्रमाद वाटावा असा ‘मोह’ अशी महत्त्वाची आशयसूत्रं असूनही त्यामुळे काही ही नाटकं लोकप्रिय झाली नसावीत; पण अ-तडकपणे याचा परिणाम झालाच असेल. ओघवती भाषा (वजा सुधाकर- रामलाल- भगीरथची भाषा), प्रातिनिधिक, तरी खास अशा जोडप्यांचं विलोभनीय चित्रण (इंदिराकाकू-कांचनभट व गीता-तळीराम), गमतीदार व गंभीर यांचा गोफ (‘शारदा’मध्ये सर्वत्र; तर ‘एकच प्याला’मध्ये आलटूनपालटून) ही, ही नाटकं जिवंत होण्याची प्रमुख कारणं. संगीत आहेच. कांचनभट-इंदिराकाकू आणि सिंधू-गीता हे तर स्वाभाविकता, स्वभावचित्रण आणि पात्रभाषा यादृष्टीने मराठी नाटकातले अविस्मरणीय प्रवेश होत.
‘एकच प्याला’मध्ये सुरुवातीला नर्मशृंगार आहे. ‘शारदा’मध्ये तोही नाही. इथे उद्रेकी करुणरसही नाही. नर्मशृंगाराचे ‘उद्दीपन विभाव’ तेवढे हळदीकुंकवाच्या प्रवेशात आहेत. पण ‘आलंबन विभाव’च नाहीत. शृंगाररसपोषक वातावरण आहे, पण नायक-नायिका नाहीत! इथे ‘एकच प्याला’चा उल्लेख ओघात केला. लिहायचं आहे ‘शारदा’बद्दल.
अतिशय ज्वलंत समस्येवरची नाटकं कंटाळवाणी होऊ शकतात. अपरिचित वास्तव समोर आलं तर कंटाळवाणेपणा कमी. उदा. महानगरवासीयांसाठी डाकीण प्रथा. आज तर ‘शारदा’चा विषय कुणाला फार महत्त्वाचा वाटायचं कारणच नाही. तो ज्वलंतही नाही. ‘शारदा’ला समकालीन महत्त्व शून्य. ते लिहिलं गेलं तेव्हा असेलही. पण म्हणजे तेव्हा ते चिरंतन महत्त्वाच्या कशासाठी तरी लिहिलं गेलेलं नाही. या नाटकाचा सदारंगपणा त्याच्या सद्य:कालीन स-लागूपणामध्ये नाही. मग तो कशात आहे? ते अजूनही अवीट गोडीचं का? ते सरळसरळ रंजनवादीही नाही.. अप्रतिम अशा ‘सौभद्र’सारखं. मग?
‘शारदा’मधल्या विनोदाची आणि करुणेची तारीफ होते. त्यावर लिहिणारे त्यातल्या पदांच्या प्रासादिकतेचा आणि संवादांच्या स्वाभाविकतेचा उल्लेख करतात, तसंच त्यावेळच्या सामाजिक समस्येची दखल या नाटकाने घेतली, ते निव्वळ रंजनात्मक नव्हतं, हेही आवर्जून नोंदवतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांची कशी फरफट होते याचं दर्शन यात घडतं, असं बहुतेक सगळ्यांचं मत आहे. हे अगदी बरोबरच आहे. मात्र, या नाटकाच्या काही विशेषांकडे पुरेसं लक्ष गेलेलं नाही असं वाटतं. तेवढय़ापुरताच हा प्रपंच. हे ‘शारदा’चं सर्व बाजूने केलेलं विश्लेषण नव्हे. उलट, होता होईतो आधीच्यांनी म्हटलेलं न म्हणण्याचा प्रयत्न आहे. यात पुढील गोष्टींचा विचार आहे :
१) स्त्रीशक्तीचा उद्गार, २) आश्रमव्यवस्थेचा प्रभाव, ३) प्रतिमा व रूपक, ४) सुयोजित कालावकाश, ५) नाटय़ात्म संगीत, ६) पद्यातला विनोद.
यापैकी इथे केवळ ‘शारदा’मधील ‘स्त्रीशक्तीच्या पहिल्या उद्गारा’बद्दल ऊहापोह करीत आहे. (अन्य मुद्दय़ांचा इतरत्र परामर्श घेतला आहे.)
स्त्रीशक्तीचा उद्गार
या नाटकातली स्त्री-पात्रं फक्त सोसत नाहीत. नटी, वल्लरी, इंदिराकाकू आणि शारदा या साऱ्यांबाबत हे खरं आहे. त्या साऱ्या पुरुषवर्चस्वाचा धिक्कार करतात, आपला संताप शब्दबद्ध करतात, त्यावर आपसात चर्चा करतात, आणि त्याबाबत काही प्रत्यक्ष कृतीही करू पाहतात.
अगदी सुरुवातीला नटी-सूत्रधार प्रवेशातच याचं सूतोवाच होतं. नटी या नाटकातल्या सर्व स्त्री-पात्रांची जणू प्रतिनिधीच आहे. पण हा सूत्रधार पुरुष सज्जन असावा. (तो या नाटकातल्या सर्व पुरुष-पात्रांचा प्रतिनिधी नसून, नाटककाराचा आहे.) पण तोही बाजू मांडण्याकरता गमतीत स्त्रीची अक्कल काढतोच. हा नवऱ्यांनी बायकांना ‘वेडी’ म्हणण्याचा प्रकार नाटकभर खेळवला आहे. (‘द डॉल्स हाऊस’मधला ओस्वाल्ड आठवतो? नोराला ‘माय लिट्ल स्पॅरो’ म्हणणारा!) पण बायका पुरून उरतात.
सूत्रधार : वेडी रे वेडी! म्हणतात तें बरोबर, कीं स्त्रियांचं शहाणपण चुलीपुरतंच. हे कार्यकारणांचे गहन संबंध तुम्हाला कसे कळावेत!
नटी : कळत नाहींत तेच बरं. कार्यकारण समजणारे शहाणेसुरते पुरुष काय दिग्विजय लावताहेत, तें दिसतंच आहे. परवा त्या थेरडय़ा सुदाम सावकारानं इतके पैसे ओतून, त्या दहा वर्षांच्या पोरीशी लग्न केलंन्, ते कार्यकारणांचा संबंध पाहूनच की नाहीं? मोठ्ठा वाईट काळ आला आम्हां बायकांना!
काय पुरुष चळले बाई, ताळ मुळी उरला नाहीं /
धर्म-नीति-शास्त्रे पायीं, तुडविती कसे
हो //धृ// (पृ.३)
‘ज्यांची साठ अधिक वर्षे भरली अशा घोडथेरडय़ांना बाप पोरी देतात कशा?,’ असंही विचारून ती मुलीचे बाप, लग्न करणारे म्हातारे व धर्ममरतड अशा सर्वच पुरुषांना फैलावर घेते.
सूत्रधार सज्जन असल्यामुळे ‘सर्व लोकधुरंधरांनींहि एकबुद्धीनं याकामी पुढे सरसावलं पाहिजे. तशातही तुझ्यासारख्या स्त्रियांचं साह्य़ मिळेल तर उत्तमच..’ असं म्हणतो. (पृ.३) ही थोडी पुरुषी साखरपेरणी खरी; पण तरी हा ‘त्यामानाने’ पुरोगामीच म्हणायचा. कोदंडही असाच आहे, हे पुढे पाहूच.
या नाटकाच्या प्रयोगांतून कित्येकदा शारदा ‘मुकाट सोसणारी गाईसारखी अबला’ अशी रंगवली जाते. पण ती काही गरीब बिच्चारी सहन करणारी नाही. तिला आपल्या शोषणाची जाणीव आहे आणि ती मिळेल तिथे कडकपणे हे बोलून दाखवते. पदांच्या मुखडय़ाचे धोके हे, की आपण कडवं दुर्लक्षितो. पहा :
शारदा :
आम्ही गायी जातीच्या, नाही अम्हां वाचा //
ती असती तरी तुमच्या, भेदितोचि हृदया //१//
अंतरि जें जें सलतें, सांगितलें मग असतें //
गुपित अशा मारातें, नसतें सोशियले //२//
हिला वाचा नाही असं कोण म्हणेल? आणि ही हृदय भेदित नाही, असं तरी कसं म्हणावं? सध्या मार मुटकून सोसावा लगतोय खरा; पण हे जाणवतंय, आणि त्याबद्दल ती स्पष्ट बोलते आहे. म्हणजेच उद्या शारदा गप्प तर बसणार नाहीच, कृतीही करेल.
आणि ती बोलते तरी कशी? गुळूमुळू नाही. खडखडीत. ‘विकूं नका पोटचा गोळा’ (पृ.७०) असं ती बजावते, आणि ‘यमपाश गळ्याशीं ज्यास लागला, त्यांस मला का देतां?’ (पृ.७१) असंही विचारते. बरं, हे झालं आईकडे. बापाशीही बोलताना ही काही कमी नाही. उलट, तिच्या बोलण्याला उपरोधाची धार चढते. कांचनभट ‘उद्या गेलीस म्हणजे बाळे! माझं घर उदास दिसायला लागेल!,’ असं मानभावीपणे म्हणतो. त्यावर ही म्हणते : ‘दिसायला लागेल खरंच. पण बाबा, एवढा सोन्याचा गोळा यायचा आहे, त्याच्याकडे पाहून कसंतरी दु:ख गिळून टाका म्हणजे झालं! काय करणार! शिवाय त्याच सोन्याच्या प्रकाशानं घरहि चांगलं शोभिवंत दिसेल नाहीं?’ (पृ.८०). इंदिराकाकूंना कांचनभट ‘वेडी’ म्हणतो तेव्हा ती ते ऐकून घेते. पण नटी जसं ऐकून घेत नाही, तशी शारदाही.
कांचनभट : ..वेडी कुठली!
शारदा : खरंच वेडी मी! बाबा तुमचं दारिद्रय़ दूर करण्यासाठीं देवानं मला तुमच्या पोटी घातलीन, हे इतके दिवस माझ्या ध्यानांतच आलं नाहीं! तेंव्हा एक नव्हे मी शंभर वेडी! आणि तुम्हीच जतन करून वाढविलेली तुमची मुलगी, तुम्हींच विकणार, त्यांत वाईट ते काय? पण मेली माझी पोरबुद्धी! म्हणून मला उमज पडला नव्हता! आतां माझं कांहीं म्हणणं नाहीं. एक मात्र करा. की..
पद्य (लक्ष्मी प्रभूसी म्हणे)
मागील जन्मिंचें, अतांचें, ऋण देणें असेल
तितकें फेडून घ्या तुमचे //१//
मजवरचें, असें तें, प्रेम धनाचें, नव्हे मनाचें,
कळले मज पुरते //२//
पुढच्या जन्मिं तरी, शिरावरि, भार न ठेवा,
हे मानिन मी उपकारचि भारी //३//
.. हे तर अतिजहाल आहे. नाटककार गो. ब. देवल वास्तववादाच्याच कक्षेत राहून ‘नाही अम्हां वाचा’ असं म्हणवत, शारदेला नंतर मात्र बोल सुनवायला लावतात! धुमसणाऱ्या या असमाधानाचं, संतापाचं कधीही विद्रोहात रूपांतर होईल. पुन्हा वास्तववादी भान जपत रस्त्यावर उतरण्याची आदर्शवादी कृती शारदा करत नाही. शेवटी ग्रीक नाटकातल्या यंत्रातल्या देवाप्रमाणे केवळ धर्मपंडित हा गुंता सोडवतात, असं म्हणूनच वाटत नाही. प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये तर हा शेवटचा धर्मनिर्णयाचा प्रवेश कधीपासून गाळू लागले कोण जाणे. मी तरी तो मंचावर पाहिलेला नाही.
वल्लरी, जान्हवी आणि इतर मैत्रिणी हळदीकुंकवाच्या प्रसंगी शारदेला चिडवतात खऱ्या; पण ते जणू काही तिला सावध करायलाच.
त्रिवेणी : शारदे, हे ग काय? अशी रडूं नकोस बाई; आई-बापांनीं बुडविलं आणि नवऱ्याने तुडविलं, सांगायचं कुणाला? अशीच आईकडे जा, आणि तिच्याकडून बघ काही झालं तर. (पृ. ५७)
..‘रडू नकोस’ आणि ‘बघ काही झालं तर’, ‘आईकडे जा’ हे शब्द तिरप्या ठश्यात न देता वेगळे पुन्हा देतो!
वल्लरी व जान्हवी धीर एकवटून लागलीच इंदिराकाकूंना- म्हणजे शारदेच्या आईला भेटून शारदेसाठी योजलेल्या वराचं म्हातारेपण त्यांच्या कानी घालून हे लग्न मोडायला सांगतात.
वल्लरी : ..तुम्हाला जर मुलीचं खरं सुख पाहायचं असेल, तर ठरवलं आहे, तिथं तिला देऊं नका. आणि नुसत्या भपक्यावरच जायचं असेल, तर आमचं काही म्हणणं नाही. त्या बहुरूपी श्रीमंतीला फसून त्या कुचक्या खोडाला आपली मुलगी विकूं नका. (पृ. ७१, ७२)
यासरशी इंदिराकाकू कुठल्याही आईप्रमाणे दक्ष होतात. पदरच खोचतात. तशा या साऱ्याच जणी नवऱ्याचा जाच सहन कराव्या लागणाऱ्या बायका आहेत. अगदी थट्टेखोर मैत्रीणसुद्धा
म्हणते :
वल्लरी : अगं बाई खरंच ! चला तर, देवदर्शन घेऊन चालायला लागूया, नाहीं तर त्यांच्याशी गाठ आहे. बोलून बोलून पुरे करतील अगदीं. (पृ.२३)
प्रौढ इंदिराकाकू तर असं वागणं आधीच ओळखतात. शारदेच्या मैत्रिणींना म्हणतात : ‘..कुंकू लावून घेऊन तुम्ही स्वयंपाकघरातून चला आता. आजचा रंग काही ठीक दिसत नाही.’ (पृ. ७२)
या मुलींचे बापही ‘पुरुष’ शोभतात. मुलीला विकली नाही तरी शारदेच्या विक्रीसाठी शारदेच्या बापाला- कांचनभटाला मदत करणारा सुवर्णशास्त्री हा वल्लरीचा बाप आहे. परावलंबनामुळे या मुली वयाने वडील अशा इंदिराकाकूंकडे गाऱ्हाणं घेऊन जातात. स्वत:साठी नव्हे, दुसऱ्या एका स्त्रीसाठी- मैत्रीण शारदेसाठी. इंदिराकाकूही जीव तोडून आपल्या नवऱ्याशी यावरून प्रचंड भांडतात. त्याचा शब्द झेलत नाहीत, आपला खाली पडू देत नाहीत. आपलं बायकोपण झुगारून आपल्या आईपणाचा.. बाईपणाचा हक्क मागतात. हा मोठा संवादतुकडाच पाहा :
कांचनभट : पुन्हां तोंड, पुन्हां तोंड वर करते! मस्तवाल कार्टी! म्हणे ते स्थळ असंच आहे, म्हणे ती बेगडीच श्रीमंती आहे. तिथे म्हणे मला कां देता? जसं काही कारटीचं स्वयंवरच चाललं आहे. गळ्यांत दावं बांधून मी विकीन तिथं तुला गेलंच पाहिजे.
इंदिराकाकू : हो! दावं बांधून विकायला माझी मुलगी म्हणजे गोठय़ांतली पारडीच की नव्हे?
कांचनभट : आता तुम्ही आलांत वाटतं पोरीचा कैवार घेऊन! तूंच, तूंच तिचे कान फुंकून तिला बिघडवलीस; नाहीं तर इतकं चुरू चुरू बोलायची तिची काय छाती होती?
इंदिराकाकू : पोटांत दुखल्यावर कोणीही ओवा मागेलच. ही दांडगी म्हणून जर त्यांच्या मनातून उतरली असेल तर देवच पावला म्हणायचा अनायासें. माझ्या पोरीला तरी असा जांबुवंत नवरा कुठं आवडतो आहे?
कांचनभट : ..त्यांच्या श्रीमंतीवर मी त्यांना मुलगी देणार. तुझं काय म्हणणं?
इंदिराकाकू : देणार म्हणजे? मी देऊं द्यायची नाहीं. नाहीं पोरीचं लग्न झालं तरी पुरवलं. जन्मभर तश्शी जवळ बाळगेन, पण पैशाच्या लालचीनं विकूं म्हणून द्यायची नाही. आपल्या पोरीवर उदार होऊन कितीहि लाभ झाला तरी
मला नको तो. तिला सुख होईल तिथंच दिली पाहिजे.
कांचनभट : ..तुम्ही बायका म्हणजे शुद्ध अडाणी जनावरं. घातलेलं खावं, दिलेलं नेसावं, आणि सांगितलेलं करावं, हें तुमचं काम! जास्त पंचाइतींत पडायची गरज नाहीं..
इंदिराकाकू : आम्ही जनावरंच, तेव्हां आम्हाला काय कळतं! पण पैशाकरितां आपली मुलगी म्हाताऱ्याला विकायची, हें मनुष्यांना शोभतं का? .. इतकीं कशीं पुरुषांची हृदयं निर्दय म्हणतें मी!
माया जळली कां, तिळही ममता नाहीं कां /
आली पोटीं पोर एकटी, तीहि विकतां कां //१//
लाजहि गेली कां, मतिला भ्रमही पडला कां /
शोभा करितील लोक तयाची,
चाडहि नाहीं कां //२//
द्रव्यचि बघता कां, तिजला पतिसुख नलगे कां /
वृद्धा देऊन तिला वांझपण,
विकतचि घेता कां //३//
..आग लागली त्या जिभेला! मी म्हणतें मनाची नाहीं, पण जनाची कांहीं चाड!
कांचनभट : काय संबंध जनाचा? माझी पोरगी मी वाटेल त्याला देईन!
इंदिराकाकू : म्हणजे, माझी तिच्यावर मुळींच का सत्ता नाहीं?
कांचनभट : सत्ता असेल, पण मत्ता आहे माझी. (पृ. ७३- ७५)
पुरुषी अरेरावीपुढे या बायकांचं अखेरीस काही चालत नाही. पण त्या जिवाच्या आकांताने ‘शब्दाला शब्द’ देत भांडतात! आपण पुढे या नाटकातल्या प्रतिमा पाहूच; पण स्वत: जनावरासारखं अमानुष वागून दुसऱ्यांना पाळीव जनावर बनवण्याची वृत्ती इथेही दिसते. पुरुष जबरदस्तीने बाईला दावणीला बांधतो आहे आणि ती गाय बनायचं नाकारते आहे.
शारदेसाठी तिच्या मैत्रिणी जशा त्यांच्याहून ज्येष्ठ अशा काकूंकडे जातात, तशाच इंदिराकाकू त्यांच्याहून ज्येष्ठ अशा आपल्या वन्स व आत्याबाई (सासूबाई) यांच्याकडे जातात. सासूला मधे घालतात, नणंदेचा सल्ला घेतात.
इंदिराकाकू : ..उगीच काय म्हणून पोरीला मारायचं? शारदे जा, जा स्वयंपाकघरात; आत्याबाईंजवळ जाऊन बैस. (पृ. ७३)
इंदिराकाकू : आंत चल; वन्संना तरी कांही सुचतं कां विचारून पहातें. (पृ.७६)
पण कांचनभट नुसताच लोभी बाप नाही, तर पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. तो आपल्या मुलीचं, बायकोचं ऐकत नाही, तसंच बहिणीचं आणि आईचंही ऐकत नाही. लक्षात घ्यायची गोष्ट अशी, की इंदिराकाकू ‘माहेरी जाईन’ असं म्हणतात. पण भावाला काही सांगण्याअगोदर सासरच्याच बायकांशी मनातलं बोलतात.
या साऱ्या बायका जुलमाविरुद्ध आवाज उठवताहेत, अबला होण्याचं नाकारताहेत. इथे स्त्री-शोषणाचं फक्त चित्रण नाही. या शोषित स्त्रियांचा असंतोष खदखदतो आहे. त्यांना या शोषणाची जाणीव आहे. त्याविरोधात त्या आपण होऊन बाह्य नेतृत्वाशिवाय एकत्रित येऊ पाहताहेत. त्याबद्दल बोलताहेत, भांडताहेत. हे ‘बायकांचं बंड’ आहे.. यशस्वी न झालेलं; पण बंडच. क्रांतिकारक कलाकृतींमध्ये यशस्वी क्रांतीचं दर्शन आवश्यक नसतं, हे ‘द बॅट्लशिप पोटेमकिन’ वगैरे अनेक कलाकृतींनी सिद्धच केलं आहे. इथे सारी स्त्री-पात्रं आवर्जून एकमेकींना भेटतात- मैत्रिणी, आई-मुलगी, सून-सासू, नणंद-भावजय, पुतण्या-काकू! या भेटून केवळ ‘चुलीपुरतं’ बोलत नाहीत, तर बायकांच्या व्यथा व समस्यांबद्दल बोलतात, त्याबद्दल काय करता येईल याबद्दल चर्चा करतात. ही चर्चा, चर्चा म्हणून त्या करत नाहीत, पण ती होते. हा संवाद आग्र्युमेंटेटिव्ह असतो. स्त्रीवादी म्हणणं असं आहे..
‘शारदा’च्या आधी ‘सौभद्र’मध्ये सुभद्रा-रुक्मिणी आणि नंतर ‘एकच प्याला’मध्ये सिंधू-गीता असंच बोलतात. गीताने तर इंदिराकाकूंकडूनच स्फूर्ती घेतली असावी. ‘सखाराम बाइंडर’, ‘सावल्या’, ‘सांधा’, ‘चारचौघी’ अशा अनेक नाटकांमध्येही अशा बायका भेटतात. याबाबतीत मराठी नाटकाची आस्था खरी आणि अवस्था बरी आहेसं दिसतं. ‘शारदा’ १८९९ सालचं आहे. यातल्या साऱ्याजणी मिळून विसाव्या शतकाचं स्वागत करत आहेत असं वाटतं. आता एकविसाव्या शतकातही हे सगळं नकोशा अर्थाने अद्याप सलागू (रेलव्हंट) आहे याचं मात्र वाईट वाटतं.