राखी चित्रपटांतून अदृश्य झाल्याला आता काळ लोटलाय. आज ती काय करतेय, कशी जगतेय, याबद्दल चाहत्यांना निश्चितच उत्सुकता आहे. तिचं आजचं विश्व…
काही चित्रपट कलाकार पडद्यावरून आणि चित्रपटसृष्टीतूनही कधी दिसेनासे होतात, हे कळतही नाही. चित्रपटनिर्मितीचं अवाढव्य विश्व, विविध वाहिन्यांवरील मालिका, गेम शोज्, रिअ‍ॅलिटी शोज्, जाहिरातपटांचे जग,  मॉडेलिंगकडून चित्रपटाकडे येणाऱ्यांची महत्त्वाकांक्षा, डोळ्यांत रंगीत स्वप्नं व आशावाद घेऊन येणारे कितीतरी दिसणारे- न दिसणारे नवे चेहरे, त्यांचा एकेका संधीसाठीचा कडवा संघर्ष, आणि तशी संधी मिळाल्यावर इथं टिकण्यासाठीचा आटापिटा.. या सगळ्या गदारोळात हळूहळू मागे पडणाऱ्या, दिसेनासे होणाऱ्या चेहऱ्यांची साधी आठवण तरी कोणाला कशाला राहील? पण त्या कलाकाराचा एखादा सिनेमा पाहताना प्रश्न पडतो- ‘कहाँ गए ये लोग?’ हल्ली चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्तानं त्याचे निर्माता, दिग्दर्शक व कलाकार असे सगळे मिळून इतकी पोपटपंची करतात, की त्यात अशा दिसेनाशा झालेल्या चेहऱ्यांची साधी आठवणही कोणाला येत नाही.
..मग एके दिवशी कुठून तरी अकस्मात कळतं की, चित्रपटांतून गायब झालेली परवीन बाबी जुहूच्या कालूमल इस्टेटमध्ये परतली आहे. सध्या ती सिनेपत्रकारांना भेटून आपण इतके दिवस कुठे गायब होतो, हे सांगतेय. पण प्रत्यक्ष तिला भेटायला गेल्यावर तिचा अवतार पाहूनच दचकायला होतं. बी. आर. इशारा यांच्या ‘चरित्र’पासून ग्लॅमरस तारका म्हणून लक्ष वेधणाऱ्या परवीन बाबीची अशी हालत व्हावी, हे पचवणं खूप त्रासाचं होतं. आठवणीतील कलाकार त्यांच्या रूपेरी प्रतिमेतच राहावेत, त्यांना ‘कुछ साल बाद’ अशा स्थितीत पाहावे लागू नये वा तशा स्थितीत भेटण्याचा योग येऊ नये असं खूप वाटतं.
पण काळ कुणासाठीच थांबत नाही. कलाकार दिसेनासे होण्याचं चक्र सुरूच राहतं. नि अचानक एके दिवशी वर्सोव्याच्या कोळी वस्तीतून मढला जाणारी होडी पकडण्याच्या घाईत असताना एक ओळखीचा चेहरा समोर येतो. पण ‘ही कोण?’ हा प्रश्न मनात येतो- ना येतो तोच वाटतं- अरे, ही सोनिया सहानी वाटतं. एकेकाळची मादक तारका. वळून तिला भेटताच ती काहीसं संशयानं माझ्याकडे पाहते. मात्र, तिच्या काही चित्रपटांचे संदर्भ दिल्यावर ती आपली ओळख देते. त्याहीपेक्षा आपल्याला कुणीतरी ओळखल्याचा आनंद तिला जास्त होतो.
मग प्रश्न पडतो- सिनेमापासून दूर आज ती कशी जगतेय?
कोणताही लहान-मोठा कलाकार ‘फोकस’ंमध्ये असताना तो/ ती वापरत असलेल्या टूथपेस्टपासून रात्री झोपताना त्याच्या/तिच्या मनात कोणते विचार असतात, त्याचं/तिचं आवडतं हॉटेल कोणतं, इथपासून त्याच्या/तिच्या आवडत्या पदार्थाच्या रेसिपीज्पर्यंत सतत कुठे ना कुठे गुलाबी मुलाखती प्रसिद्ध होत असतात. बडे कलाकार तर चित्रपटाचा प्रीमियर, पेज थ्री पाटर्य़ामधूनही दिसत असतात. पण कधीतरी हा ‘शो’ थांबतो.
राखी गुलजारबद्दल असा ‘शो’ कधी बरे थांबला?
राखी हा असाच एक पडद्यावरून आणि सिनेमांतून अचानक दिसेनासा झालेला चेहरा. तिला प्रत्यक्षात शेवटचं कधी पाहिलं, हे नेमकं सांगायचं तर तिची कन्या बोस्की हिच्या ‘फिलहाल’ या चित्रपटाच्या अंधेरीच्या क्लबमधील ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्यात! त्यालाही एक दशक झालं. तेव्हाची आठवण सांगायला हवी. सिनेमाचे सोहळे आमंत्रणावर दिलेल्या वेळेपेक्षा दीड-दोन तास उशिराच सुरू होतात, असा रिवाजच आहे. बोस्की सर्वाच्या स्वागताला हॉलच्या गेटवर उभी होती. आपल्या कन्येच्या पहिल्या दिग्दर्शनाखालील चित्रपटाच्या ध्वनिफितीला आशीर्वाद देण्यासाठी गुलजारही बऱ्यापैकी लवकर आले. पण राखी कधी येणार? ती आल्यावर काय घडणार? याचं विलक्षण कुतूहल होतं. वाहिन्यांचे प्रतिनिधी गुलजारपेक्षा तब्बूला ‘कव्हर’ करण्यात विशेष रस घेत होते याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. याच गर्दी-गडबडीत राखी आली आणि चौथ्या रांगेत बसली. राखीच्या चेहऱ्यावर आपल्या मुलीच्या प्रगतीचं कौतुक दिसत होतं. हा तिचा ‘मुखवटा’ नव्हता, खरा चेहरा होता. सिनेमाच्या जगातील सगळेच जण मुखवटे घालून वावरतात, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं आहे. निवेदिकेनं एकेकाला स्टेजवर बोलावलं आणि अगदी शेवटी तिनं या सोहळ्याला राखी आल्याबद्दल आनंद व्यक्त करताच गुलजार स्वत: स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांनी राखीजवळ येऊन तिला स्टेजवर येण्याची विनंती केली. बोस्कीदेखील त्यात सामील झाली. पण राखीनं दोघांची ही प्रेमळ विनंती नाकारत पहिल्या रांगेत बसण्याचा आग्रह कसाबसा मान्य केला.
या क्षणाची भावपूर्ण बातमी काही वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर दिली.
यानंतर राखी कोणत्याच सोहळ्यात दिसली नाही. आणि अलीकडे बऱ्याच दिवसांत तिचं कोणत्या सिनेमातही दर्शन झालेलं नाही.
मग राखी आहे कुठे?
राखी म्हणताच रसिकांच्या एका पिढीला घाऱ्या डोळ्यांची, फारशी टामटूम न करता विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवते. राजश्री प्रॉडक्शनच्या सत्येन बोस दिग्दर्शित ‘जीवनमृत्यू’ या चित्रपटात धर्मेन्द्रची नायिका बनत तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीला सुरुवात झाली. तिच्या या पहिल्याच चित्रपटाने, मॅटिनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही, हा नवा ट्रेण्ड आणला. दक्षिण मुंबईतील ‘अलंकार’मध्ये हा चित्रपट मॅटिनीला १०२ आठवडे चालला. हे आवर्जून सांगण्याचं कारण- आपल्या चित्रपटसृष्टीला फकत यशाचीच भाषा समजते. मानवते. पहिलाच चित्रपट सुपरहिट् झाल्यानं राखीसाठी पुढचा मार्ग प्रशस्त झाला. शशी कपूरसोबत तिची जोडी छान शोभली. (उदा. ‘बसेरा’, ‘शर्मिली’) पण अमिताभसोबत तिनं विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ती त्याची प्रेयसी (‘बरसात की एक रात’), पत्नी (‘कस्मे वादे’) तर झालीच, पण त्याची आईदेखील (‘शक्ती’) तिनं साकारली. ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘शान’, ‘जुर्माना’, ‘बेमिसाल’ अशा अनेक चित्रपटांतून अमिताभ-राखी विविध नात्यांनी प्रेक्षकांसमोर आले. ‘कभी कभी’तही ते दोघं होते. त्यात ती अमिताभची प्रेयसी असली तरी पुढं ‘कहानी एक ऐसा मोड लेती है’ की ती शशी कपूरची पत्नी होते.
संजीवकुमार (‘पारस’), जितेंद्र (‘यार मेरा’), मनोजकुमार (‘बेइमान’), संजय खान (‘वफा’), राजेंद्रकुमार (‘आन बान’), राजेश खन्ना (‘दाग’, ‘शहजादा’), देव आनंद (‘बनारसी बाबू’, ‘हिरा पन्ना’) असे करता करता नवीन निश्चल (‘मेरे सजना’), परीक्षित साहनी (‘हमकदम’), राकेश रोशन (‘पगली’), दीपक पराशर (‘श्रद्धांजली’) यांचीही ती नायिका झाली. या रूपेरी प्रवासात तिनं रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’मध्ये दिलीपकुमारची पत्नीही (अमिताभची आई) साकारली. अभिनेत्री म्हणून तिची ही सर्वोच्च कामगिरी. त्याकाळी दिलीपकुमारची नायिका (प्रेयसी वा पत्नी) साकारायची संधी लाभणं, हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात होतं..
साधारणपणे एक तप नायिकापद साकारल्यावर राखी अपेक्षेप्रमाणं चरित्र- भूमिकांकडे वळली. ‘राम लखन’, ‘डकैत’, ‘प्रतिकार’ इत्यादी चित्रपटांतून तिनं अशा भूमिका साकारल्या. त्यातील काही भूमिका खरंच चांगल्या होत्या, तर काही वेळा दुसरं कुणी नव्हतं म्हणून राखी होती, इतकंच. अशा भूमिकेत कलाकार ‘असतो’, पण ‘दिसत’ नाही. भूमिकांची लांबी-रुंदीच जिथे नीट नसते, तिथे ‘खोली’ ती काय असणार! एव्हाना चित्रीकरणाच्या ठिकाणी मिळणारं महत्त्वही कमी झालेलं असतं. नायिका म्हणून वावरताना सेटवर उशिरा येणं, मेकअपला वेळ घेणं ‘स्टाईल’ मानलं जातं. पण चरित्रभूमिका साकारताना स्वतंत्र मेकअप व्हॅन मिळत नाही, भूमिका कापली तरी थयथयाट करता येत नाही.
राखीच्या या दीर्घ प्रवासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे गुलजार यांच्याशी झालेला विवाह आणि काही वर्षांनी बोस्कीला दिलेला जन्म.
‘राखीचं गुलजार यांच्याशी पटत नाही, छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून त्यांचा अहंकार दुखावला जातो, संसारातील कटकटींपासून दूर राहण्यासाठीच ती स्वत:ला सिनेमात बिझी ठेवते,’ अशा गोष्टींना गॉसिप मॅगझिन्समधून भरपूर मसाला तडका दिला गेला..
पण राखी सध्या कुठे आहे?
‘आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हैं वो इस वक्त संपर्क क्षेत्र से बाहर हैं’ अथवा ‘बंद हैं’ असं तिच्या मोबाइल नंबरवर वारंवार ऐकावं लागल्यानं राखीला गाठणं मुश्कील आहे असं वाटू लागलं. राखीचा हा मोबाइल क्रमांकदेखील इतनी आसानी से मिळाला नव्हता. चलतीतील कलाकारांचे नंबर मिळवणं पूर्वीइतकं कठीण राहिलेलं नाही. (पूर्वी एखाद्या तारकेचा टेलिफोन नंबर फक्त आपल्याकडेच आहे, याचा काही पत्रकारांना केवढा अभिमान असे!) पण दृष्टीआड गेलेल्या कलाकाराचा मोबाइल क्रमांक कोण हो कशाला सेव्ह करेल? जे उपयोगाचे नाहीत त्यांचा मोबाइल नंबरही ठेवू नये, हा इथला शुद्ध व्यवहार. बऱ्याच प्रयासानं राखीच्या दोनपैकी एका मोबाइलचा क्रमांक तर मिळवला; पण संपर्काचं काय? ‘‘लोकसत्ता’ दिवाळी अंकासाठी मुलाखत हवी आहे. मी ‘जीवनमृत्यू’पासूनचे तुमचे बरेचसे चित्रपट पाहिलेले आहेत,’ असा एसएमएस करताच १५ मिनिटांत राखीकडून उत्तर आलं, ‘मी माझ्या फार्महाऊसवर आहे. माझे डॉक्टर एस. जी. गोखले ज्यांच्याबद्दल सांगत असतात, ते ठाकूर तुम्हीच का?’ राखीचा एसएमएस सकारात्मक होता. पण तो ‘ठाकूर मी नव्हे,’ असा एसएमएस त्वरित पाठविला. काही दिवस एसएमएसच्या माध्यमातून आमच्या भेटी होत राहिल्या..
‘तुम्ही माझी मुलाखत का घेऊ इच्छिता? मी तर सध्या सिनेमापासून, खरं तर फिल्मी दुनियेपासून खूप दूर आले आहे. पण कशाला वा कुणाला कंटाळून नव्हे, तर मी हा निर्णय स्वत:हूनच घेतलेला आहे. तो काही अचानक घेतलेला नाही. असे महत्त्वाचे निर्णय एकदम उठून घेता येत नाहीत, घेतले जात नसतात. कधीतरी त्याची मानसिक प्रक्रिया सुरू होते आणि मग आपण आपल्या मूळ मार्गावरून दूर होतो. तशीच मी झाले आहे. अशा आऊटफोकस असणाऱ्या माझ्याकडून तुम्हाला चांगली मुलाखत ती काय मिळणार? मला तुम्ही विचारणार तरी काय?’ राखीनं प्रतिप्रश्न करतच गप्पांना सुरुवात केली. तिचा रोखठोक बाणा पाहता तिला बोलतं ठेवणं गरजेचं आहे, हे माझ्या लक्षात आलं. मी म्हणालो, ‘बऱ्याच दिवसांत तुमचं चित्रपटातून दर्शन झालेलं नाही.’ राखी पटकन् म्हणाली, ‘दोन वर्षांपूर्वी एका बंगाली चित्रपटात मी भूमिका केली होती. त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही. मी शेवटचा हिंदी चित्रपट कोणता केला, हे तर मी केव्हाच विसरले आहे. आणि मी ते लक्षात तरी का ठेवू?  आव्हानात्मक वा चांगला ठसा उमटेल अशी आईची भूमिका असणारा एक तरी हिंदी चित्रपट गेल्या दहा वर्षांत आला असेल तर मला सांगा. बघा जरा आठवून एखादा चित्रपट आहे का तसा? काही चांगलं करावं अशी संधीच नाही. तसं वातावरणदेखील नाही. म्हणून मी चित्रपटांपासून दूर गेले. पण मला त्याची खंत वाटत नाही. कलाकाराला दमात घेऊन त्याच्याकडून आपल्याला हवं तसं काम करून घेणारा आज एक तरी दिग्दर्शक आहे का सांगा? दिग्दर्शक म्हणजे दिशा देणारा. कथेला दिशा देत त्यात कलाकारांना योग्यरीत्या सामावणारा! ‘जीवनमृत्यू’च्या वेळी एका दृश्याचे संवाद माझ्याकडून सतत चुकत होते. त्यामुळे रिटेक होत होते. दिग्दर्शक सत्येन बोस यांनी मला चक्क सर्वादेखत एक जोरदार फटका दिला. अशी कलाकाराला फटकावण्याची हिंमत असणारा एक तरी दिग्दर्शक आज आहे? मी समीर गांगुली, विजय आनंद, रमेश सिप्पी, प्रकाश मेहरा, अनिल गांगुली, रमेश बहल, यश चोप्रा अशा कितीतरी मान्यवर व चित्रपट माध्यमाची जाण असणाऱ्या दिग्दर्शकांसोबत कामं केली. मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. हृषिदांबाबत तर जेवढं सांगावं तेवढं थोडंच. होमवर्क केल्याशिवाय मी कधीही त्यांच्या सेटवर गेले नाही. त्यांची सेटवर जबरदस्त जरब असे. त्यांच्या डोक्यात सिनेमा फिट असायचा. एखादा क्लोजअप आपण अमुकच बाजूने का घेतो, हे त्यांना पक्कं ठाऊक असे. कोणताही कलाकार त्यांना कधी प्रतिप्रश्न करीत नसे वा शंका विचारीत नसे. मी हे सारं अनुभवलंय. माझ्यासाठी या सुखद आठवणी आहेत. त्या तशाच राहाव्यात म्हणून मला सिनेमापासून दूर जावंसं वाटलं. माझ्या बुद्धीला जो निर्णय योग्य वाटला तो मी घेतला. मला त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही.’
‘पण तुमचे चाहते तुम्हाला मिस करताहेत..’
‘छे! छे! कुणीही कलाकार आपल्या चाहत्यांपासून दुरावत नसतो. चित्रपटांच्या रूपात, आपल्या भूमिकांच्या माध्यमातून पूर्वीचे कलाकार आजही आपल्या चाहत्यांच्या जवळ आहेत. मी जवळपास रोजच एखाद्या वाहिनीवर नजर टाकते तेव्हा त्यावर पूर्वीच्या कितीतरी कलाकारांचं दर्शन घडतं. त्यापैकी कुणाला कोणीही विसरलं असेल असं मला तरी वाटत नाही. चांगल्या कामाचा कुणालाच विसर पडत नसतो. मधुबाला, मीनाकुमारी, नर्गिस, नूतन, राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार, राजेश खन्ना, सचिन देव बर्मन, साहिर लुधियानवी यापैकी कुणालाच लोक विसरलेले नाहीत. त्यांची आठवण यावी, त्यांना आठवणीत ठेवावं असं भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. मी अशा काही मान्यवरांसोबत कामही केलय. त्यांच्यापैकी अनेकांचं काम मी जवळून पाहिलंय. मला स्वत:ला कोलकात्याला असताना बंगाली चित्रपटांत काम करण्याची सर्वप्रथम संधी मिळाली; तेव्हा मी थेट कॅमेऱ्यासमोर उभी राहिले नाही. मी तिथल्या चित्रा थिएटरमध्ये सकाळच्या खेळाला- म्हणजे मॅटिनीला जुने चित्रपट पाहायचा धडाका लावला. चित्रपट म्हणजे काय असतं, त्यात किती गोष्टी सामावलेल्या असतात, त्यात काम करताना नृत्य कसं करतात, डबिंग काय असतं, हे सगळं थोडंफार जाणून घेतलं. माझी शिकण्याची वृत्ती कायम ठेवली. एखाद्या चित्रपटाच्या सेटवर स्पॉटबॉयनं जरी मला सल्ला दिला, एखादी गोष्ट करून दाखविली तरी त्यात मी कधी कमीपणा मानला नाही. ती गोष्ट मी स्वीकारली. तुम्हाला ‘शर्मिली’ चित्रपटातील ‘आज मदहोश हुआ’ गाणं आठवतं? त्यात मी गरोदर असल्याचं दाखवलं आहे. गरोदर असताना स्त्रीनं चालायचं कसं, हे मला एका स्पॉटबॉयनं सांगितलं.’
राखीला फ्लॅशबॅकमधून बाहेर काढणं गरजेचं होतं. म्हणून विचारलं, ‘वाहिन्यांवर जुने चित्रपट व जुनी गाणी वगळता सध्या तुमचा दिनक्रम काय?’
‘मघाशीच मी म्हटलं, की पुढील आयुष्याची दिशा ठरवण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होते. तुम्हाला रायगड जिल्ह्य़ातील पनवेल नक्कीच माहीत असणार. पनवेलपासून जवळच तारा नावाचं गाव आहे. त्या गावापासून थोडं पुढं गेल्यावर रसायनीकडे डाव्या बाजूला एक रस्ता जातो. तिथे फार पूर्वी मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. अत्यंत शांत अशी ही जागा आहे. मला शांतता अत्यंत प्रिय आहे. त्या जागेवर येताच मला माझं बालपण आठवलं. बंगालमध्ये माझं बालपण अशाच शांत वातावरणात गेलं. इथं झाडंझुडपं, डोंगर-नदी, प्राणी-पक्षी सगळं कसं माझ्या लहानपणासारखंच होतं. मला या जागेची मोहिनी पडली आणि मी १२ हजार स्क्वेअर फुटाची ही जागा घेतली. सुरुवातीला इथं काही नव्हतं. मी १९९६ सालापासून अधेमधे येथे येऊन राहू लागले. आता तर जवळपास कायमच माझं वास्तव्य इथं असतं. अगदीच काही महत्त्वाचं काम असेल तरच मी मुंबईला जाते. हल्लीची मुंबईची गर्दी, धावपळ मला घाबरवूनच टाकते. तिथं एक क्षणही थांबावंसं वाटत नाही. त्यापेक्षा इथं मी सुखात आहे. समोर रस्ता आहे. या रस्त्यावर एक छानसं देऊळ आहे. दुसऱ्या बाजूला नदी वाहतेय. पलीकडून कोकण रेल्वे धावतेय. किती सुखद वातावरण आहे ना! मी इथं एकटी राहते. लहानपणापासूनच मला एकांतात राहायला आवडतं. मला त्याची भीती वाटत नाही. मला गडबड-गोंधळ नकोसा वाटतो. मी इथं आले तेव्हा सुरुवातीला एक गाय आली. मग कुत्रा आला. मांजर आलं. काही पक्षी आले. जे जे आले त्यांना मी स्वीकारलं. त्यांना आपलं मानलं. पाळलं. इथला सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि प्राणी-पक्षी या सगळ्यांची मला सोबत आहे. म्हणूनच मी म्हणते- मी एकटी नाही. मला एकटेपण जाणवत नाही. या सगळ्यांचा सहवास मला सुखाचा वाटतो. माझं मन या साऱ्यात गुंतलंय. रमलंय. एक अतिशय चांगलं आयुष्य मी जगतेय. शक्य तेव्हा मी काही लिहितेदेखील. त्यात माझ्या काही व्यक्तिगत व व्यावसायिक आठवणी असतात. ३५ वर्षांच्या अभिनय कारकीर्दीतील छोटय़ा-छोटय़ा गोष्टी मला आठवतात. काही इगो प्रॉब्लेम्सही आठवतात व माझं मलाच हसू येतं. कशी होते मी? कसे होते आपले सहकारी? सगळेच चांगले व समजूतदार असतात असे नाही. नि सगळेच वाईट वा स्वार्थी असतात असंही नाही! आपल्या नशिबात जे होतं ते सगळं तेव्हा घडलं असं मी म्हणेन. आता मी तसंच म्हणते. यश काय असतं, ते मी पाहिलं. मोठं घर, मोठा बंगला, मोठी गाडी या सगळ्याचं सुख मी अनुभवलं. देवानं मला भरभरून दिलं. कितीतरी सुपरहिट चित्रपट, कितीतरी चांगल्या भूमिका दिल्या. रसिकांच्या हृदयात मला स्थान मिळालं. आपल्याकडच्या चित्रपट चाहत्यांची स्मरणशक्ती प्रचंड असते, याची मला कल्पना आहे. तसे चाहते मला अनेकदा भेटलेत. तेच तर आम्हा कलाकारांचं टॉनिक असतं! काम करता करता मी चित्रपट माध्यमाचं माझं ज्ञान वाढवलं. त्यातून मी खूप काही शिकले. गेल्या दहा वर्षांत मात्र या परिस्थितीत फरक पडत गेला. आता झटपट यश व नावलौकिक- अर्थात ग्लॅमरच्या मोहानं अनेकजण येतात. सिनेमा इतका सोपा आहे का? हे बदललेलं वातावरण मला मान्य नाही. माझ्या स्वभावाशी ते जुळत नाही. म्हणून मी चित्रपटांपासून दूर झाले. हे करताना मी काही गमावलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. मी माझ्या चित्रपट कारकीर्दीबाबत पूर्णपणे तृप्त आहे. आता मी माझ्या फार्महाऊसवर पूर्णपणे नवं आयुष्य जगतेय. त्याचा आनंद घेतेय. मी आता निसर्ग, प्राणी, पक्षी, शांतता यांच्या सहवासात आहे..’
‘तुमच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक पडलाय..’
‘होय, तसं म्हटलं तरी चालेल. या बदलाबद्दल माझी स्वत:ची काही तक्रार नाही, तर मग कोणी माझा शोध का घ्यावा? जिंदगी जिने का नाम है. जिंदगी सिर्फ सिनेमा नहीं. चित्रपटांतून भूमिका साकारत असतानाचं माझं अस्वस्थपण वेगळं होतं. तेव्हा मला आपण चांगलं काम करून आपल्या दिग्दर्शक व प्रेक्षकांना समाधान द्यावं असं वाटे. मी माझ्या लहानपणी पाहिलेल्या त्या चित्रपटाचा माझ्यावर प्रभाव असावा. तो चित्रपट कोणता होता माहितेय? राज कपूरचा ‘जिस देश में गंगा बहती हैं.’ या चित्रपटाचा आशय, विषय, अभिनय, गीत, संगीत, नृत्य, संवाद या साऱ्यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. मी चित्रपटांतून भूमिका साकारत असताना सतत हा प्रभाव मला जागा करायचा. मी सगळ्यांची मदत घेतली. सगळ्यांकडून काहीतरी शिकत गेले व यशस्वीपणे प्रवास केला. पण मी त्यातच कायमचं का अडकून पडायचं, सांगा? मला काही झालं तरी वाहिन्यांवरील मालिका आणि जाहिरातपटांतून भूमिका करायची नव्हती. जे कायमस्वरूपी नाही व ज्या कामाचा आपण कसलाही आनंद घेऊ शकत नाही, असं काम आपण स्वीकारायचं नाही, असं मी ठरवलं. मी अत्यंत मेहनतपूर्वक आणि प्रामाणिकपणे चित्रपटातील कारकीर्द केली. ती तशीच लोकांच्या स्मरणात राहू द्यावी, असा मी विचार केला.’
‘या फार्महाऊसवर गुलजारसाहेब आणि इतरांचं येणं-जाणं वगैरे..’
‘हो तर! गुलजारसाहेब इथं येतात तेव्हा ते माझं आवर्जून कौतुक करत म्हणतात की, ‘बाकी लोग सिर्फ बातें करते हैं, हम शांत जिंदगी जिना चाहते है, मगर ऐसा जिने की किसी में हिमत नहीं. सिर्फ राखी ही ऐसा कर सकती हैं.’ त्यांच्या या बोलण्यानं माझी उमेद वाढते. मी घेतलेला निर्णय योग्य आहे असं वाटतं. ते येतात, त्यांच्या काही काव्यरचना ऐकवतात. कधी दोघेही जुन्या आठवणींत रमतो. बऱ्याचदा त्यांनाही येथील शांतता हवीशी वाटते. तेही निसर्गाशी गप्पा करतात असं मला वाटतं. त्यांच्या मूळ प्रवृत्तीशी साजेसं वातावरण इथं आहे. पूर्वी बराच काळ माझे आई-वडील इथे माझ्यासोबत राहायचे. त्यांना या महाराष्ट्रात आपला बंगाल अनुभवायला मिळायचा. फार पूर्वी माझे बाबा ऑफिसला आणि मी चित्रीकरणाला जात असे. पण दिवसभराचं काम संपल्यावर मी इकडेतिकडे कुठेही न फिरता घरी परत येत असे. मी माझ्या कुटुंबात रमायचे. ते इथे आल्यावर त्या दिवसांच्या आठवणी निघायच्या. मला चांगल्या आठवणींत रमायला नेहमीच आवडतं. कधी माझी मुलगी व नातू येतात. माझ्या नातवासोबत खेळताना मी स्वत: लहान होते. मला हे सारं आवडतं. मला माझं लहानपण आठवतं. आयुष्यात पैसा म्हणजेच सगळं काही नाही. अंदर से खुशी होनी चाहिए. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून खूप मोठा आनंद मिळत असतो असं मला वाटतं. मी खूप गरीब कुटुंबातून आले आहे. त्यामुळेही कदाचित, मी अशा साध्या साध्या गोष्टींचा विचार करीत असेन, त्यांचा स्वीकार करीत असेन. मी शूटिंगच्या निमित्ताने व इतर वेळीही खूप फिरले आहे. लोकांना जाणून घेतलं आहे. मी सुंदरबनला गेले आहे. चेरापुंजीलाही गेले आहे. भरपूर आणि कोणत्याही हेतूविना फिरल्यानं खूप चांगले अनुभव आले. त्यातून आपलाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी जन्माला येताना काय घेऊन आले होते? आणि जेव्हा इथून जायची वेळ येईल, तेव्हा काय घेऊन जाईन? अभिनेत्री होणं हे माझ्या नशिबात लिहिलं होतं. आणि मी झालेही. त्याशिवाय आणि त्यानंतर मला माझं आयुष्य जसं जगावंसं वाटत होतं, तसं ते मी आता जगतेय. झाडंझुडपं, डोंगराच्या सावलीत, नदीच्या प्रवाहासोबत..’
‘आता आयुष्याकडे पाहताना काय वाटतं?’
‘ऋषिमुनी, गौतम बुद्ध यांना जे साध्य झालं, ते मला आता साध्य झाल्यासारखं वाटतं. तीच गहिरी शांतता. निरामय आनंद. हा प्रवास किंवा हा बदल काही एका दिवसात झालेला नाही. काहींना हे सगळं कदाचित कौतुकाचं वाटेल, तर काहींना खूप विचित्र! याबाबतीत मी कोणाची समजूत काढू शकत नाही. आणि माझ्याबाबत कोणी कसा समज करून घेतंय, हे मलाही जाणून घेण्यात रस नाही. ज्या चित्रपटसृष्टीनं मला नाव, पैसा, लोकप्रियता दिली, त्या चित्रपटसृष्टीला माझी आज किती आठवण येते अथवा नाही, या प्रश्नाचा मी विचार करून स्वत:ला त्रास करून घेत नाही. आज आपण तिथे नाही, इतकाच मी विचार करते. पूर्वी बऱ्याचदा मी आऊटडोअरला असताना पुढाकार घेऊन युनिटसाठी जेवण करीत असे. वेगवेगळे पदार्थ बनवून सगळ्यांच्या कामाचा उत्साह कायम ठेवत असे. चित्रपट चांगला बनण्यामागे असे छोटे छोटे अनेक घटक असतात. कधी त्या सगळ्या आठवणी हव्याहव्याशा वाटतात, तर कधी ते सगळं विसरून सध्याच्या शांत आयुष्याला सामोरं जावंसं वाटतं.. ’ राखी बोलता बोलता शांत होते. तिला आणखीन काही बोलायची इच्छा नाही, हे त्यातून जाणवतं. मग ती स्वत:च या शांततेचा भंग करीत म्हणते, ‘माझ्या फार्महाऊसबाहेरच्या फलकावर मी म्हटलंय- रूट्स.. आरओओटीएस. मी आतून खूप खूप आनंदी आहे, सुखी आहे, एवढंच लिहा.’
राखी सध्या काय करतेय, याचं उत्तर या भेटीत मिळालं. वैभवाच्या दिवसांतील माणसाचं वागणं आणि त्यानंतरच्या काळातील त्याचं वागणं यांत अंतर वा फरक पडण्याची कारणं शोधताना नवं काही गवसतं, तसंच राखीच्या या भेटीत झालं.
चित्रपटसृष्टीतील बरेचसे कलाकार उतरत्या काळात एका नवीन आयुष्याला सामोरे जातात. काहींना त्या बदलाशी जुळवून घेणं जमतं, तर काहींची घुसमट होते. कोणी व्यसनाधीन होतं, तर काहींच्या दुर्दैवाची कहाणी जाणून घेणंही नको वाटतं. तर काहीजण मावळतीच्या दिवसांतही कुठं कुठं फुटकळ भूमिकांतून चेहऱ्यावर चढवलेला रंग कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.
राखी या सगळ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा