डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदीलाटेत शेवटी ती भुईसपाट झाली. सरंजामशाही पद्धतीने या भागावर सत्ता गाजविणाऱ्या पद्मसिंह पाटलांनी आपल्या सत्तेच्या दहशतीची प्रतीकं खुबीने वापरत निरंकुश सत्ता उपभोगली.

एक प्रसंग :
त्या दिवशी काही गुढीपाडवा नव्हता, तरीही ‘गुढी उभारा’ असे आदेश आले होते. कार्यकर्त्यांनी चौकात रांगोळ्या काढल्या. प्रत्येकाने ‘त्यांच्या’ जंगी स्वागतासाठी पुष्पहार आणलेला होता. दुपारपासून त्यांच्या आगमनाची तयारी सुरू होती. चुलतभावाच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने ‘त्या’ नेत्याला अटक केली होती. न्यायालयाने जामीन दिल्यानं ते आता गावात परत येणार होते. गावातली स्वागताची ही जय्यत तयारी त्याकरताच होती. लांबून येणारी आपल्या नेत्याची गाडी कार्यकर्त्यांनी पाहिली आणि नेहमीची कडकडीत घोषणा दिली.. ‘डॉक्टर ऽऽऽ पद्मसिंह पाटलांचा..’!
या माणसाची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी! जाणीवपूर्वक ती घडवलेली. देहबोलीदेखील तशीच. बलदंड बाहू, करारी नजर. किंचितशी छाती पुढे. नजर न झुकणारी. चालण्याचा झपाटा एवढा, की सोबत चालणाऱ्या माणसाची दमछाक नक्की ठरलेली. कार्यकर्त्यांची बठक घ्यायला जमिनीवर बसले तरी वज्रासन घालण्याची सवय. कमावलेलं शरीर. आपल्या मनाचा थांगपत्ता चेहऱ्यावर दिसू नये, यासाठीचं अंगभूत असलेलं कौशल्य.
मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात त्यांचा ‘रॉयल स्टोन’ नावाचा मोठा शाही बंगला आहे. काहीसा त्याच पद्धतीचा एक बंगला नंतर उस्मानाबादेत त्यांनी बांधला. या शाही बंगल्यासमोरच्या पोर्चमध्ये चारचाकी गाडीबरोबर एक बुलेटही ऐटीत उभी असते. तिचा उपयोग फक्त ‘डॉक्टर’ करतात. डॉक्टर म्हणजे पद्मसिंह पाटील! विधानसभा वा लोकसभा निवडणूक लागली, की डॉक्टरांची बुलेटफेरी शहरभर निघते. फेरीत सहभागी त्यांचे उत्साही कार्यकत्रे मोठमोठय़ानं हॉर्न वाजवीत फिरतात. तेव्हा समोरून कुणी रस्तादेखील ओलांडत नाही. डॉक्टरांच्या भोवती कार्यकर्त्यांचा अक्षरश: गराडा असतो. पक्षाचे झेंडा मिरवणारे कार्यकर्ते सतत घोषणा देत असतात.
अशाच एका निवडणुकीपूर्वी एका बुलेटफेरीत डॉक्टरांसमवेत मनोगत शिनगारे नावाचा कार्यकर्ता होता. हा तोच- ज्याने पवन राजे िनबाळकरांच्या हत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या मोर्चावर दगडफेक केली होती. दगडफेक करणारा कार्यकर्ता मागे आणि डॉक्टर पुढे अशी शहरभर फेरी निघते. पद्मसिंह पाटील यांच्या राजकारणाचे मनोविश्लेषण या बुलेटफेरीत दडलेले आहे. शिनगारे हा डॉ. पाटील यांचा अलीकडच्या काळातील कार्यकर्ता. पण अशा कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे फौजच्या फौज आहे. त्यामुळे राजकीय पटावर डॉक्टरांना चितपट करताना विलासराव देशमुखांसारख्या कसलेल्या राजकारणी व्यक्तीचीही मोठी पंचाईत व्हायची. अगदी एकमेकांना इरसाल शिव्या देण्यापासून ते कार्यकत्रे पळविण्यापर्यंत नाना उद्योग पद्धतशीरपणे करणे म्हणजेच राजकारण- अशी धारणा व्हावी; किंबहुना तशीच राजकारणाची व्याख्या बनावी अशी इथे गत असल्याने उस्मानाबादकर या वातावरणाला आता सराईत झाले आहेत.
‘वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या पांढऱ्याशुभ्र घोडय़ावर मांड ठोकलेले पद्मसिंह पाटील’ हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे आवडते चित्र. ज्यांच्या दारात सदासर्वकाळ गाडय़ांचा ताफा उभा असतो. त्यांनी घोडय़ावर मारलेली हे रपेट नक्की काय सांगून जाते? अर्थात अशी घोडय़ावरून रपेट मारणारे ते एकमेव नेते नाहीत, हे मान्य; पण अशा बहुतांश नेत्यांची मानसिकता एकसारखीच असते. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ अमावस्या नावाचा सण साजरा होतो. या दिवशी सगळेजण शेतात जेवायला जातात. नेमकी याच दिवशी डॉक्टरांनी गावातून घोडय़ावरून रपेट मारली. या भागातील सत्ता माझ्याकडेच आहे, याचा तो संदेश होता. त्यांच्या समर्थकांना त्याचं एवढं कौतुक, की नंतर ती छायाचित्रे चौका-चौकांत लावली गेली. तेव्हा त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले होते. मतदार मोठे हुशार असतात. त्यांना प्रतीकांचे अर्थ लवकर समजतात. बुलेट व घोडा ही प्रतीके सत्तेचा परीघ अधिक गडद करणारी आहेत, हे नक्की.
एक प्रसंग.. सत्तापटाभोवती!
२००४ ची विधानसभेची निवडणूक होती. मतदानाचा दिवस उजाडला. त्या दिवशी गावातल्या प्रत्येकाच्या घरात ‘जनप्रवास’ दैनिकाचा अंक फुकट टाकण्यात आला होता. गावोगावी वर्तमानपत्राचे गठ्ठे पोहोचलले. त्यात एक बातमी होती : ‘डॉ. पद्मसिंह पाटील यांना पवन राजे िनबाळकरांचा पािठबा..’ शीर्षकासमोर मात्र प्रश्नचिन्ह होते. गावागावात मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला. सकाळच्या पहिल्या टप्प्यात डॉ. पाटील तेर येथे मतदान करण्यासाठी आलेले. सकाळीच त्यांना बातमीदारांनी गाठले तेव्हा त्यांनी असे काही झाल्याचे आपणास माहीत नसल्याचे सांगितले. पुन्हा त्यांना कोणी या प्रकरणी काही विचारले नाही. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना पहिल्यांदाच पवन राजे िनबाळकर यांनी आव्हान दिले होते. या बातमीने त्यांच्या गोटात अस्वस्थता होती. सकाळी आठ वाजता ते गावोगावी जाऊन खुलासा करीत होते. त्यांचे कार्यकत्रे बसवर, ऑटोरिक्षांच्या काचांवर खडूने मजकूर लिहिण्यासाठी धावले.. ‘पद्मसिंह पाटील यांना पािठबा दिलेला नाही, रेल्वे इंजिन चिन्हालाच मत द्या.’ रेल्वे इंजिन हे पवन राजे िनबाळकरांचे निवडणूक चिन्ह होते. त्या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील केवळ ४८४ मतांनी विजयी झाले.
हा प्रसंग घडला तेव्हा ‘पेड न्यूज’ हा शब्दही नव्हता. बातम्यांमुळे निवडणुकांचे निकाल बदलतात, हे आयोगाला माहीत नव्हते असे मात्र नाही. पण त्यावर अंकुश ठेवण्याची वा त्यासंबंधीच्या नियमांत बदल करण्याची तेव्हा कुणाचीच इच्छा नव्हती. एका बातमीने मिळवलेला तो विजय ‘माध्यमांना आम्ही वाकवू शकतो,’ हे सांगण्यासाठी पुरेसा होता. याच घटनेचा पूर्वार्धही मोठा रोचक आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी विरोधी उमेदवार पसे वाटत असल्याने त्याच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची अफवा पसरविली गेली. क्षणात ती बातमी गावात सर्वत्र पसरली. गावात काहीतरी ‘गडबड’ झाल्याचे व्यापाऱ्यांना लगेचच कळले. काहींनी दुकाने बंद केली. वातावरणात तणाव निर्माण झाला. तोवर संबंधितांना जो संदेश द्यायचा होता तो मात्र देऊन झाला होता.
अशा दहशतवादी क्लृप्त्यांनी समूहाची मानसिकता घडविण्याचे, किंवा ती बदलविण्याचे असे अनेक हातखंडा प्रयोग उस्मानाबादच्या मतदारांवर नेहमी केले गेले.. आजही केले जातात. कधी ते मतदारांना कळतात, कधी कळतदेखील नाहीत. आपली जरब बसविण्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरून मारामारीच केली पाहिजे असे नाही. निवडणुकांच्या राजकारणात नेमके हेच होत असे. मतदार सकाळी रांगेत उभा राहायचा तेव्हा हात जोडून उभा असलेला कार्यकर्ता ओळखीचे हसू ओठी आणायचा. त्यामुळे घडलेले प्रकार मनाच्या सांदीकोपऱ्यात ढकलून शांततेत मतदान होत असे. त्यामुळे प्रशासनही, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असा अहवाल द्यायला मोकळे होत असे. एखाद्या वेगवान चित्रपटातील घटना-प्रसंगांचा पट जसा वेगाने डोळ्यांसमोर बदलत जातो, तसे दिवस उस्मानाबादकरांनी आजवर अनुभवले आहेत. त्याचे भय कधी कोणाच्या नजरेत दिसले नाही, कारण प्रत्येकाला आपली बाजू निवडणे अपरिहार्यच होते.
पद्मसिंहांचे वक्तृत्व तसे जेमतेमच. सभा गाजविण्यासाठी रेटून खोटे बोलणे, असले कृत्य त्यांनी कधी केले नाही. सिंचनमंत्री असताना आपण कसे व किती कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, कशी विकासकामे मार्गी लावली, याची ते देत असलेली ठराविक जंत्री बातम्या लिहिणाऱ्यांना एकेकाळी तोंडपाठ होती. भारत गजेंद्रगडकरांसारखा एखादा पत्रकार वगळता त्यांच्या भाषणाविषयी आणि कृतीविषयी फारसे कुणी टीकात्म लिखाणही कधी केले नाही. त्यामुळे ‘मागील पानावरून पुढे’ असा उस्मानाबादचा विकास पुढे पुढे जात राहिला. अलीकडे तर रस्त्यावर सिग्नलसुद्धा बसविले गेले आहेत. त्याचे उस्मानाबादकरांना कोण कौतुक! ‘कपडे घ्यायला सोलापूरला नि शिक्षणासाठी लातूरला’ ही मनोवृत्ती इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेली असल्याने त्यांच्यात निवांतपणा तसा ठासून भरलेला. त्यामुळे विरोध केला तरी एखाद्या पत्रकावर भागून न्यायचं, असंच त्यांच्या विरोधकांचं राजकारण असे.
पद्मसिंहांच्या विरोधात कुणी उभे राहणे तसे अवघडच. या माणसाचे प्रचार करण्याचे तंत्रही निराळे. कार्यकर्त्यांना जवळ करण्याची तऱ्हाही न्यारी. त्यांच्या भाषेत उद्दामपणा अजिबात नसतो. विशेषत: सरकारी अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी कधी वावगा शब्द वापरल्याचे ऐकिवात नाही. परंतु त्यांची प्रतिमाच अशी, की अधिकाऱ्यांना सांगितलेले काम त्यांना नाही म्हणता येत नसे. चोकिलगम् यांच्यासारख्या एखाद्या अधिकाऱ्याचे नाव अजूनही घेतले जाते. पण पद्मसिंहांच्या प्रतिमेचा हा खेळ पद्धतशीरपणे जोपासला गेला. पद्मसिंह पाटील यांचे अनेक किस्से आजही गावोगावी चच्रेत असतात. त्यांच्या मोठेपणाचे कौतुक करताना त्यात आदर, प्रेम, दयाबुद्धी, कणव आणि औदार्य या भावना तशा कमीच असतात. शौर्य, पराक्रम असल्या शब्दांतच त्यांची स्तुती अधिक होते.
काही वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांना ऊस न देण्याचे आंदोलन छेडले होते. त्यावेळी त्याविरोधात डॉक्टर उभे राहिले. म्हणजे काय केले असेल? तर ऊसाच्या ट्रकच्या पुढे डॉक्टर दुचाकीवरून निघाले. त्यामुळे कोणी दगड मारला नाही की कोणी आंदोलन केले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील छगन भुजबळांच्या प्रवेशाचा किस्साही रंगवून सांगितला जातो. तेव्हा शिवसेनेशी द्रोह म्हणजे राष्ट्रद्रोहच असे मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात होता. गद्दार ठरवून भुजबळांवर हल्ला होईल, हे गृहीत धरून त्यांची व्यवस्था पद्मसिंह पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. यावरूनच त्यांच्या बाहुबलाची कल्पना यावी.
पवन राजे िनबाळकरांच्या हत्येच्या आरोपाखाली सीबीआयच्या अटकेत असताना डॉक्टर इअरफोन लावून जॉिगग करतानाचे छायाचित्र त्यांची मानसिकता दर्शविणारे आहे. पद्मसिंहांना राग आल्यावर ते उजव्या हाताची मूठ डाव्या तळहातावर व डाव्या हाताची मूठ उजव्या हातावर आपटतात, हे उस्मानाबादकरांना माहीत आहे. एखाद्याकडे ते जर टक लावून पाहू लागले तर दुसऱ्या एखाद्याने त्यांची नजर बाजूला वळवेपर्यंत ते तसेच रोखून पाहू शकतात. वेळप्रसंगी ते समोरच्याच्या अंगावर धावून जाऊ शकतात. अशा त्यांच्या अनेक सवयी सांगितल्या जातात. अगदी मतदान केंद्रातील मतमोजणीच्या दिवशी काढलेल्या ‘टिप्स’ अनेकांनी पाहिल्या आहेत. संदेश देण्यासाठी शारीरिक ताकद किती व कशी वापरावी, हे ते आवर्जून कळवीत असत. ज्यांनी त्यांचे हे रूप प्रत्यक्ष पाहिलेले नाही, अशांना बुलेट, घोडा ही प्रतीके पुरेशी ठरतात.
प्रतीकांची भीती दूर करण्यासाठी कोणीतरी पाय रोवून उभे ठाकावे लागते. अशी धमक असणारी दोन माणसे : एक नानासाहेब पाटील व दुसरे केरबा गाढवेगुरुजी. गुरुजींचा अवतार म्हणजे शर्टाची कॉलर मानेवर विरलेली. पांढरी खुरटी दाढी वाढलेली. अधूनमधून ब्रिस्टॉलचा झुरका घेत हा माणूस तेरणा कारखान्याच्या कारभारातील त्रुटी, त्यासंबंधीची कागदपत्रे कापडी पिशवीतून काढायचा. त्यांच्या आधारे तक्रार करायचा. परिणामी तेरणा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला. तर नानासाहेब पाटील यांनी या लढय़ाला राजकीय व्यापकता दिली. लेख लिहून आणि निवडणुकांमध्ये प्रश्न विचारणाऱ्या या मंडळींच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चाचपडायला होई. त्यांनी सहकार क्षेत्रातील चुकांवर अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित केले. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत, हे कबूल करणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे समर्थक आजही भेटतात.
पवन राजे िनबाळकरांची हत्या झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना सहानुभूती मिळत गेली. त्यांनी केलेल्या व न केलेल्या कामांनाही सहानुभूतीची झालर आपसूकच मिळाली. याचा अर्थ त्यांचा कारभार चांगला होता असे नाही. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय संघटनाची मूस त्यांच्या आक्रमक शैलीत असावी असे वाटणाऱ्यांमध्ये ते एक होते. तशी रचना लावून देताना त्या आक्रमकतेचा तेही एक भाग होते. या नात्यातील गुंता कसाही असला तरी त्याची धाटणी सारखीच होती. विशेष म्हणजे भयकारक होती, हे निश्चित.
तेव्हा तेरणा कारखाना पूर्ण क्षमतेने चालू होता. राज्याच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचा दबदबा होता. त्यांचा शब्द जवळपास अंतिम मानला जात असे. त्यांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची िहमत नव्हती. याचा अर्थ त्यांचा कारभार स्वच्छ, पारदर्शी होता असे नाही. जिल्हा बँकेत नोकरभरतीत घोटाळा झाला होता. तत्कालीन आमदार महारूद्र मोटे यांच्या कारभारावरून जिल्ह्यात प्रश्न विचारले जात होते. ते पद्मसिंहांचे जवळचे नातलग. तुलनेने फटकळ समजले जाणारे त्यांचे दुसरे नातेवाईक जीवनराव गोरे जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आपली घट्ट पकड ठेवून होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे तेव्हा मोठे कौतुक होत होते. ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री म्हणून पद्मसिंह पाटील कार्यरत असताना त्यांच्या नात्याबाहेरील व्यक्तीकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कधीच दिल्या गेल्या नव्हत्या. गावागावातून येणाऱ्या माणसांनी डॉक्टरांचे गुणगान तेवढे करावे, एवढेच त्यांच्या हाती. कोणाच्या घरात लग्न असो वा आजारपण- पसे देण्याची व्यवस्था असणारी यंत्रणा पवन राजे िनबाळकरांच्या हातात होती. परिणामी जिल्ह्यातील राजकारण नातलगांकडे आणि राज्याच्या राजकारणात मात्र डॉ. पद्मसिंह पाटील- असेच चित्र होते. जिल्ह्यातील विकासकामांच्या कोनशिला तपासल्यास याची प्रचीती येते. त्यातही मोजक्याच नातलग पदाधिकाऱ्यांची नावे दिसतील. जिल्ह्यातील अन्य नेत्यांनाही त्यात कधी स्थान नव्हते. डॉ. पद्मसिंह पाटील आणि विलासराव देशमुखांचे संबंध कायम ताणलेलेच होते. परंतु शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सुशीलकुमार िशदं यांनाही कधी राजकीय कार्यक्रमास बोलवावे असे त्यांना वाटले नाही. एकहाती कारभार असतानाही पाटलांच्या काही नातलगांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेली. घरातील वाद पराकोटीला गेले. परिणामी उस्मानाबादच्या राजकारणातील भीतीपर्व आणखीनच वाढत गेले.
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रतिमेला जबरदस्त तडा गेला तो कारगिल निधी प्रकरणात. कारगिल युद्धातील सनिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत सर्व साखर कारखान्यांनी मदत करण्याचे ठरवले होते. शेतकरी सभासदांकडून घेतलेली ही रक्कम कारखाना प्रशासनाने या निधीत भरली नाही. तेव्हापासून एकेक भानगडी बाहेर येऊ लागल्या. या प्रकरणी न्या. सावंत आयोग नेमला गेला. त्यासमोर साक्ष देणाऱ्या केरबा गाढवे आणि अन्य शेतकऱ्यांना धमक्या देण्यात आल्या. तशातच या आंदोलनात अण्णा हजारेही उतरले आणि डॉक्टरांच्या प्रतिमेस तडा जाऊ लागला. तेरणा कारखान्यात तेव्हा साखर निर्यात घोटाळा झाला होता. त्यातील प्रमुख आरोपी पवन राजे िनबाळकर हे होते. त्याचवेळी झालेल्या ३० कोटी रुपयांच्या होम ट्रेड घोटाळ्यातही तेच प्रमुख आरोपी होते. ज्या पद्मसिंहांसाठी पवन राजे िनबाळकर काम करायचे, ते पुढे त्यांच्यापासून वेगळे झाले. तेव्हा प्रश्न उपस्थित केला गेला की, पवन राजे िनबाळकर न विचारता एवढे मोठे निर्णय घेत असतील का? याचे उत्तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या समर्थकांना नीटपणे देता आले नाही. आजही या प्रश्नावर ते चाचपडतात. प्रश्न निर्णय चूक होते की बरोबर, हा नाही; तर कारभार करताना डॉक्टरांनी जवळ केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नंतर मोठय़ा गुन्ह्यात नाव आले, याचा अर्थ काय? त्यांची पारख एवढी कच्ची होती? ज्यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडूनही विरोधकांना मोदी लाट येईपर्यंत वाट पाहावी लागली, त्यांची निर्णयप्रक्रियेची वीण एवढी कच्ची कशी, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
साखर कारखाना, जिल्हा बँक या माध्यमांतून अनेकांना मदत करणारे डॉक्टर आपल्यावर नाराज असणाऱ्यांच्या घरी आवर्जून जातात. आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांची ‘काय बेटा, कसे काय?,’ अशी विचारणाही करतात. परंतु राजकीय अस्तित्वाची लढाई असते तेव्हा मात्र त्यांची भाषा बदलते. आता ते स्वत: फारसे काही करीत नाहीत. त्याचे चेलेचपाटे असले उद्योग करतात. पण एक मात्र मान्य करायला हवं, की आपल्यावरील टीका त्यांनी कधी रोखली नाही. टीका रोखण्याचे काही फुटकळ प्रयत्न पेड न्यूजच्या स्तरावर होतात; पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात कधी राजकारण केले असे नाही. पवन राजे िनबाळकर हत्या प्रकरणात सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली तेव्हाच त्यांच्यावर आरोप झाले.
एकदा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. वेळ संपली तेव्हा किती जागांवर निवडणूक होणार आहे, याची माहिती पत्रकारांना देण्यात आली. सगळ्यांनी निवडणूक होणार असे प्रकाशित केले. दुसऱ्या दिवशी काही संचालकांना वेळ संपल्यानंतरही अर्ज मागे घेण्याची मुभा अधिकाऱ्यांनी दिली. ती का आणि कशी, असे प्रश्न विचारले गेले. मा. गो. मांडुरके या निवडणूक अधिकाऱ्याची चौकशी झाली. पुढे मात्र काहीच घडले नाही. नंतर याच बँकेत ३० कोटी रुपयांचा होम ट्रेड घोटाळा झाला. बँकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात तत्कालीन अध्यक्ष पवनराजे िनबाळकर यांच्यासह संचालक मंडळाकडून ५२ कोटी ७२ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. पण ते पसे काही वसूल झाले नाहीत. कारण सहकारमंत्र्यांनी त्यात बहुतेकांना निर्दोष ठरवले. या घडामोडी सुरू असताना पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात सत्ता होती. महत्त्वाच्या संस्थांवर त्यांनी ठरवलेल्याच व्यक्तींची नेमणूक होत होती. पुढे कायद्याचा गुंता वाढत गेला, तसे राजकीय घडामोडींचे वळण बदलले. याचं कारण अहंकार व राजकीय महत्त्वाकांक्षेने परिसीमा गाठली होती. याचीच परिणती म्हणून पारसमल जैन, मोहन शुक्ल यांच्यासह उत्तर प्रदेशातील काही गुंडांची नावे उस्मानाबादकरांना ज्ञात झाली. जो राजकारणापासून दूर राहू इच्छित होते त्यांच्यासाठी हे भयपर्वच होते.
पद्मसिंह पाटलांच्या साम्राज्याला हादरे देण्याचे प्रयत्नही एकीकडे सुरू होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत एकेकाळी त्यांचे चेले असलेल्या पवन राजे निंबाळकरांनीच त्यांच्या तोंडाला भलताच फेस आणला होता. तर २००९ च्या निवडणुकीत पवन राजेंच्या खुनाच्या आरोपामुळे पद्मसिंह पाटलांना शिवसेनेच्या रवी गायकवाड यांनी नाकी नऊ आणले. त्यावेळी ते कमी मतांनी निवडून आले. त्यांची सद्दी संपुष्टात येत चालल्याचंच हे द्योतक होतं. अखेर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी नावाच्या त्सुनामीचा लाभ उठवत याच रवी गायकवाडांनी पद्मसिंह पाटलांचा गड प्रचंड मताधिक्याने उद्ध्वस्त केला. इथून पुढे उस्मानाबादचं राजकारण कोणतं वळण घेतं हे आता पाहायचं.

Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Story img Loader