देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. करोनाची अजून एक तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना त्रास होऊ शकतो असं कळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
मात्र घाबरुन न जाता आपल्या मुलांची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मुलांना करोनाची लक्षणं दिसू लागल्यास, करोनाची लागण झाल्यास त्यांची काळजी कशी घ्यावी असे प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात असतील. त्याच प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांच्या माध्यमातून जाणून घेऊ.
मुलांमध्ये करोनाची लक्षणं दिसल्यास काय कराल?
लहान मुलांमध्ये दिसणारी करोनाची लक्षणं साधारणपणे सौम्य स्वरुपाची असतात. त्यांच्यावर घरच्या घरीही उपचार करता येऊ शकतात. मात्र, जर मुलाला अस्थमा, हृदयासंबंधी विकार अशा प्रकारचे काही आजार असतील तर त्यांना अधिक धोका आहे.
मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवताना कोणत्या गोष्टी तपासाल?
१. श्वास घ्यायला त्रास होतोय का?
२. किशोरवयीन मुलांच्या छातीत त्रास होत आहे का?
3. ओठ, चेहरा काळवंडणे, कोरडा पडणे
४. त्वचेच्या स्वरुपात बदल
त्याचप्रमाणे शरीरात कोणताही बदल होत असल्यास त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेळोवेळी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे.
५. अलगीकरणाचा कालावधीः (Isolation Period)
- लक्षणं दिसणाऱ्यांसाठी- लक्षणं दिसू लागल्यापासून १० दिवस आणि लक्षणं नसतानाचे अजून तीन दिवस
- लक्षणं न दिसणाऱ्यांसाठी- चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून पुढे १० दिवस
मूल करोनाबाधित असेल, मात्र आईवडिलांना करोनाची लागण झाली नसेल तर मुलाची कशी काळजी घ्याल?
१. व्यवस्थित मास्क लावा.
२. पीपीई कीट, ग्लोव्ह्स घालून मुलाच्या आसपास वावरा.
३. मुलाला इतर कोणाजवळही सोडू नये, विशेषतः आजी आजोबांजवळ.
त्याचबरोबर पालकांनी निष्काळजीपणाने पाल्याच्या जवळ जाण्याची घाई करु नये.