केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. त्यानुसार येत्या १ मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी २८ एप्रिलपासून म्हणजे आज दुपारी चार वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आधीप्रमाणेच कोविन अॅपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याआधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
लसीकरण सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने लशीची मागणी वाढणार असून, गर्दी टाळण्यासाठी लशीची आगाऊ नोंदणी क रून वेळ ठरवून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे १८-४४ या वयोगटातील नागरिकांना नोंदणी करूनच लस घेता येईल, असे केंद्राने म्हटले आहे. मात्र, ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केंद्रात जाऊनही नोंदणी करून लस घेता येईल. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी ‘कोविन’ किंवा ‘आरोग्य सेतू’ अॅपवर २८ एप्रिलपासून नोंदणी करता येईल. लसीकरणाची प्रक्रिया व कागदपत्रे या सर्व अटी सारख्याच असतील. लसीकरणावेळी आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. या टप्प्यात लस घेण्यासाठी नाव नोंदणी कशी करायची जाणून घेऊयात…
कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?
1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका
२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा.
३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा.
४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.
६. आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.