प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. X, Y, Z आणि SPG असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना आधी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच होते. पण आता त्यांना Z + दर्जाची सुरक्षा आहे. परिस्थितीनुसार, सुरक्षेचा आढावा घेऊन सरकारकडून व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दर्जामध्ये बदल केला जातो.

आता शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

Z सुरक्षा
झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये २२ जण सुरक्षेसाठी तैनात असतात. यात चार तेच पाच एनएसजी कमांडो असतात. राज्य सरकार किंवा सीआरपीएफकडून अतिरिक्त सुरक्षा दिली जाते. या कॅटेगरीतील कमांडो सबमशीन गन आणि संवादाच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असतात. त्याशिवाय हे कमांडो मार्शल आर्ट आणि विनाशस्त्र लढण्याच्या कौशल्याने सुसज्ज असतात.

Z + सुरक्षा
Z+ कॅटेगरीमध्ये सुरक्षेसाठी ३६ जण तैनात असतात. यात दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. SPG नंतर हे दुसऱ्या दर्जाचे सुरक्षा कवच आहे. सर्व कमांडोज अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि उपकरणांनी सुसज्ज असतात.

Y सुरक्षा
या कॅटेगरीत येणाऱ्या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी ११ सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यात दोन कमांडोज, दोन पीएसओ असतात.

Y + सुरक्षा
या कॅटेगरीमध्ये कंगनाच्या सुरक्षेसाठी १० सशस्त्र कमांडो तैनात असतील. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.

X सुरक्षा
या कॅटेगरीतंर्गत फक्त दोन जण सुरक्षेसाठी दिले जातात. हे खूप सामान्य दर्जाचे सुरक्षाकवच आहे.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)

एसपीजी सुरक्षेबाबत बरीच गोपनीयता बाळगली जाते. विद्यमान आणि माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८८ साली SPG ची स्थापना करण्यात आली. सध्याच्याघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना SPG ची सुरक्षा आहे.