दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १७ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. दरम्यान, या अपघाताचं कारण टेबलटॉप रनवे असल्याचं म्हटलं जात आहे. अशाप्रकारचे रनवे धोकादायक असल्याचं म्हटलं जातं.

कोझिकोड विमानतळ हे चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पूर्वी या ठिकाणी २ हजार ८६० मीटर लांब रनवे होता. परंतु डीजीसीएच्या आदेशानंतर रनवेवरी सेफ्टी एरिया ९० मीटरवरून वाढवून २४० मीटर करण्यात आला. त्यानंतर या रनवेची लांबी २ हजार ७०० मीटर झाली. केरळमधील चार विमानतळांपैकी हे सर्वात लहान विमानतळ असल्याचं मानलं जातं.

टेबलटॉप रनवे म्हणजे काय?

सामान्यपणे विमातळाची उभारणी ही मैदानी अथवा सपाट भागावर केली जाते. मात्र डोंगराळ भागांमध्ये सपाट जागा नसल्यानं डोगराच्या वरील भागात असे विमानतळ उभारले जातात. या विमानतळावरील रनवेच्या आसपास डोंगर उतार असतो. अशा परिस्थितीत रनवेच्या एका किंवा दोन्ही बाजूंना डोगर उतार असू शकते. टेबलटॉप रनवे संपल्यानंतर पुढे फारशी जागा नसते. अशा रनवेवर विमान उतरवणं हे वैमानिकांचं कौशल्य मानलं जातं. देशात कर्नाटकातील मंगळुरू, केरमधील कोझिकोड आणि मिझोरममध्ये टेबलटॉप रनवे आहेत.

का असतो हा रनवे धोकादायक?

टेबलटॉप रनवे वरील विमानांचं लँडिंग हे धोकादायक मानलं जातं. कारण या ठिकाणी विमान उतरवताना अनेकदा ऑप्टिकल इल्युजन निर्माण होतो. तसंच विमान उतरवताना व्हिज्युअल रेफरंसमध्ये बदल होतो. वैमानिकासमोर विमान खुप वर किंवा खाली नेण्याचं एक आव्हान असतं. तसंच रात्रीच्या वेळी आणि पावसामध्ये अशा ठिकाणी विमान उतरवणं हे खुप आव्हानात्मक ठरू शकतं.

तिसऱ्या प्रयत्नात लँडिंग

रियल टाईम एअर ट्रॅफिक दाखवणारी वेबसाईट flightradar24 ने दिलेल्या माहितीनुसार ज्या लँडिंगदरम्यान हा अपघात झाला तो लँडिंगचा तिसरा प्रयत्न होता. मिळालेल्या माहितीनुसार विमान रनवे २८ वर उतरणार होतं. परंतु पावसामुळे ते लँडिंग रद्द करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्यांदा रनवे क्रमांक १० वर विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला आणि तिसऱ्यांदा विमान उतरवताना हा अपघात झाला.