गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीमेवरून केंद्र सरकारवर टीका होत होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरण केलं जाईल, असं जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र आता १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

२१ जूनपासून राज्यांना मोफत लस

२१ जूनपासून देशातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या कोट्यवधी लोकांना मोफत लस मिळाली आहे. देशात आतापर्यंत २३ कोटीहून अधिक लस दिल्या गेल्या आहेत. देशात कोविशिल्ड. कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस दिली जात आहे.

खासगी रुग्णालयात किती पैसे मोजावे लागणार?

ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नाही. ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घ्यायची आहे, त्यांचीही काळजी घेतली गेली आहे. देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना दिल्या जाणार आहेत. लसीच्या निर्धारित किंमत वगळता खासगी रुग्णालये एका डोसला १५० रुपये सेवा कर आकारू शकतील. यावर देखरेख ठेवण्याचं काम राज्य सरकारांकडेच असणार आहे.

समजून घ्या : लॉकडाउनमुळे घरात कोंडून असलेल्या मुलांच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्याल?

लसीकरण वेगाने करण्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष’

मुलं आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने डिसेंबर २०१४ ला ‘मिशन इंद्रधनुष’ सुरु केलं होतं. या योजनेंतर्गत वेगाने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. मिशन इंद्रधनुष २.० अभियान चार टप्प्यात राबवण्यात आलं होतं. पहिला टप्पा डिसेंबर २०१९, दुसरा टप्पा ६ जानेवारी २०२०, तिसरा टप्पा ३ फेब्रुवारी २०२० आणि चौथा टप्पा २ मार्च २०२० ला सुरु झाला होता. या अभियानाचा करोना लसीकरणावेळी फायदा होणार आहे. “आपल्याकडे आपली लस नसती तर भारतासारख्या मोठ्या देशाचं काय झालं असतं? आपण मागच्या ५०-६० वर्षातील इतिहास बघा तेव्हा तुम्हाला कळेल. भारताला परदेशातून लस मिळवण्यासाठी दशकं लागायची. परदेशात लसीकरण होऊन जायचं तरी आपल्याकडे लसीकरण सुरु होत नव्हतं. मात्र आता ‘मिशन इंद्रधनुष’ सुरु केलं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय?

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या दिशेने देखील दोन लसींची ट्रायल वेगाने सुरू आहे. याशिवाय आता देशात एका नेजल व्हॅक्सिनवर देखील संशोधन सुरू आहे. याला सूई वाटे न देता नाकात स्प्रे केलं जाणार आहे. देशाला जर नजीकच्या काळात या लसीवर यश मिळालं तर यामुळे भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येईल.

समजून घ्याः लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणं दिसली तर काय कराल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी

२ जूनला पाटण्यातील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. करोना लशीचा डोस घेण्यासाठी एकूण १५ मुलं आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यात ३ मुलं चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला. लस दिल्यानंतर या मुलांना जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. आता या मुलांना लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लशीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.