आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरंच. मात्र या वडापावचा जन्म नक्की कुठे झाला. तो आजच्या मॅक-डोनाल्ड्सपासून ते शेजवान वडापाव, स्वीटकॉर्न वडापावपर्यंत कसा आलाय हे जाणून घेऊयात या खास लेखामध्ये…
जन्म…
१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.
सुरुवातीचा काळ…
वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले.
रोजगाराचे साधन आणि राजकीय पाठिंबा…
१९७० ते १९८० च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसाने उद्योगात उतरावे या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.
वडापावमधील वेगळेपणाच ठरू लागली ओळख…
काळ बदलत गेला तशी स्पर्धा वाढू लागली. त्यामुळेच तोच तोचपणा टाळण्यासाठी मुंबईमध्ये वडापावचे वेगवेगळे प्रकार मिळू लागले आणि वडापावमध्ये आणलेले हेच व्हेरिएशन त्या वडापावची ओळख झाले. उदाहणच द्यायचे झाले तर कीर्ती कॉलेजबाहेरच्या वडापाववाल्याने वड्याबरोबर बेसनाचा चुरा देण्यास सुरुवात केली. तर ठाण्यातील कुंजविहारने पहिल्यांदाच मोठ्या पावाचा प्रयोग केला. सामान्यपणे दोन पावांच्या आकाराचा एक मोठा पाव कुंजविहार स्वत: बनवू लागले आणि जम्बो वडापाव ही कुंजविहारची ओळख झाली. ठाण्यातील असेच दुसरे नाव म्हणजे गजानन वडापाव. बेसनाच्या पिवळ्या चटणीमुळे हा वडापाव केवळ ठाण्यातच नाही तर मुंबईकरांमध्येही लोकप्रिय झाला आणि अनेकांनी या पिठल्यासारख्या चटणीची कॉपी करण्यास सुरुवात केली. तर कल्याणमधील वझे कुटुंबाने सुरु केलेला वडापावच्या दुकानामध्ये वडापाव ग्राहकांना खिडकीमधून दिला जायचा म्हणून तो वडापाव खिडकी वडापाव नावाने लोकप्रिय झाला.
नक्की पाहा >> मुंबईतले दहा ‘जगात भारी’ वडापाव
परदेशी व्हर्जन…
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात दाखल झालेल्या परदेशी बॅण्डसनेही वडापावचा धसका घेतला होता असं म्हणता येईल. कारण भारतीय बाजारपेठेमध्ये उतरतानाच मॅक-डोनाल्ड्ससारख्या बड्या ब्रॅण्डने भारतीयांसाठी वेगळा मेन्यू तयार केला. यामधील विशेष बाब म्हणजे वडा-पावला टक्कर देण्यासाठी मॅक-डीने ‘मॅक आलू टिक्की’ हा बर्गर स्वरूपातील वडापावचा परदेशी भाऊच जन्माला घातला. बटाट्याची पॅटी आणि पाव हे बेसिक तसेच ठेवत त्याला थोडा चकाचक लूक देऊन हा परदेशी वडापाव विकला जाऊ लागला.
फ्युजन…
वडापाव झाला, मॅक आलू टिक्कीसारखे त्याचे परदेशी भाऊही भारतामध्ये दाखल झाले आणि मग या दोघांचे फ्युजनही २००० सालापासून मुंबईकरांना उपलब्ध झाले. मुंबईतीलच धीरज गुप्ता या तरुणाने जम्बोकिंग नावाने वडापावला परदेशी लूक दिला. फरक इतकाच की ‘मॅक आलू टिक्की’मध्ये नसणारे बेसनाचे आवरण या फ्युजन वडापावमध्ये कायम ठेवण्यात आले होते. या वडापावला इंडियन बर्गर असे नाव देण्यात आल्याने मुंबईबाहेरचे लोक मुंबईच्या खऱ्याखुऱ्या वडापावऐवजी या आकर्षक दिसणाऱ्या आणि छान पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या वडापावच्या प्रेमात पडले. त्यानंतर गोली सारख्या ब्रॅण्डचा जन्म झाला. आणि स्वच्छतेच्या नावाखाली हे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झालेत असचं म्हणावं लागेल.
ब्रॅण्डेड वडापाव, स्ट्रीटफूड फेस्टीव्हल्स आणि वडापाव ट्रेल्स…
या ब्रॅण्डेड वडापावमुळे आणखीन परदेशी पदार्थांना वडापावच्या जोडीला साथ देण्यास सुरुवात केली. यातूनच चीज वडापाव, नाचो वडापाव, शेजवान वडापाव, मसाला वडापाव, स्वीटकॉर्न वडापाव, मेयोनिज वडापावसारखे भन्नाट कॉम्बिनेश्नस मुंबईकरांच्या जीभेचे चोचले पुरवू लागले. त्यातही आधी एकाच आकारात मिळणारा वडापाव ब्रॅण्डींगमुळे मिनी, नॉर्मल आणि जम्बो अशा तीन प्रकारांमध्ये मिळू लागला. आता तर साधा ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड प्रकारातही वडापाव मिळू लागले आहेत. वर्षातून अनेकदा मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सही मुंबईच्या या लाडक्या वडापावच्या प्रेमात असल्याचे त्यांनी भरवलेल्या स्ट्रीट फूड फेस्टीवलमधील वडापावच्या व्हरायटीमधून दिसून येते. तर सायकल ट्रेलसारख्या वडापाव खाद्य भटकंतीचे आयोजनही अनेक खाद्यप्रेमी करतात. या खाद्य भ्रमंतीमध्ये मुंबईतील लोकप्रिय वडापाव स्टॉल्सवरील वडापावची चव चाखण्याची संधी तर मिळतेच शिवाय त्या स्टॉलचा इतिहासही सांगितला जातो.
टेकसेव्ही वडापाव…
आज अगदी झोमॅटोवर रिव्ह्यू देण्यापासून ते स्वीगीवरून वडापाव ऑर्डर कऱण्यापर्यंत मुंबईकर टेकसेव्ही झाले असले तरी रस्त्यावरील गाडीवर किंवा प्रत्यक्षात तिथे जाऊन वडापाव खाण्यातील मज्जा काही वेगळीच आहे. म्हणूनच की आज इंटरनेटवर मुंबईतील लोकप्रिय वडापाव स्टॉलचे पत्ते सांगणारे विशेष नकाशेही गुगल मॅप्सवर सहज उपलब्ध आहेत.
येथे क्लिक करून पाहा मुंबई शहराचा वडापाव स्पेशल मॅप
परदेशातही वडापावचा बोलबाला…
>
अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतला विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएच.डी. केली आहे.
>
लंडनमध्ये मुंबईतील रिझवी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे. सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) या दोघांनी सुरु केलेल्या श्री कृष्ण वडापाव नावाच्या या हॉटेलच्या उद्योगातून ते आज वर्षाला चार कोटींहून अधिक रुपये कमावतात.
मुंबईतील उत्तम वडापाव मिळणारी काही ठिकाणे…
आराम वडापाव
श्री कृष्णा बटाटावडा
मामा काणे
आस्वाद
चेंबूर जीमखाना
अशोक वडापाव
किर्ती वडापाव
ठाण्यातील उत्तम वडापाव मिळणारी काही ठिकाणे…
कुंजविहार
गजानन वडापाव
राजमाता वडापाव
दुर्गा वडापाव
संतोष वडापाव
तुम्हाला कोणता वडापाव आवडतो? कमेन्ट करुन नक्की कळवा.
संकलन: स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com