सध्या २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरु आहे. दोन आठवड्यांनंतर म्हणजेच ३१ मार्च २०२३ रोजी चालू आर्थिक वर्षाचा शेवट होणार आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शासनाद्वारे दिलेली काही ठराविक कामे प्रत्येकाला पूर्ण करावी लागतात. यामध्ये उशीर झाल्यास दंड भरावा लागू शकतो. सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या कामांची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे या कामांना लवकर सुरुवात केल्यास २०२२-२३ आर्थिक वर्ष संपण्याआधी त्यांची पूर्तता होऊ शकेल. जर तुम्ही या गोष्टी वेळेत केल्या नाहीत, तर तुम्ही कर लाभ किंवा इतर कोणताही मोठा फायदा घेण्यापासून वंचित राहू शकता.
१. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या संस्थेने परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. तेव्हा तुमचं पॅन-आधार लिंक नसेल, तर तुम्ही नवीन आयकर वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन शकता.
२. २०२२-२३ हे चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सर्व कर-बचत गुंतवणूक एकाच ठिकाणी संकलित करावी. बचतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. पगारदार करदात्यांसाठी कलम 80C अंतर्गत सर्वात जास्त कर बचत करण्याची संधी मिळते. यामध्ये १.५ लाख रुपयांची कपात करण्याची परवानगी करदात्यांना आहे.
३. पगारदार व्यक्तीला वर्षाच्या मध्यात कोणत्याही नव्या संस्थेमध्ये सहभागी झाल्यास फॉर्म 12 B हा आयकर फॉर्म देणे आवश्यक समजते जाते. २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही नव्या कंपनीमध्ये कामाला लागले असाल, तर नवीन उत्पन्नाचा अहवाल देण्यासाठी फॉर्म 12 B चा वापर करा. ३१ मार्च २०२३ पूर्वी या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे, तुम्ही ज्या नव्या कंपनीमध्ये नोकरी करत आहात, त्या कंपनीला अचूक प्रमाणामध्ये TDS कापणे शक्य होईल.
४. ३१ मार्च २०२३ ही आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी विलंबित ITR दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. जर तुम्ही ITR वेळेत भरला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
५. एसबीआय, एचडीएफसी बॅंक, इंडियन बॅंक, आयडीबीआय बॅंक आणि पंजाब अँड सिंध बँक अशा काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष मुदत ठेव योजना जाहीर केल्या होत्या. या सर्व एफडी योजनांचा शेवटदेखील ३१ मार्च रोजी होणार आहे. त्याव्यतिरिक्त एसबीआय अमृत कलश मुदत ठेव, एचडीएफसी बॅंक सीनिअर केअर मुदत ठेव योजना, इंडियन बॅंक इंडिया शक्ती 555 डेज मुदत ठेव योजना, आयडीबीआय बॅंक नमन ज्येष्ठ नागरिक ठेव आणि पंजाब अँड सिंध बँक विशेष मुदत ठेव योजना अशा काही विशेष मुदत ठेव योजनांची मुदतही ३१ मार्चला संपणार आहे.
६. जर तुम्ही बॅंकेच्या खात्याचा तपशील अपडेट केला नसेल, तर लवकरात करुन घ्या. कारण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बॅंक खात्यांचे KYC करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे असे घोषित केले आहे.
आणखी वाचा – Gig Economy : भारतात ९ कोटी रोजगार निर्मितीची क्षमता!
७. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या केंद्राच्या संस्थेने दीर्घकालीन भांडवली नफा कर म्हणजेच (long-term capital gains – LTCG) कर भरणे टाळण्यासाठी कलम 54 GB चा वापर करायची इच्छा असणाऱ्यांसाठी मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ जानेवारी २०२३ रोजी संस्थेने जाहीर केलेल्या सूचनापत्रकानुसार, ज्यांनी घर अथवा अन्य भांडवली मालमत्ता विकून LTCG मिळवला आहे. अशा लोकांना १ एप्रिल २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान त्यांचे कर दायित्व कमी करण्यासाठी LTCG ची गुंतवणूक विशिष्ट साधनांमध्ये करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.