What is 75 Hard Challenge Ankit Singh: सोशल मीडियावर राम राम भाई सारेयाने.. असं म्हणत एका तरुणाचा ७५ हार्ड डे चॅलेंजचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अंकित बयानपुरिया सिंग नामक हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपलं ७५ हार्डचं चॅलेंज करताना प्रत्येक दिवशी एक रील पोस्ट करतो आणि २४ तासाच्या आत त्याची प्रत्येक रील साधारण १० लाखाच्या वर व्ह्यूज मिळवत व्हायरल होत आहे. या ७५ हार्ड चॅलेंजची माहिती देताना अंकितची बोलायची खास शैली सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अंकित या चॅलेंजमुळे इतका प्रसिद्ध झाला आहे की आता इंस्टाग्रामवर सुद्धा त्याचे ३ मिलियन म्हणजे साधारण ३० लाख फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. भारतात ७५ हार्ड हे चॅलेंज अंकितमुळेच जास्त चर्चेत आले असले तरी या चॅलेंजची निर्मिती कुठे झाली? नेमकं हे चॅलेंज आहे तरी काय? शिवाय या चॅलेंजचे नियम, तुमच्यासाठी हा प्रयोग किती फायदेशीर ठरू शकतो या सगळ्याची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया..
तर मुळात ७५ हार्ड हे चॅलेंज अँडी फ्रीसेला यांनी तयार केले आहे. या चॅलेंजचे जर एखाद्याने पालन केले तर त्यांना आयुष्यात १०० टक्के चांगल्या सवयी लागू शकतात असेही फ्रीसेला यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते ७५ हार्ड चॅलेंज पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास, स्वतःवरील प्रेम, स्वतःविषयी आदर, शिस्त, स्वावलंबन, व स्वभावातील कणखरपणा असे अनेक पैलू जोडले जाऊ शकतात. जरी ७५ हार्डमध्ये फिटनेस हा मुख्य घटक आहे तरी मानसिक, आध्यत्मिक व बौद्धिक पातळीवर सुद्धा हे चॅलेंज व्यक्तीचे आयुष्य पालटून टाकू शकते.
७५ हार्ड या चॅलेंजमध्ये पाच लक्षवेधी मुद्दे किंबहुना नियम असतात ज्याचे पालन ७५ दिवसांसाठी करणे आवश्यक असते. सर्वात आधी हे पाच नियम काय आहेत हे जाणून घेऊया..
- शून्य प्रमाणात मद्यपान आणि जंक फूड बंद
- दररोज दोन वेळा ४५ -मिनिटांचे वर्कआउट पूर्ण करा, त्यापैकी एक हे घराबाहेर असणे आवश्यक आहे.
- दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या.
- दररोज शैक्षणिक किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तकाचे १० पाने वाचा.
- दररोज एक सेल्फी घ्या जेणेकरून तुम्हाला चॅलेंजच्या शेवटी स्वतःमधील बदल नीट पाहता येईल.
या नियमांसह आणखी एक मोठा व महत्त्वाचा भाग म्हणजे यातील एकही गोष्ट जर तुमच्याकडून चुकली किंवा राहून गेली तर आपल्याला पूर्ण चॅलेंज पहिल्यापासून पुन्हा सुरु करावे लागते.
तुमच्यासाठी 75 हार्ड प्रोग्राम योग्य आहे का?
जर तुमच्याकडे वेळ आणि इच्छा असेल तर, 75 हार्ड चॅलेंज तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.
तथापि, तुम्ही योग्य योजनेचे पालन करत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्हाला फिटनेस आणि डाएट नीट प्लॅन करावे लागेल. जर तुम्ही खरोखरच दररोज ९० मिनिटे व्यायाम करत असाल तर व्यायामाचे काही दिवस इतर दिवसांपेक्षा हलके असावेत. तसेच तितकी ऊर्जा राखून ठेवण्यासाठी तुमचा आहार सुद्धा सकस असायला हवा.
जर तुम्ही अगोदरच स्वतःच्या शरीराविषयी, खाण्याविषयी किंवा राहणीमानाविषयी अत्यंत नकारात्मक असाल आणि चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला सहज मनाची तयारी करता येत नसेल तर तुम्ही हा विचार सोडून द्यायला हवा. याचा बहुतांश प्रभाव हा मानसिक असतो त्यामुळे तुम्हाला चॅलेंज आधी व दरम्यान मन भक्कम करणे आवश्यक असते.
(टीप: वरील लेख हा माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)