दारूच्या दुकानांमध्ये गेल्यावर मोठ्या बाटल्या आकर्षक अशा बॉक्समध्ये पॅक केलेल्या दिसतात. त्यावर लिहिल्या ब्रॅण्डच्या माहितीवरून, नावावरून लोक दारू खरेदी करतात. पण, काही मद्यविक्री करणाऱ्या कंपन्यांनी हे बॉक्स काढून टाकायचे ठरवले आहे. मोनो कार्टन बॉक्सशिवायच आता दारूची मोठी बाटली मिळणार आहे. पण, दारू कंपन्यांनी बॉक्स काढून टाकायचे का ठरवले, याचे काय परिणाम होणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
सध्याच्या काळात दारू म्हणजे काय, हे माहीत नसणाऱ्या व्यक्ती कमी आहेत. दारूच्या दुकानांमध्ये दारूच्या लहान आकाराच्या बाटल्यांपासून मोठ्या आकाराच्या बाटल्यांपर्यंतचे प्रकार दिसतात. यातील काही बाटल्या या आकर्षक अशा बॉक्समध्ये पॅक केलेल्या असतात. हे बॉक्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, ब्रॅण्डची माहिती देण्यासाठी खासकरून असतात. सीग्राम आणि इतर नामांकित अल्कोहोलनिर्मितीमधील कंपन्यांनी मोनो कार्टन बॉक्समध्ये बाटल्या पॅक करणे बंद केले आहे. म्हणजेच आता दारूच्या दुकानांमध्ये केवळ काचेच्याच बाटल्या विक्रीसाठी असतील. त्यावर कोणतेही कागदी आवरण असणार नाही.
दारू कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. वस्तुतः दारूच्या बाटली बाहेर असणाऱ्या बॉक्सचा ग्राहकाला काही उपयोग नसतो. अशा बॉक्समुळे कचऱ्यामध्ये वाढ होते. हे बॉक्स केवळ ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी असतात. त्यावरील ब्रॅण्डचे नाव, माहिती ग्राहकाला आकर्षित करू शकते. यापलीकडे ग्राहकाला त्याचा कोणताही फायदा नसतो.
सध्या कचऱ्याचे वाढते प्रमाण, प्रदूषणाची समस्या, या बॉक्सच्या निर्मितीसाठी होणारी वृक्षतोड, बॉक्सची कमी असणारी उपयोगिता यामुळे मद्यविक्री करणाऱ्या कंपन्यांनी केवळ काचेच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला.या काचेच्या बाटल्यांमध्ये एक टॅग असून त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास दारू विक्री करणाऱ्या कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळते. #वनफॉरअवरप्लॅनेट ही मोहीम दरवर्षी मोनो कार्टन लिकर बॉक्स अडीच लाखांहून अधिक झाडांची तोड थांबवण्यासाठी राबवण्यात येत आहे. .
कार्टन बॉक्स, त्यातील कागद बनवण्यासाठी वृक्षतोड होते. या बॉक्सचा नंतर काही उपयोगही होत नाही. तापमानवाढीची समस्या भेडसावत असताना विनाकारण होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी मद्यविक्री करणाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.