Persia to India Irani Chai History : चहा हा जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातलाच एक अविभाज्य घटक झाला आहे. चहा घेऊन दिवस सुरु करणारे बहुतांश लोक भारतात आहेत. कटिंग चहापासून ते अगदी फुल चहा पिणारेही चहाबाज आपल्याला आढळतात. मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईत तर शेकडो कप चहा रोज उकळला जातो. कटिंगच्या ग्लासात चहा पिण्याची मजा काही औरच असते यात शंका नाही. या सगळ्या चहा पुरणात एक गोष्ट आजही टिकून आहे ती म्हणजे इराणी चहा. इराणी चहा हा प्रकार कुठून आला? तुम्हाला माहीत आहे का? चहा जाणून घेऊ इराणी चहाचा इतिहास.
इराणी चहाचा इतिहास काय सांगतो?
इराणी चहा मुंबईसह भारतात १९ व्या शतकात आला आहे. प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांनी ही माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली. झोराष्ट्रीयन म्हणजेच पारशी समुदायतले अनेक निर्वासीत भारतात आले. त्यांनी येताना जशी त्यांची संस्कृती या ठिकाणी आणली तसाच आणला तो पर्शियातला म्हणजेच आत्ताच्या इराणचा इराणी चहा. मुंबई, पुणे आणि हैदराबाद या ठिकाणी अजूनही इराणी चहा मिळतो. या चहाची लज्जत काही औरच असते यात काहीही शंका नाही.
इराणी चहाची मूळं पर्शियात
ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधायला जाऊ नये म्हणतात. पण इराणी चहाचं मूळ शोधलं तर ते पर्शियन अर्थात पारशी संस्कृतीतच दडलंय. पर्शियात चहा मिळण्याचे काही खास स्टॉल्स होते. त्यातून हा चहा भारतात आला आहे. निर्वासित इराणी नागरिकांचं चहा प्रेमच इराणी चहा भारतात घेऊन आलं आणि भारतात इराणी चहाची संस्कृती रुजली आणि ती हळूहळू इथलीच झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
इराणी चहाबाबत शेफ हरपाल सिंग सोखी यांनी काय सांगितलं?
इराणी चहाबाबत शेफ सोखी सांगतात, इराणी कॅफे ही फक्त चहाची दुकानं नव्हती तिथे समाजकारणाच्या गप्पाही चालत असत. शेफ सोखी यांनी सांगितल्याप्रमाणे इराणी चहाचा भारतीय संस्कृतीशी मिलाफ झाला. कारण इथे आल्यानंतर त्यात मलईदार दूध, साखर यांचं सुंदर मिश्रण त्यात मिसळलं गेलं. भारत आणि इराण यांच्या खाद्यसंस्कृतीतूनच इथे मिळणाऱ्या इराणी चहाचा जन्म झाला आहे. इराणी चहा पिणं हा एक खास अनुभव आहे यात शंका नाही. विशिष्ट कपात भरपूर दूध, माफक गोड असलेला आणि काहीसा गडद चवीचा गुलाबी चहा भुरका मारुन पिताना जी मजा येते त्या आनंदाला सीमा नाही. त्याच्या जोडीला बन मस्का आणि किंवा ब्रेड बटर जरी असेल तर मग बातही बन गयी. भारतीयांना हा प्रकार आवडला आणि त्यांनी तो आपसूकच आपलासा केला. मूळ इराणमध्ये तयार होणाऱ्या इराणी चहामध्ये दूध मिसळलं जात नसे. भारतीय संस्कृतीत तो रुजल्यानंतर तो चहा दुधाचा झाला. याच चहाला पानी कम असंही म्हटलं जाऊ लागलं.
हैदराबादमध्ये सर्वात आधी लोकप्रिय झाला इराणी चहा
शेफ सोखी पुढे म्हणाले, इराणी चहा हैदराबादमध्ये खूप लोकप्रिय झाला. तसंच त्याच्या साथीला बन मस्का आणि उस्मानिया प्रकारातली बिस्किटं खाण्याचाही ट्रेंड आला. इराणी चहा हा भारतीय चहापेक्षा वेगळा असतो. आटवलेलं घट्ट दूध त्यात घालण्यात येतं त्यामुळे त्याला एक प्रकारची मलईदार आणि दिलखुश करणारी चव असते. मुंबई, पुणे आणि हैदराबाद या ठिकाणी गेलात तर इराणी कॅफेतल्या पानी कम किंवा इराणी चहाची चव घ्यायला विसरु नका.