Most Expensive Wood In the World: नवीन घर किंवा राजवाडा बांधण्यासाठी आपण अनेक लाकडांचा वापर करतो. तसंच घरातील अलिशान फर्निचरसाठीही लाकडाच्या वस्तूंचा वापर करतो. यामध्ये सोफा, बेड, अलमारी किंवा दरवाजे यांचा समावेश असतो. वेगवेगळ्या झाडांच्या लाकडांची किंमतही फरक असतो. सर्वात महागड्या लाकडाबद्दल बोलायचं झालं, तर लोक म्हणतील चंदनाचं लाकूड सर्वात महाग आहे. विशेषत: लाल चंदनचाच दाखला सर्वजण देतील. भारतात अनेक लोकांना असंच वाटतं की, चंदन जगातील सर्वात महाग लाकूड आहे. पण सत्य काहीसं वेगळं आहे. कारण चंदनापेक्षाही १०० पटीने महाग एक लाकूड आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
चंदनापेक्षा १०० पटीने महाग आहे ‘हे’ लाकूड
भारतीय लोक चंदनालाच सर्वात मूल्यवान लाकूड मानतात. पण वास्तविकपणे तसं नाहीये. जगात एक लाकूड असं आहे, ज्याची किंमत चंदनापेक्षाही १०० पटीने जास्त आहे. ‘अफ्रिकन ब्लॅक वूड’ (African Blackwood)असं या लाकडाचं नाव आहे. चंदनाची किंमत प्रति किलो ७ ते ८ हजार रुपयांमध्ये असते. तर अफ्रिकन ब्लॅक वू़डची किंमत प्रति किलो ७-८ लाख रुपये असते. हे लाकूड पृथ्वीवरील सर्वात मूल्यवान गोष्टींपैकी एक मानलं जातं. १ किलो लाकूड विक्रि केल्यावर तुम्ही एखादी कार खरेदी करू शकता, एवढं हे लाकूड मूल्यवान आहे.
६० वर्षांत पूर्णपणे तयार होतं झाड
‘आफ्रिकन ब्लॅक वूड’चं झाड फक्त २६ देशांत आढळतं आणि विशेषत: आफ्रिकी महाद्विपच्या मध्य आणि दक्षिण भागातच ही झाडे आढळतात. या झाडाची सरासरी लांबी २५ ते ४० फूट असते आणि ते पूर्णपणे वाढण्यात ६० वर्ष लागतात. परंतु, आता या झाडांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे या झाडांच्या किमतीत वाढ होत आहे.
या लाकडाचा वापर कशासाठी करतात?
आफ्रिकन ब्लॅकवूडपासून शहनाई, बासरी आणि संगीत क्षेत्रातील अन्य वाद्ययंत्र तयार केले जातात आणि या लाकडाचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठीही केला जातो. या लाकडापासून बनवलेले फर्निचर महाग असतात आणि श्रीमंत माणसं या लाकडाने बनवलेल्या वस्तूंची खरेदी करून घरी सजावट करतात.
लाकडाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात सैनिक
या लाकडाची तस्करीही वाढली आहे. कारण या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. या झाडांची संख्या कमी होत असल्याने तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. काही देशात या झाडांच्या सुरक्षेसाठी शस्त्रासह सैनिक तैनात करण्यात आले आहेत.