Men Dress Up As Women in Garba: शारदीय नवरात्रीचा उत्सव ३ ऑक्टोबर पासून देशभरात सुरू झाला. गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर देवीचं आगमन झालं. लोक या उत्सवात हिरीरीने सहभाग घेतात. खासकरून सायंकाळी होणाऱ्या गरब्याचं एक वेगळंच आकर्षण दिसून येतं. देवीच्या या उत्सवात देशभरात विविध प्रथा-परंपरा जोपासल्या जातात. बंगालमध्ये केली जाणारी दुर्गा पूजा, महाराष्ट्रात शक्तीपीठ असलेल्या ठिकाणी केली होणारे जत्रोत्सव आणि गरब्याची परंपरा जिथून लोकप्रिय झाली, त्या गुजरातपर्यंत अनेक परंपरा आहेत. अहमदाबाद शहरात अशाच तऱ्हेने सुमारे २०० वर्षांपासून एक परंपरा जोपासली जात आहे. ज्यामध्ये पुरुष महिलांचे वस्त्र घालून गरब्यात सहभागी होतात.

अहमदाबादमध्ये नवरात्री दरम्यान एका समाजाचे पुरुष महिलांची घागरा-चोळी, साडी घालून गरबा खेळताना दिसतात. २०० वर्षांपासून ही परंपरा चालत आल्याचे सांगितलं जातं. अहमदाबादच्या ‘साडू माता नी पोल’ येथे ही परंपरा जपली जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच महाष्टमीला बारोट समाजाचे पुरुष महिलांसारखे नटून थटून गरब्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतात. या परंपरेला ‘शेरी गरबा’ असंही तिथं म्हटलं जातं.

ही परंपरा सुरू होण्याचं कारण काय?

ही परंपरा एका शापातून सुरू झाल्याचं सांगितलं जातं. २०० वर्षांपूर्वी ‘साडू माता’कडून शाप मिळाल्यानंतर बारोट समाजाचे पुरुष प्रायश्चित म्हणून ही परंपरा जोपासत आहेत. आज जगात हे ऐकायला थोडं अजब वाटत असलं तरी साडू मातेला माननाऱ्या लोकांचा हा श्रद्धेचा विषय आहे. भारतात मुघलांचा शेवटचा काळ असताना साडूबेन नावाच्या एका महिलेवर मुघल सरदाराची वाईट नजर पडली. साडूबेननं स्वतःच्या रक्षणासाठी बारोट समाजाकडून मदत मागितली. पण साडूबेनचं रक्षण करण्यात त्याकाळी समाजातील लोकांना अपयश आलं. या घटनेत साडूबेनच्या बाळाचं निधन झालं. यानंतर साडूबेननं संपूर्ण समाजातील पुरुषांना शाप दिला. तुमच्या भावी पिढ्या भ्याड असतील, असा शाप देऊन साडूबेननं आत्मदहन केलं.

साडी घालून सर्व पुरुष मंदिराजवळ एकत्र जमतात. (Express photo by Nirmal Harindran)

शापातून मुक्त होण्यासाठी महिलांचे वस्त्र घालून गरब्यात सहभाग

साडूबेनच्या निधनानंतर तिच्या आत्म्याला शांतता मिळावी आणि या शापातून मुक्त व्हावे, यासाठी अहमदाबादमध्ये साडू माता मंदिर बांधले गेले. याच मंदिराजवळ दरवर्षी बारोट समाजाचे पुरुष एकत्र येऊन महिलांचे वस्त्र परिधान करत गरबा खेळतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही तशीच कायम राहिली आहे. या परंपरेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी शहरातील अनेक भागातील लोक याठिकाणी नवरात्रीमध्ये येत असतात.

बारोट समाजातील पुरुषांनी ही परंपरा मोठ्या श्रद्धेने आणि नम्रतेने आजवर पाळली आहे. एकीकडे महिलांना दुय्यम वागणूक मिळत असतानाच पुरुष अशाप्रकारे महिलांचे कपडे कुठलीही भीड भाड न ठेवता परिधान करून मोठ्या आनंदाने गरबा खेळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं.