Ajit Pawar Property & Salary: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर महाराष्ट्र सत्तासंघर्ष भाग तीन चर्चेत आला आहे. अजित पवारांनी कालच राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची व छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या नऊ आमदारांचा जाहीर पाठिंबा असलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीतुन दोन तृतीयांश आमदारांचा गट आपल्या पाठीशी असल्याचा सुद्धा दावा केला आहे. यापूर्वी सुद्धा अशाच नाट्यमय पद्धतीने अजित पवार पहाटेच्या शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री झाले होते. आता राष्ट्रवादीत उभी फूट पाडून बाहेर पडलेले अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या एकूण कमावलेल्या संपत्तीचा आढावा घेऊया…
२०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या नावे तब्बल २७ कोटीहून अधिक किमतीची मालमत्ता आहे. तर पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ४७ कोटींहून अधिक रकमेची मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये पवारांकडे पुण्यातील २० ठिकाणच्या जमिनी, चार निवासी इमारती व एक कर्मशियल इमारत आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ६ शेतजमिनी, २९ भूखंड व तीन निवासी इमारती आहेत.
जंगम मालमत्तेच्या रूपात सुनेत्रा पवार ६१ लाखाचे दागिने, एक ट्रॉली, एक इनोव्हा कार व एक ट्रॅक्टर आहे तर अजित पवार यांच्या नावे दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर व १३ लाखाहून अधिक किमतीच्या सोन्या- चांदीच्या वस्तू आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेल्या गाड्यांची एकूण किंमत सुमारे ८९ लाख रुपये इतकी आहे. अजित पवार यांनी १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावावर २ कोटी ६८ लाखांचे कर्ज आहे.
दरम्यान, आता नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना शासनाकडून दरमहा ३ लाखापर्यंत पगार तसेच मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि सुविधा दिल्या जातील.