नव्या वित्त वर्षाच्या अर्थसंकल्प बांधणीची तयारी अखेर सोमवारपासून (२० जानेवारी २०२०) सुरु झाली. २०२०-२१ साठीच्या अर्थसंकल्पीय कागदपत्र छपाईची औपचारिकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानीत पूर्ण केली. या प्रक्रियेतील महत्वाच्या सहकाऱ्यांना हलवा देऊन सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय कागदपत्र छपाईच्या कामाचा श्रीगणेशा केला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हेही उपस्थित होते. निर्मला सीतारामन या येत्या एक फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तोपर्यंत दिल्लीतील अर्थ मंत्रालयाच्या ‘नॉर्थ ब्लॉक’ कार्यालयात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मात्र दरवर्षी अशाचप्रकारे हलवा प्रक्रियेने अर्थसंकल्प छापण्यास सुरुवात केली जाते. यानंतर अर्थसंकल्प छापून होईपर्यंत पूर्णवेळ या प्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचारी कार्यालयातच थांबतात. अर्थसंकल्पातील कोणताही मजकूर वा तरतूद संसदेत सादर होण्यापूर्वी बाहेर जाऊ नये, यासाठी ही खातरजमा केली जाते. या प्रक्रियेला ‘हलवा सेरिमनी’ असं म्हणतात. पण असं का करतात आणि त्यानंतर काय होतं हे अनेकांना ठाऊक नसतं. आज आपण याच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
सामान्यपणे दरवर्षी अर्थ संकल्पाच्या छपाईला ‘हलवा सेरिमनी’नंतर नॉर्थ ब्लॉकमध्ये सुरुवात करण्यात येते. ‘हलवा सेरिमनी’नंतर पुढील १५ दिवस अर्थमंत्रालयातील अर्थसंकल्प छपाशी संबंधित कर्मचारी मंत्रालयातच कैद होतात. संपूर्ण अर्थसंकल्पाची छपाई झाल्याशिवाय त्यांची मंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. अर्थमंत्री याच सर्व कर्मचाऱ्यांना हलव्याचे वाटप करुन तोंड गोड करुन अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करण्यासाठी मंजूरी देतात.
अर्थसंकल्प सादर होण्याआधी अर्थमंत्रालयातील या कर्मचाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्येच रहावे लागते. एकदा हे कर्मचारी इथे कैद झाल्यानंतर अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडण्याची परवानगी मिळते. अर्थसंकल्पाची छपाई ही अत्यंत गोपनीय गोष्ट असल्याने या कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी संपूर्ण जगाशी संपर्क तोडावा लागतो. या काळात या कर्मचाऱ्यांसाठी विशेष डॉक्टरांचे पथकही नेमलेले असते. मात्र या डॉक्टरांना अर्थमंत्रालयात जाण्याची परवानगी नसते. गरज पडल्यास कर्मचारी त्यांना येऊन भेटू शकतात.
अर्थसंकल्पाच्या छपाईच्या काळात अर्थमंत्रालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला अर्थ मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. छपाईशी संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाहेर येण्यास किंवा आपल्या सहकार्यांना भेटण्यासही परवानगी दिली जात नाही. जर एखाद्याला मंत्रालयातला भेट देणे खूपच गरजेचे असले तर त्याला सुरक्षा रक्षकांच्या कड्यामध्ये आणि चौकशीनंतरच मर्यादित काळासाठी आतमध्ये प्रवेश दिला जातो.